वृषांक भट
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे
थोडीशी जरी प्रसिद्धी मिळाली तरी 'मी मोठा व्यक्ती' म्हणून मिरविणाऱ्यांंत श्री सिद्धेश्वर स्वामीजी हे अभिन्न आदर्श म्हणून दिसतात. अपरिग्रह व्रताचे कठोरपणे अनुसरण करताना चालून आलेले पद्मश्रीसह अनेक पुरस्कार नम्रतेने ते नाकारलेले सिद्धेश्वर स्वामीजी संतपरंपरेत पहिल्या रांगेत आहेत.
सिद्धेश्वर स्वामीजी हे उत्तर कर्नाटकात सर्वाधिक प्रसिद्ध होते. मात्र, त्यांनी कधीही प्रसिद्धीची आशा बाळगली नाही. कमीत कमी एक पत्रकार परिषदही त्यांनी कधीही बोलावली नाही. राजकारण्यांना भेटून अनुदान, सहकार्य मागणे ही तर दूरची गोष्ट. त्यांनी आपले प्रवचन टीव्हीवर दाखवावे, वृत्तपत्रांंत प्रसिद्ध व्हावे, अशी एकदाही अपेक्षा केली नाही. राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभाग नोंदवून विद्वत्तेचे प्रदर्शन घडविणेही दूरची गोष्ट. तरीही लाखो लोकांची मने जिंकली. आपले कौतुक करावे, आपली प्रशंसा करावी याची अपेक्षा न ठेवलेल्या या साध्या संताने प्रामाणिक आध्यात्मिक जीवनाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात स्थान मिळविले.
सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रवचनांना न गेलेल्यांना ते कसे चालायचे याविषयी येथे स्पष्टपणे सांगायलाच हवे. सूर्योदयाला सुरू होणारे प्रवचन सुमारे एक तास चालायचे. ३० दिवस एकाच ठिकाणी प्रवचन चालायचे. गुळाला लागणाऱ्या मुंग्यांप्रमाणे हजारो लोक प्रवचन सुरू होण्याआधी एकत्र यायचे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमले तरी कोठेही आवाज नाही! गूढ मौन. कोणत्याही कोपऱ्यात एखाद्याने खोकले तरी सर्वांना ऐकू यावे इतके निशब्द! लोक जमताच श्वेतवस्त्र धारण केलेले सिद्धेश्वर स्वामीजी माईकपुढे उभे राहायचे, प्रवचन सुरू करायचे. एक शब्दही चुकीचा जाणार नाही इतके स्पष्ट चिंतन असायचे. आपण सांगितलेली कोणतीही गोष्ट पुन्हा एकदा सांगून दुरुस्ती करणारे नव्हते !
प्रवचन संपताच स्वामीजी व्यासपीठावरून उतरून जायचे. भक्तांनी निघावे, यासाठी कोणी माईकवरुन सूचना देत नव्हते. स्वामीजी व्यासपीठावरून उतरले, हीच प्रवचन संपल्याची सूचना ! आलेल्या भक्तांमध्ये किती ती शिस्त! कसले ते मौन ! कसली ती नम्रता ! खरंच हा भारत का इतका संभ्रम ! खरा भारत असाच असल्याचे हे निदर्शक !
तर विजयपुरात असलेल्या सिद्धेश्वर स्वामीजींच्या ज्ञानयोगाश्रमाचे मूलतत्त्वे कोणती हे माहीत आहे का?
कर्मयोग ! भक्तियोग ! ध्यानयोग ! ज्ञानयोग !
No comments:
Post a Comment