Monday 4 September 2023

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात



२० जानेवारी २०२३

 बालगाव आश्रमात गुरुवंदना 

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री गुरुदेव आश्रमात गुरुवारी गुरुवंदना कार्यक्रम झाला. न बोलावता, कोणाला निमंत्रण न देता हजारो साधक आपले श्रद्धेय गुरू ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींना वंदन करण्यासाठी एकत्र आले होते. यात भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. आरती गायनासह साधकांनी सोबत आणलेल्या पणत्यांनी आरती करुन ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींना वंदना केली. 

श्री बसवलिंग स्वामीजी, अध्यक्ष ज्ञानयोश्रम, विजयपूर

आ तनुवेल्ला लिंग काणा रामनाथा... या वचनाप्रमाणे श्री सिद्धेश्वर स्वामीजी आपल्यात ज्योतीप्रमाणे आहेत. ते आता सागर झाले आहेत.

बयलू बयलन्नू बित्ती बयलादरु नम्म शरणरु... आपण स्वामीजींना पाहिलो, ऐकलो, त्यांची सेवा केलो. त्यांचे जीवन आपल्यात आहे.  स्वामीजींनी सांगितलेल्या ज्ञान, भक्तीचा दीप तेवत ठेवा. 




अमृतानंद स्वामीजी

समाजात चर्चा आहे, श्री गुरुदेव सिद्धेश्वर स्वामीजींनी आपले कोणतेही अस्तित्व ठेवले नाही. त्यांनी दगड, लाकूड,  सोने या माध्यमातून त्यांनी कोणतेही अस्तित्व ठेवले नाही. मात्र, ते आज अनेक लोकांत आहेत. कोणीही व्यक्ती इतक्या लोकांच्या हृदयात राहिले नाहीत. १२ व्या शतकात विजयपूर बसवण्णांच्या भक्तीमुळे लोकप्रिय झाले. तर २१ व्या शतकात श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी ज्ञानाद्वारे अनेकांचे जीवन उजळवल्याने लोकप्रिय झाले. गुरुदेवांच्या वाणीला, ज्ञानाला, आचरणाला मृत्यू नाही. त्यांची वाणी असेपर्यंत विचार, ज्ञानाला मृत्यू नाही. ते देहरुपात असेपर्यंत त्यांच्या अस्तित्वाला सीमा होती. मात्र,  आता ते सर्वत्र आहेत. ते विचार, ज्ञानरुपाने प्रत्येकात आहेत. त्यांच्या ज्ञानाचा दीप सर्वत्र आहे. ते प्रकाशमय करण्यासाठी  आपण साधन बनले पाहिजे. आपले मन तेल, वात झाल्यावर ते प्रकाशमय होईल.

गुरुदेवांनी शरीर सोडले, आता ते बयलू रूप झाले. ते बयलू पूजक होते. सर्वत्र बयलू आहे. 

प्रत्येक झोपडी, घर, परिसर बयलू आहे. गुरुदेव लिंगैक्य झाल्यानंतर १८ तासांत लक्षावधी लोक दर्शनासाठी जमले. ते पाहून देशातील लोक आश्चर्यचकित झाले. असेही ज्ञानी असू शकतात, हे पाहून ते अचंबित झाले.  गुरुदेवांनी ज्ञानासाठी जीवन समर्पित केले.ते योगमय जीवन जगले. स्वामीजींच्या अपरोक्ष रेकॉर्डिंग केलेले

१० हजार प्रवचने उपलब्ध आहेत. जात, धर्म, राजकारण, हवे, नको विरहित ते जीवन जगले. ते बुद्धासमान राहिले. ते खिसा नसलेले संत होते. हा खिसा कधीही भरणार नाही, हे त्यांनी जाणले होते. त्यांचे दैहिक, बौद्धिक सामर्थ्य प्रचंड होते. ते रोज हजारो साधकांना भेटायचे, संवाद साधायचे. परंतु ते कधीही त्रासले नाहीत. त्यांना पाहिल्यास साधकांना आनंद व्हायचे. 

