Monday 4 September 2023

लिंगैक्यातच दडलेय लिंगोद्भवाचे सत्य !

 


१९ मार्च २०२२

नुकतेच फाल्गुन शुक्ल पक्ष १३ ( १६ मार्च ) रोजी जगद्गुरू श्री रेणुकाचार्य जयंती म्हणजे अवतारोत्सव साजरा झाला.  जगद्गुरू रेणुकादि पंचाचार्य हे  लिंगोद्भव अवतारी पुरुष असल्याचा समज आहे. त्यांच्या अवताराचा जेव्हा  विषय निघतो तेव्हा माझे तथाकथित पुरोगामी मित्र तावातावाने एक प्रश्न विचारतात, लिंगातून कसा त्यांचा जन्म झाला ? स्त्री - पुरुष समागमाशिवाय कोणत्याही जीवाचा जन्म शक्य आहे ? माझे उत्तर आहे, निश्चितच शक्य नाही. केवळ रेणुकादि पंचाचार्यच नव्हे तर तुम्ही, आम्ही सकल जीवराशी यांचा जन्म त्याशिवाय झाला नाही, हे जीवशास्त्रीय सत्य आहे. 

वीरशैव लिंगायत समाजात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते लिंगैक्य झाले अथवा शिवैक्य झाले, असे म्हटले जाते. लिंगैक्य शब्द प्रचलित आहे, हे तेही जाणतात.  एखाद्याच्या  मृत्यूनंतर समाधी विधीवेळी जंगमही अमुक अमुक व्यक्ती अमुक अमुक दिवशी लिंगैक्य झाले अथवा शिवैक्य म्हणजेच शिवचरणी लीन झाले, असे म्हणतात.  मात्र, आपणांस माझा एक प्रश्न आहे. जसे लिंगैक्य तसे लिंगोद्भव. लिंगैक्य याविषयी कधी आपण प्रश्न उपस्थित केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मग लिंगोद्भव याविषयीच प्रश्न का ? लिंगैक्य म्हणजे मनुष्य थेट लिंगात ऐक्य होतो, म्हणजे सामावतो का ? तर निश्चितच नाही. तरीही समाजाला आम्हीच  शहाणे करू शकतो, या थाटात लिंगोद्भव याविषयी प्रश्न विचारणारे लिंगैक्य याविषयी कधीच का बरे 'ब्र' काढले नाहीत? कारण अंतस्थ हेतू स्पष्ट आहे,  समाजाला शहाणे करण्याचा नव्हे, तर एकसंघ समाजात भ्रम निर्माण करुन फुटीरतेची बीजे पेरणे. कारण याशिवाय त्यांची बुद्धिमंत म्हणवून मिरवण्याची डाळ शिजू शकत नाही. गेल्या काही वर्षांत वीरशैव लिंगायत समाजातील 'स्वतंत्र धर्म' विचाराच्या फुटीचा लाभ घेऊन लिंगोद्भव विषयी उच्चरवाने हा प्रश्न विचारला जात आहे. 

लिंगैक्य म्हणण्यामागे जो शुद्ध भाव आहे, तोच शुद्ध भाव लिंगोद्भव म्हणण्यामागे आहे. रेणुकादि पंचाचार्य हे लिंगोद्भव असल्याचे सुप्रभेदागम, स्वयंभूवागम आणि वीरलैंगोपनिषद आदी ग्रंथांत प्रतिपादित केले आहे. अक्कमहादेवी, चन्नबसवण्णा यांनी पंचाचार्य यांचा लिंगोद्भव होऊन ते पुन्हा लिंगातच ऐक्य झाल्याचे  बीज - वृक्ष दृष्टांताद्वारे विवेचन केले आहे. त्याच प्रकारे तोंटद सिध्दलिंगेश्वर यांनी आपल्या वचनांत रेणूक आणि रेवणसिद्ध यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ते लिंगातून अविर्भूत होऊन शेवटी त्यातच अदृष्य झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. 

गुरूचे मूळ शोधू नये, हे ज्या उद्देशाने सांगितले त्याच उद्देशाने तेव्हाच्या लोकांनी रेणुकादि पंचाचार्य यांची पार्श्वभूमी सांगितली नसेल. अल्लमप्रभूंच्या गूढ वचनांसारखेच पंचाचार्य यांच्या जन्माचेही गूढ ! संन्यास दीक्षेनंतर केवळ व्यक्तीचे नावच बदलत नाही तर त्याचे त्याच्या कुटुंब व नातेवाईक यांच्याशी कोणताही संबंध नसतो. तेही आपल्या कुटुंब अथवा आपल्या पार्श्वभूमीविषयी सांगत नसतात. उत्सुकतेपोटी विचारल्यावर कुटुंब नव्हे,  गावाचे नावही न सांगणारे संन्यासी मी पाहिले आहेत. आज वीरशैव लिंगायत समाजातील प्रसिद्ध अशा ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्यासह जगद्गुरु अथवा शिवाचार्य यांच्या कुटुंबाची आपल्याला किती  माहिती आहे ? तुमकुरु मठाचे श्री शिवकुमार स्वामी यांच्यावरील पुस्तकांमुळे त्यांच्या कुटुंबाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली. योगी आदित्य नाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याआधी 'फेकसत्ता' सह किती जणांना त्यांचे आईवडील अथवा कुटुंबीय यांच्याविषयी माहिती सोडा, जाणून घेण्याची उत्सुकता होती !

भारतात अनेक संन्यासी, संत होऊन गेले ज्यांच्या गाव, कुटुंबाची माहिती नाही. अशाप्रकारे रेणुकादि पंचाचार्य हे पुरातन असल्याने त्यांच्या आईवडिलांचे नाव अथवा त्यांच्या जन्माविषयी कोणतीही माहिती मिळाली नसल्याने त्यांना लिंगोद्भव म्हटले जात असावे. हे केवळ सांकेतिक आहे. याशिवाय वीरशैव लिंगायतांत गर्भाष्टमीतच लिंगदीक्षा दिली जाते. त्या कारणाने जन्मानंतर आजीव ते लिंग शरीरावर धारण केले जाते. इतकेच नव्हे तर ते मृत्यूनंतर त्या लिंगासह समाधी दिली जाते. त्यामुळे सर्व वीरशैव लिंगायत हे लिंगोद्भवच. यामुळेच लिंगोद्भव आणि लिंगैक्य म्हटले जाते. ती परंपरेनुसार रूढ झाली आहे. विस्तारित विश्व हेच लिंग. तीच उद्भव व ऐक्याची प्रक्रिया. लिंगच विश्वाचे संकेत, स्वयंपूर्ण आहे. अशाप्रकारे रेणुकादि पंचाचार्य हे लिंगोद्भव असल्याचे संकेत परंपरा मानते. लिंगैक्य शब्द योग्य असेल तर लिंगोद्भव शब्दही योग्यच आहे. विरोधक काही म्हटले तरी  वीरशैव लिंगायतांना दोन्ही शब्द मान्य आहेत.

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...