अमृत सुरभी

Tuesday, 13 August 2019

सार्थक जीवन जगून सागराला मिळालेली गंगा

रोहित चक्रतीर्थ, पत्रकार, बंगळुरू
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे


बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. सिद्धगंगेच्या श्री शिवकुमार स्वामीजींना 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांची दीर्घ मुलाखत घेण्यासाठी दीप तिम्मय्या यांनी आपली टीम तुमकुरला नेली होती. त्या टीममध्ये मलाही संधी दिली होती. आम्ही बंगळुरूहून निघून कॅत्संद्रजवळ उजव्या बाजूला वळलो. मठाला पोहोचेपर्यंत सायंकाळचे साडेचार वाजले. बंगळुरू - तुमकुरु राष्ट्रीय महामार्गावरील ट्रॅफिकची वर्दळ संपताच मन प्रशांत परिसतील सायंकाळच्या शीतलतेने व्यापले. भोवती उंच वाढलेली झाडे, पसरलेली विशाल खुली जागा, शेतशिवार. पुढे जाताच दिसल्या त्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या इमारती, अनेक समाधी, भव्य संस्कृत पाठशाळा, देवालये, मठ, दासोह भवन, अतिथीगृहे. मध्यभागी उभे राहून भोवती पाहिल्यास भव्य, उंच सिद्धगंगा डोंगराची अगाधता भान हरपून टाकत होती. डावीकडे रामदेवाचे डोंगर, त्याच्या पलिकडे देवराय दुर्ग. संस्कृत पाठशाळेच्या बाजूने डोंगराला लागल्यास समोरच्या एका गुहेत कधीच न आटलेले सिद्धगंगेचे तीर्थजलकुंड. मठाचा कर्मचारी आम्हाला हे सर्व दाखवत होता. सहा वाजता सामुदायिक प्रार्थना होते; स्वामीजीही तेव्हा तेथे असतात, असे त्याने सांगितले. तोपर्यंत आम्हाला इकडे तिकडे दहा - वीस विद्यार्थी दिसले असले तरी मठाचे विशाल प्रांगणही भरुन वाहावे इतक्या विद्यार्थी सागराने भरते, याचा आम्हाला अंदाजही नव्हता. मात्र, सहा वाजायला दहा मिनिटे कमी असताना कोठेही असले तरी पंचा, लाल शेला परिधान केलेली मुले तेथे येत होती!  पुराच्या काळात धरण फुटल्यावर खेड्यांत पाणी शिरावे तसे त्या प्रांगणात काही मिनिटांतच 8000 मुले जमली! हजारोंची संख्या असली तरी कुठेही धक्काबुक्की, हसणे - खिदळणे, गोंधळ नाही. एक मूकचित्र पाहतोय का, असा भ्रम व्हावा, अशाप्रकारे माझ्या डोळ्यांसमोरच ते सर्व प्रांगणात शिस्तबद्ध उभे राहून स्वामीजींची प्रतिक्षा करत होते. स्वामीजींनाच पाहून घड्याळ आपणहून स्वत:ला सेट करुन घेते, असे वाटावे इतक्यातच सहाला सहा सेकंद कमी असताना कोणाच्याही मदतीविना आलेले स्वामीजी आसनावर आसनस्थ झाले! आसनासमोरील छोट्या टेबलवर ठेवलेली त्या दिवशीची कार्यक्रम पत्रिका चष्म्याविना वाचली! ही दृश्ये पाहून हे सत्य की भास म्हणून मला हाताला चिमटा घ्यावा लागला!