बाबुराव होनवाड

 श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्याला बोलण्यासारखे वागायला सांगितले. 

वाणी, शारिरीक तपश्चर्या, संयम हे आपण त्यांच्याकडून घ्यायला हवे. ते स्वामी

विवेकानंद,  रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी, ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे होते. आता लिंगैक्य झाल्यानंतर ते निसर्गात आहेत. ते कोणाला दीक्षा, आशीर्वाद न देता सर्वांचे गुरू आहेत.

सिद्धेश्वरांची बयलू यात्रा

 


५ जानेवारी २०२३

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी सोमवारी (दि. २) वैकुंठ एकादशी दिवशी उत्तरायण कालात देहत्याग केला. त्यानंतर मंगळवारी (दि. ३) रात्री त्यांच्या पार्थिवावर स्वामीजींच्या इच्छेनुसार अग्निसंस्कार झाले. दरम्यान, लाखो लोकांनी शिस्तबद्धरीत्या त्यांचे अंतिम दर्शन घेतले. ती गर्दी अंतिम संस्कारानंतर बुधवारीही थांबली नव्हती. तर गुरुवारी चिताभस्म संग्रहावेळीही ती होती. अनेक भाविक साश्रुनयनांनी चिताभस्म देण्याची विनंती करत होते. मात्र, आश्रमाने ते कठोरपणे नाकारले आहे. कारण ते स्वामीजींच्या इच्छेविरुद्ध ठरेल. 

'बयलू' यात्रेला निघण्यापूर्वी स्वामीजींनी आपल्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यास सांगितले होते. त्यांनी २०१४ मध्येच हे अंतिम अभिवादन पत्र लिहिले होते. त्यांनी त्यात देहाविषयी काही विषय स्पष्ट केले होते. १. देह भूमीत ठेवण्याऐवजी त्याला अग्नीला समर्पित करा. (वीरशैव लिंगायत समाजात पद्मासन स्थितीत समाधी देतात.) २. श्राद्धादिक विधी - विधानांची आवश्यकता नाही. ३. चिताभस्म नदी अथवा सागरात विसर्जित करा. ४. कोणतेही स्मारक उभारू नका. 

भाविकांच्या भावनांना बळी पडून त्यांना स्वामीजींच्या पार्थिवाचे चिताभस्म दिल्यास काय घडू शकते, याची कल्पना आश्रमास आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात चिताभस्म संग्रह करण्यात आला. भविष्यात कोणी स्वामीजींचे चिताभस्म घेऊन ते कोठेही ठेवून त्यांचे स्मारक उभारण्याची भीती नाकारता येत नाही, जे स्वामीजींच्या विचाराविरुद्ध ठरेल.

स्वामीजींनी देह व आत्मा दोन्ही वेगळे मानले हे स्पष्ट आहे. देहाचे कार्य संपले, यामुळेच त्यांनी 'इच्छामरण'द्वारे 'बयलू' स्थितीकडे मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला. स्वामीजींनी गेल्या महिनाभरापासून आहार टप्प्याटप्प्याने आहार कमी - कमी केले होते. त्यांचा देहत्यागाचा निर्णय झाला होता. तसेच देह अग्निसमर्पित करण्याची इच्छाही व्यक्त केली.  त्यांचा देह अग्निसमर्पित झाला तरी त्यांचा अविनाशी आत्मा विचार, आचार रुपाने सदैव आपल्यासोबत राहणार आहे. तो निरंतर प्रेरणा देत राहणार आहे.  

