Friday 12 November 2021

माध्यम आणि धर्म


  



कर्नाटकातील कटील येथील दुर्गा परमेश्वरी देवस्थानच्या समारंभात सुवर्णा वृत्तवाहिनीचे प्रमुख अजित हणुमक्कण्णवर यांनी माध्यम आणि धर्म या विषयावर दिलेले व्याख्यान. 

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

माध्यम आणि धर्म या खूपच औत्सुक्याच्या विषयावर बोलायला मला सांगितले आहे. माध्यम धर्म यावर बोलायचे तर खूपच सोपे आहे. माध्यम आणि धर्म म्हटल्यावर भारताची विशेषता अशी आहे, की येथे धर्माचे डेफिनेशन आणि कन्सेप्ट संपूर्णपणे वेगळे आहे. युरोपियन भारतात आल्यावर त्यांच्याकडे रिलिजन नावाचे शब्द होते. त्या शब्दाला येथील धर्म हाच समानार्थी शब्द समजले. आपणही तेच गृहित धरुन वापरायला लागलो. आपल्याकडे धर्माचा अर्थ नैतिकता असा आहे. नैतिक मूल्यांनाच आपण धर्म असे मानले. देवस्थानाच्या बाहेर बसलेला भिक्षुक आई, धर्म कर असे म्हणतो. आई रिलिजन कर असा अनुवाद करता येणार नाही. एखादा बलिष्ठ त्याच्याहून बलहीन अशा व्यक्तीला मारताना हे धर्म नाही, असे आपण म्हणतो. त्याचा अर्थ हे रिलिजन नाही, असे नाही. ही भूमी धर्माला नैतिकतेशी जोडून पाहते, पूजा पद्धती, ईश्‍वराची आराधना पद्धती याच्याशी जोडून पाहत नाही. तशी आपली संस्कृती नाही. त्यामुळे अनेकदा लाइव कार्यक्रम करताना धार्मिक विषयांच्या संदर्भात माझाही गोंधळ उडतो. या देशाचा इतिहास आणि खरा इतिहास वाचून नव्हे तर वाचण्याचा प्रयत्न करून वाढलेल्यांपैकी मीही एक आहे. या देशात क्षत्रिय असलेल्या रामाने ब्राह्मण असलेल्या रावणाला मारलेली कथा दलित असलेल्या वाल्मीकीने लिहिली आणि जगभारात पोहोचविली. आणि ते आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. Look at the Combination.  क्षत्रिय असलेल्या रामाने ब्राह्मण असलेल्या रावणाला मारलेली कथा दलित असलेल्या वाल्मीकीने लिहिली. हा या देशाचा मूळ ग्रंथ. त्याला सन्मान दिलेली ही संस्कृती. या जगातील मूळ धर्मांना आणि त्यानंतर आलेल्या प्रमुख मतांमध्ये मूलत: काय फरक आहे, याविषयी आपण विचार करत आहोत. मूलत: फरक म्हणजे, आपण ज्याला धर्म समजतो त्या धर्मात आपण कोणत्या देवाची पूजा करता, तुम्ही स्वर्गात जाता की नरकात जाता याचा काही संबंध नाही. इथे जगताना किती नैतिकतेने जगलात त्यावरच तुमचे स्वर्ग, नरक अवलंबून आहे. भक्तीच स्वर्ग, नरक याचे मूळ असते तर शिवाचा परमभक्त रावण हा राक्षस म्हणवून घ्यायला नको होते. रावण शिवाचा अत्यंत परमभक्त होता. हे मूळ समजून घेण्यासाठी खूपच वेळ द्यावा लागेल. आणि खूपच आसक्तीने या संस्कृतीचे मूळ समजून घ्यावे लागते. ते समजून न घेण्याची अटेन्शन स्पॅन नसलेली मंडळी या संस्कृती आणि आचरणाच्या विरोधात, आपण ज्याला पूज्य समजतो त्या सर्वांविरोधात बोलायला लागले. तसेच कोठून तरी आलेल्या धर्मनिरपेक्षतेचे धडे आम्हाला द्यायला लागले. एक पत्रकार म्हणून थेट कार्यक्रम करताना काहीवेळा राग आवरू शकत नाही. धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे, धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे, असे म्हटल्यावर राग आवरू शकत नाही. हे कोणाला धर्मनिरपेक्षता शिकवायला आले आहेत? ही मंडळी कोणाला धर्मनिरपेक्षता शिकवायला आली आहेत ? पर्शियात धार्मिक अत्याचाराला बळी पडलेले एक हजार लोक नेसत्या वस्त्रांनिशी नावेतून येऊन गुजरातच्या किनार्‍यावर उतरतात. तेथील राजाला आमच्यावर अन्याय झाला आहे, येथे राहायला जागा द्या, अशी मागणी करतात. येथे जागा नाही, असे राजाला सांगावेसे वाटत नाही. जागा नाही, ते देऊ शकत नाही, इथल्या लोकांशी संघर्ष होऊ शकेल, हे राजा सांगू शकत नाही. त्यामुळे राजा ते सांगण्यासाठी जागा विचारायला आलेल्या लोकांमार्फत एक मडकी भरुन दूध पाठवतो. ते पूर्ण भरून पाठवतो. जागा नाही, हा संदेश यातून मिळावा, अशी त्याची अपेक्षा असते. पर्शिया येथून जागा, आसरा द्या म्हणून आलेली मंडळी राजाचा संदेश समजून घेतात. त्या भरलेल्या मडक्यात एक मूठभर साखर टाकून ते राजाकडे परत पाठवतात. आमच्यात जागा नाही, असे राजा सांगत होता. परंतु जागा नसली तरी आम्ही दूधातील साखरेप्रमाणे आम्ही येथील लोकांसोबत राहू, आम्हाला थोडी जागा, आश्रय द्या असा संदेश त्यांनी यातून राजाला पाठवला. मी बाराव्या शतकात येथे आलेल्या पार्शी समाजाबद्दल बोलत आहे. त्यांनी दुधात साखर टाकून पाठवलेले पाहून राजाला खूप आनंद झाला. राजा त्यांच्याकडून केवळ एकाच गोष्टीची अपेक्षा करतो. गोहत्या आमच्यात महापाप आहे, आपण गोमांस खाणार नसाल तर येथे राहण्यास काही अडचण नाही, असे राजा सांगतो. तेव्हापासून आतापर्यंत कोणत्याही पार्शी समाजबांधवाने गोमांस सेवन केले नाही. अशा भारताला धर्मनिरपेक्षेतेचे धडे देत आहेत. या भारताला ? पर्शियामधून आलेले लोक एक पवित्र अग्नी घेऊन आलेले होते. ती अग्नी जेथे असते त्याच्या तीन चौरस मैल परिसरात पार्शी व्यतिरिक्त अन्य लोकांनी येऊ नये, अशी मागणी ते राजाकडे करतात. राजा त्याला होकार देतो. त्यांच्याच राज्यात येऊन, तेथेच पवित्र अग्नी स्थापतात. मात्र, तीन चौरस मैल परिसरात कोणाला येऊ देणार नाही, तुमच्या धार्मिक भावनांना धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही राजा देतो. अशा देशाला धर्मनिरपेक्षतेचे धडे दिले जात आहेत. अनेक लोक माझा राष्ट्रवादी पत्रकार म्हणून ओळख करुन देतात. एका पत्रकाराचा राष्ट्रवादी म्हणून सन्मान करणे, एका राजकारण्याचा सरळ, सज्जन म्हणून सन्मान करणे, एका संन्याशाचा सर्वसंग परित्याग केला म्हणून सन्मान करणे, एका पोलिसाचा कडक शिस्तीचा