Sunday 26 February 2023

कन्नडमधील उपनिषद : वचन साहित्य

 


भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था संपविण्यासाठी रशियातून १९७० च्या दशकात आलेला एक हेर पूर्ण देशभर फिरला. अशा या सुंदर देशाचे मी नुकसान करणार नाही, असे सांगून तो काम सोडतो. एका देशाचे कशाप्रकारे वाटोळे केले जाते, याविषयी तो एक सुंदर मुलाखत देतो. एखाद्या देशाचे वाटोळे करायचे तर एकूण ३५ वर्षांची प्रक्रिया आहे. आधीच्या २० वर्षांत त्या देशातील लोकांच्या मनात, विशेषत: युवकांच्या मनात तुमचा देश चांगला नाही, तुमचा धर्म चांगला नाही, तुमची आचारपद्धती चांगली नाही, तुमच्या रीतीनीती चांगल्या नाहीत, तुमचे देव चांगले नाहीत, तुमची पूजापद्धती चांगली नाही, हा विचार सतत बिंबवायला हवा. पुढच्या १० वर्षांत आपोआपच तो देश कोसळेल, असे तो सांगतो. ते भारतात अत्यंत व्यवस्थितपणे चालले आहे. त्याच्याविरोधात आवाज उठविताना आपला समाज परफेक्ट समाज आहे, या भ्रमात आम्ही नाही. परंतु एक समाधान आहे, की एक 'सेल्फ करेक्टिंग सिस्टीम' या संस्कृतीत सुरुवातीपासूनच आहे. आपल्यात असलेल्या समस्या आपणच सुधारुन पुढे जाण्याची या देशात एक पद्धती आहे. कालौघात या देशात जाती पद्धतीसह अनेक रुढी, परंपरा निर्माण झाल्या. त्या थांबवण्यासाठी आकाशातून कोणी आला नाही. या देशातच समाजसुधारक जन्माला आले. हे योग्य नाही, असे करू नये, हे समाजासाठी चांगले नाही, हे सांगून त्यांनी याचा विरोध केला. वेगवेगळ्या रुढी, चालीरीतींना विरोध करणारे, ते समाजातून काढून टाकणारे महात्मे आपल्यात जन्मले. सातव्या शतकातील दक्षिणेतील नायनारांपासून  पंधराव्या शतकातील शंकरदेवांपर्यंत देशभरात भक्तिपंथाच्या चळवळीची मालिकाच निर्माण झाली.  बाराव्या शतकात कर्नाटकात महात्मा बसवण्णांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली वीरशैव लिंगायतांची शरण चळवळ ही या मालिकेचीच एक कडी आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षांत महात्मा बसवण्णा हे संस्कृतविरोधी होते, त्यांनी वेद नाकारला. इतकेच नव्हे तर वीरशैव आणि लिंगायत वेगवेगळे आहेत. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, या विचाराला पुरोगामीत्वाच्या नावाखाली काही विचारवंत आणि स्वार्थी राजकारणी जाणीवपूर्वक खतपाणी घालत आहेत, हे वरील षड्यंत्राचाच एक भाग आहे. कारण येथील समाजाच्या प्रत्येक आदर्श राष्ट्रपुरुषाविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे महात्मा बसवण्णांच्या वचनांतूनच आपल्याला सत्य जाणून घेणे आवश्यक आहे.












भारतीय तत्त्वशास्त्रात सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा हे सहा दर्शन आहेत. त्यांना षड्दर्शन म्हणून ओळखले जाते. वेदोपनिषदांच्या काळापासून भूमीवरील जीवसंकुल आणि बाह्यजगताची निगुढता शोधण्याचे कार्य निरंतर चालत आले आहे. डोळ्यांना दिसणारे जीव - जगत  आणि त्याबाहेर असलेले अव्यक्त चैतन्य याविषयीची जिज्ञासा आजही न शमणारी ज्ञानदाह बनून राहिली आहे. जीव - देव -जग आणि त्याच्यातील संबंधाच्या विश्लेषणात गुंतलेल्या ऋषी - मुनी आणि द्रष्टे यांचे विभिन्न चिंतन म्हणजेच हे षड्दर्शन होय. एकेका दर्शनाने आपल्या रीतीने जीवात्मा, परमात्मा, जगत याविषयी चिंतन मांडले आहे. विविध दर्शनांच्या मागे वेगवेगळ्या ऋषिमुनींचे चिंतन आहे. उदाहरणार्थ कणाद, गौतम, पतंजली आदी नावे घेता येतील. या षड्दर्शनांत जीवात्मा, परमात्मा आणि जगत याविषयी अर्थपूर्ण विवरणासोबतच या तिन्हींतील त्रिकोण संबंधाविषयी गंभीर चिंतन केले आहे.
या विभिन्न दर्शनांतील मुक्त आणि गंभीर चिंतनाला निश्चितच शास्त्रीय चौकट आहे. कोणत्याही शास्त्रीय चौकट नसलेले स्वतंत्र, परिशुद्ध आणि मुक्त गंभीर चिंतन उपनिषदांत दिसते. त्याच प्रकारचे चिंतन शिवशरणांच्या वचनांत आपल्याला दिसून येते. त्यामुळेच वचनांना कन्नडमधील उपनिषदे म्हणून ओळखले जाते. शरणसंकुलाचे नेतृत्व केलेल्या महात्मा बसवण्णा यांच्या वचनांत या परंपरागत ज्ञानासह प्रगाढ आध्यात्मिक चिंतन, सामाजिक काळजी आणि आत्मानुसंधान दिसून येते.
कोणत्याही देशातील, कोणत्याही काळातील साहित्याचे अवलोकन केल्यावर मागील साहित्याने पुढे आलेल्या साहित्यावर परिणाम केल्याचे दिसून येईल. बसवण्णांचा जन्म सांप्रदायिक घराण्यात झाला. ते बहुश्रुत, वेद - शास्त्र पारंगत होते. त्यामुळे त्यांच्यावर प्राचीन भारतीय संस्कृत साहित्याचा मोठा प्रभाव दिसून येतो.
तंदे नीनु तायि नीनु,
बंधु नीनु बळग नीनु.
नीनल्लदे मत्तरू इल्लय्या.
कूडलसंगमदेवा, हाललद्दु नीरलद्दु.
अनुवाद :  पिता तुम्ही, माता तुम्ही,
बंधू तुम्ही बांधव तुम्ही
तुमच्याविना मला कोणी नाही देवा.
कूडलसंगमदेवा, दूधात बुडवा नाहीतर पाण्यात बुडवा.
या वचनातील शेवटची ओळ सोडली तर हे वचन पुढील संस्कृत श्लोकाच्या कन्नड अनुवादासारखे आहे.
त्वमेव माता च पिता त्वमेव ।
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देव देवा ॥
या पुढील वचनात महात्मा बसवण्णा शिवाच्या तांडव स्त्रोताचे वर्णन करतात. नटराज शिव नृत्य करताना त्याच्या पायांच्या आघाताने भूमी हादरली, त्याच्या ताठ उभ्या राहिलेल्या जटांनी आकाशातील गृहनक्षत्र छिन्नविच्छिन्न झाले. नाट्याच्या विभिन्न मुद्रेत त्याचे हात लागून तिन्ही लोक गळून पडले, अशा शब्दांत वर्णन केले आहे.
अदुरितु पादाघातदिंद धरे,
बिदिरिदुवु मकुट तागि तारकेगळु,
उदुरिदुवु कै तागि लोकंगळेल्ला !
महिपादाघातांद् व्रजति सहसा संशयपदं ! 
पदं विष्णोर्भ्राम्यद् भुजपरिघरुग्णग्रहगण: 
महुरद्योर्दौस्थ्यं यात्यनिभृतजटाताडिततटा |
जगद्रक्षा त्वं नटसि ननु वामैव विभुता !
नम्म कूडलसंगमदेवनिंदु नांट्यवनाडे.
अनुवाद : थरथरली धरणी पादाघाताने,
बिखरले तारे मुगुटाच्या टक्करेनी,
गळाले लोकांचे हात, हाताच्या स्पर्शाने,
महीपादाघाताद् व्रजीत सहसा संशयपदं ।
पदं विष्णोर्भम्यद् भुजपरिघरुग्णग्रहण : ॥
महुदरद्योर्दौस्थ्यं यात्यानिभृतजटातटाताडिततटा ।
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वायैव विभुता ॥
आमचे कूडलसंगमदेव आज तांडवनृत्य करू लागले.
हे वचनही संस्कृतमधील शिवमहिम्नस्तोत्राच्या १६ व्या श्‍लोकातील कन्नड भावानुवादासारखे आहे.
'महीपादाघाताद् व्रजीत सहसा संशयपदं ।
पदं विष्णोर्भम्यद् भुजपरिघरुग्णग्रहण : ।
महुदरद्योर्दौस्थ्यं यात्यानिभृतजटातटाताडिततटा ।
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वायैव विभुता ॥'
पुढील वचनात महात्मा बसवण्णांनी भगवंतनामाच्या संकीर्तनाला उचलून धरले आहे. कोट्यवधी मंत्रजप करण्यापेक्षा तन्मयतेने एक भक्तीगीत गाऊन देवाची आराधना करायला सांगतात,
कोट्यानुकोटी जपव माडि कोटलेगोळ्ळेलदेके मनवे ?
किंचितु गीतवोंदनंतकोटि जप.
जपवेंबुदेके, मनवे ?
कूडलसंगम शरणर कंडु,
आडि हाडि बदुकु मनवे. 
अनुवाद : कोट्यानुकोटी जप करुन,
भवबंधनाच्या चक्रात का सापडतो मना ?
एक लहानसे गीत अनंत कोटी जपासम आहे.
जप कशाला हवा आहे मना ? कूडलसंगाच्या
शरणाला पाहून हसत - खेळत गा रे मना.
हे वरील वचन स्कंद पुराणातील या श्लोकासारखे आहे.
श्रुतिकोटी श्रमं जपं ।
जपकोटी समं हवि : ।
हविकोटी समं हवि : ।
हविकोटी नमं गेयं ।
गेयं गेय समं विदु: ॥
वेदपारायणापेक्षा मंत्रजप कोटी भाग चांगले, मंत्रजपापेक्षा हव्यार्पण कोटी भाग चांगले, हव्यार्पणापेक्षा भक्तीने गाणे कोटी भाग चांगले, आणि भक्तिगीताच्या समान भक्तिगीताला सोडून दुसरे काहीही नाही, हे या श्लोकाचे आशय आहे. भक्तीने ईश्वराची आराधना करणाऱ्या भक्तिसंपन्न मनुष्याच्या मनाच्या महानतेचा बसवण्णा अशाप्रकारे गौरव करतात,
करि घनः अंकुश किरिदेन्न बहुदे ? बारदय्या, 
गिरि घन: वज्र किरिदेन्न बहुदे ? बारदय्या.
तमंध घन: ज्योति किरिदेन्न बहुदे ? बारदय्या.
मरहु घन: निम्म नेनेव मन किरिदेन्नबहुदे ? बारदय्या.
कूडलसंगमदेवा.
अनुवाद : हत्ती मोठा, आणि अंकुश लहान म्हणता येईल ? येणार नाही.
पर्वत मोठा आणि वज्र लहान म्हणता येईल ? येणार नाही.
अंधकार मोठा आणि ज्योत लहान म्हणता येईल ? येणार नाही.
विस्मरण मोठे आणि तुमचे स्मरण लहान म्हणता येईल ?
येणार नाही कूडलसंगमदेवा.
हत्ती आकाराने मोठा असेल. मात्र, माहुताच्या हातातील अंकुश लहान म्हणून त्याचा अनादर करणे शक्य आहे का?  पक्ष्यांसारखे विहारणाऱ्या पर्वत, डोंगरांचे पंख इंद्राने आपल्या वज्राने कापून जमीनदोस्त केल्याची एक पुराणकथा आहे. दैत्याकाराच्या पर्वतांपुढे इंद्राचे वज्रायुध लहान समजून त्याचे अवमूल्यन करणे साध्य आहे का? दाटलेल्या अंधकाराला दूर सारणारी पणती लहान म्हणून त्याची तुलना करणे शक्य आहे का ? या वचनांतील तिन्ही बाबींचा पंचतंत्रातील 'मित्रभेद' शी साम्य आहे.
हस्ती स्थूलतर: स चांकुवश: ।
किं हस्तिमात्रोंकुशो ? दिपे प्रज्वलिते प्रणश्यति तम: ।
किं दीपमात्रं तम: ? वज्रेणापि हता: पतंति गिरय: ।
किं वज्रमात्रो क: प्रत्यय: ॥
वरील श्लोकात दैहिक सामर्थ्यापेक्षा  एक तेजस्वी, सात्विक शक्ती मोठी असल्याचे प्रतिपादन केले आहे. तर मनुष्याचे अपरिमित अज्ञान निवारण करण्याची अपार शक्ती असलेल्या भक्ताचे मन मोठे, असे बसवण्णा म्हणतात.  त्यांच्यासारखे वेदोपनिषद समजून घेतलेले आणि निरुपण केलेले खूपच विरळ आहेत. ज्ञानाला जखडलेल्या परंपरागत शुष्क धार्मिक आचरण आणि मूर्खपणा याचे त्यांनी खंडन केले आहे. बसवण्णांनी वेदोपनिषदांचा नव्हे तर ते समजून न घेणाऱ्या कर्मठ आणि मूर्खांचा  विरोध केला आहे.
या पार्श्वभूमीवर ते वेद भार भाराक्रांता : गार्दभा : म्हणतात. म्हणजे वेदांचा अर्थ समजून न घेता केवळ पोपटासारखा पाठ करणाऱ्यांना 'वेदांचा भार वाहणारे' असे म्हणत त्यांची गाढवाशी तुलना करतात. त्यांनी आपल्या वचनांतून श्रुतींचे विश्लेषण करुन त्यांचा खरा अर्थ, अंतरंग आणि सार यांचे विवेचन केले आहे.
इब्बरु मूवरु देवरेंदु उब्बी मातनाडबेड, 
ओब्बने काणिरो, इब्बरेबुदु हुसि नोडा !
कूडलसंगमदेवनल्लदिल्लदेंदित्तु वेद.
अनुवाद : दोन - तीन देव आहेत असे गर्वाने म्हणू नको
देव एकच आहे, दोन देव आहे हे खोटे पहा. कूडलसंगमदेवाविना
दुसरा कोणता देव नाही असे वेद सांगतात.
जे वेदांनी सांगितले तेच बसवण्णांनी सांगितले आहे. त्यामुळेच त्यांनी एका वचनात  म्हटले आहे, देव एक आहे, नाव अनेक आहे. हेच वेदांनी सांगितले आहे, 'एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति ।' सत्य एकच आहे, परंतु ज्ञानी त्याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात. तसेच यत्र जीव: तत्र शिव:  म्हटले आहे. बसवण्णा म्हणतात,
शिवने जगत्रयक्कोडेयनेंदुदु वेद, 
उत्पत्ति स्थिति लयकारणनेंदुदु वेद, 
"ईश: सर्वस्य जगत: प्रभु: प्रेरको विश्वभुक्" एंदुदु श्रुति इदु
कारण, कूडलसंगमदेवनोब्बने देवनु.
अनुवाद : शिव हा त्रिलोकीचा स्वामी असे वेद म्हणतात.
उत्पत्ती - स्थिती - लय कारणीभूत वेद म्हणतात.
ईश: सर्वस्य जगत: प्रभु: प्रेरको विश्‍वभ्रुक् असे
श्रुती म्हणते म्हणून कूडलसंगमदेव हा एकच देव.
सामाजिक असमानता, जातिभेद आणि वर्णभेदाला वेदशास्त्रांचे प्रामाण्य देणाऱ्यांचा बसवण्णा तीव्र विरोध करतात. ते म्हणतात,
वेद नडनडुगित्तु, शास्त्रवगली केलक्के सारिद्दित्तय्या !
तर्क तर्किसलरियदे मूगुवट्टिद्दितय्या !
आगम हेरतोलगी अगलिद्दितय्या ! 
नम्म कूडलसंगय्यनु मादार चेन्नय्यन  मनेयलुंड कारण.

मराठी : वेद थरथर कापू लागले, शास्त्र मागे सरकले.
तर्कवितर्क केल्याविना गोंधळून गेले देवा.
आगम आपोआप अंग चोरुन दूर गेले देवा !
आमचा कूडलसंगमदेव मादार चन्नय्याच्या घरी जेवल्यामुळे.
याचा अर्थ वेदशास्त्र नाकारा, असे नव्हे. तर त्यांना पुढे करुन जातिभेद करणाऱ्यांवर मर्माघात करणे ! वेदशास्त्र न जाणता वाद करणाऱ्यांनो ऐका, असे म्हणत समजावून सांगतात. बसवण्णांनी आपल्या वचनांत दार्शनिक चिंतनावर मुक्त चिंतन केले आहे. त्यामुळे त्यांच्या वचनांत पुरातन परंपरेचे विमर्श दिसते. त्यांनी उपनिषदांच्या शुद्ध विचारांभोवती निर्माण झालेले कर्मठतेचे कटू आवरण दूर सरण्याचे कार्य केले. त्यांची अनेक वचने पाहिल्यावर वरुन ते वेद आणि शास्त्रांच्या विरोधी वाटत असले तरी त्यात कर्मठतेविषयी केवळ सात्विक आक्रोश आहे. वेदोपनिषदांचा योग्यरीत्या अर्थ समजून न घेता आपल्या स्वार्थलोलुपतेच्या समर्थनासाठी त्याचा वापर करण्यास ते विरोध करतात.
त्यामुळेच ते सवाल करतात,
वेद, शास्त्र, आगमंगळनोदिदवरु हिरियरे ? 
कवि, गमकि, वादि वाग्मिगळु हिरियरे ?
नटिनि, बाण, विलासि, सुविद्यव कलित
डोगबनेनु किरियने ? हिरियतनवावुदेंदडे;
गुणज्ञान आचारधर्म, कूडलसंगन शरणरु
साधिसिद साधनेये हिरियतन.

