जाती - मताच्या सीमा ओलांडून मानवीय जीवनाची जाणीव मनामनात जागवलेल्या त्या महान गुरू, मनुष्य हा मनुष्य म्हणूनच राहणे हाच धर्म या विचाराचा प्रचार प्रसार केलेल्या एका महान संताचे युगांत झाले आहे. ते क्षण असे होते की, समुद्राच्या लाटा येऊन कोसळाव्यात तसे लाखो - लाखो लोक येत होते. ओसाड मरुभूमीसारखा भास होत होता. लाखो भक्तांचे आक्रंदन आकाशाला भिडत होते ! सर्वत्र महामौन पसरल्याचा क्षण. तेथे हात जोडून उभे असलेले, पुष्पवृष्टी करणारे, गुरुदेवा म्हणून अश्रू ढाळणारे लोक होते. ज्याप्रमाणे १२ व्या शतकात बसवण्णांचा कालखंड होता त्याप्रमाणे आताच्या २१ व्या शतकातील आधुनिक बसवण्णाच्या कालखंडाचेही अंत झाल्यासारखा भास होत होता. तेव्हा ज्या बुद्ध, महावीराच्या कालखंडाचा अंत्य झाला, आज त्याच प्रकारच्या नवबुद्धाचे काळही संपले ! तेव्हा ज्याप्रकारे विवेकानंद - रामकृष्ण परमहंस यांचा काळ निघून गेला, आज त्याच प्रकारच्या आधुनिक विवेकानंदाचा काळ निघून गेला ! शतकातील संत, एका युगपुषाच्या युगाचा अंत झाला आहे.
'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' कोणत्याही फलाफलाची अपेक्षा न करता तुझे कर्म तू कर या गीतातत्वाचे अक्षरशः आपल्या जीवनात अंगीकार करून ते कृतीरूपात आणलेले एकमेव संन्यासी श्री सिद्धेश्वर स्वामीजी होत. त्यामुळे ते एक खरे संत होते.
सामान्यतः स्वामीजी म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एक मठ, भगवे वस्त्र, रुद्राक्ष माळा, पाद्यपूजा, पुष्पार्चण आराधना या गोष्टी येतात. मात्र, अखंड संन्यासत्वाचे पालन करुनही सिद्धेश्वर स्वामीजींनी कधीही भगवी वस्त्रे परिधान केली नाहीत ! पीठावर तर चढलेलेच नाहीत ! सत्ता, सन्मानाची आकांक्षा बाळगली नाही ! सुख साधनांची लालसा मनाला शिवली नाही ! चुकूनही जातीच्या राजकारणामागे लागले नाहीत ! सरकारी पैशांतून मठ उभारले नाहीत. जैसे थे (आहे तसे) राहणे हेच खरे जीवन हे त्यांनी सांगितले. साधेपणातच सर्व काही सुंदर या मोत्यांसारख्या बोलण्यातून, भावभरित लेखनाने लोकांना प्रकाशाची वाट दाखवली. 'श्रीं' नी केवळ पैसेच नको म्हटले नाही तर खिसाही नको म्हटले. हे त्यांच्या जीवनाच्या पारदर्शकतेचे साक्ष होय.
