संतोष तम्मय्या, कार्यकारी संपादक, होस दिगंत
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे
भरलेल्या न्यायालयात न्यायाधीश चौगले साहेब कामकाज चालवत होते. तेव्हा अजून वकिलांनी काळे कोट परिधान करणे बंधनकारक नव्हते.त्यामुळे आवारात वकील कोण ? अशील कोण ? हे समजत नव्हते. त्या दिवशी शांतपणे बसून आपल्याकडे एकटक पाहणाऱ्या युवकाकडे बोट करून न्या. चौगले यांनी प्रसिद्ध वकील भंडीवाड यांना विचारले, 'कोण हा मुलगा?' त्यावर भंडीवाड उत्तरले, 'साहेब, मला माहिती नाही.' न्यायाधीश रागीट चेहऱ्याने कामकाजात व्यस्त झाले. तो युवक कंटाळून बाहेर पडला.दुसऱ्या दिवशी कचेरीत आल्यावर एक लखोटा त्यांची वाट पाहत होती. ते वाचताच चौगले साहेब रागाने थरथरू लागले. त्या पत्रात असे लिहिले होते, 'न्यायालयात येऊन कामकाजाचे निरीक्षण करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, अधिकार आहे. नव्याने वकिली पेशा स्वीकारलेल्यांना कामकाजाचे निरीक्षण करून अनुभव आणि मार्गदर्शन मिळवावे लागते. एक तरुण वकील या नात्याने मी ज्येष्ठ वकिलांच्या शेजारी बसून कामकाजाचे निरीक्षण करतो. आपण थेट मलाच प्रश्न विचारायला हवे होते. मात्र, आपण मी कोण याविषयी ज्येष्ठ वकिलांकडे विचारणा केली. त्यामुळे मी काही न सांगता गप्प राहिलो. दुसऱ्यांना प्रश्न विचारुन माझ्याविषयी समजून घेण्याची आपली कार्यपद्धती माझ्यासह वकिली पेशासाठी अवमानकारक असल्याचे मी समजतो. तसेच त्याविषयी नाराजी व्यक्त करीत आहे. यामुळे माझा स्वाभिमान दुखावला गेला आहे. आपण आपल्या या चुकीपोटी माफी मागून वकिली पेशाची प्रतिष्ठा राखावी.
- सदाशिव शंकरप्पा शेट्टर'
हे पत्र वाचून न्यायाधीश गोंधळून गेले. ती मोठी बातमी बनल्याने शहरातही चर्चेचा विषय बनला. 'कोण हा ? कोण हा शेट्टर ?'शेवटी काहीतरी आठवून चौगले यांनी त्या युवकाला कचेरीत बोलावून घेतले. त्याला विचारले, 'तू शंकरप्पा शिवप्पा शेट्टर (एस. एस. शेट्टर) यांचा मुलगा का ?' मुलगा उत्तरला, होय ! या सर्व घटनेला अर्धशतक उलटून गेले आहे. मात्र, हे कोण ? कोण हे शेट्टर ?' हा प्रश्न वेगळ्या प्रकारे संपूर्ण कर्नाटक राज्याला सतावत आहे ! एस. एस. शेट्टर यांचा मुलगा हा सदाशिव शेट्टर तर मग हा कोणता शेट्टर ? यांचेही वडील एस. एस. शेट्टरच ना ? आदी प्रश्न काहींना सतावत आहेत. हे केवळ प्रश्नच राहिले असते तर त्यात काही विशेष राहिले नसते. मात्र, आता निर्माण झालेला प्रश्न मूल्ये, निष्ठा, प्रामाणिकतेचा आहे. आता चर्चेत असलेले सत्तालोलुप शेट्टर यांना काहीजण वकील सदाशिव शेट्टर यांचे पुत्र समजले आहेत. जनसंघाच्या महानायकांच्या तालमीत तयार झालेल्या सदाशिव शेट्टर यांच्या मुलाने असे का केले म्हणून काहीजण दुखावले गेले आहेत. मात्र, सदाशिव शेट्टर यांच्या घराण्याच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास तेथे तीन शतकांपासून फक्त प्रामाणिक, धर्मरक्षणासाठी जीवन समर्पित केलेले, माजासाठी जगलेले दिसतात विन: सत्तेसाठी हपापलले, धनलोलुप 'शेट्टर' दिसत नाहीत. तसे असेल तर मग हे रंग बदललेले शेट्टर कोण ? ती कथा राजमौली यांच्या सिनेमासारखे, त. सु. शामराय यांच्या 'मूरु तलेमारु' (तीन पिढ्या) पुस्तकासारखे रोचक आहे.