मराठी : वेद - शास्त्र आगम वाचणारे श्रेष्ठ आहेत ?
कवी - कथाकार, वादी, साहित्यकार श्रेष्ठ आहेत?
नाट्यविद्या, बाण, विलासी, सुविद्या शिकलेला,
डोंबारी काय कनिष्ठ आहे ?
श्रेष्ठ कोणाला म्हणतात तर - गुण, ज्ञान, आचार धर्म
कूडलसंगाच्या शरणांनी केलेली साधना श्रेष्ठ आहे.
या वचनात बसवण्णांनी कोणी वेदशास्त्र, आगम वाचल्याने श्रेष्ठ ठरत नाही, तर गुण, ज्ञान, शुद्ध आचाराने केलेली ईश्वराची साधना श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. आपण वेदोपनिषदांचा नीट अभ्यास केल्यास बसवण्णांनी त्यातील मूल्येच सांगितल्याचे दिसून येईल.
वरील एका वचनात 'शरणाला पाहून हसत - खेळत गा रे मना.' म्हणणारे बसवण्णा दुसऱ्या एका वचनात म्हणतात,
गीतव हाडिदडेनु, शास्त्र - पुराणव केळिदडेनु,
वेदवेदांतव नोडिदडेनु ?
मनवोलिदु लिंगजंगमव पूजिसलरियदवरु
यल्लरल्ली (प्रा) ज्ञ रादडेनु ?
भक्तियिल्लदवरनोल्ल कूडलसंगमदेव.

मराठी :  'गीत गायले काय, शास्त्र पुराणे ऐकले तरी काय ?
वेदवेदांत पाहिले तरी काय होणार ?
तन्मय होऊन लिंग - जंगमाची पूजा न जाणणारे
प्रज्ञावंत असून काय उपयोग ?
भक्तीहीनावर कूडलसंगम प्रसन्न होणार नाही.
भक्तीची श्रेष्ठता सांगताना बसवण्णा लिंग - जंगमाची पूजा न जाणणारे प्रज्ञावंत असून काय उपयोग ? असा सवाल करतात. याचा अर्थ प्रज्ञावंत असू नये, असा नाही. अगदी तसाच अर्थ वेदवेदांत याविषयी आहे.
बसवण्णांनीच वेदागमांविषयी म्हटले आहे,
वेदागमंगळु हेळिद हागे नडेवुदु, हेळिदंते नुडिवुदु, 
मीरि नडेयलागदु, मीरि नुडियलागदु, मुक्तिपदवैदुवात
अपहास्यक्के बारदे आचारमार्गदल्लिरबल्लडे
कूडलसंगमदेवनिगले ओलिव.
वेदागमंगळु हेळिद हागे नडेवुदु, हेळिदंते नुडिवुदु, 
मीरि नडेयलागदु, मीरि नुडियलागदु, मुक्तिपदवैदुवात
अपहास्यक्के बारदे आचारमार्गदल्लिरबल्लडे
कूडलसंगमदेवनिगले ओलिव.
अनुवाद : वेदआगमाने सांगितले तसे वागावे, तसेच बोलावे.
त्याला सोडून वागू नये - बोलू नये मग मुक्तीपद मिळते.
अपहास्य होऊ नये अशा आचार मार्गात
राहणाऱ्यांनी कूडलसंगमदेवाला प्रसन्न करून घ्यावे.
केवळ बसवण्णांनीच नव्हे तर सर्व शरणांनी आपल्या वचनांत वेदोपनिषदांतील श्लोकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. त्याच प्रकारे मातुलागम, कारुणागम आदी शिवागमाचा अनेक ठिकाणी आदराने उल्लेख केला आहे. काही ठिकाणी केवळ सात्विक आक्रोश दिसतो. त्यामुळे त्या वचनांमागील  आशय व भूमिका समजून घेण्याची गरज आहे.
- अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर
९०४९२९०१०१








Saturday 25 February 2023

ज्ञानालाच नव्हे, ज्ञानींनाही मृत्यू नाही, ते खऱ्या अर्थाने 'प्रज्ञा'वंत !

 


पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्याविषयी विचार करताना आठवतेय त्यांचे प्रवचन. मी स्वतः त्यांच्या दहा - बारा प्रवचन कार्यक्रमात सहभागी झालो आहे. शेकडो प्रवचने यूट्यूबसह इतर सोशल मीडियांत ऐकलो आहे. सुमारे १९ वर्षांपूर्वी कर्नाटक - महाराष्ट्र सीमाभागातील जत येथे चाललेल्या प्रवचनात सुमारे १५ हजार लोक सहभागी झाले होते. दूरदूरच्या गावातील लोक पहाटे तीन - चारला झोपेतून उठून बैलगाड्या - ट्रॅक्टरने एक - दोन तासाचा प्रवास करून त्यांच्या प्रवचनाला आल्याचे मी डोळ्यांनी पाहिलो आहे. हे केवळ एक - दोन दिवस नव्हे, तर महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमात दररोज न चुकता लोक हजेरी लावायचे. पहिल्या दिवशी आलेले एकही दिवस न चुकवता शेवटच्या दिवसापर्यंत कार्यक्रमात सहभागी होणारेच बहुसंख्य असायचे. तेव्हा गावात कोणतेही कार्यक्रम होत नव्हते. दिवसातून एक तास प्रवचन ऐकण्यासाठी संपूर्ण कुटुंबीय यायचे.

त्यादिवशी मी प्रथमच त्यांचे प्रवचन ऐकत होतो.  त्यादिवशी ग्रामीण जनताच बहुसंख्य असलेल्या कार्यक्रमात सिद्धेश्वर स्वामीजी 'गणित आणि जीवन' याविषयी बोलले. 'आज मी तुम्हाला गणिताविषयी सांगणार आहे...' म्हणून सुरुवात केल्यावर मला खरेच आश्चर्य वाटले. या खेड्यातल्या लोकांपर्यंत हा विषय कसा पोहोचेल, ते तो कसा स्वीकारतील, असे वाटले होते. जर मला त्याविषयी एक तास बोलायला सांगितले असते तर ते शक्य झाले नसते. इतरांना फारसे माहिती नसलेला, कठीण विषय सामान्यातल्या सामान्यालाही समजेल अशा प्रकारे सांगणे सामान्य काम नाही. आपण एखादा विषय स्पष्टपणे, खोलवर, विस्तृत जाणत असला तरच इतरांना नीट, सुलभरीत्या समजावून सांगणे शक्य आहे. तुम्हाला माहीत असलेला विषय इतरांना समजेल अशाप्रकारे सांगता येत नसल्यास तो विषय तूम्हालाच पूर्णपणे कळला नाही, असा त्याचा अर्थ आहे. काहीजण इतरांना सांगताना, 'हे तुला कसे सांगावे हे मला समजेना' ऐकला असाल. आपण नीट समजून घेतले तरच इतरांना समजेल अशा प्रकारे सांगणे शक्य आहे. त्यातच इतरांना माहीत नसलेला विषय समजावून सांगणे एक आव्हान आहे. त्या दिवशी सिद्धेश्वर स्वामीजींनी खेडुतांना गणिताच्या पायथागोरस थेरम, गुरुत्वाकर्षण नियम, E=mc^2, व्यास, त्रिज्या, थर्मोडायनामिक्स याविषयी सांगत ते त्यांनी (खेडूत) समजून घेण्याच्या प्रयोजनाविषयी विवेचन केले. मी विज्ञानाचा विद्यार्थी असूनही, ते शिकूनही सत्य जीवनात गणित, विज्ञानाची सूत्रे कशी आचरणात आणली पाहिजेत, याचा विचार केला नव्हता. दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनात 'विमान कसा उडतो' याविषयी बोलले. कार्यक्रमात एखादाही झोपताना, जांभया देताना दिसला नाही. त्यादिवशी त्यांनी एरोडायनामिक्स थिअरीविषयी सांगितले. दहा - बारा शास्त्रज्ञांच्या नावांचा उल्लेख केला. एरोडायनामिक्स थिअरीविषयी सांगताना मधमाशाची कथा सांगितली.

'आपण सर्वजण मधमाशी पाहिलात; त्याचा देह मोठा आहे, मात्र, पंख पातळ आहेत. देहाचा आकार आणि पंख यांच्यात खूप विरोधाभास आहे. एरोडायनामिक्स नियमानुसार मधमाशी उडायलाच नको. उडणेही शक्य नाही. तरीही ते कितीतरी हजारो वर्षांपासून उडत आहे. विमानाचा शोध लागण्याच्या आधीपासून मधमाशी उडत आहे. ते कसे ?' म्हणून विचारले. 'नंतर स्वामीजींनीच विवेचन केले - ',कारण त्या मधमाश्यांना एरोडायनामिक्स थिअरी म्हणजे काय, हे माहिती नाही. त्यांनी ती थिअरी वाचली नाही. त्यामुळे ते उडत आहेत. मनुष्य ही थिअरी जाणण्यामागे मधमाशी हे एक कारण आहे. मधमाश्याप्रमाणे विमान डिझाइन केल्यास उडेल, मात्र, खूप दूरपर्यंत उडणार नाही' असे सामान्यांनाही समजेल अशाप्रकारे विवेचन केले. मनुष्यही या मधमाश्यांसारखा आहे. आपल्याला आपल्या बल आणि बलहीनता माहिती असाव्यात. भीमाला त्याची शक्ती माहिती नव्हती म्हणे. त्यामुळे त्याने दहा हत्तींसमोर शड्डू ठोकून उभा राहिला. कृष्णाला आपल्या बलहीनतेची माहितीच नव्हती. त्यामुळे तो देव झाला.' असे सांगून स्वामीजींनी त्या प्रसंगाची खऱ्या जीवनाशी तुलना केली. 

सिध्देश्वर स्वामीजी हे उत्तम व्याख्यात्यापेक्षा अद्भुत संवादक आहेत, असे अनेकदा मला वाटले आहे. व्याख्यात्यातील शाब्दिक चढ - उतार, अतिशयोक्ती, अलंकार आदी कोणतेही नव्हते. त्यात उद्वेग,  उद्घोष, गर्जना, अवमानकारकही नव्हते. त्यांचे प्रवचन म्हणजे एकप्रकारे संथ वाहणाऱ्या नितळ शाल्मलेचा प्रवाह होय. तेथे कोणतीही घोषणा, खुशामत, आत्मप्रशंसा काहीही नाही. त्यांचे बोलणे अशिक्षितापासून शिक्षितापर्यंत एकाच तरंगांतराने भिडायचे. त्यांचे बोलणे कधीही श्रोत्यांना संभ्रमित करणारे नसायचे. कोणीही न ऐकलेल्या मोठमोठ्या तत्त्वज्ञानी, विचारवंत, बुद्धिजीवींच्या नावांचा ते उल्लेख करायचे. बसव, बुद्ध, अरिस्टाटल, प्लेटो, कन्फ्युशियस, गुड्जिफ, थामस अक्विनास, इमर्सन, डेव्हिड ह्युम, जॉन लोके...आदी अनेक तत्त्वज्ञानी मंडळींचे विचार प्रवचनातून मांडायचे. त्यात तत्त्वज्ञानी मंडळींचा गौरव असायाचा, ते सगळे मला माहिती आहेत, हे स्वकौतुक नव्हे. त्या महान तत्त्ववेत्त्यांचे विचार आपल्या सामान्य शेतकरी, खेड्यातील लोकांच्या ज्ञान,  विचारांशी किती साधर्म्य राखतात, हे सांगण्यासाठी ते त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख करायचे. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नसायचा. एकदा ते प्रवचन सुरू करण्याआधी जवळच पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. त्यादिवशी ते पक्ष्यांचे स्वारस्य आणि रोचक जगताविषयीच ते एक तासभर बोलले. त्यांच्या प्रवचनासाठी उभारलेल्या व्यासपीठासमोर साकारलेली सुंदर रांगोळी पाहून 'रांगोळी का घालावी, त्याचे महत्त्व काय?' याविषयीच संपूर्ण प्रवचन केले. त्यात दहाएक कथा, दृष्टांत, घटना, नीतिकथा असायच्या. स्वामीजी कोणत्याही प्रवचनाची कधीही पूर्वतयारी करत नव्हते. छोटीसी चिठ्ठीही कधी लिहून ठेवून घ्यायचे नाहीत. टिपण काढायचे तर विचारुच नका. ते लहान मुलांनाही रॉकेट सायन्स समजेल, कुतूहल निर्माण होईल अशा प्रकारे सांगायचे. त्यांच्याकडे मनगटी घड्याळ नसायचे. बरोबर एक तास होताच ते प्रवचन थांबवायचे. पुन्हा उद्या सर्वकाही नवीन असायचे. 

स्वामीजींच्या बोलण्यात 'हिडन अजेंडा' नसायचे. जाती, धर्म, पंथ, कुल - गोत्रांचे प्रवर्तकपण, प्रवक्तेपण नसायचे. त्यांची मुख्य चिंता ही मनुष्य कल्याण, समाजहित असायची. त्यामुळे ते सर्वधर्मियांना आवडायचे. साधारणपणे कोणत्याही मनुष्याला कोठेतरी आपले विचार, सिद्धांत, अस्तित्व मांडण्याची इच्छा असते. त्याला छोटे मोठे का होईना पण आपलेच एक साम्राज्य उभे करण्याची हितासक्ती असते. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींची हितासक्ती स्वतःला सर्वत्र नाकारण्यातच होती. ती लौकिकापासून दूर होण्यात होती. त्यांनी स्वतः साठी कशाचीही आकांक्षा बाळगली नाही. त्यांना खासगी आणि वैयक्तिक असे काहीच नव्हते.

मनुष्याला आरामात जगण्यासाठी पैशांची गरज असते. मात्र, त्यांनी त्याचीही आकांक्षा बाळगली नाही. पैसा पाहिल्यावर आगीला पाहिल्यासारखे व्हायचे. त्याला कधी करंगळीनेही शिवले नाही. त्यांनी ज्ञानलोकात महाल बांधला होता. त्या जगतात पैशांचा व्यवहारच नव्हता. त्यामुळे त्यांनी पैशाच्या स्त्रोतापासून निर्माण होणाऱ्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षाच केली नाही. ज्ञान आणि विवेक यापेक्षा काहीही चांगले नाही. पैसा त्यापुढे नीरस असल्याचे त्यांनी जाणले होते. त्यामुळे  त्यांच्या जवळ आलेल्यांना त्यांनी ज्ञान व विवेक दिले. त्यातच त्यांनी सुख अनुभवले.  तेवढेच नव्हे, त्यासाठीच ते आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले. ज्ञान कोणीही चोरून नेऊ शकत नाही, त्याचा नाश करू शकत नाही. त्याचा ठाव कुणाला लागू शकत नाही. त्यामुळे स्वामीजी केवळ ज्ञानार्जनाच्याच मार्गाने चालले आणि त्यात ते यशस्वीही झाले. अपार ज्ञान मिळविले. त्यांनी एकट्यांनीच त्याचा आनंद घेतला नाही, तर ते संपूर्ण जगाला वाटले. ते जेथे असायचे ते ठिकाणच ज्ञानयोगाश्रम बनवून टाकले. ज्ञानयोगी झाले. त्या जगात असलेल्या आनंदापेक्षा अन्य कोठेही ते असणे शक्य नाही, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर करताच ते 'नको' म्हणाले. मनुष्याला आनंदाने जगण्यासाठी कोणत्याही नावाची गरज नाही. नाव ओझे आहे. ओळख म्हणून ते हवे, मात्र, तेच अस्तित्व बनून राहू नये. 

असे असताना नावाआधी पद्मश्री म्हणून शेपूट कशाला हवे म्हणाले. स्वामीजींनी मनात आणले कसते तर त्यांच्या ज्ञानयोगाश्रमात पैशांची नदीच वाहिली असती. त्यांना तसे भक्त, चाहतेही होते. त्यांनी फक्त डोळ्यांनी सूचना केली तरी पुरेसे होते. मात्र, ज्ञानापुढे सर्व नश्वर आहे, यावर विश्वास असलेल्या त्या सुज्ञानीने य:कश्चित गोष्टींसाठी हात पसरले नाही. व्यक्ती म्हटल्यावर साहजिकपणे गुण - दोष असणारच. नसल्यास तो देव बनतो. तसे असल्यास देवांमध्ये गुणदोष नाहीत का ? मात्र, सिद्धेश्वर स्वामीजी यांच्यात तसे दोषही नव्हते. परंतु ही गोष्ट त्यांच्यासमोर सांगितली असती तर त्यांना सहन झाली नसती. ते संकोचाने आक्रसून गेले असते. कारण या प्रशंसेतील अपायकारकता, कृत्रिमतेची चाल त्यांना माहीत होती.  ज्ञानी नावाचा चादर पांघरलेल्यांना बिरुद - उपाधी, प्रशंसा हे सगळे चिल्लर ! आपल्या वागण्या - बोलण्यात समानता राखलेल्या स्वामीजींनी आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टींकडे कधीही लक्ष दिले नाही. एक संत कसा असावा याविषयी स्पष्टता होती. ते गम्य शेवटपर्यंत जपलेले स्वामीजी आगीजवळ राहूनही त्याची उष्णता न लागता बकुळ, काटेरी धोतऱ्यासारखे राहिले !



