Sunday, 5 February 2023

अल्लमप्रभूंचे मार्दवरूप श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी

वीणा बन्नंजे

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. जवळपास सन २००० च्या आसपासची. सत्यकाम यांच्या देहत्यागानंतर माझे जमखंडीकडे जाणे  येणे सुरू झाले होते. तेव्हा माझे हितचिंतक अशोक तुंगळ यांनी एका महान व्यक्तीची भेट घालून देतो, असे सांगून मला विजयपूरला नेले. तेव्हा ते कोण, काय याची मला काहीही माहिती नव्हती. तेच पूज्य श्री सिद्धेश्‍वर स्वामीजी.

ते महनीय शुभ्र श्‍वेत वस्त्रधारी. ते माझ्याशी खूप प्रेमाने बोलले. अशोक दादांनी माझा परिचय करुन देत सांगितले, हे सुम्मने (उगीच) नावाच्या आश्रमात राहतात. त्यावर स्वामीजींनी विचारले, काय करता. मी म्हणाले, स्वामीजी काहीही करत नाही. ओह! सुम्मनेमध्ये सुम्मने (उगीच) राहता काय ?  असे म्हणत ते हसले. नाही, स्वामीजी उगीच माझ्यातील गोंधळ पाहते, असे मी सांगितले. ओह ! म्हणत स्वामीजींनी भुवया उंचावताच त्यांच्या चेहर्‍यावर कौतुक झळकले. पुन्हा प्रश्‍न विचारले, तेथील बागबगिचा (शेती)  पाहता का. मी उत्तरले, नाही स्वामीजी, बाग आमचे क्षेमकुशल पाहते. पुन्हा मंदहास्याने त्यांच्या चेहर्‍यावर कौतुक झळकले. अध्यापन करत होता म्हणे का सोडलात, असा त्यांचा प्रश्‍न. त्यावर मी उत्तरले, "मी अध्यापन करत नव्हते, अध्यापन करतेय हे समजले, ते सोडून दिले. ओह! स्वामीजी म्हणाले. माझे कोरडेशुष्क, उलटेसुलटे उत्तर. मात्र, स्वामीजी शांतपणे ऐकत होते, त्यांच्या चेहर्‍यावर हास्य कायम होते.  

त्यांचा निरोप घेताना एकदा आमच्या बागेत येण्याचे त्यांना निरोप दिले. वाह! अवश्य येऊ, असे स्वामीजी म्हणाले. त्यानंतर २००२ ची आठवण. सत्यकाम यांच्या आराधना कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेले होते. तेव्हा उत्तर कर्नाटकात त्यांचे प्रवचन सुरू होते. ते येणे जमणार नाही, असे म्हणू शकले असते. मात्र, ते आमच्या शेतात आले. त्यांना शरण आणि तंत्र हा विषर देऊन त्यावर बोलारला सांगितले होते. त्यांनी होकार दिला होता.  वेळेच्या बाबतीत ते खूपच शिस्तप्रिय असल्याचे तेव्हा मला माहीत होते. ठीक १०.३० ला कार्यक्रमाची सुरुवात होईल, १२ ते १ आपले प्रवचन राहील, असे त्यांना म्हटले होते. ते १०.२९ ला कार्यक्रमस्थळी आले. आम्हीही १०.३० ला कार्यक्रमाची सुरुवात केली. ते येणार असल्याने कार्यक्रमाला लोकांनी गर्दी केली होती. दरवर्षी सत्यकाम यांच्या  समाधीला पुष्पार्पणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्याची आमची परंपरा होती. त्यानुसार स्वामीजी समाधीजवळ आले. मात्र, पुष्पार्पण केले नाही. सर्वांसोबत हात जोडून समाधीसमोर उभे राहिले अन् परतले. म्हणजे त्यात अहंकार नव्हता. तसेच व्यासपीठावर सत्यकाम यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे आमचे नित्यक्रम होते. ते सर्व अतिथींसोबत दीपप्रज्वलन करण्यासाठी उभे असल्यासारखे उभे होते. एकाचे संपल्यावर उरलेल्यांना दीपप्रज्वलन करायला सूचवत होते. ते केव्हाही दीपप्रज्वलन, आरती केले नाहीत. छोट्या- छोट्या कार्यातही कडेला थांबलेल्या अल्लमाचे रूप !

त्यांच्या आधी इतर अतिथींची भाषणे होती. त्यांची भाषणे संपून स्वामीजींची वेळ आली तेव्हा १२.१० वाजले होते. स्वामीजी शरण आणि तंत्र हा विषय मांडून बरोबर १ वाजता थांबले. आम्ही त्यांना एक तासाचा वेळ दिला होता. आम्ही १० मिनिटे गमावल्याचे आम्हाला कळले. मात्र, वेळ चुकल्याने काळाने दिलेल्या इशार्‍यासारखे त्यांचे जीवन. दारात बसवण्णाचे वाट पाहताना त्याने न येता मुलाला पाठविल्यावर निघालेल्या कालदूत अल्लमासारखे स्वामीजीही न बोलता मौनपणे निघाले. त्यांनी शरण आणि तंत्र याविषयी केलेले विवेचन खूप सुलभ होते. लहान मुलालाही समजेल अशाप्रकारे क्रमाने अलगद एखाद्या फुलाच्या पाकळ्या काढून दाखविल्याप्रमाणे होते.