आमच्यासाठी तो एक दिवसाचा कार्यक्रम. मात्र श्री शिवकुमार स्वामीजी ते व्रत एक - दोन दिवस नव्हे तर बरोबर 80 वर्षांपासून आचरत आले होते. पहाटे दोन वाजता - आपण अजून साखर झोपेत - ते झोपेतून उठून, योगाभ्यासाला बसायचे. ब्राह्म मूहुर्ताला स्नान, जप - तप, नामस्मरण, मुप्पिन षडाक्षरी, निजगुणांच्या पद्यांसह शिवपूजा संपवून साडेपाच वाजता लौकिक जगात परतल्यावर पुन्हा त्यांना रात्री उशिरा अकरा वाजताच विश्रांती मिळायची. तरुणपणी मठ चालवण्यासाठी आवश्यक आर्थिक संपदा जमवण्यासाठी स्वामीजी पहाटे सहाला बैलगाड्या घेऊन निघायचे. बैलगाडी जाणार नाही तेथे ते घोड्यावरुन जायचे. घोडाही जाणार नाही त्या ठिकाणी ते पायीच पोहोचायचे. तसेच खेड्यात जाऊन मठातील विद्यार्थ्यांच्या आहार - निवासाच्या व्यवस्थेसाठी रिकामी झोळी पुढे करत भिक्षा मागून, लोकांनी दिलेला एक दाणाही वाया जाणार नाही इतक्या काळजीने आणून मठातील सदा पेटत्या चुलींचे पोट भरावे लागायचे. अनेकदा मठाच्या शेतात वाढलेले गवत आपणच कापून पेंढ्या बांधून आणून गोशाळेतील गायींपुढे टाकायचे. मठाचा विस्तार वाढू लागल्यावर हवे तेथे नवी बांधकामे उभी राहू लागली तेव्हा त्यासाठी स्वत: दगड, वाळू वाहिली. शारिरीक श्रमाची कामे संपताच  स्वामीजी विद्यार्थ्यांसाठी शिक्षक व्हायचे. त्यांच्या अध्यापनात कालीदास, भास, कुमार व्यास, अल्लम, मिल्टन, शेक्स्पिअर अशा सर्व देशभाषांच्या सिमेबाहेरील कवी लीलया येऊन जायचे. अध्यापनाचे कर्तव्य संपल्यावर थोडीशीही उसंत नाही! पुन्हा पाकशाळेतील कर्तव्य हाक द्यायची. रात्रंदिवस पाकशाळेतील चुलींमध्ये लाकडे  जळत राहतील हे पहावे लागत होते ना?  सरपण संपल्यावर त्यासाठी हेच संन्यासी कासोटी बांधून उभे राहायचे. लाकडे फोडण्यासाठी कुर्‍हाड धरलेले हेच दंड काही क्षणातच रागीमुद्दीसाठी कढयांत चमचा फिरवताना दिसायचे. अशाप्रकारे एकाही दिवशी कोणतेही कारण पुढे न करता, न चुकवता, आठ दशके ही व्यक्ती रोज वीसहून अधिक तास, आपल्यासाठी नव्हे तर केवळ इतरांसाठी आपले जीवन समर्पित करुन जगले, हे पुढील पिढीला सांगितल्यावर विश्‍वास ठेवतील ? तरीही हे भगव्या वस्त्रांतील जीवन श्री शिवकुमार स्वामीजी यांनी स्वत:हून आवडीने स्वीकारलेले नव्हते तर आकस्मिकपणे त्यांच्या जीवनाला ती महत्वाची कलाटणी मिळाली होती. बंगळुरू जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील वीरापूर येथे 1 एप्रिल 1908 रोजी शिवण्णाचा जन्म झाला. वडील होन्नप्पगौडा हे वीरापूरचे पाटील होते. परिसरातील गावांत त्यांना मान होता. त्यातच सात मुले, पाच मुली असलेल्या होन्नप्पा - गंगम्मा दांपत्याचे 13 वे अपत्य असलेला शिवण्णा शिक्षणात पुढे, खेळात चपळ, आईसारखाचा ईशभक्त, वडिलांसारखा वागण्याबोलण्यात विनयशील होता. इतर मुलांपेक्षा भिन्न, विशिष्ट व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या लहान मुलाला पाहून गावी आलेल्या एका हस्तसामुद्रिकाने, हा मुलगा घरालाच नव्हे गावासाठी ज्योती बनून प्रकाश देईल, असे सांगितले होते म्हणे. होन्नय्याच्या मुलाचे पायगुण चांगला असल्याचे सांगून गावातील वडीलधारी मंडळी त्याचे कोडकौतुक करायचे. प्राथमिक शिक्षण गुंडीगेरेतील कुलीमठात घेतले. वयाच्या आठव्या वर्षी आईच्या निधनामुळे पोरका झाल्याने पुढे आपल्या बहिणींच्या घरांमध्ये राहून शिक्षण सुरू ठेवले. हायस्कूलच्या शिक्षणासाठी तुमकुरुच्या सरकारी शाळेत प्रवेश घेतला. त्याच वेळेस गावात प्लेगची साथ पसरल्याने शेट्टीहळ्ळीला जावे लागले. मात्र, तेथेही प्लेगची महामारी आल्याने स्वत:च स्वयंपाक करुन शाळा शिकावी लागली. सिद्धगंगा मठात उद्दान शिवयोगी स्वामी काही विद्यार्थ्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था केल्याचे ऐकलेल्या मुलाने पुढील शिक्षणाच्या आशेने मठ गाठला. तेथे गरीबाला अनुमती मिळाली नाही. तरी  मुलाला शिक्षणाविषयी अदम्य रुची, श्रद्धा असल्याचे उद्दान शिवयोगी यांनी जाणले. त्यांनी त्याला मठात चार महिने वास्तव्यास परवानगी दिली. शिवण्णाचा मठाशी पहिला संपर्क आला - तो अशाप्रकारे.
तेव्हा मठात एक लहान इमारत सोडली तर काही मालमत्ता नव्हती. तरीही धैर्याने स्वामीजींनी संस्कृत पाठशाळा सुरु करुन त्यात लिंगायत, गौड, हरिजन, ब्राह्मण आदी सर्व जाती - पंथाच्या मुलांना संस्कृत अध्ययनाची सोय केली होती, हे विशेष. यावरुन उद्दान शिवयोगी किती आधुनिक होते, ही लक्षात घेता येणारी बाब आहे. अशा मठाला मरुळसिद्ध (मरुळाराध्य) यांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. काही काळ सिद्धगंगा मठात राहून शिक्षण घेणार्‍या शिवण्णा आणि त्यांच्यात स्नेह वाढला. आध्यात्मिक भुकेने दोघांना जवळ आणले असावे,  असे म्हणावे लागेल. हायस्कूल शिक्षण संपवून, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शिवण्णा इंटमिजिएटसाठी बंगळुरूच्या सेंट्रल कॉलेजमध्ये दाखल झाला. तरी कॉलेजमध्ये गेल्यावरही त्याचे आणि सिद्धगंगा मठाचे संबंध तसेच राहिले. सुटीत वर्षातून दोन - तीनवेळा त्याचे मठाला भेटी देणे चुकले नाही.
16 जानेवारी 1930. शिवण्णा सेंट्रल कॉलेजमध्ये बी. ए. अंतिम वर्षात शिकत होता. वीज कोसळावी तशी एक खबर आली. चार -  पाच वर्षांपासून परिचित, आत्मीय मित्र मरुळाराध्य यांचे अकालिक निधन झाले होते. ती खबर ऐकताच शिवण्णा सिद्धगंगेला पोहोचला. अंत्यसंस्कार कार्यात पुढे उभे राहून सर्व काही पार पाडले. डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसत, हृदयावर दगड ठेवून मठातील सर्व कामे हिरीरीने मार्गी लावली. हे सर्व सूक्ष्मपणे पाहणार्‍या गुणग्राही ज्येष्ठ स्वामीजींच्या मनात एक विचार आकार घेत होता. क्रियाकर्म संपल्यानंतरच्या दिवशी त्यांनी शिवण्णाला जवळ बोलावले. जवळ बसवून म्हणाले, “शिवण्णा ! मुला, या मठाचा पुढचा उत्तराधिकारी तूच ! ही जबाबदारी मी तुला सोपवत आहे, स्वीकार कर ! ’’ थंड तलवारीसारखे शब्द. दोरीवर उभे करुन खाली पडणार नाही अशाप्रकारे चाल असे सांगितल्यावर कसे, मगरींचे वास्तव्य असलेल्या तलावात सहजपणे उतरवून पोहायला सांगितल्यास कसे, असा हा प्रसंग! ऐकलेस का, स्वीकार कर; स्वीकार कर म्हणाले. जीवनच बदलवून टाकण्यासारख्या त्या बोलण्यावर एकदोन सेकंदाचे मौनही पसरण्याआधीच पटकन शिवण्णा म्हणाला, “आपली आज्ञा स्वामीजी !.’’ विचार करुन सांगतो म्हणून मान हलवली नाही; घरी विचारावे लागेल, हा बहाणा केला नाही; आता काय कॉलेज दोन महिन्यांत संपण्याच्या मार्गावर आहे, त्यानंतर सरकारी नोकरी करायची, ही सबबही पुढे केली नाही. सर्व काही बाजूला ठेवून शिवण्णा एकाच श्‍वासात त्या महाजबाबदारीला मान देता झाला होता. स्वामीजी आणि  आणि शिवण्णा यांच्यात झालेले बोलणे सविस्तरपणे वडील होन्नप्पगौडा यांच्यापर्यंत पोहोचले. कॉलेज शिकलेल्या मुलाला योग्य मुलगी पाहून त्याचे लग्न करावे, नातवांना खेळवावे, हे स्वप्न पाहिलेल्या वडिलांंची ही गोष्ट ऐकून छातीच फुटली. ते एकटेच नव्हे, आपल्या सर्व नातेवाईकांना एकत्र करुन लगबगीने सिद्धगंगेला पोहोचले. मुलाच्या दोन्ही भुजांना पकडून त्याचे डोके ठिकाणावर आहे ना, हे पाहिले. त्याला रागावले. चार चांगल्या गोष्टी सांगितल्या. हात पसरले. तरी मुलाचा निर्णय मात्र सिद्धगंगा डोंगराइतकाच अचल होता. बाबा, मला जन्म देऊन हे जग दाखवलेत. या जगाचे ऋण फेडण्यासाठी कार्य करण्याची संधी मला द्या - मुलगा हट्टाने या एकाच वाक्यावर अढळ राहिला. अश्रूधारा वाहिल्या तरी मुलाचे मन न विरल्याने बेजार वडील मठाशी संपर्कही गमावून बसले. शिक्षणाला प्रथम प्राधान्य देणारे उद्दान शिवयोगी आपल्या शिष्याच्या मार्गातील दगड बनले नाहीत. ते त्यांच्या मार्गात फुलांचा सडा बनले. मठाचा उत्तराधिकारी म्हणून पट्टाभिषेक झाल्यावर भगवी वस्त्रे धारण करणारा मुलगा त्याच वस्त्रांत पुढे बी. ए. अंतिम वर्षाची परीक्षा दिल्याची त्या काळी राष्ट्रीय बातमी झाली होती ! तेथून पुढे श्री शिवकुमार स्वामी यांचे संपूर्ण विरक्त जीवन. संपूर्ण समाजासाठी समर्पित जीवन. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर 11 वर्षांनी श्री शिवकुमार स्वामी यांचे गुरुही लिंगैक्य झाले. परंतु तेव्हा मठाची संपत्ती म्हणून हाती होते केवळ 300 रुपये. शिवगणाराधनेसाठीही पुरेसे पैसे नाहीत, ही परिस्थिती होती. केवळ 33 वर्षे वयाच्या युवकाच्या डोक्यावर फक्त 60 विद्यार्थ्यांच्या भोजन - निवासाचीच जबाबदारी नव्हे, तर संपूर्ण मठाच्या सर्व खर्चादी पेलून नेण्याची महत्वाची जबाबादारीही होती. येणारी संकटे येऊ दे, देवाची कृपा राहू दे, ही सद्भावना सोडल्यास स्वामीजींच्या समोरील मार्गावर होता अंधार, फक्त अंधार... तरीही त्या अंधारातच  आशेचा किरण दिसला. गावात कंजुष शेट्टी म्हणून ओळखली जाणारी चिक्कण्णा नावाची एक व्यक्ती बैलगाडी भरुन तांदूळ घेऊन कुठे निघाली होती कोण जाणे, मनपरिवर्तन होऊन तो वाटेतून बैलगाड्यांसह परतला आणि मठासमोर येऊ उभा राहिला. गाडीतील सर्व तांदूळ मठाच्या आवारात उतरवून हातातील 3000 रुपये स्वामीजींच्या हाती ठेवून  शरणु शरणार्थी म्हणाला! तेवढेच नाही पुढे त्याने गावातील कोणाकोणाला व्याजाने पैसे दिले होते त्यांच्याकडून मुद्दल वसूल करुन ते सर्व मठाच्या तिजोरीत आणून जमा केले! सोबतच मठातच कोणतेही काम करत जीवन व्यतीत केले! तेथून सुरू झालेल्या यात्रेत श्री शिवकुमार स्वामी यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांनी मार्गातील चढ - उतारांवरही  मात केली. या यात्रेत सामना केलेल्या अग्निपरीक्षांचा खरा हिशेब त्यांच्याशिवाय कुणालाही माहीत नाही. विटा - विटांनी मठ बांधलेल्या स्वामीजींनी संपूर्ण जीवनयात्रेत लाकडे फोडली, दगड वाहिले, गायी सांभाळल्या, मुलांना दही मिळावी या उद्देशाने दूधाचा त्याग केला, अशा प्रसंगांचा विशेब ठेवायचा तरी कसा? एखादी व्यक्ती आपल्या जीवनात दत्त म्हणून समोर ठाकलेल्या एका प्रसंगाला स्वीकारुन, त्यानुसार आपले अखंड जीवन कसे जगले याचेच मला आश्‍चर्य वाटते. मनुष्यमात्राला जीवनाच्या एका ना एका क्षणी कामक्रोधादी षड्रिपुंची बाधा होतेच होते, मात्र स्वामीजी कसे त्यापासून दूर राहून जगले, हा एक अभ्यास करण्यायोग्य विषय आहे !  आपल्या जीवनात ते गोरगरीबांना भेटले, राजेरजवाड्यांना, पंतप्रधान - राष्ट्रपतींनाही भेटले. मात्र कोणत्याही भेटीने त्यांच्यात तिळमात्रही कमीपणा अथवा मोठेपणा आला नाही. गोरगरीबांनी प्रेमाने दिलेला पावशेर तांदूळ - रागी, राजकारण्यांकडून मिळणारे हजारो रुपयांचे दान त्यांनी नि:स्वार्थपणे स्वीकारले. देवराज अरस यांचे काँग्रेस सरकार असताना तीन वर्षे सरकारच सिद्धगंगेवर तुटून पडले होते. 1850 पासून कोणतेही जात, मत, पंथ न पाहता धर्मनिरपेक्षतेने कार्यरत मठ अरस यांचे लक्ष्य ठरले, हे विचित्र होते. मागास जाती -  वर्गांना तुम्ही चांगली वागणूक देत नाही, अशा विचित्र अतार्किक मुद्यावरुन अरस यांनी तीन वर्षे  सरकारकडून मठाला मिळणार्‍या अनुदानांना कात्री लावली. अनुदानाच्या पाठबळाविना  रस्त्यावर येण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना स्वामीजींनी केवळ झोळीच्या बळाच्या भरवशावर मार्गक्रमण केले. खेडोपाडी भिक्षाटन करुन धनधान्य गोळा केले. आकाशच फाटून डोक्यावर पडले असताना मुले मात्र एका वेळेसही उपाशी राहू नयेत याची काळजी आणि भूतदयेने रात्रंदिवस यंत्रगत राबणार्‍या स्वामीजींनी सरकारी मदतीविना आपण मठ चालवू शकतो, हे दाखवून दिले. प्रतिदिन श्री मठाला रोज लागणारे धान्य, वस्तूंचा हिशेब पाहिल्यास कोणाचेही डोके गरगरायला लागेल. 3000 किलो तांदूळ, 1500 किलो तूरडाळ, 400 किलो भाजीपाला, उप्पीट रवा 500 किलो, 300 किलो कांदा, 200 नारळ... एवढे सर्व एका दिवसाच्या जेवणासाठी लागते; रोज 9000 विद्यार्थ्यांना पोट भरुन जेवण देणार्‍या श्री मठात स्वामीजींचा आहार 2 इडली, एक छोटे रागीमुद्दी, कडुनिंबाच्या काडीचा काढा! हे देव नाहीत तर आणखी कोण ?

