Monday 4 September 2023

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात



२० जानेवारी २०२३

 बालगाव आश्रमात गुरुवंदना 

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री गुरुदेव आश्रमात गुरुवारी गुरुवंदना कार्यक्रम झाला. न बोलावता, कोणाला निमंत्रण न देता हजारो साधक आपले श्रद्धेय गुरू ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींना वंदन करण्यासाठी एकत्र आले होते. यात भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. आरती गायनासह साधकांनी सोबत आणलेल्या पणत्यांनी आरती करुन ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींना वंदना केली. 

श्री बसवलिंग स्वामीजी, अध्यक्ष ज्ञानयोश्रम, विजयपूर

आ तनुवेल्ला लिंग काणा रामनाथा... या वचनाप्रमाणे श्री सिद्धेश्वर स्वामीजी आपल्यात ज्योतीप्रमाणे आहेत. ते आता सागर झाले आहेत.

बयलू बयलन्नू बित्ती बयलादरु नम्म शरणरु... आपण स्वामीजींना पाहिलो, ऐकलो, त्यांची सेवा केलो. त्यांचे जीवन आपल्यात आहे.  स्वामीजींनी सांगितलेल्या ज्ञान, भक्तीचा दीप तेवत ठेवा. 




अमृतानंद स्वामीजी

समाजात चर्चा आहे, श्री गुरुदेव सिद्धेश्वर स्वामीजींनी आपले कोणतेही अस्तित्व ठेवले नाही. त्यांनी दगड, लाकूड,  सोने या माध्यमातून त्यांनी कोणतेही अस्तित्व ठेवले नाही. मात्र, ते आज अनेक लोकांत आहेत. कोणीही व्यक्ती इतक्या लोकांच्या हृदयात राहिले नाहीत. १२ व्या शतकात विजयपूर बसवण्णांच्या भक्तीमुळे लोकप्रिय झाले. तर २१ व्या शतकात श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी ज्ञानाद्वारे अनेकांचे जीवन उजळवल्याने लोकप्रिय झाले. गुरुदेवांच्या वाणीला, ज्ञानाला, आचरणाला मृत्यू नाही. त्यांची वाणी असेपर्यंत विचार, ज्ञानाला मृत्यू नाही. ते देहरुपात असेपर्यंत त्यांच्या अस्तित्वाला सीमा होती. मात्र,  आता ते सर्वत्र आहेत. ते विचार, ज्ञानरुपाने प्रत्येकात आहेत. त्यांच्या ज्ञानाचा दीप सर्वत्र आहे. ते प्रकाशमय करण्यासाठी  आपण साधन बनले पाहिजे. आपले मन तेल, वात झाल्यावर ते प्रकाशमय होईल.

गुरुदेवांनी शरीर सोडले, आता ते बयलू रूप झाले. ते बयलू पूजक होते. सर्वत्र बयलू आहे. 

प्रत्येक झोपडी, घर, परिसर बयलू आहे. गुरुदेव लिंगैक्य झाल्यानंतर १८ तासांत लक्षावधी लोक दर्शनासाठी जमले. ते पाहून देशातील लोक आश्चर्यचकित झाले. असेही ज्ञानी असू शकतात, हे पाहून ते अचंबित झाले.  गुरुदेवांनी ज्ञानासाठी जीवन समर्पित केले.ते योगमय जीवन जगले. स्वामीजींच्या अपरोक्ष रेकॉर्डिंग केलेले

१० हजार प्रवचने उपलब्ध आहेत. जात, धर्म, राजकारण, हवे, नको विरहित ते जीवन जगले. ते बुद्धासमान राहिले. ते खिसा नसलेले संत होते. हा खिसा कधीही भरणार नाही, हे त्यांनी जाणले होते. त्यांचे दैहिक, बौद्धिक सामर्थ्य प्रचंड होते. ते रोज हजारो साधकांना भेटायचे, संवाद साधायचे. परंतु ते कधीही त्रासले नाहीत. त्यांना पाहिल्यास साधकांना आनंद व्हायचे. 

बाबुराव होनवाड

 श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्याला बोलण्यासारखे वागायला सांगितले. 

वाणी, शारिरीक तपश्चर्या, संयम हे आपण त्यांच्याकडून घ्यायला हवे. ते स्वामी

विवेकानंद,  रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी, ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे होते. आता लिंगैक्य झाल्यानंतर ते निसर्गात आहेत. ते कोणाला दीक्षा, आशीर्वाद न देता सर्वांचे गुरू आहेत.

सिद्धेश्वरांची बयलू यात्रा

 


५ जानेवारी २०२३

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी सोमवारी (दि. २) वैकुंठ एकादशी दिवशी उत्तरायण कालात देहत्याग केला. त्यानंतर मंगळवारी (दि. ३) रात्री त्यांच्या पार्थिवावर स्वामीजींच्या इच्छेनुसार अग्निसंस्कार झाले. दरम्यान, लाखो लोकांनी शिस्तबद्धरीत्या त्यांचे अंतिम दर्शन घेतले. ती गर्दी अंतिम संस्कारानंतर बुधवारीही थांबली नव्हती. तर गुरुवारी चिताभस्म संग्रहावेळीही ती होती. अनेक भाविक साश्रुनयनांनी चिताभस्म देण्याची विनंती करत होते. मात्र, आश्रमाने ते कठोरपणे नाकारले आहे. कारण ते स्वामीजींच्या इच्छेविरुद्ध ठरेल. 

'बयलू' यात्रेला निघण्यापूर्वी स्वामीजींनी आपल्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यास सांगितले होते. त्यांनी २०१४ मध्येच हे अंतिम अभिवादन पत्र लिहिले होते. त्यांनी त्यात देहाविषयी काही विषय स्पष्ट केले होते. १. देह भूमीत ठेवण्याऐवजी त्याला अग्नीला समर्पित करा. (वीरशैव लिंगायत समाजात पद्मासन स्थितीत समाधी देतात.) २. श्राद्धादिक विधी - विधानांची आवश्यकता नाही. ३. चिताभस्म नदी अथवा सागरात विसर्जित करा. ४. कोणतेही स्मारक उभारू नका. 

भाविकांच्या भावनांना बळी पडून त्यांना स्वामीजींच्या पार्थिवाचे चिताभस्म दिल्यास काय घडू शकते, याची कल्पना आश्रमास आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात चिताभस्म संग्रह करण्यात आला. भविष्यात कोणी स्वामीजींचे चिताभस्म घेऊन ते कोठेही ठेवून त्यांचे स्मारक उभारण्याची भीती नाकारता येत नाही, जे स्वामीजींच्या विचाराविरुद्ध ठरेल.

स्वामीजींनी देह व आत्मा दोन्ही वेगळे मानले हे स्पष्ट आहे. देहाचे कार्य संपले, यामुळेच त्यांनी 'इच्छामरण'द्वारे 'बयलू' स्थितीकडे मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला. स्वामीजींनी गेल्या महिनाभरापासून आहार टप्प्याटप्प्याने आहार कमी - कमी केले होते. त्यांचा देहत्यागाचा निर्णय झाला होता. तसेच देह अग्निसमर्पित करण्याची इच्छाही व्यक्त केली.  त्यांचा देह अग्निसमर्पित झाला तरी त्यांचा अविनाशी आत्मा विचार, आचार रुपाने सदैव आपल्यासोबत राहणार आहे. तो निरंतर प्रेरणा देत राहणार आहे.  

स्वामीजींचे गुरू श्री मल्लिकार्जुन स्वामी यांची समाधी आश्रमात आहे. 'माझे जीवन गुरुदेवांनी घडविले', असे कृतज्ञतापूर्ण गौरवोद्गार  स्वामीजी आपल्या अंतिम अभिवादन पत्रात काढतात. स्वामीजी आध्यात्मिक प्रवचनाच्या निमित्ताने दरवर्षी वर्षभर कोठेही असले तरी  गुरुपौर्णिमेला महिनाभर विजयपूरच्या ज्ञानयोश्रमात असायचे. तेथे प्रवचन, प्रसाद व गुरुपौर्णिमा उत्सव चालायचा. यावरुन गुरुदेवांप्रती त्यांची भक्ती, प्रेम दिसून येते. आता स्वामीजींच्या पार्थिवावर अग्निसंस्कार केल्याने, संपूर्ण चिताभस्म नदी, समुद्रात विसर्जित होणार असल्याने आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे कोणतेही स्मारक उभे राहणार नसल्याने आश्रमात श्री गुरू वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामी यांचीच समाधी राहणार आहे. भविष्यात कोणाची समाधी उभे राहणेही शक्य वाटत नाही. कारण स्वामीजींनी आपली समाधी व स्मारक न उभारण्याच्या इच्छेद्वारे क्रांतिकारी पाऊल टाकून आपल्या शिष्यांसमोरही एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचे शिष्यही आश्रमात आपल्या गुरुदेवाची समाधी नसताना आपली समाधी उभारण्याचा विचार करतील, असे वाटत नाही.  विशेष म्हणजे लिंगैक्य होण्यापूर्वीच समाधी बांधून सज्ज ठेवणारे अनेक मठाधीश आपण पाहिले आहेत.  सिध्देश्वर स्वामीजी संपूर्ण जीवनभर लाखो लोकांसाठी प्रेरक, आदर्श, पूज्यनीय राहिले. देहत्यागानंतरही ते अशा तथाकथित मठाधीशांहून विरळेच.