एक राजा होता. खूप चांगली फळझाडे वाढविली होती. तेथे खूप लोक येत होते. तेथे येणार्‍यांना तो फळे कापून द्यायचा. सर्वांनी त्या फळांची चव चाखून त्यांची गोडी अनुभवली. एकजण तेथे आला. राजा त्यालाही फळे द्यायला गेला. मात्र, तो म्हणाला, राजा, मला फळ नको, त्याच्या  बिया दे. राजाने त्याला बिया दिल्या. त्याने आपल्या शेतात बिया लावल्या. त्याची झाडे झाली, फळे लागली. ती पिकली. एकदा विहाराला बाहेर पडलेला राजा त्या बागेत पोहोचला. तेथे तो होता. त्याने राजाला फळे दिली. हे तंत्र, तो शरण असे स्वामीजींनी सांगितले. कसले अपूर्व उदाहरण. तंत्र म्हणजे टेक्निक, तंत्र म्हणजे काळी जादू आदी विद्या, तंत्र म्हणजे परमार्थात विस्तार होय, यासह सर्व अर्थांचा उलगडा स्वामीजींनी केला. शरणांची भूक, समर्पणाचेही प्रतिबिंब त्यात होते. मुक्तायक्काला मृत्यूचे गूढ सहजपणे उकलून सांगणार्‍या अल्लमसारखी ती रीत होती.

त्यानंतर तलावाच्या बांधकामात गुंतले होते. त्याचे उद्घाटन स्वामीजींच्या हस्ते व्हावे, ही माझी इच्छा होती. केव्हाही कलहळ्ळीला बोलावल्यावर कधीही नाही म्हटले नाहीत. यावेळेसही आनंदाने आले.  त्यांच्यात विशेष प्रेम होते. प्रत्येकाला ते आमच्यावर प्रेम करतात, असे वाटायचे. ते कसे माहीत नाही. पण मी त्यांचे प्रेम अनुभवले, हे माझे भाग्य आहे. त्यांनी तलावाचे पाणी तलावातच सांडून त्याचे उद्घाटन केले. त्या दिवशी पूज्य श्री सुत्तुरु स्वामीजी व माझे वडील बन्नंजे गोविंदाचार्यही उपस्थित होते. तलाव खोदल्यानंतर सिद्धराम अहंकारात असताना तेथे आलेले अल्लम त्यांना म्हणाले, आता दगड घडविण्याचे (वडाराचे) काम थांबव, कल्याणला चल. त्या अहंकाराविषरी अल्लमाने नाराजी व्यक्त करीत दिलेल्या इशार्‍याविषयी मी प्रास्ताविकात बोलले. तसेच मी रडत प्रार्थना केली,  ज्यांना भक्तीपूर्णरीत्या पाहते त्या श्री सिद्धेश्‍वर स्वामीजींनी मला हे दगड घडविण्याचे काम संपवून त्या कल्याणकडे चालण्याचे आशीर्वाद द्यावे. या समाजसेवेत वेळ घालविणे नकोसे झाले आहे. मला या समयसिद्धीच्या कार्यातून मुक्त करा.  त्या दिवशी स्वामीजींनी खूप वेळ आमच्या  कामाचे कौतुक केले. म्हणाले, ते सर्वकाही करुनही काही न केल्यासारखे शांत बसलेले आहेत. त्यामुळे ते आनंदी आहेत. त्यामुळेच त्यांनी आश्रमाला सुम्मने (उगीच) म्हणून नाव ठेवले आहे. ते सर्वांनी ठेवण्यासारखे नाव नाही. आपण ते नाव ठेवून पाहा, त्याचे परिणाम अनुभवा, तेव्हा आपणांस समजेल. त्याच्यात सत्यकाम  आहेत. काम आहे, मात्र ते सत्याचे काम आहे. केवळ अशाप्रकारे जगल्यास सत्यकाम म्हणावे, नाहीतर ते असत्याचे काम. येथील झाडे, जमीन पाहा, त्यात सत्याचे काम आहे, त्यामुळे हे असे आहे...ते निघताना मी खूपवेळ त्यांच्या पायावर पडून अश्रूंचा अभिषेक घालत होते. आता नको, मला या कर्मबंधनातून मुक्त करा, ही माझी आंतरिक प्रार्थना. खूप वेळानंतर मी उठताना ते मात्र घनमौन. शांतपणे डोळे मिटलेले होते. मी त्यांच्याकडे आर्तपणे पाहत होते. ते स्मितहास्य करत तेवढ्याच करुणामयीप्रमाणे हात जोडले. तितक्यात जसे काही न समजता सिद्धरामाने अल्लमाचे अनुसरण केले तसा मला अनुभव. 