त्या दिवशी मुलाखतीसाठी सिद्धगंगेला गेलो असताना मला सिद्धगंगा शिक्षण संस्थेचे संचालक चन्नबसप्पा यांच्या गोष्टी ऐकण्याची संधी मिळाली. लहान असताना चौथ्या - पाचव्या वर्षी मठात आलेले चन्नबसप्पा हे पुढे शिक्षण संपवून सुरत्कल कॉलेजमध्ये गणित प्राध्यापक बनले होते. ते मठात विद्यार्थी असताना स्वामीजी दररोज मुलांचा क्लास घ्यायचे. इंग्लिश, कन्नड, संस्कृतसह स्वामीजी मुलांना गणित शिकवायचे. सेंट्रल कॉलेजमध्ये पदवीला स्वामीजींनी भौतिकशास्त्र आणि गणित शिकल्याचे  बहुतेक लोकांना माहीत नाही. गणिताचा विद्यार्थी असलेल्या मला स्वामीजींची गणित विषयातली रुची पाहून आश्‍चर्य वाटले. गणितात 111 या संख्येला एक विशेष नाव आहे. त्याला नेल्सन म्हटले जाते. 111 वर्षांचे भरलेले आयुष्य जगून, उत्तरायण पुण्यकालात, सोमवारी पूर्णायुष्य संपवून ईश्‍वराच्या चरणी लीन झालेले स्वामीजी या भूमीचे सन - अर्थात भूमिपुत्र म्हणजून जगले; ते या कन्नड मातीचे पुण्य आहे. त्यांच्यासारखे जगता न आले तरी ते असतानाच्या काळात आपण या भूमीवर  आहोत, हेच आमचे पुण्य होय. ते अलग झाल्यामुळे भूमीवरील पुण्यच पुरुष रुपाने गेल्यासारखे झाले आहे. मन विदीर्ण झाले आहे. ओम शांती.






- August 13, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, 12 August 2019

कन्नड गीत


नेत्तीयल्ली गिरी छत्रियनेत्तीद शक्तीगे ओ नमना । धृ ।
सुत्तले सागर वस्त्रव धरिसिद भक्तीगे ओ नमना
कोटी कोटी कै, कोटी कोटी कंटाळी निंतिरिवुदु
साटी इल्लद एकरुपाद ताईगे ओ नमना, शक्तीगे ओ नमना
मरिगिड आडीतिडुव गाळीय परिमळ निन्न उसिरू
निनू उट्टिरव पितांबरवू शालीवनद हसिरू
हगलल्ली सूर्य,  इरूळल्ली चंद्र, निन्न हणेय तिलकं
एंथ श्रीमंत रुप निन्नदे नोडी ननगे पुलका, नोडी ननगे पुलका
नेत्तीयल्ली गिरी छत्रियनेत्तीद शक्तीगे ओ नमना
सुत्तले सागर वस्त्रव धरिसिद भक्तीगे ओ नमना, भक्तीगे ओ नमना
सावीर धारेगळ आदरु वंदे सागर नम्म गुरी
सावीर रेशमी एडेगळू सेरीद पत्तल नम्म सिरी
नुरू शक्तीगळ सुंदर संगम संस्कृती ई नाडू
हुट्टू कुडलू नाडिन दुडिमेगे नमगे यारू ईडू, नमगे यारू ईडू
नेत्तीयल्ली गिरी छत्रियनेत्तीद शक्तीगे ओ नमना
सुत्तले सागर वस्त्रव धरिसिद भक्तीगे ओ नमना, भक्तीगे ओ नमना
कोटी कोटी कै, कोटी कोटी कंटाळी निंतरूनू
साटी इल्लद एकरुपाद ताईगे ओ नमना, शक्तीगे ओ नमना, शक्तीगे ओ नमना, नमना, नमना ,नमना, ताईगे ओ नमना,नमना, नमना, नमना,  कोटीगे ओ नमना, नमना, नमना, नमना,  देवीगे ओ नमना, शक्तीगे ओ नमना, ताईगे ओ नमना, कै कंटिगे ओ नमना...