म्हणून सन्मान करणे हे सगळे एकच आहे. त्या कारणांसाठी त्यांचा गौरव करणे अपेक्षित नाही. कारण आपण सर्वजण असेच राहिले पाहिजे. इतर लोक असे का नाहीत, हा प्रश्‍न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. माझे मित्र, बंगळुरू दक्षिण मतदारसंघाचे खासदार तेजस्वी सूर्या चीनला गेले होते. त्यांनी तेथून दूरध्वनी केला. ते मला म्हणाले, येथे अनेक ठिकाणी बौद्ध विहारांच्या बाहेर फलक लावले आहेत. या जन्मात तू पुरेसा पुण्य केला असशील तर पुढच्या जन्मात भारतात जन्म घेशील असे त्या फलकांवर लिहिले आहे. भारतात जन्मलेल्या आम्हाला, आणि आमच्यासोबत येथे जन्मलेल्या अनेकांना आपण येथे का जन्मलो, असे वाटू लागले आहे. धर्मनिरपेक्षतेचे धडे देणार्‍या या मंडळींना इतिहासाच्या काही गोष्टी माहीतच नाहीत. सातव्या शतकात सौदी अरेबियातील व्यापार्‍यांची एक टोळी केरळमध्ये आली. ते तेथील राजाला म्हणाले,  आमच्यात एका नव्या मताचा उदय झाला आहे. पैगंबर आले आहेत. त्यांनी आम्हाला धर्माचा उपदेश केला आहे. आम्हाला एक प्रार्थनास्थळ बांधायचे आहे. त्यावर केरळच्या राजाने एक बौद्ध विहार रिकामे करुन दिले. तेथे मशीद बांधायला सांगितले. केरमळमध्ये जगातील दुसरी मशीद उभी राहिली, हे लक्षात राहू द्या. राजाने एक बौद्ध विहार रिकामे करुन मशीद बांधायला सांगितले. हे बांधल्यानंतर मदिनामध्ये मशीद उभी राहिली. केरमधील मशिदीचे बांधकाम करताना ते मक्केच्या दिशेन असावे, हे बधनकारक नव्हते. आजही त्याचा दरवाजा पूर्व दिशेलाच आहे. ठीक आहे, बौद्ध विहार रिकामी करुन तेथे आपले प्रार्थनास्थळ बनवा, असे  सांगणार्‍या या मातीला आता कोणीतरी येऊन धर्मनिरपेक्षतेचे धडे द्यावेत काय? आता कोणी येऊन धर्मनिरपेक्षतेचे धडे देण्याची गरज आहे का? अशी अनेक उदाहरणांची मालिकाच सांगता येईल. भारत संस्काराने धर्मनिरपेक्ष बनून राहिला आहे. धर्मनिरपेक्षता हे या भूमीचे सत्व आहे. येथील लोकांनी सप्रेस केले, मात्र उभे राहून झगडलेही नाहीत. हे भव्य प्रार्थनास्थळ बांधण्यासाठी 27 मंदिरे पाडण्यात आली, असा एक मोठा फलक बाराव्या शतकात झालेल्या एका बांधकामाच्या स्थळी लावण्यात आला आहे. आपण या स्थळाला राष्ट्रीय पुरातत्व स्थळाचा दर्जा दिला आहे. त्या बांधकामाविषयी मी फारसे काही सांगत नाही. राष्ट्रीय पुरातत्व स्थळ म्हणून ज्याला आपण ओळखतो त्यात एक मोठा फलक लावला आहे. या बांधकामासाठी 27 मंदिरांचा विद्ध्वंस करण्यात आल्याचा त्यावर उल्लेख त्यावर केला आहे. त्याला आपण आपला सन्मान समजतो. ते सर्व सोडा, जेव्हा राम मंदिराचा  खटला सर्वोच्च न्यायालयात चालला होता तेव्हा पुरातत्वविद के. के. मोहमद हे बाबरी मशिदीच्या खाली मंदिर होते, त्यामुळे तेथे मंदिर व्हावे, यासाठी धडपडत होते. मात्र, हिंदू वकील रांग लावून तेथे मशीद व्हावी, यासाठी धडपडत होते. या भूमीला नव्याने धर्मनिरपेक्षता शिकविणारे अनेकजण ठिकठिकाणी जन्माला आले आहेत. येथे बोलण्यासाठी मला पत्रकारिता आणि धर्म हा विषय दिला आहे. माझ्या दृष्टीने धर्म कधीही रिलीजन असू शकत नाही. धर्म म्हणजे नैतिक मूल्ये. सदाकाल सत्य सांगणे, सांगावे लागणारे सत्य परखडपणे सांगणे हाच पत्रकारितेचा धर्म होय. मी ते काया, वाचा, मनाने पाळलो आहे. कालौघात असे झाले की, बोलो भारत माता की जय म्हटले की आरएसएस म्हणतात. जय हिंद म्हटले भाजप म्हणतात. काश्मीरमध्ये धडपडणार्‍या सैनिकांविषयी बोलले की राइट विंगचा पत्रकार ठरतो. सीएए, एनआरसीमध्ये काय चुकीचे आहे, असे विचारले की उजव्या विचारसरणीचा पत्रकार ठरतो. लॉजिकल प्रश्‍ने विचारली तरी आमच्या कपाळावर पट्टी बांधण्याचे काम सातत्याने चालत आले आहे. विशेष म्हणजे अत्यंत लॉजिकली प्रश्‍न विचारले तरी ही स्थिती आहे. बंगळुरूच्या टाउन हॉलसमोर अनेक घटनांवेळी मी ही गोष्ट सांगितली आहे. तैवानमध्ये कुत्र्यांच्या मांसापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचा एक उत्सव चालला होता. त्याच्या विरोधात टाउन हॉलमध्ये निदर्शने केली जातात. दुसर्‍या दिवशी सर्वच वर्तनमानपत्रांमध्ये प्राणिप्रेमींची निदर्शने म्हणून छापून येते. हे सहज आहे. श्‍वानांविषयी प्रेम असलेल्या मंडळींनी तेथे निदर्शने केली होती. ते झाल्यानंतरच्या एका आठवड्यात गोहत्या बंदी झाली पाहिजे, यासाठी निदर्शने केली जातात. ते मात्र, जातियवाद्यांची निदर्शने म्हटले जाते. एका आठवड्यापूर्वी कुत्र्यांसाठी केलेली निदर्शने प्राणिप्रेमींची, गायींसाठी निदर्शने करणारे मात्र जातियवादी ठरतात. आपण आजच्या पत्रकारितेत पाहत असलेल्या विरोधाभासाविषयी मी सांगत आहे. या गोष्टी जे जाहीरपणे बोलायला जातात, ते जातियवादी पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांना उजव्या विचारसरणीचे पत्रकारही म्हटले जाते. केवळ काहीजण मात्र गाढवाचे शेपूट, घोड्याचे केस म्हणून पुढे जातात. त्यासाठी धैर्य हवे. तसेच वेळोवळी कटकटींना सामोरे जावे लागते. त्यांचा अनुभव घेतलेला मी एक पत्रकार आहे. मी मघाच सांगितलो, सत्य सांगणे, सांगावे लागणारे सत्य परखडपणे सांगणे हा पत्रकारितेचा धर्म आहे. आज देशात नागरिकत्व कायदा आणि एनआरसीची अधिक चर्चा आहे.   