बयलू योगी

 


प्रखर ज्ञानी, योगमार्गनिष्ठ, उन्नत आध्यात्मिक साधक, बसवण्णांचे सहकारी, शरणश्रेष्ठ श्री अल्लमप्रभू यांची आज जयंती. यानिमित्त त्यांना शत शत नमन.

शब्द एंबेने श्रोत्रद एंजेलु

नोटा एंबेने नेत्रद एंजेलु

वासने एंबेने घ्राणद एंजेलु

रुचि एंबेने जिव्हे एंजेलु

स्पर्श एंबेने त्वक्किन एंजेलु

ई नानू एंबेने भिन्नवडिद बेळगिनवळगण

बेळकु काणा गुहेश्वरा.

या वचनातून श्री अल्लमप्रभूंनी बयलू योग सांगितले आहे. एनिदू बयलयोग या प्रवचनात ज्ञानयोगी श्री सिध्देश्वर स्वामी सांगतात, बयलू योग म्हणजे मन रिक्त करणारे योग. अल्लमाच्या मनात काही नाही. ते रिक्त आहे. याउलट आपले मन नावाचे घर भाव, स्वप्न, वस्तूंनी भरले आहे. अल्लमही पूर्वी असेच होते. त्यांनी आपले मन रिक्त केले. हे मोकळेपणच देव. या रिक्ततेचा अनुभव ईश्वराचे दर्शन घडवेल. मन रिकामे करणे म्हणजे साधना, भरणे म्हणजेच संसार. आध्यात्मिक चिंतक वीणा बण्णंजे यांनीही याविषयी खूप सुंदर विवेचन केले आहे. तसेच त्या म्हणतात, अल्लमांनी आपल्या वचनांतून स्वतःविषयी काही सांगितलेच नाही. त्यासाठी त्या श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्याशी झालेल्या चर्चेचे उदाहरण देतात. त्या एकदा स्वामीजींना म्हणाल्या, आपण आत्मचरित्र लिहा. त्यावर स्वामीजी म्हणाले, काही घटनाच नाहीत. अशाप्रकारे अल्लमाच्या जीवनातही काही घटनाच नव्हत्या. ते अशा अभिन्न स्थितीला पोहोचलेले महान योगी होते.

२ एप्रिल २०२२

जसा गुरु तसा शिष्य



 २२ जानेवारी २०२३

सळईने माझ्या हातावर डागा, 

कायम आठवण राहील

गुरवू निनू, अरिवू निनू

दैव निनू, जीव निनू

निनिल्लदे....बालगाव - कात्राळ आश्रमात एका सामान्य साधकाने गीताच्या माध्यमातून ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांना केलेली वंदना. या गीतातून स्वामीजींविषयी सामान्य साधकांत असलेले गुरुविषयीचे अनन्य प्रेम, भक्ती, त्यांची महानता दिसून येते. सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या बयलू यात्रेनंतर संतवेंदरे यारू या गीताने घरोघरी मनामनापर्यंत पोहोचत हृदयाहृदयात स्थान मिळविले आहे. त्याविषयी आपण नंतर पाहू. पण जनमनात हे स्थान मिळविणारे निर्मोही संत, पाच दशकांहून अधिक काळ आध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या रसाळ, सहज - सोप्या वाणीने प्रबोधन करणारे  ज्ञानयोगी, कधीही काहीही हवे न म्हणणारे जंगमश्रेष्ठ, बयलू यात्रेनंतर लोकांना अधिक हवेहवेसे वाटणारे ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी इथपर्यंत कसे पोहोचले, ते कसे घडले याविषयी सर्वांनाच कुतूहल असणे साहजिकच आहे. ते घडले ते गुरूंमुळे. ते म्हणजे वेदांत केसरी मल्लिकार्जुन शिवयोगी यांच्यामुळे. ही बाब या गुरू - शिष्याविषयी माहिती असलेल्या जुन्या लोकांना माहीत आहे. मात्र, स्वामीजींचे गुरू मल्लिकार्जुन शिवयोगी यांचे नाव आजच्या पिढीला माहिती नाही. जसा गुरू तसा शिष्य. जे पेरू, तेच उगवणार. त्यामुळे वेदांत केसरी  गुरू श्री मल्लिकार्जुन स्वामी यांच्याविषयी थोडेसे...  गुरुवंदना कार्यक्रमात बालगावच्या गुरुदेवाश्रमाचे श्री अमृतानंद स्वामीजी यांनी उल्लेख केला. १९८४ ज्ञानयोगाश्रम उभे राहिले. मात्र, पूर्वीपासून मल्लिकार्जुन स्वामीजींना आश्रम नव्हता. ते साधकांच्या घरीच निवास करायचे. ते त्रिकाल (सकाळी, दुपारी व सायंकाळी) प्रवचन करायचे. कलबुर्गी जिल्ह्यातील एका ठिकाणी मल्लिकार्जुन स्वामीजींचे प्रवचन होते. त्यासाठी स्वामीजी काहीही घेत नसायचे. तरीही त्या गावातील साधकांनी त्यांना काही रक्कम  द्यायचे ठरवले. ते रक्कम घेऊन स्वामीजींकडे पोहोचले. स्वामीजींना ते देऊ लागले. त्यावर स्वामीजींनी विचारले, हे काय? लोकांनी सांगितले, पैसे आहेत. त्यावर स्वामीजींनी म्हटले, आपणांस माहिती आहे की मी काही घेत नाही. त्यावर ग्रामस्थांनी म्हटले, तरीही आपली आठवण रहावी, यासाठी आपण काही रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे, आपण पैसे घ्यावेत. त्यावर स्वामीजी म्हणाले, असे करा; एक सळई आणा, ती तापवा आणि त्याच्याने माझ्या हातावर डागा. त्यामुळे कायमची आठवण राहील.

परमज्ञानी श्री सिद्धेश्वर स्वामीजी

 


३ जानेवारी २०२३

भगवद्गीतेतील १३ व्या अध्यायाचे निरुपण करताना आर्ज्य या शब्दाविषयी बोलताना कर्नाटकातील चिंतक चक्रवर्ती सुलिबेले म्हणतात, खरे ज्ञानी कसे असतात, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. अशाप्रकारचा परमज्ञानी मी पाहिलोय. त्यांचे सानिध्य सतत आनंददायी वाटते. ते केवळ सिद्धेश्वर स्वामी मात्र. त्यांनी आतापर्यंत कोणातही दोष पाहिल्याचे बघितलो नाही. ते खूप दुर्मिळ व्यक्ती. कोणीही असो, त्यांच्यात छोटेसे दोष असले तरी त्यांनी ते दोष म्हणून दाखवल्याचे मी कधीच पाहिलो नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप वैशिष्ट्यपूर्ण. ज्ञानाकडे जाता - जाता मनुष्य कसा पक्व बनतो, याचे एक चांगले उदाहरण आपल्यासमोर आहे. उदाहरणे अनेक असतील, मात्र आताही आपल्या डोळ्यांसमोर असलेले दुर्मिळ व नि:संशय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री सिद्धेश्वर स्वामी होत. 

यावरुन ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांची ज्ञानश्रेष्ठता दिसून येते. ज्ञानदान हेच श्रेष्ठदान मानलेले स्वामीजी शरणश्रेष्ठ अल्लमप्रभू देव यांच्या ज्ञानपथावरुनच चालत राहिले. त्यांच्या वचनसाहित्यावर स्वामीजींनी सिद्ध केलेला ग्रंथ शरणजनांना पथदर्शक ठरला आहे. 'बयलू' स्थितीकडे मार्गस्थ होण्यापूर्वी स्वामीजी अंतिम संदेशात अल्लमप्रभू देवांच्या वचनाचाच उल्लेख करतात, 

'सत्यवू इल्ल, असत्यवू इल्ल

सहजवू इल्ल, असहजवू इल्ल

नानू इल्ल, निनू इल्ल

इल्ल इल्ल एंबुदु तानिल्ल

गुहेश्वरनेंबुदु ता बयलु. 