स्वामीजींचे गुरू श्री मल्लिकार्जुन स्वामी यांची समाधी आश्रमात आहे. 'माझे जीवन गुरुदेवांनी घडविले', असे कृतज्ञतापूर्ण गौरवोद्गार  स्वामीजी आपल्या अंतिम अभिवादन पत्रात काढतात. स्वामीजी आध्यात्मिक प्रवचनाच्या निमित्ताने दरवर्षी वर्षभर कोठेही असले तरी  गुरुपौर्णिमेला महिनाभर विजयपूरच्या ज्ञानयोश्रमात असायचे. तेथे प्रवचन, प्रसाद व गुरुपौर्णिमा उत्सव चालायचा. यावरुन गुरुदेवांप्रती त्यांची भक्ती, प्रेम दिसून येते. आता स्वामीजींच्या पार्थिवावर अग्निसंस्कार केल्याने, संपूर्ण चिताभस्म नदी, समुद्रात विसर्जित होणार असल्याने आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे कोणतेही स्मारक उभे राहणार नसल्याने आश्रमात श्री गुरू वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामी यांचीच समाधी राहणार आहे. भविष्यात कोणाची समाधी उभे राहणेही शक्य वाटत नाही. कारण स्वामीजींनी आपली समाधी व स्मारक न उभारण्याच्या इच्छेद्वारे क्रांतिकारी पाऊल टाकून आपल्या शिष्यांसमोरही एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचे शिष्यही आश्रमात आपल्या गुरुदेवाची समाधी नसताना आपली समाधी उभारण्याचा विचार करतील, असे वाटत नाही.  विशेष म्हणजे लिंगैक्य होण्यापूर्वीच समाधी बांधून सज्ज ठेवणारे अनेक मठाधीश आपण पाहिले आहेत.  सिध्देश्वर स्वामीजी संपूर्ण जीवनभर लाखो लोकांसाठी प्रेरक, आदर्श, पूज्यनीय राहिले. देहत्यागानंतरही ते अशा तथाकथित मठाधीशांहून विरळेच.



बयलू योगी

 


प्रखर ज्ञानी, योगमार्गनिष्ठ, उन्नत आध्यात्मिक साधक, बसवण्णांचे सहकारी, शरणश्रेष्ठ श्री अल्लमप्रभू यांची आज जयंती. यानिमित्त त्यांना शत शत नमन.

शब्द एंबेने श्रोत्रद एंजेलु

नोटा एंबेने नेत्रद एंजेलु

वासने एंबेने घ्राणद एंजेलु

रुचि एंबेने जिव्हे एंजेलु

स्पर्श एंबेने त्वक्किन एंजेलु

ई नानू एंबेने भिन्नवडिद बेळगिनवळगण

बेळकु काणा गुहेश्वरा.

या वचनातून श्री अल्लमप्रभूंनी बयलू योग सांगितले आहे. एनिदू बयलयोग या प्रवचनात ज्ञानयोगी श्री सिध्देश्वर स्वामी सांगतात, बयलू योग म्हणजे मन रिक्त करणारे योग. अल्लमाच्या मनात काही नाही. ते रिक्त आहे. याउलट आपले मन नावाचे घर भाव, स्वप्न, वस्तूंनी भरले आहे. अल्लमही पूर्वी असेच होते. त्यांनी आपले मन रिक्त केले. हे मोकळेपणच देव. या रिक्ततेचा अनुभव ईश्वराचे दर्शन घडवेल. मन रिकामे करणे म्हणजे साधना, भरणे म्हणजेच संसार. आध्यात्मिक चिंतक वीणा बण्णंजे यांनीही याविषयी खूप सुंदर विवेचन केले आहे. तसेच त्या म्हणतात, अल्लमांनी आपल्या वचनांतून स्वतःविषयी काही सांगितलेच नाही. त्यासाठी त्या श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्याशी झालेल्या चर्चेचे उदाहरण देतात. त्या एकदा स्वामीजींना म्हणाल्या, आपण आत्मचरित्र लिहा. त्यावर स्वामीजी म्हणाले, काही घटनाच नाहीत. अशाप्रकारे अल्लमाच्या जीवनातही काही घटनाच नव्हत्या. ते अशा अभिन्न स्थितीला पोहोचलेले महान योगी होते.

