दहा लोक जरी जमले तरी रसाळ बोलणारे राज्यात सर्वत्र सापडतील. यक्षागानाप्रमाणे अभिनयासह भाषण करणारे कलाकारही अनेक आहेत. चढ उतार, व्यंगात्मक शरसंधान करून, थोडा मसाला घालून भाषणालाच कलाकृती बनवून टाकणारे वक्तेही आहेत. टाळ्या मिळविणारे वक्तेही आहेत. भाषणाने समाजातील वाईट गोष्टी दूर करू हा भ्रम बाळगणारेही आहेत. चार व्यासपीठांवर बोलण्याची संधी मिळताच विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवणारेही आहेत ! मात्र, हे तसे नाहीत. बोलण्यात चढ - उतार नाही. त्यांना प्रवचनाला लोकांना जमवण्याची गरज भासली नाही. त्यासाठी बोलले पाहिजे ही त्यांची इच्छाही नाही ! समाजात त्यांच्यापेक्षा महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले अनेकजण आहेत; व्याख्याने देणारेही आहेत, मूल्ये देणारेही आहेत. मात्र, समाजाने यांना दिलेला सन्मान त्या कोणालाही दिला नाही ! म्हणजे समाजाला ते सर्वजण तसे वाटले नाहीत. यांना अवधूत मानल्यास तशा बिरुदावल्या नाहीत. त्यांनी कधीही पापाचे पुण्यात रुपांतर करण्याचा दावा केला नाही. लोकांनीही त्यांच्याकडून ती अपेक्षा केली नाही. नावापुढे पीठाधिपतिपदाचे विशेषण लावले नाही, जातीचे बंधन पाळले नाही. कोणीही त्यांचा अनुयायी म्हणून दावा केला नाही. कोणा मंत्र्यालाही विशेष दर्शन दिले नाही. स्टुडिओत बसून प्रवचनांचे रेकॉर्ड करवले नाही. कोणाही राजकारण्याला शाल पांघरुन स्तुतिसुमने उधळली नाहीत. तेवढेच कशाला नेसलेल्या कपड्याला खिसा नाही, बसलेल्या खुर्चीलाच पीठ मानले, भगवी वस्त्रे धारण करण्याची संधी असतानाही ती धारण केली नाहीत. कोणाच्या मर्जीखातर अथवा त्याच्या दबावाखाली राहिले नाहीत. ते जसे होते तसेच राहिले. सर्वांना आपण आहात तसेच राहायला सांगितले. धावपळ न करता हे जीवन सुखी व समृद्ध बनवणे हेच साध्य आहे. अशाप्रकारे धर्माचे परमोत्कृष्ट निरुपण केलेले सिद्धेश्वर स्वामीजी हे खरे संत होत. त्यांच्या अंतिम यात्रेला १५ लाखांहून अधिक लोक जमले होते.
आजच्या भडक युगात जे गुण कालबाह्य समजले जातात त्या सर्व गुणांनी संपन्न एका व्यक्तीच्या अंतिम यात्रेला इतके लोक का जमले हे आश्चर्यकारक आहे. आजचा काळ हा तसे जगण्याचा नाही, ही भावना दिवसेंदिवस वाढीस लागली असताना त्याच गुणांनी ते जीवंत देव म्हणून ओळखले जाणे हे अतार्किक आहे. होय, हे न सोडवता येणारे कोडे आहे. सोशल मीडियात खरडून, मेकअप करुन कॅमेऱ्यासमोर तोंड दाखवत महान चिंतक म्हणून मिरवणे, बड्या मंडळींशी असलेल्या संबंधांचा इतरांना पायदळी तुडवण्यासाठी अस्त्र म्हणून वापर करण्याचे प्रकार फोफावत असताना अशी व्यक्ती आपल्यात होती, हे आश्चर्यकारक आहे. मग सिद्धेश्वर स्वामीजी यांच्यात असलेली वैशिष्ट्ये तरी काय आहेत ? स्वतःला एक सामान्य मनुष्य समजणाऱ्या माणसावर समाजाने इतके प्रेम कसे केले ? 'बड्या मंडळीं' त नसलेल्या कोणत्या गोष्टी यांच्यात होत्या ? हा सध्याचा प्रश्न आहे. मात्र, त्याचे उत्तर धर्म विषयावरील अत्यंत सोप्या प्रवचनात आहे. कारण धर्म म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे. ती आचरणात आणायची गोष्ट आहे, उपदेश करण्याची नव्हे. अथवा आचरणानुसार त्याविषयी उपदेश करावा. त्यामुळे वेळोवेळी धर्म उपदेशकांनी आधी त्याचे आचरण केले, लोकांना सांगितले. आपण धर्ममार्गावर चालल्यानंतर त्याचा प्रचारक बनले. त्यामुळे धर्मप्रचारकांचे वैशिष्ट्य हे त्यांचे गुण समजण्याऐवजी ते धर्माचे गुण म्हणणे अधिक योग्य होईल. सिध्देश्वर स्वामीजी यांच्यात असा धर्म होता.