सुमारे दोन दशकांपासून माझा 'श्रीं'शी निकटचा संबंध होता. ते कोणत्याही गावी असले तरी मी संपादित वर्तमानपत्रे दररोज वाचायचे. भेटल्यावर ते त्याविषयी बोलायचे. आम्ही दिलेले मथळे आठवणीत ठेवून उद्धृत (quote) करायचे. त्यामुळे ते किती गंभीरपणे वर्तमानपत्रे वाचायचे हे समजायचे. कर्नाटकातील कोणत्याही गावी प्रवचन असले तरी माझ्या परिचित स्नेहींच्या माध्यमातून बोलवायचे. 'श्रीं'च्या सूचनेनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये भालकी येथे चाललेल्या आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा आम्ही दोघेच एका  शेतातील मोठ्या झाडाखालील खूर्चीवर बसून सुमारे दोन तास केलेली लोकाभिमुख चर्चा विसरता येणारी नाही. ते संपूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवलेले क्षण एक सुंदर आठवण आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवचन होते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे 'श्रीं'चे प्रवचन ऐकण्यासाठी हजारो लोक आले होते. सर्वत्र नीटनेटकेपणा, शिस्त होते. आलेल्या सर्वांनी आंघोळ करून, कपाळावर विभूती (भस्म) लावून स्वच्छ वस्त्रे परिधान केली होती. इतर धर्मीयही श्रोत्यांच्या रांगेत बसलेले होते. मात्र, त्यादिवशी स्वामीजी बोललेच नाहीत. 'म्हणाले, आज भट बोलतील!' त्या पवित्र व्यासपीठावरून बोलण्याचे सौभाग्य स्वामीजींनी दिले. त्यादिवशी भालकीच्य हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरु आणि सुत्तुरु मठाचे जयराजेंद्र स्वामीजीही व्यासपीठावर होते. सिद्धेश्वर स्वामीजींनी दिलेली ती 'भेट' माझ्यासाठी शाश्वत आठवणीत राहणारी आहे. 

ज्ञानाला मरण नाही, ती शाश्वत आहे. ज्ञानींचेही तसेच आहे. तसे ज्ञानयोगी सिद्धेश्वर स्वामीजींनाही. ते अमर आहेत. ते दोन्ही अर्थांनी 'प्रज्ञावंत!'

- विश्वेश्वर भट, संपादक, विश्ववाणी

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

 




Thursday 23 February 2023

गोविंदराव पानसरे हत्या : त्यांना लढाई एकट्याने लढायचे आहे

 


२३ फेब्रुवारी २०१५

 कम्युनिस्ट नेते गोविंदराव  पानसरे यांची हत्या निंदनीय आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जायला हवी. मात्र, नरेंद्र दाभोलकर व त्यानंतर पानसरे यांची हत्या पाहता तसे होताना दिसत नाही. या हत्यांचा तातडीने तपास होऊन सत्य बाहेर यायला हवे. त्यासाठी सर्वच विचारप्रवाहांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढवावा. परंतु पानसरे यांच्या हत्येनंतरच्या पुरोगामी मंडळींच्या बिनबुडाच्या प्रतिक्रिया पाहता हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करत त्यांना ही लढाई एकट्‌यांनीच लढायची आहे. परंतु ती कशासाठी, हे मात्र संशयास्पद आहे. कारण पानसरे यांच्या हल्ल्यानंतरच्या पहिल्या क्षणापासूनच अशी वक्तव्ये सुरू झाली की, हिंदुत्ववाद्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले, जेणेकरुन ते या लढाईत त्यांच्यासोबत उतरुच नयेत. दाभोलकर व पानसरे या दोघांची हत्या आणि त्यासाठी वापरलेली नीती यातील साम्य आणि यांचा समान वैचारिक विरोधक यामुळे ते हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करत आहेत. युक्तीवादापुरते जरी मान्य केले तरी दाभोलकर हत्येवेळी राज्यात हे पुरोगामी विचारवंत उठता बसता ज्यांची जपमाळ ओढतात त्या पुरोगाम्यांचेच तर सरकार होते. मग ते आरोपींपर्यंत का पोहोचले नाहीत. काही पुरोगामी यामागे कोणाचा दबाव आहे, असाही सवाल करताना दिसत आहेत. परंतु ते हा प्रश्‍न थेट या सरकारची सूत्रे ज्यांच्या इशार्‍यावर हलायची, त्या आपल्या प्रिय नेत्यालाच का विचारत नाहीत. तसे केले असते आणि त्यासाठी रान पेटवले असते तर आज आरोपी गजाआड असते ना. का केवळ या हत्यांचे राजकीय भांडवल करुन ते ज्यांना पुरोगामी समजून सातत्याने तळी उचलतात त्या पक्षांना भविष्यात केवळ राजकीय लाभ मिळवून द्यायचा आहे. दुसरा मुद्दा देशात व राज्यात हिंदुत्ववाद्यांचे सरकार आल्याने हे घडते आहे, असा यांचा आरोप आहे. का देशात आणि राज्यात यापूर्वी हत्याच झाल्या नाहीत? (हा प्रश्न विचारण्यामागे भाजपच्या राज्यात हत्या झाल्या तर चालतील अथवा व्हाव्यात असा उद्देश असल्याचे कुणी समजू नये. ) माहिती अधिकार कार्यकर्ते शेट्‌टी यांची हत्या तर पुरोगाम्यांच्या राज्यातच झाली.स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या, सहा प्रचारकांचे अपहरण, केरळातील संघ स्वयंसेवकांच्या हत्या याही घटना त्यांच्याच काळात तर घडल्या. का ती माणसं नव्हती? त्यांच्या जीवनाचे मोल नाही? या दुटप्पी नीतीतून इतकेच दिसते, यांना मारेकरी सापडावा यात आणि वैचारिक लढाईत रस नाही तर राजकारणात रस आहे. कारण भाजप सत्तेत येऊच शकत नाही, अशी या पुरोगाम्यांची भविष्यवाणी होती. ती खोटी ठरली. आणि ते सत्तेवर आलेच कसे, ही खरी पोटदुखी आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांची बदनामी हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. यांचा हिंदुत्ववाद बदनाम व्हावा, हा एकच अजेंडा पूर्वीही होता, आणि आताही असल्याचे या एकूणच वक्तव्यांवरुन दिसते. मिशनर्‍यांच्या हत्येतही हिंदुत्ववादी असल्याची ओरड या पुरोगाम्यांनी केली होती. परंतु ती खोटी ठरल्यानंतर या पुरोगाम्यांनी माफी मागितली का, तर नाही. पुरोगाम्यांच्याच भाषेत इतिहासाचे मढे उकरल्यासही यांची दुटप्पी नीती दिसते. पानसरे यांच्या हत्येनंतरही गोडसे प्रवृत्तीचा उल्लेख सुरू आहे. महात्मा गांधीजींची हत्या निंदनीयच होती. मात्र, त्यापूर्वी स्वामी श्रद्धानंदांची हत्या झाली, याचा पुरोगामी कधी उल्लेख करताना दिसत नाहीत. का स्वामी श्रद्धानंद माणूस नव्हते? का केवळ ते हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांच्या हत्येचा उल्लेख टाळायचा? पुरोगाम्यांनो, इतके मानवतावादी, गांधीवादी असाल तर गांधींनी स्वामी श्रद्धांनदांच्या मारेकर्‍याला माफ करायला सांगितले तसे आपण अजुन गोडसेला का माफ केले नाही? प्रत्येक निवडणूक आल्यावर कॉंग्रेसचा पुढारी जे बोलतो तेच या पुरोगामी बोरुबहाद्दरांच्या लेखणीतून का पाझरते. त्यावेळी गोडसे, गोडसे का सुरू होते. गोडसे वगळला तर कॉंग्रेसचे भांडवलच संपणार आहे. कारण मते कशाच्या आधारावर मागायची, हा प्रश्‍न कॉंग्रेससमोर असेल. परंतु मानवतेचे गोडवे गाणार्‍या पुरोगाम्यांना कशाची भीती आहे? स्वातंत्र्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा रहस्यमय मृत्यू, रेल्वे प्रवासात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचा खून झाला. त्याची चौकशी होऊन मारेकर्‍यांना शिक्षा व्हावी, हे आपल्याला का वाटले नाही? कृष्णा देसाईच्या खुनाचेही तसेच. उठसूठ त्याचा दाखला देणार्‍यांना त्यापूर्वीची डाव्यांची मुंबईतील गुंडगिरी आणि त्यांनी पाडलेले खून याविषयी कधी का लिहावेसे वाटले नाही? का तुमचा पुरोगामीपणा हा कोणत्या विचाराच्या कार्यर्त्याचा खून झाला, यावर ठरतो का?डाव्यांनी केलेले खून, त्यांची गुंडगिरी, लोककल्याणकारी असल्याचे म्हणायचे आहे काय? हत्या कोणाचीही असो, ती मानवतेला काळीमा फासणारी, लोकशाहीला नख लावणारी असते, असे का वाटत नाही?

- अप्पासाहेब हत्ताळे

Wednesday 22 February 2023

निर्मोहत्वाचा मार्गदर्शन केलेले खरे संत

 


 दहा लोक जरी जमले तरी रसाळ बोलणारे राज्यात सर्वत्र सापडतील. यक्षागानाप्रमाणे अभिनयासह भाषण करणारे कलाकारही अनेक आहेत. चढ उतार, व्यंगात्मक शरसंधान करून, थोडा मसाला घालून भाषणालाच कलाकृती बनवून टाकणारे वक्तेही आहेत. टाळ्या मिळविणारे वक्तेही आहेत. भाषणाने समाजातील वाईट गोष्टी दूर करू हा भ्रम बाळगणारेही आहेत. चार व्यासपीठांवर बोलण्याची संधी मिळताच विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवणारेही आहेत !  मात्र, हे तसे नाहीत. बोलण्यात चढ - उतार नाही. त्यांना प्रवचनाला लोकांना जमवण्याची गरज भासली नाही. त्यासाठी बोलले पाहिजे ही त्यांची इच्छाही नाही  !  समाजात त्यांच्यापेक्षा महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले अनेकजण आहेत; व्याख्याने देणारेही आहेत, मूल्ये देणारेही आहेत. मात्र, समाजाने यांना दिलेला सन्मान त्या कोणालाही दिला नाही ! म्हणजे समाजाला ते सर्वजण तसे वाटले नाहीत. यांना अवधूत मानल्यास तशा बिरुदावल्या नाहीत. त्यांनी कधीही पापाचे पुण्यात रुपांतर करण्याचा दावा केला नाही. लोकांनीही त्यांच्याकडून ती अपेक्षा केली नाही. नावापुढे पीठाधिपतिपदाचे विशेषण लावले नाही, जातीचे बंधन पाळले नाही. कोणीही त्यांचा अनुयायी म्हणून दावा केला नाही. कोणा मंत्र्यालाही विशेष दर्शन दिले नाही. स्टुडिओत बसून प्रवचनांचे रेकॉर्ड करवले नाही. कोणाही राजकारण्याला शाल पांघरुन स्तुतिसुमने उधळली नाहीत. तेवढेच कशाला नेसलेल्या कपड्याला खिसा नाही, बसलेल्या खुर्चीलाच पीठ मानले,  भगवी वस्त्रे धारण करण्याची संधी असतानाही ती धारण केली नाहीत. कोणाच्या मर्जीखातर अथवा त्याच्या दबावाखाली राहिले नाहीत. ते जसे होते तसेच राहिले. सर्वांना आपण आहात तसेच राहायला सांगितले. धावपळ न करता हे जीवन सुखी व  समृद्ध बनवणे हेच साध्य आहे. अशाप्रकारे धर्माचे परमोत्कृष्ट निरुपण केलेले सिद्धेश्वर स्वामीजी हे खरे संत होत. त्यांच्या अंतिम यात्रेला १५ लाखांहून अधिक लोक जमले होते.  

  आजच्या भडक युगात जे गुण कालबाह्य समजले जातात त्या सर्व गुणांनी संपन्न एका व्यक्तीच्या अंतिम यात्रेला इतके लोक का जमले हे आश्चर्यकारक आहे. आजचा काळ हा तसे जगण्याचा नाही, ही भावना दिवसेंदिवस वाढीस लागली असताना त्याच गुणांनी ते जीवंत देव म्हणून ओळखले जाणे हे अतार्किक आहे. होय, हे न सोडवता येणारे कोडे आहे. सोशल मीडियात खरडून, मेकअप करुन कॅमेऱ्यासमोर तोंड दाखवत महान चिंतक म्हणून मिरवणे, बड्या मंडळींशी असलेल्या संबंधांचा इतरांना पायदळी तुडवण्यासाठी अस्त्र म्हणून वापर करण्याचे प्रकार फोफावत असताना अशी व्यक्ती आपल्यात होती, हे आश्चर्यकारक आहे. मग सिद्धेश्वर स्वामीजी यांच्यात असलेली वैशिष्ट्ये तरी काय आहेत ? स्वतःला एक सामान्य मनुष्य समजणाऱ्या माणसावर समाजाने इतके प्रेम कसे केले ? 'बड्या मंडळीं' त नसलेल्या कोणत्या गोष्टी यांच्यात होत्या ? हा सध्याचा प्रश्न आहे. मात्र, त्याचे उत्तर धर्म विषयावरील अत्यंत सोप्या प्रवचनात आहे. कारण धर्म म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे. ती आचरणात आणायची गोष्ट आहे, उपदेश करण्याची नव्हे. अथवा आचरणानुसार त्याविषयी उपदेश करावा. त्यामुळे वेळोवेळी धर्म उपदेशकांनी आधी त्याचे आचरण केले, लोकांना सांगितले. आपण धर्ममार्गावर चालल्यानंतर त्याचा प्रचारक बनले. त्यामुळे धर्मप्रचारकांचे वैशिष्ट्य हे त्यांचे गुण समजण्याऐवजी ते धर्माचे गुण म्हणणे अधिक योग्य होईल. सिध्देश्वर स्वामीजी यांच्यात असा धर्म होता. 

 हजारो वर्षांपासून धर्माविषयी सांगितलेले सर्वजण तसे जगले होते. त्यांचे जीवनच एक धडा आहे. तसे जगलेल्यांचे समाज ऐकायचा. त्या गुणामुळेच समाजाने सिद्धेश्वर स्वामीजींचे अनुकरण केले. वेळोवेळी समाजाला त्यांच्या सारख्यांची आवश्यकता निश्चितच आहे. कारण अशा लोकांशिवाय जगात आदर्श, सत्य आणि धर्म यांचे मूल्यांमध्ये रूपांतर होणार नाही. मूल्ये नसलेल्या जगात दुष्ट लोक धर्मात्मा म्हणून ओळखले जाण्याचा, रमणाश्रमाला जाणारे परम सात्विक समजले जाण्याचा, अहंकाराच्या नशेत चूर लोक महात्मा होण्याचा धोका संभवतो. धूर्त लोक नैतिकतेचा मुखवटा पांघरुन समाजात मिरवतील. एकीकडे यांच्याभोवतीची मंडळी त्यांच्या वाईट गोष्टींचा विरोध न करता, दुसरीकडे ते चांगुलपणा आचरणात न आणता दोलायमान स्थिती निर्माण होते. ही पूर्वीपासूनच जगाची रीत बनली आहे. मात्र, त्या त्या काळात जगात अवतरलेल्या काही सत्पुरुषांनी मूल्यांचे पालन करीत तसे जगून दाखवले आहे. भारतात असे कितीतरी अवधूत होऊन गेले. त्यात अलिकडे होऊन गेलेल्या रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी यांचा उल्लेख करता येईल. सिध्देश्वर स्वामीजीही तसे जगले. होऊन गेलेले दार्शनिक, योगी तसेच होते. कारण भारत नावाच्या महालाला धर्म हाच खांब होय !  त्यामुळे या मातीने केवळ सत्य सांगणाऱ्या, धर्माचे आचरण करणाऱ्यालाच सत्पुरुष मानले आहे. तशाप्रकारे सिद्धेश्वर स्वामीजी जगले. तसेच तशाप्रकारची श्रद्धा समाजात रूजवली. ती श्रद्धा रुजवण्यासाठी वाक्चातुर्याची आवश्यकता नाही. शिवाय संघटनेच्या ताकदीचीही गरज नाही, हे सिद्धेश्वर स्वामीजींनी दाखवून दिले. आज दांभिकता शिखरावर आहे. अशा काळातही हे साध्य असल्याचे सिद्धेश्वर स्वामीजींच्या जगण्यातून दिसून येते. 

 जे अल्लम, सर्वज्ञ, बसवादि शरणांना अत्यंत सहजपणे गवसले तेच सिद्धेश्वर स्वामीजींनीही मिळविले. जे शंकराचार्यांना चांडाळामुळे प्राप्त झाले, ज्याची रामानुजाचार्यांनी देवस्थानच्या गोपुरावरून घोषणा केली तेच चिंतन सिद्धेश्वर स्वामीजींनी मांडले. रमण महर्षींनी 'तुझ्या अंतरंगातही बघ' म्हणून सांगितले. सिद्धेश्वर स्वामीजीही तशाच प्रकारे जगले. सिद्धेश्वर स्वामीजी यांचे जीवन इतके साधे आणि शांत होते की 'जीवन अनुभवांचा प्रवाह' आहे ही जाणीवच त्यावर उपाय ठरू शकते. ती जाणीव आत नव्हे आणखी कोठे शोधायची ? अनुभवण्यासाठी असलेले जीवन अनुभवांचा प्रवाह नव्हे, आजचे आजच ही मनोवृत्ती संपवण्यासाठीच जगलेल्या श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी देहत्यागानंतर समाजाला आणखी एका उंचीवर नेले. भारतात होऊन गेलेले बहुतेक महापुरुष हे मृत्यूनंतर जगाला अधिक प्रस्तुत ठरले आणि लोकप्रिय झाले. रमण महर्षी यांना पाहिले तरी कळेल. आपल्या जीवनात कधीही तिरुवन्नामलै सोडून कोठेही ते गेले नाहीत. मात्र, मृत्यूनंतर संपूर्ण जगच  तिरुवन्नामलैला येण्यासारखे केले. रमण महर्षी हे आपल्याकडे येणाऱ्या काही भक्तांना मी एक वेडा असल्याचे सांगायचे. सिद्धेश्वर स्वामीजींसारखे रमण महर्षीही पापाचे पुण्यात रूपांतर करून देईन, चमत्काराने उद्धार करेन, असे कधीही सांगितले नाहीत. ते महर्षी बनले. म्हणजे गोंधळाविना जीवन कसे जगायचे हे सांगितले. त्यामुळे सिद्धेश्वर स्वामीजीही महर्षीच होत. 