महिनाभर चालणाऱ्या श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रवचनांना मीही हजेरी लावून ऐकलो आहे. त्यांच्या प्रवचनाचा प्रभाव असा असायचा की, २००७ मध्ये आमच्या मुधोळ नगरातील महाविद्यालयाच्या मैदानावर स्वामीजींचे महिनाभर प्रवचन चालले होते. दररोज सकाळी बरोबर सहा वाजता प्रवचनाला सुरुवात व्हायची. तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोक पहाटे चार वाजता उठून आपली नित्यकर्मे आटोपून बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि मोटारसायकलवर प्रवचन ऐकायला यायचे. 'श्रीं'चा प्रत्येक शब्द लोकांना खिळवून ठेवायचा. त्यांचे प्रवचन सुरु असताना सुई पडला तरी आवाज यावा इतकी निशब्द शांतता असायची. या निशब्द शांततेत स्वामीजींच्या तोंडातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टी थेट लोकांच्या हृदयाला भिडायच्या. स्वामीजींच्या प्रवचनातील सोपी भाषा, स्पष्ट निरुपण, मुख्य विचार ऐकणाऱ्यांच्या मनात रुजायचे. शिवाय लोकांना आपल्या जीवनात त्यांचा अंगीकार करतील यासाठी प्रेरणा द्यायचे. त्यांच्या बोलण्यात अशी अद्भूत शक्ती होती. त्यांच्या प्रवचनाचा एक सार सतत माझ्या कानात गुंजारव करते. "कोणीही मागे वाईट केल्यास ते विसरून जा, तू कोणाचेही चांगले केलेले असल्यास तेही विसरून जा." या दोन्हीही गोष्टी विसरल्यास तुझे जीवन सुखी होईल. ते आठवणीत ठेवल्यास तुझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत कोलाहल ! स्वामीजींनी सांगितलेली ही गोष्ट किती अर्थगर्भित आहे.
एकदा एका पत्रकाराने स्वामीजींना भेटून त्यांची मुलाखत घ्यावयाची असल्याचे सांगितले. त्यावर स्वामीजी म्हणाले, 'इथे मी १५ दिवस प्रवचन सांगणार आहे. आपण ते १५ दिवस प्रवचन ऐका. १६ व्या दिवशी आपल्याला काही विचारावे असे वाटल्यास तेव्हा मी मुलाखत देईन.' स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे ते पत्रकार १५ दिवस प्रवचन ऐकतात. १६ व्या दिवशी ते पत्रकार स्वामीजींना नमस्कार करून सांगतात, 'स्वामीजी, माझ्याकडे कोणताही प्रश्न नाही !' माध्यमकर्मीही स्वामीजींच्या प्रवचनाने प्रभावित झाले होते.
त्यांचे कोट्यवधी भक्तगण आहेत. तरी त्यांनी आपण सर्वश्रेष्ठ म्हणवून घेतले नाही. सनातन धर्माविषयी अपार ज्ञान असलेले स्वामीजी शरणांच्या वचन साहित्याचे मोठे जाणकार होते. त्यामुळे श्री सिद्धेश्वर स्वामीजींचे प्रवचन म्हटल्यास तेथे लाखो लोक जमायचे. स्वामीजींच्या तोंडून बाहेर पडणारा एकेक शब्द मानवी जीवनाला नवीन मार्ग दाखविणारा असायचा. आध्यात्मिक जगताचा चक्रवर्ती म्हणून मिरविण्याच्या पुष्कळ संधी होत्या. मात्र, त्यांनी कधीही त्याविषयी आशा बाळगली नाही. परंतु कोट्यवधी भक्तांच्या मनात आध्यात्मिक चक्रवर्ती म्हणून राज्य केले. श्री सिद्धेश्वर स्वामीजी व शुभ्र वस्त्रांचे जन्मजन्मांतराचे अनुबंध असावे असे वाटते. अतिशय साधे कपडे परिधान करणारे स्वामीजी शेवटपर्यंत तसेच जगले. या माध्यमातून स्वामीजींनी भक्तांनाही धर्मजीवनाची दिशा दाखवून दिली. पुरस्कारांसह विविध गौरव, पैसे, भौतिक