Monday 4 September 2023

'मी' देह नव्हे तर ईश्वरी तत्त्व



५ जानेवारी २०२३

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजींचे आध्यात्मिक प्रवचनवगळता मी कन्नडमध्ये आध्यात्मिक व संत साहित्याविषयी सर्वाधिक व्याख्याने ऐकतो ते वीणाताई बन्नंजे यांचे. अल्लमप्रभू देव यांच्या व्याख्यानात त्यांच्याविषयी सांगताना वीणाताई श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे उदाहरण देतात. एका भेटीत वीणाताई स्वामीजींना आत्मचरित्र लिहिण्याविषयी विचारणा करतात. त्यावर स्वामीजी म्हणतात, 'माझ्या जीवनात लिहिण्यासारख्या घटनाच नाहीत.(बरेयलक्के नन्न जीवनदल्ली घटनेगळे इल्ल)' याविषयी बोलताना वीणाताई अल्लमप्रभू देव यांचे वचन उद्धृत करत खूप सुंदर विवेचन करतात.  हे सांगायचे कारण म्हणजे ज्यांनी आपले जीवन व वाणीने अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवले, त्यांचे जीवन आनंददायी बनवले, त्यांच्या जीवनात घटनाच नसतील का? तर घटना निश्चितच होत्या. पण त्या जीवनाविषयी मोह नव्हता. सर्वसामान्यांसमोर  जीवनतत्वज्ञान मांडणारे स्वामीजी केवळ त्यांच्यासमोर बोलले नाहीत तर त्याप्रमाणे जगले. 

मात्र, आज आम्ही सोशल मीडियात माझ्या पोस्टला किती लाईक्स मिळाल्या, कितीजणांनी शेअर केले याचा हिशेब मांडत

 असतो. हे जाऊद्या आम्हीच शहाणे, सकलजनांना शहाणे करण्याचा आम्हालाच जन्मदत्त अधिकार मिळाला या अविर्भावात आपले साहित्य व लेखनातून लोकांना ज्ञानामृत  पाजणारे अनेक लेखक, पत्रकार व बुद्धिमंतांनी आत्मचरित्र लिहिले आहेत. अनेकांच्या आत्मचरित्रात सत्यासत्यता किती? आत्मगौरवासाठी कितीजणांनी आत्मचरित्र लिहिले नसतील !  त्यांच्या आत्मचरित्रात कितपत नीरक्षीर विवेक आहे ? (मी हे सर्वांना म्हणत नाही. अनेक थोर व्यक्तींचे आत्मचरित्र निश्चितच प्रेरणादायी आहेत.) ते वास्तविक जीवनात आपल्या साहित्यात मांडलेल्या विचाराप्रमाणे  जगले का?  कितीजणांनी अशा मंडळींचे आत्मचरित्र वाचले, हा शोधाचा विषय आहे. 'आत्मचरित्र'चेही 'भांडवल' करण्याचा हा काळ आहे. म्हणूनच अशाप्रसंगी माझ्या जीवनात लिहिण्यासारख्या घटनाच नाहीत, असे सांगणारे निर्मोही सिद्धेश्वर स्वामीजी लाखो लोकांच्या हृदयात ज्ञानज्योत बनून तेवत राहतात. बसवण्णा आपल्या एका सुंदर वचनात म्हणतात, ...तन्न बण्णिसबेड..., इदे अंतरंग शुद्धी, इदे बहिरंग शुद्धी. आत्मप्रौढी मिरवू नको, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी. स्वामीजींचे अंतरंग शुद्ध होते. म्हणूनच ते 'आत्मचरित्रा'तील या 'आत्मप्रौढी'पासून दूर राहिले असावेत. कारण त्यांच्यातील 'मी' देह नव्हे तर  ईश्वरी तत्त्व (आत्मा) होते.

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...