Friday 13 August 2021

लिंगायत, वीरशैव, हिंदू शब्दांच्या भोवती...



 डाॅ. एम. चिदानंद मूर्ती 

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

अलिकडील दिवसांत लिंगायत आणि वीरशैव - लिंगायत स्वतंत्र धर्माचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.  लिंगायत धर्म बसवण्णांनी स्थापन केला आहे, बसवण्णा वीरशैव नव्हे तर लिंगायत आहेत, असे माते महादेवी काही वर्षांपासून सतत तीव्रपणे सांगत आहेत. त्यांचे मत खरे असल्याचे काही भक्तांना वाटते. मात्र, पुढील माहिती पाहा - 'माते महादेवी यांनी ५ एप्रिल १९६६ रोजी पूज्य लिंगानंद स्वामी यांच्याकडून जंगम दीक्षा घेतली. तेव्हा त्यांनी ' आदर्श जीवनासाठी, वीरशैव धर्मप्रचारासाठी सतत लढा देईन. शरण धर्म प्रचार करण्यासाठी परदेशात जाईन. मी आणखी जादा क्षमता प्राप्त करेन. नंतर वीरशैव मिशनरी बनेन', अशी प्रतिज्ञा केली. (लिंगायत वीरशैव : एंबुदू हौदु, हिंदूवू हौदु - डाॅ. महांतलिंग शिवाचार्य स्वामीजी, श्रीमद विभूतीपूर, वीर सिंहासन मठ, बेंगळुरू, रेणुक सौभाग्य सिरी ग्रंथ, पृष्ठ क्र. १४१). 

 माते महादेवी यांनी लिहिलेल्या 'मातृवाणी' पुस्तकात हा उल्लेख आहे -' दावणगेरे विश्वकल्याण मंटप स्थापक, धीर गुरुवर्य वैराग्यनिधी, वीरशैव धर्मपीदीप्ती... पूज्य श्री लिंगानंद स्वामीजी यांच्या चरणी... सच्चिदानंद सती प्रिय महादेवीचे अर्पण' (मातृवाणी, दावणगेरे १९६५) याच पुस्तकात 'वीरशैव लांछन (वीरशैवांचे प्रतीक)' नावाच्या लेखनात ही वाक्ये आहेत. - विभूती रुद्राक्षी धारणेय कंडु हीनैसी नगुवर | नोडेन्न मनदोळु सिग्गदु संचरिसिवे | त्रिपुंड्रवदु वीरशैवर विषय भस्मदा लांछन | रुद्राक्षीयदु लिंगपतीयक्षीयं होम्मी कट्टलट्ट मंगलसूत्र | इंथप्प विभूती रुद्राक्षी धरिसिद सद्भक्तरन कंडु | हीयाळीपर अडेतडेयिल्लद ज्ञानक्के मननोंदु नक्कनो सच्चिदानंद ( ವಿಭೂತಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಧಾರಣೆಯ ಕಂಡು ಹೀನೈಸಿ ನಗುವರ| ನೋಡೆನ್ನ ಮನದೊಳು ಸಿಗ್ಗದು ಸಂಚರಿಸಿವೆ| ತ್ರಿಪುಂಡ್ರವದು ವೀರಶೈವರ ವಿಷಯ ಭಸ್ಮದಾ ಲಾಂಛನ| ರುದ್ರಾಕ್ಷಿಯದು ಲಿಂಗಪತಿಯಕ್ಷಿಯಿಂ ಹೊಮ್ಮಿ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟ ಮಂಗಲಸೂತ್ರ| ಇಂಥಪ್ಪ ವಿಭೂತಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಧರಿಸಿದ ಸದ್ಭಕ್ತರಂ ಕಂಡು| ಹೀಯಾಳಿಪರ ಅಡೆತಡೆಯಿಲ್ಲದ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಮನನೊಂದು ನಕ್ಕೆನೋ ಸಚ್ಚಿದಾನಂದ’ (ಮಾತೆ ಮಹಾದೇವಿ: ಮಾತೃವಾಣಿ ಪು. 42). ( विभूती, रुद्राक्ष धारण करणाऱ्यांना पाहून हीनतेने हसणाऱ्यांना पाहून मला संताप येतो. भस्माचे त्रिपुंड हे वीरशैवांचे प्रतीक आहे. रुद्राक्ष हे लिंग हेच पती समजून बांधलेले मंगळसूत्र आहे. अशा विभूती, रुद्राक्ष धारण करणाऱ्या सद्भक्तांना पाहून अविचाराने हीनतेने वागणाऱ्यांवर सच्चिदानंद हसेल. ( माते महादेवी - मातृवाणी पृष्ठ ४२). 