संपत्ती, ऐषाराम यापासून दूर राहून सिद्धेश्वर स्वामीजींनी खरे संन्यासत्व जीवनाचे भाग बनविले. केवळ आध्यात्मिक मार्गदर्शन नव्हे तर ते साध्या जीवनाचा सोपा मार्ग आहे हे सर्वसामान्यांना समजावून सांगितले. त्याशिवाय त्यांच्यात आध्यात्मासोबत सतत ज्ञानाचा दिवा तेवत राहील, याची दक्षता घेतली. परंतु अलिकडे बहुतांश स्वामीजी हे राजकीय नेत्यांचे समर्थक बनल्याचे आपण सारे जाणतो. कोणीतरी एक चिल्लर नेता सत्ता गमावल्यावर त्याला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी दबाव टाकणे, आणखी कोणाला मंत्रीपद द्या म्हणून भरसभेत गर्जत मुख्यमंत्र्यांनाच दम भरणे, अशा सर्व घटना आपण पाहिल्या आहेत. आजकाल अशाप्रकारच्या दांभिक स्वार्थी संन्याशांचा भरणा आहे. अशाकाळात अशा कोणत्याही भौतिक विलासाकडे सिद्धेश्वर स्वामीजींनी आपले चित्तही भरकटू दिले नाही. त्यांनी करंगळीनेही इशारा केला असता तरी त्यांना हवे ते आणून त्यांच्या पायी ओतणारा श्रीमंत भक्तवर्ग होता. इच्छा व्यक्त केल्यास मठात कोट्यवधी रुपये, सरकारी निधी येऊन पडला असता. मात्र, पैशांचा मोह मनालाच कलुषित करेल या विचाराने येणाऱ्या पैशाला डाव्या हातानेही शिवले नाही.
"मीही नाही, तूही नाही, नाही हेही स्वतः नाही, गुहेश्वरही स्वतः बयलु या अद्भूत पारमार्थिक सत्याचे आपल्या जीवनभर पालन केले. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेल्या स्वार्थरहित कर्मयोगाचे अनुसरण, खऱ्या संन्यासत्वाचे आचरण केलेल्या श्री सिद्धेश्वर स्वामीजींचे जीवन आम्हा साऱ्यांसाठी आदर्शवत आहे. अलिकडे पुरस्कार, मानद डॉक्टरेट मिळविणाऱ्यांत अर्ज करुन व वशिल्याने ते मिळवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींकडे आपणहून चालून आलेल्या पुरस्कार, सन्मानांची पट्टी छोटी नाही ! भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. तर अनेक विद्यापीठे मानद डॉक्टरेट देण्यासाठी पुढे आली होती. तेव्हाही स्वामीजींनी ते अतिशय विनम्रपणे ते नाकारले.
अलिकडील काळात सर्व मठही अत्यंत श्रीमंत बनले आहेत. त्यांना सरकारकडून पुष्कळ अनुदान मिळत आहे. त्यामुळे तेथील स्वामीजीही मठांची संपत्ती वाढवत आहेत. मुख्यतः राजकीय नेत्यांच्या भरपूर पैशांचे व्यवहारही मठांतून चालत आहेत. त्यामुळे त्या मठांची श्रीमंती वाढली असून त्यांची राजकीय नेत्यांचे अड्डे अशी ओळख बनली आहे. ही अत्यंत शोचनीय बाब आहे. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींचे ज्ञानयोगाश्रम या सर्व मठांहून भिन्न आहे. एकदा राज्य सरकारने राज्यातील सर्व मठांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्वामीजींच्या ज्ञानयोगाश्रमालाही कोट्यवधी रुपये देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन अनुदान स्वीकारण्याची विनंती केली. तेव्हा स्वामीजींनी अत्यंत विनयशीलतेने ते नाकारले. शिवाय 'कोणतेही मठ असो अथवा आश्रम ते केवळ तेथील भक्तांच्या दानातूनच चालावे. त्याव्यतिरिक्त सरकारच्या अनुदानावर नव्हे,' असे सांगून स्वामीजींनी अनुदान परत पाठवले होते.
