Wednesday, 23 August 2023

आधुनिक कर्ण शिरसंगी लिंगराज देसाई यांचे घराणे मूळचे सोलापूरचे !



उत्तर कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमाभागातील शैक्षणिक विकासात दिलेय अपूर्व योगदान

-अप्पासाहेब हत्ताळे

शैक्षणिक क्षेत्रात उत्तर कर्नाटकाचा विकास झाला. धारवाड विद्येचे माहेरघर बनले. तर महाराष्ट्राच्या सीमाभागातील सोलापुरात अण्णप्पा काडादी प्रशाला, अक्कलकोटला मंगरुळे प्रशाला, बार्शीत सिल्व्हर ज्युबिली प्रशाला आदी शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. यामुळे केवळ वीरशैव लिंगायत समाजातीलच नव्हे तर समाजाच्या सर्वच वर्गातील वंचित समाजघटकांना शिक्षण मिळाले. संपूर्ण उत्तर कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमाभागातील अशा अनेक शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेऊन अनेकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत उन्नत स्थान मिळवले.  या शैक्षणिक संस्थांचे नाव घेतल्यावर केएलई (कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी) सारख्या शिक्षण संस्थांचे नाव समोर येईल. मात्र, या उदात्त व पवित्र कार्यासाठी आपले सर्वस्वच अर्पण करणारे त्यागवीर लिंगराज देसाई क्वचितच आपल्याला आठवत असतील. कारण त्यांच्यासारख्यांच्या अतुलनीय दातृत्वातून आणि श्रमातून उभ्या राहिलेल्या बहुतांश शिक्षण संस्था कुरणं आणि राजकीय अड्डे बनले आहेत. आज लिंगैक्य लिंगराज देसाई यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक कळकळीला, त्यांच्या दानशूरतेला उजाळा देण्याचा, त्यांच्या स्मृती जागविण्याचा अल्पसा प्रयत्न. 
शिक्षणात अत्यंत मागासलेला उत्तर कर्नाटकातील वीरशैव लिंगायत समाज आज सुशिक्षित होऊन समाजाच्या अनेकविध क्षेत्रात प्रगत बनला आहे. यामागे १९ व्या शतकात समाजात होऊन गेलेल्या मठाधीश, समाजधुरिणांसह शिरसंगीचे सरदेसाई लिंगराज देसाई यांच्या असामान्य व अलौकिक दातृत्वाचे योगदान आहे. त्यांनी वार्षिक सुमारे ६० - ७० हजार रुपये उत्पन्नाची संपूर्ण जहागीरच समाजाच्या शिक्षण कार्याला अर्पण केली. केवळ वीरशैव लिंगायत समाजालाच नव्हे तर देशातील सर्व दानी लोकांसमोर एक उदात्त आदर्श घालून दिला. अशा या महान पुरुषाविषयी उत्तर कर्नाटकातील जनतेला माहिती असली तरी महाराष्ट्रातील समाजबांधव त्यांच्याविषयी अनभिज्ञ आहे. विशेष म्हणजे लिंगराज देसाई यांचे घराणे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहे.











देसाई घराणे दक्षिण सोलापूरचे !
शिरसंगीकर देसाई यांच्या घराण्याला ४०० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. या घराण्याच्या संस्थापकाचे, मूळ पुरुषाचे नाव विठ्ठप्पा. ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद गावाचे पाटील होते. ते शूर लढवय्ये व पराक्रमी होते. १६ व्या शतकात विजयपूरच्या इब्राहिम अदिलशहाच्या कारकिर्दीधधत त्यांनी पराक्रमाने व कर्तृत्वाने सरदारकी व आजच्या कर्नाटकातील कोकटनूर परगण्याची देसगत मिळविली. त्यानंतर अली अदिलशहाच्या काळात १५६५ मध्ये विजयनगरचे साम्राज्य आणि मुस्लिमांत प्रसिद्ध ऐतिहासिक तालिकोटची लढाई झाली. यात विठ्ठप्पा पाटिल यांनी मुस्लिमांना साथ देत पराक्रम गाजवला. त्यामुळे बादशहाने त्यांना नवलगुंद संस्थानची जहागीर व तीन लक्ष वराहांचा 'मुंडीपाच्छा' पदवी बहाल केली. त्यानंतर त्यांनी बादशहाच्या इच्छेनुसार तेव्हाचा अत्यंत मजबूत तोरगल किल्ला व त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकला. बादशहाने त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन १५६६ मध्ये त्यांना तोरगल प्रांताचे सरदेसाई म्हणून नेमले. औरादसारख्या एका खेड्याचे पाटील असलेले विठ्ठप्पा पाटील आपल्या पराक्रम व कर्तृत्वाने कोकटनूर परगणे, नवलगुंद संस्थान आणि तोरगल प्रांत एवढ्या मोठ्या प्रांताचे सरदेसाई बनले. 
त्यांच्या घराण्यात प्रसिद्धीस आलेले दुसरे थोर पुरुष म्हणजे जायप्पा पाटील होत. बुद्धिमान व कर्तबगार असलेल्या जायप्पा यांनी अत्यंत प्रयासाने आपल्या जहागीरीचा विस्तार केला. सध्याचा सौंदत्तीचा किल्ला त्यांनीच १७३४ मध्ये बांधला. सरदेसाई यांची ही जहागीर उत्तरेस पेशवे, दक्षिणेस हैदर अली - टिपू यांच्या सीमेवर होती. त्यांच्या त्रासामुळे जहागीरीत सतत चढउतार होत राहिली. ब्रिटिश सत्ता स्थापनेनंतर त्यांच्या घराण्याला व देसगतीला स्थिरता लाभली. 



