Saturday 25 February 2023

ज्ञानालाच नव्हे, ज्ञानींनाही मृत्यू नाही, ते खऱ्या अर्थाने 'प्रज्ञा'वंत !

 


पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्याविषयी विचार करताना आठवतेय त्यांचे प्रवचन. मी स्वतः त्यांच्या दहा - बारा प्रवचन कार्यक्रमात सहभागी झालो आहे. शेकडो प्रवचने यूट्यूबसह इतर सोशल मीडियांत ऐकलो आहे. सुमारे १९ वर्षांपूर्वी कर्नाटक - महाराष्ट्र सीमाभागातील जत येथे चाललेल्या प्रवचनात सुमारे १५ हजार लोक सहभागी झाले होते. दूरदूरच्या गावातील लोक पहाटे तीन - चारला झोपेतून उठून बैलगाड्या - ट्रॅक्टरने एक - दोन तासाचा प्रवास करून त्यांच्या प्रवचनाला आल्याचे मी डोळ्यांनी पाहिलो आहे. हे केवळ एक - दोन दिवस नव्हे, तर महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमात दररोज न चुकता लोक हजेरी लावायचे. पहिल्या दिवशी आलेले एकही दिवस न चुकवता शेवटच्या दिवसापर्यंत कार्यक्रमात सहभागी होणारेच बहुसंख्य असायचे. तेव्हा गावात कोणतेही कार्यक्रम होत नव्हते. दिवसातून एक तास प्रवचन ऐकण्यासाठी संपूर्ण कुटुंबीय यायचे.

त्यादिवशी मी प्रथमच त्यांचे प्रवचन ऐकत होतो.  त्यादिवशी ग्रामीण जनताच बहुसंख्य असलेल्या कार्यक्रमात सिद्धेश्वर स्वामीजी 'गणित आणि जीवन' याविषयी बोलले. 'आज मी तुम्हाला गणिताविषयी सांगणार आहे...' म्हणून सुरुवात केल्यावर मला खरेच आश्चर्य वाटले. या खेड्यातल्या लोकांपर्यंत हा विषय कसा पोहोचेल, ते तो कसा स्वीकारतील, असे वाटले होते. जर मला त्याविषयी एक तास बोलायला सांगितले असते तर ते शक्य झाले नसते. इतरांना फारसे माहिती नसलेला, कठीण विषय सामान्यातल्या सामान्यालाही समजेल अशा प्रकारे सांगणे सामान्य काम नाही. आपण एखादा विषय स्पष्टपणे, खोलवर, विस्तृत जाणत असला तरच इतरांना नीट, सुलभरीत्या समजावून सांगणे शक्य आहे. तुम्हाला माहीत असलेला विषय इतरांना समजेल अशाप्रकारे सांगता येत नसल्यास तो विषय तूम्हालाच पूर्णपणे कळला नाही, असा त्याचा अर्थ आहे. काहीजण इतरांना सांगताना, 'हे तुला कसे सांगावे हे मला समजेना' ऐकला असाल. आपण नीट समजून घेतले तरच इतरांना समजेल अशा प्रकारे सांगणे शक्य आहे. त्यातच इतरांना माहीत नसलेला विषय समजावून सांगणे एक आव्हान आहे. त्या दिवशी सिद्धेश्वर स्वामीजींनी खेडुतांना गणिताच्या पायथागोरस थेरम, गुरुत्वाकर्षण नियम, E=mc^2, व्यास, त्रिज्या, थर्मोडायनामिक्स याविषयी सांगत ते त्यांनी (खेडूत) समजून घेण्याच्या प्रयोजनाविषयी विवेचन केले. मी विज्ञानाचा विद्यार्थी असूनही, ते शिकूनही सत्य जीवनात गणित, विज्ञानाची सूत्रे कशी आचरणात आणली पाहिजेत, याचा विचार केला नव्हता. दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनात 'विमान कसा उडतो' याविषयी बोलले. कार्यक्रमात एखादाही झोपताना, जांभया देताना दिसला नाही. त्यादिवशी त्यांनी एरोडायनामिक्स थिअरीविषयी सांगितले. दहा - बारा शास्त्रज्ञांच्या नावांचा उल्लेख केला. एरोडायनामिक्स थिअरीविषयी सांगताना मधमाशाची कथा सांगितली.