उपलब्ध पुराव्यांनुसार शेट्टर वंशाच्या इतिहासाची सुरुवात १६ व्या शतकातील गोकाकचे काडप्पा शेट्टर नावाच्या शिवभक्तापासून होते. शरणतत्त्वांनुसार जीवन व्यतीत केलेल्या दयाळू काडप्पा यांना दोन मुले होती. दुसरा मुलगा बसप्पा शेट्टर पित्याप्रमाणेच शिवभक्त होता. त्यांची समाजसेवा आणि सात्विकता पाहून गदगचे तोंटदार्य स्वामीजी, सवणूरचे नवाब आणि जडे मठाचे स्वामीजी यांनी त्यांना सन्मानाचे स्थान दिले होते. त्यांनी चित्रदुर्गचे गुरुसिद्धेश्वर स्वामीजींना बोलावून हुब्बळ्ळीमध्ये मूरुसाविर मठाची निर्मिती केली. पुढे त्यांचे तिसरे पुत्र गुरुसिद्धप्पा शेट्टर हे त्या मठाचे पीठाधीशही झाले. ही काडप्पा शेट्टर यांच्या वंशातील तिसरी पिढी होय. यांच्या नंतरच्या पाचव्या पिढीत जन्मलेलेच शंकरप्पा शिवप्पा शेट्टर अथवा एस. एस. शेट्टर होत. हेच न्यायाधीशांना माफी मागायला सांगितलेल्या स्वाभिमानी सदाशिव शेट्टर यांचे वडील. वकील सलेले एस. एस. शेट्टर हे हुब्बळ्ळी - धारवाड भागातील प्रसिद्ध व्यक्ती होते. शेट्टर चाळीत आलेल्या कोणालाही रिकाम्या हाताने न पाठविणारे महादानी होते. धारवाड भागातील खेड्यांतील मुलांना बोलावून आणून आपल्या घरात ठेवून शिक्षण देणारे एस. स. शेट्टर आपल्या वयाच्या ३४ व्या वर्षी निवर्तले. ते निवर्तण्याधी काही वर्षांपासून ते कलघटगी, मिसरकोटी आदी गावांतील गरीब कुटुंबातील मुलांना आणून आपल्या घरी ठेवून शिक्षण देत होते. त्याचप्रकारे शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर हा बुद्धिमानी मुलगाही आला होता. पुढे हेही एस. एस. शेट्टर म्हणूनच प्रसिद्ध झाले. या शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर यांना आपल्याला लोक एस. एस. शेट्टर म्हणूनच ओळखतात याचा अभिमान वाटायचा. शिवाय ते अन्न - शिक्षण दिलेल्या शेट्टर घराण्याचे निष्ठावंतही होते. थोरले एस. एस. शेट्टर यांच्या अपार संपत्तीला किंचितही अपाय होणार नाही अशाप्रकारे सुरक्षित राखलेले हे सवाई एस. एस. शेट्टर होत. कोणतेही रक्ताचे नाते नसतानाही सवाई एस. एस. शेट्टर हे थोरले एस. एस. शेट्टर यांचा मुलगा सदाशिव शेट्टर हे वकिली पेशा सुरू करण्याच्या काळापर्यंत त्या कुटुंबाची सेवा करत सार्थक जीवन जगले.