जे बोलल्याप्रमाणे जगले तेच जगात मोठे झाले आहेत. आज कसे जगायचे हे सांगण्यासाठी मॅनेजमेंट कोर्स आहेत. त्याविषयी सेमिनारमध्ये लीलया पटवून देणारे मॅनेजमेंट गुरुही आहेत. मात्र, जीवनविषयक जाणीव ? धार्मिक जाणीव ? अशा काळात सिद्धेश्वर स्वामीजींनी लोकांना या दोन्ही जाणिवा दिल्या. देशात धार्मिक जाणीव दिलेले काही मठाधीश आहेत. काही मठाधीशांनी केवळ जीवनविषयक जाणीव दिले आहे. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींनी दोन्ही जाणिवा दिल्या. विद्वानांसाठी त्यांनी जसे कैवल्य सूत्र, नारद सूत्र, आनंद योग, पतंजल योगसूत्रावर भाष्य लिहिले तसे सामान्यांसाठी कथामृत, अंतरंगद कृषी, भगवत चिंतन, नानू यारू आदी पुस्तके लिहिली. आपल्या प्रवचनांतून पंचमहखभूतांच्या माध्यमातून मूल्यांचा उपदेश केला. समाजाच्या सर्व वर्गापर्यंत पोहोचतील अशा सर्व विषयांना स्पर्श केला. त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचले. 

ऋषींना स्वतः धर्म आणि आपल्या शरीराला प्रयोगशाळा समजण्याची ताकद असते. त्याला दधिची, अगस्त्य यांच्यासारख्या महाऋषींची उदाहरणे आहेत. सिद्धेश्वर स्वामीजींनी तसे प्रयोग केले. आचारांचा मूळ उद्देशच धर्माचरण आहे. धर्माचरणासाठी आचरण हे डबके बनू नये, हे सांगण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. एकदा सिद्धेश्वर स्वामीजी हे शिष्यांसह बंगळुरुच्या सुत्तुरू मठाच्या केतोहळ्ळी आश्रमात मुक्कामी होते. एके दिवशी सकाळी त्यांच्या शिष्यवृंदापैकी एक असलेले गदगच्या शिवानंद मठाचे जगद्गुरु सदाशिवानंद यांना लिंगपूजेसाठी वेळेवर बेलपत्र सापडले नाही. ते त्याच्या शोधात होते. ते पाहून सिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, "जर बेलपत्र नसेल तर तुळशीपत्राने पूजा उरका. भक्तिभावाने अर्पण केल्यास ते सर्व भगवंतापर्यंत पोहोचेल. सतत त्या लिंगाची आराधना केल्यास पुढे त्यात पांडुरंगही असेल !" अशी समग्रता, विशालता, धर्मविषयक जाणीव असलेले सिद्धेश्वर स्वामीजी हे दुर्मिळ संत होते. अशाप्रकारची जाणीव असलेल्या सिद्धेश्वर स्वामीजींनी सहजपणे समाजाशी जवळीक साधली. दिवसातील बराचवेळ चेकवर स्वाक्षऱ्या करण्यात घालविणारे स्वामीजी सहजपणे मठाधिपती म्हणून मिरवू शकतील. मात्र, ते समाजाशी जवळीक साधू शकणार नाहीत. 

 जीवनाची तुलना 'बयलु'शी करणाऱ्या अनुभावींच्या वचनांना पाठ्यपुस्तकांपुरते सीमित करणारे हे जग, काम असताना तो रुद्रासारखा, काम गेल्यावर दुसऱ्याच दिवशी तो उडणारा गरुड पाहा असे सांगितलेल्या सर्वज्ञांना, निसंगत्व - निर्मोहत्व - निर्मलत्व सांगितलेल्या शंकराचार्यांना जातिय नजरेतून पाहते. मात्र, आपल्या काळातच जगलेल्या सिद्धेश्वर स्वामीजींच्या जीवनाचे यथार्थ पालन केल्यास जगाच्या काही समस्या सुटतील. तसेच जगात शांती नांदेल. आता अशांचा जन्म कधी ! त्यामुळे तरी जगाला सिद्धेश्वर स्वामीजी यांची आठवण येतच राहावी.

- संतोष तम्मय्या, कार्यकारी संपादक, होस दिगंत

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे


Thursday 9 February 2023

संताच्या रूपात भूमीवर अवतरलेला भगवंत!

 


जाती - मताच्या सीमा ओलांडून मानवीय जीवनाची जाणीव मनामनात जागवलेल्या त्या महान गुरू, मनुष्य हा मनुष्य म्हणूनच राहणे हाच धर्म या विचाराचा प्रचार प्रसार केलेल्या एका महान  संताचे युगांत झाले आहे. ते क्षण असे होते की,  समुद्राच्या लाटा येऊन कोसळाव्यात तसे लाखो - लाखो लोक येत होते. ओसाड मरुभूमीसारखा भास होत होता. लाखो भक्तांचे आक्रंदन आकाशाला भिडत होते ! सर्वत्र महामौन पसरल्याचा क्षण. तेथे हात जोडून उभे असलेले, पुष्पवृष्टी करणारे, गुरुदेवा म्हणून अश्रू ढाळणारे लोक होते.  ज्याप्रमाणे १२ व्या शतकात बसवण्णांचा कालखंड होता त्याप्रमाणे आताच्या २१ व्या शतकातील आधुनिक बसवण्णाच्या कालखंडाचेही अंत झाल्यासारखा भास होत होता. तेव्हा ज्या बुद्ध, महावीराच्या कालखंडाचा अंत्य झाला, आज त्याच प्रकारच्या नवबुद्धाचे काळही संपले ! तेव्हा ज्याप्रकारे विवेकानंद - रामकृष्ण परमहंस यांचा काळ निघून गेला, आज त्याच प्रकारच्या आधुनिक विवेकानंदाचा काळ निघून गेला ! शतकातील संत, एका युगपुषाच्या युगाचा अंत झाला आहे.

'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' कोणत्याही फलाफलाची अपेक्षा न करता तुझे कर्म तू कर या गीतातत्वाचे अक्षरशः आपल्या जीवनात अंगीकार करून ते कृतीरूपात आणलेले एकमेव संन्यासी श्री सिद्धेश्वर स्वामीजी होत. त्यामुळे ते एक खरे संत होते. 

  सामान्यतः स्वामीजी म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एक मठ, भगवे वस्त्र, रुद्राक्ष माळा, पाद्यपूजा, पुष्पार्चण आराधना या गोष्टी येतात.  मात्र, अखंड संन्यासत्वाचे पालन करुनही सिद्धेश्वर स्वामीजींनी कधीही भगवी वस्त्रे परिधान केली नाहीत ! पीठावर तर चढलेलेच नाहीत ! सत्ता, सन्मानाची आकांक्षा बाळगली नाही ! सुख साधनांची लालसा मनाला शिवली नाही ! चुकूनही जातीच्या राजकारणामागे लागले नाहीत ! सरकारी पैशांतून मठ उभारले नाहीत. जैसे थे (आहे तसे) राहणे हेच खरे जीवन हे त्यांनी सांगितले. साधेपणातच सर्व काही सुंदर या मोत्यांसारख्या बोलण्यातून, भावभरित लेखनाने लोकांना प्रकाशाची वाट दाखवली. 'श्रीं' नी केवळ पैसेच नको म्हटले नाही तर खिसाही नको म्हटले. हे त्यांच्या जीवनाच्या पारदर्शकतेचे साक्ष होय. 

महिनाभर चालणाऱ्या श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रवचनांना मीही हजेरी लावून ऐकलो आहे. त्यांच्या प्रवचनाचा प्रभाव असा असायचा की, २००७ मध्ये आमच्या मुधोळ नगरातील महाविद्यालयाच्या मैदानावर स्वामीजींचे महिनाभर प्रवचन चालले होते. दररोज सकाळी बरोबर सहा वाजता प्रवचनाला सुरुवात व्हायची. तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोक पहाटे चार वाजता उठून आपली नित्यकर्मे आटोपून बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि मोटारसायकलवर प्रवचन ऐकायला यायचे. 'श्रीं'चा प्रत्येक शब्द लोकांना खिळवून ठेवायचा. त्यांचे प्रवचन सुरु असताना सुई पडला तरी आवाज यावा इतकी निशब्द शांतता असायची. या निशब्द शांततेत स्वामीजींच्या तोंडातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टी थेट लोकांच्या हृदयाला भिडायच्या. स्वामीजींच्या प्रवचनातील सोपी भाषा, स्पष्ट निरुपण, मुख्य विचार ऐकणाऱ्यांच्या मनात रुजायचे. शिवाय लोकांना आपल्या जीवनात त्यांचा अंगीकार करतील यासाठी प्रेरणा द्यायचे. त्यांच्या बोलण्यात अशी अद्भूत शक्ती होती. त्यांच्या प्रवचनाचा एक सार सतत माझ्या कानात गुंजारव करते. "कोणीही मागे वाईट केल्यास ते विसरून जा, तू कोणाचेही चांगले केलेले असल्यास तेही विसरून जा." या दोन्हीही गोष्टी विसरल्यास तुझे जीवन सुखी होईल. ते आठवणीत ठेवल्यास तुझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत कोलाहल ! स्वामीजींनी सांगितलेली ही गोष्ट किती अर्थगर्भित आहे. 

 एकदा एका पत्रकाराने स्वामीजींना भेटून त्यांची मुलाखत घ्यावयाची असल्याचे सांगितले. त्यावर स्वामीजी म्हणाले, 'इथे मी १५ दिवस प्रवचन सांगणार आहे. आपण ते १५ दिवस प्रवचन ऐका. १६ व्या दिवशी आपल्याला काही विचारावे असे वाटल्यास तेव्हा मी मुलाखत देईन.' स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे ते पत्रकार १५ दिवस प्रवचन ऐकतात. १६ व्या दिवशी ते पत्रकार स्वामीजींना नमस्कार करून सांगतात, 'स्वामीजी, माझ्याकडे कोणताही प्रश्न नाही !' माध्यमकर्मीही स्वामीजींच्या प्रवचनाने प्रभावित झाले होते. 

  त्यांचे कोट्यवधी भक्तगण आहेत. तरी त्यांनी आपण सर्वश्रेष्ठ म्हणवून घेतले नाही. सनातन धर्माविषयी अपार ज्ञान असलेले स्वामीजी शरणांच्या वचन साहित्याचे मोठे जाणकार होते. त्यामुळे श्री सिद्धेश्वर स्वामीजींचे प्रवचन म्हटल्यास तेथे लाखो लोक जमायचे. स्वामीजींच्या तोंडून बाहेर पडणारा एकेक शब्द मानवी जीवनाला नवीन मार्ग दाखविणारा असायचा. आध्यात्मिक जगताचा चक्रवर्ती म्हणून मिरविण्याच्या पुष्कळ संधी होत्या. मात्र, त्यांनी कधीही त्याविषयी आशा बाळगली नाही. परंतु कोट्यवधी भक्तांच्या मनात आध्यात्मिक चक्रवर्ती म्हणून राज्य केले. श्री सिद्धेश्वर स्वामीजी व शुभ्र वस्त्रांचे जन्मजन्मांतराचे अनुबंध असावे असे वाटते. अतिशय साधे कपडे परिधान करणारे स्वामीजी शेवटपर्यंत तसेच जगले. या माध्यमातून स्वामीजींनी भक्तांनाही धर्मजीवनाची दिशा दाखवून दिली. पुरस्कारांसह विविध गौरव, पैसे, भौतिक संपत्ती, ऐषाराम यापासून दूर राहून सिद्धेश्वर स्वामीजींनी खरे संन्यासत्व जीवनाचे भाग बनविले. केवळ आध्यात्मिक मार्गदर्शन नव्हे तर ते साध्या जीवनाचा सोपा मार्ग आहे हे सर्वसामान्यांना समजावून सांगितले. त्याशिवाय त्यांच्यात आध्यात्मासोबत सतत ज्ञानाचा दिवा तेवत राहील, याची दक्षता घेतली. परंतु अलिकडे बहुतांश स्वामीजी हे राजकीय नेत्यांचे समर्थक बनल्याचे आपण सारे जाणतो. कोणीतरी एक चिल्लर नेता सत्ता गमावल्यावर त्याला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी दबाव टाकणे, आणखी कोणाला मंत्रीपद द्या म्हणून भरसभेत गर्जत मुख्यमंत्र्यांनाच दम भरणे,  अशा सर्व घटना आपण पाहिल्या आहेत. आजकाल अशाप्रकारच्या दांभिक स्वार्थी संन्याशांचा  भरणा आहे. अशाकाळात अशा कोणत्याही भौतिक विलासाकडे सिद्धेश्वर स्वामीजींनी आपले चित्तही भरकटू दिले नाही. त्यांनी  करंगळीनेही इशारा केला असता तरी त्यांना हवे ते आणून त्यांच्या पायी ओतणारा श्रीमंत भक्तवर्ग होता. इच्छा व्यक्त केल्यास मठात कोट्यवधी रुपये, सरकारी निधी येऊन पडला असता. मात्र, पैशांचा मोह मनालाच कलुषित करेल या विचाराने येणाऱ्या पैशाला डाव्या हातानेही शिवले नाही. 

"मीही नाही, तूही नाही, नाही हेही स्वतः नाही, गुहेश्वरही स्वतः बयलु या अद्भूत पारमार्थिक सत्याचे आपल्या जीवनभर पालन केले. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेल्या स्वार्थरहित कर्मयोगाचे अनुसरण,  खऱ्या संन्यासत्वाचे आचरण केलेल्या श्री सिद्धेश्वर स्वामीजींचे जीवन आम्हा साऱ्यांसाठी आदर्शवत आहे. अलिकडे  पुरस्कार, मानद डॉक्टरेट मिळविणाऱ्यांत अर्ज करुन व वशिल्याने ते मिळवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींकडे आपणहून चालून आलेल्या पुरस्कार, सन्मानांची पट्टी छोटी नाही ! भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. तर अनेक विद्यापीठे मानद डॉक्टरेट देण्यासाठी पुढे आली होती. तेव्हाही स्वामीजींनी ते अतिशय विनम्रपणे ते नाकारले.

अलिकडील काळात सर्व मठही अत्यंत श्रीमंत बनले आहेत. त्यांना सरकारकडून पुष्कळ अनुदान मिळत आहे.  त्यामुळे तेथील स्वामीजीही मठांची संपत्ती वाढवत आहेत. मुख्यतः राजकीय नेत्यांच्या भरपूर पैशांचे व्यवहारही मठांतून चालत आहेत. त्यामुळे त्या मठांची श्रीमंती वाढली असून त्यांची राजकीय नेत्यांचे अड्डे अशी ओळख बनली आहे. ही अत्यंत शोचनीय बाब आहे. मात्र,  सिद्धेश्वर स्वामीजींचे ज्ञानयोगाश्रम या सर्व मठांहून भिन्न आहे. एकदा राज्य सरकारने राज्यातील सर्व मठांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्वामीजींच्या ज्ञानयोगाश्रमालाही कोट्यवधी रुपये देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन अनुदान स्वीकारण्याची विनंती केली. तेव्हा स्वामीजींनी अत्यंत विनयशीलतेने ते नाकारले. शिवाय 'कोणतेही मठ असो अथवा आश्रम ते केवळ तेथील भक्तांच्या दानातूनच चालावे. त्याव्यतिरिक्त सरकारच्या अनुदानावर नव्हे,' असे सांगून स्वामीजींनी अनुदान परत पाठवले होते. 

५ सप्टेंबर १९४० रोजी विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील बिज्जरगी येथे स्वामीजींचा जन्म झाला. मोठा मुलगा सिद्धगोंडा बिरादार हा पुढे एके दिवशी या देशातील महान संत बनेल, देशविदेशातील लोक उत्सुकतेने त्यांचे विचार ऐकायला येतील, याचा त्या दाम्पत्याने विचारही केला नव्हता ! चौथ्या इयत्तेत शिकताना हा लहान बालक विजयपूरच्या यात्रेला गेला होता. तेथे ज्ञानयोगाश्रमाच्या मल्लिकार्जुन शिवयोगी महास्वामींचे प्रवचन ऐकला. त्यांच्या प्रवचनाच्या प्रभावाने पुढे त्या आश्रमात आला. त्या लहान मुलाचा लहानपणापासूनच आध्यात्माकडे ओढा होता. तेव्हाच बालकाने आपला गुरू शोधला होता. त्या गुरुनेही आपल्या जवळ आलेल्या परमाद्भूत शिष्याला ओळखण्यात विलंब केला नाही. ते कोणत्या जन्मातील गुरू - शिष्य संबंध होते माहीत नाही ! अद्भूत गुरू, परमाद्भूत शिष्यवृत्ती असलेले हे पुन्हा एकत्र आले. सिद्धगोंडप्पा सिद्धेश्वर झाले. आपल्या शिष्याला शिक्षण देतानाच त्याच्या अंतरंगातील आध्यात्मिक ज्योतीचा प्रकाश बाहेर आणण्याच्या प्रयत्नात मल्लिकार्जुन शिवयोगी यशस्वी होतात. कोठेही प्रवचनासाठी गेले तरी मल्लिकार्जुन शिवयोगी सिद्धेश्वर स्वामीजींना सोबत न्यायचे. तेथील लोक आणि त्यांचे जीवन समजून घेतानाच सिद्धेश्वरांच्या आतील ज्ञानयोगही जागृत झाले. नंतर कर्नाटक विश्वविद्यालयातून पदवी मिळवून कोल्हापूरच्या विद्यापीठातून तत्त्वशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. कन्नड, संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवले. 

