Sunday, 2 July 2023

भास्कराचार्यांच्या भूमीतला ज्ञानसूर्य



विजयपूर जिल्ह्यातील बिज्जरगी ही पुण्यभूमी. या गावातील दोन नक्षत्रांनी आपल्या ज्ञान प्रकाशाने नभांगण सुंदर बनवले. १२ व्या शतकात आकाशात स्थान मिळवत पहिले नक्षत्र अमर झाले तर दुसर्‍या नक्षत्राने वैकुंठ एकादशीला गोधुली मुहूर्तावर आकाशी पोहोचले. भास्कराचार्य हे विज्ञान, गणित क्षेत्रात चमकले तर आध्यात्मिक क्षेत्रात श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी हे ध्रुव तारा बनले. 

विख्यात खगोलशास्त्रज्ञ, गणिततज्ज्ञ भास्कराचार्य  यांचा जन्म झालेल्या बिज्जरगी गावातच श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी जन्मले, हा निश्‍चितच योगायोग नाही. त्या मातीचे ते गुण आहे. अनेक प्रतिभावंत तेथे जन्माला आले आहेत. 

भास्कराचार्य बिज्जरगीचे, कर्नाटकातील हे या भागातील लोकांना माहीत नव्हते. तेवढेच कशाला, कर्नाटक सरकारलाही माहीत नव्हते. हा विषय सिद्धेश्‍वर स्वामीजींनीच उजेडात आणला. आपल्या प्रवचनात सॉक्रेटिस, रुसो, अ‍ॅरिस्टॉटल यांच्यासारख्या तत्त्वज्ञानींसह गॅलिलिओ, न्युटन, कणाद, आर्यभट आदी वैज्ञानिकांचाही ते उल्लेख करायचे. तेव्हा ते भास्कराचार्यांचीही स्मृती जागवायचे. भास्कराचार्य बाहेरचे नव्हेत, याच बिज्जरगीचे. ते विश्‍वश्रेष्ठ वैज्ञानिक, त्यांनी गणितजगताला दशमान पद्धतीची ओळख करुन दिली. ग्रहांची हालचाल मोजण्याची अचूक सूत्रे दिली. तेच बीजगणिताचे जनक. ते आपले असल्याचा अभिमान हृदयी असावा, असे ते सांगायचे. 

भास्कराचार्यांविषयीचा अभिमान केवळ त्यांच्या प्रवचनापुरते सीमित नव्हते. विजयपूरच्या ज्ञानयोगाश्रमात ‘भास्कर बळग’चीही स्थापना केली. त्या माध्यमातून भास्कराचार्यांविषयी अध्ययन केलेल्या, त्याविषयी आसक्ती असलेल्या लोकांना एकत्र आणले. भास्कराचार्यांची ९०० वी जयंती  दूरच्या कॅनडामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ते पाहून स्वामीजींनी ते जन्मलेल्या जिल्ह्यात एक मोठा कार्यक्रम घेण्याविषयी सूचना केली. त्यानुसार २०१६ मध्ये विजयपुरात भास्कराचार्यांचा ९ वा शतमानोत्सव साजरा करण्यात आला. स्वामीजींच्या विचाराला कर्नाटक सरकारनेही प्रतिसाद दिला. अक्कमहादेवी महिला विद्यापीठात भास्कराचार्य अध्यासन केंद्रही स्थापन झाले. 

केवळ अध्यासन केंद्र स्थापन करुन भागणार नाही, भास्कराचार्य घरोघरी पोहोचायला हवेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात मी भास्कराचार्य यांच्यासारखा वैज्ञानिक बनण्याची आस निर्माण करायला हवी, या स्वामीजींच्या विचाराला अनुसरुन गेल्या काही वर्षांपासून भास्कराचार्यांच्या नावाने दिनदर्शिका छापून, दरवेळी ५० हजारांपेक्षा जास्त दिनदर्शिका माफक दरात वितरित केल्या जात आहेत. तसेच स्वामीजींची तळमळ पाहून सिंदगीच्या सारंग मठाचे श्री प्रभू सारंगदेव शिवाचार्य यांनी भास्कराचार्यांच्या नावे 'भास्कर पुरस्कार'ची सुरुवात केली. ख्यात वैज्ञानिक सी. एन. आर. राव, यू. आर. राव यांना पुरस्कार देण्यात आला. कन्नडिगांच्या मनात भास्कराचार्य यांचे नाव अमीट अशाप्रकारे पुनर्स्थापित करण्याचे कार्य स्वामीजींच्या संकल्पसिद्धीने साध्य झाले.

भारतीय संस्कृतीविषयी स्वामीजींना अतिशय काळजी होती. स्वामीजींच्या विचारांनुसार ख्यात चिंतक गोविंदाचार्य, माजी खासदार बसवराज पाटील सेडम यांनी 'भारतीय संस्कृती उत्सव'ची सुरुवात केली. तितक्याच ताकदीने त्याचे आयोजन करत स्वामीजींना अपेक्षित अशाप्रकारे तिचे संयोजन केले. आज हे सांगायचे कारण म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक महत्वपूर्ण उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. स्वामीजींनी आध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून केवळ मानवी मनाची मशागत, हृदये स्वच्छ करण्याचेच नव्हे तर विज्ञाननिष्ठ विचार पेरतानाच, आपल्या श्रेष्ठतम पूर्वसूरींचा अभिमान मनी बाळगावा, हा विचार लाखो लोकांत रुजवण्याचे कार्य केले. शिवाय,  भास्कराचार्य व सिद्धेश्‍वर  स्वामी यांचा जन्म एकाच गावी झाला होता, हे आजच्या पिढीला कळावे, हा हेतू आहे. तसेच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भास्कराचार्य सांगावा, हा उद्देश नव्हे तर एका गणिततज्ञाविषयी स्वामीजींना किती कळकळ होती, हे सांगण्यासह पुढील प्रपंच...