इकडे सदाशिव शेट्टर यशस्वी वकील झाले. विवाह झाल्यानंतर त्यांना पाच मुले झाली. सोबतच ते काँग्रेसचे कार्यकर्ते बनले. तिकडे काडप्पा शेट्टर यांचे वंशज नसलेले शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर म्हणजे सवाई एस. एस. शेट्टर हेही सांसारिक जीवनात पडले होते. त्यांनाही मुले झाली होती. त्यातील एकजण पुढे भारतीय जनता पक्षात अनेक पदे, सत्ता उपभोगून जगदीश शेट्टर म्हणून प्रसिद्ध झाले. काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले वकील सदाशिव शेट्टर यांना काँग्रेस कार्यकर्त्यांत श्रद्धा, क्रियाशीलता नाही असे वाटले. सत्तेचा दंभ, जातियवाद आणि अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण हे राष्ट्रभावनेला अपायकारक असल्याचे त्यांनी जाणले. आपण येथेच राहिल्यास काँग्रेसप्रमाणे निष्क्रिय बनून राहू, ही भीती सतावू लागली. तेव्हा त्यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या चिंतनांनी आकर्षित केले. त्यानंतर पुढचा - मागचा विचार न करता सदाशिव शेट्टर यांनी जनसंघात प्रवेश केला. जगन्नाथराव जोशी, भाऊराव देशपांडे आणि गदगचे डॉ. रामचंद्र अनंतराव जालिहाळर यांच्या मार्गदर्शनामुळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही संपर्कात आले. १९६२ हुब्बळ्ळीतून, १९६४ मध्ये धारवाडमधून विधासभेची निवडणूक लढवून त्यात पराभूत झाले. १९६७ च्या निवडणुकीत हुब्बळ्ळीमधून निवडणूक रिंगणात उतरून जिंकले. तसेच दक्षिण भारतातील जनसंघाचे पहिले आमदार म्हणून ओळखले गेले. उशिरा जनसंघात प्रवेश केला असला तरी निष्ठावंत कार्यकर्ता बनून राहिले. पक्षाच्या कार्यासाठीच प्रिंटिंग प्रेस सुरू केले. कार्यकर्त्यांना घरी जेऊ घालून पक्षाची बांधणी केली. दीनदयाळ यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांचे निकटवर्तीय राहिले. हुब्बळ्ळी हॉस्पिटलच्या निर्मितीनंतर कोणीही वाली नसलेल्या कामगारांसाठी लढा देऊन निवारा दिला. शेतकऱ्यांच्या आंदोलनांचे संघटन केले. मालमत्ता कराच्या विरोधात धरणे धरले. दरवाढ, रेशनमधील भेदभाव विरोधात रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधले.