२ एप्रिल २०२२

जसा गुरु तसा शिष्य



 २२ जानेवारी २०२३

सळईने माझ्या हातावर डागा, 

कायम आठवण राहील

गुरवू निनू, अरिवू निनू

दैव निनू, जीव निनू

निनिल्लदे....बालगाव - कात्राळ आश्रमात एका सामान्य साधकाने गीताच्या माध्यमातून ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांना केलेली वंदना. या गीतातून स्वामीजींविषयी सामान्य साधकांत असलेले गुरुविषयीचे अनन्य प्रेम, भक्ती, त्यांची महानता दिसून येते. सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या बयलू यात्रेनंतर संतवेंदरे यारू या गीताने घरोघरी मनामनापर्यंत पोहोचत हृदयाहृदयात स्थान मिळविले आहे. त्याविषयी आपण नंतर पाहू. पण जनमनात हे स्थान मिळविणारे निर्मोही संत, पाच दशकांहून अधिक काळ आध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या रसाळ, सहज - सोप्या वाणीने प्रबोधन करणारे  ज्ञानयोगी, कधीही काहीही हवे न म्हणणारे जंगमश्रेष्ठ, बयलू यात्रेनंतर लोकांना अधिक हवेहवेसे वाटणारे ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी इथपर्यंत कसे पोहोचले, ते कसे घडले याविषयी सर्वांनाच कुतूहल असणे साहजिकच आहे. ते घडले ते गुरूंमुळे. ते म्हणजे वेदांत केसरी मल्लिकार्जुन शिवयोगी यांच्यामुळे. ही बाब या गुरू - शिष्याविषयी माहिती असलेल्या जुन्या लोकांना माहीत आहे. मात्र, स्वामीजींचे गुरू मल्लिकार्जुन शिवयोगी यांचे नाव आजच्या पिढीला माहिती नाही. जसा गुरू तसा शिष्य. जे पेरू, तेच उगवणार. त्यामुळे वेदांत केसरी  गुरू श्री मल्लिकार्जुन स्वामी यांच्याविषयी थोडेसे...  गुरुवंदना कार्यक्रमात बालगावच्या गुरुदेवाश्रमाचे श्री अमृतानंद स्वामीजी यांनी उल्लेख केला. १९८४ ज्ञानयोगाश्रम उभे राहिले. मात्र, पूर्वीपासून मल्लिकार्जुन स्वामीजींना आश्रम नव्हता. ते साधकांच्या घरीच निवास करायचे. ते त्रिकाल (सकाळी, दुपारी व सायंकाळी) प्रवचन करायचे. कलबुर्गी जिल्ह्यातील एका ठिकाणी मल्लिकार्जुन स्वामीजींचे प्रवचन होते. त्यासाठी स्वामीजी काहीही घेत नसायचे. तरीही त्या गावातील साधकांनी त्यांना काही रक्कम  द्यायचे ठरवले. ते रक्कम घेऊन स्वामीजींकडे पोहोचले. स्वामीजींना ते देऊ लागले. त्यावर स्वामीजींनी विचारले, हे काय? लोकांनी सांगितले, पैसे आहेत. त्यावर स्वामीजींनी म्हटले, आपणांस माहिती आहे की मी काही घेत नाही. त्यावर ग्रामस्थांनी म्हटले, तरीही आपली आठवण रहावी, यासाठी आपण काही रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे, आपण पैसे घ्यावेत. त्यावर स्वामीजी म्हणाले, असे करा; एक सळई आणा, ती तापवा आणि त्याच्याने माझ्या हातावर डागा. त्यामुळे कायमची आठवण राहील.