काल सद्गुरू यांनी एक गोष्ट सांगितली. माझ्या निरीक्षणानुसार ते सत्य आहे. नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात एक महिला मी येथे जन्मले, वाढले, माझे आईवडील येथेच जन्मले, वाढले, मी एका विशिष्ट समाजात जन्माला आले म्हणून मला भारतातून बाहेर का घालता, असा सवाल करते. समोर असलेला पत्रकार तिला तुला भारतातून बाहेर काढणार हे कोणी सांगितले, ही माहिती तुला कोणी दिली, हा उलट प्रश्‍नही तिला विचारत नाही. मी समविचारी पत्रकारांशी बसून चर्चा करत होतो. नागरिकत्व कायदा खरेच भारताला, भारताच्या एकजुटीला मारक आहे का, असे आपल्यापैकी कितीजणांना वाटते, असे त्यांना विचारलो. भारतीय, भारतात राहणार्‍या एकालाही या कायद्यामुळे समस्येला सामोरे जावे लागणार नाही, हे प्रत्येकाने मान्य केले. मात्र, जाहीरपणे आपण का बोलत नाही, म्हटल्यावर आपण पत्रकार म्हणून तसे सांगावे का, असे त्यांनी विचारले. मी पत्रकारितेत येऊन 15 वर्षे झाली आहेत. या 15 वर्षांत वेगवेगळ्या आठ संपादकांच्या हाताखाली काम केलो आहे. त्यापैकी तीनजण नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. नागरिकत्व कायद्याविरोधात बोलायला पत्रकारितेचा धर्म आडवा येत नाही, मात्र सत्य आहे ते सांगण्यास पत्रकारितेचा धर्म आडवा येतो. आपण कोणता पत्रकारिता धर्म फॉलो करत आहोत, हा माझा प्रश्‍न आहे. एखादे सत्य आहे तसे सांगू शकत नाही, असा हा पत्रकारिता धर्म कोणता ?  भारतात पाच वर्षांपूर्वी आलेल्या हिंदू, बौद्ध, ख्रिश्‍चन, शीख धर्मीय 33 हजार लोकांना नागरिकत्व द्यायला हवे. ते पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानातून आले आहेत. ते आता येथे आले आहेत. केवळ 33 हजार लोक आहेत. अनुभवू नये ते अनुभवून ते येथे आले आहेत. अशा 33 हजार लोकांना नागरिकत्व देताना देशभरात गोंधळ माजवला जात आहे. परंतु नागकित्वाची परिकल्पनाच अस्तित्वात नसताना आपण पारशी लोकांना जागा दिली. त्यांच्यावरही धार्मिक अत्याचार झाले होते. इस्त्रायल देश अस्तित्वात आल्यानंतर त्या देशाच्या संसदेत पहिला ठराव हा भारताच्या अभिनंदनाचा करण्यात आला. संपूर्ण जगात आमच्यावर धार्मिक कारणाने अत्याचार न करणारा भारत हा एकमेव देश असल्याचे त्या ठरावात म्हटले आहे. तेव्हा कोणाला नागरिकत्वाची कल्पना नव्हती. धर्मनिरपेक्षता सांगायला कोणी आला नव्हता. केवळ 33 हजार लोकांना नागरिकत्व देताना एवढा मोठा हंगामा केला जात आहे. शेवटी पत्रकार म्हणवून घेणारे नागरिकत्व कायद्यात काय आहे, हे पूर्णपणे वाचून आपल्या वाचकांना, दर्शकांना सांगायला हवे, असे म्हटले तर आपण पत्रकार म्हणून एका कायद्याच्या बाजूने बोलणे योग्य आहे का,  असा प्रश्‍न विचारत आहेत. एक पत्रकार अशा प्रकारच्या संदिग्धतेत आहे. या कायद्याच्या विरोधात बोलणार्‍या पत्रकारांविषयी त्यांना कोणताही नैतिक प्रश्‍न पडत नाही. त्याच्या बाजुने बोलणार्‍यांवर मात्र प्रश्‍नांची सरबत्ती केली जाते. भारतातील पत्रकारिता निरंतरपणे अशा संदिग्धतेत सापडली आहे. ती अशाप्रकारे संदिग्धतेत सापडली असताना इथल्या संस्कृतीलाच फटका बसला आहे. पत्रकारांच्या संदिग्धतेमुळे बसलेला हा फटका आहे. गेल्या पाच - सहा वर्षांत संपूर्ण भारत असहिष्णू देश असल्याचे संपूर्ण जगाला ओरडून सांगून झाले. भारतात असहिष्णूता वाढली आहे. हिंदू जातियवादाचा अतिरेक होऊन तांडव सुरू आहे, अशी अमेरिकेतही चर्चा झाली. यात पत्रकारांचे योगदान काही कमी आहे का? शेवटी पत्रकारांनी जे आहे ते सांगितले असते तरी अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. अशी परिस्थिती निश्‍चितच आली नसती. 1990 च्या दशकात काश्मीरातील पंडितांचा नको तो छळ करून त्यांना हाकलून लावले. तेव्हा भारतात अशाप्रकारची घटना घडली, याचे योग्यप्रकारे वृत्तांकन जरी केले असते तरी भारताविषयी अशाप्रकारे कोणी म्हटले नसते. सोडा, तेव्हा होऊ नये ते झाले, मात्र आताच्या पत्रकारांना काय झाले आहे? आपल्यातील कितीजण गौरी लंकेश यांचे नाव ऐकला आहात? बहुतेक सर्वजण ऐकला आहात. कितीजण गोविंद पानसरे यांचे नाव ऐकला आहात? कितीजण नरेंद्र दाभोळकर यांचे नाव ऐकला आहात ? बहुतेक सर्वजण ऐकला आहात. विचारवंतांची साखळी हत्या झाल्या कारणाने भारत एक जातियवादी देश बनला आहे, अशाप्रकारे जगभरात बिंबविण्यात आले. पत्रकार मंडळींनीच हे बिंबविले. आपल्यातील कितीजण कोईमतूरच्या फारुखचे नाव ऐकला आहात? कोईमतूरचा फारुख. एकही हात वर उठला नाही. कोईमतूरचा फारुखही अशाप्रकारेच विचारवंत होता. देव नाही, अशी त्याची भावना होती. देव नाही, देव नाही, देव नाही, असे कार्ड लिहून मुलीच्या हाती देऊन काढलेले छायाचित्र त्याने फेसबुकवर पोस्ट केला. त्यामुळे स्थानिक युवकांनी त्याचा खून केला. मात्र, एकाही पत्रकाराने कोईमतूरच्या फारुखची हत्या झाल्याची बातमी पहिल्या पानावर छापली नाही, प्राईम टाईमला प्रसारित केली नाही. एका समाजाने सर्व हत्यांचे निश्‍चितच प्रखरपणे निषेध करायला हवा. ती गौरी लंकेश यांची हत्या असो, गोविंद पानसरे यांची हत्या असो, नरेंद्र दाभोलकर यांची हत्या असो अथवा कोणत्याही विचारवंताची हत्या असो. या देशातील विचारवंतांना सोडा. फारुख याला विचारवंत म्हणून कन्सिडर करायला तरी पत्रकारांना काय झाले होते? फारूख का विचारवंत म्हणवून घेऊ शकला नाही ? जेएनयूमध्ये अफझल गुरूला श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजिलेल्या सभेला विरोध केल्यावर त्याला असहिष्णूता म्हणण्यापर्यंत पत्रकारितेची मजल जात असेल,  देशविरोधी घोषणा देणार्‍यांना हिरो ठरवण्यापर्यंत पत्रकारिता पोहोचत असेल तर पत्रकारिता येता येता देशविरोधी बनेल. आपण या देशात अशाप्रकारची एखाद दुसरी नव्हे अनेक घटना पाहिल्या आहेत. त्यामुळे काही पत्रकारांनी तरी आपल्यावर शिक्का मारला तरी हरकत नाही, आम्ही आहे ते आहे तसे जोरात सांगू असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही काळाची गरज बनली आहे. मी अनेक ठिकाणी ही गोष्ट सांगितली आहे. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था संपवण्यासाठी रशियातून 1970 च्या दशकात  आलेला एक हेर पूर्ण देशभर फिरला. अशा या सुंदर देशाचे मी नुकसान करणार नाही, असे सांगून तो काम सोडतो. एका देशाचे कशाप्रकारे वाटोळे केले जाते, याविषयी तो एक सुंदर मुलाखत देतो. एखाद्या देशाचे वाटोळे करायचे तर एकूण 35 वर्षांची प्रक्रिया आहे. आधीच्या सुमारे 20 वर्षांत त्या देशातील लोकांच्या मनात, विशेषत: युवकांच्या मनात तुमचा देश चांगला नाही, तुमचा धर्म चांगला नाही, तुमची आचारपद्धती चांगली नाही, तुमच्या रीतीनिती चांगल्या नाहीत, तुमचे देव चांगले नाहीत, तुमची पूजापद्धती चांगली नाही, हा विचार सतत बिंबवायला हवा. पुढच्या 10 वर्षांत आपोआपच तो देश कोसळेल, असे तो सांगतो. ते भारतात अत्यंत व्यवस्थितपणे चालले आहे. त्याच्याविरोधात काहीजणांनी तरी आवाज उठवायला हवे. त्याच्याविरोधात आवाज उठवताना आपला समाज परफेक्ट समाज आहे, या भ्रमात राहू नका. आमच्यासारखा समाज दुसरा कोणताही नाही, आमच्यासारखी संस्कृती कोणाची नाही, आमचेच चांगले या भ्रमात राहू नका. परंतु एक समाधान आहे, की एक सेल्फ करेक्टिंग सिस्टीम या संस्कृतीत सुरुवातीपासूनच आहे. आपल्यात असलेल्या समस्या आपणच सुधारुन पुढे जाण्याची या देशात एक पद्धती आहे. या देशात पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा होती. ती प्रथा थांबवण्यासाठी आकाशातून कोणी आला नाही. या देशातच समाजसुधारक जन्माला आले. हे योग्य नाही, असे करू नये, हे समाजासाठी चांगले नाही, हे सांगून त्यांनी याचा विरोध केला. अशाप्रकारे विरोध करुन सती पद्धती थांबवण्यात आली. लहान वयात पतीच्या निधनानंतर पत्नीचे केशवपन केले जायचे. तिने घरातून बाहेर पडू नये, अशी पद्धतीही आपल्या समाजात होती. हेही रोखण्यासाठी कोणी आकाशातून आले नाही. आमच्यातच समाजसुधारक जन्माला आले. ही हीन पद्धती आहे, हे थांबायला हवे, हे त्यांनी सांगितले. आपण ते थांबवलो. एखादी महिला विधवा झाल्यास ती जीवनात पुन्हा कधीही विवाह करू नये, ही प्रथाही होती. त्याचाही विरोध करणारे, ते समाजातून काढून टाकणारे महात्मे आपल्यात जन्मले. त्याच रीतीने या समाजात अस्पृश्यता नावाची हीन प्रथा होती. ही खुपच वाईट प्रथा आहे. ती या संस्कृतीला चिकटलेले कलंक आहे.  त्या कलंकाविरोधात लढता लढता हा देश पुन्हा यापूर्वीचे वैभव प्राप्त करण्याची अनिवार्यता आहे. असे कलंक आणि वाईट प्रथांसह आपण विश्‍वगुरू होण्याचे स्वप्न पाहत असू तर ते कधीही साध्य होणार नाही. आपल्यात असलेल्या वाईट प्रथा समाजाच्या विभाजनाला कारण ठरतात. अशा वाईट प्रथा प्रज्ञावंत समाजाने दूर करत पुढे जायला हवे. त्यासोबतच मी अथवा माझ्यासारखे ज्या विषयावर अधिक जोर देतात ते थेटपणे तुमच्याशी संबंधित नाही. त्याचे महत्व थेटपणे तुम्हाला माहीत होणार नाही. मात्र, आता जी चार - पाच वर्षांची मुले आहेत ना ते मोठे झाल्यावर त्यांना ते समजेल. 1925 -26 मध्ये कोणी लाहोर, कराचीत असलेल्या शीख अथवा हिंदू समाजबांधवांना कोणी आणखी 15 - 20 वर्षांत तुम्ही जगणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल, असे सांगितले असते तर ते हसले असते. मात्र, ते खरे झाले. 1980 मध्ये काश्मीरमधील पंडितांना आता दहा वर्षांत तुम्ही तुमच्या घरात राहू शकणार नाही, तुमच्या आयाबहिणींचे रक्षणही करू शकणार नाही, असे सांगितले असते तर पंडितही हसले असते. पण 1990 मध्ये ते खरे ठरले. आताही अनेकांचे बोलणे काही लोकांना तसेच वाटते. हसण्यासारख्या गोष्टी वाटतात. पुढे एक दिवस अशाप्रकारच्या कटू परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, या कळकळीने मी बोलत आहे. आपली एक श्रेष्ठ संस्कृती म्हणून आपण सांगतो. सहा हजार वर्षांचा इतिहास असलेली संस्कृती म्हणून आपण सांगतो. अशाप्रकारची आपली एकच संस्कृती नव्हती. जगभरात खुपच पुढारलेल्या कमीत कमी दहा संस्कृती होत्या. इजिप्त, मेसोपेटोमियात संस्कृती होती. आजच्या अमेरिकेत इंका संस्कृती होती. ते सर्व निसर्गाची पूजा करायचे. ईश्‍वराची आराधना करायचे. ते भूगोलमध्ये पुढारलेले होते. त्यांनी गणिताचा अभ्यास केला होता. तेव्हाच्या वैज्ञानिक अभ्यासाविषयी सांगण्यास वेळ पुरणार नाही. अशाप्रकाच्या दहा संस्कृती या जगात होत्या. परंतु शेवटी वाचलेली आमची एकमेव संस्कृती होय. उर्वरित संस्कृतीचे काय झाले, का नष्ट झाले, याविषयी आपणच अभ्यास केल्यास पुढील काळात कसे रहावे, हे समजत जाईल. असा काळ आला आहे, की मी दररोज पूजा करणार्‍या देवाचीच यापुढेही दररोज पूजा करत जाईन, असे म्हटले तरी त्याला अंधश्रद्धा म्हणतात. आम्हाला जे आराध्य त्या सर्व गोष्टींचा अवमान केला जाईल. पूर्वी झालेल्या मूर्तिभंजनाची पद्धती आणि आता होत असलेल्या मूर्तिभंजनाची पद्धती वेगळी आहे. पुढच्या दिवसांत ते आणखी वेगळ्या पद्धतीने होत जाईल. धर्म, देशाचा विषय बाजूला ठेवू. सैन्य, सैनिकाच्या बाजूनेही बोलले तरी कपाळावर शिक्का मारुन घेऊन फिरण्याची वाईट स्थिती आली आहे. सैन्याविषयी आणि देशाविषयीही बोलले तरी अशी वाईट परिस्थिती आली आहे. ही परिस्थिती आपण सर्वांना जागे करणारी घंटा ठरो. याचा अर्थ आपण उद्यापासून हाणामारीला सिद्ध होऊ, असा नव्हे. आपल्या मूळांविषयी आपल्यात सन्मानाची भावना वृद्धिंगत करणे हेच त्या लढ्याची सुरूवात आहे. आपण कोठून आलो, हे समजून घेणे आहे ना ते आपल्याला पुढे कुठे जायचे आहे, तो मार्ग दाखवेल. आपली अशी स्थिती का झाली आहे, हे समजून घेतले तर पुढे काय घडले पाहिजे, याविषयीचा मार्ग प्रशस्त होईल.              