५ सप्टेंबर १९४० रोजी विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील बिज्जरगी येथे स्वामीजींचा जन्म झाला. मोठा मुलगा सिद्धगोंडा बिरादार हा पुढे एके दिवशी या देशातील महान संत बनेल, देशविदेशातील लोक उत्सुकतेने त्यांचे विचार ऐकायला येतील, याचा त्या दाम्पत्याने विचारही केला नव्हता ! चौथ्या इयत्तेत शिकताना हा लहान बालक विजयपूरच्या यात्रेला गेला होता. तेथे ज्ञानयोगाश्रमाच्या मल्लिकार्जुन शिवयोगी महास्वामींचे प्रवचन ऐकला. त्यांच्या प्रवचनाच्या प्रभावाने पुढे त्या आश्रमात आला. त्या लहान मुलाचा लहानपणापासूनच आध्यात्माकडे ओढा होता. तेव्हाच बालकाने आपला गुरू शोधला होता. त्या गुरुनेही आपल्या जवळ आलेल्या परमाद्भूत शिष्याला ओळखण्यात विलंब केला नाही. ते कोणत्या जन्मातील गुरू - शिष्य संबंध होते माहीत नाही ! अद्भूत गुरू, परमाद्भूत शिष्यवृत्ती असलेले हे पुन्हा एकत्र आले. सिद्धगोंडप्पा सिद्धेश्वर झाले. आपल्या शिष्याला शिक्षण देतानाच त्याच्या अंतरंगातील आध्यात्मिक ज्योतीचा प्रकाश बाहेर आणण्याच्या प्रयत्नात मल्लिकार्जुन शिवयोगी यशस्वी होतात. कोठेही प्रवचनासाठी गेले तरी मल्लिकार्जुन शिवयोगी सिद्धेश्वर स्वामीजींना सोबत न्यायचे. तेथील लोक आणि त्यांचे जीवन समजून घेतानाच सिद्धेश्वरांच्या आतील ज्ञानयोगही जागृत झाले. नंतर कर्नाटक विश्वविद्यालयातून पदवी मिळवून कोल्हापूरच्या विद्यापीठातून तत्त्वशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. कन्नड, संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवले.
मल्लिकार्जुन शिवयोगी यांंच्यानंतर ज्ञानयोगाश्रमाची धुरा सांभाळत सिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्या साधेपणाने अपार जनमान्यता मिळवली. कर्नाटक आणि महाराष्ट्रातही त्यांच्या अनुयायांची संख्या वाढली. आपल्या जीवनातील सुमारे ५० वर्षे प्रवचनाच्या माध्यमातून भक्तांच्या मनातील किल्मिष दूर करून तेथे सज्जनतेचा प्रकाश भरला. लोखंडाचे चणे म्हटले जाणाऱ्या उपनिषदांचे सार, जीवनाचे गमक, वचन, आध्यात्म आदी कोणालाही समजेल अशाप्रकारे अत्यंत सोपे करून सांगितले.
गुरू मल्लिकार्जुन शिवयोगी यांचे प्रवचन लिहून ठेवलेल्या सिद्धेश्वर स्वामीजींनी 'सिद्धांत शिखामणी' या नावाने त्यांचा संग्रह प्रकाशित केला. तेव्हा स्वामीजींचे वय केवळ १९ वर्षे होते. त्यानंतर स्वामीजींच्या अनेक कृती प्रकाशित झाल्या. उपनिषद, भगवद्गीता यावर आणि शरण साहित्याविषयी पुष्कळ पुस्तके लिहिली. अल्लम प्रभूंच्या वचनांवर आधारित 'वचन निर्वचन', 'भगवत चिंतन' ही पुस्तके लिहिली. इंग्रजीतही 'God world soul' 'Patanjali Yoga Sutra' 'Narada Bhakti Sutra' 'Shiva Sutra' आदी ग्रंथ लिहिले.
