Thursday, 2 February 2023

देहाच्या पलिकडे, कणाकणात शिव झाले !



सकाळची बोचरी  थंडी. अंग झटकून अंथरुणातून बाहेर पडणेच कष्टाचे. अजून सूर्यच पूर्ण प्रमाणात उगवून मुख दाखवले नाही. अशातच ज्ञानसूर्याच्या प्रखर तेजाने आपल्या मनावर चढलेले किल्मिष दूर व्हावे, या ओढीने शेकडो,  नव्हे  हजारो लोक मैदान भरुन जमायचे. मात्र, अशाप्रकारचे आश्चर्य केवळ उत्तर कर्नाटकात दिसून यायचे. ते सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रवचन कार्यक्रमात ! होय. त्यांच्या अतिसहज, सरळ, स्निग्ध बोलणे ऐकण्यासाठी जमणारे ते लोक हृदय भरुन प्रवचनातील ओळी साठवून त्या पुन्हा पुन्हा आठवत घराकडे पाऊले टाकताना पाहून आश्चर्य वाटायचे. का माहीत आहे ? सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रवचनात मी कधीही चढ - उतार पाहिलो नाही. 'चांगला वक्ता कसा व्हावा?' यासाठी लांबलचक भाषणे देतात ना त्यांच्या कोणत्याही चौकटीत स्वामीजी अडकले नाहीत. त्यांच्या विस्तीर्ण हृदयातून स्फुरणारा एकेक शब्द थेट लोकांच्या हृदयापर्यंत भिडायचा. तेथेच ते पाय रोवून उभे राहून प्रेरणा द्यायची. त्यांचे एक महिन्याचे प्रवचन नि:संशयपणे एक दशकभर पुरेल इतके परिवर्तन आणायचे. जगाच्या मागे धावणाऱ्या लोकांना एके ठिकाणी बांधून ठेवून त्यांच्या अंतरंगात प्रवेश करण्याची अगोचर शक्ती त्यांच्यात होती. आश्चर्य कोणते माहीत आहे ? अशाप्रकारची शक्ती असताना, राज्यभरात 'जीवंत देव' (चालता - बोलता ईश्वर) म्हणून प्रसिद्ध असतानाही त्यांचे पाय जमिनीवरच राहिले; ते स्थान त्यांनी कधीही गमावले नाही. कीर्ती पिशाच्चाला शिरावर चढू दिले नाही. सहज, लहान मुलाप्रमाणेच ते जगले. एकदा त्यांच्यासोबत 'मॉर्निंग वॉक' करताना त्यांच्या मानेजवळ कुर्ता फाटल्याचे पाहून संकोचानेच विचारले, 'असे का?' ते हसत म्हणाले, 'अजूनही कापड चांगले आहे. पूर्ण जीर्ण होईपर्यंत वापरता येईल !' मी अवाक् झालो. ते विचारले असते तर एवढेच काय? नको म्हणून न सांगता गप्प राहिले तरी पुरेसे होते, कपड्यांच्या राशीच त्यांच्यासमोर पडल्या असत्या. मात्र, संन्यस्त जीवन स्वीकारलेल्या व्यक्तीला कपड्याची चिंता कशाला? 