Friday 13 August 2021

लिंगायत, वीरशैव, हिंदू शब्दांच्या भोवती...



 डाॅ. एम. चिदानंद मूर्ती 

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

अलिकडील दिवसांत लिंगायत आणि वीरशैव - लिंगायत स्वतंत्र धर्माचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.  लिंगायत धर्म बसवण्णांनी स्थापन केला आहे, बसवण्णा वीरशैव नव्हे तर लिंगायत आहेत, असे माते महादेवी काही वर्षांपासून सतत तीव्रपणे सांगत आहेत. त्यांचे मत खरे असल्याचे काही भक्तांना वाटते. मात्र, पुढील माहिती पाहा - 'माते महादेवी यांनी ५ एप्रिल १९६६ रोजी पूज्य लिंगानंद स्वामी यांच्याकडून जंगम दीक्षा घेतली. तेव्हा त्यांनी ' आदर्श जीवनासाठी, वीरशैव धर्मप्रचारासाठी सतत लढा देईन. शरण धर्म प्रचार करण्यासाठी परदेशात जाईन. मी आणखी जादा क्षमता प्राप्त करेन. नंतर वीरशैव मिशनरी बनेन', अशी प्रतिज्ञा केली. (लिंगायत वीरशैव : एंबुदू हौदु, हिंदूवू हौदु - डाॅ. महांतलिंग शिवाचार्य स्वामीजी, श्रीमद विभूतीपूर, वीर सिंहासन मठ, बेंगळुरू, रेणुक सौभाग्य सिरी ग्रंथ, पृष्ठ क्र. १४१). 

