Saturday, 2 September 2023

गुरुपरंपरा : श्री शिवानंद ते श्री सिद्धेश्वर

 


स्वामी विवेकानंद म्हणतात, जो 'श्रोत्रिय' हैं - वेदों का रहस्य समझते हैं, जो 'अवृजिन' हैं - निष्पाप हैं, जो 'अकामहत' हैं - जिन्हें काम छू भी नहीं गया है, जो तुम्हें शिक्षा देकर अर्थप्राप्ती की आशा नहीं रखते वे ही सन्त हैं, वे ही साधु हैं । 

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी अर्धशतकाहून अधिक काळ आध्यात्मिक प्रवचनांच्या माध्यमातून ज्ञान दासोह करताना कशाचीही अपेक्षा केली नाही, हे आपण जाणताच. शिवाय ते वेदांचे रहस्य जाणणारे, निष्पाप होते. 'काम'च नव्हे तर कोणतीही 'कामना'ही त्यांच्या मनाला कधीही स्पर्श करू शकली नाही. ते खरे संत, साधु होते. आज 'धर्म'कार्याच्या नावाखाली पैसे घेऊन प्रवचन सांगणाऱ्यांंचे 'पीक'च आले आहे.  महिनाभराच्या प्रवचनासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. मात्र, श्री सिद्धेश्वर स्वामीजी, त्यांचे गुरु वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामीजी यांच्यासारखे संत विरळच !


एखादा संन्यासी निर्माण होण्यासाठी त्याच्या आई - वडिलांसह त्याच्या घराण्याची आध्यात्मिक, पारमार्थिक पार्श्वभूमी, संचित जशी कारणीभूत असते, अगदी तशीच शिष्यही महान बनण्यास त्याची गुरु परंपराही कारणीभूत असते. भगवान रामकृष्ण परमहंस यांनी म्हटले आहे, आपण साधे मडके घेतानाही वाजवून घेतो, गुरु निवडतानाही तशी काळजी घ्यावी. तसेच गुरुला दिवसा पहावा; रात्रीही पहावा, मग गुरु करावा. 
लहानपणापासूनच्या आध्यात्मिक ओढीने, वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामी यांची प्रवचने ऐकून श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले असले तरी त्यांच्यासारख्या विरागी गुरुमुळेच सिद्धेश्वर श्रींसारखा ज्ञानयोगी घडला, हे मागील लेखांमध्ये पाहिले आहे. शिवाय उन्नत गुरुपरंपरेचे आध्यात्मिक बळही त्यामागे आहे. ती कोणती हे आपण आज ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या आठव्या मासिक पुण्यस्मरण दिनानिमित्त पाहणार आहोत. 
एकदा मी ज्येष्ठ पत्रकार, मार्गदर्शक दशरथ वडतिले यांच्यासोबत शरण साहित्यविषयक कामाच्या निमित्ताने एका घरी गेलो होतो. तेथे श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांचा विषय निघताच एका आजीने म्हटले, सिद्धेश्वर स्वामीजी हे केवळ वेद, उपनिषदाचेच निरुपण करतात. शरण साहित्य - वचन - विषयी सांगत नाहीत. ज्यांनी सिद्धेश्वर स्वामीजी यांचे प्रवचन ऐकले आहे, ते जाणतात की यात किती तथ्य आहे ! न ऐकलेली मंडळी आजही याची खातरजमा करू शकतात, कारण त्यांची प्रवचने आज यू ट्यूबसह फेसबुकवर (ध्वनिफिती, पुस्तकेही) उपलब्ध आहेत. हे सारे सांगायचे कारण म्हणजे श्री सिद्धेश्वर स्वामीजी तर शरण साहित्य - वचन, शरणांची जीवनचरित्रे, घटना यांचा उल्लेख करतानाच जगात जे जे उत्तम ते ते सांगायचे. त्यात विश्वातील सारे तत्त्वचिंतक असायचे. मग ज्या भूमीत जन्माला आले, त्या भूमीतील ज्या साहित्याने 'सर्वे भवंतु...',  'वसुधैव कुटुंबकम्', 'कृण्वंतो विश्वमार्यम्' चा संदेश दिला, ते ज्या गुरुपरंपरेतून आले, त्या गुरुजनांनी जो तत्त्वविचार मांंडला, त्याचे मूळ वेद, उपनिषद आणि सिद्धांत शिखामणी मांडायचे. शिवाय त्यांच्या गुरु परंपरेतील पूज्यनीय पूर्वसुरींनीही प्रवचन, पुराण निरुपण व साहित्य यातून शरण साहित्य - वचन, शरणांची जीवनचरित्रे याद्वारे आपले विचार मांडून तत्कालीन समाजमनाची मशागत केल्याचा इतिहास आहे. मात्र, आजच्या विभाजनवादी मानसिकतेच्या बुद्धमंतांनी सर्वसामान्यांच्या मनात पेरलेले विष हेच आजीच्या प्रश्नात दडलेले आहे. सर्वसामान्यांच्या मनातील हा गोंधळ संपावा; कारण आपल्या पूर्वसुरींत हा गोंधळ नव्हता, तो अलिकडच्या स्वार्थी बुद्धिमंतांनी निर्माण केला हे समजावे, हा हेतू आहे. त्यासाठी सिद्धेश्वर स्वामीजी ज्या उन्नत गुरुपरंपरेचे पाईक आहेत, ती परंपरा समजून घेऊया.