हजारो वर्षांपासून धर्माविषयी सांगितलेले सर्वजण तसे जगले होते. त्यांचे जीवनच एक धडा आहे. तसे जगलेल्यांचे समाज ऐकायचा. त्या गुणामुळेच समाजाने सिद्धेश्वर स्वामीजींचे अनुकरण केले. वेळोवेळी समाजाला त्यांच्या सारख्यांची आवश्यकता निश्चितच आहे. कारण अशा लोकांशिवाय जगात आदर्श, सत्य आणि धर्म यांचे मूल्यांमध्ये रूपांतर होणार नाही. मूल्ये नसलेल्या जगात दुष्ट लोक धर्मात्मा म्हणून ओळखले जाण्याचा, रमणाश्रमाला जाणारे परम सात्विक समजले जाण्याचा, अहंकाराच्या नशेत चूर लोक महात्मा होण्याचा धोका संभवतो. धूर्त लोक नैतिकतेचा मुखवटा पांघरुन समाजात मिरवतील. एकीकडे यांच्याभोवतीची मंडळी त्यांच्या वाईट गोष्टींचा विरोध न करता, दुसरीकडे ते चांगुलपणा आचरणात न आणता दोलायमान स्थिती निर्माण होते. ही पूर्वीपासूनच जगाची रीत बनली आहे. मात्र, त्या त्या काळात जगात अवतरलेल्या काही सत्पुरुषांनी मूल्यांचे पालन करीत तसे जगून दाखवले आहे. भारतात असे कितीतरी अवधूत होऊन गेले. त्यात अलिकडे होऊन गेलेल्या रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी यांचा उल्लेख करता येईल. सिध्देश्वर स्वामीजीही तसे जगले. होऊन गेलेले दार्शनिक, योगी तसेच होते. कारण भारत नावाच्या महालाला धर्म हाच खांब होय ! त्यामुळे या मातीने केवळ सत्य सांगणाऱ्या, धर्माचे आचरण करणाऱ्यालाच सत्पुरुष मानले आहे. तशाप्रकारे सिद्धेश्वर स्वामीजी जगले. तसेच तशाप्रकारची श्रद्धा समाजात रूजवली. ती श्रद्धा रुजवण्यासाठी वाक्चातुर्याची आवश्यकता नाही. शिवाय संघटनेच्या ताकदीचीही गरज नाही, हे सिद्धेश्वर स्वामीजींनी दाखवून दिले. आज दांभिकता शिखरावर आहे. अशा काळातही हे साध्य असल्याचे सिद्धेश्वर स्वामीजींच्या जगण्यातून दिसून येते.
जे अल्लम, सर्वज्ञ, बसवादि शरणांना अत्यंत सहजपणे गवसले तेच सिद्धेश्वर स्वामीजींनीही मिळविले. जे शंकराचार्यांना चांडाळामुळे प्राप्त झाले, ज्याची रामानुजाचार्यांनी देवस्थानच्या गोपुरावरून घोषणा केली तेच चिंतन सिद्धेश्वर स्वामीजींनी मांडले. रमण महर्षींनी 'तुझ्या अंतरंगातही बघ' म्हणून सांगितले. सिद्धेश्वर स्वामीजीही तशाच प्रकारे जगले. सिद्धेश्वर स्वामीजी यांचे जीवन इतके साधे आणि शांत होते की 'जीवन अनुभवांचा प्रवाह' आहे ही जाणीवच त्यावर उपाय ठरू शकते. ती जाणीव आत नव्हे आणखी कोठे शोधायची ? अनुभवण्यासाठी असलेले जीवन अनुभवांचा प्रवाह नव्हे, आजचे आजच ही मनोवृत्ती संपवण्यासाठीच जगलेल्या श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी देहत्यागानंतर समाजाला आणखी एका उंचीवर नेले. भारतात होऊन गेलेले बहुतेक महापुरुष हे मृत्यूनंतर जगाला अधिक प्रस्तुत ठरले आणि लोकप्रिय झाले. रमण महर्षी यांना पाहिले तरी कळेल. आपल्या जीवनात कधीही तिरुवन्नामलै सोडून कोठेही ते गेले नाहीत. मात्र, मृत्यूनंतर संपूर्ण जगच तिरुवन्नामलैला येण्यासारखे केले. रमण महर्षी हे आपल्याकडे येणाऱ्या काही भक्तांना मी एक वेडा असल्याचे सांगायचे. सिद्धेश्वर स्वामीजींसारखे रमण महर्षीही पापाचे पुण्यात रूपांतर करून देईन, चमत्काराने उद्धार करेन, असे कधीही सांगितले नाहीत. ते महर्षी बनले. म्हणजे गोंधळाविना जीवन कसे जगायचे हे सांगितले. त्यामुळे सिद्धेश्वर स्वामीजीही महर्षीच होत.