 माते महादेवी यांनी लिहिलेल्या 'मातृवाणी' पुस्तकात हा उल्लेख आहे -' दावणगेरे विश्वकल्याण मंटप स्थापक, धीर गुरुवर्य वैराग्यनिधी, वीरशैव धर्मपीदीप्ती... पूज्य श्री लिंगानंद स्वामीजी यांच्या चरणी... सच्चिदानंद सती प्रिय महादेवीचे अर्पण' (मातृवाणी, दावणगेरे १९६५) याच पुस्तकात 'वीरशैव लांछन (वीरशैवांचे प्रतीक)' नावाच्या लेखनात ही वाक्ये आहेत. - विभूती रुद्राक्षी धारणेय कंडु हीनैसी नगुवर | नोडेन्न मनदोळु सिग्गदु संचरिसिवे | त्रिपुंड्रवदु वीरशैवर विषय भस्मदा लांछन | रुद्राक्षीयदु लिंगपतीयक्षीयं होम्मी कट्टलट्ट मंगलसूत्र | इंथप्प विभूती रुद्राक्षी धरिसिद सद्भक्तरन कंडु | हीयाळीपर अडेतडेयिल्लद ज्ञानक्के मननोंदु नक्कनो सच्चिदानंद ( ವಿಭೂತಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಧಾರಣೆಯ ಕಂಡು ಹೀನೈಸಿ ನಗುವರ| ನೋಡೆನ್ನ ಮನದೊಳು ಸಿಗ್ಗದು ಸಂಚರಿಸಿವೆ| ತ್ರಿಪುಂಡ್ರವದು ವೀರಶೈವರ ವಿಷಯ ಭಸ್ಮದಾ ಲಾಂಛನ| ರುದ್ರಾಕ್ಷಿಯದು ಲಿಂಗಪತಿಯಕ್ಷಿಯಿಂ ಹೊಮ್ಮಿ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟ ಮಂಗಲಸೂತ್ರ| ಇಂಥಪ್ಪ ವಿಭೂತಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಧರಿಸಿದ ಸದ್ಭಕ್ತರಂ ಕಂಡು| ಹೀಯಾಳಿಪರ ಅಡೆತಡೆಯಿಲ್ಲದ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಮನನೊಂದು ನಕ್ಕೆನೋ ಸಚ್ಚಿದಾನಂದ’ (ಮಾತೆ ಮಹಾದೇವಿ: ಮಾತೃವಾಣಿ ಪು. 42). ( विभूती, रुद्राक्ष धारण करणाऱ्यांना पाहून हीनतेने हसणाऱ्यांना पाहून मला संताप येतो. भस्माचे त्रिपुंड हे वीरशैवांचे प्रतीक आहे. रुद्राक्ष हे लिंग हेच पती समजून बांधलेले मंगळसूत्र आहे. अशा विभूती, रुद्राक्ष धारण करणाऱ्या सद्भक्तांना पाहून अविचाराने हीनतेने वागणाऱ्यांवर सच्चिदानंद हसेल. ( माते महादेवी - मातृवाणी पृष्ठ ४२). 



या पुस्तकासाठी ज्येष्ठ विद्वान डाॅ. एच. तिप्पेरुद्रस्वामी यांनी लिहिलेले अभिप्राय योग्यच आहे. माते महादेवी यांनी पूर्वी वापरलेला 'वीरशैव' शब्द सोडून आता 'लिंगायत' हा शब्द वापरला आहे. तसेच बसवण्णांनी  'लिंगायत' धर्माची स्थापना केली, हे त्यांचे सांगणे त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेच्या विरुद्ध आहे.  वास्तविक बसवण्णांनी कोठेही 'लिंगायत' हा शब्द वापरला नाही. त्यांनी केवळ 'वीरशैव' हा शब्द वापरला आहे. उदाहरणार्थ - 'एन्न बंद भवंगळनु परिहरिसि... एन्न होंदिद शैव मार्गंगळ नेलेगळेदु निज वीरशैवाचारवरुही तोरी... शैव कर्मव कळेदु...' शैव असलेला मी चन्नबसवण्णांच्या सूचनेनुसार 'वीरशैव' झालो, असे बसवणांनीच सांगितले आहे  (वचन १०९८). त्यांनी ९३० व्या वचनात उल्लेख केलेल्या त्यांच्या पूर्वीच्या एका श्लोकात 'वीरशैव' शब्द आहे. इसवी सन १११० मधील केशिराजच्या 'शील महत्वद कंद' या पुस्तकात 'वीरशैव' शब्द आहे. त्यात अंगावर लिंग धारण करण्याची एक पद्धती  या अर्थाने  'लिंगायत' या शब्दाचा उल्लेख आला आहे. बसवण्णांनी कोठेही 'लिंगायत' या शब्दाचा वापर केला नाही. चित्र स्पष्ट आहे - 'वीरशैव' नावाचा धर्म बसवपूर्व कालीन आहे. - वर दिलेल्या आधारांनुसार हे स्पष्ट होते. याविषयी माते महादेवी काय सांगू इच्छितात ?

वीरशैव - लिंगायत हिंदू धर्माचा भाग नाही. तो एक स्वतंत्र धर्म आहे, असा निर्णय अखिल भारतीय वीरशैव महासभेने निर्णय  आहे. तसे मागणी पत्रही सरकारला दिले आहे. केंद्र सरकारने लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून मान्य केल्यास अल्पसंख्यकांना मिळणाऱ्या सर्व सोयी - सवलती लिंगायतांनाही मिळतील, ही आशा महासभेला आहे. हिंदू धर्म म्हणजे काय, त्याची व्याप्ती किती आहे, याची जाणीव महासभेला असू शकेल. स्वामी विवेकानंद, बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या श्रेष्ठांनी आपण हिंदू म्हणूनच जाहीरपणे घोषित केले आहे. भारताच्या सर्वोच्या न्यायालयाच्या पूर्णपीठाने १९९५ मध्ये एका निर्णयात हिंदू धर्माची लक्षणे अशाप्रकारे स्पष्ट केली आहेत - ‘Acceptence of the Vedas with reverence, recognition of the fact that the means or ways to salvation are diverse; and realisation of the truth that the gods to be worshipped is large: that indeed is the distinguishing features of Hinduism’ - वेदांवर श्रद्धा ठेवणारे, बहुदेवता आराधक, दैव साक्षात्कारासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, यावर विश्वास ठेवणार हिंदू आहेत. 



आतापर्यंत सर्व वीरशैव वेदांवर श्रद्धा ठेवणारे आहेत. 'ओंकार' (ओम) त्यांच्यासाठी प्रिय मंत्र आहे. काही देवांवर विश्वास ठेवणारे आहेत. कर्नाटकातील काही मठ  वेद - संस्कृत पाठशाळा चालवितात. उदाहरणार्थ  तुमकुरु येथील सिद्धगंगा मठाची संस्कृत वेद पाठशाळा होय. तेथे आजही सायंकाळची प्रार्थनासभा वेदघोषाने सुरू होते. लिंगायतांत शिव हाच परमदैव ही श्रद्धा असली तरी त्यातील काहीजण तिरुपतीच्या व्यंकटेश्वराचे भक्तही आहेत. हिंदूंप्रमाणेच वीरशैवही गायीला माता मानतात. - नंदी हे शिवाचे वाहन आहे. गावातील करियव्वा, काळव्वा आदी देवतांच्या पूजेतही सहभागी होतात. मात्र, तेथे चालणाऱ्या पशुबळीपासून दूर राहतात,  हे सहज आहे. 

