५ जानेवारी २०२३
ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी सोमवारी (दि. २) वैकुंठ एकादशी दिवशी उत्तरायण कालात देहत्याग केला. त्यानंतर मंगळवारी (दि. ३) रात्री त्यांच्या पार्थिवावर स्वामीजींच्या इच्छेनुसार अग्निसंस्कार झाले. दरम्यान, लाखो लोकांनी शिस्तबद्धरीत्या त्यांचे अंतिम दर्शन घेतले. ती गर्दी अंतिम संस्कारानंतर बुधवारीही थांबली नव्हती. तर गुरुवारी चिताभस्म संग्रहावेळीही ती होती. अनेक भाविक साश्रुनयनांनी चिताभस्म देण्याची विनंती करत होते. मात्र, आश्रमाने ते कठोरपणे नाकारले आहे. कारण ते स्वामीजींच्या इच्छेविरुद्ध ठरेल.
'बयलू' यात्रेला निघण्यापूर्वी स्वामीजींनी आपल्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यास सांगितले होते. त्यांनी २०१४ मध्येच हे अंतिम अभिवादन पत्र लिहिले होते. त्यांनी त्यात देहाविषयी काही विषय स्पष्ट केले होते. १. देह भूमीत ठेवण्याऐवजी त्याला अग्नीला समर्पित करा. (वीरशैव लिंगायत समाजात पद्मासन स्थितीत समाधी देतात.) २. श्राद्धादिक विधी - विधानांची आवश्यकता नाही. ३. चिताभस्म नदी अथवा सागरात विसर्जित करा. ४. कोणतेही स्मारक उभारू नका.
भाविकांच्या भावनांना बळी पडून त्यांना स्वामीजींच्या पार्थिवाचे चिताभस्म दिल्यास काय घडू शकते, याची कल्पना आश्रमास आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात चिताभस्म संग्रह करण्यात आला. भविष्यात कोणी स्वामीजींचे चिताभस्म घेऊन ते कोठेही ठेवून त्यांचे स्मारक उभारण्याची भीती नाकारता येत नाही, जे स्वामीजींच्या विचाराविरुद्ध ठरेल.
स्वामीजींनी देह व आत्मा दोन्ही वेगळे मानले हे स्पष्ट आहे. देहाचे कार्य संपले, यामुळेच त्यांनी 'इच्छामरण'द्वारे 'बयलू' स्थितीकडे मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला. स्वामीजींनी गेल्या महिनाभरापासून आहार टप्प्याटप्प्याने आहार कमी - कमी केले होते. त्यांचा देहत्यागाचा निर्णय झाला होता. तसेच देह अग्निसमर्पित करण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यांचा देह अग्निसमर्पित झाला तरी त्यांचा अविनाशी आत्मा विचार, आचार रुपाने सदैव आपल्यासोबत राहणार आहे. तो निरंतर प्रेरणा देत राहणार आहे.
स्वामीजींचे गुरू श्री मल्लिकार्जुन स्वामी यांची समाधी आश्रमात आहे. 'माझे जीवन गुरुदेवांनी घडविले', असे कृतज्ञतापूर्ण गौरवोद्गार स्वामीजी आपल्या अंतिम अभिवादन पत्रात काढतात. स्वामीजी आध्यात्मिक प्रवचनाच्या निमित्ताने दरवर्षी वर्षभर कोठेही असले तरी गुरुपौर्णिमेला महिनाभर विजयपूरच्या ज्ञानयोश्रमात असायचे. तेथे प्रवचन, प्रसाद व गुरुपौर्णिमा उत्सव चालायचा. यावरुन गुरुदेवांप्रती त्यांची भक्ती, प्रेम दिसून येते. आता स्वामीजींच्या पार्थिवावर अग्निसंस्कार केल्याने, संपूर्ण चिताभस्म नदी, समुद्रात विसर्जित होणार असल्याने आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे कोणतेही स्मारक उभे राहणार नसल्याने आश्रमात श्री गुरू वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामी यांचीच समाधी राहणार आहे. भविष्यात कोणाची समाधी उभे राहणेही शक्य वाटत नाही. कारण स्वामीजींनी आपली समाधी व स्मारक न उभारण्याच्या इच्छेद्वारे क्रांतिकारी पाऊल टाकून आपल्या शिष्यांसमोरही एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचे शिष्यही आश्रमात आपल्या गुरुदेवाची समाधी नसताना आपली समाधी उभारण्याचा विचार करतील, असे वाटत नाही. विशेष म्हणजे लिंगैक्य होण्यापूर्वीच समाधी बांधून सज्ज ठेवणारे अनेक मठाधीश आपण पाहिले आहेत. सिध्देश्वर स्वामीजी संपूर्ण जीवनभर लाखो लोकांसाठी प्रेरक, आदर्श, पूज्यनीय राहिले. देहत्यागानंतरही ते अशा तथाकथित मठाधीशांहून विरळेच.
No comments:
Post a Comment