Sunday, 26 February 2023

कन्नडमधील उपनिषद : वचन साहित्य

 


भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था संपविण्यासाठी रशियातून १९७० च्या दशकात आलेला एक हेर पूर्ण देशभर फिरला. अशा या सुंदर देशाचे मी नुकसान करणार नाही, असे सांगून तो काम सोडतो. एका देशाचे कशाप्रकारे वाटोळे केले जाते, याविषयी तो एक सुंदर मुलाखत देतो. एखाद्या देशाचे वाटोळे करायचे तर एकूण ३५ वर्षांची प्रक्रिया आहे. आधीच्या २० वर्षांत त्या देशातील लोकांच्या मनात, विशेषत: युवकांच्या मनात तुमचा देश चांगला नाही, तुमचा धर्म चांगला नाही, तुमची आचारपद्धती चांगली नाही, तुमच्या रीतीनीती चांगल्या नाहीत, तुमचे देव चांगले नाहीत, तुमची पूजापद्धती चांगली नाही, हा विचार सतत बिंबवायला हवा. पुढच्या १० वर्षांत आपोआपच तो देश कोसळेल, असे तो सांगतो. ते भारतात अत्यंत व्यवस्थितपणे चालले आहे. त्याच्याविरोधात आवाज उठविताना आपला समाज परफेक्ट समाज आहे, या भ्रमात आम्ही नाही. परंतु एक समाधान आहे, की एक 'सेल्फ करेक्टिंग सिस्टीम' या संस्कृतीत सुरुवातीपासूनच आहे. आपल्यात असलेल्या समस्या आपणच सुधारुन पुढे जाण्याची या देशात एक पद्धती आहे. कालौघात या देशात जाती पद्धतीसह अनेक रुढी, परंपरा निर्माण झाल्या. त्या थांबवण्यासाठी आकाशातून कोणी आला नाही. या देशातच समाजसुधारक जन्माला आले. हे योग्य नाही, असे करू नये, हे समाजासाठी चांगले नाही, हे सांगून त्यांनी याचा विरोध केला. वेगवेगळ्या रुढी, चालीरीतींना विरोध करणारे, ते समाजातून काढून टाकणारे महात्मे आपल्यात जन्मले. सातव्या शतकातील दक्षिणेतील नायनारांपासून  पंधराव्या शतकातील शंकरदेवांपर्यंत देशभरात भक्तिपंथाच्या चळवळीची मालिकाच निर्माण झाली.  बाराव्या शतकात कर्नाटकात महात्मा बसवण्णांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली वीरशैव लिंगायतांची शरण चळवळ ही या मालिकेचीच एक कडी आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षांत महात्मा बसवण्णा हे संस्कृतविरोधी होते, त्यांनी वेद नाकारला. इतकेच नव्हे तर वीरशैव आणि लिंगायत वेगवेगळे आहेत. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, या विचाराला पुरोगामीत्वाच्या नावाखाली काही विचारवंत आणि स्वार्थी राजकारणी जाणीवपूर्वक खतपाणी घालत आहेत, हे वरील षड्यंत्राचाच एक भाग आहे. कारण येथील समाजाच्या प्रत्येक आदर्श राष्ट्रपुरुषाविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे महात्मा बसवण्णांच्या वचनांतूनच आपल्याला सत्य जाणून घेणे आवश्यक आहे.












भारतीय तत्त्वशास्त्रात सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा हे सहा दर्शन आहेत. त्यांना षड्दर्शन म्हणून ओळखले जाते. वेदोपनिषदांच्या काळापासून भूमीवरील जीवसंकुल आणि बाह्यजगताची निगुढता शोधण्याचे कार्य निरंतर चालत आले आहे. डोळ्यांना दिसणारे जीव - जगत  आणि त्याबाहेर असलेले अव्यक्त चैतन्य याविषयीची जिज्ञासा आजही न शमणारी ज्ञानदाह बनून राहिली आहे. जीव - देव -जग आणि त्याच्यातील संबंधाच्या विश्लेषणात गुंतलेल्या ऋषी - मुनी आणि द्रष्टे यांचे विभिन्न चिंतन म्हणजेच हे षड्दर्शन होय. एकेका दर्शनाने आपल्या रीतीने जीवात्मा, परमात्मा, जगत याविषयी चिंतन मांडले आहे. विविध दर्शनांच्या मागे वेगवेगळ्या ऋषिमुनींचे चिंतन आहे. उदाहरणार्थ कणाद, गौतम, पतंजली आदी नावे घेता येतील. या षड्दर्शनांत जीवात्मा, परमात्मा आणि जगत याविषयी अर्थपूर्ण विवरणासोबतच या तिन्हींतील त्रिकोण संबंधाविषयी गंभीर चिंतन केले आहे.