२००६ च्या मध्यात सतत कलहळ्ळी सोडण्याची भावना तीव्र होत होती. २००७ मध्ये ती भावना आणखी तीव्र झाली. तेथे सुरू झालेल्या कामासह सर्व काही सोडून बाहेर पडले. तेव्हाही स्वामीजी आसपास कोठेही असल्यास भेटायला जात होते. एकदा सुत्तुरु मठात वास्तव्यास होते. सुत्तुरु श्रींच्या आमंत्रणानुसार आनंदाने जाऊन त्यांच्या दर्शन घेतले. त्यांचे वायू विहारच वैशिष्ट्यपूर्ण होते. ते डोंगर चढायला लागल्यास असे चालायचे की त्यांच्यासोबत चालणे कष्टाचे व्हायचे. ते सूर्योदय, सूर्यास्तावेळी डोंगरावर बसले असताना त्यांच्यसोबत चालणारे सत्संग अप्रुपच. ते बोलतील म्हणून आपण जायचे. ते तेथील प्रत्येकाचा परिचय करून घेऊन त्यांचे विशेष अनुभव, त्यांच्या क्षेत्रातील वेगळी माहिती, त्यांच्यातील ज्ञान याविषयीच जाणून घ्यायचे. मात्र, ते बोलायचे नाहीत. सुत्तुरुच्या वॉकिंगवेळी त्यांच्या सत्संगाच्या ओढीने मीही अनेकांसोबत डोंगर चढून गेले. ते सर्वांशी माझा परिचय करून दिला. तसेच मला बोलण्याची सूचना करत म्हणाले, 'हे खूप अनुभवी आहेत, त्यांचे बोलणे ऐका.' नाही स्वामीजी, मी आपले ऐकायला आलेय, मी बोलणार नाही, असे मी म्हणाले. तरीही ते बोला म्हणाले. मीही माझा हट्ट सोडले नाही.  स्वामीजींच्या समोरच तेथील सर्वजण स्वामीजींचा आदेश डावलू नका, बोला म्हणून आग्रह करू लागले.  तेवढ्याच सलगीने मी का बोलत नाही, हे स्वामीजी जाणतात, होय ना स्वामीजी असे मी म्हणाले. ते मंदहास्य करत होते. त्या हास्यात मला कौतुकाचे आनंद दिसत होते. माझा सात्विक हट्ट त्यांना आवडायचा. वेळोवेळी त्याचा अनुभव मी घेतले आहे. 

आणखी एकदा स्वामीजी सुत्तुरुमध्ये असताना मी एकटीच त्यांना शोधत गेले.  दरवेळी कोणा ना कोणाला घेऊन जायचे. त्यांचे दर्शन घेऊन परतण्याचा विचार होता. स्वामीजी गवताच्या शेतात एकटेच बसले होते. नमस्कार केल्यानंतर ते विचारले, "काय करत आहात?" तेव्हा मी माझ्या वडिलांच्या आत्मचरित्राचे ध्वनिमुद्रण करत होते. वडील त्यासाठी दररोज दोन तास वेळ द्यायचे. सर्व ध्वनिमुद्रण लिहून पुढे एक पुस्तक लिहायचा उद्देश असल्याचे सांगितले. स्वामीजी आस्थेने म्हणाले, "खूप चांगले काम करत आहात. मोठी व्यक्ती किती कष्ट घेतलाय, कसा मोठा बनलाय, त्यामागे काय परिश्रम आहे, हे सर्व कळायला हवे. लोकांना मोठी व्यक्ती दसते, मात्र, त्याचे हे कष्ट दिसत नाहीत. आपण आचार्यांची पार्श्वभूमी सांगायला हवी." त्याक्षणी जे सूचले ते मी विचारलेच, स्वामीजी आपण का आपले आत्मचरित्र लिहू नये ? आज आपण ज्या उंचीवर आम्हाला दिसता त्यामागे काय आहे, हे आपणही लिहा ना ? त्यांचे पटकन बाणासारखे उत्तर, "घटनाच नाहीत, काय आत्मचरित्र लिहायचे ?" हे कसले अद्भूत उत्तर. त्यानंतर मी काहीही बोललेच नाही. घट असेल तरच घटना ना? छे ! इथे एकही घटना नसल्याचे स्वामीजींनी त्यादिवशी समजावले. त्या घटकेला माझे शरीर रोमांचित झाले, अश्रूधारा वाहत होत्या. मी का रडतेय, हे त्यांना समजत होते. तरीही मौनपणे त्याच हसन्मुख चेहऱ्याने आनंदाने प्रेमपूर्वक पाहत होते. बसवण्णाला न स्वीकारता बसवण्णावर अगाध प्रेम केलेल्या अल्लमाचा भाव. 