    मल्लिकार्जुन शिवयोगी यांंच्यानंतर ज्ञानयोगाश्रमाची धुरा सांभाळत सिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्या साधेपणाने अपार जनमान्यता मिळवली. कर्नाटक आणि महाराष्ट्रातही त्यांच्या अनुयायांची संख्या वाढली. आपल्या जीवनातील सुमारे ५० वर्षे प्रवचनाच्या माध्यमातून भक्तांच्या मनातील किल्मिष दूर करून तेथे सज्जनतेचा प्रकाश भरला. लोखंडाचे चणे म्हटले जाणाऱ्या उपनिषदांचे सार, जीवनाचे गमक, वचन, आध्यात्म आदी कोणालाही समजेल अशाप्रकारे अत्यंत सोपे करून सांगितले. 

गुरू मल्लिकार्जुन शिवयोगी यांचे प्रवचन लिहून ठेवलेल्या सिद्धेश्वर स्वामीजींनी 'सिद्धांत शिखामणी' या नावाने त्यांचा संग्रह प्रकाशित केला. तेव्हा स्वामीजींचे वय केवळ १९ वर्षे होते. त्यानंतर स्वामीजींच्या अनेक कृती प्रकाशित झाल्या. उपनिषद, भगवद्गीता यावर आणि शरण साहित्याविषयी पुष्कळ पुस्तके लिहिली. अल्लम प्रभूंच्या वचनांवर आधारित 'वचन निर्वचन', 'भगवत चिंतन' ही पुस्तके लिहिली. इंग्रजीतही  'God world soul' 'Patanjali Yoga Sutra' 'Narada Bhakti Sutra' 'Shiva Sutra' आदी ग्रंथ लिहिले. 

शेवटी, त्यांनाही वयोमानानुसार आरोग्याच्या समस्येने ग्रासले. आपल्या आश्रमात उपचार घेणाऱ्या स्वामीजींनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास नकार दिला. दर्जेदार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी आलेल्या राजकीय नेत्यांनाही हात जोडून निसर्गाच्या विरोधात जाऊन जगण्याची मला इच्छा नाही, असे स्पष्टपणे सांगितले. समाजातील अज्ञानाचा अंधकार पळवून लावण्यासाठी त्या भगवंतानेच त्यांना पाठवले होते.  वैकुंठ एकादशीच्या दिवशी सायंकाळी स्वर्गाचे दार उघडण्याच्या वेळी भगवंताने त्या प्रकाशाच्या पुंज, त्यांच्या आत्म्याला बोलावून घेतले.

सामान्यपणे आपण इच्छामरण हे पुराणात वाचलो, ऐकलो आहे. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्या इच्छेनुसार देहाचा त्याग केला. देह मातीत ठेवू नका, तर त्याला अग्निसमर्पित करा, चिताभस्म नदीत विसर्जित करा, कोणतेही श्राद्ध विधी करू नका, स्मारक उभारू नका, मी या भूमीवर जसा आलो तसाच जायला हवा, माझे म्हणून कोणतीही गोष्ट राहू नये. कोणत्याही मनुष्याला भौतिक स्मारके ही जुवं ठेवणे शक्य नाही, हे स्वामीजींनी पूर्वीच अंतिम पत्रात लिहून ठेवले होते. 

संपूर्ण सरकारी इतमामात 'कर्मयोगी'ला सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. 'श्रीं'च्या पार्थिव देहाच्या अंतिम यात्रेवेळी संपूर्ण राज्यात भक्तीचा उत्सव सुरु झाला होता. उभ्या जनसमुदायामुळे संपूर्ण रस्ते झाकोळून गेले होते. झाडे, घरांच्या गच्चीवरही जनहमूह उभा होता. मार्ग दाखविलेल्या गुरुला हात जोडून उभ्या लोकांसह ती मिरवणूक पाहून त्या सूर्यालाही पाझर फुटला होता ! उजेड जाऊन तारे दिसण्याच्या वेळी, अतिरिक्त संस्कारांविना, 'श्रीं'च्या  इच्छेनुसार त्यांच्या चितेला अग्निस्पर्श करण्यात आला. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन न म्हणता जाती - पंथाच्या सीमा ओलांडून सुमारे २२ लाखांहून अधिक सर्वधर्मीय भक्त 'श्रीं'च्या अंतिम दर्शनासाठी जमले होते..

 आपल्या जीवनात प्रतिदिनी आणि शेवटच्या क्षणीही चांगले मार्गदर्शन करून, चांगलेच चिंतून, चांगूलपणच ज्यांचा श्वास होता त्या सिद्धेश्वर स्वामीजींनी काळाच्या हाकेला ओ देऊन, आपणच सांगितल्याप्रमाणे मृत्युला सामोरे जात मरण अनुभवले. तसेच नेहमीप्रमाणे मंदस्मित प्रसन्नतेने त्यांचा आत्मा 'परमात्मा' त लीन झाला. भविष्यातील मार्ग दाखवलेला गुरू अग्नीच्या प्रकाशात विरघळून गेला. "जीवन संपते, दिवा विझल्याप्रमाणे, समुद्राच्या लाटा विरल्याप्रमाणे, मेघ विरघळल्याप्रमाणे, उरणार केवळ बयलु, महामौन, शून्य सत्त्व !" गुरुने जागवलेल्या जाणीवेने मात्र त्या गुरुला आपल्यासोबत साध्य आहे, हा शेवटचा संदेश देऊन स्वामीजी भौतिकदृष्ट्या आपल्यापासून दूर गेले आहेत. मात्र, त्यांचे आदर्श, साधेपणा, घालून दिलेल्या निस्वार्थ मार्गावर चालणे शक्य झाले तरच तो गुरू सतत आपल्या जाणिवेत शाश्वत राहील. परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजींनी लावलेला साधेपणाचा दीप शाश्वतपणे आम्हा सर्वांच्या हृदयमंदिरात प्रकाशमान होवो.

डॉ. जगदीश माने, धारवाड

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 

  


Sunday 5 February 2023

अल्लमप्रभूंचे मार्दवरूप श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी

वीणा बन्नंजे

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. जवळपास सन २००० च्या आसपासची. सत्यकाम यांच्या देहत्यागानंतर माझे जमखंडीकडे जाणे  येणे सुरू झाले होते. तेव्हा माझे हितचिंतक अशोक तुंगळ यांनी एका महान व्यक्तीची भेट घालून देतो, असे सांगून मला विजयपूरला नेले. तेव्हा ते कोण, काय याची मला काहीही माहिती नव्हती. तेच पूज्य श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी.

ते महनीय शुभ्र श्‍वेत वस्त्रधारी. ते माझ्याशी खूप प्रेमाने बोलले. अशोक दादांनी माझा परिचय करुन देत सांगितले, हे सुम्मने (उगीच) नावाच्या आश्रमात राहतात. त्यावर स्वामीजींनी विचारले, काय करता. मी म्हणाले, स्वामीजी काहीही करत नाही. ओह! सुम्मनेमध्ये सुम्मने (उगीच) राहता काय ?  असे म्हणत ते हसले. नाही, स्वामीजी उगीच माझ्यातील गोंधळ पाहते, असे मी सांगितले. ओह ! म्हणत स्वामीजींनी भुवया उंचावताच त्यांच्या चेहर्‍यावर कौतुक झळकले. पुन्हा प्रश्‍न विचारले, तेथील बागबगिचा (शेती)  पाहता का. मी उत्तरले, नाही स्वामीजी, बाग आमचे क्षेमकुशल पाहते. पुन्हा मंदहास्याने त्यांच्या चेहर्‍यावर कौतुक झळकले. अध्यापन करत होता म्हणे का सोडलात, असा त्यांचा प्रश्‍न. त्यावर मी उत्तरले, "मी अध्यापन करत नव्हते, अध्यापन करतेय हे समजले, ते सोडून दिले. ओह! स्वामीजी म्हणाले. माझे कोरडेशुष्क, उलटेसुलटे उत्तर. मात्र, स्वामीजी शांतपणे ऐकत होते, त्यांच्या चेहर्‍यावर हास्य कायम होते.  

त्यांचा निरोप घेताना एकदा आमच्या बागेत येण्याचे त्यांना निरोप दिले. वाह! अवश्य येऊ, असे स्वामीजी म्हणाले. त्यानंतर २००२ ची आठवण. सत्यकाम यांच्या आराधना कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेले होते. तेव्हा उत्तर कर्नाटकात त्यांचे प्रवचन सुरू होते. ते येणे जमणार नाही, असे म्हणू शकले असते. मात्र, ते आमच्या शेतात आले. त्यांना शरण आणि तंत्र हा विषर देऊन त्यावर बोलारला सांगितले होते. त्यांनी होकार दिला होता.  वेळेच्या बाबतीत ते खूपच शिस्तप्रिय असल्याचे तेव्हा मला माहीत होते. ठीक १०.३० ला कार्यक्रमाची सुरुवात होईल, १२ ते १ आपले प्रवचन राहील, असे त्यांना म्हटले होते. ते १०.२९ ला कार्यक्रमस्थळी आले. आम्हीही १०.३० ला कार्यक्रमाची सुरुवात केली. ते येणार असल्याने कार्यक्रमाला लोकांनी गर्दी केली होती. दरवर्षी सत्यकाम यांच्या  समाधीला पुष्पार्पणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्याची आमची परंपरा होती. त्यानुसार स्वामीजी समाधीजवळ आले. मात्र, पुष्पार्पण केले नाही. सर्वांसोबत हात जोडून समाधीसमोर उभे राहिले अन् परतले. म्हणजे त्यात अहंकार नव्हता. तसेच व्यासपीठावर सत्यकाम यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे आमचे नित्यक्रम होते. ते सर्व अतिथींसोबत दीपप्रज्वलन करण्यासाठी उभे असल्यासारखे उभे होते. एकाचे संपल्यावर उरलेल्यांना दीपप्रज्वलन करायला सूचवत होते. ते केव्हाही दीपप्रज्वलन, आरती केले नाहीत. छोट्या- छोट्या कार्यातही कडेला थांबलेल्या अल्लमाचे रूप !

त्यांच्या आधी इतर अतिथींची भाषणे होती. त्यांची भाषणे संपून स्वामीजींची वेळ आली तेव्हा १२.१० वाजले होते. स्वामीजी शरण आणि तंत्र हा विषय मांडून बरोबर १ वाजता थांबले. आम्ही त्यांना एक तासाचा वेळ दिला होता. आम्ही १० मिनिटे गमावल्याचे आम्हाला कळले. मात्र, वेळ चुकल्याने काळाने दिलेल्या इशार्‍यासारखे त्यांचे जीवन. दारात बसवण्णाचे वाट पाहताना त्याने न येता मुलाला पाठविल्यावर निघालेल्या कालदूत अल्लमासारखे स्वामीजीही न बोलता मौनपणे निघाले. त्यांनी शरण आणि तंत्र याविषयी केलेले विवेचन खूप सुलभ होते. लहान मुलालाही समजेल अशाप्रकारे क्रमाने अलगद एखाद्या फुलाच्या पाकळ्या काढून दाखविल्याप्रमाणे होते.

एक राजा होता. खूप चांगली फळझाडे वाढविली होती. तेथे खूप लोक येत होते. तेथे येणार्‍यांना तो फळे कापून द्यायचा. सर्वांनी त्या फळांची चव चाखून त्यांची गोडी अनुभवली. एकजण तेथे आला. राजा त्यालाही फळे द्यायला गेला. मात्र, तो म्हणाला, राजा, मला फळ नको, त्याच्या  बिया दे. राजाने त्याला बिया दिल्या. त्याने आपल्या शेतात बिया लावल्या. त्याची झाडे झाली, फळे लागली. ती पिकली. एकदा विहाराला बाहेर पडलेला राजा त्या बागेत पोहोचला. तेथे तो होता. त्याने राजाला फळे दिली. हे तंत्र, तो शरण असे स्वामीजींनी सांगितले. कसले अपूर्व उदाहरण. तंत्र म्हणजे टेक्निक, तंत्र म्हणजे काळी जादू आदी विद्या, तंत्र म्हणजे परमार्थात विस्तार होय, यासह सर्व अर्थांचा उलगडा स्वामीजींनी केला. शरणांची भूक, समर्पणाचेही प्रतिबिंब त्यात होते. मुक्तायक्काला मृत्यूचे गूढ सहजपणे उकलून सांगणार्‍या अल्लमसारखी ती रीत होती.

त्यानंतर तलावाच्या बांधकामात गुंतले होते. त्याचे उद्घाटन स्वामीजींच्या हस्ते व्हावे, ही माझी इच्छा होती. केव्हाही कलहळ्ळीला बोलावल्यावर कधीही नाही म्हटले नाहीत. यावेळेसही आनंदाने आले.  त्यांच्यात विशेष प्रेम होते. प्रत्येकाला ते आमच्यावर प्रेम करतात, असे वाटायचे. ते कसे माहीत नाही. पण मी त्यांचे प्रेम अनुभवले, हे माझे भाग्य आहे. त्यांनी तलावाचे पाणी तलावातच सांडून त्याचे उद्घाटन केले. त्या दिवशी पूज्य श्री सुत्तुरु स्वामीजी व माझे वडील बन्नंजे गोविंदाचार्यही उपस्थित होते. तलाव खोदल्यानंतर सिद्धराम अहंकारात असताना तेथे आलेले अल्लम त्यांना म्हणाले, आता दगड घडविण्याचे (वडाराचे) काम थांबव, कल्याणला चल. त्या अहंकाराविषरी अल्लमाने नाराजी व्यक्त करीत दिलेल्या इशार्‍याविषयी मी प्रास्ताविकात बोलले. तसेच मी रडत प्रार्थना केली,  ज्यांना भक्तीपूर्णरीत्या पाहते त्या श्री सिद्धेश्‍वर स्वामीजींनी मला हे दगड घडविण्याचे काम संपवून त्या कल्याणकडे चालण्याचे आशीर्वाद द्यावे. या समाजसेवेत वेळ घालविणे नकोसे झाले आहे. मला या समयसिद्धीच्या कार्यातून मुक्त करा.  त्या दिवशी स्वामीजींनी खूप वेळ आमच्या  कामाचे कौतुक केले. म्हणाले, ते सर्वकाही करुनही काही न केल्यासारखे शांत बसलेले आहेत. त्यामुळे ते आनंदी आहेत. त्यामुळेच त्यांनी आश्रमाला सुम्मने (उगीच) म्हणून नाव ठेवले आहे. ते सर्वांनी ठेवण्यासारखे नाव नाही. आपण ते नाव ठेवून पाहा, त्याचे परिणाम अनुभवा, तेव्हा आपणांस समजेल. त्याच्यात सत्यकाम  आहेत. काम आहे, मात्र ते सत्याचे काम आहे. केवळ अशाप्रकारे जगल्यास सत्यकाम म्हणावे, नाहीतर ते असत्याचे काम. येथील झाडे, जमीन पाहा, त्यात सत्याचे काम आहे, त्यामुळे हे असे आहे...ते निघताना मी खूपवेळ त्यांच्या पायावर पडून अश्रूंचा अभिषेक घालत होते. आता नको, मला या कर्मबंधनातून मुक्त करा, ही माझी आंतरिक प्रार्थना. खूप वेळानंतर मी उठताना ते मात्र घनमौन. शांतपणे डोळे मिटलेले होते. मी त्यांच्याकडे आर्तपणे पाहत होते. ते स्मितहास्य करत तेवढ्याच करुणामयीप्रमाणे हात जोडले. तितक्यात जसे काही न समजता सिद्धरामाने अल्लमाचे अनुसरण केले तसा मला अनुभव. 

२००६ च्या मध्यात सतत कलहळ्ळी सोडण्याची भावना तीव्र होत होती. २००७ मध्ये ती भावना आणखी तीव्र झाली. तेथे सुरू झालेल्या कामासह सर्व काही सोडून बाहेर पडले. तेव्हाही स्वामीजी आसपास कोठेही असल्यास भेटायला जात होते. एकदा सुत्तुरु मठात वास्तव्यास होते. सुत्तुरु श्रींच्या आमंत्रणानुसार आनंदाने जाऊन त्यांच्या दर्शन घेतले. त्यांचे वायू विहारच वैशिष्ट्यपूर्ण होते. ते डोंगर चढायला लागल्यास असे चालायचे की त्यांच्यासोबत चालणे कष्टाचे व्हायचे. ते सूर्योदय, सूर्यास्तावेळी डोंगरावर बसले असताना त्यांच्यसोबत चालणारे सत्संग अप्रुपच. ते बोलतील म्हणून आपण जायचे. ते तेथील प्रत्येकाचा परिचय करून घेऊन त्यांचे विशेष अनुभव, त्यांच्या क्षेत्रातील वेगळी माहिती, त्यांच्यातील ज्ञान याविषयीच जाणून घ्यायचे. मात्र, ते बोलायचे नाहीत. सुत्तुरुच्या वॉकिंगवेळी त्यांच्या सत्संगाच्या ओढीने मीही अनेकांसोबत डोंगर चढून गेले. ते सर्वांशी माझा परिचय करून दिला. तसेच मला बोलण्याची सूचना करत म्हणाले, 'हे खूप अनुभवी आहेत, त्यांचे बोलणे ऐका.' नाही स्वामीजी, मी आपले ऐकायला आलेय, मी बोलणार नाही, असे मी म्हणाले. तरीही ते बोला म्हणाले. मीही माझा हट्ट सोडले नाही.  स्वामीजींच्या समोरच तेथील सर्वजण स्वामीजींचा आदेश डावलू नका, बोला म्हणून आग्रह करू लागले.  तेवढ्याच सलगीने मी का बोलत नाही, हे स्वामीजी जाणतात, होय ना स्वामीजी असे मी म्हणाले. ते मंदहास्य करत होते. त्या हास्यात मला कौतुकाचे आनंद दिसत होते. माझा सात्विक हट्ट त्यांना आवडायचा. वेळोवेळी त्याचा अनुभव मी घेतले आहे. 