या विभिन्न दर्शनांतील मुक्त आणि गंभीर चिंतनाला निश्चितच शास्त्रीय चौकट आहे. कोणत्याही शास्त्रीय चौकट नसलेले स्वतंत्र, परिशुद्ध आणि मुक्त गंभीर चिंतन उपनिषदांत दिसते. त्याच प्रकारचे चिंतन शिवशरणांच्या वचनांत आपल्याला दिसून येते. त्यामुळेच वचनांना कन्नडमधील उपनिषदे म्हणून ओळखले जाते. शरणसंकुलाचे नेतृत्व केलेल्या महात्मा बसवण्णा यांच्या वचनांत या परंपरागत ज्ञानासह प्रगाढ आध्यात्मिक चिंतन, सामाजिक काळजी आणि आत्मानुसंधान दिसून येते.
कोणत्याही देशातील, कोणत्याही काळातील साहित्याचे अवलोकन केल्यावर मागील साहित्याने पुढे आलेल्या साहित्यावर परिणाम केल्याचे दिसून येईल. बसवण्णांचा जन्म सांप्रदायिक घराण्यात झाला. ते बहुश्रुत, वेद - शास्त्र पारंगत होते. त्यामुळे त्यांच्यावर प्राचीन भारतीय संस्कृत साहित्याचा मोठा प्रभाव दिसून येतो.
तंदे नीनु तायि नीनु,
बंधु नीनु बळग नीनु.
नीनल्लदे मत्तरू इल्लय्या.
कूडलसंगमदेवा, हाललद्दु नीरलद्दु.
अनुवाद :  पिता तुम्ही, माता तुम्ही,
बंधू तुम्ही बांधव तुम्ही
तुमच्याविना मला कोणी नाही देवा.
कूडलसंगमदेवा, दूधात बुडवा नाहीतर पाण्यात बुडवा.
या वचनातील शेवटची ओळ सोडली तर हे वचन पुढील संस्कृत श्लोकाच्या कन्नड अनुवादासारखे आहे.
त्वमेव माता च पिता त्वमेव ।
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देव देवा ॥
या पुढील वचनात महात्मा बसवण्णा शिवाच्या तांडव स्त्रोताचे वर्णन करतात. नटराज शिव नृत्य करताना त्याच्या पायांच्या आघाताने भूमी हादरली, त्याच्या ताठ उभ्या राहिलेल्या जटांनी आकाशातील गृहनक्षत्र छिन्नविच्छिन्न झाले. नाट्याच्या विभिन्न मुद्रेत त्याचे हात लागून तिन्ही लोक गळून पडले, अशा शब्दांत वर्णन केले आहे.
अदुरितु पादाघातदिंद धरे,
बिदिरिदुवु मकुट तागि तारकेगळु,
उदुरिदुवु कै तागि लोकंगळेल्ला !
महिपादाघातांद् व्रजति सहसा संशयपदं ! 
पदं विष्णोर्भ्राम्यद् भुजपरिघरुग्णग्रहगण: 
महुरद्योर्दौस्थ्यं यात्यनिभृतजटाताडिततटा |
जगद्रक्षा त्वं नटसि ननु वामैव विभुता !
नम्म कूडलसंगमदेवनिंदु नांट्यवनाडे.
अनुवाद : थरथरली धरणी पादाघाताने,
बिखरले तारे मुगुटाच्या टक्करेनी,
गळाले लोकांचे हात, हाताच्या स्पर्शाने,
महीपादाघाताद् व्रजीत सहसा संशयपदं ।
पदं विष्णोर्भम्यद् भुजपरिघरुग्णग्रहण : ॥
महुदरद्योर्दौस्थ्यं यात्यानिभृतजटातटाताडिततटा ।
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वायैव विभुता ॥
आमचे कूडलसंगमदेव आज तांडवनृत्य करू लागले.
हे वचनही संस्कृतमधील शिवमहिम्नस्तोत्राच्या १६ व्या श्‍लोकातील कन्नड भावानुवादासारखे आहे.