आमच्या तलावाच्या दशकपूर्ती कार्यक्रमास पुन्हा स्वामीजी आले होते. कधीही ते निसर्ग, रोपे, झाडे,  याविषयी कोणीही ऐकायला हवे. ते एक विशेष जगत. ते रोपाचा नाजुक फुटवा व्हायचे. फुलाचा परिमळच ते. तेच फळाचे माधुर्य. निसर्गाच्या वेदनाच त्यांच्या वेदना. भूमी, जल, रोप, झाडांना दिल्या जाणाऱ्या वेदना त्यांच्यावरच केला जाणारा हिंसाचार इतके तादात्म्य त्यांच्या बोलण्यात असायचे. त्या दिवशीही ते निसर्गमय होऊनच बोलले. प्रवचन संपल्यावर ते निघाले. त्या दिवशी नाट्य निर्मिती क्षेत्रातील प्रसन्न नावाचे आणखी एख आतिथी होते. सिद्धेश्वर स्वामीजी गेल्यावर ते माझ्याजवळ येऊन म्हणाले, "त्या सिद्धेश्वर स्वामीजींजवळ काही दिवस राहू देतात का?" याविषयी मी जास्त सांगणार नाही. मात्र, विरोधकांवरही सिद्धेश्वर स्वामीजींचा कशाप्रकारे प्रभाव पडायचा, हे समजले तर पुरेसे आहे. 

खूप दिवसांपासून माझ्यात स्वामीजीच माझे अदृश्य गुरु ही भावना निर्माण झाली होती. हे मी माझ्या अनेक व्याख्यानांतूनही सांगितले आहे. तसे पाहिल्यास  नित्य स्मरण करत नव्हते.तरीही 

कोठूनतरी दूरवरून ते शुभाशीर्वाद देताहेत अशाप्रकारे भक्ती होती. एकदा माझ्या वाढदिवशी पहाटे एक स्वप्न पडले. "आज माझा वाढदिवस आहे, आपले आशीर्वाद राहूद्या" म्हणून त्यांच्या पाया पडले. त्यांनी तुम्ही निवडलेला मार्ग चांगला आहे, मी तुमच्यासोबत आहे" म्हणून आशीर्वाद दिला. त्या दिवशी मी आश्चर्यचकित झाले. कारण मी स्वतः कधीही त्यांच्याविषयी असा विचार केले नव्हते. त्याचा इतका मोठा परिणाम झाला होता की मी खूप आनंदी होते. मात्र, मी मनात ठेवू शकत नसल्याने एकदा त्यांच्याकडे जाऊन मला असे झाल्याचे सांगितले. ते फक्त हसले, आत प्रेम भरुन ओसंडून वाहत होता. 

दोन वर्षांपूर्वी एकदा मी मित्रांसह कलहळ्ळीला आले तेव्हा पूर्ण सूर्यग्रहण होते. त्यादिवशी शेतात आलेल्या २० जणांना घेऊन स्वामीजींकडे गेले होते. सर्वांनी उपवास धरला होता. स्वामीजींना नमस्कार करून खाली बसल्यावर विचारले, "स्वामीजी, ग्रहणादिवशी जेवण करू नये म्हणतात, ते कशामुळे ?" मात्र,  आमच्याकडूनच उत्तर काढून घेण्याचा त्यांचा नित्यक्रम. "ठीकंय, आपण सारे आलात ना, आपण जेवण केलात का?" असे विचारले. माझ्यासोबत आलेले सर्वजण 'नाही' म्हणाले. एकेकाला 'का जेवला नाहीत ?' म्हणून विचारले. "देवस्थानचे दरवाजेच बंद असतात, देवालाच नैवेद्य नाही, आम्ही कसे जेवायचे?" असे एकाचे उत्तर. "सर्वजण जेऊ नये म्हणून सांगतात, त्यामुळे जेवलो नाही" असे दुसऱ्या एकाचे उत्तर. "आम्हाला प्रकाश देणाऱ्या त्या देवालाच प्रकाश मिळत नाही. त्याला काही झाले असताना आम्ही आरामात बसून कसे जेवायचे?" असे एका स्त्रीचे प्रश्न. स्वामीजी म्हणाले, यांचे बोलणे चांगले आहे पाहा. तुमच्या कुटुंबाला भोजन देणारा बाप नेहमीच्या वेळी घरी परतला नाही, तो दिसलाच नाही तेव्हा तो येईपर्यंत आपण त्याची भोजनासाठी वाट पाहता; तोपर्यंत आपण भोजन करत नाही, खरंय ना. तसे असेल तर चांगले असे या माईला वाटलेय पाहा. "आम्हाला प्रकाश देणाऱ्याला काही झाले आहे, त्याला आराम मिळो, त्यानंतर भोजन करू. कोणाचीही जोडी अशी असल्यास खूप चांगले. इथे असलेले झाडे, वेली, सूर्य, चंद्र हे सर्व आपले कुटुंबीय आहेत, ही भावना मोठी आहे." असे स्वामीजी म्हणाले.गहन विषय सोपे करून सांगण्याची ही त्यांची पद्धत. आम्हाला नकळत आम्हालाच अखंडभावात बुडवून टाकण्याची ताकद होती. ही मनापुढील मोहच माया जाणा (मनद मुंदण आशेये माय काणा ) असे म्हटलेल्या अल्लमाची रीत होय. 