बसवण्णांच्या वचनातील - (वेदक्के बरेयु कट्टुवे, शास्त्रक्के निगळवन्नुक्कुवे...)  अशाप्रकारच्या गोष्टी वेद विरोधी आहेत, हे सांगणे सत्याचा अपलाप करणारे आहे. ते  जातिभेद पाळत  इतर वर्गाच्या लोकांना हीन वागणूक देत वेदघोषात यज्ञयागादि करणाऱ्या ब्राह्मण वर्गाविरुद्ध आहे. त्याच बसवण्णांचे हे पुढील वचन लक्षवेधी आहे. - वेदागमगळ हेळिद हागे नडेवुदु, हेळिदंते नुडिवुदु, मीरी नडेयलागदु, मीरी नुडियलागदे मुक्तिपदवन्नैदुवात (वचन २३९). वेदांनी सांगितल्याप्रमाणे चालावे. त्यांनी सांगितलेले उल्लंघून चालणे शक्य नाही, हे त्यांचे स्पष्टातिस्पष्ट सांगणे आहे. 1१९५० मध्ये अस्तित्वात आलेल्या भारतीय संविधानानेही वीरशैव हा हिंदू धर्माचा भाग असल्याचे मान्य केले आहे. कायद्यानुसार वीरशैव, लिंगायत, हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी १९ व्या शतकात उदयास आलेले ब्रह्म, आर्य, प्रार्थना समाजाचे अनुयायी हे सर्वजण एकाच वर्गात मोडतात. बौद्ध, जैन, शीख समाजाचे अनुयायी हिंदू नसले तरी त्यांनाही हिंदू विवाह कायदाच लागू आहे.  कायद्यात वीरशैव, लिंगायतांना हिंदू धर्मापेक्षा वेगळ्या वर्गाचे समजणे हे कायदा करणाऱ्यांत असलेला वास्तवाचा अभाव होय. स्वत: बसवण्णांनीच मी वीरशैव म्हणून सांगितलेले असताना लिंगायत म्हणजे कोण ? बसवण्णांचे अनुयायी हे वीरशैवही होत, लिंगायतही होत. 


 

वीरशैव (लिंगायत) वर्ग हा हिंदू धर्माचा भाग नाही. तो स्वतंत्र धर्म म्हणून वरील कायद्यात दुरुस्ती होऊन लोकसभा, राज्यसभेत स्वीकारले जाणे आवश्यक आहे. सध्या ते शक्य न होणारी बाब आहे. कायद्यात सुधारणा करण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्राला पत्र लिहिले असले तरी ते लोकसभेत बहुमताने स्वीकारले जाणे असाध्य आहे.  तसेच पत्र लिहून विफल ठरल्यास ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाला आघातकारी ठरण्याची शक्यता आहे. सिद्धगंगेचे पूज्य शिवकुमार स्वामीजी यांनी म्हटले आहे - 'वीरशैव धर्म हिंदू धर्माचा अर्थात शैव धर्माची द्वैत, अद्धैत पंथांसारखी एक शाखा आहे...' ब्राह्मण जातीशी त्याची तुलना योग्य नाही. पूज्य पंचपीठाधिपतींचा अभिप्राय असा आहे - वीरशैव धर्म हिंदू धर्माचे आगम - वेद मानतो. आता वीरशैव हिंदू नाहीत, असे म्हणणे योग्य नाही. याच प्रकारे फ. गु. हळकट्टी, न्यायमूर्ती टी. एन. मल्लप्पा, कर्नाटक गांधी हर्डीकर मंजप्पा, सिद्धरामप्पा पावटे आदी मान्यवरांनी लिंगायत - वीरशैव हे हिंदूच आहेत, याविषयी सहमती व्यक्त केली आहे. 

लिंगायतांनी  (वीरशैव) आम्ही हिंदू नसल्याचे घोषित केल्यास वक्कलिग, बेडर, धनगर, भंगी, दलितही तशी घोषणा करतील  तेव्हा संपूर्ण भारतात कोणाची संख्या अधिक असेल?  क्रूरता, मतांधता, मतांतराने घेरलेल्या भारताचे भविष्य काय ? प्रज्ञावंतांनी याविषयी विचार करणे गरजेचे आहे.  मी जन्माने लिंगायत असलो तरी मला 'हिंदू' म्हणवून घ्यायला अभिमान वाटतो. 

(लेखक ज्येष्ठ संशोधक आहेत.)

साभार : विजयवाणी, शनिवार, दिन. ६ जानेवारी २०२८


Thursday 12 August 2021

मुस्लिमांच्या आक्रमणाला बळी पडलेली शरण क्षेत्रे

 डाॅ. एम. चिदानंद मूर्ती 

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

हिंदूंसाठी पवित्र क्षेत्र असलेल्या  वाराणसी (काशी), अयोध्या (औध), नेपाळमधील काठमांडू आदी ठिकाणे मुस्लिमांनी विद्ध्वंस करुन अपवित्र केल्याची हजारो उदाहरणे आहेत. कर्नाटकातच हंपीसारख्या शेकडो ठिकाणी अशी कृत्ये केली आहेत. हा सर्वांना माहीत असलेला विषय आहे. मात्र, सर्वजण सार्वजनिकरीत्या  बोलायला कचरतात. त्याच प्रकारे  कर्नाटकातील वीरशैवांना पूज्य असलेली काही शरण क्षेत्रे आक्रमणाला बळी पडल्याचा विषय बहुतेकांना माहिती नाही. शरण क्षेत्रांना भेटी देऊन डाॅ. जयश्री दंडे व डाॅ. वीरण्णा दंडे  यांनी लिहिलेल्या १२ ने शतमानद शरण स्मारकगळू (बसव कल्याणदिंद कूडलसंगमदवरेगे ) १२ व्या शतकातील शरण स्मारके (बसव कल्याणपासून कूडलसंगमपर्यंत) या पुस्तकात ठिकठिकाणी चित्रांसह त्याची माहिती दिली आहे. त्यावर आधारित हे छोटेसे लेखन. 

१. परुषकट्टा : बीदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथील परुषकट्टा नावाच्या ठिकाणी बसवण्णा हे गोरगरीबांना आर्थिक साहाय्य करायचे, अशी लोकांची धारणा आहे. परुषकट्टा आधी बसवेश्वर देवस्थानच्या अखत्यारीत होते. १९४८ मध्ये मुस्लिमांनी त्यावर दावा करत न्यायालयात धाव घेतली, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही.  तेथे त्याच्या शेजारीच दररोज निरंतरपणे गोहत्या, पशुबळी, मांस विक्री  चालते. आधी परुषकट्ट्यावर मोठे दगडी मंटप होते, त्याचे कलात्मक खांब उखडून तेथेच टाकले आहेत. बसव कल्याणला गेलो असताना ती जागा पाहून मी तीव्र दु:ख अनुभवलो आहे. हे स्पष्ट आहे, की परुषकट्टा हे एक मूळ शरण क्षेत्र आहे. 




२. पीर पाशा बंगला : बसवकल्याणमधील बसवेश्वर देवालयाच्या मागे असलेला पीर पाशा बंगला हेही पूर्वी शैव क्षेत्र होते. तेथे असलेल्या नंदी मूर्तीवर हिरवे कापड टाकून झाकण्यात आले आहे. खाली कन्नड संख्या कोरल्या आहेत. तेथील मंटपही चालुक्य स्थापत्य शैलीची आहे. बहुतेक बाराव्या शतकातील आहे. तेथील मंटपाला लागूनच एक चालुक्यांचा शिलालेख आहे. 