- August 12, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

त्रिविध दासोही शिवकुमार स्वामी


६०० वर्षांची शरण परंपरा लाभलेल्या कर्नाटकातील तुमकुरु येथील सिद्धगंगा मठाला पद्मभूषण डाॅ. शिवकुमार स्वामी यांनी अन्न, अक्षर आणि आश्रय या त्रिविध दासोहाच्या आधारे देशभरातच गौरवाचे स्थान मिळवून दिले.  अखंड कायक (कर्म)  निष्ठा, अनन्य भक्ती आणि ज्ञानामुळे त्यांना जनमनांत नडेदाडुव देवरु (जिवंत ईश्वर) म्हणून स्थान मिळाले. १११ व्या वर्षी २१ जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले. 


या जगातील शेकडो गुरुंस पाहून पाहुन, मी कंटाळून गेलो हो,  वित्तापहारी गुरू शेकडो, शास्त्रार्थ सांगणारे गुरू शेकडो,  मंत्रतंत्राने दोन्ही लोकांमध्ये, सुखदु:खे देणारे गुरू शेकडो, सत्कर्माचा उपदेश करून, स्वर्ग - मर्त्यामध्ये सुख देणारे गुरू शेकडो, विचारमार्गाने षट्साधनांचा उपदेश करणारे गुरू शेकडो. विषय सगळे मिथ्या म्हणून समजावून देऊन, आत्मप्रेम निर्माण करणारे गुरू शेकडो, शिवजीवांचे ऐक्य समजावून देऊन, निर्मल ज्ञान देणारे गुरू प्रथम होत.  संशयाचे किडे सर्व ज्ञानाग्नीमध्ये जाळून टाकून,
मुक्तीची गरज ज्ञानाच्या बंधनी ठेवणारे गुरू, चेन्नबसवण्णाविना दुसरे कोणी न दिसती पहा हो,
कपिलसिद्ध मल्लिकार्जुना.  श्री सिद्धरामेश्वरांचे हे वचन सर्वकालिक सत्य आहे. गुरु कसा असावा, हे त्यांनी या वचनातून सांगितले आहे. श्री शिवकुमार स्वामी हे शरण विचारांनुसार मूर्तिमंत गुरू होते. बाराव्या शतकात बसवण्णांनी दासोह शब्दाला क्रियाशील रुप दिले. मात्र, आजच्या पिढीला त्याचा अर्थ समजून घेण्याचा, पाहण्याचा योग श्री शिवकुमार स्वामी यांनी दिला. त्यांचे ८८ वर्षांचे संन्यस्त जीवन, ७७ वर्षे मठाधीश म्हणून कायक निर्वाह हे संख्यात्मकदृष्ट्या आश्यर्चकारक आहे. मात्र, यापेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांचा निकटचा लोकसंपर्क.  त्यांच्या दृष्टीने संन्यास हा समाजापासून अंतर आणि धार्मिक गोष्टींपुरते सीमित नव्हते. मनुष्याची आंतरिक उन्नती हाच त्यांच्या चिंतनाचा प्राधान्याचा विषय होता. त्यासाठी सशक्त व्यक्तित्व घडवणारे शिक्षण गोरगरीब आणि वंचित समूहांना मिळवून देण्यासाठी आजीवन ते राबले.

ते अनपेक्षितपणे सिद्धगंगा मठाचे उत्तराधिकारी झाले.  मात्र, त्यांनी आपल्या वैराग्यभाव, संयमी, दृढसंकल्प, कार्यदक्षता, वाकपटुत्व, सेवाकांक्षा आणि बसवादि शिवशरणांनी प्रतिपादित कायक व दासोह तत्त्वांच्या आचरणाने मठाला लौकिक प्राप्त करुन दिले. १९३० मध्ये श्री उद्दान शिवयोगी यांनी मठाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केली. १९४१ मध्ये मठाची सूत्रे त्यांच्या हाती आली तेव्हा केवळ ६० विद्यार्थ्यांची संस्कृत पाठशाळा होती.  तेथे आज १३१ शैक्षणिक संस्थांतून ४९ हजार १४७ विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवली जात आहे.  तर अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशातच 'एसआयटी' या नावाने ख्याती मिळवली आहे.  सरकार शिक्षणाला अधिक महत्व देत नसतानाच्या काळात मठाने त्याचे महत्व ओळखले. योग्य शिक्षण, वसतिगृह आणि भोजन याद्वारे हजारो मुलांचे जीवन उजळवले. 'ज्ञान हाच दीपस्तंभ' हा शिवकुमार स्वामी यांचा विचार होता. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर 'शिक्षण हे व्यक्ती व राष्ट्र या दोहोंसाठी सशक्तीकरणाचे माध्यम आहे. कारण आपल्या देशाचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित राहू शकेल. योग्य आणि चांगले शिक्षण हे एक असे माध्यम आहे जे मनुष्याला शक्तिसंपन्न बनवते. तसेच त्याला समाजातील वाईट गोष्टींपासून मुक्त ठेवते.’  विशेष म्हणजे १० हजार विद्यार्थ्यांच्या निवास, भोजनाची आणि रोज दर्शनासाठी येणाऱ्या तीन हजारांहून अधिक भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते.  मठातील अनेक दशकांपूर्वीची पेटती चूल आजही गोरगरीब, अनाथ विद्यार्थ्यांसह भाविकांसाठी नंदादीप बनली आहे. 'जेवणारा यजमान, वाढणारा दास' असे शिवकुमार स्वामी म्हणायचे. त्यामुळेच रात्रीही मठात आलेला भाविक उपाशीपोटी गेल्याचे आजपर्यंत एकही उदाहरण नाही. त्यांनी त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था लावली होती.
शिवकुमार स्वामी यांनी बसवण्णांचा कायकवे कैलास हे तत्व जीवनात प्रत्यक्षात आणले. त्यांच्यावर बसवण्णांसह स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. गरीब, दुबळे, रोगी वैगरेंमध्ये ज्यांना शिव दिसतो, ते खरेखुरे शिवाचे उपासक होत. तेच खरोखर शिवाची उपासना करीत असतात आणि जो माणूस केवळ प्रतिमेमध्येच शिवाची उपासना करीत असतो, त्याने धर्मजीवनाला नुकतीच सुरुवात केली आहे, असे म्हणता येईल, फक्त मंदिरांमध्येच शिव आहे, असे मानणाऱ्या व्यक्तीपेक्षा जी व्यक्ती जात किंवा धर्म विचारात न घेता , एका देखील गरीब माणसाची शिव बोधाने सेवा करते तिच्यावर शिव अधिक प्रसन होतात, हा विवेकानंदांचा विचार त्यांनी अनुसरला. ते रोज वि्दयार्थ्यांना नीतिकथा सांगायचे. त्यात बसवण्णा, विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या संदर्भातील कथा सर्वाधिक असायच्या. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबन, शिक्षणाबरोबर जीवनशिक्षणाचेही धडे दिले. त्यांच्यावर श्रमसंस्कार केला.  त्यांच्यासोबत मठात आणि शेतात राबणारे ते कायकयोगी होते.  त्यांच्यात धर्म आणि कर्म यांचा समन्वय होता. त्यामुळेच राष्ट्रकवी जी. एस. शिवरुद्रप्पा, ज्येष्ठ साहित्यिक जी. एस. सिद्धलिंगय्या, गो. रु. चन्नबसप्पा, कुं. वीरभद्रप्पा, अभिनेता मुख्यमंत्री चंद्रू आदी अनेकविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मठाच्या शिक्षण संस्थांतून घडली. श्री शिवकुमार स्वामी यांनी बसवण्णांच्या विचारांच्या प्रसारासाठी कार्य केले.  ते म्हणायचे, ' 'आज जगाला शांती हवी आहे. ती केवळ बसवण्णांसह  शरणांच्या वचन साहित्याच्या अध्ययन, अनुसरणानेच निर्माण होईल. हा कोण ऐवजी तो आमचा हा मधुर आत्मीय भाव सर्वांच्यात वाढावा. तेव्हाच जातियता संपेल. 'तसेच शेती विकासासाठी कृषी, जनावरे प्रदर्शनासह विविध उपक्रम राबवले. मठाची वार्षिक यात्रा ही रयत यात्रा म्हणूनच ओळखली जाते. चेन्नबसवण्णा म्हणतात,  भगवी कफनी घातलेला जंगम असे का? कर्णकुंडल , हस्तमुद्रिका बाळगलेला जंगम असे का? केवळ संन्यासी सारे जंगम असती का? वेषधरी सारे जंगम असती का? अज्ञानी सारे जंगम असती का? भूभारी  सारे जंगम? नव्हेत. जंगम कोण म्हणजे, सीमा नसलेला निस्सीम हा जंगम, आशा नसलेला निरासक्त हा जंगम, चिंता नसलेला निश्चिंत हा जंगम, अशा जंगमाची चाहूल न लागल्याने, कूडल चेन्नसंगय्या स्वत:च जंगम झाला. या वचनातील जंगमाच्या लक्षणाप्रमाणे पद्मभूषण डाॅ. शिवकुमार स्वामी हे निस्सीम, निरासक्त आणि निश्चिंत होते. तसेच ते लोकजंगम होते.