शेवटी, त्यांनाही वयोमानानुसार आरोग्याच्या समस्येने ग्रासले. आपल्या आश्रमात उपचार घेणाऱ्या स्वामीजींनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास नकार दिला. दर्जेदार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी आलेल्या राजकीय नेत्यांनाही हात जोडून निसर्गाच्या विरोधात जाऊन जगण्याची मला इच्छा नाही, असे स्पष्टपणे सांगितले. समाजातील अज्ञानाचा अंधकार पळवून लावण्यासाठी त्या भगवंतानेच त्यांना पाठवले होते. वैकुंठ एकादशीच्या दिवशी सायंकाळी स्वर्गाचे दार उघडण्याच्या वेळी भगवंताने त्या प्रकाशाच्या पुंज, त्यांच्या आत्म्याला बोलावून घेतले.
सामान्यपणे आपण इच्छामरण हे पुराणात वाचलो, ऐकलो आहे. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्या इच्छेनुसार देहाचा त्याग केला. देह मातीत ठेवू नका, तर त्याला अग्निसमर्पित करा, चिताभस्म नदीत विसर्जित करा, कोणतेही श्राद्ध विधी करू नका, स्मारक उभारू नका, मी या भूमीवर जसा आलो तसाच जायला हवा, माझे म्हणून कोणतीही गोष्ट राहू नये. कोणत्याही मनुष्याला भौतिक स्मारके ही जुवं ठेवणे शक्य नाही, हे स्वामीजींनी पूर्वीच अंतिम पत्रात लिहून ठेवले होते.
संपूर्ण सरकारी इतमामात 'कर्मयोगी'ला सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. 'श्रीं'च्या पार्थिव देहाच्या अंतिम यात्रेवेळी संपूर्ण राज्यात भक्तीचा उत्सव सुरु झाला होता. उभ्या जनसमुदायामुळे संपूर्ण रस्ते झाकोळून गेले होते. झाडे, घरांच्या गच्चीवरही जनहमूह उभा होता. मार्ग दाखविलेल्या गुरुला हात जोडून उभ्या लोकांसह ती मिरवणूक पाहून त्या सूर्यालाही पाझर फुटला होता ! उजेड जाऊन तारे दिसण्याच्या वेळी, अतिरिक्त संस्कारांविना, 'श्रीं'च्या इच्छेनुसार त्यांच्या चितेला अग्निस्पर्श करण्यात आला. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन न म्हणता जाती - पंथाच्या सीमा ओलांडून सुमारे २२ लाखांहून अधिक सर्वधर्मीय भक्त 'श्रीं'च्या अंतिम दर्शनासाठी जमले होते..
आपल्या जीवनात प्रतिदिनी आणि शेवटच्या क्षणीही चांगले मार्गदर्शन करून, चांगलेच चिंतून, चांगूलपणच ज्यांचा श्वास होता त्या सिद्धेश्वर स्वामीजींनी काळाच्या हाकेला ओ देऊन, आपणच सांगितल्याप्रमाणे मृत्युला सामोरे जात मरण अनुभवले. तसेच नेहमीप्रमाणे मंदस्मित प्रसन्नतेने त्यांचा आत्मा 'परमात्मा' त लीन झाला. भविष्यातील मार्ग दाखवलेला गुरू अग्नीच्या प्रकाशात विरघळून गेला. "जीवन संपते, दिवा विझल्याप्रमाणे, समुद्राच्या लाटा विरल्याप्रमाणे, मेघ विरघळल्याप्रमाणे, उरणार केवळ बयलु, महामौन, शून्य सत्त्व !" गुरुने जागवलेल्या जाणीवेने मात्र त्या गुरुला आपल्यासोबत साध्य आहे, हा शेवटचा संदेश देऊन स्वामीजी भौतिकदृष्ट्या आपल्यापासून दूर गेले आहेत. मात्र, त्यांचे आदर्श, साधेपणा, घालून दिलेल्या निस्वार्थ मार्गावर चालणे शक्य झाले तरच तो गुरू सतत आपल्या जाणिवेत शाश्वत राहील. परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजींनी लावलेला साधेपणाचा दीप शाश्वतपणे आम्हा सर्वांच्या हृदयमंदिरात प्रकाशमान होवो.
डॉ. जगदीश माने, धारवाड
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे
No comments:
Post a Comment