परमात्म्याच्या अनंत चैतन्य सागरात कोठेतरी एकेक महात्मे दैवी संदेश घेऊन अवतरतात. अशापैकी श्री जगद्गुरू शिवानंद स्वामी हे एक होत. गदग शहरात मुक्तेश्वर पीठाची स्थापना केली. त्यांच्या १८ वर्षे घोर तपश्चर्येमुळे प्रत्यक्ष जगन्मातेलाच अवतरावे लागले. सकल वेद वेदांगांचे अध्ययन करुन शापानुग्रह सामर्थ्य मिळविलेले ते त्रिकाल ज्ञानी होते. आपल्या जीवनाची ९७ वर्षे लोककल्याणासाठी खर्ची घातली.
श्री शिवानंद स्वामी यांचे मूळ नाव वीरण्णगौडा होय. त्यांचे जन्म - शिक्षण गदग जिल्ह्यातील रोणमध्ये झाले. १८४२ मध्ये रोण नगरात त्रिविध दासोही म्हणून प्रसिद्ध असलेल्या घराण्यातील बसम्मा निंगणगौडा तोटगंटी यांच्यापोटी त्यांचा जन्म झाला. तोटगंटी यांच्या घरी आलेले नवलगुंदचे अजात नागलिंग शिवयोगी यांनी त्यांचे भविष्य जाणले होते. त्या गोंडस शिशुला हाती उचलून घेत ते म्हणाले, "या यंत्रयुगात मंत्र पुरुष बनून आलास  ! बाळा, तू या यंत्र शक्तीला मंत्र शक्तीने प्रवाही बनविले पाहिजे. त्यासाठीच तुझा हा अवतार आहे. तू या भूतलावर अवतरला ही चांगली गोष्ट आहे. या अंधाऱ्या जगात तू प्रकाश बनून आलास, लोकल्याणाचे हे कार्य तुझ्या हातून पुढे चालत राहू दे." अशाप्रकारे त्यांनी त्या बाळाला अनुग्रह दिला. मातेच्या वात्सल्याच्या पाळण्यात हा मुलगा संस्कारशीलतेने वाढला. त्याला शाळेत घातले. सातव्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाले. मात्र, त्या मुलाला पोटभरू शिक्षण नको झाले होते. मेंदू  ज्ञानाने भरणाऱ्या आध्यात्मिक शिक्षणाच्या ओढीला अनुरूप वातावरण हवे होते. आता वीरण्णगौडाचे वय १२ वर्षे होते. विरक्त भावना वाढीस लागली होती. शेतातून गवताचा भारा डोक्यावर घेऊन घरी येताना वाटेत अचानक थांबला. मनात अंतर्विचार सुरू झाला. हा भारा वाहिलेला मी कोण ? देह ? की आत्मा ? देहाने हा भारा वाहिला असेल ते जड आहे, चैतन्याच्या आश्रयाशिवाय चालू शकत नाही. अन् आत्मा असेल तर ते निराकार आहे. आकार वस्तूंना साक्षीभावांनी पाहते. तसे असेल तर मग हा गवताचा भारा वाहिलेला कोण ? या जिज्ञासेने वीरण्णगौडा याच्यात द्वंद्व निर्माण केले. डोक्यावरील ओझे खाली न उतरवता उभ्या उभ्या खूप वेळ विचार करू लागला. रोगी, वृद्ध, शव, दारिद्र्याचे प्रसंग पाहून दु:खाचे मूळ कारण काय ? हे शोधण्यासाठी बुद्ध मध्यरात्री झोपेतून उठून राजमहालाबाहेर पडला हे पाहिल्यास या वीरण्णगौडाचीही अवस्था तशीच झाली होती.