चौकट
धर्मनिरपेक्ष धोरणामुळे बनले सर्वांचे श्रद्धाकेंद्र
सिद्धगंगा मठ वीरशैव लिंगायत समुदायाचे असले तरी श्री शिवकुमार स्वामी यांच्या धर्मनिरपेक्ष धोरणामुळेच ते सर्व वर्गातल्या भक्तांचे श्रद्धाकेंद्र बनले. शैक्षणिक संस्थांत येणाऱ्या विद्यार्थी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांत त्यांनी कोणताही भेद केला नाही.  कन्नडद कोट्यधिपती कार्यक्रमात भगवद्गीतेचे श्लोक सहजगत्या व पटापट उच्चारत गंगावतीच्या हुसेन बाशा याने एक कोटीचे बक्षीस मिळवले. हुसेनने सिद्धगंगा मठातच शिक्षण घेतले. बक्षीस मिळवल्यानंतर हुसेन आधी स्वामींच्या दर्शनासाठी सिद्धगंगा मठ गाठला होता.  सर्वधर्मीयांना मठाच्या सेवाकार्याचा लाभ मिळत असला तरी त्यांचा अजेंडा मतांतरणाचा नव्हता. केवळ मानवीय सेवा हाच त्यांचा अजेंडा होता.
अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर





- August 12, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

काश्मीर आता खरा भारताचा मुकुटमणी !

सहना विजयकुमार, बंगळुरू

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 
आता यापुढे काश्मीरला भेट देणार्‍यांना पडझड झालेली घरे, फोडलेली मंदिरे, हरवलेले सांस्कृतिक अवशेष पाहायला मिळाले नाही तरी पुरेसे आहे. त्यांचे संवर्धन खरेच कष्टदायक आहे.

अशक्य ! काश्मीरचे ऐतिहासिक, राजनैतिक आणि वैधानिक पार्श्‍वभूमी जाणणारे या वेळेस भावूक न होणे अशक्य ! ते काहीही नसले तरी आनंद व्यक्त करायला केवळ भारतीय यापेक्षा आणखी कोणत्याही निमित्ताची गरज नाही !
शेवटी कलम 370 नावाच्या ब्रह्मराक्षसाचे शिरच्छेद झाले. त्यासोबतच 35 ए नावाचे त्याचे विषारी सुळे दातही गळून पडल्याने भारतीयांत आनंद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काश्मीरी हिंदूंमध्ये (सतत काश्मीरी पंडित म्हणून उल्लेख करत केवळ ब्राह्मण जातीवर अन्याय झाल्याची भावना निर्माण करुन त्याला क्षुल्लक गोष्ट बनवले, हे वेगळ्या स्तराचे राजकारण. असो, त्याची चर्चा आता नको.)
29 वर्षांपूर्वी मशिदींमधील ध्वनिवर्धकांवरुन धमकी, मतांध मौलवींची क्रूरता, विश्‍वास ठेवलेल्या मुस्लिम बांधवांनीच चालवलेला रक्तपात, अत्याचाराला बळी पडून घाबरुन रातोरात आपली घरे सोडून बाहेर पडलेले आज भावूक होवून अश्रूंना मोकळी वाट करुन देत आहेत. साहजिकच भावूकतेने मूक झाले आहेत. बहुतेक ही समस्या इतक्या सहजतेने सुटेल, असे त्यांनाही वाटले नसावे. राष्ट्रीय वाहिन्यांवरील अगणित चर्चांमधून सर्वजण मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर सतत टीका करत असतात. त्यांचा आक्रोश समजून घेण्यासारखा आहे. तसे पाहिल्यास ही समस्या सोडविण्यासाठी 72 वर्षे लागावीत, इतके क्लिष्ट ती कधी नव्हतीच. अभाव होता केवळ इच्छाशक्तीचा.
एकतर नेता स्वत: बुद्धिमान असावा. नाहीतर बुद्धिमंतांनी दिलेला सल्ला पाळण्याचा विवेक तरी हवा. देशाच्या हिताचे निर्णय घेण्याचे धैर्यही हवे. पण या गोष्टी नसलेल्या नेहरू यांनी काश्मीरची जबाबदारी घेतली हा त्यांचा मोठा अविचार होता. नंतर ती जबाबदारी कोणत्याही प्रकारे योग्य नसलेल्या गोपालस्वामी अय्यंगार यांच्याकडे हस्तांतरित केली. काश्मीर म्हणजे त्यांना वाटले इतके सुलभ होते? या भूमीवर गोनंद, त्यानंतर झालेले 43 राजे, कार्कोट, उत्पल, गुप्त, लोहर, दुलाच, रिंचन, शहमीर, सय्यद, दर, चक, मुघल, अफगाण आणि शिखांनी राज्य केले. नंतर आलेल्या निर्लज्ज धर्मनिरपेक्ष राजकारण्यांनी वाहिलेल्या रक्ताच्या पाटात ही भूमी भिजली. त्याच्या नशिबाची कथा समजायला कल्हणाची राजतरंगिणी एकच पुरेसे आहे. दुर्दैवाने, काश्मीरचा इतिहास कोणत्याही पाठ्यपुस्तकात नाही. अरबांना पिटाळून लावणार्‍या कार्कोट वंशाच्या अग्रणी वीर ललितादित्य याची अंगावर रोमांच उभी करणारी कथा बाबर, अकबराच्या कल्पित, उत्प्रेक्षित महागाथांमध्ये समाधिस्थ झाली. असो, काश्मीरचे अन्य आयाम बाजूला ठेवून स्वातंत्र्योत्तर भारतातात घडलेल्या दोन घटनांचे अवलोकन करू या.







