Sunday 4 February 2018

आधुनिक कबीराचा सन्मान.. श्रेष्ठ समन्वयभावी संत : इब्राहिम सुतार

कर्नाटकातील प्रवचनकार, संत साहित्याचे अभ्यासक श्री इब्राहिम सुतार यांना केंद्र सरकारने नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर केला. त्यानिमित्त... 

वादग्रस्त व्यक्तींना देशाच्या जनमानसांत रुजवण्याचा प्रयत्न भारतात पूर्वीपासून निरंतर चालला आहे.  मात्र, गेल्या काही वर्षांत ते अधिक जोरकसपणे सुरू असल्याचे काही घटनांवरुन अधिक प्रकर्षाने समोर आले आहे. स्वातंत्र्यानंतर समाजातील श्रेष्ठ अशा समन्वयभावी विचारांच्या व्यक्ती, सर्वांच्या भावनांचा आदर राखत सामरस्याचे अग्रणी बनलेल्या मेरुपुरुषांना पुढे आणून त्यांच्या आदर्श जीवनाची ओळख करुन देण्याचे काम या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षाने अथवा विचारवंत, बुद्धीजीवींनी केले नाही. कबीर, शिशुनाळ शरीफ यांच्यासारख्या संतश्रेष्ठांची समाजाला आणखी ओळख व्हावी, त्यांचे सामरस्यपूर्ण आणि हिंदू - मुस्लिम - ख्रिश्चन हे सर्व एकच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपूर्व संधी गमावल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही जाती, मतांच्या नावाखाली भांडणे सुरुच आहेत. माझाच धर्म खरा, हा अट्टाहास समरस समाजजीवनाचा गळा घोटत आहे. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधुनिक कबीर म्हणून ओळखले जाणारे प्रवचनकार इब्राहिम सुतार यांना जाहीर केलेला पद्मश्री सन्मान हा समरस समाजमनासाठी आशादायक आहे.
वेद, उपनिषदे, वचन साहित्य, तत्त्वपदे आणि सुफी परंपरेतील तत्त्वे भजन, प्रवचन आणि संवादाच्या माध्यमातून संपूर्ण कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमाभागातील जनमनांत रुजवून एकात्म समाजनिर्मितीचे कार्य इब्राहिम सुतार हे गेल्या ४८ वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. त्यांचे लौकिक शिक्षण केवळ तिसरीपर्यंत झाले आहे. मात्र, त्यांचा जीवनानुभव हा कबीर, शिशुनाळ शरीफ, शिवशरण आणि सुफी संतांची आध्यात्मिक धारा पुढे नेणारी आहे. १० मे १९४० रोजी महालिंगपूर (ता. मुधोळ, जि. बागलकोट) येथील नबीसाहेब व अमीनाबी या दांपत्यापोटी इब्राहिम सुतार यांचा जन्म झाला. गरीबीमुळे तिसरीनंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यांचा पिढीजात व्यवसाय सुतारकीचा असला तरी त्यांनी विणकाम स्वीकारले. कारण तेथील बहुतांश लोकांचा हा व्यवसाय होता. बालपणापासून ते मशिदीत जाऊन नमाज, कुराण पठण करायचे. इतर धर्म, त्यातील मुक्तीचा मार्ग याविषयी बालपणापासूनच त्यांना कुतुहल होते. गावातील भजन संघामुळे त्यांच्या या सुप्त भावाला बळ मिळाले. या धार्मिक मंडळींच्या सान्निध्यात त्यांनी भजन, तत्त्वपदे, वचनांचा अभ्यास केला. वेद, उपनिषदे समजून घेतली. रमजान महिन्यात गावोगावी जाऊन पद्य गायन करत जीवनानुभव घेतलेले इब्राहिम महालिंगपुरात लिंगैक्य श्री बसवानंद स्वामी यांच्या पुण्याराधने निमित्त दरवर्षी सकाळी, सायंकाळी चालणारे निरुपण ऐकायचे. तेथील धार्मिक चिंतन, प्रवचनाने त्यांच्यातील आध्यात्मिक जाणीवा विस्तारण्यास पूरक ठरल्याचे ते सांगतात. देव, धर्म, आराधनेच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सत्य एकच असल्यची जाणीव झाली.  सोबतच तत्त्वपदे, निजगुण शिवयोगी, शंभूलिंग, सिद्धप्पा, विद्यानंद स्वामी आदी विद्वानांचे शास्त्र, भगवद्गीतेच्या अध्ययनाने भवविषयक जाणीवा विस्तारल्याचेही त्यांनी म्हटले.
१९७० मध्ये सुतार यांनी समविचारी मित्रांसह भावैक्य जनपद संगीत मेळा सुरू केला. त्या माध्यमातून भजन, तत्त्वपदांच्या गायनाद्वारे धार्मिक, आध्यात्मिक चिंतन जनसामान्यांपर्यंत पोहोचवू लागले. ते सुलभपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रश्नोत्तरासह तत्त्वपद गायन सुरू केले. तेव्हापासून ते  वर्षभरात भजन, प्रवचन, संवादाचे १०० कार्यक्रम करत आले आहेत. आज ७८ व्या वर्षीही समाजमनात एकात्म भाव रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. त्यांनी आजतगायत कर्नाटकाबाहेर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथेही प्रवचन केले आहे.
इतर धर्मांचा सन्मान हीच एकात्मता
आपला धर्म, मते नीटपणे समजून घेऊन आपल्या जीवनात  ते चांगल्याप्रकारे आचरणात आणणे,  इतरांच्या धर्म, मतांचे अत्यंत प्रामाणिकपणे सन्मान करणे म्हणजे एकात्मता होय, असे इब्राहिम सुतार यांनी सांगितले. आपला धर्म जितका सत्य आहे,  इतरांचाही धर्मही तितकाच सत्य आहे या भावाने प्रेमपूर्वक स्वीकारणे. तसेच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच्या आराधनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसे आपल्या मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचणे शक्य आहे अगदी तसेच इतरांच्या मार्गानेही ईश्वराचा साक्षात्कार होणे शक्य आहे, हे स्वीकारुन त्या मार्गांचा प्रेमपूर्वक स्वीकार, त्यांचा गौरव हेच एकात्म  असे ते म्हणाले. तसेच मतांतरणही अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले.  एकात्मतेविषयी सांगताना  बसवण्णा, भगवान रामकृष्ण, सुफी संतांच्या वचनांचा उल्लेख करत ते  म्हणाले, एकता से बढकर कोई इबादत नहीं, लडने की वेद, कुरान में नसीहत नहीं, मालिक भी एक हमारा, मजहब भी एक हमारा, हर इन्सान बंधू हमारा, संतोंने यही पुकारा।।

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...