आपण बसवण्णा, अल्लमप्रभू देव, चन्नबसवण्णा या शरणांसह ज्ञानेश्वर, तुकाराम, शंकरदेव, तुलसीदास आदी भारतातील अनेक  संतश्रेष्ठांची नावे ऐकली. त्यांच्या साहित्याचा अभ्यास करताना ते विचार आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती संतमंडळी कशी असतील, याची कल्पना ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींना पाहिल्यावर आली. अशा संतश्रेष्ठाच्या काळात आपण जन्माला आलो, त्यांना पाहिलो, त्यांचे आध्यात्मिक विचार ऐकलो,  त्यांच्या सान्निध्यात काही क्षण राहिलो, त्यांच्याकडून ज्ञान मिळविता आले, हे आमच्यासाठी आमच्या जीवनातील सर्वात मोठे संचित व पुण्यप्रद म्हणावे लागेल. 

आनंदाने राहा!

 


८ एप्रिल २०२०

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांनी कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर दिलेला संदेश

आपण कशाला चिंता करताय

सगळं लॉक नाही केलं

सूर्योदय लॉक नाही केलं

प्रेम लॉक नाही केलं

कुटुंबाचं वेळ लॉक नाही केलं

दया लॉक नाही केलं

सृजनशीलता लॉक नाही केलं

शिकणं लॉक नाही केलं

संवाद लॉक नाही केलं

कल्पनाही लॉक नाही केलं

वाचन लॉक नाही केलं

संबंध लॉक नाही केलं

प्रार्थना लॉक नाही केलं

ध्यानही लॉक नाही केलं

निद्रा लॉक नाही केलं

घरचे काम लॉक झाले नाहीत

विश्वास लॉक झाले नाही

तुमच्यात आहे त्याचे पालन करा

आपण जे सतत करू इच्छिता त्यासाठी लॉकडाउन एक संधी

व्हेंटिलेटरपेक्षा मास्क उत्तम आहे

आयसीयूपेक्षा घर अधिक उत्तम आहे

बरे होण्यापेक्षा त्याला रोखणे उत्तम आहे

त्यामुळे आनंदाने राहा!

'मी' देह नव्हे तर ईश्वरी तत्त्व



५ जानेवारी २०२३

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींचे आध्यात्मिक प्रवचनवगळता मी कन्नडमध्ये आध्यात्मिक व संत साहित्याविषयी सर्वाधिक व्याख्याने ऐकतो ते वीणाताई बन्नंजे यांचे. अल्लमप्रभू देव यांच्या व्याख्यानात त्यांच्याविषयी सांगताना वीणाताई श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे उदाहरण देतात. एका भेटीत वीणाताई स्वामीजींना आत्मचरित्र लिहिण्याविषयी विचारणा करतात. त्यावर स्वामीजी म्हणतात, 'माझ्या जीवनात लिहिण्यासारख्या घटनाच नाहीत.(बरेयलक्के नन्न जीवनदल्ली घटनेगळे इल्ल)' याविषयी बोलताना वीणाताई अल्लमप्रभू देव यांचे वचन उद्धृत करत खूप सुंदर विवेचन करतात.  हे सांगायचे कारण म्हणजे ज्यांनी आपले जीवन व वाणीने अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवले, त्यांचे जीवन आनंददायी बनवले, त्यांच्या जीवनात घटनाच नसतील का? तर घटना निश्चितच होत्या. पण त्या जीवनाविषयी मोह नव्हता. सर्वसामान्यांसमोर  जीवनतत्वज्ञान मांडणारे स्वामीजी केवळ त्यांच्यासमोर बोलले नाहीत तर त्याप्रमाणे जगले. 

मात्र, आज आम्ही सोशल मीडियात माझ्या पोस्टला किती लाईक्स मिळाल्या, कितीजणांनी शेअर केले याचा हिशेब मांडत

 असतो. हे जाऊद्या आम्हीच शहाणे, सकलजनांना शहाणे करण्याचा आम्हालाच जन्मदत्त अधिकार मिळाला या अविर्भावात आपले साहित्य व लेखनातून लोकांना ज्ञानामृत  पाजणारे अनेक लेखक, पत्रकार व बुद्धिमंतांनी आत्मचरित्र लिहिले आहेत. अनेकांच्या आत्मचरित्रात सत्यासत्यता किती? आत्मगौरवासाठी कितीजणांनी आत्मचरित्र लिहिले नसतील !  त्यांच्या आत्मचरित्रात कितपत नीरक्षीर विवेक आहे ? (मी हे सर्वांना म्हणत नाही. अनेक थोर व्यक्तींचे आत्मचरित्र निश्चितच प्रेरणादायी आहेत.) ते वास्तविक जीवनात आपल्या साहित्यात मांडलेल्या विचाराप्रमाणे  जगले का?  कितीजणांनी अशा मंडळींचे आत्मचरित्र वाचले, हा शोधाचा विषय आहे. 'आत्मचरित्र'चेही 'भांडवल' करण्याचा हा काळ आहे. म्हणूनच अशाप्रसंगी माझ्या जीवनात लिहिण्यासारख्या घटनाच नाहीत, असे सांगणारे निर्मोही सिद्धेश्वर स्वामीजी लाखो लोकांच्या हृदयात ज्ञानज्योत बनून तेवत राहतात. बसवण्णा आपल्या एका सुंदर वचनात म्हणतात, ...तन्न बण्णिसबेड..., इदे अंतरंग शुद्धी, इदे बहिरंग शुद्धी. आत्मप्रौढी मिरवू नको, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी. स्वामीजींचे अंतरंग शुद्ध होते. म्हणूनच ते 'आत्मचरित्रा'तील या 'आत्मप्रौढी'पासून दूर राहिले असावेत. कारण त्यांच्यातील 'मी' देह नव्हे तर  ईश्वरी तत्त्व (आत्मा) होते.

लिंगैक्यातच दडलेय लिंगोद्भवाचे सत्य !

 


१९ मार्च २०२२

नुकतेच फाल्गुन शुक्ल पक्ष १३ ( १६ मार्च ) रोजी जगद्गुरू श्री रेणुकाचार्य जयंती म्हणजे अवतारोत्सव साजरा झाला.  जगद्गुरू रेणुकादि पंचाचार्य हे  लिंगोद्भव अवतारी पुरुष असल्याचा समज आहे. त्यांच्या अवताराचा जेव्हा  विषय निघतो तेव्हा माझे तथाकथित पुरोगामी मित्र तावातावाने एक प्रश्न विचारतात, लिंगातून कसा त्यांचा जन्म झाला ? स्त्री - पुरुष समागमाशिवाय कोणत्याही जीवाचा जन्म शक्य आहे ? माझे उत्तर आहे, निश्चितच शक्य नाही. केवळ रेणुकादि पंचाचार्यच नव्हे तर तुम्ही, आम्ही सकल जीवराशी यांचा जन्म त्याशिवाय झाला नाही, हे जीवशास्त्रीय सत्य आहे. 

वीरशैव लिंगायत समाजात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते लिंगैक्य झाले अथवा शिवैक्य झाले, असे म्हटले जाते. लिंगैक्य शब्द प्रचलित आहे, हे तेही जाणतात.  एखाद्याच्या  मृत्यूनंतर समाधी विधीवेळी जंगमही अमुक अमुक व्यक्ती अमुक अमुक दिवशी लिंगैक्य झाले अथवा शिवैक्य म्हणजेच शिवचरणी लीन झाले, असे म्हणतात.  मात्र, आपणांस माझा एक प्रश्न आहे. जसे लिंगैक्य तसे लिंगोद्भव. लिंगैक्य याविषयी कधी आपण प्रश्न उपस्थित केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मग लिंगोद्भव याविषयीच प्रश्न का ? लिंगैक्य म्हणजे मनुष्य थेट लिंगात ऐक्य होतो, म्हणजे सामावतो का ? तर निश्चितच नाही. तरीही समाजाला आम्हीच  शहाणे करू शकतो, या थाटात लिंगोद्भव याविषयी प्रश्न विचारणारे लिंगैक्य याविषयी कधीच का बरे 'ब्र' काढले नाहीत? कारण अंतस्थ हेतू स्पष्ट आहे,  समाजाला शहाणे करण्याचा नव्हे, तर एकसंघ समाजात भ्रम निर्माण करुन फुटीरतेची बीजे पेरणे. कारण याशिवाय त्यांची बुद्धिमंत म्हणवून मिरवण्याची डाळ शिजू शकत नाही. गेल्या काही वर्षांत वीरशैव लिंगायत समाजातील 'स्वतंत्र धर्म' विचाराच्या फुटीचा लाभ घेऊन लिंगोद्भव विषयी उच्चरवाने हा प्रश्न विचारला जात आहे. 