दीनदयाळ उपाध्याय हे उत्तर कर्नाटकाच्या प्रवासावर आल्यानंतर त्यांच्यासोबत संघटन कार्य केले. हाती घेतलेले कार्य वेगाने संपविणारे सदाशिव शेट्टर यांनी आपले जीवनकार्यही घाईघाईत संपविले. १९६८ मध्ये आपल्या वयाच्या ३६ व्या वर्षी आमदार असतानाच ते निवर्तले. तेथेच शेट्टर कुटुंबियांच्या राजकीय जीवनाचा अंत्य झाला. यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कार्यकर्त्यांनी शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर (सवाई एस. एस. शेट्टर) यांना उमेदवार म्हणून उभे केले. मात्र, ते जिंकले नाहीत. आपल्याला अन्न दिलेल्या सदाशिव शेट्टर यांच्या कुटुंबाच्या मूल्यांना अनुसरून ते जगले. मात्र, सवाई एस. एस. शेट्टर तसे जगले म्हणून त्यांच्या मुलानेही तसे जगावे कसे काही आहे का ? तसेही हुब्बळ्ळी - धारवाडमध्ये शेट्टर घराण्याची एक हवा होती. सदाशिव शेट्टर यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत एक लाखाहून अधिक लोक सहभागी झाले होते. या सर्व कारणांमुळे काँग्रेसला टक्कर देण्यासाठी शेट्टर कुटुंबातील कोणी उमेदवार झाल्यास भाजप जिंकेल, ही गोष्ट राजकीय वलयात प्रचलित झाली होती. मात्र, सदाशिव शेट्टर यांच्या मुलांपैकी कोणीही राजकारणात येणार नसल्याचे सांगून गप्प राहिले. त्या वेळेस आकस्मिकपणे शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर म्हणजे सवाई एस. एस. शेट्टर यांचा मुलगा राजकीय नेत्यांच्या नजरेस पडला. त्यानंतर तो मागे वळून पाहिला नाही. एकेक राजकीय पायऱ्या चढत राहिले. शेट्टर हे नावच त्यांना विजय मिळवून देत होते. त्यामुळे आधुनिक शेट्टर यांचे राजकीय जीवन सुलभ झाले.
कालौघात जुन्या शेट्टर यांची मूल्ये जुळ्या शहरात दंतकथा बनून लोकप्रिय झाली असताना या शेट्टरमध्ये आपणच विचार, आपणच भाजप हा भ्रमही वाढला. काडप्पा शेट्टर यांच्या घराण्याच्या प्रभाव व वलयाशिवाय आपण पुढे आलो हा अहंकारही निर्माण झाला. यडीयुरप्पा यांचे सरकार असताना हुब्बळ्ळीत सदाशिव शेट्टर यांचा पुतळा बसविण्याच्या मागणीला या ट्टरांनी दाद दिली नाही. शेवटी चाहत्यांनी छोटासा पुतळा बनविल्यावर काहीनी त्याला अडथळा आणला ! सरकारने सदाशिव शेट्टर यांच्याविषयीचे पुस्तक प्रकाशित केले. त्या समारंभात मंत्री शेट्टर यांनी थोरले शेट्टर यांच्या मुलांना सौजन्य म्हणूनही व्यासपीठावर न बोलावता त्यांना मानसिक त्रास दिला. म्हणजे भाजपमध्ये असतानाच या शेट्टर यांच्या मनामध्ये षडयंत्र, कुटीलता, धूर्तपणा भरलेली होती. पण मुखवटाही किती दिवस लपवला जाऊ शकतो ? तो आता गळून पडला आहे. आता ते संघाच्या प्रचारकांविषयी अशोभनीय वक्तव्य करण्याइतके अधोगतीला पोहोचले आहे. मात्र, यात कोणतेही आश्चर्य दिसत नाही. कारण हे काडप्पा शेट्टर यांच्यासारखे जगलेच नाहीत ! त्यामुळे आश्चर्य का वाटावे ? शिवाय वडील शिवप्पा शिवमोर्त्यप्पा शेट्टर हेही निवर्तले होते.
त्यातच या शेट्टरना कोणाच्या उपकाराची जाण राहिली नाही. त्यामुळे पक्ष सोडतानाही त्यांना लाज वाटली नाही. विडंबन म्हणजे आजही बहुतांश लोक हे भाजपकडे पाठ फिरवलेल्या या शेट्टरना सदाशिव शेट्टर यांचे पुत्र, दीनदयाळ यांच्या संपर्कातील घराण्यातीलच समजले आहेत ! हे अगदी असे झाले की बिस्लेरी पाण्याची बाटली यशस्वी झाल्यानंतरत्याच नावाशी साधर्म्य राखणाऱ्या नकली बाटल्या बाजारात आल्या ना तसे झाले !संदर्भ ग्रंथ : संसदीयपटू सदाशिव एस. शेट्टर. ग्रंथालय उपसमिती, बंगळुरू
No comments:
Post a Comment