आणखी एकदा स्वामीजी सुत्तुरुमध्ये असताना मी एकटीच त्यांना शोधत गेले.  दरवेळी कोणा ना कोणाला घेऊन जायचे. त्यांचे दर्शन घेऊन परतण्याचा विचार होता. स्वामीजी गवताच्या शेतात एकटेच बसले होते. नमस्कार केल्यानंतर ते विचारले, "काय करत आहात?" तेव्हा मी माझ्या वडिलांच्या आत्मचरित्राचे ध्वनिमुद्रण करत होते. वडील त्यासाठी दररोज दोन तास वेळ द्यायचे. सर्व ध्वनिमुद्रण लिहून पुढे एक पुस्तक लिहायचा उद्देश असल्याचे सांगितले. स्वामीजी आस्थेने म्हणाले, "खूप चांगले काम करत आहात. मोठी व्यक्ती किती कष्ट घेतलाय, कसा मोठा बनलाय, त्यामागे काय परिश्रम आहे, हे सर्व कळायला हवे. लोकांना मोठी व्यक्ती दसते, मात्र, त्याचे हे कष्ट दिसत नाहीत. आपण आचार्यांची पार्श्वभूमी सांगायला हवी." त्याक्षणी जे सूचले ते मी विचारलेच, स्वामीजी आपण का आपले आत्मचरित्र लिहू नये ? आज आपण ज्या उंचीवर आम्हाला दिसता त्यामागे काय आहे, हे आपणही लिहा ना ? त्यांचे पटकन बाणासारखे उत्तर, "घटनाच नाहीत, काय आत्मचरित्र लिहायचे ?" हे कसले अद्भूत उत्तर. त्यानंतर मी काहीही बोललेच नाही. घट असेल तरच घटना ना? छे ! इथे एकही घटना नसल्याचे स्वामीजींनी त्यादिवशी समजावले. त्या घटकेला माझे शरीर रोमांचित झाले, अश्रूधारा वाहत होत्या. मी का रडतेय, हे त्यांना समजत होते. तरीही मौनपणे त्याच हसन्मुख चेहऱ्याने आनंदाने प्रेमपूर्वक पाहत होते. बसवण्णाला न स्वीकारता बसवण्णावर अगाध प्रेम केलेल्या अल्लमाचा भाव. 

आमच्या तलावाच्या दशकपूर्ती कार्यक्रमास पुन्हा स्वामीजी आले होते. कधीही ते निसर्ग, रोपे, झाडे,  याविषयी कोणीही ऐकायला हवे. ते एक विशेष जगत. ते रोपाचा नाजुक फुटवा व्हायचे. फुलाचा परिमळच ते. तेच फळाचे माधुर्य. निसर्गाच्या वेदनाच त्यांच्या वेदना. भूमी, जल, रोप, झाडांना दिल्या जाणाऱ्या वेदना त्यांच्यावरच केला जाणारा हिंसाचार इतके तादात्म्य त्यांच्या बोलण्यात असायचे. त्या दिवशीही ते निसर्गमय होऊनच बोलले. प्रवचन संपल्यावर ते निघाले. त्या दिवशी नाट्य निर्मिती क्षेत्रातील प्रसन्न नावाचे आणखी एख आतिथी होते. सिद्धेश्वर स्वामीजी गेल्यावर ते माझ्याजवळ येऊन म्हणाले, "त्या सिद्धेश्वर स्वामीजींजवळ काही दिवस राहू देतात का?" याविषयी मी जास्त सांगणार नाही. मात्र, विरोधकांवरही सिद्धेश्वर स्वामीजींचा कशाप्रकारे प्रभाव पडायचा, हे समजले तर पुरेसे आहे. 

खूप दिवसांपासून माझ्यात स्वामीजीच माझे अदृश्य गुरु ही भावना निर्माण झाली होती. हे मी माझ्या अनेक व्याख्यानांतूनही सांगितले आहे. तसे पाहिल्यास  नित्य स्मरण करत नव्हते.तरीही 

कोठूनतरी दूरवरून ते शुभाशीर्वाद देताहेत अशाप्रकारे भक्ती होती. एकदा माझ्या वाढदिवशी पहाटे एक स्वप्न पडले. "आज माझा वाढदिवस आहे, आपले आशीर्वाद राहूद्या" म्हणून त्यांच्या पाया पडले. त्यांनी तुम्ही निवडलेला मार्ग चांगला आहे, मी तुमच्यासोबत आहे" म्हणून आशीर्वाद दिला. त्या दिवशी मी आश्चर्यचकित झाले. कारण मी स्वतः कधीही त्यांच्याविषयी असा विचार केले नव्हते. त्याचा इतका मोठा परिणाम झाला होता की मी खूप आनंदी होते. मात्र, मी मनात ठेवू शकत नसल्याने एकदा त्यांच्याकडे जाऊन मला असे झाल्याचे सांगितले. ते फक्त हसले, आत प्रेम भरुन ओसंडून वाहत होता. 

दोन वर्षांपूर्वी एकदा मी मित्रांसह कलहळ्ळीला आले तेव्हा पूर्ण सूर्यग्रहण होते. त्यादिवशी शेतात आलेल्या २० जणांना घेऊन स्वामीजींकडे गेले होते. सर्वांनी उपवास धरला होता. स्वामीजींना नमस्कार करून खाली बसल्यावर विचारले, "स्वामीजी, ग्रहणादिवशी जेवण करू नये म्हणतात, ते कशामुळे ?" मात्र,  आमच्याकडूनच उत्तर काढून घेण्याचा त्यांचा नित्यक्रम. "ठीकंय, आपण सारे आलात ना, आपण जेवण केलात का?" असे विचारले. माझ्यासोबत आलेले सर्वजण 'नाही' म्हणाले. एकेकाला 'का जेवला नाहीत ?' म्हणून विचारले. "देवस्थानचे दरवाजेच बंद असतात, देवालाच नैवेद्य नाही, आम्ही कसे जेवायचे?" असे एकाचे उत्तर. "सर्वजण जेऊ नये म्हणून सांगतात, त्यामुळे जेवलो नाही" असे दुसऱ्या एकाचे उत्तर. "आम्हाला प्रकाश देणाऱ्या त्या देवालाच प्रकाश मिळत नाही. त्याला काही झाले असताना आम्ही आरामात बसून कसे जेवायचे?" असे एका स्त्रीचे प्रश्न. स्वामीजी म्हणाले, यांचे बोलणे चांगले आहे पाहा. तुमच्या कुटुंबाला भोजन देणारा बाप नेहमीच्या वेळी घरी परतला नाही, तो दिसलाच नाही तेव्हा तो येईपर्यंत आपण त्याची भोजनासाठी वाट पाहता; तोपर्यंत आपण भोजन करत नाही, खरंय ना. तसे असेल तर चांगले असे या माईला वाटलेय पाहा. "आम्हाला प्रकाश देणाऱ्याला काही झाले आहे, त्याला आराम मिळो, त्यानंतर भोजन करू. कोणाचीही जोडी अशी असल्यास खूप चांगले. इथे असलेले झाडे, वेली, सूर्य, चंद्र हे सर्व आपले कुटुंबीय आहेत, ही भावना मोठी आहे." असे स्वामीजी म्हणाले.गहन विषय सोपे करून सांगण्याची ही त्यांची पद्धत. आम्हाला नकळत आम्हालाच अखंडभावात बुडवून टाकण्याची ताकद होती. ही मनापुढील मोहच माया जाणा (मनद मुंदण आशेये माय काणा ) असे म्हटलेल्या अल्लमाची रीत होय. 

एकदा सुत्तुरुमध्ये माझे भाषण होते. त्यानंतर स्वामीजींचे प्रवचन होते. मी प्रेक्षकांत पहिल्या रांगेत होते. स्वामीजींच्या समोरील टेबलवर एक गुलाबाचे फूल होते. ते बोलायला लागले, "हे गुलाबाचे फूल, याचे रंग लाल आहे. गुलाबी रंगात खूप रंग आहेत. याच्या रोपाला खूप काटे आहेत. त्यामुळे अशी माती असल्यास अशाप्रकारची फुले वाढतात. त्यासाठी असे खत हवे, त्याची फांदी इतकी कापायला हवी, ते इतक्या खोल खड्ड्यात लावायला हवे, इतके ऊन हवे, इतके पाणी द्यायला हवे. हे सर्व एकानेच जाणलंय, त्याने गुलाबाचे फूल पाहिले नाही, झाडाला स्पर्श केला नाही, फुलाचा सुवास घेतला नाही. मात्र, त्याला गुलाबाविषयी सगळं समजलंय तो ज्ञानी." 

आणखी एकजण आहे. त्याने शेतात गुलाबाचे रोप लावले आहे. पाणीही दिलाय, कळीही पाहिलाय, काटेही टोचून घेतलाय, त्याला फुलाचा रंग माहिती आहे, त्याचा वासही घेतलाय, माती, पाण्याविषयी जाणतो, त्याने गुलाबाविषयी वाचले नाही, मात्र अनुभवलाय, तो तो अनुभवी. 

आणखी एकाने कधीही गुलाबाचे फूलच पाहिले नाही, त्याविषयी ऐकले नाही, वाचलेही नाही. एकाएकी त्याला कशाची तरी ओढ, ते आतून सांगतंय, तू अजून इथेच का बसलास ? चल, तिथे एख फूल आहे, बघ. कुठे आहे शोध...अशाप्रकारची ओढ. तो थांबेना, बसेना, कुठपर्यंत जायचे हे माहीत नाही. तो तसाच चालत चालत राहतो...आतला आवाज, तेच बोलावून नेतेय. तो तसाच जात राहतो. कुठे अमेरिकेत राहणाऱ्याने बोलवावे तसे तो गाव, देश सोडून कोणत्यातरी उद्यानात आला. तेच ते त्याला दिसणारे ते फूल त्याला तेथे दिसले. सुवास कळले. त्याला बाहेरचे पाहणे पुरेसे वाटले नाही. तो आत शिरला, त्याचे अंतरंग भरुन गेले. तेथेच तो नाहीसा झाला. तो अनुभावी. 

ज्ञानी बनता, अनुभवी बनता की अनुभावी बनता याचा विचार करा', असे स्वामीजी म्हणाले. हे माझ्या जीवनात अविस्मरणीय उपदेश ठरले. ते केवळ ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग याविषयी सुलभरीत्या केलेले विवेचन नव्हते तर मला आतून मारुन उठवून फुलात बुडून जा म्हणून केलेल्या आदेशाप्रमाणे आताही गुणगुणत आहे. 'मी' पणाचा अहंकार उष्टेइतकेच अभिन्न पाहा गुहेश्वरा या गूढ वचनाचे हे इतके सोपे निरुपण होय. 

खूप काही सांगण्यासारखे आहे. मात्र, स्वामीजी त्या साऱ्यांच्या पलिकडे आहेत. महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातील एक स्वच्छ, सुंदर गाव. ते गाव निश्चितच आवर्जून पाहायला हवे. तेथून मला बोलावणे आले. अमुक दिवशी सिद्धेश्वर स्वामीजी येणार आहेत, आपणही यावे, असे सांगण्यात आले. मला अन्य कोणतेही विवरण कशाला हवे ? स्वामीजी बोलावले तेव्हा जायचे. गायीच्या मागे लागलेली भूकेली वासरू मी. (हसु (सि)विन बेन्नु हत्तिद करु नानु).

सकाळी नऊच्या आत त्या गावी पोहोचायचे होते. कलहळ्ळीहून पहाटे पाचला मी मित्रांसह कारने निघाले होते. वाटेत गावांनजीकच्या रस्त्यांच्या बाजुला घाणीचे दृश्य. नैसर्गिक वैभव, सूर्योदय त्यामुळे झाकोळले गेले होते. मला खूप वाईट वाटले. तेथे पोहोचल्यावर स्वच्छ, सुंदर गाव स्वागताला सज्ज होते. एकेक निर्मल गाव. नरकातून स्वर्गात आल्याचा अनुभव होता. मला आयोजख स्वामीजींसोबत व्यासपीठावर बसायला बोलावत असल्याचे माहीत नव्हते. मी नकार दिल्यावर स्वामीजींनी डोळ्यांनीच सूचना केली. मी त्यांच्या बरोबर कशी बसेन ?  खाली जमिनीवर बसले. स्वामीजींनी मला बोलण्याचा आदेश दिला. आधीच माझ्या डोळ्यांतून अर्धे पाणी आले होते. तेथील स्वच्छता, सुंदरतेने माझे अंतरंगही धुवून पाणीच पाणी केले. संपूर्ण प्रवासात रस्त्यांत  हॄदय पिळवटून टाकणारे दु:ख होते. मी जास्त बोललेच नाही. स्वामीजींचे सामीप्य लाभेल म्हणून मी आलेली. दुसरी कोणतीही गोष्ट माझ्या आवडीची नाही. त्यांच्यासोबत बसले हे पुरेसे आहे. तरीही या स्वच्छतेला नमन. संपूर्ण देशात हे चित्र निर्माण व्हायला हवे. हे एकटे मोदी करू शकणार नाहीत. सगळ्यांत ही भावना निर्माण व्हावी. कुत्रे, मांजरही आपण केलेली अस्वच्छता दिसू नये यासाठी त्यावर माती टाकतात. हे मनुष्याला का समजत नाही ? "ईश्वरा सगळ्यांना ही बुद्धी दे, आमच्या आतील, बाहेरील अस्वच्छता दूर कर" अशी प्रार्थना करत हात जोडून रडतच मी खाली बसले. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होत्या. 

स्वामीजी बोलायला लागले. त्या गावातील स्वच्छतेचे कौतुक केल्यानंतर म्हणाले, "येथे बसल्यात ना, त्या अनुभावी आहेत. ब्रह्मवादिनी आहेत. त्यांच्या डोळ्यांतील पाण्याला खूप अर्थ आहेत..." त्यांनी सांगितलेले या जीवनाला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार होय. आता कोणी काही दिले तरी नको, हे पुरे ही भावना प्रबळ झाली. त्यांना तसे वाटल्याने जन्म सार्थक झाल्याचे वाटले.  आणखी खूप चालायचे आहे, त्यांचे विचार पाठीशी असावेत, त्यांनी चालवावे अशी प्रार्थना केले. धुक्याने झाकलेले फळ खाल्ले तर तुमची शपथ जाणा गुहेश्वरा असे अल्लमाने म्हटल्याचे आठवले. 

असे माझे परमप्रिय स्वामीजी पडल्याने हाड मोडल्यावर ते कणेरीत असताना भेटायला गेले. 'कसे आहात स्वामीजी' असे विचारल्यावर त्या वेदनेतही हसत आरामात असल्याचे म्हणाले. दुखतंय का विचारल्यावर हसतच म्हणाले, 'होय, चालताना... हात वर करताना दुखतेय.' त्यांना किती वेदना होत असतील याचा अंदाज येत होता. मला 'आपण कशा आहात?' विचारले. त्यांना पाहत आपल्या आशीर्वादाने चांगले असल्याचे म्हटले. 'आपण आनंदात राहणाऱ्या आहात. आनंद हाच आपला जीवभाव आहे. आनंदातच राहता.' म्हणाले. त्यांचे आशीर्वाद हीच भेटवस्तू होय. त्यांना न समजलेले काय आहे ? त्या हितकारक गोष्टींचा संचय घेऊन मी परतले. 

अशाप्रकारे संस्कारित केलेल्या स्वामीजींनी अन्नत्याग केल्याचे कळलेच नाही. चिक्कमंगळुरुतील काम आटोपून निघताना एका मित्राने फोन करून विचारले, 'सिद्धेश्वर स्वामीजींना बरे नाही म्हणे. ते व्हीलचेअरवर असल्याचा व्हिडिओ पाहिलो.' तेव्हा त्यालाही काही माहिती नव्हती. मीही त्यांना वयोमानानुसार काही शारीरिक त्रास असल्याचे समजले. मी मनातच देवा, ते कधीही अंथरुण धरुन कण्हायला नको, अशी प्रार्थना केले. चिक्कमंगळुरुचा प्रवास संपवून ३१ डिसेंबरला पोहोचले. मी तीन वर्षांपासून वृत्तपत्रे वाचली नव्हती. सहा वर्षांपासून टीव्हीचा संपर्क नव्हता. मोबाईलमध्ये बातम्या बघायचीही हवय नाही. या सर्व 'नाही' च्या मध्ये एक तारखेला घरी अतिथी होते. 

दोन जानेवारीला रात्री बारा वाजता अचानक श्री सिद्धेश्वर स्वामीजींना भेटायला जाण्याची भावना निर्माण झाली. तेव्हाही ते अत्यवस्थ असल्याचे मला माहीत नव्हते. टीव्ही पाहून समजल्यानंतर माझ्या कोणी आप्त मंडळींनीही मला सांगितले नाही. सगळ्यांना माहिती झाली आहे, मलाही माहिती असेल असे त्यांना वाटले असावे. अशावेळी काही माहिती नसताना, कोणीही सांगितले नसतानाही तरीही मनात तीव्र ओढ होती. त्यांना समोर पाहून झुकलेली मान, हा मार्ग चांगला आहे, या मार्गावरुनच चालत राहा, मी तुमच्या सोबत आहे, असे सांगितलेल्या घटनेचे पुनर्दर्शन झाले. स्वप्न, भ्रम नव्हे, जागेपणी अनुभव आला. तेवढेच माहीत, पुढे...

