Thursday 2 February 2023

शिवयोगी सिद्धरामाने दिले शरण चळवळीला बळ



 ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी योगीकुल चक्रवर्ती, शरणश्रेष्ठ श्री सिद्धरामाविषयी म्हणतात, "श्री सिद्धरामेश्वर हे योगीपुरुष, आत्मानुभवी होते. त्यांची वचने मधुर - मंत्र, शब्द - हंस होत. ते दृष्टीच्या मार्गे अंतरंगात प्रवेश करतात. तेथे पसरलेल्या मनसागरात तरंगतात. तेथून वर आलेले छोटेछोटे तरंग विचारांच्या शेकडो लाटा निर्माण करतात." यातून श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी श्री शिवयोगी सिद्धरामांच्या वचनांचे स्वरूप व सामर्थ्य विषद केले आहे. ते लोककल्याणकारी संत, कायक - शिवयोगी,  वचनकार म्हणून श्रेष्ठ आहेतच. शिवाय कल्याणक्रांतीनंर शरणसंकुल निर्नायकी होऊन सैरभैर झालेला असताना आपल्या हाती नेतृत्व घेतले. शून्य सिंहासनाचे अधिपती म्हणून आपल्या समर्थ नेतृत्वाने व चाणाक्षपणे शरण चळवळीला बलशाली बनविण्याचे कार्य केले. त्यामुळेच तो शिवशरणांच्या हत्या व रक्तपाताच्या आघातांना झेलूनही विस्तारला. 

बाराव्या शतकात शिवशरणांनी चांभार हरळय्याचा मुलगा शीलवंत व ब्राह्मण मंत्री मधुवरस याची कन्या कलावती यांचा विवाह अनुभव मंटपात लावला. यामुळे तत्कालीन राजा बिज्जळ व त्यांचा पुरोहितवर्ग यांनी वर्णसंकर होत आहे म्हणून गदारोळ उठवला. यामुळे प्रधानमंत्री बसवण्णांनी पदाचा राजीनामा दिला. राजाने हरळय्या व मधुवरस यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. त्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार करण्यात आले.  कल्याणात हलकल्लोळ माजला. अनुभव मंटपातील शरणजन देशांत इतस्तत: विखुरले गेले.  दरम्यान, हरळय्या, मधूवरस व शीलवंत यांच्या हत्येचा सूड घेण्याचा निर्धार शरण जगदेव व मल्लिबोम्मण्णा यांनी केला. त्यांनी एके दिवशी भर रस्त्यात राजा बिज्जळाचा वध केला. त्यानंतर बिज्जळाचा मुलगा सोयिदेवने सर्व शरणांना शोधून शोधून मारण्याची आज्ञा केली. त्यावेळी मोठ्‌‌‌या प्रमाणात शिवशरणांसह लोकांच्या हत्या झाल्या. दरम्यान, शरणांचे नायक  बसवण्णा तेथे न थांबता कल्याण सोडून निघून गेले होते. तेथे ते लिंगैक्य पावले. अल्लमप्रभू देवांनी श्रीशैलची वाट धरली. गणाचार दलासह लढत निघालेले चन्नबसवण्णा उळवीत लिंगैक्य झाले. महत्त्वाचे सगळे शिवशरण कल्याण सोडल्याने तेथे उरलेले शिवशरण नेतृत्वाविना दिशाहीन झाले होते. त्यांना काही सूचेनासे झाले होते. अशा स्थितीत सोन्नलगीचे सिद्धराम उभे राहिले. उरलेल्या शरणांना धैर्य दिले. आपण सारे शरण नवसमाजाच्या निर्मितीसाठीच कल्याणला आलोय. 'धर्म हा समाजाच्या उद्धारासाठी आहे, या विश्वासाने बसवण्णांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू केली; रोजगारासाठी नव्हे. त्यामुळे कोणी धीर सोडण्याची गरज नाही. आत्मस्थैर्य गमावू नका',  असे सांगत सिद्धरामांनी पुढाकार घेऊन सर्व शिवशरणांना धीर दिला. तसेच त्यांना पुन्हा संघटित केले. मोळिगे मारय्यासारखे ज्येष्ठ शरण सिद्धरामांच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर सिद्धरामांच्या नेतृत्वाखाली कल्याणात पुन्हा वीरशैव लिंगायत धर्माचा, बसवण्णांचा, शरणतत्त्वांचा जयजयकार घुमू लागला. 

शिवशरणांनी पुन्हा आपल्या 'कायक'ला सुरुवात केली. अनुभव मंटपाचे दार उघडले. मात्र, आता शून्य सिंहासनाचा अधिपती कोण बनणार ? त्यावर कोण बसणार? हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा सोड्डळ बाचरस यांनी उद्घोषणा केली, ''योगियांचा योगी शिवयोगी सोड्डळ सिद्धराम हाचि एक योगी.'' (योगिगळ योगी शिवयोगी सोड्डळ सिद्धरामनोब्बने योगी) सर्व शिवशरणांनी हात उंचावत त्यांना अनुमोदन दिले. तिसरे पीठाधिपती म्हणून सिद्धराम शून्य सिंहासनावर विराजमान झाले.

राजा बिज्जळाच्या हत्येनंतर सिंहासनासाठी त्याचा मुलगा राज मुरारी सोयिदेव व त्याचा भाऊ कर्णदेव या दोघांत कलह सुरू होता. दोघेही समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. तेव्हा पुन्हा शरण संकुल अतिशय सबल बनले होते. सिद्धरामांनी ते एक राज्य हलवू शकेल अथवा एका राज्याची पुनर्रचना करू शकेल, इतके त्याला बलशाली बनविले होते. बिज्जळाचा भाऊ कर्णदेवाने सोन्नलगीच्या सिद्धरामांना संदेश पाठवून कल्याणच्या सिंहासनावर बसवण्यासाठी सहाय्य आणि आशीर्वाद मागितले. कवी   राघवांकाने आपले काव्य 'सिद्धराम चरित्रे'मध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. (पृष्ठ ८२).

या घटनेपूर्वी शरण चळवळीने राजकीय सलगीचा परिणाम भोगला होता. त्यामुळे सिद्धरामांनी चाणाक्षपणे कर्णदेवाचा प्रस्ताव नाकारला. केवळ धर्मकार्य हे एकच ध्येय मानून ते कार्यप्रवृत्त झाले. त्यांनी आपले शरीर वृथा कार्यात झिजविण्याऐवजी नित्य 'कायक'ला आपले जीवनमंत्र बनविले. त्यामुळे सिद्धराम जनप्रिय झाले. राघवांकाने "साकारनिष्ठे भुतंगळोळगनुकंपे ताने परबोम्म" अशा शब्दांत सिद्धरामांचा गौरव केला आहे. आपल्या लोककल्याणाच्या कार्यांमुळे प्रसिद्ध झालेल्या सिद्धरामांनी अल्लमप्रभू देवांचे शिष्य म्हणून शरण संकुलात केलेला प्रवेश शरण चळवळीला विजयमार्गावर नेणारा ठरला.



No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...