लिंगराज देसाई यांचे दत्तक विधान
धारवाड जिल्ह्यातील वनशिंग्ली या खेड्यातील गरीब शेतकरी घराण्यात १० जानेवारी १८६२ रोजी लिंगप्पाचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव रामप्पा होते. त्यांच्या वडिलांचे नाव धुळप्पा होते. त्यांचे चौथे पुत्र असलेले लिंगप्पा जात्याच सुदृढ, देखणे व बाणेदार होते. सरदेसाई यांच्या घराण्यातील शेवटचे देसाई जायप्पा हे निपुत्रिक वारले. तेव्हा त्यांच्या धर्मपत्नी गंगाबाई यांनी मूल दत्तक घेण्याचे ठरविले. अशा घराण्यात दत्तक पुत्राची निवड योग्यायोग्यता न पाहता वशिलेबाजीने होते, हे आपण जाणता. मात्र, गंगाबाई निर्भीड, कर्तव्यदक्ष आणि धीट स्वभावाच्या होत्या. त्यांनी कोणाची भीड न बाळगता दत्तकपुत्र निवडीसाठी आपल्या नात्यातील सर्व घराण्यांमधील मुलांना भेटीला बोलावले. रामप्पा सुदृढ, देखणा व बाणेदार असल्यामुळे धुळप्पा यांनी त्यालाच देसाईण गंगाबाई यांच्या भेटीला पाठवले. कर्मधर्म संयोगाने रामप्पा त्यांच्या पसंतीस उतरल्याने कायदेशीर आणि विधियुक्त दत्तक विधानानंतर त्याचे लिंगप्पा असे नाव ठेवण्यात आले. परंतु त्या घराण्यातील रिवाजाप्रमाणे सर्व लोक त्यांना अप्पासाहेब म्हणू लागले. दत्तक विधानावेळी ते ११ वर्षांचे होते. त्यानंतर त्यांच्या इंग्रजी शिक्षणासाठी मातोश्री गंगाबाई यांनी त्यांना कोल्हापूरला पाठवले. परंतु थोड्याच काळात त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची सवत उमाबाई लिंगप्पा यांच्या दत्तक विधानास सरकार दरबारी आव्हान दिले. त्यामुळे लिंगप्पा यांना शिक्षण अर्धवट सोडून गावी परतावे लागले. शिवाय न्यायालयात खेटे मारावे लागले. १८८० मध्ये कमिशनर क्राफर्ड यांनी त्यांचे दत्तक विधान रद्द ठरवले. त्या विरोधात लिंगप्पा यांनी मुंबई सरकारकडे अपील केले. १८८१ मध्ये मुंबई सरकारने त्यांचे दत्तक विधान वैध ठरवून त्याला मंजुरी दिली. 


