ह्यांग सत्ते कुंयव्वा,
निन्न गंड परदेसी,
बळ्ळोळ्ळी बनदाग, उळ्याडी अळतानं...
आषाढ महिन्यातील दर बुधवारी हे गीत गात शोकमग्न मुली गुळ्ळव्वाला निरोप द्यायची. शेतशिवारं मुला - मुलींच्या गर्दीने फुलायची. त्यांच्या खेळांनी शिवार चैतन्यमय व्हायचं. निमित्त असायचं आषाढ महिन्यात दर मंगळवारी येणाऱ्या गुळ्ळव्वा उत्सवाचं. आज यंदाच्या आषाढातला तिसरा मंगळवार. मात्र, आता आषाढातल्या दर बुधवारचं हे चित्र लुप्त झालंय. केवळ मंगळवारी घरोघरी होणारी पूजा उरलीय. 'मुठीतल्या दुनिये'त अडकलेल्या मुला - मुलींना ना याचं आकर्षण, ना माहिती आहे. त्याला काही अंशी आपणही जबाबदार आहोत.
उत्तर कर्नाटकासह महाराष्ट्रातील सीमाभागात आषाढ महिन्यात येणाऱ्या मंगळवारी हा उत्सव साजरा होतो. कारहुणवीनंतर येणारा हा शेतकऱ्यांचा आणखी एक सण. कर्नाटकातील काही ठिकाणी कन्नडमध्ये 'मण्णेत्तीन अमावस्या' साजरी केली जाते. माझ्या लहानपणी मुला -मुलींना या उत्सवाची खूप ओढ असायची. म्हणूनच म्हटलं जायचं.
गुळ्ळव्वा गुळ्ळव्वा एंद बरती,
गुड्डक्क होगी गुलगंजी तरतिनी,
एंद बरती, इलकलक होगी सीरी तरतिनी,
गुळेदगुड्डक्क होगी खणा, गोकाकक होगी करदंट तरतिनी, एंद बरती
अशाप्रकारे पुढे असेही म्हटलं जायचं.
गुड्डक्क होगलिल्ला गुळ्ळव्वन मण्ण तरलिल्ला,
सुळ्ळ बंतव्वा नागर पंचमी
इतकी ओढ तेव्हाच्या लहान मुलांना असायची.
संपूर्ण जगताचे भरणपोषण करणाऱ्या, अन्न देणाऱ्या भूमातेची पूजा करण्यासाठी विविध सण, उत्सवांची परंपरा चालत आली आहे. एका ऋतूत मातीची पाचवेळा पूजा केली जाते. कारहुणवीनंतर आषाढात मातीचे बैल, गुळ्ळव्वाची पूजा, नागपंचमीला वारुळाची पूजा, गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तीची पूजा, जोकुमारची पूजा केली जाते. माती ही शक्तिदेवता समजून गुळ्ळव्वाचा सण साजरा केला जातो. विशेषतः मुली व मुलांसाठी हा सण वैशिष्ट्यपूर्ण आहे.
आषाढ महिन्यातील दर मंगळवारी मुली चुरमुरे, दाळगा, शेंगा घेऊन लहान मुला-मुलींसह शेतात जाऊन माती आणतात. त्या मातीने गुळ्ळव्वा व बैलांची मूर्ती बनवण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी तळवारकी असलेल्या कुटुंबातील महिलांनी पाटलांसह प्रमुख कुटुंबांच्या घरी माती आणून देण्याची तर काही ठिकाणी कुंभारांनी मूर्ती बनवून विकण्याची पध्दत आहे. गुळ्ळव्वाची मूर्ती बनवण्याची पद्धत आणि आकार दर मंगळवारी बदलते. यानिमित्त देवस्थान, मोर, साप, विंचू, रेडा आदी मूर्तीही बनवल्या जातात. तसेच बैलांच्या मूर्तीही बनवतात. गुलगंज व रंगीबेरंगी करडईच्या बियांनी गुळ्ळव्वाचा शृंगार तर बैलांची सजावट केली जाते. विशेष म्हणजे माझ्या लहानपणी दोन्ही मूर्ती चांगले बनवणाऱ्यांच्या घरी त्या बनवून घेण्यासाठी मुली व मुलांची गर्दी व्हायची. अनेक महिला गुळ्ळव्वाच नव्हे तर बैलांच्याही साचेबद्ध, आकर्षक व सुंदर मूर्ती तयार करायच्या. त्यांच्याकडूनच मूर्ती बनवून घेण्यासाठी मुली व मुले आपल्या पालकांसह त्यांच्याकडे हट्ट धरायची. तसेच एक पुरुष मूर्तीही तयार केली जाते. तो गुळ्ळव्वाचा नवरा गोग्गप्पा. नंतर सायंकाळी गुळ्ळव्वा व बैैलांची पूजा, आरती केली जाते. तसेच शेवयाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर मुली मैत्रिणींसह गाणी म्हणतात. या गाण्यांनी जानपद समृद्ध केले आहे.
वंद हुंचिनकप्प ना माडिद तप्प,
भिमारती होळी होळीतन सेळे,
सेळे बागिलू तेरेये गौरम्मा...गंगम्मा...
बसवग बसव एन्निरी बसवन पादक शरणेन्निरी...
गुळव्वन मण्ण तरलिल्ल गुलगंजी हच्ची आडलिल्ल,
सुळ्ळ बंतल्लव नागर पंचमी...!
बुधवारी खेळ, वनभोजन
बुधवारी खेळांसह जेवणालाही प्राधान्य असायचे. या दिवशी मुला - मुलींसह अख्खे कुटुंब शेतात असायचे. मात्र हे चित्र आज दिसत नाही. मुला - मुलींसाठी खेळ अविस्मरणीय क्षण असायचे. मुले - मुली गट बनवून वेगवेगळे खेळ खेळायचे. वनभोजनाचा आनंद घ्यायचे. यासाठी धपाटे, बाजरीच्या भाकरी, वांगीची भाजी, शेंगा चटणी, दही, शेंगा पोळी, घारगे आदी पदार्थांचा आस्वाद घ्यायचे. मुली शोक करत गुळ्ळव्वाचे शेतातील मातीत विसर्जन करून घरी परतायच्या. 'गुळ्ळव्वा देवता नाही' अशी म्हण प्रचलित आहे. तरीही ग्रामीण व शेतकरी यांचे मातीवरील प्रेम, निष्ठा, श्रद्धा व आराधनेला तोड नाही. परंतु आज ग्रामीण लोकांसाठी केवळ ही आठवण बनली आहे.
No comments:
Post a Comment