Sunday, 29 October 2017

बेंद्रे यांच्या साहित्यातील शरण तत्त्वाचे चिंतन

बाराव्या शतकात  बसवण्णा, अल्लमप्रभू आदि शरणांनी लोकभाषा कन्नडमधील वचन साहित्याच्या माध्यमातून कर्नाटकात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक जागृती घडवली. कर्नाटकातीलच ज्ञानपीठ विजेते महाकवी द. रा. बेंद्रे यांनी शरणतत्त्व हाच आपला श्वास मानला. गेल्या शतकात शरणांच्या विषयी विविध साहित्य लिहिले गेले. मात्र, काव्य माध्यमातून ते समर्थपणे अभिव्यक्त करणारे आणि लौकिक भावनांच्या अभिव्यक्तीसाठी वचनशैलीचा वापर करणारे  नवोदय काव्याचे प्रमुख कवी असलेले बेंदे हे पहिले कवी होते. त्यांच्या साहित्याचे जीवनभर आद्यांतापर्यंत अभ्यास, त्यांची जनपद भाषा, त्यांचा आध्यात्मिक मनोभाव याचा दर्शन केलेले डाॅ. जी. कृष्णप्पा यांनी त्यांच्या साहित्यातील शरणतत्त्वांच्या चिंतनाचे आपल्या 'बेंद्रेयवर साहित्यदल्ली शरण चिंतने' या पुस्तकात निरुपण केले आहे. ३६ पुस्तकांतही मावणार नाही अशा शरण संस्कृती, शरण दर्शनाचं सार त्यांनी 'गागर में सागर' याप्रमाणे केवळ ३६ पानांत निरुपिले आहे. इतक्या संक्षिप्तपणे केलेले हे निरुपण ग्रंथकर्त्याच्या अगाध अभ्यासाचे फळ म्हणावे लागेल.
शरणक्षेत्र धारवाडमध्ये बेंद्रे यंचा जन्म झाला. जाती, मत, पंथ, सोवळेओवळे, श्रीमंती, गरीबी हा भेद त्यांच्या मनाला शिवला नाही. वेदांचे पाठ, जंगमांची वचने,  करडीकुणित (स्थानिक लोकनृत्य), बयलाट आदि जीवपोषक द्रव्यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. मात्र, ते पाश्चात्त्य प्रेरणेला बळी  पडले नाहीत.  देशी प्रज्ञेने त्यांचे काव्य फुलले. त्यांना सर्वज्ञ, हरिहर, लक्ष्मीश, वचनकार आणि हरिदासांविषयी आत्मीयता होती. 'बेळगु' काव्यासाठी त्यांनी सदानंद जंगम हे काव्यनाम स्वीकारले. १९२० - २१ मध्ये 'नोविन बेले', 'हिग्गिन नेले' आदि वचने लिहिल्याचे 'उय्याले' काव्यसंग्रहाच्या मनोगतात बेंद्रे यांनी सांगितले आहे. 'उय्याले'  मधील 'करुळीन वचनगळू'  वात्सल्यांची रसलहरीच. गर्भवती स्त्रीमध्ये अपत्यप्राप्तीचा अनुभव अलौकिक शक्ती निर्माण करते, हे सांगणाऱ्या 'अलौकिक' वचनांत  अल्लमप्रभूंच्या वचनांचा प्रभाव दिसतो.
बेंद्रे यांचे 'दवन हुण्णिमेय जात्रेय रात्री' हे काव्य शिवाचे प्रतीक आहे. लेखक कृष्णप्पा म्हणतात की, शिवध्यानी बेंद्रे यांनी प्रकृतीत अनुभवलेले लिंगवैभव भारतीय साहित्यातच विशिष्ट आहे. निसर्गातील समतत्त्व, त्याच्या अमृत पोषणामुळे जगणारे सकल जीवराशी, त्यावरील विश्वासाला पात्र शिवरुप हेच बेंद्रे यांचे शिवानुभव. वेद, उपनिषदांचे सार जाणून बसवण्णांनी संपूर्ण मानवजात एकच हे तत्त्व सांगण्यासाठी सामाजिक क्रांती घडवली. कायकतत्त्वापासून दार्शनिकत्वापर्यंत त्यांनी ध्वजा फडकावली. असे क्रांतिकारी बसवण्णा बेंद्रे यांच्यासाठी महात्मा होते. त्यांनी 'वृषभोरोरविती' हे काव्य रचले. भूतदयेचे साक्षात्कारी बसवण्णा हे समानतेचे पुरस्कर्ते असल्याचे बेंद्रे यांनी या काव्यात सांगितले आहे. 