मुळातच शेतकरी घराण्यातील असलेले लिंगप्पा हे बुद्धिमान व कर्तबगार होते. दत्तक कायम झाल्यावर त्यांनी जहागीरीची नीट घडी बसवून उत्पन्न वाढवले. जनतेच्या हिताला प्राधान्य दिले. दुष्काळी भागातील त्यांच्या जहागीरीतील जनतेला सतत त्याचे चटके सहन करावे लागत होते. पाण्याची व्यवस्था नसल्याने शेती तोट्यात होती. त्यासाठी त्यांनी एक लाख रुपये खर्चून भवानी तलाव बांधला. शिवाय पटबंधाऱ्याने शेतीला पाण्याची सोय करून दिली. आपला देश शेतीप्रधान आहे, ती सुधारल्याशिवाय तरणोपाय नाही, हे ओळखून त्याच्या सुधारणेसाठी अनेक प्रयत्न करतानाच सोयी, सवलती दिल्या. 
लिंगप्पा उर्फ अप्पासाहेब देसाई हे सद्गुणी, उद्योगप्रिय व उदार मनोवृत्तीचे होते. त्यांचे शालेय शिक्षण केवळ इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत झाले तरी त्यांचा वाचनव्यासंग दांडगा होता. त्याद्वारे त्यांनी आपल्या ज्ञानात भर घातली होती. समाज विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी अनेक गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना सढळ हाताने मदत केली. तसेच ते वीरशैव लिंगायत समाजाने सुरू केलेल्या समाजोद्धाराच्या कार्यातही सहभागी होत होते. तेव्हा गिलगिंची व अर्ताळ यांनी समाजासाठी लिंगायत फंडाची सुरुवात केली होती. १९०३ मध्ये  अप्पासाहेबांनी काही जमीन विकून त्या फंडाला २० हजार रुपयांची देणगी दिली. समाजाच्या व्यापार, उद्योग वाढीसाठी संघ स्थापन करून आर्थिक उन्नतीला चालना दिली. समाजातील अनिष्ट चालीरीती संपवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.  परमपूज्य शिवयोगी श्री हानगल कुमारस्वामी यांच्या योजनेनुसार स्थापन झालेल्या अखिल भारत वीरशैव महासभेला सक्रिय मदत केली, शिवाय सुरूवातीपासून त्यांचा तितकाच सक्रिय सहभाग राहिला. धारवाड येथे भरलेल्या महासभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांचे सामाजिक कार्य पाहून मुंबई सरकारने त्यांना मुंबई कौन्सिलचे सदस्य म्हणून नेमले होते. तसेच मजिस्ट्रेटचे अधिकारही दिले होते. 
सार्वजनिक जीवनात गढून गेलेल्या अप्पासाहेबांना व्यक्तिगत जीवनात सुख लाभले नाही. त्यांची पहिली प्रिय पत्नी निपुत्रिक वारली. त्यानंतर दुसऱ्या पत्नीपासून झालेली दोन मुले अल्पायुषी ठरली. ही चिंता त्यांना रयतेच्या, समाजाच्या चिंतेपासून दूर सारू शकली नाही. उलट वैराग्य वृत्ती दृढ झाल्याने समाजोद्धाराचा मार्ग प्रशस्त झाला. वंश चालवण्यासाठी मूल दत्तक घेण्याऐवजी आपल्या जहागीरीची संपूर्ण संपत्ती समाजाच्या शैक्षिक कार्यासाठी समाजालाच सुपूर्द करण्याचा निश्चय केला. तसेच आपला हा निश्चय कुटुंबीय, नातेवाईक व स्नेहीजनांना कळविला. तेव्हा एखादा संस्थानिक अथवा जहागीरदार असणे भूषण मानले जायचे. त्यामुळे आपल्या समाजाची ही जहागीर अशीच नष्ट होऊ नये, यासाठी त्या साऱ्यांनी त्यांना त्या निश्चयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र, त्यापासून ते किंचितही ढळले नाहीत. त्यावर ते ठाम राहिले. 


दत्तक घेतल्यास एखाद्या मुलाचा उद्धार होईल.  समाजाची सर्व मुले ही आपलीच मुले आहेत. त्या सर्वांचा उद्धार करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे. एवढेच नव्हे तर हे सत्कार्य दत्तकापेक्षा शतपटीने श्रेयस्कर आहे, असा खडा जवाब त्यांनी आप्तेष्टांसह स्नेहीजनांना दिला. शेवटी सर्वांना ही गोष्ट पटली. त्यानंतर ६ जून १९०६ रोजी सर्व जहागीरीचा ट्रस्ट करुन तो जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवला. हा दिवस खरोखरच वीरशैव लिंगायत समाजाच्या इतिहासात सूवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारखा आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक कार्यासाठी मदतीकरिता त्यांनी करुन ठेवलेल्या या ट्रस्टमध्ये शेतकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम व सढळ हाताने मदत द्यावी, असे एक कलम त्यांनी घालून ठेवलेले आहे. यावरुन त्यांच्या चाणाक्षतेची, दूरदृष्टीची व त्यांना शेती सुधारणेविषयी असलेल्या कळकळीची कल्पना येते. 


ट्रस्टचा कारभार सुरू झाला तेव्हा त्याच्या मिळकतीचे वार्षिक उत्पन्न सुमारे ६५ हजार रुपये होते. त्याच्या व्यवस्थेकरिता २० हजार रुपये खर्च व्हायचे. उर्वरित  45 हजार रूपये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर खर्च  केले जातात. आजपर्य़त लाखो विद्यार्थ्या़नी कोट्यवधी रूपया़चा लाभ घेतला आहे. असा महान दानवीर, दासोही गणेश चतुर्थीच्य़ा दिवशी 23 ऑगस्ट 1906 रोजी लि़गैक्य झाला. त्या़च्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!





No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...