एकदा सुत्तुरुमध्ये माझे भाषण होते. त्यानंतर स्वामीजींचे प्रवचन होते. मी प्रेक्षकांत पहिल्या रांगेत होते. स्वामीजींच्या समोरील टेबलवर एक गुलाबाचे फूल होते. ते बोलायला लागले, "हे गुलाबाचे फूल, याचे रंग लाल आहे. गुलाबी रंगात खूप रंग आहेत. याच्या रोपाला खूप काटे आहेत. त्यामुळे अशी माती असल्यास अशाप्रकारची फुले वाढतात. त्यासाठी असे खत हवे, त्याची फांदी इतकी कापायला हवी, ते इतक्या खोल खड्ड्यात लावायला हवे, इतके ऊन हवे, इतके पाणी द्यायला हवे. हे सर्व एकानेच जाणलंय, त्याने गुलाबाचे फूल पाहिले नाही, झाडाला स्पर्श केला नाही, फुलाचा सुवास घेतला नाही. मात्र, त्याला गुलाबाविषयी सगळं समजलंय तो ज्ञानी." 

आणखी एकजण आहे. त्याने शेतात गुलाबाचे रोप लावले आहे. पाणीही दिलाय, कळीही पाहिलाय, काटेही टोचून घेतलाय, त्याला फुलाचा रंग माहिती आहे, त्याचा वासही घेतलाय, माती, पाण्याविषयी जाणतो, त्याने गुलाबाविषयी वाचले नाही, मात्र अनुभवलाय, तो तो अनुभवी. 

आणखी एकाने कधीही गुलाबाचे फूलच पाहिले नाही, त्याविषयी ऐकले नाही, वाचलेही नाही. एकाएकी त्याला कशाची तरी ओढ, ते आतून सांगतंय, तू अजून इथेच का बसलास ? चल, तिथे एख फूल आहे, बघ. कुठे आहे शोध...अशाप्रकारची ओढ. तो थांबेना, बसेना, कुठपर्यंत जायचे हे माहीत नाही. तो तसाच चालत चालत राहतो...आतला आवाज, तेच बोलावून नेतेय. तो तसाच जात राहतो. कुठे अमेरिकेत राहणाऱ्याने बोलवावे तसे तो गाव, देश सोडून कोणत्यातरी उद्यानात आला. तेच ते त्याला दिसणारे ते फूल त्याला तेथे दिसले. सुवास कळले. त्याला बाहेरचे पाहणे पुरेसे वाटले नाही. तो आत शिरला, त्याचे अंतरंग भरुन गेले. तेथेच तो नाहीसा झाला. तो अनुभावी. 

ज्ञानी बनता, अनुभवी बनता की अनुभावी बनता याचा विचार करा', असे स्वामीजी म्हणाले. हे माझ्या जीवनात अविस्मरणीय उपदेश ठरले. ते केवळ ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग याविषयी सुलभरीत्या केलेले विवेचन नव्हते तर मला आतून मारुन उठवून फुलात बुडून जा म्हणून केलेल्या आदेशाप्रमाणे आताही गुणगुणत आहे. 'मी' पणाचा अहंकार उष्टेइतकेच अभिन्न पाहा गुहेश्वरा या गूढ वचनाचे हे इतके सोपे निरुपण होय. 

खूप काही सांगण्यासारखे आहे. मात्र, स्वामीजी त्या साऱ्यांच्या पलिकडे आहेत. महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातील एक स्वच्छ, सुंदर गाव. ते गाव निश्चितच आवर्जून पाहायला हवे. तेथून मला बोलावणे आले. अमुक दिवशी सिद्धेश्वर स्वामीजी येणार आहेत, आपणही यावे, असे सांगण्यात आले. मला अन्य कोणतेही विवरण कशाला हवे ? स्वामीजी बोलावले तेव्हा जायचे. गायीच्या मागे लागलेली भूकेली वासरू मी. (हसु (सि)विन बेन्नु हत्तिद करु नानु).