'कर्नाटकद इतिहास पुरुषरू' या प्रकरणात कृष्णप्पा यांनी बसवण्णा, अल्लमप्रभू, अक्कमहादेवी यांच्याविषयीचे बेंद्रे यांचे चिंतन मांडले आहे. 'तुंबी बंदीत्तु' या रुपकात्मक काव्यातून बसवादि शरणांच्या मधुरभावाचे मधुर जीवन सकल जनांत भरुन गेल्याचा काल मांडल्याचे सांगितले आहे.
बेंद्रे १९४४ ते १९५६ पर्यंत सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात होते. त्यामुळे त्यांच्या सिद्धराम या प्रकरणाचा विशेष उल्लेख करावा लागेल. सोलापुरात आल्या वर्षीच वयाला आलेला मुलगा रामचंद्र, पुढच्या सात दिवसांतच लहान मुलगा आनंद याचे निधन झाले. बेंद्रे यांना तीव्र दु:ख झाले. अशाप्रसंगी सिद्धरामेश्वर देवस्थानची त्यांच्या आध्यात्मिक साधनेत प्रमुख भूमिका राहिली. त्यांनी सिद्धरामेश्वरांचे कायततत्त्व, लिंगांग सामरस्य आणि  स्त्री, सोनेनाणे या विषयांच्या मोहापलिकडील सिद्धत्व, साधनामार्ग याविषयी 'सिद्धरामर वचनवन्नु नेनेदु' हे काव्य रचले. 'चेन्नलिंगवे' या काव्यातून त्यांचे मित्र तत्त्वचिंतक हलसंगीचे मधुरचेन्न यांच्याविषयीचा, विनायक गोकाक, शंकरगौड पाटील, शिंपी लिंगण्णा यांच्याविषयीच्या  बेंद्रे यांच्या शरणबंधुत्वावर 'शरण बांधव्य' या प्रकरणात लेखकाने प्रकाश टाकला आहे. बेंद्रे यांचे शिवध्यानातील भावैक्य सामरस्य, भक्त,  प्राण, लिंग, शक्ती, इष्टलिंग याविषयीच्या चिंतनाचे कृष्णप्पा यांनी सुलभपणे निरुपण केले आहे. एकूणच शरणांनी वचनसाहित्य, शिवभक्ती, कायतत्त्वानुसार जीवन, दासोह आणि आध्यात्मिकता या माध्यमातून केलेल्या ऐतिहासिक  कार्याविषयी बेंद्रे यांनी म्हटले आहे, ' कन्नड शिवशरणांनी आपल्या भक्तीच्या युक्तीने कैलासाला कल्याणला आणण्यासाठी केलेली अद्भुत साधना कर्नाटकाच्या,  नव्हे भारताच्या, तेवढेच काय संपूर्ण जगाच्या इतिहासात रोमहर्षक आहे.
डाॅ. जी. कृष्णप्पा यांनी जानेवारी २०१५ पासून बसव समितीच्या 'बसव पथ' मासिकाच्या कन्नड आवृत्तीत सलग चार महिने बेंद्रे यांच्या साहित्यात शरण चिंतन ही लेखमाला लिहिली. या माध्यमातून त्यांनी बेंद्रे यांच्या साहित्याला व्यापलेल्या शरण चिंतनावर टाकलेल्या प्रकाशाला वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या लेखमालेचा अमूल्य ठेवा पुस्तकरुपात बंगळुरुच्या वंशी प्रकाशनाद्वारे वाचकांसमोर आणला आहे. योगी अरविंद यांचे चिंतन, कवी कुवेंपु यांच्या काव्याचे समग्र चिंतन केलेले ज्येष्ठ साहित्यिक को. चेन्नबसप्पा यांची प्रस्तावना लाभली आहे.
बेंद्रेयवर साहित्यदल्ली शरण चिंतने
लेखक : डा. जी. कृष्णप्पा
प्रकाशक : वंशी प्रकाशन,  बंगळुरू
किंमत :  ३० रुपये

No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...