Monday 4 September 2023

जसा गुरु तसा शिष्य



 २२ जानेवारी २०२३

सळईने माझ्या हातावर डागा, 

कायम आठवण राहील

गुरवू निनू, अरिवू निनू

दैव निनू, जीव निनू

निनिल्लदे....बालगाव - कात्राळ आश्रमात एका सामान्य साधकाने गीताच्या माध्यमातून ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांना केलेली वंदना. या गीतातून स्वामीजींविषयी सामान्य साधकांत असलेले गुरुविषयीचे अनन्य प्रेम, भक्ती, त्यांची महानता दिसून येते. सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या बयलू यात्रेनंतर संतवेंदरे यारू या गीताने घरोघरी मनामनापर्यंत पोहोचत हृदयाहृदयात स्थान मिळविले आहे. त्याविषयी आपण नंतर पाहू. पण जनमनात हे स्थान मिळविणारे निर्मोही संत, पाच दशकांहून अधिक काळ आध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या रसाळ, सहज - सोप्या वाणीने प्रबोधन करणारे  ज्ञानयोगी, कधीही काहीही हवे न म्हणणारे जंगमश्रेष्ठ, बयलू यात्रेनंतर लोकांना अधिक हवेहवेसे वाटणारे ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी इथपर्यंत कसे पोहोचले, ते कसे घडले याविषयी सर्वांनाच कुतूहल असणे साहजिकच आहे. ते घडले ते गुरूंमुळे. ते म्हणजे वेदांत केसरी मल्लिकार्जुन शिवयोगी यांच्यामुळे. ही बाब या गुरू - शिष्याविषयी माहिती असलेल्या जुन्या लोकांना माहीत आहे. मात्र, स्वामीजींचे गुरू मल्लिकार्जुन शिवयोगी यांचे नाव आजच्या पिढीला माहिती नाही. जसा गुरू तसा शिष्य. जे पेरू, तेच उगवणार. त्यामुळे वेदांत केसरी  गुरू श्री मल्लिकार्जुन स्वामी यांच्याविषयी थोडेसे...  गुरुवंदना कार्यक्रमात बालगावच्या गुरुदेवाश्रमाचे श्री अमृतानंद स्वामीजी यांनी उल्लेख केला. १९८४ ज्ञानयोगाश्रम उभे राहिले. मात्र, पूर्वीपासून मल्लिकार्जुन स्वामीजींना आश्रम नव्हता. ते साधकांच्या घरीच निवास करायचे. ते त्रिकाल (सकाळी, दुपारी व सायंकाळी) प्रवचन करायचे. कलबुर्गी जिल्ह्यातील एका ठिकाणी मल्लिकार्जुन स्वामीजींचे प्रवचन होते. त्यासाठी स्वामीजी काहीही घेत नसायचे. तरीही त्या गावातील साधकांनी त्यांना काही रक्कम  द्यायचे ठरवले. ते रक्कम घेऊन स्वामीजींकडे पोहोचले. स्वामीजींना ते देऊ लागले. त्यावर स्वामीजींनी विचारले, हे काय? लोकांनी सांगितले, पैसे आहेत. त्यावर स्वामीजींनी म्हटले, आपणांस माहिती आहे की मी काही घेत नाही. त्यावर ग्रामस्थांनी म्हटले, तरीही आपली आठवण रहावी, यासाठी आपण काही रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे, आपण पैसे घ्यावेत. त्यावर स्वामीजी म्हणाले, असे करा; एक सळई आणा, ती तापवा आणि त्याच्याने माझ्या हातावर डागा. त्यामुळे कायमची आठवण राहील.

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...