'महीपादाघाताद् व्रजीत सहसा संशयपदं ।
पदं विष्णोर्भम्यद् भुजपरिघरुग्णग्रहण : ।
महुदरद्योर्दौस्थ्यं यात्यानिभृतजटातटाताडिततटा ।
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वायैव विभुता ॥'
पुढील वचनात महात्मा बसवण्णांनी भगवंतनामाच्या संकीर्तनाला उचलून धरले आहे. कोट्यवधी मंत्रजप करण्यापेक्षा तन्मयतेने एक भक्तीगीत गाऊन देवाची आराधना करायला सांगतात,
कोट्यानुकोटी जपव माडि कोटलेगोळ्ळेलदेके मनवे ?
किंचितु गीतवोंदनंतकोटि जप.
जपवेंबुदेके, मनवे ?
कूडलसंगम शरणर कंडु,
आडि हाडि बदुकु मनवे. 
अनुवाद : कोट्यानुकोटी जप करुन,
भवबंधनाच्या चक्रात का सापडतो मना ?
एक लहानसे गीत अनंत कोटी जपासम आहे.
जप कशाला हवा आहे मना ? कूडलसंगाच्या
शरणाला पाहून हसत - खेळत गा रे मना.
हे वरील वचन स्कंद पुराणातील या श्लोकासारखे आहे.
श्रुतिकोटी श्रमं जपं ।
जपकोटी समं हवि : ।
हविकोटी समं हवि : ।
हविकोटी नमं गेयं ।
गेयं गेय समं विदु: ॥
वेदपारायणापेक्षा मंत्रजप कोटी भाग चांगले, मंत्रजपापेक्षा हव्यार्पण कोटी भाग चांगले, हव्यार्पणापेक्षा भक्तीने गाणे कोटी भाग चांगले, आणि भक्तिगीताच्या समान भक्तिगीताला सोडून दुसरे काहीही नाही, हे या श्लोकाचे आशय आहे. भक्तीने ईश्वराची आराधना करणाऱ्या भक्तिसंपन्न मनुष्याच्या मनाच्या महानतेचा बसवण्णा अशाप्रकारे गौरव करतात,
करि घनः अंकुश किरिदेन्न बहुदे ? बारदय्या, 
गिरि घन: वज्र किरिदेन्न बहुदे ? बारदय्या.
तमंध घन: ज्योति किरिदेन्न बहुदे ? बारदय्या.
मरहु घन: निम्म नेनेव मन किरिदेन्नबहुदे ? बारदय्या.
कूडलसंगमदेवा.
अनुवाद : हत्ती मोठा, आणि अंकुश लहान म्हणता येईल ? येणार नाही.
पर्वत मोठा आणि वज्र लहान म्हणता येईल ? येणार नाही.
अंधकार मोठा आणि ज्योत लहान म्हणता येईल ? येणार नाही.
विस्मरण मोठे आणि तुमचे स्मरण लहान म्हणता येईल ?
येणार नाही कूडलसंगमदेवा.
हत्ती आकाराने मोठा असेल. मात्र, माहुताच्या हातातील अंकुश लहान म्हणून त्याचा अनादर करणे शक्य आहे का?  पक्ष्यांसारखे विहारणाऱ्या पर्वत, डोंगरांचे पंख इंद्राने आपल्या वज्राने कापून जमीनदोस्त केल्याची एक पुराणकथा आहे. दैत्याकाराच्या पर्वतांपुढे इंद्राचे वज्रायुध लहान समजून त्याचे अवमूल्यन करणे साध्य आहे का? दाटलेल्या अंधकाराला दूर सारणारी पणती लहान म्हणून त्याची तुलना करणे शक्य आहे का ? या वचनांतील तिन्ही बाबींचा पंचतंत्रातील 'मित्रभेद' शी साम्य आहे.
हस्ती स्थूलतर: स चांकुवश: ।
किं हस्तिमात्रोंकुशो ? दिपे प्रज्वलिते प्रणश्यति तम: ।
किं दीपमात्रं तम: ? वज्रेणापि हता: पतंति गिरय: ।
किं वज्रमात्रो क: प्रत्यय: ॥
वरील श्लोकात दैहिक सामर्थ्यापेक्षा  एक तेजस्वी, सात्विक शक्ती मोठी असल्याचे प्रतिपादन केले आहे. तर मनुष्याचे अपरिमित अज्ञान निवारण करण्याची अपार शक्ती असलेल्या भक्ताचे मन मोठे, असे बसवण्णा म्हणतात.  त्यांच्यासारखे वेदोपनिषद समजून घेतलेले आणि निरुपण केलेले खूपच विरळ आहेत. ज्ञानाला जखडलेल्या परंपरागत शुष्क धार्मिक आचरण आणि मूर्खपणा याचे त्यांनी खंडन केले आहे. बसवण्णांनी वेदोपनिषदांचा नव्हे तर ते समजून न घेणाऱ्या कर्मठ आणि मूर्खांचा  विरोध केला आहे.