परमज्ञानी श्री सिद्धेश्वर स्वामीजी

 


३ जानेवारी २०२३

भगवद्गीतेतील १३ व्या अध्यायाचे निरुपण करताना आर्ज्य या शब्दाविषयी बोलताना कर्नाटकातील चिंतक चक्रवर्ती सुलिबेले म्हणतात, खरे ज्ञानी कसे असतात, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. अशाप्रकारचा परमज्ञानी मी पाहिलोय. त्यांचे सानिध्य सतत आनंददायी वाटते. ते केवळ सिद्धेश्वर स्वामी मात्र. त्यांनी आतापर्यंत कोणातही दोष पाहिल्याचे बघितलो नाही. ते खूप दुर्मिळ व्यक्ती. कोणीही असो, त्यांच्यात छोटेसे दोष असले तरी त्यांनी ते दोष म्हणून दाखवल्याचे मी कधीच पाहिलो नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप वैशिष्ट्यपूर्ण. ज्ञानाकडे जाता - जाता मनुष्य कसा पक्व बनतो, याचे एक चांगले उदाहरण आपल्यासमोर आहे. उदाहरणे अनेक असतील, मात्र आताही आपल्या डोळ्यांसमोर असलेले दुर्मिळ व नि:संशय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री सिद्धेश्वर स्वामी होत. 

यावरुन ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांची ज्ञानश्रेष्ठता दिसून येते. ज्ञानदान हेच श्रेष्ठदान मानलेले स्वामीजी शरणश्रेष्ठ अल्लमप्रभू देव यांच्या ज्ञानपथावरुनच चालत राहिले. त्यांच्या वचनसाहित्यावर स्वामीजींनी सिद्ध केलेला ग्रंथ शरणजनांना पथदर्शक ठरला आहे. 'बयलू' स्थितीकडे मार्गस्थ होण्यापूर्वी स्वामीजी अंतिम संदेशात अल्लमप्रभू देवांच्या वचनाचाच उल्लेख करतात, 

'सत्यवू इल्ल, असत्यवू इल्ल

सहजवू इल्ल, असहजवू इल्ल

नानू इल्ल, निनू इल्ल

इल्ल इल्ल एंबुदु तानिल्ल

गुहेश्वरनेंबुदु ता बयलु. 

आपण बसवण्णा, अल्लमप्रभू देव, चन्नबसवण्णा या शरणांसह ज्ञानेश्वर, तुकाराम, शंकरदेव, तुलसीदास आदी भारतातील अनेक  संतश्रेष्ठांची नावे ऐकली. त्यांच्या साहित्याचा अभ्यास करताना ते विचार आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती संतमंडळी कशी असतील, याची कल्पना ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींना पाहिल्यावर आली. अशा संतश्रेष्ठाच्या काळात आपण जन्माला आलो, त्यांना पाहिलो, त्यांचे आध्यात्मिक विचार ऐकलो,  त्यांच्या सान्निध्यात काही क्षण राहिलो, त्यांच्याकडून ज्ञान मिळविता आले, हे आमच्यासाठी आमच्या जीवनातील सर्वात मोठे संचित व पुण्यप्रद म्हणावे लागेल. 

आनंदाने राहा!

 


८ एप्रिल २०२०

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांनी कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर दिलेला संदेश

आपण कशाला चिंता करताय

सगळं लॉक नाही केलं

सूर्योदय लॉक नाही केलं

प्रेम लॉक नाही केलं

कुटुंबाचं वेळ लॉक नाही केलं

दया लॉक नाही केलं

सृजनशीलता लॉक नाही केलं

शिकणं लॉक नाही केलं

संवाद लॉक नाही केलं

कल्पनाही लॉक नाही केलं

वाचन लॉक नाही केलं

संबंध लॉक नाही केलं

प्रार्थना लॉक नाही केलं

ध्यानही लॉक नाही केलं

निद्रा लॉक नाही केलं

घरचे काम लॉक झाले नाहीत

विश्वास लॉक झाले नाही

तुमच्यात आहे त्याचे पालन करा

आपण जे सतत करू इच्छिता त्यासाठी लॉकडाउन एक संधी

व्हेंटिलेटरपेक्षा मास्क उत्तम आहे

आयसीयूपेक्षा घर अधिक उत्तम आहे

बरे होण्यापेक्षा त्याला रोखणे उत्तम आहे

त्यामुळे आनंदाने राहा!