या पुस्तकासाठी ज्येष्ठ विद्वान डाॅ. एच. तिप्पेरुद्रस्वामी यांनी लिहिलेले अभिप्राय योग्यच आहे. माते महादेवी यांनी पूर्वी वापरलेला 'वीरशैव' शब्द सोडून आता 'लिंगायत' हा शब्द वापरला आहे. तसेच बसवण्णांनी  'लिंगायत' धर्माची स्थापना केली, हे त्यांचे सांगणे त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेच्या विरुद्ध आहे.  वास्तविक बसवण्णांनी कोठेही 'लिंगायत' हा शब्द वापरला नाही. त्यांनी केवळ 'वीरशैव' हा शब्द वापरला आहे. उदाहरणार्थ - 'एन्न बंद भवंगळनु परिहरिसि... एन्न होंदिद शैव मार्गंगळ नेलेगळेदु निज वीरशैवाचारवरुही तोरी... शैव कर्मव कळेदु...' शैव असलेला मी चन्नबसवण्णांच्या सूचनेनुसार 'वीरशैव' झालो, असे बसवणांनीच सांगितले आहे  (वचन १०९८). त्यांनी ९३० व्या वचनात उल्लेख केलेल्या त्यांच्या पूर्वीच्या एका श्लोकात 'वीरशैव' शब्द आहे. इसवी सन १११० मधील केशिराजच्या 'शील महत्वद कंद' या पुस्तकात 'वीरशैव' शब्द आहे. त्यात अंगावर लिंग धारण करण्याची एक पद्धती  या अर्थाने  'लिंगायत' या शब्दाचा उल्लेख आला आहे. बसवण्णांनी कोठेही 'लिंगायत' या शब्दाचा वापर केला नाही. चित्र स्पष्ट आहे - 'वीरशैव' नावाचा धर्म बसवपूर्व कालीन आहे. - वर दिलेल्या आधारांनुसार हे स्पष्ट होते. याविषयी माते महादेवी काय सांगू इच्छितात ?

वीरशैव - लिंगायत हिंदू धर्माचा भाग नाही. तो एक स्वतंत्र धर्म आहे, असा निर्णय अखिल भारतीय वीरशैव महासभेने निर्णय  आहे. तसे मागणी पत्रही सरकारला दिले आहे. केंद्र सरकारने लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून मान्य केल्यास अल्पसंख्यकांना मिळणाऱ्या सर्व सोयी - सवलती लिंगायतांनाही मिळतील, ही आशा महासभेला आहे. हिंदू धर्म म्हणजे काय, त्याची व्याप्ती किती आहे, याची जाणीव महासभेला असू शकेल. स्वामी विवेकानंद, बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या श्रेष्ठांनी आपण हिंदू म्हणूनच जाहीरपणे घोषित केले आहे. भारताच्या सर्वोच्या न्यायालयाच्या पूर्णपीठाने १९९५ मध्ये एका निर्णयात हिंदू धर्माची लक्षणे अशाप्रकारे स्पष्ट केली आहेत - ‘Acceptence of the Vedas with reverence, recognition of the fact that the means or ways to salvation are diverse; and realisation of the truth that the gods to be worshipped is large: that indeed is the distinguishing features of Hinduism’ - वेदांवर श्रद्धा ठेवणारे, बहुदेवता आराधक, दैव साक्षात्कारासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, यावर विश्वास ठेवणार हिंदू आहेत. 



आतापर्यंत सर्व वीरशैव वेदांवर श्रद्धा ठेवणारे आहेत. 'ओंकार' (ओम) त्यांच्यासाठी प्रिय मंत्र आहे. काही देवांवर विश्वास ठेवणारे आहेत. कर्नाटकातील काही मठ  वेद - संस्कृत पाठशाळा चालवितात. उदाहरणार्थ  तुमकुरु येथील सिद्धगंगा मठाची संस्कृत वेद पाठशाळा होय. तेथे आजही सायंकाळची प्रार्थनासभा वेदघोषाने सुरू होते. लिंगायतांत शिव हाच परमदैव ही श्रद्धा असली तरी त्यातील काहीजण तिरुपतीच्या व्यंकटेश्वराचे भक्तही आहेत. हिंदूंप्रमाणेच वीरशैवही गायीला माता मानतात. - नंदी हे शिवाचे वाहन आहे. गावातील करियव्वा, काळव्वा आदी देवतांच्या पूजेतही सहभागी होतात. मात्र, तेथे चालणाऱ्या पशुबळीपासून दूर राहतात,  हे सहज आहे. 