 विवेकानंदांच्या संन्यासी गीताचे अनुवाद करताना कुवेंपु लिहितात, आकाश हेचि घर, भूमीच अंथरुण, त्यागीला घर पुरेसे? (गगनवे मने, हसुरे हासिगे, मनेयु साल्वुदे चागिगे?). अक्षरशः या गीताला साजेसे ते होते. ते काही घरी गरीबीत नव्हते. वडील जमीनदार होते. त्यांचे घरच ४० खणांचे होते. मात्र, ती श्रीमंती त्यांना कधीही आकर्षित करू शकली नाही. वयाच्या १४ व्या वर्षी शाळेला गेलेला मुलगा कुणाला न सांगता गावातील देवस्थानात ध्यानाला बसलेला असताना अनेकांनी पाहिले आहे. पुढे प्रवचनासाठी आलेल्या मल्लिकार्जुन स्वामीजींच्या प्रभावाने या तरुणाने त्यांनाच गुरू मानून घराचा त्याग केला. गीतेपासून योगसूत्रांपर्यंत, उपनिषदांपासून शरण साहित्यापर्यंत सर्वांत नैपुण्य मिळविलेले  'श्री' गुरूंच्या आदेशानुसार सर्व जबाबदाऱ्या आपल्या खांद्यांवर घेत पुढे मार्गस्थ झाले. विजयपूरचे त्यांचे ज्ञानयोगाश्रम इतर सर्व मठांच्या तुलनेत आकाराने मोठे, विस्तारदृष्ट्या वडासारखे विस्तारलेले नाही. ते कोणाचेही लक्ष न वेधता 'श्रीं'सारखेच साधे आहे. तेच ज्ञानदासोह केंद्र ! सिद्धेश्वर स्वामीजी इतर मठाधीशांप्रमाणे शाळा - महाविद्यालये, रुग्णालये बांधण्याच्या हट्टाला पेटले नाहीत. ते दु:खी, कष्टी मनाला शीतलता देणाऱ्या प्रवचनांचे मार्ग अनुसरले. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तेच त्यांचे 'कायक' राहिले. गुरुंच्या आदेशाचे श्रद्धेने पालन केले!




इतके ख्यातकीर्त,  भक्तांचे हृदयसिंहासनाधीश्वर असलेले स्वामीजी झोळी धरुन हात पसरल्याचे उदाहरणच नाही. अक्षरशः त्यांचा 'अपरिग्रह योग.' ते परिधान करत असलेल्या शर्टाला खिसाच नव्हता. एकदा बोलता बोलता सहजपणे त्याविषयी विचारले. त्यावर  'काय भरण्यासाठी खिसा हवा  हे सांगा' म्हणून हसले. म्हैसूरुला नरेंद्र मोदी आले होते. तेव्हा स्वामीजींनी 'त्यांना खिसा आहे, मात्र ते भरण्याची त्यांची इच्छा नाही' अशा शब्दांत मुक्तकंठाने त्यांचा गौरव केला ! बहुतेक एखाद्या राजकारण्याचे इतक्या उदारपणे त्यांनी गुणगान केल्याचे मी तर पहिल्यांदाच ऐकलोय! तर ते कोणाचे तरी अवगुण दाखवल्याचे कधीही माझ्या निदर्शनास आले नाही. आपण त्यांच्यासमोर एखाद्या दरोडेखोराला जरी आणून उभे केले तर ते त्याच्यातील एक चांगला गुण शोधून काढून त्याचे कौतुक केले असते. शारदामाता सांगायच्या, 'कोणांतही दोष पाहू नका.' अनेकजण आपल्या भाषणांत त्याचा उल्लेख करतात. मात्र, तसे जगलेले केवळ सिद्धेश्वर स्वामीजी.

एकदा व्यासपीठावरून एक स्वामीजी असंख्य लोकांसमोर बोलत होते. ते आपल्या परदेशातील प्रवासांविषयीचे अनुभव सांगताना बढाई मारत होते. सिद्धेश्वर स्वामीजींसारख्या अनुभावी व्यक्तीसमोर या विदेशी प्रवासातील अनुभवाचे वर्णन ऐकणे त्रासदायक ठरले होते. नंतर सिद्धेश्वर स्वामीजींसमोर त्यांची भेट झाली तेव्हा त्यांचा परिचय करून देताना स्वामीजी म्हणाले, हे सर्व जग फिरलेले महात्मा आहेत. देश पाहा, कोश वाचा (देश नोडु कोश ओदु) म्हणतात ना त्याप्रमाणे हे जग पाहिले आहेत, अध्ययन केले आहेत.' माझे डोळे विस्फारलेले. सिद्धेश्वर स्वामीजींचे व्यक्तिमत्वच तसे होते. ते कोणालाही कधीही दुखावले नाहीत. आत्मविश्वास भरणारे, ते वाढविणारे गण होते. 

