तिरुअनंतपूरमपासून 15 किलोमीटर अंतरावरील चेंपाजंती येथे 20 आॅगस्ट 1854 रोजी नारायण गुरू (नानू) यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मदन हे शेतकरी होते. ते संस्कृतचे विद्वान व गुरुकुलचे प्रसिद्ध आचार्य होते. तसेच आयुर्वेद व ज्योतिषाचे जाणकार होते. त्यांचे घर भद्रादेवी मंदिराच्या जवळ होते. त्यामुळे धार्मिक वातारवरणातच नारायण गुरू वाढले. त्यांनी प्राथमिक शिक्षण घेताना संस्कृतचेही अध्ययन केले. ते दररोज संस्कृत काव्य पाठ करायचे. मंदिरात पूजा व एकांतात ध्यान करायचे. वयाच्या 14 व्या वर्षी ते ‘नानू भक्त’ या नावाने प्रसिद्ध झाले. 15 व्या वर्षी आईचे निधन झाल्यानंतर त्यांचे मामा कृष्ण वेदयार यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांनी लवकरच त्यांची प्रतिभा ओळखली. उच्च शिक्षणासाठी त्यांना करुनगपल्ली येथील अध्यापक रमण पिल्ले यांच्याकडे पाठविले. ते सवर्ण होते तर नानू अस्पृश्य. त्यांनी गुरूच्या घराबाहेर बसून अध्ययन केले. यावरून त्या काळातील सामाजिक स्थितीची कल्पना येईल. त्यांनी सर्वांपेक्षा प्रतिभाशाली असल्याचे सिद्ध केले. सहअध्यायींच्या पुढे जाऊन शिक्षकांसमोर संस्कृतमध्ये आपली विद्वत्ता सिद्ध केली. 1881 मध्ये आजारी पडल्याने ते आपल्या गावी परतले. आजारातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी गावच्या परिसरात मागास घटकांसाठी शाळा सुरू केल्या. स्थानिक विशेषत: मागास घटकांसाठी ज्ञान, शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य हाती घेतले. हा काळ त्यांच्यासाठी खुपच संघर्षाचा राहिला. एकीकडे प्रापंचिक तर दुसरीकडे त्यांच्या अंतर्मनात आध्यात्मिक उन्नती, त्याच्या यथार्थ अनुभवाची उत्कट इच्छा उसळी मारत होती. त्यांच्यात बदल होईल या आशेने त्यांच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने वयाच्या 28 व्या वर्षी त्यांचा विवाह लावला.
आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात नानू घराचा त्याग करून बाहेर पडले. त्यांनी मारुतवमलैच्या गुहांमध्ये साधना केली. कालांतराने श्री नारायण गुरू लोकांमध्ये परतले. समाजाच्या शेवटच्या घटकाच्या सोबत राहिले. लोकांमध्ये त्यांच्याविषयी श्रद्धा निर्माण झाली. त्यांनी 1888 मध्ये तिरुअनंतपूरमपासून 20 किलोमीटर अंतरावरील आरुविप्पूरममध्ये नायर नदीच्या किनाºयावर शिवमंदिराच्या स्थापनेने समाजकार्याला सुरुवात केली. या माध्यमातून केवळ ब्राह्मण पुजारी ही संकल्पना त्यांनी नाकारली. या मंदिरात कोणालाही प्रवेशासाठी बंदी नव्हती. कोणीही सहजपणे या मंदिरात येऊ शकत होते. मंदिराजवळच एका आश्रमाची स्थापना केली. नंतर हेच संघटन ‘नारायण धर्म परिपालन योगम्’ या नावाने ओळखले जाऊ लागले जे ‘श्री नारायण धर्म’ प्रसाराचे कार्य करू लागले. स्थापनेपासून हे संघटन हिंदू धर्मातील दूरगामी सुधारणांच्या प्रसारकार्याचे माध्यम राहिले आहे. आज हे केरळचे मोठे सामाजिक आंदोलन बनले आहे. त्यानंतर त्यांनी 1904 मध्ये वर्कला येथील शांत, नयनरम्य अशा शिवगिरी पर्वतावर आपल्या सामाजिक कार्याचे केंद्र बनविले. 1928 मध्ये महासमाधी घेईपर्यंत श्री गुरूंनी याच ठिकाणी राहून साधना केली. दरम्यान, 1913 मध्ये अद्वैत तत्त्वज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी एका अद्वैत आश्रमाची स्थापना केली. या ठिकाणी एक संस्कृत विद्यालयही सुरू केले. 1920 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या कारामुक्कू येथील मंदिरात कोणत्याही देवतेची प्रतिमा नव्हे तर एका ज्योतीची स्थापना केली. त्याचा संदेश होता ‘चोहीकडे प्रकाशच प्रकाश पसरो.’ तर 1924 मध्ये मुरुक्कुमपुझा येथे स्थापन केलेल्या मंदिरात मूर्तीच्या जागी ‘सत्य, धर्म, प्रेम, दया’ असे लिहायला लावले. 1924 मध्ये त्यांनी कलवनकोड येथे शेवटचे मंदिर स्थापन केले. त्याच्या गर्भगृहात त्यांनी एक आरसा लावायला लावला. यावरुन श्री नारायण गुरू मूर्तिपूजेचे विरोधक होते असे नव्हे. ते राजा राममोहन राय यांच्यासारखे मूर्तिपूजेचा विरोध करत नव्हते. तर ते अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. ते आपल्या ईश्वराला सर्वसामान्य माणसाशी जोडू पाहत होते.
No comments:
Post a Comment