या पार्श्वभूमीवर ते वेद भार भाराक्रांता : गार्दभा : म्हणतात. म्हणजे वेदांचा अर्थ समजून न घेता केवळ पोपटासारखा पाठ करणाऱ्यांना 'वेदांचा भार वाहणारे' असे म्हणत त्यांची गाढवाशी तुलना करतात. त्यांनी आपल्या वचनांतून श्रुतींचे विश्लेषण करुन त्यांचा खरा अर्थ, अंतरंग आणि सार यांचे विवेचन केले आहे.
इब्बरु मूवरु देवरेंदु उब्बी मातनाडबेड, 
ओब्बने काणिरो, इब्बरेबुदु हुसि नोडा !
कूडलसंगमदेवनल्लदिल्लदेंदित्तु वेद.
अनुवाद : दोन - तीन देव आहेत असे गर्वाने म्हणू नको
देव एकच आहे, दोन देव आहे हे खोटे पहा. कूडलसंगमदेवाविना
दुसरा कोणता देव नाही असे वेद सांगतात.
जे वेदांनी सांगितले तेच बसवण्णांनी सांगितले आहे. त्यामुळेच त्यांनी एका वचनात  म्हटले आहे, देव एक आहे, नाव अनेक आहे. हेच वेदांनी सांगितले आहे, 'एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति ।' सत्य एकच आहे, परंतु ज्ञानी त्याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात. तसेच यत्र जीव: तत्र शिव:  म्हटले आहे. बसवण्णा म्हणतात,
शिवने जगत्रयक्कोडेयनेंदुदु वेद, 
उत्पत्ति स्थिति लयकारणनेंदुदु वेद, 
"ईश: सर्वस्य जगत: प्रभु: प्रेरको विश्वभुक्" एंदुदु श्रुति इदु
कारण, कूडलसंगमदेवनोब्बने देवनु.
अनुवाद : शिव हा त्रिलोकीचा स्वामी असे वेद म्हणतात.
उत्पत्ती - स्थिती - लय कारणीभूत वेद म्हणतात.
ईश: सर्वस्य जगत: प्रभु: प्रेरको विश्‍वभ्रुक् असे
श्रुती म्हणते म्हणून कूडलसंगमदेव हा एकच देव.
सामाजिक असमानता, जातिभेद आणि वर्णभेदाला वेदशास्त्रांचे प्रामाण्य देणाऱ्यांचा बसवण्णा तीव्र विरोध करतात. ते म्हणतात,
वेद नडनडुगित्तु, शास्त्रवगली केलक्के सारिद्दित्तय्या !
तर्क तर्किसलरियदे मूगुवट्टिद्दितय्या !
आगम हेरतोलगी अगलिद्दितय्या ! 
नम्म कूडलसंगय्यनु मादार चेन्नय्यन  मनेयलुंड कारण.

मराठी : वेद थरथर कापू लागले, शास्त्र मागे सरकले.
तर्कवितर्क केल्याविना गोंधळून गेले देवा.
आगम आपोआप अंग चोरुन दूर गेले देवा !
आमचा कूडलसंगमदेव मादार चन्नय्याच्या घरी जेवल्यामुळे.
याचा अर्थ वेदशास्त्र नाकारा, असे नव्हे. तर त्यांना पुढे करुन जातिभेद करणाऱ्यांवर मर्माघात करणे ! वेदशास्त्र न जाणता वाद करणाऱ्यांनो ऐका, असे म्हणत समजावून सांगतात. बसवण्णांनी आपल्या वचनांत दार्शनिक चिंतनावर मुक्त चिंतन केले आहे. त्यामुळे त्यांच्या वचनांत पुरातन परंपरेचे विमर्श दिसते. त्यांनी उपनिषदांच्या शुद्ध विचारांभोवती निर्माण झालेले कर्मठतेचे कटू आवरण दूर सरण्याचे कार्य केले. त्यांची अनेक वचने पाहिल्यावर वरुन ते वेद आणि शास्त्रांच्या विरोधी वाटत असले तरी त्यात कर्मठतेविषयी केवळ सात्विक आक्रोश आहे. वेदोपनिषदांचा योग्यरीत्या अर्थ समजून न घेता आपल्या स्वार्थलोलुपतेच्या समर्थनासाठी त्याचा वापर करण्यास ते विरोध करतात.