  त्या रस्त्याने ये - जा करणाऱ्या लोकांनी वाटेत गवताचा भारा वाहून उभ्या या मुलाविषयी त्याच्या आई - वडिलांना कळविले. सर्वजण आश्चर्यचकित झाले. मुलगा वेडा झाला की काय ही चिंता करतच त्याला घरी आणले. न सुटणारी समस्या समोर उभी राहिली. गावातील एका मंदिरात श्रावण मासानिमित्त सोलापूरच्या सिध्दरामावर पुराण सुरू होते. दररोज वीरण्णगौडा पुराण ऐकायला जात असे. पुराणिकांनी पुराण सांगताना श्री सिध्दरामाच्या जीवनातील एक घटना सांगितली. श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी बालक सिद्धराम श्रीशैलच्या रुद्रकमरी डोंगरावर उभा राहून मल्लय्या, मल्लय्या... म्हणत उडी मारला ! त्याची भक्ती पाहून श्रीशैल मल्लिकार्जुन प्रत्यक्ष झाल्याची कथा त्यांनी सांगितली. बालकाने ते ऐकले. ऐकलेले आता करुन पहावे या विचाराने दुसऱ्या दिवशी पहाटे कोणालाही कळू न देता गावाजवळील कळकमल्लय्याच्या दर्शनाला निघाला. रोणपासून १५ - २० किलोमीटर अंतरावरील 'कळकमल्लय्या' च्या जवळ जाऊन दर्शनासाठी आर्त साद घातली. त्याने दर्शन न दिल्याने 'त्या दिवशीचा मल्लय्या आज का नाही, देवा ! माझ्यात भक्तीची कमतरता आहे का ? तसे असेल तर मलाच तुला अर्पण करतो बघ !' म्हणाला. डोंगरावरुन खाली उडी मारली. ते पाहून घाबरलेल्या मेंढपाळांनी मुलगा मेला ! असे समजून आरडाओरडा सुरू केली. तसेच त्याच्या आई - वडिलांना याविषयी कळविले.

 डोंगरावरुन उडी मारलेल्या बालकाचे भक्तिपाश मल्लय्यालाही सोडवता आले नाही. बालकाने डोळे उघडून पाहिले तेव्हा तो प्रत्यक्ष मल्लय्याच्या मांडीवर होता. मल्लय्यालाच पाहत होता. बालकाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. 'बाळ ! ऊठ, वर ऊठ तुझ्या हातून लोककल्याण घडावयाचे आहे. त्यासाठी तू पुढे चालत राहा, माझा आशीर्वाद तुला आहे. घाबरू नकोस, धीर, वीर, शूर हो. ज्ञानयोगी बनून जग प्रकाशमय कर, ज्या कार्यासाठी आलास ते पूर्ण कर, जिज्ञासू बनून आलेल्यांना भवमुक्ती दे, गुरू बनून उपदेश कर'. - अशाप्रकारे अनुग्रहित करून अभय आश्वासन देत मल्लय्या अदृश्य झाला. बालकाला शोधत चिंताग्रस्त आई - वडिलांसह बंधूजन, भावकीतील मंडळी कळकमल्लेश्वराच्या देवस्थानात पोहोचले. त्यांनी त्याला घरी नेले. पुढे वीरण्णगौडा आणखी अंतर्मुख झाल्याने आध्यात्मिक साधना सुरू झाली. माया, मोह विरहित होऊन अलौकिक क्षेत्रात पक्ष्यांप्रमाणे विहरू लागला. लौकिक जीवनच नको म्हणणाऱ्या वीरण्णगौडाला एका परीक्षेला सामोरे जावे लागण्याची वेळ आली. 

रामदुर्ग तालुक्यातील सुरेबान गावी राहणारी त्याची आत्या यल्लम्मा यांनी त्याला दत्तक घेतले. दत्तकपुत्र म्हणून वीरण्णगौडा याला सुरेबानला जावे लागले. त्यानंतर गावाची पाटीलकीही सांभाळली. श्री गुरु रुद्रमुनी यांच्या आग्रहाखातर नाईलाजाने नीलम्मा नावाच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा झाला. तोच मुलगा श्री आत्मानंद स्वामी. त्यानंतर वीरण्णगौडा यांनी आपल्या गृहस्थ जीवनाचा त्याग केला. 