जे बोलल्याप्रमाणे जगले तेच जगात मोठे झाले आहेत. आज कसे जगायचे हे सांगण्यासाठी मॅनेजमेंट कोर्स आहेत. त्याविषयी सेमिनारमध्ये लीलया पटवून देणारे मॅनेजमेंट गुरुही आहेत. मात्र, जीवनविषयक जाणीव ? धार्मिक जाणीव ? अशा काळात सिद्धेश्वर स्वामीजींनी लोकांना या दोन्ही जाणिवा दिल्या. देशात धार्मिक जाणीव दिलेले काही मठाधीश आहेत. काही मठाधीशांनी केवळ जीवनविषयक जाणीव दिले आहे. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींनी दोन्ही जाणिवा दिल्या. विद्वानांसाठी त्यांनी जसे कैवल्य सूत्र, नारद सूत्र, आनंद योग, पतंजल योगसूत्रावर भाष्य लिहिले तसे सामान्यांसाठी कथामृत, अंतरंगद कृषी, भगवत चिंतन, नानू यारू आदी पुस्तके लिहिली. आपल्या प्रवचनांतून पंचमहखभूतांच्या माध्यमातून मूल्यांचा उपदेश केला. समाजाच्या सर्व वर्गापर्यंत पोहोचतील अशा सर्व विषयांना स्पर्श केला. त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचले.
ऋषींना स्वतः धर्म आणि आपल्या शरीराला प्रयोगशाळा समजण्याची ताकद असते. त्याला दधिची, अगस्त्य यांच्यासारख्या महाऋषींची उदाहरणे आहेत. सिद्धेश्वर स्वामीजींनी तसे प्रयोग केले. आचारांचा मूळ उद्देशच धर्माचरण आहे. धर्माचरणासाठी आचरण हे डबके बनू नये, हे सांगण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. एकदा सिद्धेश्वर स्वामीजी हे शिष्यांसह बंगळुरुच्या सुत्तुरू मठाच्या केतोहळ्ळी आश्रमात मुक्कामी होते. एके दिवशी सकाळी त्यांच्या शिष्यवृंदापैकी एक असलेले गदगच्या शिवानंद मठाचे जगद्गुरु सदाशिवानंद यांना लिंगपूजेसाठी वेळेवर बेलपत्र सापडले नाही. ते त्याच्या शोधात होते. ते पाहून सिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, "जर बेलपत्र नसेल तर तुळशीपत्राने पूजा उरका. भक्तिभावाने अर्पण केल्यास ते सर्व भगवंतापर्यंत पोहोचेल. सतत त्या लिंगाची आराधना केल्यास पुढे त्यात पांडुरंगही असेल !" अशी समग्रता, विशालता, धर्मविषयक जाणीव असलेले सिद्धेश्वर स्वामीजी हे दुर्मिळ संत होते. अशाप्रकारची जाणीव असलेल्या सिद्धेश्वर स्वामीजींनी सहजपणे समाजाशी जवळीक साधली. दिवसातील बराचवेळ चेकवर स्वाक्षऱ्या करण्यात घालविणारे स्वामीजी सहजपणे मठाधिपती म्हणून मिरवू शकतील. मात्र, ते समाजाशी जवळीक साधू शकणार नाहीत.
जीवनाची तुलना 'बयलु'शी करणाऱ्या अनुभावींच्या वचनांना पाठ्यपुस्तकांपुरते सीमित करणारे हे जग, काम असताना तो रुद्रासारखा, काम गेल्यावर दुसऱ्याच दिवशी तो उडणारा गरुड पाहा असे सांगितलेल्या सर्वज्ञांना, निसंगत्व - निर्मोहत्व - निर्मलत्व सांगितलेल्या शंकराचार्यांना जातिय नजरेतून पाहते. मात्र, आपल्या काळातच जगलेल्या सिद्धेश्वर स्वामीजींच्या जीवनाचे यथार्थ पालन केल्यास जगाच्या काही समस्या सुटतील. तसेच जगात शांती नांदेल. आता अशांचा जन्म कधी ! त्यामुळे तरी जगाला सिद्धेश्वर स्वामीजी यांची आठवण येतच राहावी.
- संतोष तम्मय्या, कार्यकारी संपादक, होस दिगंत
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे
No comments:
Post a Comment