'आपण सर्वजण मधमाशी पाहिलात; त्याचा देह मोठा आहे, मात्र, पंख पातळ आहेत. देहाचा आकार आणि पंख यांच्यात खूप विरोधाभास आहे. एरोडायनामिक्स नियमानुसार मधमाशी उडायलाच नको. उडणेही शक्य नाही. तरीही ते कितीतरी हजारो वर्षांपासून उडत आहे. विमानाचा शोध लागण्याच्या आधीपासून मधमाशी उडत आहे. ते कसे ?' म्हणून विचारले. 'नंतर स्वामीजींनीच विवेचन केले - ',कारण त्या मधमाश्यांना एरोडायनामिक्स थिअरी म्हणजे काय, हे माहिती नाही. त्यांनी ती थिअरी वाचली नाही. त्यामुळे ते उडत आहेत. मनुष्य ही थिअरी जाणण्यामागे मधमाशी हे एक कारण आहे. मधमाश्याप्रमाणे विमान डिझाइन केल्यास उडेल, मात्र, खूप दूरपर्यंत उडणार नाही' असे सामान्यांनाही समजेल अशाप्रकारे विवेचन केले. मनुष्यही या मधमाश्यांसारखा आहे. आपल्याला आपल्या बल आणि बलहीनता माहिती असाव्यात. भीमाला त्याची शक्ती माहिती नव्हती म्हणे. त्यामुळे त्याने दहा हत्तींसमोर शड्डू ठोकून उभा राहिला. कृष्णाला आपल्या बलहीनतेची माहितीच नव्हती. त्यामुळे तो देव झाला.' असे सांगून स्वामीजींनी त्या प्रसंगाची खऱ्या जीवनाशी तुलना केली. 

सिध्देश्वर स्वामीजी हे उत्तम व्याख्यात्यापेक्षा अद्भुत संवादक आहेत, असे अनेकदा मला वाटले आहे. व्याख्यात्यातील शाब्दिक चढ - उतार, अतिशयोक्ती, अलंकार आदी कोणतेही नव्हते. त्यात उद्वेग,  उद्घोष, गर्जना, अवमानकारकही नव्हते. त्यांचे प्रवचन म्हणजे एकप्रकारे संथ वाहणाऱ्या नितळ शाल्मलेचा प्रवाह होय. तेथे कोणतीही घोषणा, खुशामत, आत्मप्रशंसा काहीही नाही. त्यांचे बोलणे अशिक्षितापासून शिक्षितापर्यंत एकाच तरंगांतराने भिडायचे. त्यांचे बोलणे कधीही श्रोत्यांना संभ्रमित करणारे नसायचे. कोणीही न ऐकलेल्या मोठमोठ्या तत्त्वज्ञानी, विचारवंत, बुद्धिजीवींच्या नावांचा ते उल्लेख करायचे. बसव, बुद्ध, अरिस्टाटल, प्लेटो, कन्फ्युशियस, गुड्जिफ, थामस अक्विनास, इमर्सन, डेव्हिड ह्युम, जॉन लोके...आदी अनेक तत्त्वज्ञानी मंडळींचे विचार प्रवचनातून मांडायचे. त्यात तत्त्वज्ञानी मंडळींचा गौरव असायाचा, ते सगळे मला माहिती आहेत, हे स्वकौतुक नव्हे. त्या महान तत्त्ववेत्त्यांचे विचार आपल्या सामान्य शेतकरी, खेड्यातील लोकांच्या ज्ञान,  विचारांशी किती साधर्म्य राखतात, हे सांगण्यासाठी ते त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख करायचे. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नसायचा. एकदा ते प्रवचन सुरू करण्याआधी जवळच पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. त्यादिवशी ते पक्ष्यांचे स्वारस्य आणि रोचक जगताविषयीच ते एक तासभर बोलले. त्यांच्या प्रवचनासाठी उभारलेल्या व्यासपीठासमोर साकारलेली सुंदर रांगोळी पाहून 'रांगोळी का घालावी, त्याचे महत्त्व काय?' याविषयीच संपूर्ण प्रवचन केले. त्यात दहाएक कथा, दृष्टांत, घटना, नीतिकथा असायच्या. स्वामीजी कोणत्याही प्रवचनाची कधीही पूर्वतयारी करत नव्हते. छोटीसी चिठ्ठीही कधी लिहून ठेवून घ्यायचे नाहीत. टिपण काढायचे तर विचारुच नका. ते लहान मुलांनाही रॉकेट सायन्स समजेल, कुतूहल निर्माण होईल अशा प्रकारे सांगायचे. त्यांच्याकडे मनगटी घड्याळ नसायचे. बरोबर एक तास होताच ते प्रवचन थांबवायचे. पुन्हा उद्या सर्वकाही नवीन असायचे. 