  संन्यास : नरगुंद तालुक्यातील बनहट्टी येथील हिरेमठाचे रुद्रमुनी शिवाचार्य यांच्याकडून वीरण्णगौडा यांनी लिंगदीक्षा आणि संन्यास दीक्षा स्वीकारली. दरम्यान, काही काळ एका शाळेत शिक्षक म्हणून सेवा केली. संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर वैराग्य भावनेने सुरेबान डोंगरावरील 'शबरीकोळ्ळ' या या ठिकाणी सुदीर्घ १८ वर्षे अखंड तपश्चर्या केली. मुंग्यांनी चावा घेऊन शरीर रक्तबंबाळ झाले, वाघांनी समोर येऊन डरकाळी फोडली, रामदुर्गच्या राजाने तेथे येऊन बंदुकीने हवेत गोळ्या झाडल्या तरीही जागे न होता हा निजविरागी इतका अंतर्मुख झाला होता की आपले अस्तित्वच विसरला होता.  १८ वर्षांची तपश्चर्या विजयादशमी (नवरात्री) च्या दिवशी फळास आली. त्या दिवशी जगन्माता प्रत्यक्ष झाली. तिने म्हटले, 'मुला ! काय हवे ते माग !' त्यावर वीरण्णगौडा म्हणाले, 'माते ! जगच मिथ्या असताना काय मागू, तुझी चरणसेवा तेवढी पुरे.' त्यानंतर न मागताही जगन्माता स्वत:हून ' मागितला नसलास तरी पुढे तू रथ, पालखीतून मिरवशील' असा आशीर्वाद देत अदृश्य झाली. 

   संचार : पुढे श्री वीरण्णगौडा यांनी फिरत संपूर्ण भारतभर संचार केला. त्यानंतर त्यांनी गदग येथे वास केला. त्यांना हुब्बळ्ळीच्या श्री सिद्धारुढ स्वामीजींनी शिवानंद हे बिरुद दिले. १८२३ मध्ये श्री शिवानंद स्वामीजींनी गदग येथे मुक्तेश्वर पीठाची स्थापना केली. अनेक मुमुक्षुंना त्या आध्यात्मिक तालमीत घडवून त्यांच्या जीवनाला नवा आयाम दिला. त्या माध्यमातून ते कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. त्या ज्ञानप्रवाहात पोहूनच भवसागर पार केलेले द्वितीय जगद्गुरू सदाशिवानंद महास्वामी होत. विजयपूरचे श्री वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामीजी, त्यांचे परमशिष्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी,  जगद्गुरू श्री नंदीश्वर महास्वामी यांच्यासह अनेकांनी मुक्तेश्वर पीठाचे अनुयायी म्हणून तेथे तेथे शाखा मठ (२०७ मठ) स्थापन करून श्री शिवानंद स्वामीजींच्या तत्त्वांचा प्रचार - प्रसार करत आहेत. 

श्री बसवादि शिवशरणांचे तत्त्वविचार, वेदांतच उगमस्थान असलेल्या श्री निजगुण शिवयोगी यांचे षट्शास्त्र, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, उपनिषदित्यादि ग्रंथांचे अंत:सार जाणलेल्या श्री शिवानंद स्वामीजी यांच्या शिष्य समूहाला कमतरता नाही. श्री गुरुंनी लावलेला अध्यात्माचा अमर नंदादीप संपूर्ण राज्य प्रकाशमय करीत आहे. विश्वास ठेवून आलेल्यांची जात, कुळ व गोत्र न विचारता त्यांचा उद्धार व्हावा, हाच विचार केला. मठपीठादि स्वामींसाठी नव्हेत, मानवी कल्याणासाठी आहेत, ही बसवादि शिवशरणांची तत्त्वे जीवंत स्वरुपात साकारण्यासाठी कार्य केले. मठात ज्ञान, बान (भात - प्रसाद), नाम दासोहाचे कार्य निरंतरपणे चालविले. आपल्या कार्याची मनीषा पूर्ण करुन १८६१ च्या प्रभवादि नाम संवत्सर, श्रावण महिन्यातील शक्ल पक्ष, पंचमी तिथी, उत्तरा नक्षत्र, ब्राह्मी मुहूर्तावर २१ ऑगस्ट १९३९ रोजी श्री शिवानंद स्वामीजी हे देहत्याग करुन शिवमय झाले. नुकतेच त्यांचे पुण्यस्मरण साजरे करण्यात आले.




No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...