३. बसवकल्याणच्या शेजारीच किल्ला असलेला डोंगर आहे. काही वर्षांपूर्वी  तेथील एका देवालयातील शिवलिंग काढून टाकले आहे. (माझ्या पाहणीनुसार किल्ल्याच्या दगडी भिंती बांधण्यासाठी भग्न देवालयाच्या अवशेषांचा वापर करण्यात आला आहे. चालुक्यकालीन देवालये पाडून त्यांचे अवशेष वापरले आहेत.)




४. बसव कल्याणनजीकच्या नारायणपुरात वचनकार वक्कलिग मुद्दय्याचे मंदिर आहे. तेच त्याचे समाधीस्थळ असल्याचा लोकांचा विश्वास आहे. त्याचे शिष्य मृत्यूंजय याचीही समाधीही तेथे आहे. मृत्यूंजयाचे देवालय अथवा समाधीला मुस्लिमांनी दर्गा बनविला आहे. मृत्यूंजय मंदिराचे मुर्तुजा दर्गा असे नामकरण झाले आहे. (मृत्यूंजय - मुर्तुजा). 

५. बसव कल्याण तालुक्यातील हुलसूरमध्ये वचनकार लद्वेय सोम याची समाधी आहे. तेथे देवालयाच्या मागे उमा महेश्वराचे भग्न शिल्प होते. निजामाच्या काळात रझाकारांनी नाश केलेल्या देवालयाचा ते भाग बनले आहे. 

६. बीदर तालुक्यातील अष्टुरमधील अल्लम प्रभू यांचे स्मारकाचेही  सुलतान अहमद शहावली बहामनी दर्ग्यात रुपांतर झाले आहे. तेथे परंपरेनुसार पूर्वीपासून हिंदू पूजा करतात. मुस्लिमांच्या ताब्यातील या दर्ग्यात मुस्लिम नमाज पठण करतात. (अशा ठिकाणांकडे हिंदू - मुस्लिमांची एकतेचे उदाहरण म्हणून पाहणे योग्य नाही. अशाप्रकारे समानतेची स्थळे म्हणून काही हिंदू अभिमान बाळगतात. मात्र, ही सर्व ठिकाणे मुस्लिमांनी बळकावलेली हिंदूंची पवित्र स्थाने आहेत.  )




७. सुरपूर तालुक्यातील मुदनूरू हे जेडर दासिमय्या यांचे गाव. पूर्वी हे गाव अग्रहार होते. तेथे १००१ लिंग, काही तीर्थ आहेत. ग्रामस्थ दासिमय्या यांचे जन्मस्थळ म्हणून एक घर दाखवितात. त्याचे आराध्य देव रामनाथ देवालयाच्या शेजारीच १०१ खांबांचे संगमनाथ मंदिर आहे. मुस्लिमांनी  ते सुंदर मंदिर तोडून जमेल तसे त्याला पाडून सुमारे २५० हून अधिक जणांनी घरे बांधली आहेत. 



८. सोलापूर जिल्ह्याती मंगळवेढा ही बिज्जळाची आधीची राजधानी होय.  बसवण्णांनी तेथे सुरुवातीला कोषाधिकारी म्हणून काम पाहिले होते. तेथील किल्ल्याजवळील एक दर्गाही मूळ हिंदू मंदिर आहे. त्या दर्ग्यालाही मुस्लिमांप्रमाणेच हिंदूही मानतात. स्थानिक लोकांच्या मतानुसार दर्गा पूर्वी मंगला देवीचे देवस्थान होते. दर्ग्यात आजही चालुक्य कालीन शिल्पे आहेत. (मंगला देवीच्या नावावरुनच त्या गावाला मंगळवाड, मंगळवेढे असे नाव पडले आहे.)

९. सोलापुरातील किल्ल्यात वचनकार सिद्धरामाने मल्लिकार्जुन मंदिर बांधले होते. तो किल्ला ताब्यात आल्यानंतर मुस्लिम शासकांनी त्याच्या स्थलांतराचा आदेश दिला. त्याचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले असले तरी मूळ देवस्थानचा काही भाग अजुनही शेष आहे. (टिपू सुलताननेही श्रीरंगपट्टण किल्ल्यातील अंजनेय देवस्थानचे मशिदीत रुपांतर केले.)



वर सांगितलेल्या पुस्तकातील आणखी काही माहिती. या हजार वर्षांत संपूर्ण कर्नाटकात मुस्लिम शासकांनी हिंदू देवालयांचा विद्ध्वंस केला आहे. विजापुरातील जिल्हाधिकारी बंगल्याच्या आवारातील करीमुद्दीन मशीद, कलबुर्गीतील कलाम मशीद, दोड्डबळळापूर येथील जिष्मा दर्गा, बेळगाव किल्ल्यातील मशीद, जामा मशीद या सर्व मशिदी हिंदू देवालयांच्या दगडांनी बांधण्यात आल्या आहेत. (संदर्भ : सीताराम गोयल लिखित ''Hindu Temples : What happened to them (The Islamic evidence. ) बाबा बुडनगिरी येथील दत्तात्रेय पीठाच्या विकृतीकरणाचा मुस्लिमांनी प्रयत्न केला आहे. विजापुरातील जगप्रसिद्ध इब्राहिम रोजा आवारात असलेले हिंदू देवालयाचे अवशेष मी पाहिलो आहे. त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. हंपीतील वीरण्णा मंदिरही होन्नारसाब दर्गा बनले आहे. हे थांबविण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे हिंदू समाजातील आंतरिक जागृती आणि दृढसंकल्प होय. भारतात, शेजारी आणि जगात काय घडते आहे, काय घडू शकते याविषयी जागरूक राहून भविष्याविषयी आंतरिक तळमळ असावी. आपले राष्ट्र, धर्म याविषयी खरा अभिमान त्यांच्यात निर्माण व्हायला हवा. सत्य सांगायला, त्यानुसार वागायला घाबरू नये. सहनशीलता ही प्रशंसनीय तर असहनशीलता अक्षम्य आहे. मात्र, अति सहनशीलता अक्षम्य आहे. हिंदूंमधील आजची सहनशीलता अशीच कायम राहिल्यासह पुढील शतकातील भारत अथवा इंडियातील अल्पसंख्यक हिंदूंना वरील सत्यता जाणवेल. मात्र, तेव्हा ते पूर्णपणे असहाय्य असतील. हीच परिस्थिती पुढे राहिल्यास हिंदू धर्म, भारतीय संस्कृती केवळ इतिहासाच्या अभ्यासाचा विषयवस्तू ठरण्याची वेळ येईल. ही माझी आंतरिक तळमळ, वेदना आणि सात्विक आक्रोशाची घोषणा आहे.  

साभार : कन्नड प्रभा 












सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...