'मी' देह नव्हे तर ईश्वरी तत्त्व



५ जानेवारी २०२३

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींचे आध्यात्मिक प्रवचनवगळता मी कन्नडमध्ये आध्यात्मिक व संत साहित्याविषयी सर्वाधिक व्याख्याने ऐकतो ते वीणाताई बन्नंजे यांचे. अल्लमप्रभू देव यांच्या व्याख्यानात त्यांच्याविषयी सांगताना वीणाताई श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे उदाहरण देतात. एका भेटीत वीणाताई स्वामीजींना आत्मचरित्र लिहिण्याविषयी विचारणा करतात. त्यावर स्वामीजी म्हणतात, 'माझ्या जीवनात लिहिण्यासारख्या घटनाच नाहीत.(बरेयलक्के नन्न जीवनदल्ली घटनेगळे इल्ल)' याविषयी बोलताना वीणाताई अल्लमप्रभू देव यांचे वचन उद्धृत करत खूप सुंदर विवेचन करतात.  हे सांगायचे कारण म्हणजे ज्यांनी आपले जीवन व वाणीने अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवले, त्यांचे जीवन आनंददायी बनवले, त्यांच्या जीवनात घटनाच नसतील का? तर घटना निश्चितच होत्या. पण त्या जीवनाविषयी मोह नव्हता. सर्वसामान्यांसमोर  जीवनतत्वज्ञान मांडणारे स्वामीजी केवळ त्यांच्यासमोर बोलले नाहीत तर त्याप्रमाणे जगले. 

मात्र, आज आम्ही सोशल मीडियात माझ्या पोस्टला किती लाईक्स मिळाल्या, कितीजणांनी शेअर केले याचा हिशेब मांडत

 असतो. हे जाऊद्या आम्हीच शहाणे, सकलजनांना शहाणे करण्याचा आम्हालाच जन्मदत्त अधिकार मिळाला या अविर्भावात आपले साहित्य व लेखनातून लोकांना ज्ञानामृत  पाजणारे अनेक लेखक, पत्रकार व बुद्धिमंतांनी आत्मचरित्र लिहिले आहेत. अनेकांच्या आत्मचरित्रात सत्यासत्यता किती? आत्मगौरवासाठी कितीजणांनी आत्मचरित्र लिहिले नसतील !  त्यांच्या आत्मचरित्रात कितपत नीरक्षीर विवेक आहे ? (मी हे सर्वांना म्हणत नाही. अनेक थोर व्यक्तींचे आत्मचरित्र निश्चितच प्रेरणादायी आहेत.) ते वास्तविक जीवनात आपल्या साहित्यात मांडलेल्या विचाराप्रमाणे  जगले का?  कितीजणांनी अशा मंडळींचे आत्मचरित्र वाचले, हा शोधाचा विषय आहे. 'आत्मचरित्र'चेही 'भांडवल' करण्याचा हा काळ आहे. म्हणूनच अशाप्रसंगी माझ्या जीवनात लिहिण्यासारख्या घटनाच नाहीत, असे सांगणारे निर्मोही सिद्धेश्वर स्वामीजी लाखो लोकांच्या हृदयात ज्ञानज्योत बनून तेवत राहतात. बसवण्णा आपल्या एका सुंदर वचनात म्हणतात, ...तन्न बण्णिसबेड..., इदे अंतरंग शुद्धी, इदे बहिरंग शुद्धी. आत्मप्रौढी मिरवू नको, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी. स्वामीजींचे अंतरंग शुद्ध होते. म्हणूनच ते 'आत्मचरित्रा'तील या 'आत्मप्रौढी'पासून दूर राहिले असावेत. कारण त्यांच्यातील 'मी' देह नव्हे तर  ईश्वरी तत्त्व (आत्मा) होते.

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...