लिंगैक्य म्हणण्यामागे जो शुद्ध भाव आहे, तोच शुद्ध भाव लिंगोद्भव म्हणण्यामागे आहे. रेणुकादि पंचाचार्य हे लिंगोद्भव असल्याचे सुप्रभेदागम, स्वयंभूवागम आणि वीरलैंगोपनिषद आदी ग्रंथांत प्रतिपादित केले आहे. अक्कमहादेवी, चन्नबसवण्णा यांनी पंचाचार्य यांचा लिंगोद्भव होऊन ते पुन्हा लिंगातच ऐक्य झाल्याचे  बीज - वृक्ष दृष्टांताद्वारे विवेचन केले आहे. त्याच प्रकारे तोंटद सिध्दलिंगेश्वर यांनी आपल्या वचनांत रेणूक आणि रेवणसिद्ध यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ते लिंगातून अविर्भूत होऊन शेवटी त्यातच अदृष्य झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. 

गुरूचे मूळ शोधू नये, हे ज्या उद्देशाने सांगितले त्याच उद्देशाने तेव्हाच्या लोकांनी रेणुकादि पंचाचार्य यांची पार्श्वभूमी सांगितली नसेल. अल्लमप्रभूंच्या गूढ वचनांसारखेच पंचाचार्य यांच्या जन्माचेही गूढ ! संन्यास दीक्षेनंतर केवळ व्यक्तीचे नावच बदलत नाही तर त्याचे त्याच्या कुटुंब व नातेवाईक यांच्याशी कोणताही संबंध नसतो. तेही आपल्या कुटुंब अथवा आपल्या पार्श्वभूमीविषयी सांगत नसतात. उत्सुकतेपोटी विचारल्यावर कुटुंब नव्हे,  गावाचे नावही न सांगणारे संन्यासी मी पाहिले आहेत. आज वीरशैव लिंगायत समाजातील प्रसिद्ध अशा ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्यासह जगद्गुरु अथवा शिवाचार्य यांच्या कुटुंबाची आपल्याला किती  माहिती आहे ? तुमकुरु मठाचे श्री शिवकुमार स्वामी यांच्यावरील पुस्तकांमुळे त्यांच्या कुटुंबाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली. योगी आदित्य नाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याआधी 'फेकसत्ता' सह किती जणांना त्यांचे आईवडील अथवा कुटुंबीय यांच्याविषयी माहिती सोडा, जाणून घेण्याची उत्सुकता होती !

भारतात अनेक संन्यासी, संत होऊन गेले ज्यांच्या गाव, कुटुंबाची माहिती नाही. अशाप्रकारे रेणुकादि पंचाचार्य हे पुरातन असल्याने त्यांच्या आईवडिलांचे नाव अथवा त्यांच्या जन्माविषयी कोणतीही माहिती मिळाली नसल्याने त्यांना लिंगोद्भव म्हटले जात असावे. हे केवळ सांकेतिक आहे. याशिवाय वीरशैव लिंगायतांत गर्भाष्टमीतच लिंगदीक्षा दिली जाते. त्या कारणाने जन्मानंतर आजीव ते लिंग शरीरावर धारण केले जाते. इतकेच नव्हे तर ते मृत्यूनंतर त्या लिंगासह समाधी दिली जाते. त्यामुळे सर्व वीरशैव लिंगायत हे लिंगोद्भवच. यामुळेच लिंगोद्भव आणि लिंगैक्य म्हटले जाते. ती परंपरेनुसार रूढ झाली आहे. विस्तारित विश्व हेच लिंग. तीच उद्भव व ऐक्याची प्रक्रिया. लिंगच विश्वाचे संकेत, स्वयंपूर्ण आहे. अशाप्रकारे रेणुकादि पंचाचार्य हे लिंगोद्भव असल्याचे संकेत परंपरा मानते. लिंगैक्य शब्द योग्य असेल तर लिंगोद्भव शब्दही योग्यच आहे. विरोधक काही म्हटले तरी  वीरशैव लिंगायतांना दोन्ही शब्द मान्य आहेत.

हिंदू वीरशैव लिंगायत मंच राष्ट्रैक्यासाठी कटिबद्ध

समाजातील विकृत शक्ती राष्ट्रीय एकतेला बाधा पोहोचविण्यासाठी धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय षड्यंत्र निर्माण करीत आहेत. राष्ट्रैक्य टिकून राहण्यासाठी समाजातील राष्ट्रवादी विचाराच्या जागरूक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली ‘हिंदू वीरशैव लिंगायत मंच’ स्थापन केला. त्या अंतर्गत संघटितपणे जनजागृतीसह समाजाचे प्रश्न सरकारदरबारी मांडण्यास सुरुवात केली आहे. 



देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व भारतीयांनी एकजुटीने लढा दिला. त्यात धर्मभेद, जातिभेद, प्रांतभेद असा कोणताही भेद नव्हता. केवळ भारतीयता होती. मात्र, इंग्रजांनी फोडा आणि झोडा या नीतीचा वापर करत कधी धर्म, कधी जाती, कधी भाषा, कधी प्रांतभेदाच्या आधारावर दुहीची बीजे पेरली. धर्माच्या आधारावर देशाचे त्रिविभाजन म्हणजे फाळणी ही त्याचीच परिणिती होती. तर स्वातंत्र्यानंतर सत्तांध काँग्रेसनेही केवळ मतांच्या राजकारणासाठी विशिष्ट समाजाच्या लांगूलचालनासह येथील मूळ हिंदू धर्मात फूट पाडण्याची इंग्रजांचीच नीती अवलंबली. परिणामी देशाला सतत दहशतवाद, फुटीरतावादासह धर्म, जाती, भाषा व प्रांतभेदाला सामोरे जावे लागत आहे. आज गेल्या काही महिन्यांपासून जळत असलेला मणिपूरही स्वार्थी राजकारणाचाच परिपाक आहे, हा इतिहास आहे. तर कर्नाटकातील सत्तांतरानंतर पुन्हा स्वतंत्र लिगायत धर्माची हाक दिली जात आहे. पाच वर्षांपूर्वी राजकीय फटका बसल्यानंतर गाडले गेलेले ‘भूत’ पुन्हा वीरशैव लिंगायत समाजाच्या मानगुटीवर बसविण्याचे कारस्थान रचले जात आहे. तेव्हा राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित समाजबांधवांनी केलेल्या विरोधानंतर ‘मौन’ झालेले स्वतंत्र लिंगायत धर्मसमर्थक कर्नाटकातील सत्तांतरानंतर पुन्हा भूछत्राप्रमाणे अवतीर्ण झाले, याचा सरळ अर्थ त्यांना काँग्रेसची राजकीय कुमक आहे, असाच होतो. राष्ट्रीय एकतेलाच बाधा पोहोचविणार्‍या या धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय षड्यंत्राविरोधात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली वीरशैव लिंगायत समाजातील राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी हिंदू वीरशैव लिंगायत मंच या नावाने संघटितपणे जनजागरण चालविले आहे. लवकरच त्याचे दृश्य परिणाम दिसणार असून त्यातून समाजजागृतीला मोठी चालना मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांत महात्मा बसवण्णांसह शिवशरण हे संस्कृतविरोधी होते, त्यांनी वेद नाकारला. इतकेच नव्हे तर वीरशैव आणि लिंगायत वेगवेगळे आहेत. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, या विचाराला कै. प्रा. एम. एम. कलबुर्गी, कै. चंद्रशेखर पाटील आदी काँग्रेसपोषित तथाकथित पुरोगामी विचारवंत आणि स्वार्थी राजकारणी यांनी जाणीवपूर्वक खतपाणी घातले, आताही घातले जात आहे. त्यासाठी बसवण्णांसह शिवशरणांनी रचलेल्या वचन साहित्याचा आधार देत आहेत. देशात सातव्या शतकापासून विविध प्रांतात वेगवेगळी भक्तिपंथाची चळवळ निर्माण झाली, तशी बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांच्या नेतृत्वाखाली शरण चळवळ निर्माण झाली. शिवशरणांनी वचन साहित्याची निर्मिती केली. त्यामागे केवळ सामाजिक नवजागरणच नव्हे, तर भक्ती, आध्यात्मिक प्रेरणाही होती. वचन साहित्याच्या निर्मितीमागचा उद्देश स्वत: चेन्नबसवण्णा यांनी स्पष्ट केला आहे. मानवी मनाची मलीनता दूर करुन त्यांच्या हृदयात आत्मज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी वचन नावाच्या ज्योतीची निर्मिती केल्याचे म्हटले आहे.
पाताळातील शुद्ध जल काढता येईल का,
दोराविना अथवा सोपानांच्या आधाराविना?
शब्दसोपान बांधुनी चालविले शरणांनी,
देवलोकाचा हाच मार्ग पहा.
मर्त्य मानवाच्या मनाची मलिनता जावी म्हणून,
गीतबोलरूपी ज्योती प्रकाशित करुन दिली,
कूडल चेन्नसंगय्याच्या शरणांनी.
तत्कालीन हिंदू समाजाला एकसंध, एकजिनसी बनविण्यासाठी बसवण्णांनी पुरातन वीरशैव मताचे पुनरुज्जीवन, उपनिषकालीन मूल्यांची पुनर्स्थापना केली. मात्र, तथाकथित पुरोगामी विचारवंतांनी काही वेदविषयक वचनांना धरुन शिवशरणांना वेदविरोधी ठरविण्याचा खटाटोप चालविला आहे. केवळ साहित्याला धरुन भक्ती, अध्यात्म याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सर्वच शिवशरण महात्मा बसवण्णांचा भक्तिभंडारी असा गौरव करतात. तर अध्यात्म म्हणजे ईश्‍वराचा मार्ग हा एकीकरणासाठी आहे, विभाजनासाठी नव्हे ! अध्यात्मात विरोध नाही. बसवण्णांची केवळ पाच वचने वरवरुन वेदविरोधी वाटतील अशी तर एक वचन वेद समर्थनात आहे. तर अल्लमप्रभूंचे एक वचन वेदविषयक आहे. त्या एकाच वचनाच्या आधारे त्यांना वेदविरोधी ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर अक्कमहादेवी आजच्या विचारवंतांनी निर्माण केलेल्या या गोंधळात कुठे दिसत नाही, तिचे ‘लोक’च वेगळे ! महात्मा बसवण्णांच्या वेदविरोधी म्हटल्या जाणार्‍या वचनांवर स्वतंत्र धर्म आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर खूप मंथन झाले आहे. आता आपण अन्य शिवशरणांची काही वचने पाहूया. अल्लमप्रभू म्हणतात,
वेद म्हणजे वाचायची गोष्ट,
शास्त्र म्हणजे बाजारगप्पा,
पुराण म्हणजे पुंडांच्या गोष्टी,
भक्तीतर्क म्हणजे एडक्यांची टक्कर,
भक्ती म्हणजे नैवेद्य दाखवून जेवण्याचा लाभ,
गुहेश्‍वर म्हणजे मात्र अतीत परतत्त्व.
यात कोठेही वेद, शास्त्र अथवा पुराणाचा विरोध दिसत नाही. वेद ही केवळ वाचण्याची गोष्ट नव्हे तर आचरणात आणायची बाब आहे. शास्त्र ही बाजारातील गप्पा ठरू नये. आपल्या वाईट गोष्टींच्या समर्थनासाठी पुराणाचा वापर नको, दुसर्‍यांना हानी पोहोचविण्यासाठी, एडक्यांप्रमाणे भांडण्यासाठी तर्क असू नये. भक्ती ही दिखावा, लाभाची गोष्ट ठरू नये, असे म्हटले आहे. जर ते वेदविरोधी असते तर अनेक वचने लिहायला हवी होती. मात्र, तसे दिसत नाही. तसेच स्वत: वचनेच उपनिषदाचा कंठरवाने उद्घोष करताना दिसतात. ईशावास्य उपनिषदातील खालील श्‍लोक पाहा.
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।
सच्चिदानंदघन परब्रह्म हे परिपूर्ण व अनंत आहे. त्यामुळे त्याच्यापासून निर्माण झालेले हे जगही पूर्ण आहे. म्हणजेच सर्व चराचर सृष्टी परमात्मतत्त्व व्याप्त आहे. अर्थातच प्रत्येक व्यक्तीतील आत्मतत्त्व परमात्मा तत्त्वाचाच अंश आहे, असे म्हटले आहे. या मंत्रात ऋषींनी मांडलेला अत्यंत मूलभूत विचारच अक्कमहादेवी यांनी पुढील वचनात मांडला आहे.  
बयलु बयलुचि पेरुनि
बयलु बयलु झाले,
बयलु बयलुचि पिकवुनि
बयलु बयलु झाले,
स्वत: चन्नमल्लिकार्जुन बयलु
ईशावास्य उपनिषदातच म्हटले आहे,
ईशा वास्यमिदं सर्वं यत्किष्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा: मा गृध: कस्य स्विद्धनम् ॥
या जगात कोणतीही गोष्ट शाश्‍वत नाही. या बदलत्या जगाला व्यापून उरणारा परमेश्‍वर मात्र शाश्‍वत आहे. तो सर्वत्र आहे. कोणाचीही संपत्ती मिळविण्याची अभिलाषा धरू नये. असे या श्‍लोकाचा अर्थ आहे. वचनकार जेडर दासिमय्याही आपल्या वचनात हेच सांगतात,
जमीन तुझे, जल तुझे
फिरुनी घोंघावणारा वारा तुझा
तुझे अन्न खाऊन दुसर्यांची
स्तुती करणारे हीन कुळाचे जाणा रामनाथा ॥
संपूर्ण चराचरात एकच ईश्‍वर आहे. त्याचे अन्न खाऊन दुसर्‍यांची स्तुती करणारे हीन आहेत. दुसर्‍यांच्या वस्तूची अभिलाषा बाळगू नये, असे या वचनात म्हटले आहे. भगवंताच्या दारी सत्य एकच आहे. कोठे भिन्नता आहे ? अल्लमप्रभू म्हणतात,
सत्यही नाही, असत्यही नाही
सहजही नाही, असहजही नाही
मी नाही, तू नाही
नाही हे स्वत: नाही
स्वत: गुहेश्‍वर बयलु ।
या जगात कोणतीही गोष्ट शाश्‍वत नाही. तो परमेश्‍वर एकच सत्य आणि अनंत असल्याचे या वचनात म्हटले आहे. नेति नेति म्हणत उपनिषदांनी हेच सांगितले आहे. वचनसाहित्याचा अभ्यास केल्यास या भूमीतील धार्मिक, आध्यात्मिक ऐक्य साधण्यासाठी शिवशरणांनी उपनिषदकालीन मूल्येच समाजमनात रूजविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. उपनिषदातील श्‍लोकाशी साधर्म्य राखणारी अनेक वचने असून तीच मूल्ये शिवशरणांनी लोकभाषेत वेगळ्या प्रकारे मांडली आहेत. वचन साहित्य षट्स्थल चौकटीत आहे. वचन साहित्याच्या विकासक्रमाचा विचार केल्यास उगम, संकलन व विस्तार आणि टीका या तीन काळात विचार करता येईल.  वचनांच्या उगमकाळात षट्स्थलाची चौकट नव्हती, ती शुद्ध होती. परंतु संकलन काळात ती षट्स्थलाच्या चौकटीत बद्ध करण्यात आली. कारण बसवण्णा, अल्लमप्रभु, सिद्धराम, चेन्नबसवण्णादी शरणांचीच वचने या चौकटीत आहेत, इतर शरणांच्या वचनांत ती चौकट नाही. तरीही समाजात फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजणारे स्वार्थांध राजकारणी व त्यांच्याकडून पोषित तथाकथित बुद्धिमंत वीरशैव लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग असल्याचे मानण्यास तयार नाहीत.
गेल्या काही वर्षांपासून लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, त्यास मान्यता मिळावी. तसेच अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासाठी काही हिंदूविरोधी राजकीय नेते, लिंगायत समाजातील स्वयंघोषित नेते आणि त्यांचे समर्थक प्रयत्नशील आहेत. मात्र, कायदेशीर बाजू तपासता ही मागणी कदापिही मान्य होणारी नाही. देशाचे रजिस्ट्रार जनरल यांनी तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यालयाला दि. 14 नोव्हेंबर 2013 रोजी लिहिलेले एक पत्र महत्वाचे आहे. तेव्हाच्या गृहमंत्रालयाने लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे का, याबद्दल रजिस्ट्रार जनरलचे मत मागविले होते. रजिस्ट्रार जनरल यांनी लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. याची दोन प्रमुख कारणे दिली होती. एक म्हणजे लिंगायत हे हिंदू धर्माचाच एक घटक आहेत, हे स्पष्ट करताना रजिस्ट्रार जनरल यांनी सरकारचेच जुने निर्णय, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत आणि आधीच्या जनगणनेचा हवाला दिला होता. लिंगायतांना आधी वीरशैव म्हटले जायचे, ती धर्मातीलच एक जात आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा दिला तर या समाजातील अनुसूचित जातीच्या लोकांना सध्या मिळणार्‍या आरक्षणापासून वंचित रहावे लागेल. तसेच हिंदू कायद्यात हिंदू म्हणजे कोण याची व्याख्या दिली असून त्यात वीरशैव व लिंगायतांना समाविष्ट केले आहे. तरीही काही स्वयंघोषित लिंगायत नेत्यांकडून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याबाबत 1967 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा कायम उल्लेख केला जातो. स्वामीनारायण हा पंथ हिंदू धर्माचा भाग नसून तो स्वतंत्र धर्म असल्याबाबत मान्यता देण्यासंबंधी मागणी केलेली ही अपील याचिका आहे. याच्या निकालात न्यायालयाने महात्मा बसवेश्‍वरांचा उल्लेख हिंदू धर्मसुधारक असा केला आहे. अशाप्रकारे स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळणे दुरापास्त असल्याने समाजातील काही नेत्यांनी अल्पसंख्याक दर्जा मिळावा, ही मागणी पुढे आणली. यामागे शिक्षण संस्थाचालकांना अल्पसंख्याक म्हणून मिळणार्‍या अनियंत्रित शुल्क वाढ, सरकारी लेखापरीक्षणातून मिळणारी सूट आणि विद्यार्थ्यांसाठी सक्तीच्या आरक्षणात मिळणारी सूट हे कारण आहे. ही मागणी रेटणारे कोण, त्यांच्या संस्था कोणत्या हे समाजासमोर आहे. तर अल्पसंख्याक मान्यतेमुळे लिंगायत समाजातील काही मोजक्या जातींना मिळणारे आरक्षणही जाऊ शकते. तसे कर्नाटक सरकारच्या प्रस्तावावरील उत्तरात केंद्रीय समाजकल्याण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या लिंगायत समाजातील काही जातींना ओबीसी आरक्षण मिळते. अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यास त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. अल्पसंख्याक दर्जाच्या फायदा - तोट्याचा विचार केल्यास फायद्यापेक्षा तोटाच अधिक होणार आहे. त्यामुळे संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाला आरक्षण हाच यावर पर्याय उरतो. परंतु स्वतंत्र धर्म समर्थकांतही स्वतंत्र धर्म की अल्पसंख्याक दर्जा याविषयी गोंधळाचे वातावरण आहे. तर त्यांच्या लाभाच्या ‘लॉलीपॉप’ला भुलून काही सर्वसामान्य समाजबांधव त्यांच्यामागे फरफटत आहेत. धर्म हा कायदेशीरदृष्ट्या आणि अल्पसंख्याक दर्जा हा सामान्य समाजबांधवाच्या लाभाच्या दृष्टीने मृगजळ आहे.  
स्वतंत्र धर्म समर्थकांनी वीरशैव लिंगायत म्हटल्यास स्वतंत्र धर्माला मान्यता मिळणार नाही, म्हणून वीरशैव व लिंगायत वेगवेगळे असल्याची शक्कल लढवली. मात्र, वीरशैव लिंगायत समाजात पंचाचार्य आणि विरक्त या दोन्ही पीठांना मानणारे आहेत. त्यांच्यात दुही माजवून केवळ राजकीय स्वार्थ साधणे आणि शैक्षणिक संस्थांचे इमले उभे करणे हाच अंतस्थ हेतू आहेेे, यामागे समाजकल्याणाची कोणतीही भावना नाही. तसेच राष्ट्रीय ऐक्यभावनेलाही तडा जावा, हा डाव असल्याचे समाजातील मोठा वर्ग जाणून आहे. त्यामुळे समाजातील जागरुक राष्ट्रवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली हिंदू वीरशैव लिंगायत मंच या नावाने संघटितपणे जनजागरणासह समाजाचे प्रश्‍न सरकार दरबारी मांडण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महात्मा बसवेश्‍वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन त्यासाठी 50 कोटी निधीचीही तरतूद केली. तसेच सोलापूरच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्‍वर अध्यासनाची स्थापना केली. समाजाचे हे दोन्ही महत्वाचे प्रश्‍न मार्गी लागण्यामागे मंचाची भूमिका निर्णायक राहिली आहे.
 लिंगायत समाजातील स्वयंघोषित नेते, त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते धर्ममान्यता राहिली बाजूला, धर्मगुरू, जंगम समाज यांच्यावर टीकाटिप्पणी, शिव्याशाप देणे, प्रसंगी मारहाण करणे इतक्या खालच्या स्तराला पोहोचल्याचे दिसत आहे. त्यामुळे मंचाने संपर्क, साहित्याद्वारे समाजात जागृतीला सुरुवात केली. गुरुपौर्णिमा या उत्सवाला लिंगायत समाजातही विशेष महत्व आहे. त्यामुळे या निमित्ताने जंगम कृतज्ञता सोहळ्याची सुरुवात केली. हल्ल्यांप्रकरणी संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. महाराष्ट्रासह कर्नाटकातील मान्यवर समाजबांधवांसह  मठाधीशांच्या भेटी घेऊन स्वतंत्र धर्म, अल्पसंख्याक दर्जा मागणी आंदोलनाद्वारे समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र, त्यामुळे समाजाचे होणारे नुकसान यासह धर्मांतर, लव्ह जिहाद या धर्मविरोधी आणि राष्ट्रविघातक कृत्यांविषयी अवगत केले. त्यामुळे मठाधीशांसह समाज जागरुक होत आहे. त्याचे दृश्यरुप म्हणजे दिवाळीपूर्वी लिंगायत समाजात मानाचे स्थान असलेल्या देशभरातील शिवाचार्यांची परिषद सोलापुरात होणार आहे. होटगी मठाच्या शाळेच्या प्रांगणात होणार्‍या या परिषदेत पाचही जगद्गुरू यावेत, असे नियोजन मंचाने केले आहे. यापैकी काशी, उज्जैनी आणि श्रीशैलम जगद्गुरूंनी मान्यता दिली आहे. केदारनाथ आणि रंभापुरी जगद्गुरूंशी यासंदर्भात मंचाने संपर्क केला आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामधील सुमारे 500 शिवाचार्य या परिषदेस येणार आहेत. त्यासाठी शिवाचार्यांशी संपर्क सुरू आहे. राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या मुद्यांवर सर्व शिवाचार्यांचे एकमत असावे, या दृष्टीने चर्चेचे स्वरुप राहणार आहे. वसुधैव कुटुम्बकम, संत आणि राष्ट्र, सर्वे संतु निरामया आदी विषयांवर संवाद होणार आहे. केवळ हिंदू वीरशैव लिंगायत समाजच नव्हे, तर व्यक्ती, राष्ट्र व समष्टीचे हितचिंतन होणार आहे. ही परिषद वीरशैव लिंगायत समाजाच्या इतिहासातच परिवर्तन घडविणारे ठरणार आहे.  
अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर 9049290101  