स्वामीजींच्या बोलण्यात 'हिडन अजेंडा' नसायचे. जाती, धर्म, पंथ, कुल - गोत्रांचे प्रवर्तकपण, प्रवक्तेपण नसायचे. त्यांची मुख्य चिंता ही मनुष्य कल्याण, समाजहित असायची. त्यामुळे ते सर्वधर्मियांना आवडायचे. साधारणपणे कोणत्याही मनुष्याला कोठेतरी आपले विचार, सिद्धांत, अस्तित्व मांडण्याची इच्छा असते. त्याला छोटे मोठे का होईना पण आपलेच एक साम्राज्य उभे करण्याची हितासक्ती असते. मात्र, सिद्धेश्वर स्वामीजींची हितासक्ती स्वतःला सर्वत्र नाकारण्यातच होती. ती लौकिकापासून दूर होण्यात होती. त्यांनी स्वतः साठी कशाचीही आकांक्षा बाळगली नाही. त्यांना खासगी आणि वैयक्तिक असे काहीच नव्हते.

मनुष्याला आरामात जगण्यासाठी पैशांची गरज असते. मात्र, त्यांनी त्याचीही आकांक्षा बाळगली नाही. पैसा पाहिल्यावर आगीला पाहिल्यासारखे व्हायचे. त्याला कधी करंगळीनेही शिवले नाही. त्यांनी ज्ञानलोकात महाल बांधला होता. त्या जगतात पैशांचा व्यवहारच नव्हता. त्यामुळे त्यांनी पैशाच्या स्त्रोतापासून निर्माण होणाऱ्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षाच केली नाही. ज्ञान आणि विवेक यापेक्षा काहीही चांगले नाही. पैसा त्यापुढे नीरस असल्याचे त्यांनी जाणले होते. त्यामुळे  त्यांच्या जवळ आलेल्यांना त्यांनी ज्ञान व विवेक दिले. त्यातच त्यांनी सुख अनुभवले.  तेवढेच नव्हे, त्यासाठीच ते आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले. ज्ञान कोणीही चोरून नेऊ शकत नाही, त्याचा नाश करू शकत नाही. त्याचा ठाव कुणाला लागू शकत नाही. त्यामुळे स्वामीजी केवळ ज्ञानार्जनाच्याच मार्गाने चालले आणि त्यात ते यशस्वीही झाले. अपार ज्ञान मिळविले. त्यांनी एकट्यांनीच त्याचा आनंद घेतला नाही, तर ते संपूर्ण जगाला वाटले. ते जेथे असायचे ते ठिकाणच ज्ञानयोगाश्रम बनवून टाकले. ज्ञानयोगी झाले. त्या जगात असलेल्या आनंदापेक्षा अन्य कोठेही ते असणे शक्य नाही, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर करताच ते 'नको' म्हणाले. मनुष्याला आनंदाने जगण्यासाठी कोणत्याही नावाची गरज नाही. नाव ओझे आहे. ओळख म्हणून ते हवे, मात्र, तेच अस्तित्व बनून राहू नये. 