घटना 1 : 24 ऑगस्ट 1947 : आजाराने ग्रस्त पाकिस्तानचे गवर्नर जनरल मोहम्मद अली जीना विश्रांतीसाठी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतात. त्या वेळी भारत  - पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झाले असले तरी जम्मू काश्मीर संस्थान कोणत्याही देशात विलीन झाले नव्हते. काश्मीर मुस्लिमबहुल प्रदेश असल्या कारणाने कधी का होईना ते आपल्यालाच मिळेल, हे जीनांचे गणित होते. त्यामुळे आपले ब्रिटीश सचिव कर्नल विल्यम बर्नी यांना बोलावून आपली काश्मीरमध्ये दोन आठवडे राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देतात. त्यानंतर पाच दिवसांनी बर्नी येतात. ते आघातकारी उत्तर देतात, ‘काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी आपल्याला प्रवासी म्हणूनही तेथे पाय ठेवू देणार नाही !’ असे म्हटले आहे. त्यामुळे चिडलेले जीना भारताच्या गुप्तचरांनाही कळू न देता काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी आपले संस्थान पाकिस्तानात विलीन न केल्यास पुढे हाती घ्याव्या लागणार्‍या कारवाईची रुपरेषा आखतात. मात्र, त्यात तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान सक्रियपणे कार्यरत असतात. परिणामी 22 ऑक्टोबरला पठाण टोळ्या मुजफ्फराबादवर अमानुष हल्ला करतात. घाबरलेले हरिसिंग भारताकडे मदतीची याचना करतात आणि 26 ऑक्टोबर रोजी भारताच्या विलीनकरण करारावर स्वाक्षरी करतात. संवैधानिकदृष्ट्या त्या दिवशी जम्मू काश्मीर (लडाखसहित) भारतात विलीन झाले.
तेव्हा भारतात - पाकिस्तानचा हल्ला परतवणे असाध्य नाही हे जाणलेले आपले सैनिक त्यात प्रत्येक टप्प्यावर यश मिळवत राहिले. इतक्यात, म्हणजे एक जानेवारी 1948 रोजी नेहरू यांनी माउंबॅटनच्या सल्ल्यानुसार हा विषय संयुक्त राष्ट्रसंघात नेऊन तिसर्‍याने मध्यस्थी करण्यास संधी मिळवून दिली. ते पुरे नसेल की काय एक जानेवारी 1949 रोजी युद्धविरामाची घोषणा केली. आजचा पाकव्याप्त काश्मीर त्याचाच परिणाम आहे. आपल्या सैनिकांना रोखले नसते तर नीलम खोर्‍यातील शारदापीठ (श्रीनगरपासून सुमारे 130 किलोमीटर अंतर) आज आपल्या अधिकारात सुरक्षित राहिले असते.
घटना 2 : 1949 : काँग्रेस कार्यकारिणी संविधानाच्या मसुदा प्रतीला अंतिम स्वरुप देण्यात रत होते. त्याच वेळेला गोपालस्वामी अय्यंगार यांना जम्मू - काश्मीरची जबाबादारी सोपवली होती. गोपालस्वामींच्या मागे लागलेल्या शेख अब्दुल्ला यांनी कलम 370 चा मसुदा तयार करुन त्यांची संमती मिळविण्यात यशस्वी झाले. मात्र, ते संविधानात समाविष्ट व्हावे, यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीत चर्चा होऊन स्वीकारायला हवे होते. संसदेत गोपालस्वामी यातील तरतुदी सांगताना गोंधळ झाला. तेव्हा नेहरू नेहमीप्रमाणे सुटाबुटात विदेश प्रवासात होते. नाईलाजाने गोपालस्वामींनी सरदार पटेलांकडे मदतीची याचना केली. त्यावर पटेल यांचे निजी सचिव व्ही. शंकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर पटेल यांनी काय सांगून त्यांचे समाधान केले माहीत आहे? ‘शेख अब्दुल्ला आणि गोपालस्वामी या दोघांपैकी कोणीही शाश्‍वत नाही. भारताचे भविष्य सरकारची शक्ती, सामर्थ्यावर उभी आहे. त्यावरच आपला विश्‍वास नसेल तर आपण एक देश म्हणून अस्तित्व टिकविण्यास पात्र नाही !’
पहिली घटना घडली तेव्हाच प्रत्युत्तर दिले असते तर हे राहिलेच नसते. तेव्हा नेहरू आंतरराष्ट्रीय समुदायाचे दार ठोठावल्यामुळेच आज अमेरिका पावलोपावली नाक खुपसण्यासाठी सज्ज आहे. उद्याच्या जेवणाचीही भ्रांत असलेला पाकिस्तान आपली परिस्थिती बिघडली तरीही वेळोवेळी काश्मीरच्या जखमेवरील खपल्या काढून आनंदित व्हायचा. आपल्यामधील कलह, आपण स्थैर्य मिळवू शकतो, हे सांगणारे धैर्यधर पटेल या देशाचे पहिले पंतप्रधान बनू शकले नाहीत, हे आपले दुर्दैव होय. नेहरुंच्या अनुपस्थितीत त्यांच्या सचिवाचा अवमान नको, या एकमेव उद्देशाने मसुदा स्वीकारण्यासाठी सहकार्य केलेल्या पटेलांना असलेली नैतिक प्रज्ञा ही त्यांच्या असीम व्यक्तिमत्त्वाचा आरसाच आहे. एकूणच, काश्मीरच्या विषयात चारजण प्रात:स्मरणीय आहेत. सरदार पटेल, कलम 370 विरुद्ध लढतानाच काश्मीरमध्ये बलिदान दिलेले श्यामाप्रसाद मुखर्जी, 1990 च्या त्या अंधकारात आपली संपूर्ण ताकद लावून हिंदूंचे संरक्षण करणारे तत्कालीन राज्यपाल जगमोहन मल्होत्रा आणि पटेलांच्या जन्मभूमीचे आणखी एक पुत्र नरेंद्र दामोदरदास मोदी.
 कलम 370 ला हात घातल्यास आकाशच कोसळेल म्हणून बोंब मारणार्‍या राजकीय धुरीणांना राहत्या घरी नजरकैदेत ठेवले. फुटीरतावाद्यांना तिहार कारागृहात टाकले. दगडफेक करणार्‍यांचे हात बांधून ठेवले. ही रात्र संपून दिवस उजाडण्याच्या आत जे घडले ते चमत्कार नव्हे. दीड वर्षाहून अधिक काळ अतिसतर्कतेने आखलेल्या रणनीतीचे हे प्रतिफल, हे एक मुख्य तथ्य आहे. काश्मीरचे कोणतीही मुस्लीम व्यक्ती नाराज झाली नाही. त्यांना या कलमाविषयी कधीही विशेष आस्था नव्हती. मी काश्मीरात सर्वाधिक मुस्लिमांसोबतच फिरले. सुशिक्षितांची भावना आपल्या शहरातील युवकांपेक्षा वेगळी नाही. निश्‍चितच प्रलय येणार नाही.
आता यापुढे काश्मीरला भेट देणार्‍यांना पडझड झालेली घरे, फोडलेली मंदिरे, हरवलेले सांस्कृतिक अवशेष पाहायला मिळाले नाही तरी पुरेसे आहे. त्यांचे संवर्धन खरेच कष्टदायक आहे. आपण एक देश म्हणून राहण्यास पात्र असल्याचे मोदी सरकारने दाखवून दिले आहे. लक्षात असू द्या, संपूर्ण जगात शतकानुशतके अव्याहतपणे ख्रिस्ती आणि मुस्लिम आक्रमणांना सामोरे जावे लागूनही संस्कृती, सभ्यता वाचवू शकले ते केवळ आपले राष्ट्र. सनातन धर्मीय म्हणून अभिमान बाळगायला संधी मिळाली, हे पुण्यच होय. काश्मीर खराच भारताचा मुकुटमणी झाला,  अशावेळी श्रीकृष्णांची उक्ती आठवते, ‘धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।...’
- August 12, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

सिद्धगंगेचा लोकजंगम






बाराव्या शतकात दासोह शब्दाला बसवण्णांनी क्रियाशील रुप दिले. त्यांच्यानंतरच्या अनेक अनुयायांनी ही परंपरा पुढे चालवल्याचे दाखले इतिहासात मिळत असले तरी आपल्याला त्याचा अर्थ समजून घेण्याचा, पाहण्याचा योग शरण परंपरेतील सिद्धगंगा मठाने दिला.  तर पद्मभूषण डाॅ. शिवकुमार स्वामी यांनी कर्म, भक्ती, ज्ञान या योगत्रयांच्या बळावर आणि अन्न, अक्षर, आश्रय या त्रिविध दासोहाच्या आधारे या मठाला कर्नाटकातच नव्हे तर देशभरात गौरवाचे स्थान मिळवून दिले. त्यामुळे ते चालता बोलता ईश्वर (नडेदाडुव देवरू) बनले.  अशा शतायुषयी स्वामीजींचे २१ जानेवारी रोजी वयाच्या १११ व्या वर्षी निधन झाले. … 
 भगवी कफनी घातलेला जंगम असे का? 
कर्णकुंडल , हस्तमुद्रिका बाळगलेला जंगम असे का? 
केवळ संन्यासी सारे जंगम असती का? 
वेषधरी सारे जंगम असती का?
अज्ञानी सारे जंगम असती का? 
भूभारी  सारे जंगम? नव्हेत. 
जंगम कोण म्हणजे, 
सीमा नसलेला निस्सीम हा जंगम, 
आशा नसलेला निरासक्त हा जंगम, 
चिंता नसलेला निश्चिंत हा जंगम, 
अशा जंगमाची चाहूल न लागल्याने, 
कूडल चेन्नसंगय्या स्वत:च जंगम झाला. 
श्री चेन्नबसवण्णांनी या वचनात सांगितलेल्या जंगमाच्या लक्षणाप्रमाणे पद्मभूषण डाॅ. शिवकुमार स्वामी हे निस्सीम, निरासक्त आणि निश्चिंत होते. ८८ वर्षांचे संन्यस्त जीवन, ७७ वर्षे मठाधीश म्हणून कायक निर्वाह हे संख्यात्मकदृष्ट्या आश्यर्चकारक आहे. मात्र, यापेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांचा निकटचा लोकसंपर्क. त्यांच्या दृष्टीने संन्यास हा समाजापासून अंतर आणि धार्मिक गोष्टींपुरते सीमित नव्हते. मनुष्याची आंतरिक उन्नती हाच त्यांच्या चिंतनाचा प्राधान्याचा विषय होता. त्यासाठी सशक्त व्यक्तित्व घडवणारे शिक्षण गोरगरीब आणि वंचित समूहांना मिळवून देण्यासाठी आजीवन ते राबले.