त्यांना भेटल्यावर दरवेळी दीर्घकाळ त्यांच्यासोबत 'वॉक' करण्याची संधी मला मिळत होती. त्यांनी एकदाही त्यांच्या प्रवचनाविषयी, त्याच्या विषयवस्तूविषयी चर्चा केल्याचे मी ऐकलो नाही. 'वॉक' संपेपर्यंत देशाच्या सद्यस्थितीविषयी त्यांचे प्रश्न असायचे. सांस्कृतिक आक्रमण असो, प्रत्यक्ष युद्ध असो ते अमुलाग्र विचार करायचे. भाषेची समस्या असो, लोकसंख्येच्या स्फोटाचाही विषय का असेना ते खोलवर जाऊन विस्तृत चर्चा करायचे. अनेकदा त्यांची अंतर्दृष्टी इतकी सूक्ष्म असायची की तोपर्यंत आपण मानलेले सत्य तर्कबद्धरीत्या खोटे ठरायचे. त्यांनी कधीही वाद घातला नाही, मात्र, समजेल अशाप्रकारे सूक्ष्मपणे सांगायचे. मला चांगले आठवतेय. आम्हा सर्वांच्या सुदीर्घ प्रयत्नांनंतरही समाजात बदल दिसत नाही. त्यामुळे हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत, ही मनातील भावना एकदा त्यांच्यासमोर व्यक्त केलो. त्यावर गंभीर होत ते म्हणाले, 'आज आपण करत असलेल्या प्रयत्नांना एका पिढीनंतर फळ मिळेल, ही आशा ठेवली पाहिजे. तरच ते काम करू शकू.' आपण सुरू केलेल्या कामाला २५ वर्षांनंतर फळ मिळेल,  या विश्वासाने पुढे जायला हवे, हा कानमंत्र त्यांनी दिला. बहुधा समाजात काम करणाऱ्या प्रत्येकाने इतक्या संयमाने, सजगपणे प्रतीक्षा केल्यास बदल निश्चित होईल. स्वतः स्वामीजीच त्यांचे प्रवचन ऐकायला येणाऱ्या लोकांविषयी सांगायचे, 'हे लोक उगीच येत नाहीत. २० वर्षे परीक्षण करुन भात शिजलंय याची खात्री झाल्यावर येत आहेत!' त्यांची दिनचर्या वैशिष्ट्यपूर्ण असायची. अतिशय कमी झोपायचे. सकाळी लवकर उठून प्रवचन करायचे. ते संपल्यावर घामेघुम होईपर्यंत 'वॉक.' अल्प प्रसाद (भोजन). अध्ययन - पाठ - सायंकाळी आणखी 'वॉक' गावातील मान्यवर, जाणकारांसोबत विचारविनिमय करायचे. यात ते फारच कमी बोलायचे. इतरांना बोलते करून चालू घडामोडींविषयी जाणून घ्यायचे. त्यांची मौन साधना. मधाच्या पोळ्यात जमवून ठेवलेल्या मकरंदाचे प्रमाण समजणे सोपे नाही. अगदी त्याप्रमाणे त्यांचे जीवनही. कोठेही गेले तरी, कोणासोबतही थोडावेळ घालवले तरी ते त्यांचे आप्त बनून जायचे. ही सरळता आणि प्रेमाला असलेली श्रेष्ठ शक्ती होय.

पोन्नंपेटे हे कोडगूमधील एक लहान खेडे. तेथील एका घरात त्यांच्या निवासाची व्यवस्था केली होती. त्या कुटुंबियांना त्यांचा परिचय नसल्याने ते त्यांना इतर साधुंप्रमाणे समजून गप्प राहिले. त्याआधी घराच्या निरीक्षणासाठी आलेल्या एका स्वामीजींनाच ते सिद्धेश्वर स्वामीजी समजले होते म्हणे. त्यानंतर थेट शुभ्र वेषात आलेल्या साधूंनी त्यांचे मन जिंकले. ते थोडेच भोजन करायचे. मात्र, कुटुंबीय भोजनाला बसताच ते प्रेमाने त्यांना जेवण वाढायचे, पोट भरुन आणखी शक्य नाही इतके ! त्यांचे ते दोन दिवसांच्या काळातील वास्तव्य ते कुटुंबीय अद्याप विसरले नाहीत. हा सिद्धेश्वर स्वामीजींचा दिव्य चमत्कार होय. प्रत्येकाला 'मी म्हणजे त्यांना खूप आवडतो' असे वाटायचे. तितकेच ते प्रत्येकावर समदृष्टीने प्रेम करायचे. 

