Thursday, 23 February 2023

गोविंदराव पानसरे हत्या : त्यांना लढाई एकट्याने लढायचे आहे

 


२३ फेब्रुवारी २०१५

 कम्युनिस्ट नेते गोविंदराव  पानसरे यांची हत्या निंदनीय आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जायला हवी. मात्र, नरेंद्र दाभोलकर व त्यानंतर पानसरे यांची हत्या पाहता तसे होताना दिसत नाही. या हत्यांचा तातडीने तपास होऊन सत्य बाहेर यायला हवे. त्यासाठी सर्वच विचारप्रवाहांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढवावा. परंतु पानसरे यांच्या हत्येनंतरच्या पुरोगामी मंडळींच्या बिनबुडाच्या प्रतिक्रिया पाहता हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करत त्यांना ही लढाई एकट्‌यांनीच लढायची आहे. परंतु ती कशासाठी, हे मात्र संशयास्पद आहे. कारण पानसरे यांच्या हल्ल्यानंतरच्या पहिल्या क्षणापासूनच अशी वक्तव्ये सुरू झाली की, हिंदुत्ववाद्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले, जेणेकरुन ते या लढाईत त्यांच्यासोबत उतरुच नयेत. दाभोलकर व पानसरे या दोघांची हत्या आणि त्यासाठी वापरलेली नीती यातील साम्य आणि यांचा समान वैचारिक विरोधक यामुळे ते हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करत आहेत. युक्तीवादापुरते जरी मान्य केले तरी दाभोलकर हत्येवेळी राज्यात हे पुरोगामी विचारवंत उठता बसता ज्यांची जपमाळ ओढतात त्या पुरोगाम्यांचेच तर सरकार होते. मग ते आरोपींपर्यंत का पोहोचले नाहीत. काही पुरोगामी यामागे कोणाचा दबाव आहे, असाही सवाल करताना दिसत आहेत. परंतु ते हा प्रश्‍न थेट या सरकारची सूत्रे ज्यांच्या इशार्‍यावर हलायची, त्या आपल्या प्रिय नेत्यालाच का विचारत नाहीत. तसे केले असते आणि त्यासाठी रान पेटवले असते तर आज आरोपी गजाआड असते ना. का केवळ या हत्यांचे राजकीय भांडवल करुन ते ज्यांना पुरोगामी समजून सातत्याने तळी उचलतात त्या पक्षांना भविष्यात केवळ राजकीय लाभ मिळवून द्यायचा आहे. दुसरा मुद्दा देशात व राज्यात हिंदुत्ववाद्यांचे सरकार आल्याने हे घडते आहे, असा यांचा आरोप आहे. का देशात आणि राज्यात यापूर्वी हत्याच झाल्या नाहीत? (हा प्रश्न विचारण्यामागे भाजपच्या राज्यात हत्या झाल्या तर चालतील अथवा व्हाव्यात असा उद्देश असल्याचे कुणी समजू नये. ) माहिती अधिकार कार्यकर्ते शेट्‌टी यांची हत्या तर पुरोगाम्यांच्या राज्यातच झाली.स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या, सहा प्रचारकांचे अपहरण, केरळातील संघ स्वयंसेवकांच्या हत्या याही घटना त्यांच्याच काळात तर घडल्या. का ती माणसं नव्हती? त्यांच्या जीवनाचे मोल नाही? या दुटप्पी नीतीतून इतकेच दिसते, यांना मारेकरी सापडावा यात आणि वैचारिक लढाईत रस नाही तर राजकारणात रस आहे. कारण भाजप सत्तेत येऊच शकत नाही, अशी या पुरोगाम्यांची भविष्यवाणी होती. ती खोटी ठरली. आणि ते सत्तेवर आलेच कसे, ही खरी पोटदुखी आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांची बदनामी हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. यांचा हिंदुत्ववाद बदनाम व्हावा, हा एकच अजेंडा पूर्वीही होता, आणि आताही असल्याचे या एकूणच वक्तव्यांवरुन दिसते. मिशनर्‍यांच्या हत्येतही हिंदुत्ववादी असल्याची ओरड या पुरोगाम्यांनी केली होती. परंतु ती खोटी ठरल्यानंतर या पुरोगाम्यांनी माफी मागितली का, तर नाही. पुरोगाम्यांच्याच भाषेत इतिहासाचे मढे उकरल्यासही यांची दुटप्पी नीती दिसते. पानसरे यांच्या हत्येनंतरही गोडसे प्रवृत्तीचा उल्लेख सुरू आहे. महात्मा गांधीजींची हत्या निंदनीयच होती. मात्र, त्यापूर्वी स्वामी श्रद्धानंदांची हत्या झाली, याचा पुरोगामी कधी उल्लेख करताना दिसत नाहीत. का स्वामी श्रद्धानंद माणूस नव्हते? का केवळ ते हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांच्या हत्येचा उल्लेख टाळायचा? पुरोगाम्यांनो, इतके मानवतावादी, गांधीवादी असाल तर गांधींनी स्वामी श्रद्धांनदांच्या मारेकर्‍याला माफ करायला सांगितले तसे आपण अजुन गोडसेला का माफ केले नाही? प्रत्येक निवडणूक आल्यावर कॉंग्रेसचा पुढारी जे बोलतो तेच या पुरोगामी बोरुबहाद्दरांच्या लेखणीतून का पाझरते. त्यावेळी गोडसे, गोडसे का सुरू होते. गोडसे वगळला तर कॉंग्रेसचे भांडवलच संपणार आहे. कारण मते कशाच्या आधारावर मागायची, हा प्रश्‍न कॉंग्रेससमोर असेल. परंतु मानवतेचे गोडवे गाणार्‍या पुरोगाम्यांना कशाची भीती आहे? स्वातंत्र्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा रहस्यमय मृत्यू, रेल्वे प्रवासात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचा खून झाला. त्याची चौकशी होऊन मारेकर्‍यांना शिक्षा व्हावी, हे आपल्याला का वाटले नाही? कृष्णा देसाईच्या खुनाचेही तसेच. उठसूठ त्याचा दाखला देणार्‍यांना त्यापूर्वीची डाव्यांची मुंबईतील गुंडगिरी आणि त्यांनी पाडलेले खून याविषयी कधी का लिहावेसे वाटले नाही? का तुमचा पुरोगामीपणा हा कोणत्या विचाराच्या कार्यर्त्याचा खून झाला, यावर ठरतो का?डाव्यांनी केलेले खून, त्यांची गुंडगिरी, लोककल्याणकारी असल्याचे म्हणायचे आहे काय? हत्या कोणाचीही असो, ती मानवतेला काळीमा फासणारी, लोकशाहीला नख लावणारी असते, असे का वाटत नाही?

- अप्पासाहेब हत्ताळे

No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...