अनपेक्षितपणे सिद्धगंगा मठाचा उत्तराधिकारी झालेला शिवण्णा शिवकुमार स्वामी झाला. मात्र, त्यांनी आपल्या वैराग्यभाव, संयमी, दृढसंकल्प, कार्यदक्षता, वाकपटुत्व, संस्कृत, कन्नड व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्व, सेवाकांक्षा आणि बसवादि शिवशरणांनी प्रतिपादित कायक व दासोह तत्त्वांच्या आचरणाने मठाला लौकिक प्राप्त करुन दिले. १९३० मध्ये श्री मरुळाराध्य स्वामी यांच्या निधनानंतर श्री उद्दान शिवयोगी यांनी मठाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केली. शिवण्णा बंगळुरुत पदवीचे शिक्षण घेत होता.   मठाधिपती मरुळाराध्य स्वामी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तो मठात आला होता. ते संपल्यांतर श्री उद्दान शिवयोगी यांनी त्याला जवळ बोलावले, म्हणाले, तुला एक गोष्ट सांगतो. तू नकार देऊ नकोस. आता तूच या मठाचा उत्तराधिकारी. हे शिवण्णासाठी अनपेक्षित होते. तरीही त्याने क्षणाचाही विचार न करता  होकार दिला. तारुण्यात अनेक आमिषे हात जोडून समोर उभ्या असतात. भविष्याची स्वप्ने असतात. तशी त्यांचीही असतील आणि त्यांच्या वडिलांसह कुटुंबियांनीही पाहिल्या असतील. मात्र, त्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करतात त्याने भगव्या वस्त्रातील संन्यस्त जीवनाचा हा कंटकाकीर्ण मार्ग स्वीकारला.   १९४१ मध्ये मठाची सूत्रे त्यांच्या हाती आली तेव्हा ६० विद्यार्थ्यांची संस्कृत पाठशाळा आणि छोटेसे वसतिगृह होते.  तेथे आज १३१ शैक्षणिक संस्थांतून ४९ हजार १४७ विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवली जात आहे.  तर अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशातच 'एसआयटी' या नावाने ख्याती मिळवली आहे.  सरकार शिक्षणाला अधिक महत्व देत नसतानाच्या काळात मठाने त्याचे महत्व ओळखले. योग्य शिक्षण, वसतिगृह आणि भोजन याद्वारे हजारो मुलांचे जीवन उजळवले. 'ज्ञान हाच दीपस्तंभ' हा शिवकुमार स्वामी यांचा विचार होता. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर 'शिक्षण हे व्यक्ती व राष्ट्र या दोहोंसाठी सशक्तीकरणाचे माध्यम आहे. कारण आपल्या देशाचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित राहू शकेल. योग्य आणि चांगले शिक्षण हे एक असे माध्यम आहे जे मनुष्याला शक्तिसंपन्न बनवते. तसेच त्याला समाजातील वाईट गोष्टींपासून मुक्त ठेवते.’  विशेष म्हणजे १० हजार विद्यार्थ्यांच्या निवास, भोजनाची आणि रोज दर्शनासाठी येणाऱ्या तीन हजारांहून अधिक भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते.  मठातील अनेक दशकांपूर्वीची पेटती चूल आजही गोरगरीब, अनाथ विद्यार्थ्यांसह भाविकांसाठी नंदादीप बनली आहे. 'जेवणारा यजमान, वाढणारा दास' असे शिवकुमार स्वामी म्हणायचे. त्यामुळेच रात्रीही मठात आलेला भाविक उपाशीपोटी गेल्याचे आजपर्यंत एकही उदाहरण नाही. त्यांनी त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था लावली होती. मठासाठी रोज लागणारे धनधान्य पाहिल्यास थक्क करणारे आहे. रोज तीन टन तांदूळ, दीड टन रागी पीठ, तीन क्विंटल तूरडाळ, ४ क्विंटल भाजीपाला, तीन क्विंटल कांदा, २०० नारळ आदी अन्य वस्तू लागतात. हजारो विद्यार्थ्यांच्या भोजन आणि भाविकांच्या प्रसादाची सोय करणाऱ्या या मठाच्या स्वामीजींचे आहार होते केवळ दोन इडली, एक लहान रागी मुद्दी आणि कुडनिंबाचा काढा!

शिवकुमार स्वामी यांनी बसवण्णांचा कायकवे कैलास हे तत्व जीवनात प्रत्यक्षात आणले. त्यांच्यावर बसवण्णांसह स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. गरीब, दुबळे, रोगी वैगरेंमध्ये ज्यांना शिव दिसतो, ते खरेखुरे शिवाचे उपासक होत. तेच खरोखर शिवाची उपासना करीत असतात आणि जो माणूस केवळ प्रतिमेमध्येच शिवाची उपासना करीत असतो, त्याने धर्मजीवनाला नुकतीच सुरुवात केली आहे, असे म्हणता येईल, फक्त मंदिरांमध्येच शिव आहे, असे मानणाऱ्या व्यक्तीपेक्षा जी व्यक्ती जात किंवा धर्म विचारात न घेता , एका देखील गरीब माणसाची शिव बोधाने सेवा करते तिच्यावर शिव अधिक प्रसन होतात, हा विवेकानंदांचा विचार त्यांनी अनुसरला. ते रोज वि्दयार्थ्यांना नीतिकथा सांगायचे. त्यात बसवण्णा, विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या संदर्भातील कथा सर्वाधिक असायच्या. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबन, शिक्षणाबरोबर जीवनशिक्षणाचेही धडे दिले. त्यांच्यावर श्रमसंस्कार केला.  त्यांच्यासोबत मठात आणि शेतात राबणारे ते कायकयोगी होते.  त्यांच्यात धर्म आणि कर्म यांचा समन्वय होता. त्यामुळेच राष्ट्रकवी जी. एस. शिवरुद्रप्पा, ज्येष्ठ साहित्यिक जी. एस. सिद्धलिंगय्या, गो. रु. चन्नबसप्पा, कुं. वीरभद्रप्पा आदी अनेकविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मठाच्या शिक्षण संस्थांतून घडली. श्री शिवकुमार स्वामी यांनी बसवण्णांच्या विचारांच्या प्रसारासाठी कार्य केले. तसेच शेती विकासासाठी कृषी, जनावरे प्रदर्शनासह विविध उपक्रम राबवले. मठाची वार्षिक यात्रा ही रयत यात्रा म्हणूनच ओळखली जाते. त्यांनी आध्यात्मिक जागृती, सांस्कृतिक परंपरेचे रक्षण, संस्कृतचे पुनरुज्जीवनही केले. 