जेवण वाढताना त्यांच्या भरपूर प्रेमप्रवाहाचा अनुभव यायचा. ते क्वचितच जेवण वाढत असल्याने त्याचे साधकांना अप्रुपच. तेव्हा देवानेच जेवायला बसलेल्यांचे रक्षण केले पाहिजे. त्यांना भेटायला कोणीही आले तरी त्यांना प्रसाद घेतल्याशिवाय ते जाऊ देत नव्हते. तेवढेच काय ? प्रवचनासाठी परगावी गेल्यावर कोणालाही कवडी नया पैसा मागितले नाहीत. मात्र, प्रवचन ऐकायला येणाऱ्यांसाठी दासोहाची व्यवस्था करायला सांगायचे. आपण साऱ्यांनी बुद्धाच्या जीवनाविषयी ऐकले आहे. त्याच्यासोबत येणाऱ्या संन्यासींविषयी वाचले आहे. आपल्या काळात आपण सिद्धेश्वर स्वामीजींच्यात ते पाहिलोय इतकेच. ते आपल्या काळात बुद्धासारखे जगले! 

 ते आपल्या देहात अनारोग्याची वेदना लपवून ठेवूनच दीर्घकाळ जगले. एकदा पाय घसरून पडल्यावर पायाचे हाड मोडल्यावरच त्यांना देहात वेगळीच वेदना असल्याचे समजले होते! तरीही ते गप्प बसले नाहीत. थोडेसे बरे झाल्यावर लगेच प्रवचनाला सिद्ध व्हायचे. गुरुचा आदेश कसा मोडायचा ? विजयपूर जिल्ह्यातील काखंडकी येथे त्यांचे शेवटचे प्रवचन झाले. त्यांना भेटल्यावर त्यांच्या वेदनेविषयी ते बोललेच नाहीत. मात्र, देशाच्या वेदनांविषयी दीर्घ चर्चा केली. त्यांच्यासोबतच्या साधुंसोबत बसून चर्चा करायला लावले. मन:पूर्वक शुभेच्छा देऊन निरोप दिला. तिथून पुढे  ज्ञानयोगाश्रमात आल्यावर आजारी पडल्याने तेथे स्थिरावले तेव्हा आम्हा सर्वांना त्यांच्या वेदनांविषयी जाणीव झाली. देहत्यागाच्या आठ दिवस आधी त्यांना भेटल्यावर चेहऱ्यावर वेदनांचे लवलेशही नव्हते. चेहऱ्यावर आपल्यातील भावभावनांचे प्रतिबिंब दिसते, हा इंग्रजी सुविचार आठवला.  आपल्या चेहऱ्यावर वेदनांचे लक्षणच नसल्याचे स्वामीजींना सांगत हसलो. ते जोरातच हसले. थोडावेळ बोलले. त्यांनी थकवा आल्याची सूचना केल्यानंतर मी तेथून निघालो. देहत्यागाच्या दोन दिवस आधीही आणखी एकदा त्यांना पाहिलो. ते यावेळेस ओळखण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांचे दैवत्व ओळखण्याची संधी ईश्वराने आम्हाला दिली हे आमचे भाग्यच होय.

'समाधी बांधून उत्सव साजरा करू नका, देह अग्निला समर्पित करा' असे आधीच लिहून ठेवले होते! त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आलेल्या लोकांचा हिशेब करणे अशक्य बनले होते. शरणांचे जीवन त्यांच्या मरणातच कळणार असे म्हटले जाते. ते खोटे नाही. परंतु पूज्य सिद्धेश्वर स्वामीजी यांचे जीवन ते असतानाही माहीत होते, देहत्यागानंतर ते सर्वत्र पसरले इतकेच!

चक्रवर्ती सुलिबेले, बंगळुरू

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर

No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...