Saturday 2 September 2023

गुरुपरंपरा : श्री शिवानंद ते श्री सिद्धेश्वर

 


स्वामी विवेकानंद म्हणतात, जो 'श्रोत्रिय' हैं - वेदों का रहस्य समझते हैं, जो 'अवृजिन' हैं - निष्पाप हैं, जो 'अकामहत' हैं - जिन्हें काम छू भी नहीं गया है, जो तुम्हें शिक्षा देकर अर्थप्राप्ती की आशा नहीं रखते वे ही सन्त हैं, वे ही साधु हैं । 

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी अर्धशतकाहून अधिक काळ आध्यात्मिक प्रवचनांच्या माध्यमातून ज्ञान दासोह करताना कशाचीही अपेक्षा केली नाही, हे आपण जाणताच. शिवाय ते वेदांचे रहस्य जाणणारे, निष्पाप होते. 'काम'च नव्हे तर कोणतीही 'कामना'ही त्यांच्या मनाला कधीही स्पर्श करू शकली नाही. ते खरे संत, साधु होते. आज 'धर्म'कार्याच्या नावाखाली पैसे घेऊन प्रवचन सांगणाऱ्यांंचे 'पीक'च आले आहे.  महिनाभराच्या प्रवचनासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. मात्र, श्री सिद्धेश्वर स्वामीजी, त्यांचे गुरु वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामीजी यांच्यासारखे संत विरळच !