स्त्रियांविषयी शिवकुमार स्वामी म्हणतात, स्त्री ही कुटुंबाचे नेत्र आहे. ती चांगली राहून आपल्या मुलांना चांगले घडवली तर ते कुटुंब चांगले बनेल. एकेक कुटुंब चांगले बनले तर समाज चांगले बनायला किती वेळ लागेल ? एकदा काही मुली ट्रेकिंगसाठी सिद्धगंगा डोंगराव गेली होती. प्रसादाच्या वेळेस त्या सिद्धगंगा मठात गेल्या. पसाद भवनाच्या दारात त्या थांबल्या. आपण प्रसादाला स्वतंत्र रांगेत बसावे का, हे विचारण्यासाठीत्या थांबल्या होत्या. तितक्यात तेथे आलेल्या श्री शिवकुमार स्वामीजींचे त्यांच्याकडे लक्ष गेले. ते बाहेर का थांबले आहेत, याविष्यी त्यांनी त्यांना विचारणा केली. त्यावर एका मुलीने सांगितले, पाळीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे आम्ही स्वतंत्र रांगेत बसावे का, विचारण्यासाठी थांबलो आहोत. त्यावर स्वामीजी खिन्नतेने म्हणाले,  ही एक नैसर्गिक दैहिक प्रक्रिया आहे. यात संकोचण्यासारखे काय आहे. चला त्याच रांगेत बसा, असे सांगितले. तसेच म्हणाले, आई होण्याचे सौभाग्य प्रत्येकाला मिळत नाही. स्त्रियांनाच स्त्रियांच्या देहाविषयी सन्मानाची भावना हवी. निसर्गप्रेरित दैहिक प्रक्रियेविषयी संकोच नसावा.  नारीकुलच देव आहे, असा शिवशरणांनी उद्घोष केला. बसवेश्‍वरांसह शरणांनी स्त्रियांना समान संधी प्राप्त करुन दिली. त्यामुळे शिवशरणींनी अनुभव मंटपाच्या चर्चेत भाग घेतानाच वचनांची रचना केली. जिला पाहिल्यानंतर माझे मन आकर्षित होईल त्या     परवधूला महादेवी मानेन! तसेच लिंग - जंगम एकच मानल्यानंतर स्त्रिया पार्वतीसमान आहेत, असा विचार बसवेश्वरांनी मांडला. ही परंपराच शिवकुमार स्वामी यांनी पुढे चालवली. 


चौकट 
धर्मनिरपेक्ष धोरणामुळे बनले सर्वांचे श्रद्धाकेंद्र 
सिद्धगंगा मठ वीरशैव लिंगायत समुदायाचे असले तरी श्री शिवकुमार स्वामी यांच्या धर्मनिरपेक्ष धोरणामुळेच ते सर्व वर्गातल्या भक्तांचे श्रद्धाकेंद्र बनले. शैक्षणिक संस्थांत येणाऱ्या विद्यार्थी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांत त्यांनी कोणताही भेद केला नाही.  कन्नडद कोट्यधिपती कार्यक्रमात भगवद्गीतेचे श्लोक सहजगत्या व पटापट उच्चारत गंगावतीच्या हुसेन बाशा याने एक कोटीचे बक्षीस मिळवले. हुसेनने सिद्धगंगा मठातच शिक्षण घेतले. बक्षीस मिळवल्यानंतर हुसेन आधी स्वामींच्या दर्शनासाठी सिद्धगंगा मठ गाठला होता.   

मुलांमध्येच देव पाहिला 
दोन महिन्यांपूर्वी श्री शिवकुमार स्वामी यांची प्रकृती बिघडल्याने चेन्नईच्या रेला रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते आयसीयूमध्येच इष्टलिंग पूजा करत होते. तेव्हा डाॅ. मोहमद रेला यांनी त्यांना विचारले, 'स्वामीजी आपण रोज पूजा करता ना? आपणास ईश्वराचे दर्शन झालेय ?' त्यावर स्वामीजी हसत म्हणाले, 'होय, मी देव पाहिलाय.' तर देव कुठे आणि असा आहे, हे आम्हालाही दाखवा, डाॅ रेला म्हणाले. त्यावर पुन्हा हसत स्वामीजी म्हणाले, 'एकदा आमच्या मठाला या आपल्याला दहा हजार देव दाखवेन.' हे उत्तर ऐकून डाॅ. रेला आश्चर्यचकित झाले. स्वामीजी पुढे म्हणाले, 'होय, माझ्यासाठी मुलेच देव आहेत. त्यांच्यातच मी देव पाहिलाय. मठातील मुलांसाठीच मी रोज इष्टलिंग पूजा करतो. हे उत्तर ऐकून डाॅ. रेला काही काळ स्तब्ध झाले. 

थक्क करणारी दिनचर्या 
श्री शिवकुमार स्वामी यांची दिनचर्या विस्मयकारक व थक्क करणारी होती. रात्री दोन वाजता झोपेतून उठणे, पूजा, ध्यान, भक्तांसह वेदमंत्र, वचने, भक्तिगीत गायन, गुरु, लिंगव जंगमाराधना, इष्टलिंगार्चनेनंतर प्रसादग्रहण, विद्यार्थ्यांसह प्रार्थना, मार्गदर्शन, भाविकांना दर्शन, मठाची कार्यालयीन कामे, पुन्हा रात्री स्नान, पूजा, वाचन आदी संपवून ते रात्री अकरा वाजता झोपायचे. सुरुवातीची अनेक वर्षे ते मठातील बांधकाम, शेतातील पिके काढणे, गायीसाठी चारा कापून आणणे आदी कामे करायचे. तसेच वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायचे. मात्र, मठाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या दिनचर्येत कोणताही बदल झाला नाही.  
अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर 
९०४९२९०१०१
ReplyForward
- August 12, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Comments (Atom)

ಅಷ್ಟಕ್ಕೂ, ಲಿಂಗಾಯತ ಮತ್ತು ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ಒಂದೇನಾ ? ಏನಿದರ ಹಕೀಕತ್‌ ?

  ರವಿ ಹಂಜ್ ಚೆನ್ನಬಸವಣ್ಣನ ‘ಕರಣ ಹಸಿಗೆ’ ಮುಂತಾದ ವಚನೇತರ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿ ಕೊಳ್ಳುವ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲದೆ ಅದನ್ನು ತಿರಸ್ಕರಿಸಿ ಮುಂದೆ ಚೆನ್ನಬಸವಣ್ಣ, ಅಲ್ಲಮಪ್ರಭ...

  • मुस्लिमांच्या आक्रमणाला बळी पडलेली शरण क्षेत्रे
     डाॅ. एम. चिदानंद मूर्ती  अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे  हिंदूंसाठी पवित्र क्षेत्र असलेल्या  वाराणसी (काशी), अयोध्या (औध), नेपाळमधील काठमांडू ...
  • संत साहित्याचे अभ्यासक : दा. का. थावरे
    माझ्या शालेय आणि पुढे महाविद्यालयीन जीवनात ‘ दैनिक संचार ’ मधील ‘ नौबत ’ आणि ‘ चिंतन ’ या दोन सदरांचा माझ्यावर प्रभाव राहि...
  • बेंद्रे यांच्या साहित्यातील शरण तत्त्वाचे चिंतन
    बाराव्या शतकात  बसवण्णा, अल्लमप्रभू आदि शरणांनी लोकभाषा कन्नडमधील वचन साहित्याच्या माध्यमातून कर्नाटकात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृत...

Search This Blog

  • Home

About Me

My photo
अप्पासाहेब चंद्रकांत हत्ताळे. निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर गेल्या 20 वर्षांपासून मराठी पत्रकारितेत
View my complete profile

Report Abuse

Blog Archive

  • ►  2025 (1)
    • ►  July (1)
  • ►  2024 (17)
    • ►  September (1)
    • ►  August (16)
  • ►  2023 (26)
    • ►  September (10)
    • ►  August (1)
    • ►  July (1)
    • ►  April (2)
    • ►  March (1)
    • ►  February (11)
  • ►  2021 (3)
    • ►  November (1)
    • ►  August (2)
  • ►  2020 (2)
    • ►  February (2)
  • ▼  2019 (5)
    • ▼  August (5)
      • सार्थक जीवन जगून सागराला मिळालेली गंगा
      • कन्नड गीत
      • त्रिविध दासोही शिवकुमार स्वामी
      • काश्मीर आता खरा भारताचा मुकुटमणी !
      • सिद्धगंगेचा लोकजंगम
  • ►  2018 (8)
    • ►  May (1)
    • ►  March (6)
    • ►  February (1)
  • ►  2017 (30)
    • ►  November (2)
    • ►  October (1)
    • ►  April (1)
    • ►  March (5)
    • ►  February (21)
Simple theme. Powered by Blogger.