बसवण्णांच्या वचनातील - (वेदक्के बरेयु कट्टुवे, शास्त्रक्के निगळवन्नुक्कुवे...)  अशाप्रकारच्या गोष्टी वेद विरोधी आहेत, हे सांगणे सत्याचा अपलाप करणारे आहे. ते  जातिभेद पाळत  इतर वर्गाच्या लोकांना हीन वागणूक देत वेदघोषात यज्ञयागादि करणाऱ्या ब्राह्मण वर्गाविरुद्ध आहे. त्याच बसवण्णांचे हे पुढील वचन लक्षवेधी आहे. - वेदागमगळ हेळिद हागे नडेवुदु, हेळिदंते नुडिवुदु, मीरी नडेयलागदु, मीरी नुडियलागदे मुक्तिपदवन्नैदुवात (वचन २३९). वेदांनी सांगितल्याप्रमाणे चालावे. त्यांनी सांगितलेले उल्लंघून चालणे शक्य नाही, हे त्यांचे स्पष्टातिस्पष्ट सांगणे आहे. 1१९५० मध्ये अस्तित्वात आलेल्या भारतीय संविधानानेही वीरशैव हा हिंदू धर्माचा भाग असल्याचे मान्य केले आहे. कायद्यानुसार वीरशैव, लिंगायत, हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी १९ व्या शतकात उदयास आलेले ब्रह्म, आर्य, प्रार्थना समाजाचे अनुयायी हे सर्वजण एकाच वर्गात मोडतात. बौद्ध, जैन, शीख समाजाचे अनुयायी हिंदू नसले तरी त्यांनाही हिंदू विवाह कायदाच लागू आहे.  कायद्यात वीरशैव, लिंगायतांना हिंदू धर्मापेक्षा वेगळ्या वर्गाचे समजणे हे कायदा करणाऱ्यांत असलेला वास्तवाचा अभाव होय. स्वत: बसवण्णांनीच मी वीरशैव म्हणून सांगितलेले असताना लिंगायत म्हणजे कोण ? बसवण्णांचे अनुयायी हे वीरशैवही होत, लिंगायतही होत. 


 

वीरशैव (लिंगायत) वर्ग हा हिंदू धर्माचा भाग नाही. तो स्वतंत्र धर्म म्हणून वरील कायद्यात दुरुस्ती होऊन लोकसभा, राज्यसभेत स्वीकारले जाणे आवश्यक आहे. सध्या ते शक्य न होणारी बाब आहे. कायद्यात सुधारणा करण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्राला पत्र लिहिले असले तरी ते लोकसभेत बहुमताने स्वीकारले जाणे असाध्य आहे.  तसेच पत्र लिहून विफल ठरल्यास ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाला आघातकारी ठरण्याची शक्यता आहे. सिद्धगंगेचे पूज्य शिवकुमार स्वामीजी यांनी म्हटले आहे - 'वीरशैव धर्म हिंदू धर्माचा अर्थात शैव धर्माची द्वैत, अद्धैत पंथांसारखी एक शाखा आहे...' ब्राह्मण जातीशी त्याची तुलना योग्य नाही. पूज्य पंचपीठाधिपतींचा अभिप्राय असा आहे - वीरशैव धर्म हिंदू धर्माचे आगम - वेद मानतो. आता वीरशैव हिंदू नाहीत, असे म्हणणे योग्य नाही. याच प्रकारे फ. गु. हळकट्टी, न्यायमूर्ती टी. एन. मल्लप्पा, कर्नाटक गांधी हर्डीकर मंजप्पा, सिद्धरामप्पा पावटे आदी मान्यवरांनी लिंगायत - वीरशैव हे हिंदूच आहेत, याविषयी सहमती व्यक्त केली आहे. 

लिंगायतांनी  (वीरशैव) आम्ही हिंदू नसल्याचे घोषित केल्यास वक्कलिग, बेडर, धनगर, भंगी, दलितही तशी घोषणा करतील  तेव्हा संपूर्ण भारतात कोणाची संख्या अधिक असेल?  क्रूरता, मतांधता, मतांतराने घेरलेल्या भारताचे भविष्य काय ? प्रज्ञावंतांनी याविषयी विचार करणे गरजेचे आहे.  मी जन्माने लिंगायत असलो तरी मला 'हिंदू' म्हणवून घ्यायला अभिमान वाटतो. 

(लेखक ज्येष्ठ संशोधक आहेत.)

साभार : विजयवाणी, शनिवार, दिन. ६ जानेवारी २०२८


No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...