एखादा संन्यासी निर्माण होण्यासाठी त्याच्या आई - वडिलांसह त्याच्या घराण्याची आध्यात्मिक, पारमार्थिक पार्श्वभूमी, संचित जशी कारणीभूत असते, अगदी तशीच शिष्यही महान बनण्यास त्याची गुरु परंपराही कारणीभूत असते. भगवान रामकृष्ण परमहंस यांनी म्हटले आहे, आपण साधे मडके घेतानाही वाजवून घेतो, गुरु निवडतानाही तशी काळजी घ्यावी. तसेच गुरुला दिवसा पहावा; रात्रीही पहावा, मग गुरु करावा. 
लहानपणापासूनच्या आध्यात्मिक ओढीने, वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामी यांची प्रवचने ऐकून श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले असले तरी त्यांच्यासारख्या विरागी गुरुमुळेच सिद्धेश्वर श्रींसारखा ज्ञानयोगी घडला, हे मागील लेखांमध्ये पाहिले आहे. शिवाय उन्नत गुरुपरंपरेचे आध्यात्मिक बळही त्यामागे आहे. ती कोणती हे आपण आज ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या आठव्या मासिक पुण्यस्मरण दिनानिमित्त पाहणार आहोत. 
एकदा मी ज्येष्ठ पत्रकार, मार्गदर्शक दशरथ वडतिले यांच्यासोबत शरण साहित्यविषयक कामाच्या निमित्ताने एका घरी गेलो होतो. तेथे श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांचा विषय निघताच एका आजीने म्हटले, सिद्धेश्वर स्वामीजी हे केवळ वेद, उपनिषदाचेच निरुपण करतात. शरण साहित्य - वचन - विषयी सांगत नाहीत. ज्यांनी सिद्धेश्वर स्वामीजी यांचे प्रवचन ऐकले आहे, ते जाणतात की यात किती तथ्य आहे ! न ऐकलेली मंडळी आजही याची खातरजमा करू शकतात, कारण त्यांची प्रवचने आज यू ट्यूबसह फेसबुकवर (ध्वनिफिती, पुस्तकेही) उपलब्ध आहेत. हे सारे सांगायचे कारण म्हणजे श्री सिद्धेश्वर स्वामीजी तर शरण साहित्य - वचन, शरणांची जीवनचरित्रे, घटना यांचा उल्लेख करतानाच जगात जे जे उत्तम ते ते सांगायचे. त्यात विश्वातील सारे तत्त्वचिंतक असायचे. मग ज्या भूमीत जन्माला आले, त्या भूमीतील ज्या साहित्याने 'सर्वे भवंतु...',  'वसुधैव कुटुंबकम्', 'कृण्वंतो विश्वमार्यम्' चा संदेश दिला, ते ज्या गुरुपरंपरेतून आले, त्या गुरुजनांनी जो तत्त्वविचार मांंडला, त्याचे मूळ वेद, उपनिषद आणि सिद्धांत शिखामणी मांडायचे. शिवाय त्यांच्या गुरु परंपरेतील पूज्यनीय पूर्वसुरींनीही प्रवचन, पुराण निरुपण व साहित्य यातून शरण साहित्य - वचन, शरणांची जीवनचरित्रे याद्वारे आपले विचार मांडून तत्कालीन समाजमनाची मशागत केल्याचा इतिहास आहे. मात्र, आजच्या विभाजनवादी मानसिकतेच्या बुद्धमंतांनी सर्वसामान्यांच्या मनात पेरलेले विष हेच आजीच्या प्रश्नात दडलेले आहे. सर्वसामान्यांच्या मनातील हा गोंधळ संपावा; कारण आपल्या पूर्वसुरींत हा गोंधळ नव्हता, तो अलिकडच्या स्वार्थी बुद्धिमंतांनी निर्माण केला हे समजावे, हा हेतू आहे. त्यासाठी सिद्धेश्वर स्वामीजी ज्या उन्नत गुरुपरंपरेचे पाईक आहेत, ती परंपरा समजून घेऊया.

परमात्म्याच्या अनंत चैतन्य सागरात कोठेतरी एकेक महात्मे दैवी संदेश घेऊन अवतरतात. अशापैकी श्री जगद्गुरू शिवानंद स्वामी हे एक होत. गदग शहरात मुक्तेश्वर पीठाची स्थापना केली. त्यांच्या १८ वर्षे घोर तपश्चर्येमुळे प्रत्यक्ष जगन्मातेलाच अवतरावे लागले. सकल वेद वेदांगांचे अध्ययन करुन शापानुग्रह सामर्थ्य मिळविलेले ते त्रिकाल ज्ञानी होते. आपल्या जीवनाची ९७ वर्षे लोककल्याणासाठी खर्ची घातली.
श्री शिवानंद स्वामी यांचे मूळ नाव वीरण्णगौडा होय. त्यांचे जन्म - शिक्षण गदग जिल्ह्यातील रोणमध्ये झाले. १८४२ मध्ये रोण नगरात त्रिविध दासोही म्हणून प्रसिद्ध असलेल्या घराण्यातील बसम्मा निंगणगौडा तोटगंटी यांच्यापोटी त्यांचा जन्म झाला. तोटगंटी यांच्या घरी आलेले नवलगुंदचे अजात नागलिंग शिवयोगी यांनी त्यांचे भविष्य जाणले होते. त्या गोंडस शिशुला हाती उचलून घेत ते म्हणाले, "या यंत्रयुगात मंत्र पुरुष बनून आलास  ! बाळा, तू या यंत्र शक्तीला मंत्र शक्तीने प्रवाही बनविले पाहिजे. त्यासाठीच तुझा हा अवतार आहे. तू या भूतलावर अवतरला ही चांगली गोष्ट आहे. या अंधाऱ्या जगात तू प्रकाश बनून आलास, लोकल्याणाचे हे कार्य तुझ्या हातून पुढे चालत राहू दे." अशाप्रकारे त्यांनी त्या बाळाला अनुग्रह दिला. मातेच्या वात्सल्याच्या पाळण्यात हा मुलगा संस्कारशीलतेने वाढला. त्याला शाळेत घातले. सातव्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाले. मात्र, त्या मुलाला पोटभरू शिक्षण नको झाले होते. मेंदू  ज्ञानाने भरणाऱ्या आध्यात्मिक शिक्षणाच्या ओढीला अनुरूप वातावरण हवे होते. आता वीरण्णगौडाचे वय १२ वर्षे होते. विरक्त भावना वाढीस लागली होती. शेतातून गवताचा भारा डोक्यावर घेऊन घरी येताना वाटेत अचानक थांबला. मनात अंतर्विचार सुरू झाला. हा भारा वाहिलेला मी कोण ? देह ? की आत्मा ? देहाने हा भारा वाहिला असेल ते जड आहे, चैतन्याच्या आश्रयाशिवाय चालू शकत नाही. अन् आत्मा असेल तर ते निराकार आहे. आकार वस्तूंना साक्षीभावांनी पाहते. तसे असेल तर मग हा गवताचा भारा वाहिलेला कोण ? या जिज्ञासेने वीरण्णगौडा याच्यात द्वंद्व निर्माण केले. डोक्यावरील ओझे खाली न उतरवता उभ्या उभ्या खूप वेळ विचार करू लागला. रोगी, वृद्ध, शव, दारिद्र्याचे प्रसंग पाहून दु:खाचे मूळ कारण काय ? हे शोधण्यासाठी बुद्ध मध्यरात्री झोपेतून उठून राजमहालाबाहेर पडला हे पाहिल्यास या वीरण्णगौडाचीही अवस्था तशीच झाली होती.