असे असताना नावाआधी पद्मश्री म्हणून शेपूट कशाला हवे म्हणाले. स्वामीजींनी मनात आणले कसते तर त्यांच्या ज्ञानयोगाश्रमात पैशांची नदीच वाहिली असती. त्यांना तसे भक्त, चाहतेही होते. त्यांनी फक्त डोळ्यांनी सूचना केली तरी पुरेसे होते. मात्र, ज्ञानापुढे सर्व नश्वर आहे, यावर विश्वास असलेल्या त्या सुज्ञानीने य:कश्चित गोष्टींसाठी हात पसरले नाही. व्यक्ती म्हटल्यावर साहजिकपणे गुण - दोष असणारच. नसल्यास तो देव बनतो. तसे असल्यास देवांमध्ये गुणदोष नाहीत का ? मात्र, सिद्धेश्वर स्वामीजी यांच्यात तसे दोषही नव्हते. परंतु ही गोष्ट त्यांच्यासमोर सांगितली असती तर त्यांना सहन झाली नसती. ते संकोचाने आक्रसून गेले असते. कारण या प्रशंसेतील अपायकारकता, कृत्रिमतेची चाल त्यांना माहीत होती.  ज्ञानी नावाचा चादर पांघरलेल्यांना बिरुद - उपाधी, प्रशंसा हे सगळे चिल्लर ! आपल्या वागण्या - बोलण्यात समानता राखलेल्या स्वामीजींनी आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टींकडे कधीही लक्ष दिले नाही. एक संत कसा असावा याविषयी स्पष्टता होती. ते गम्य शेवटपर्यंत जपलेले स्वामीजी आगीजवळ राहूनही त्याची उष्णता न लागता बकुळ, काटेरी धोतऱ्यासारखे राहिले !



सुमारे दोन दशकांपासून माझा 'श्रीं'शी निकटचा संबंध होता. ते कोणत्याही गावी असले तरी मी संपादित वर्तमानपत्रे दररोज वाचायचे. भेटल्यावर ते त्याविषयी बोलायचे. आम्ही दिलेले मथळे आठवणीत ठेवून उद्धृत (quote) करायचे. त्यामुळे ते किती गंभीरपणे वर्तमानपत्रे वाचायचे हे समजायचे. कर्नाटकातील कोणत्याही गावी प्रवचन असले तरी माझ्या परिचित स्नेहींच्या माध्यमातून बोलवायचे. 'श्रीं'च्या सूचनेनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये भालकी येथे चाललेल्या आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा आम्ही दोघेच एका  शेतातील मोठ्या झाडाखालील खूर्चीवर बसून सुमारे दोन तास केलेली लोकाभिमुख चर्चा विसरता येणारी नाही. ते संपूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवलेले क्षण एक सुंदर आठवण आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवचन होते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे 'श्रीं'चे प्रवचन ऐकण्यासाठी हजारो लोक आले होते. सर्वत्र नीटनेटकेपणा, शिस्त होते. आलेल्या सर्वांनी आंघोळ करून, कपाळावर विभूती (भस्म) लावून स्वच्छ वस्त्रे परिधान केली होती. इतर धर्मीयही श्रोत्यांच्या रांगेत बसलेले होते. मात्र, त्यादिवशी स्वामीजी बोललेच नाहीत. 'म्हणाले, आज भट बोलतील!' त्या पवित्र व्यासपीठावरून बोलण्याचे सौभाग्य स्वामीजींनी दिले. त्यादिवशी भालकीच्य हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरु आणि सुत्तुरु मठाचे जयराजेंद्र स्वामीजीही व्यासपीठावर होते. सिद्धेश्वर स्वामीजींनी दिलेली ती 'भेट' माझ्यासाठी शाश्वत आठवणीत राहणारी आहे. 

ज्ञानाला मरण नाही, ती शाश्वत आहे. ज्ञानींचेही तसेच आहे. तसे ज्ञानयोगी सिद्धेश्वर स्वामीजींनाही. ते अमर आहेत. ते दोन्ही अर्थांनी 'प्रज्ञावंत!'

- विश्वेश्वर भट, संपादक, विश्ववाणी

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

 




No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...