मी दुपारच्या बसने निघून रात्री अकरा वाजता हुबळीला पोहोचणार होते. त्यासाठी तिकिटही बुक केले होते.  तेथून मित्राच्या कारने विजयपूरला पोहोचण्याच्या घाईत होते. वाटेत बातमी आली. बसमधून उतरल्यावर मित्राने अंतिम अभिवंदन पत्र वाचून दाखवली. जीवनविषयक, आध्यात्मविषयक किती सुंदर विवेचन केले होते. देहाला अग्निसमपर्पित करा असे सांगितलेला भाग, स्मारक उभारू नका म्हणून दिलेला आदेश अपूर्व होता. माझ्या वाट्याला केवळ त्यांचे देहदर्शन आले. त्यांना नमन केले. 

अनेकांना त्यांनी धरलेला उपवास, देहत्यागानंतर अग्निसमपर्पित करण्याची सूचना ही जैन धर्माची भूमिका असल्याची भावना होती. अनेकांना त्यांना वेदोक्ताविषयी आसक्ती असल्याचे वाटत होते. प्रकृती तत्त्व जाणणाऱ्यांंना, सिद्धेश्वर स्वामीजींनी अल्लमाच्या 'बयलु'चा केलेला उल्लेख वाचल्यावर वेगळाच प्रकाश दिसला होता. या पंचमहाभूतांत देह नावाचा हा पंचमहाभूत लीन व्हावा. त्यासाठी हा देह किंचितही न ठेवता 'बयलु' मय करणे अग्निशिवाय कोणाला साध्य आहे ? 

पंचभूतांत जल, भूमीची वाकडीतिकडी चाल आहे. मात्र, केवळ अग्निची चाल उर्ध्वमुखी आहे. त्यामुळे  अल्लमाने सांगितल्याप्रमाणे स्वामीजी 'बयलु' झाले. 

अंगाराच्या गिरीवर पाहिला मी लाखाचा खांब

त्या लाखाच्या खांबावर होता एक हंस, 

जळला खांब, उडाला हंस, 

लपला कुठे अंगारा, हे गुहेश्वरा. 

एवढे मात्र जागरुकपणे पाहिले आहेत. तसे नसेल तर का सोडून गेले ? खांब जळाल्याचे पाहिल्यावरच हंस उडण्यासाठीच उपवासाला सुरुवात केला होता. 'बयलु' व्हावे, कोणत्याही खाणाखुणा राहू नयेत यासाठीच अग्निसमपर्पणाचा निर्णय घेतला. चिताभस्मही कोणाच्या हाती लागू नये अशाप्रकारे नदीत विसर्जित करण्याचा आदेश दिला. समाधिस्थ होणारे महात्मा भक्तांची हाक ऐकून येतात, त्यांच्या संकटांचे हरण करतात अशी भावना आहे. मात्र, स्वामीजींनी देहत्यागानंतर वाट पाहीन ही भावना टिकवण्याचा भरवसाही दिला नाही. 

 असेच एकदा स्वामीजींसोबत बसले होते. तेथे आलेल्या एकांनी विचारले, स्वामीजी, खूप वर्षांपासून प्रवचन सांगता, आपले प्रवचन ऐकून कोणी बदललेय, मोठे झालेत असे वाटलेय का ? स्वामीजी स्मितहास्य करत म्हणाले, "मी बदलायला लागलोय" म्हणाले. आध्यात्मात केवळ आत्मोद्धार, परोद्धार, समाजोध्दाराचा कोणताही लेषही नसल्याचे प्रखर अल्लमतत्त्व मांडले. 

"आपण खूप लवकर मोहात अडकतो; मात्र, पुढे ते आपल्यावर राज्य करते" असे सांगून स्वामीजींनी एक कथा सांगितली. "एकजण नदीकाठी बसला होता. त्याच्यासोबत एकजण होता. तो नदीकडे पाहिला. नदीतून कांबळ वाहत चालले होते. वाह! थंडीत कांबळ असल्यास ते पांघरल्यास गरम राहील. त्याने कांबळच्या मोहाने नदीत उडी मारली. पोहत जाऊन कांबळ पकडला. थोड्या वेळात वाचवा वाचवा म्हणून हाका मारू लागला.तो कांबळच्या मोहाने गेला होता, मात्र ती कांबळ नव्हे अस्वल होते. अस्वलाच्या तावडीतून कसे निसटायचे यासाठी धडपडत होता. आपले सगळे मोह अशाच असतात, गरम म्हणून जातो त्यानंतर त्याच्या हाती सापडून मरतो. मोहाला बळी पडण्यापूर्वी विचार करा." असे स्वामीजी म्हणाले. त्यांनी केलेल्या त्यागाची यादी पाहिल्यास आपण किती सोडले आहे. घर सोडले, गाव सोडले हे सर्व किती सामान्य बाब आहे. खऱ्या अर्थाने जे सोडायचे आहे ते वेगळे असल्याचे स्वामीजी मला सूचवून गेले. 

एकदा हुल्याळ आश्रमावर त्यांच्या पायाजवळ बसले होते. स्वामीजी निसर्ग व विज्ञान याविषयी खूप अद्भुतपणे बोलत होते. आताही मला ते आठवून आनंद होते. सांगता येणार नाही असे विवेचन त्यांनी केले. अचानक खालून एक आवाज आला, 'कोठे आहे तो सिद्ध्या?' तो आवाज ओळखीचा असल्यागत स्वामीजी उठले, आम्हीही उठलो. तो खालून पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत होता. तो आवाज देणारे दिसले. भगवेधारी वयस्कर स्वामीजी होते, त्यांच्यासोबत दोघे शिष्य होते. त्या स्वामीजींना हात जोडून आपली खुर्ची दाखवत त्यावर त्यांना बसायला सांगितले. त्यांचा जोरात पुन्हा प्रश्न,  'कोठे आहे तो सिद्ध्या?' सोबत असलेले शिष्य 'ते हेच, आपण यांनाच विचारत आहात.' असे सांगत स्वामीजींना दाखवले. "हा नाही, मला सिद्ध्याला पाहायचंय" म्हणून पुन्हा ओरडत निघाले. आपल्याला भेटायचेय म्हणून खूप सांगितले होते. मात्र, आता त्यांना आपली ओळख पटेना. स्मृतिभ्रंश झाला आहे, त्यामुळे ते असे करतात, असे सांगून नमस्कार करून शिष्यही निघाले. त्यांनी सिद्ध्या कोठे आहे ? म्हणून जोरात विचारलेला आवाज पूर्ण विरुन जाईपर्यंत स्वामीजी शांतपणे बसले होते. हळुवारपणे स्वामीजी म्हणाले, "एकेकाळी ते खूप मोठे ज्ञानी होते, स्वतःची ओळख स्वतःला नाही इतका विसर. त्यानंतर गप्प बसले.

बयलु बयलचि पेरुनि बयलु पिकवुनि

बयलु बयलायितय्या 

म्हटलेल्या अल्लमासारखी स्पष्ट भूमिका. गुहेश्वर बयलु इतकी स्पष्टता स्वामीजींची होत

एका पंथात असूनही सर्व पंथीयांना आपले वाटले. पंथाच्या बाहेरील लोकांनाही मोठे केले. उपनिषद, वेद आदींची वचनांशी सांगड घातली. प्रत्येकात आपलेच हा भाव जागवले. शेवटी मी कोणाचा नाही, ही घोषणा केली. तसेच प निषेधालाही सज्ज झाल्यागत 'बयलु' व्हायचा निर्धार केला. पुन्हा 'तुला शरणांचे बंधन मला तेही नाही' अशाप्रकारे अल्लमाच्याच दिशेने वाटचाल. पण दोघांत एकच विरोधाभास आहे. अल्लम समाजात न राहता पूर्णपणे दूर राहून आपल्या मार्गावर चालत राहिला. स्वामीजी लोकांतच राहून, सर्व गोष्टींत अडकूनही इथे नाही, हे दाखवून दिले. हे खूप दुर्मिळ आहे. 

इतके होऊनही सत्यही नाही असत्यही नाही

सहजही नाही असहजही नाही

मीही नाही हे सर्व मान्य करू. पण आमच्या डोळ्यांसमोर आचरण करुन जीवंत देवत्वाचा अनुभव दिलेले आपण असताना तूही नाही, हे कसे मान्य करायचे सांगा स्वामीजी ? अल्लमाच्या तूही नाही वचनाची त्याच्याइतकेच कठोरपणे न बोलता, न वागता अत्यंत सौम्यपणे नवीन मांडणी केलात. त्याचा खरा अर्थ  आपण नाही तर दुसरे कोण समजावणार ? कदाचित आपण निष्ठुरपणे समाजापासून दूर राहिलेल्या अल्लमावर प्रेम न करताही राहाल कोण जाणे. मात्र, आम्हाला प्रेम देऊन, आमच्यात आपलेपणाची भावना जागवलात. आता  अचानक आम्हाला दूर सारल्यास हे कठोर सत्य कसे स्वीकारायचे हे सांगा? 

त्रासदायक झालेय बोलणे ओझे झालेय मौन 

वेदना विरल्या डोळ्यांत 

पायी टोचलेला काटा

आतच मोडल्यागत

डंख मारतोय भाव मनी



Saturday 4 February 2023

संत परंपरेला एक आदर्श

वृषांक भट

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

थोडीशी जरी प्रसिद्धी मिळाली तरी 'मी मोठा व्यक्ती' म्हणून मिरविणाऱ्यांंत श्री सिद्धेश्वर स्वामीजी हे अभिन्न आदर्श म्हणून दिसतात. अपरिग्रह व्रताचे कठोरपणे अनुसरण करताना  चालून आलेले पद्मश्रीसह अनेक पुरस्कार नम्रतेने ते नाकारलेले सिद्धेश्वर स्वामीजी संतपरंपरेत पहिल्या रांगेत आहेत. 

सिद्धेश्वर स्वामीजी हे उत्तर कर्नाटकात सर्वाधिक प्रसिद्ध होते. मात्र, त्यांनी कधीही प्रसिद्धीची आशा बाळगली नाही. कमीत कमी एक पत्रकार परिषदही त्यांनी कधीही बोलावली नाही. राजकारण्यांना भेटून अनुदान, सहकार्य मागणे ही तर दूरची गोष्ट. त्यांनी आपले प्रवचन टीव्हीवर दाखवावे, वृत्तपत्रांंत प्रसिद्ध व्हावे, अशी एकदाही अपेक्षा केली नाही. राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभाग नोंदवून विद्वत्तेचे प्रदर्शन घडविणेही दूरची गोष्ट. तरीही लाखो लोकांची मने जिंकली. आपले कौतुक करावे, आपली प्रशंसा करावी याची अपेक्षा न ठेवलेल्या या साध्या संताने प्रामाणिक आध्यात्मिक जीवनाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात स्थान मिळविले. 

सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रवचनांना न गेलेल्यांना ते कसे चालायचे याविषयी येथे स्पष्टपणे सांगायलाच हवे. सूर्योदयाला सुरू होणारे प्रवचन सुमारे एक तास चालायचे. ३० दिवस एकाच ठिकाणी प्रवचन चालायचे. गुळाला लागणाऱ्या मुंग्यांप्रमाणे हजारो लोक प्रवचन सुरू होण्याआधी एकत्र यायचे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमले तरी कोठेही आवाज नाही! गूढ मौन. कोणत्याही कोपऱ्यात एखाद्याने खोकले तरी सर्वांना ऐकू यावे इतके निशब्द! लोक जमताच  श्वेतवस्त्र धारण केलेले सिद्धेश्वर स्वामीजी माईकपुढे उभे राहायचे, प्रवचन सुरू करायचे. एक शब्दही चुकीचा जाणार नाही इतके स्पष्ट चिंतन असायचे. आपण सांगितलेली कोणतीही गोष्ट पुन्हा एकदा सांगून दुरुस्ती करणारे नव्हते !

प्रवचन संपताच स्वामीजी व्यासपीठावरून उतरून जायचे. भक्तांनी निघावे, यासाठी कोणी माईकवरुन सूचना देत नव्हते. स्वामीजी व्यासपीठावरून उतरले, हीच प्रवचन संपल्याची सूचना ! आलेल्या भक्तांमध्ये किती ती शिस्त! कसले ते मौन ! कसली ती नम्रता ! खरंच हा भारत का इतका संभ्रम ! खरा भारत असाच असल्याचे हे निदर्शक !

तर विजयपुरात असलेल्या सिद्धेश्वर स्वामीजींच्या ज्ञानयोगाश्रमाचे मूलतत्त्वे कोणती हे माहीत आहे का? 

कर्मयोग ! भक्तियोग ! ध्यानयोग !  ज्ञानयोग !



Thursday 2 February 2023

देहाच्या पलिकडे, कणाकणात शिव झाले !



सकाळची बोचरी  थंडी. अंग झटकून अंथरुणातून बाहेर पडणेच कष्टाचे. अजून सूर्यच पूर्ण प्रमाणात उगवून मुख दाखवले नाही. अशातच ज्ञानसूर्याच्या प्रखर तेजाने आपल्या मनावर चढलेले किल्मिष दूर व्हावे, या ओढीने शेकडो,  नव्हे  हजारो लोक मैदान भरुन जमायचे. मात्र, अशाप्रकारचे आश्चर्य केवळ उत्तर कर्नाटकात दिसून यायचे. ते सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रवचन कार्यक्रमात ! होय. त्यांच्या अतिसहज, सरळ, स्निग्ध बोलणे ऐकण्यासाठी जमणारे ते लोक हृदय भरुन प्रवचनातील ओळी साठवून त्या पुन्हा पुन्हा आठवत घराकडे पाऊले टाकताना पाहून आश्चर्य वाटायचे. का माहीत आहे ? सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रवचनात मी कधीही चढ - उतार पाहिलो नाही. 'चांगला वक्ता कसा व्हावा?' यासाठी लांबलचक भाषणे देतात ना त्यांच्या कोणत्याही चौकटीत स्वामीजी अडकले नाहीत. त्यांच्या विस्तीर्ण हृदयातून स्फुरणारा एकेक शब्द थेट लोकांच्या हृदयापर्यंत भिडायचा. तेथेच ते पाय रोवून उभे राहून प्रेरणा द्यायची. त्यांचे एक महिन्याचे प्रवचन नि:संशयपणे एक दशकभर पुरेल इतके परिवर्तन आणायचे. जगाच्या मागे धावणाऱ्या लोकांना एके ठिकाणी बांधून ठेवून त्यांच्या अंतरंगात प्रवेश करण्याची अगोचर शक्ती त्यांच्यात होती. आश्चर्य कोणते माहीत आहे ? अशाप्रकारची शक्ती असताना, राज्यभरात 'जीवंत देव' (चालता - बोलता ईश्वर) म्हणून प्रसिद्ध असतानाही त्यांचे पाय जमिनीवरच राहिले; ते स्थान त्यांनी कधीही गमावले नाही. कीर्ती पिशाच्चाला शिरावर चढू दिले नाही. सहज, लहान मुलाप्रमाणेच ते जगले. एकदा त्यांच्यासोबत 'मॉर्निंग वॉक' करताना त्यांच्या मानेजवळ कुर्ता फाटल्याचे पाहून संकोचानेच विचारले, 'असे का?' ते हसत म्हणाले, 'अजूनही कापड चांगले आहे. पूर्ण जीर्ण होईपर्यंत वापरता येईल !' मी अवाक् झालो. ते विचारले असते तर एवढेच काय? नको म्हणून न सांगता गप्प राहिले तरी पुरेसे होते, कपड्यांच्या राशीच त्यांच्यासमोर पडल्या असत्या. मात्र, संन्यस्त जीवन स्वीकारलेल्या व्यक्तीला कपड्याची चिंता कशाला? 

 विवेकानंदांच्या संन्यासी गीताचे अनुवाद करताना कुवेंपु लिहितात, आकाश हेचि घर, भूमीच अंथरुण, त्यागीला घर पुरेसे? (गगनवे मने, हसुरे हासिगे, मनेयु साल्वुदे चागिगे?). अक्षरशः या गीताला साजेसे ते होते. ते काही घरी गरीबीत नव्हते. वडील जमीनदार होते. त्यांचे घरच ४० खणांचे होते. मात्र, ती श्रीमंती त्यांना कधीही आकर्षित करू शकली नाही. वयाच्या १४ व्या वर्षी शाळेला गेलेला मुलगा कुणाला न सांगता गावातील देवस्थानात ध्यानाला बसलेला असताना अनेकांनी पाहिले आहे. पुढे प्रवचनासाठी आलेल्या मल्लिकार्जुन स्वामीजींच्या प्रभावाने या तरुणाने त्यांनाच गुरू मानून घराचा त्याग केला. गीतेपासून योगसूत्रांपर्यंत, उपनिषदांपासून शरण साहित्यापर्यंत सर्वांत नैपुण्य मिळविलेले  'श्री' गुरूंच्या आदेशानुसार सर्व जबाबदाऱ्या आपल्या खांद्यांवर घेत पुढे मार्गस्थ झाले. विजयपूरचे त्यांचे ज्ञानयोगाश्रम इतर सर्व मठांच्या तुलनेत आकाराने मोठे, विस्तारदृष्ट्या वडासारखे विस्तारलेले नाही. ते कोणाचेही लक्ष न वेधता 'श्रीं'सारखेच साधे आहे. तेच ज्ञानदासोह केंद्र ! सिद्धेश्वर स्वामीजी इतर मठाधीशांप्रमाणे शाळा - महाविद्यालये, रुग्णालये बांधण्याच्या हट्टाला पेटले नाहीत. ते दु:खी, कष्टी मनाला शीतलता देणाऱ्या प्रवचनांचे मार्ग अनुसरले. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तेच त्यांचे 'कायक' राहिले. गुरुंच्या आदेशाचे श्रद्धेने पालन केले!