त्यामुळेच ते सवाल करतात,
वेद, शास्त्र, आगमंगळनोदिदवरु हिरियरे ? 
कवि, गमकि, वादि वाग्मिगळु हिरियरे ?
नटिनि, बाण, विलासि, सुविद्यव कलित
डोगबनेनु किरियने ? हिरियतनवावुदेंदडे;
गुणज्ञान आचारधर्म, कूडलसंगन शरणरु
साधिसिद साधनेये हिरियतन.

मराठी : वेद - शास्त्र आगम वाचणारे श्रेष्ठ आहेत ?
कवी - कथाकार, वादी, साहित्यकार श्रेष्ठ आहेत?
नाट्यविद्या, बाण, विलासी, सुविद्या शिकलेला,
डोंबारी काय कनिष्ठ आहे ?
श्रेष्ठ कोणाला म्हणतात तर - गुण, ज्ञान, आचार धर्म
कूडलसंगाच्या शरणांनी केलेली साधना श्रेष्ठ आहे.
या वचनात बसवण्णांनी कोणी वेदशास्त्र, आगम वाचल्याने श्रेष्ठ ठरत नाही, तर गुण, ज्ञान, शुद्ध आचाराने केलेली ईश्वराची साधना श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. आपण वेदोपनिषदांचा नीट अभ्यास केल्यास बसवण्णांनी त्यातील मूल्येच सांगितल्याचे दिसून येईल.
वरील एका वचनात 'शरणाला पाहून हसत - खेळत गा रे मना.' म्हणणारे बसवण्णा दुसऱ्या एका वचनात म्हणतात,
गीतव हाडिदडेनु, शास्त्र - पुराणव केळिदडेनु,
वेदवेदांतव नोडिदडेनु ?
मनवोलिदु लिंगजंगमव पूजिसलरियदवरु
यल्लरल्ली (प्रा) ज्ञ रादडेनु ?
भक्तियिल्लदवरनोल्ल कूडलसंगमदेव.

मराठी :  'गीत गायले काय, शास्त्र पुराणे ऐकले तरी काय ?
वेदवेदांत पाहिले तरी काय होणार ?
तन्मय होऊन लिंग - जंगमाची पूजा न जाणणारे
प्रज्ञावंत असून काय उपयोग ?
भक्तीहीनावर कूडलसंगम प्रसन्न होणार नाही.
भक्तीची श्रेष्ठता सांगताना बसवण्णा लिंग - जंगमाची पूजा न जाणणारे प्रज्ञावंत असून काय उपयोग ? असा सवाल करतात. याचा अर्थ प्रज्ञावंत असू नये, असा नाही. अगदी तसाच अर्थ वेदवेदांत याविषयी आहे.
बसवण्णांनीच वेदागमांविषयी म्हटले आहे,
वेदागमंगळु हेळिद हागे नडेवुदु, हेळिदंते नुडिवुदु, 
मीरि नडेयलागदु, मीरि नुडियलागदु, मुक्तिपदवैदुवात
अपहास्यक्के बारदे आचारमार्गदल्लिरबल्लडे
कूडलसंगमदेवनिगले ओलिव.
वेदागमंगळु हेळिद हागे नडेवुदु, हेळिदंते नुडिवुदु, 
मीरि नडेयलागदु, मीरि नुडियलागदु, मुक्तिपदवैदुवात
अपहास्यक्के बारदे आचारमार्गदल्लिरबल्लडे
कूडलसंगमदेवनिगले ओलिव.
अनुवाद : वेदआगमाने सांगितले तसे वागावे, तसेच बोलावे.
त्याला सोडून वागू नये - बोलू नये मग मुक्तीपद मिळते.
अपहास्य होऊ नये अशा आचार मार्गात
राहणाऱ्यांनी कूडलसंगमदेवाला प्रसन्न करून घ्यावे.
केवळ बसवण्णांनीच नव्हे तर सर्व शरणांनी आपल्या वचनांत वेदोपनिषदांतील श्लोकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. त्याच प्रकारे मातुलागम, कारुणागम आदी शिवागमाचा अनेक ठिकाणी आदराने उल्लेख केला आहे. काही ठिकाणी केवळ सात्विक आक्रोश दिसतो. त्यामुळे त्या वचनांमागील  आशय व भूमिका समजून घेण्याची गरज आहे.
- अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर
९०४९२९०१०१








No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...