सकाळी नऊच्या आत त्या गावी पोहोचायचे होते. कलहळ्ळीहून पहाटे पाचला मी मित्रांसह कारने निघाले होते. वाटेत गावांनजीकच्या रस्त्यांच्या बाजुला घाणीचे दृश्य. नैसर्गिक वैभव, सूर्योदय त्यामुळे झाकोळले गेले होते. मला खूप वाईट वाटले. तेथे पोहोचल्यावर स्वच्छ, सुंदर गाव स्वागताला सज्ज होते. एकेक निर्मल गाव. नरकातून स्वर्गात आल्याचा अनुभव होता. मला आयोजख स्वामीजींसोबत व्यासपीठावर बसायला बोलावत असल्याचे माहीत नव्हते. मी नकार दिल्यावर स्वामीजींनी डोळ्यांनीच सूचना केली. मी त्यांच्या बरोबर कशी बसेन ?  खाली जमिनीवर बसले. स्वामीजींनी मला बोलण्याचा आदेश दिला. आधीच माझ्या डोळ्यांतून अर्धे पाणी आले होते. तेथील स्वच्छता, सुंदरतेने माझे अंतरंगही धुवून पाणीच पाणी केले. संपूर्ण प्रवासात रस्त्यांत  हॄदय पिळवटून टाकणारे दु:ख होते. मी जास्त बोललेच नाही. स्वामीजींचे सामीप्य लाभेल म्हणून मी आलेली. दुसरी कोणतीही गोष्ट माझ्या आवडीची नाही. त्यांच्यासोबत बसले हे पुरेसे आहे. तरीही या स्वच्छतेला नमन. संपूर्ण देशात हे चित्र निर्माण व्हायला हवे. हे एकटे मोदी करू शकणार नाहीत. सगळ्यांत ही भावना निर्माण व्हावी. कुत्रे, मांजरही आपण केलेली अस्वच्छता दिसू नये यासाठी त्यावर माती टाकतात. हे मनुष्याला का समजत नाही ? "ईश्वरा सगळ्यांना ही बुद्धी दे, आमच्या आतील, बाहेरील अस्वच्छता दूर कर" अशी प्रार्थना करत हात जोडून रडतच मी खाली बसले. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होत्या. 

स्वामीजी बोलायला लागले. त्या गावातील स्वच्छतेचे कौतुक केल्यानंतर म्हणाले, "येथे बसल्यात ना, त्या अनुभावी आहेत. ब्रह्मवादिनी आहेत. त्यांच्या डोळ्यांतील पाण्याला खूप अर्थ आहेत..." त्यांनी सांगितलेले या जीवनाला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार होय. आता कोणी काही दिले तरी नको, हे पुरे ही भावना प्रबळ झाली. त्यांना तसे वाटल्याने जन्म सार्थक झाल्याचे वाटले.  आणखी खूप चालायचे आहे, त्यांचे विचार पाठीशी असावेत, त्यांनी चालवावे अशी प्रार्थना केले. धुक्याने झाकलेले फळ खाल्ले तर तुमची शपथ जाणा गुहेश्वरा असे अल्लमाने म्हटल्याचे आठवले. 

असे माझे परमप्रिय स्वामीजी पडल्याने हाड मोडल्यावर ते कणेरीत असताना भेटायला गेले. 'कसे आहात स्वामीजी' असे विचारल्यावर त्या वेदनेतही हसत आरामात असल्याचे म्हणाले. दुखतंय का विचारल्यावर हसतच म्हणाले, 'होय, चालताना... हात वर करताना दुखतेय.' त्यांना किती वेदना होत असतील याचा अंदाज येत होता. मला 'आपण कशा आहात?' विचारले. त्यांना पाहत आपल्या आशीर्वादाने चांगले असल्याचे म्हटले. 'आपण आनंदात राहणाऱ्या आहात. आनंद हाच आपला जीवभाव आहे. आनंदातच राहता.' म्हणाले. त्यांचे आशीर्वाद हीच भेटवस्तू होय. त्यांना न समजलेले काय आहे ? त्या हितकारक गोष्टींचा संचय घेऊन मी परतले. 

अशाप्रकारे संस्कारित केलेल्या स्वामीजींनी अन्नत्याग केल्याचे कळलेच नाही. चिक्कमंगळुरुतील काम आटोपून निघताना एका मित्राने फोन करून विचारले, 'सिद्धेश्वर स्वामीजींना बरे नाही म्हणे. ते व्हीलचेअरवर असल्याचा व्हिडिओ पाहिलो.' तेव्हा त्यालाही काही माहिती नव्हती. मीही त्यांना वयोमानानुसार काही शारीरिक त्रास असल्याचे समजले. मी मनातच देवा, ते कधीही अंथरुण धरुन कण्हायला नको, अशी प्रार्थना केले. चिक्कमंगळुरुचा प्रवास संपवून ३१ डिसेंबरला पोहोचले. मी तीन वर्षांपासून वृत्तपत्रे वाचली नव्हती. सहा वर्षांपासून टीव्हीचा संपर्क नव्हता. मोबाईलमध्ये बातम्या बघायचीही हवय नाही. या सर्व 'नाही' च्या मध्ये एक तारखेला घरी अतिथी होते. 