  त्या रस्त्याने ये - जा करणाऱ्या लोकांनी वाटेत गवताचा भारा वाहून उभ्या या मुलाविषयी त्याच्या आई - वडिलांना कळविले. सर्वजण आश्चर्यचकित झाले. मुलगा वेडा झाला की काय ही चिंता करतच त्याला घरी आणले. न सुटणारी समस्या समोर उभी राहिली. गावातील एका मंदिरात श्रावण मासानिमित्त सोलापूरच्या सिध्दरामावर पुराण सुरू होते. दररोज वीरण्णगौडा पुराण ऐकायला जात असे. पुराणिकांनी पुराण सांगताना श्री सिध्दरामाच्या जीवनातील एक घटना सांगितली. श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी बालक सिद्धराम श्रीशैलच्या रुद्रकमरी डोंगरावर उभा राहून मल्लय्या, मल्लय्या... म्हणत उडी मारला ! त्याची भक्ती पाहून श्रीशैल मल्लिकार्जुन प्रत्यक्ष झाल्याची कथा त्यांनी सांगितली. बालकाने ते ऐकले. ऐकलेले आता करुन पहावे या विचाराने दुसऱ्या दिवशी पहाटे कोणालाही कळू न देता गावाजवळील कळकमल्लय्याच्या दर्शनाला निघाला. रोणपासून १५ - २० किलोमीटर अंतरावरील 'कळकमल्लय्या' च्या जवळ जाऊन दर्शनासाठी आर्त साद घातली. त्याने दर्शन न दिल्याने 'त्या दिवशीचा मल्लय्या आज का नाही, देवा ! माझ्यात भक्तीची कमतरता आहे का ? तसे असेल तर मलाच तुला अर्पण करतो बघ !' म्हणाला. डोंगरावरुन खाली उडी मारली. ते पाहून घाबरलेल्या मेंढपाळांनी मुलगा मेला ! असे समजून आरडाओरडा सुरू केली. तसेच त्याच्या आई - वडिलांना याविषयी कळविले.

 डोंगरावरुन उडी मारलेल्या बालकाचे भक्तिपाश मल्लय्यालाही सोडवता आले नाही. बालकाने डोळे उघडून पाहिले तेव्हा तो प्रत्यक्ष मल्लय्याच्या मांडीवर होता. मल्लय्यालाच पाहत होता. बालकाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. 'बाळ ! ऊठ, वर ऊठ तुझ्या हातून लोककल्याण घडावयाचे आहे. त्यासाठी तू पुढे चालत राहा, माझा आशीर्वाद तुला आहे. घाबरू नकोस, धीर, वीर, शूर हो. ज्ञानयोगी बनून जग प्रकाशमय कर, ज्या कार्यासाठी आलास ते पूर्ण कर, जिज्ञासू बनून आलेल्यांना भवमुक्ती दे, गुरू बनून उपदेश कर'. - अशाप्रकारे अनुग्रहित करून अभय आश्वासन देत मल्लय्या अदृश्य झाला. बालकाला शोधत चिंताग्रस्त आई - वडिलांसह बंधूजन, भावकीतील मंडळी कळकमल्लेश्वराच्या देवस्थानात पोहोचले. त्यांनी त्याला घरी नेले. पुढे वीरण्णगौडा आणखी अंतर्मुख झाल्याने आध्यात्मिक साधना सुरू झाली. माया, मोह विरहित होऊन अलौकिक क्षेत्रात पक्ष्यांप्रमाणे विहरू लागला. लौकिक जीवनच नको म्हणणाऱ्या वीरण्णगौडाला एका परीक्षेला सामोरे जावे लागण्याची वेळ आली. 

रामदुर्ग तालुक्यातील सुरेबान गावी राहणारी त्याची आत्या यल्लम्मा यांनी त्याला दत्तक घेतले. दत्तकपुत्र म्हणून वीरण्णगौडा याला सुरेबानला जावे लागले. त्यानंतर गावाची पाटीलकीही सांभाळली. श्री गुरु रुद्रमुनी यांच्या आग्रहाखातर नाईलाजाने नीलम्मा नावाच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा झाला. तोच मुलगा श्री आत्मानंद स्वामी. त्यानंतर वीरण्णगौडा यांनी आपल्या गृहस्थ जीवनाचा त्याग केला. 

  संन्यास : नरगुंद तालुक्यातील बनहट्टी येथील हिरेमठाचे रुद्रमुनी शिवाचार्य यांच्याकडून वीरण्णगौडा यांनी लिंगदीक्षा आणि संन्यास दीक्षा स्वीकारली. दरम्यान, काही काळ एका शाळेत शिक्षक म्हणून सेवा केली. संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर वैराग्य भावनेने सुरेबान डोंगरावरील 'शबरीकोळ्ळ' या या ठिकाणी सुदीर्घ १८ वर्षे अखंड तपश्चर्या केली. मुंग्यांनी चावा घेऊन शरीर रक्तबंबाळ झाले, वाघांनी समोर येऊन डरकाळी फोडली, रामदुर्गच्या राजाने तेथे येऊन बंदुकीने हवेत गोळ्या झाडल्या तरीही जागे न होता हा निजविरागी इतका अंतर्मुख झाला होता की आपले अस्तित्वच विसरला होता.  १८ वर्षांची तपश्चर्या विजयादशमी (नवरात्री) च्या दिवशी फळास आली. त्या दिवशी जगन्माता प्रत्यक्ष झाली. तिने म्हटले, 'मुला ! काय हवे ते माग !' त्यावर वीरण्णगौडा म्हणाले, 'माते ! जगच मिथ्या असताना काय मागू, तुझी चरणसेवा तेवढी पुरे.' त्यानंतर न मागताही जगन्माता स्वत:हून ' मागितला नसलास तरी पुढे तू रथ, पालखीतून मिरवशील' असा आशीर्वाद देत अदृश्य झाली. 

   संचार : पुढे श्री वीरण्णगौडा यांनी फिरत संपूर्ण भारतभर संचार केला. त्यानंतर त्यांनी गदग येथे वास केला. त्यांना हुब्बळ्ळीच्या श्री सिद्धारुढ स्वामीजींनी शिवानंद हे बिरुद दिले. १८२३ मध्ये श्री शिवानंद स्वामीजींनी गदग येथे मुक्तेश्वर पीठाची स्थापना केली. अनेक मुमुक्षुंना त्या आध्यात्मिक तालमीत घडवून त्यांच्या जीवनाला नवा आयाम दिला. त्या माध्यमातून ते कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. त्या ज्ञानप्रवाहात पोहूनच भवसागर पार केलेले द्वितीय जगद्गुरू सदाशिवानंद महास्वामी होत. विजयपूरचे श्री वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामीजी, त्यांचे परमशिष्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी,  जगद्गुरू श्री नंदीश्वर महास्वामी यांच्यासह अनेकांनी मुक्तेश्वर पीठाचे अनुयायी म्हणून तेथे तेथे शाखा मठ (२०७ मठ) स्थापन करून श्री शिवानंद स्वामीजींच्या तत्त्वांचा प्रचार - प्रसार करत आहेत. 

श्री बसवादि शिवशरणांचे तत्त्वविचार, वेदांतच उगमस्थान असलेल्या श्री निजगुण शिवयोगी यांचे षट्शास्त्र, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, उपनिषदित्यादि ग्रंथांचे अंत:सार जाणलेल्या श्री शिवानंद स्वामीजी यांच्या शिष्य समूहाला कमतरता नाही. श्री गुरुंनी लावलेला अध्यात्माचा अमर नंदादीप संपूर्ण राज्य प्रकाशमय करीत आहे. विश्वास ठेवून आलेल्यांची जात, कुळ व गोत्र न विचारता त्यांचा उद्धार व्हावा, हाच विचार केला. मठपीठादि स्वामींसाठी नव्हेत, मानवी कल्याणासाठी आहेत, ही बसवादि शिवशरणांची तत्त्वे जीवंत स्वरुपात साकारण्यासाठी कार्य केले. मठात ज्ञान, बान (भात - प्रसाद), नाम दासोहाचे कार्य निरंतरपणे चालविले. आपल्या कार्याची मनीषा पूर्ण करुन १८६१ च्या प्रभवादि नाम संवत्सर, श्रावण महिन्यातील शक्ल पक्ष, पंचमी तिथी, उत्तरा नक्षत्र, ब्राह्मी मुहूर्तावर २१ ऑगस्ट १९३९ रोजी श्री शिवानंद स्वामीजी हे देहत्याग करुन शिवमय झाले. नुकतेच त्यांचे पुण्यस्मरण साजरे करण्यात आले.




सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...