इतके ख्यातकीर्त,  भक्तांचे हृदयसिंहासनाधीश्वर असलेले स्वामीजी झोळी धरुन हात पसरल्याचे उदाहरणच नाही. अक्षरशः त्यांचा 'अपरिग्रह योग.' ते परिधान करत असलेल्या शर्टाला खिसाच नव्हता. एकदा बोलता बोलता सहजपणे त्याविषयी विचारले. त्यावर  'काय भरण्यासाठी खिसा हवा  हे सांगा' म्हणून हसले. म्हैसूरुला नरेंद्र मोदी आले होते. तेव्हा स्वामीजींनी 'त्यांना खिसा आहे, मात्र ते भरण्याची त्यांची इच्छा नाही' अशा शब्दांत मुक्तकंठाने त्यांचा गौरव केला ! बहुतेक एखाद्या राजकारण्याचे इतक्या उदारपणे त्यांनी गुणगान केल्याचे मी तर पहिल्यांदाच ऐकलोय! तर ते कोणाचे तरी अवगुण दाखवल्याचे कधीही माझ्या निदर्शनास आले नाही. आपण त्यांच्यासमोर एखाद्या दरोडेखोराला जरी आणून उभे केले तर ते त्याच्यातील एक चांगला गुण शोधून काढून त्याचे कौतुक केले असते. शारदामाता सांगायच्या, 'कोणांतही दोष पाहू नका.' अनेकजण आपल्या भाषणांत त्याचा उल्लेख करतात. मात्र, तसे जगलेले केवळ सिद्धेश्वर स्वामीजी.

एकदा व्यासपीठावरून एक स्वामीजी असंख्य लोकांसमोर बोलत होते. ते आपल्या परदेशातील प्रवासांविषयीचे अनुभव सांगताना बढाई मारत होते. सिद्धेश्वर स्वामीजींसारख्या अनुभावी व्यक्तीसमोर या विदेशी प्रवासातील अनुभवाचे वर्णन ऐकणे त्रासदायक ठरले होते. नंतर सिद्धेश्वर स्वामीजींसमोर त्यांची भेट झाली तेव्हा त्यांचा परिचय करून देताना स्वामीजी म्हणाले, हे सर्व जग फिरलेले महात्मा आहेत. देश पाहा, कोश वाचा (देश नोडु कोश ओदु) म्हणतात ना त्याप्रमाणे हे जग पाहिले आहेत, अध्ययन केले आहेत.' माझे डोळे विस्फारलेले. सिद्धेश्वर स्वामीजींचे व्यक्तिमत्वच तसे होते. ते कोणालाही कधीही दुखावले नाहीत. आत्मविश्वास भरणारे, ते वाढविणारे गण होते. 

त्यांना भेटल्यावर दरवेळी दीर्घकाळ त्यांच्यासोबत 'वॉक' करण्याची संधी मला मिळत होती. त्यांनी एकदाही त्यांच्या प्रवचनाविषयी, त्याच्या विषयवस्तूविषयी चर्चा केल्याचे मी ऐकलो नाही. 'वॉक' संपेपर्यंत देशाच्या सद्यस्थितीविषयी त्यांचे प्रश्न असायचे. सांस्कृतिक आक्रमण असो, प्रत्यक्ष युद्ध असो ते अमुलाग्र विचार करायचे. भाषेची समस्या असो, लोकसंख्येच्या स्फोटाचाही विषय का असेना ते खोलवर जाऊन विस्तृत चर्चा करायचे. अनेकदा त्यांची अंतर्दृष्टी इतकी सूक्ष्म असायची की तोपर्यंत आपण मानलेले सत्य तर्कबद्धरीत्या खोटे ठरायचे. त्यांनी कधीही वाद घातला नाही, मात्र, समजेल अशाप्रकारे सूक्ष्मपणे सांगायचे. मला चांगले आठवतेय. आम्हा सर्वांच्या सुदीर्घ प्रयत्नांनंतरही समाजात बदल दिसत नाही. त्यामुळे हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत, ही मनातील भावना एकदा त्यांच्यासमोर व्यक्त केलो. त्यावर गंभीर होत ते म्हणाले, 'आज आपण करत असलेल्या प्रयत्नांना एका पिढीनंतर फळ मिळेल, ही आशा ठेवली पाहिजे. तरच ते काम करू शकू.' आपण सुरू केलेल्या कामाला २५ वर्षांनंतर फळ मिळेल,  या विश्वासाने पुढे जायला हवे, हा कानमंत्र त्यांनी दिला. बहुधा समाजात काम करणाऱ्या प्रत्येकाने इतक्या संयमाने, सजगपणे प्रतीक्षा केल्यास बदल निश्चित होईल. स्वतः स्वामीजीच त्यांचे प्रवचन ऐकायला येणाऱ्या लोकांविषयी सांगायचे, 'हे लोक उगीच येत नाहीत. २० वर्षे परीक्षण करुन भात शिजलंय याची खात्री झाल्यावर येत आहेत!' त्यांची दिनचर्या वैशिष्ट्यपूर्ण असायची. अतिशय कमी झोपायचे. सकाळी लवकर उठून प्रवचन करायचे. ते संपल्यावर घामेघुम होईपर्यंत 'वॉक.' अल्प प्रसाद (भोजन). अध्ययन - पाठ - सायंकाळी आणखी 'वॉक' गावातील मान्यवर, जाणकारांसोबत विचारविनिमय करायचे. यात ते फारच कमी बोलायचे. इतरांना बोलते करून चालू घडामोडींविषयी जाणून घ्यायचे. त्यांची मौन साधना. मधाच्या पोळ्यात जमवून ठेवलेल्या मकरंदाचे प्रमाण समजणे सोपे नाही. अगदी त्याप्रमाणे त्यांचे जीवनही. कोठेही गेले तरी, कोणासोबतही थोडावेळ घालवले तरी ते त्यांचे आप्त बनून जायचे. ही सरळता आणि प्रेमाला असलेली श्रेष्ठ शक्ती होय.

पोन्नंपेटे हे कोडगूमधील एक लहान खेडे. तेथील एका घरात त्यांच्या निवासाची व्यवस्था केली होती. त्या कुटुंबियांना त्यांचा परिचय नसल्याने ते त्यांना इतर साधुंप्रमाणे समजून गप्प राहिले. त्याआधी घराच्या निरीक्षणासाठी आलेल्या एका स्वामीजींनाच ते सिद्धेश्वर स्वामीजी समजले होते म्हणे. त्यानंतर थेट शुभ्र वेषात आलेल्या साधूंनी त्यांचे मन जिंकले. ते थोडेच भोजन करायचे. मात्र, कुटुंबीय भोजनाला बसताच ते प्रेमाने त्यांना जेवण वाढायचे, पोट भरुन आणखी शक्य नाही इतके ! त्यांचे ते दोन दिवसांच्या काळातील वास्तव्य ते कुटुंबीय अद्याप विसरले नाहीत. हा सिद्धेश्वर स्वामीजींचा दिव्य चमत्कार होय. प्रत्येकाला 'मी म्हणजे त्यांना खूप आवडतो' असे वाटायचे. तितकेच ते प्रत्येकावर समदृष्टीने प्रेम करायचे. 

जेवण वाढताना त्यांच्या भरपूर प्रेमप्रवाहाचा अनुभव यायचा. ते क्वचितच जेवण वाढत असल्याने त्याचे साधकांना अप्रुपच. तेव्हा देवानेच जेवायला बसलेल्यांचे रक्षण केले पाहिजे. त्यांना भेटायला कोणीही आले तरी त्यांना प्रसाद घेतल्याशिवाय ते जाऊ देत नव्हते. तेवढेच काय ? प्रवचनासाठी परगावी गेल्यावर कोणालाही कवडी नया पैसा मागितले नाहीत. मात्र, प्रवचन ऐकायला येणाऱ्यांसाठी दासोहाची व्यवस्था करायला सांगायचे. आपण साऱ्यांनी बुद्धाच्या जीवनाविषयी ऐकले आहे. त्याच्यासोबत येणाऱ्या संन्यासींविषयी वाचले आहे. आपल्या काळात आपण सिद्धेश्वर स्वामीजींच्यात ते पाहिलोय इतकेच. ते आपल्या काळात बुद्धासारखे जगले! 

 ते आपल्या देहात अनारोग्याची वेदना लपवून ठेवूनच दीर्घकाळ जगले. एकदा पाय घसरून पडल्यावर पायाचे हाड मोडल्यावरच त्यांना देहात वेगळीच वेदना असल्याचे समजले होते! तरीही ते गप्प बसले नाहीत. थोडेसे बरे झाल्यावर लगेच प्रवचनाला सिद्ध व्हायचे. गुरुचा आदेश कसा मोडायचा ? विजयपूर जिल्ह्यातील काखंडकी येथे त्यांचे शेवटचे प्रवचन झाले. त्यांना भेटल्यावर त्यांच्या वेदनेविषयी ते बोललेच नाहीत. मात्र, देशाच्या वेदनांविषयी दीर्घ चर्चा केली. त्यांच्यासोबतच्या साधुंसोबत बसून चर्चा करायला लावले. मन:पूर्वक शुभेच्छा देऊन निरोप दिला. तिथून पुढे  ज्ञानयोगाश्रमात आल्यावर आजारी पडल्याने तेथे स्थिरावले तेव्हा आम्हा सर्वांना त्यांच्या वेदनांविषयी जाणीव झाली. देहत्यागाच्या आठ दिवस आधी त्यांना भेटल्यावर चेहऱ्यावर वेदनांचे लवलेशही नव्हते. चेहऱ्यावर आपल्यातील भावभावनांचे प्रतिबिंब दिसते, हा इंग्रजी सुविचार आठवला.  आपल्या चेहऱ्यावर वेदनांचे लक्षणच नसल्याचे स्वामीजींना सांगत हसलो. ते जोरातच हसले. थोडावेळ बोलले. त्यांनी थकवा आल्याची सूचना केल्यानंतर मी तेथून निघालो. देहत्यागाच्या दोन दिवस आधीही आणखी एकदा त्यांना पाहिलो. ते यावेळेस ओळखण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांचे दैवत्व ओळखण्याची संधी ईश्वराने आम्हाला दिली हे आमचे भाग्यच होय.

'समाधी बांधून उत्सव साजरा करू नका, देह अग्निला समर्पित करा' असे आधीच लिहून ठेवले होते! त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आलेल्या लोकांचा हिशेब करणे अशक्य बनले होते. शरणांचे जीवन त्यांच्या मरणातच कळणार असे म्हटले जाते. ते खोटे नाही. परंतु पूज्य सिद्धेश्वर स्वामीजी यांचे जीवन ते असतानाही माहीत होते, देहत्यागानंतर ते सर्वत्र पसरले इतकेच!

चक्रवर्ती सुलिबेले, बंगळुरू

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर

शिवयोगी सिद्धरामाने दिले शरण चळवळीला बळ



 ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी योगीकुल चक्रवर्ती, शरणश्रेष्ठ श्री सिद्धरामाविषयी म्हणतात, "श्री सिद्धरामेश्वर हे योगीपुरुष, आत्मानुभवी होते. त्यांची वचने मधुर - मंत्र, शब्द - हंस होत. ते दृष्टीच्या मार्गे अंतरंगात प्रवेश करतात. तेथे पसरलेल्या मनसागरात तरंगतात. तेथून वर आलेले छोटेछोटे तरंग विचारांच्या शेकडो लाटा निर्माण करतात." यातून श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी श्री शिवयोगी सिद्धरामांच्या वचनांचे स्वरूप व सामर्थ्य विषद केले आहे. ते लोककल्याणकारी संत, कायक - शिवयोगी,  वचनकार म्हणून श्रेष्ठ आहेतच. शिवाय कल्याणक्रांतीनंर शरणसंकुल निर्नायकी होऊन सैरभैर झालेला असताना आपल्या हाती नेतृत्व घेतले. शून्य सिंहासनाचे अधिपती म्हणून आपल्या समर्थ नेतृत्वाने व चाणाक्षपणे शरण चळवळीला बलशाली बनविण्याचे कार्य केले. त्यामुळेच तो शिवशरणांच्या हत्या व रक्तपाताच्या आघातांना झेलूनही विस्तारला. 

बाराव्या शतकात शिवशरणांनी चांभार हरळय्याचा मुलगा शीलवंत व ब्राह्मण मंत्री मधुवरस याची कन्या कलावती यांचा विवाह अनुभव मंटपात लावला. यामुळे तत्कालीन राजा बिज्जळ व त्यांचा पुरोहितवर्ग यांनी वर्णसंकर होत आहे म्हणून गदारोळ उठवला. यामुळे प्रधानमंत्री बसवण्णांनी पदाचा राजीनामा दिला. राजाने हरळय्या व मधुवरस यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. त्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार करण्यात आले.  कल्याणात हलकल्लोळ माजला. अनुभव मंटपातील शरणजन देशांत इतस्तत: विखुरले गेले.  दरम्यान, हरळय्या, मधूवरस व शीलवंत यांच्या हत्येचा सूड घेण्याचा निर्धार शरण जगदेव व मल्लिबोम्मण्णा यांनी केला. त्यांनी एके दिवशी भर रस्त्यात राजा बिज्जळाचा वध केला. त्यानंतर बिज्जळाचा मुलगा सोयिदेवने सर्व शरणांना शोधून शोधून मारण्याची आज्ञा केली. त्यावेळी मोठ्‌‌‌या प्रमाणात शिवशरणांसह लोकांच्या हत्या झाल्या. दरम्यान, शरणांचे नायक  बसवण्णा तेथे न थांबता कल्याण सोडून निघून गेले होते. तेथे ते लिंगैक्य पावले. अल्लमप्रभू देवांनी श्रीशैलची वाट धरली. गणाचार दलासह लढत निघालेले चन्नबसवण्णा उळवीत लिंगैक्य झाले. महत्त्वाचे सगळे शिवशरण कल्याण सोडल्याने तेथे उरलेले शिवशरण नेतृत्वाविना दिशाहीन झाले होते. त्यांना काही सूचेनासे झाले होते. अशा स्थितीत सोन्नलगीचे सिद्धराम उभे राहिले. उरलेल्या शरणांना धैर्य दिले. आपण सारे शरण नवसमाजाच्या निर्मितीसाठीच कल्याणला आलोय. 'धर्म हा समाजाच्या उद्धारासाठी आहे, या विश्वासाने बसवण्णांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू केली; रोजगारासाठी नव्हे. त्यामुळे कोणी धीर सोडण्याची गरज नाही. आत्मस्थैर्य गमावू नका',  असे सांगत सिद्धरामांनी पुढाकार घेऊन सर्व शिवशरणांना धीर दिला. तसेच त्यांना पुन्हा संघटित केले. मोळिगे मारय्यासारखे ज्येष्ठ शरण सिद्धरामांच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर सिद्धरामांच्या नेतृत्वाखाली कल्याणात पुन्हा वीरशैव लिंगायत धर्माचा, बसवण्णांचा, शरणतत्त्वांचा जयजयकार घुमू लागला. 

शिवशरणांनी पुन्हा आपल्या 'कायक'ला सुरुवात केली. अनुभव मंटपाचे दार उघडले. मात्र, आता शून्य सिंहासनाचा अधिपती कोण बनणार ? त्यावर कोण बसणार? हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा सोड्डळ बाचरस यांनी उद्घोषणा केली, ''योगियांचा योगी शिवयोगी सोड्डळ सिद्धराम हाचि एक योगी.'' (योगिगळ योगी शिवयोगी सोड्डळ सिद्धरामनोब्बने योगी) सर्व शिवशरणांनी हात उंचावत त्यांना अनुमोदन दिले. तिसरे पीठाधिपती म्हणून सिद्धराम शून्य सिंहासनावर विराजमान झाले.

राजा बिज्जळाच्या हत्येनंतर सिंहासनासाठी त्याचा मुलगा राज मुरारी सोयिदेव व त्याचा भाऊ कर्णदेव या दोघांत कलह सुरू होता. दोघेही समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. तेव्हा पुन्हा शरण संकुल अतिशय सबल बनले होते. सिद्धरामांनी ते एक राज्य हलवू शकेल अथवा एका राज्याची पुनर्रचना करू शकेल, इतके त्याला बलशाली बनविले होते. बिज्जळाचा भाऊ कर्णदेवाने सोन्नलगीच्या सिद्धरामांना संदेश पाठवून कल्याणच्या सिंहासनावर बसवण्यासाठी सहाय्य आणि आशीर्वाद मागितले. कवी   राघवांकाने आपले काव्य 'सिद्धराम चरित्रे'मध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. (पृष्ठ ८२).

या घटनेपूर्वी शरण चळवळीने राजकीय सलगीचा परिणाम भोगला होता. त्यामुळे सिद्धरामांनी चाणाक्षपणे कर्णदेवाचा प्रस्ताव नाकारला. केवळ धर्मकार्य हे एकच ध्येय मानून ते कार्यप्रवृत्त झाले. त्यांनी आपले शरीर वृथा कार्यात झिजविण्याऐवजी नित्य 'कायक'ला आपले जीवनमंत्र बनविले. त्यामुळे सिद्धराम जनप्रिय झाले. राघवांकाने "साकारनिष्ठे भुतंगळोळगनुकंपे ताने परबोम्म" अशा शब्दांत सिद्धरामांचा गौरव केला आहे. आपल्या लोककल्याणाच्या कार्यांमुळे प्रसिद्ध झालेल्या सिद्धरामांनी अल्लमप्रभू देवांचे शिष्य म्हणून शरण संकुलात केलेला प्रवेश शरण चळवळीला विजयमार्गावर नेणारा ठरला.



सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...