दोन जानेवारीला रात्री बारा वाजता अचानक श्री सिद्धेश्वर स्वामीजींना भेटायला जाण्याची भावना निर्माण झाली. तेव्हाही ते अत्यवस्थ असल्याचे मला माहीत नव्हते. टीव्ही पाहून समजल्यानंतर माझ्या कोणी आप्त मंडळींनीही मला सांगितले नाही. सगळ्यांना माहिती झाली आहे, मलाही माहिती असेल असे त्यांना वाटले असावे. अशावेळी काही माहिती नसताना, कोणीही सांगितले नसतानाही तरीही मनात तीव्र ओढ होती. त्यांना समोर पाहून झुकलेली मान, हा मार्ग चांगला आहे, या मार्गावरुनच चालत राहा, मी तुमच्या सोबत आहे, असे सांगितलेल्या घटनेचे पुनर्दर्शन झाले. स्वप्न, भ्रम नव्हे, जागेपणी अनुभव आला. तेवढेच माहीत, पुढे...

मी दुपारच्या बसने निघून रात्री अकरा वाजता हुबळीला पोहोचणार होते. त्यासाठी तिकिटही बुक केले होते.  तेथून मित्राच्या कारने विजयपूरला पोहोचण्याच्या घाईत होते. वाटेत बातमी आली. बसमधून उतरल्यावर मित्राने अंतिम अभिवंदन पत्र वाचून दाखवली. जीवनविषयक, आध्यात्मविषयक किती सुंदर विवेचन केले होते. देहाला अग्निसमपर्पित करा असे सांगितलेला भाग, स्मारक उभारू नका म्हणून दिलेला आदेश अपूर्व होता. माझ्या वाट्याला केवळ त्यांचे देहदर्शन आले. त्यांना नमन केले. 

अनेकांना त्यांनी धरलेला उपवास, देहत्यागानंतर अग्निसमपर्पित करण्याची सूचना ही जैन धर्माची भूमिका असल्याची भावना होती. अनेकांना त्यांना वेदोक्ताविषयी आसक्ती असल्याचे वाटत होते. प्रकृती तत्त्व जाणणाऱ्यांंना, सिद्धेश्वर स्वामीजींनी अल्लमाच्या 'बयलु'चा केलेला उल्लेख वाचल्यावर वेगळाच प्रकाश दिसला होता. या पंचमहाभूतांत देह नावाचा हा पंचमहाभूत लीन व्हावा. त्यासाठी हा देह किंचितही न ठेवता 'बयलु' मय करणे अग्निशिवाय कोणाला साध्य आहे ? 

पंचभूतांत जल, भूमीची वाकडीतिकडी चाल आहे. मात्र, केवळ अग्निची चाल उर्ध्वमुखी आहे. त्यामुळे  अल्लमाने सांगितल्याप्रमाणे स्वामीजी 'बयलु' झाले. 

अंगाराच्या गिरीवर पाहिला मी लाखाचा खांब

त्या लाखाच्या खांबावर होता एक हंस, 

जळला खांब, उडाला हंस, 

लपला कुठे अंगारा, हे गुहेश्वरा. 

एवढे मात्र जागरुकपणे पाहिले आहेत. तसे नसेल तर का सोडून गेले ? खांब जळाल्याचे पाहिल्यावरच हंस उडण्यासाठीच उपवासाला सुरुवात केला होता. 'बयलु' व्हावे, कोणत्याही खाणाखुणा राहू नयेत यासाठीच अग्निसमपर्पणाचा निर्णय घेतला. चिताभस्मही कोणाच्या हाती लागू नये अशाप्रकारे नदीत विसर्जित करण्याचा आदेश दिला. समाधिस्थ होणारे महात्मा भक्तांची हाक ऐकून येतात, त्यांच्या संकटांचे हरण करतात अशी भावना आहे. मात्र, स्वामीजींनी देहत्यागानंतर वाट पाहीन ही भावना टिकवण्याचा भरवसाही दिला नाही. 

 असेच एकदा स्वामीजींसोबत बसले होते. तेथे आलेल्या एकांनी विचारले, स्वामीजी, खूप वर्षांपासून प्रवचन सांगता, आपले प्रवचन ऐकून कोणी बदललेय, मोठे झालेत असे वाटलेय का ? स्वामीजी स्मितहास्य करत म्हणाले, "मी बदलायला लागलोय" म्हणाले. आध्यात्मात केवळ आत्मोद्धार, परोद्धार, समाजोध्दाराचा कोणताही लेषही नसल्याचे प्रखर अल्लमतत्त्व मांडले. 

"आपण खूप लवकर मोहात अडकतो; मात्र, पुढे ते आपल्यावर राज्य करते" असे सांगून स्वामीजींनी एक कथा सांगितली. "एकजण नदीकाठी बसला होता. त्याच्यासोबत एकजण होता. तो नदीकडे पाहिला. नदीतून कांबळ वाहत चालले होते. वाह! थंडीत कांबळ असल्यास ते पांघरल्यास गरम राहील. त्याने कांबळच्या मोहाने नदीत उडी मारली. पोहत जाऊन कांबळ पकडला. थोड्या वेळात वाचवा वाचवा म्हणून हाका मारू लागला.तो कांबळच्या मोहाने गेला होता, मात्र ती कांबळ नव्हे अस्वल होते. अस्वलाच्या तावडीतून कसे निसटायचे यासाठी धडपडत होता. आपले सगळे मोह अशाच असतात, गरम म्हणून जातो त्यानंतर त्याच्या हाती सापडून मरतो. मोहाला बळी पडण्यापूर्वी विचार करा." असे स्वामीजी म्हणाले. त्यांनी केलेल्या त्यागाची यादी पाहिल्यास आपण किती सोडले आहे. घर सोडले, गाव सोडले हे सर्व किती सामान्य बाब आहे. खऱ्या अर्थाने जे सोडायचे आहे ते वेगळे असल्याचे स्वामीजी मला सूचवून गेले. 