श्री सिद्धेश्‍वर स्वामीजींची आपले गुरू श्री वेदांत केसरी मल्लिकार्जुन शिवयोगी यांच्याविषयी अपार श्रद्धा, प्रेम होते. स्वामीजींनी कोणाला लिंगदीक्षा देऊन आपला संप्रदाय निर्माण केला नाही. लिंगैक्य झाल्यानंतरही या भूतलावर त्यांचे म्हणून असे कोणतेही अस्तित्व राखू दिले नाही. आपल्या शिष्यवृदांनाही ते म्हणायचे, मी आपला गुरू नाही, मल्लिकार्जुन शिवयोगी हेच आपले गुरू.  तरीही भास्कराचार्यांच्या भूमीत जन्माला आलेल्या या नक्षत्राला लाखो लोकांनी आपल्या मनी गुरु मानले. का ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक व विवेकानंद केंद्राचा कार्यकर्ता या नात्याने संघसंस्थापक प. पू. डॉ. बळीराम हेडगेवार, त्यांच्याच नेतृत्वात जडघडण झालेले केंद्र संस्थापक माननीय एकनाथजी रानडे यांची संघटनात्मक दूरदृष्टी मनाला भावते. कारण दोघांनी कोणा व्यक्तीऐवजी तपोमय व ज्ञाननिष्ठ भारतीय संस्कृतीच्या सर्वाधिक सशक्त आणि पुरातन अशा भगवा ध्वज व ओंकाराला गुरू मानले, ते कार्यकर्त्यांसमोर प्रतिष्ठित केले. यामागे हा विचार होता की, व्यक्ती पतीत होऊ शकते, पण विचार आणि पवित्र प्रतीक पतीत होऊ शकत नाहीत. मानवी जीवनात या पुरातन प्रतीकांइतके पावित्र्य संपादन करणे कष्टाचे असले तरी सिद्धेश्‍वर स्वामीजी हे तितकेच (तुलना नव्हे) पवित्र होते.  जीवनाच्या कोणत्याही क्षणी, प्रसंगी वाणी अथवा आचरणाने ते ढळले नाहीत. आपल्याला दीक्षा दिली नसतानाही लाखो लोकांनी त्यांना गुरू मानण्यामागे हेच कारण आहे. सिद्धेश्‍वर स्वामीजी म्हणायचे, गुरू हा विशाल मनाचा हवा. त्यांच्यातील ती विशालता लक्षलक्ष मनांनी, हृदयांनी अनुभवली होती. गुरुदेव रा. द. रानडे यांनी संत कोण ? याविषयी एक साधी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, ‘ज्याच्याकडे पाहिले असता देवाकडे पाहिल्याचे समाधान मिळते तो संत.’  श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी कोणालाही आपल्या पायी मस्तक टेकवू द्यायचे नाहीत. तरीही त्यांच्या दर्शनाने तृप्त होण्यासाठी लाखो लोक ते जिथे असतील तेथे जायचे, त्यांची अमृतवाणी ऐकायचे. कारण त्यांच्या सुहास्यमुद्रेच्या दर्शनातच त्यांना ईश्‍वरी समाधान लाभायचे. गुरुदेव रानडे यांनी सद्गुरु शिष्यासाठी काय करतात? हे सांगताना असेही म्हटले आहे, ‘ते देव व भक्त यांची गाठ घालून देतात व आपण दूर राहतात.’ ज्ञानयोगी श्री सिद्धेश्‍वर स्वामीजींनी हेच केले. तेथे ‘मी’ नव्हता. साधकाने आत्मसाक्षात्कारार्थ चालविलेला उपायवन फुलविणारे ते वसंत होते. 

स्वामीजी आध्यात्मिक प्रवचनानिमित्त कोठेही असले तरी गुरुपौर्णिमेनिमित्त ते महिनाभर विजयपूरच्या ज्ञानयोगाश्रमात असायचे. त्यांचा महिनाभर ज्ञानदासोह चालायचा. गुरुपौर्णिमेला त्यांचे गुरू लिंगैक्य श्री वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामी यांच्या स्मृती जागविल्या जायच्या. त्यांच्या समाधी दर्शनासाठी भाविकभक्त यायचे. स्वामीजी लिंगैक्य होऊन कालच सहा महिने पूर्ण झाले. त्यानंतरचा आज पहिला गुरुपौर्णिमा. आजही भाविकभक्तांत तोच उत्साह कायम आहे. मल्लिकार्जुन शिवयोगी यांच्या समाधी दर्शनासह ‘कणाकणांत शिव’ झालेल्या ‘ज्ञानयोगी’च्या दर्शनासाठी. 

अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर 

No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...