एकदा हुल्याळ आश्रमावर त्यांच्या पायाजवळ बसले होते. स्वामीजी निसर्ग व विज्ञान याविषयी खूप अद्भुतपणे बोलत होते. आताही मला ते आठवून आनंद होते. सांगता येणार नाही असे विवेचन त्यांनी केले. अचानक खालून एक आवाज आला, 'कोठे आहे तो सिद्ध्या?' तो आवाज ओळखीचा असल्यागत स्वामीजी उठले, आम्हीही उठलो. तो खालून पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत होता. तो आवाज देणारे दिसले. भगवेधारी वयस्कर स्वामीजी होते, त्यांच्यासोबत दोघे शिष्य होते. त्या स्वामीजींना हात जोडून आपली खुर्ची दाखवत त्यावर त्यांना बसायला सांगितले. त्यांचा जोरात पुन्हा प्रश्न,  'कोठे आहे तो सिद्ध्या?' सोबत असलेले शिष्य 'ते हेच, आपण यांनाच विचारत आहात.' असे सांगत स्वामीजींना दाखवले. "हा नाही, मला सिद्ध्याला पाहायचंय" म्हणून पुन्हा ओरडत निघाले. आपल्याला भेटायचेय म्हणून खूप सांगितले होते. मात्र, आता त्यांना आपली ओळख पटेना. स्मृतिभ्रंश झाला आहे, त्यामुळे ते असे करतात, असे सांगून नमस्कार करून शिष्यही निघाले. त्यांनी सिद्ध्या कोठे आहे ? म्हणून जोरात विचारलेला आवाज पूर्ण विरुन जाईपर्यंत स्वामीजी शांतपणे बसले होते. हळुवारपणे स्वामीजी म्हणाले, "एकेकाळी ते खूप मोठे ज्ञानी होते, स्वतःची ओळख स्वतःला नाही इतका विसर. त्यानंतर गप्प बसले.

बयलु बयलचि पेरुनि बयलु पिकवुनि

बयलु बयलायितय्या 

म्हटलेल्या अल्लमासारखी स्पष्ट भूमिका. गुहेश्वर बयलु इतकी स्पष्टता स्वामीजींची होत

एका पंथात असूनही सर्व पंथीयांना आपले वाटले. पंथाच्या बाहेरील लोकांनाही मोठे केले. उपनिषद, वेद आदींची वचनांशी सांगड घातली. प्रत्येकात आपलेच हा भाव जागवले. शेवटी मी कोणाचा नाही, ही घोषणा केली. तसेच प निषेधालाही सज्ज झाल्यागत 'बयलु' व्हायचा निर्धार केला. पुन्हा 'तुला शरणांचे बंधन मला तेही नाही' अशाप्रकारे अल्लमाच्याच दिशेने वाटचाल. पण दोघांत एकच विरोधाभास आहे. अल्लम समाजात न राहता पूर्णपणे दूर राहून आपल्या मार्गावर चालत राहिला. स्वामीजी लोकांतच राहून, सर्व गोष्टींत अडकूनही इथे नाही, हे दाखवून दिले. हे खूप दुर्मिळ आहे. 

इतके होऊनही सत्यही नाही असत्यही नाही

सहजही नाही असहजही नाही

मीही नाही हे सर्व मान्य करू. पण आमच्या डोळ्यांसमोर आचरण करुन जीवंत देवत्वाचा अनुभव दिलेले आपण असताना तूही नाही, हे कसे मान्य करायचे सांगा स्वामीजी ? अल्लमाच्या तूही नाही वचनाची त्याच्याइतकेच कठोरपणे न बोलता, न वागता अत्यंत सौम्यपणे नवीन मांडणी केलात. त्याचा खरा अर्थ  आपण नाही तर दुसरे कोण समजावणार ? कदाचित आपण निष्ठुरपणे समाजापासून दूर राहिलेल्या अल्लमावर प्रेम न करताही राहाल कोण जाणे. मात्र, आम्हाला प्रेम देऊन, आमच्यात आपलेपणाची भावना जागवलात. आता  अचानक आम्हाला दूर सारल्यास हे कठोर सत्य कसे स्वीकारायचे हे सांगा? 

त्रासदायक झालेय बोलणे ओझे झालेय मौन 

वेदना विरल्या डोळ्यांत 

पायी टोचलेला काटा

आतच मोडल्यागत

डंख मारतोय भाव मनी



No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...