६०० वर्षांची शरण परंपरा लाभलेल्या कर्नाटकातील तुमकुरु येथील सिद्धगंगा मठाला पद्मभूषण डाॅ. शिवकुमार स्वामी यांनी अन्न, अक्षर आणि आश्रय या त्रिविध दासोहाच्या आधारे देशभरातच गौरवाचे स्थान मिळवून दिले. अखंड कायक (कर्म) निष्ठा, अनन्य भक्ती आणि ज्ञानामुळे त्यांना जनमनांत नडेदाडुव देवरु (जिवंत ईश्वर) म्हणून स्थान मिळाले. १११ व्या वर्षी २१ जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले.
या जगातील शेकडो गुरुंस पाहून पाहुन, मी कंटाळून गेलो हो, वित्तापहारी गुरू शेकडो, शास्त्रार्थ सांगणारे गुरू शेकडो, मंत्रतंत्राने दोन्ही लोकांमध्ये, सुखदु:खे देणारे गुरू शेकडो, सत्कर्माचा उपदेश करून, स्वर्ग - मर्त्यामध्ये सुख देणारे गुरू शेकडो, विचारमार्गाने षट्साधनांचा उपदेश करणारे गुरू शेकडो. विषय सगळे मिथ्या म्हणून समजावून देऊन, आत्मप्रेम निर्माण करणारे गुरू शेकडो, शिवजीवांचे ऐक्य समजावून देऊन, निर्मल ज्ञान देणारे गुरू प्रथम होत. संशयाचे किडे सर्व ज्ञानाग्नीमध्ये जाळून टाकून,
मुक्तीची गरज ज्ञानाच्या बंधनी ठेवणारे गुरू, चेन्नबसवण्णाविना दुसरे कोणी न दिसती पहा हो,
कपिलसिद्ध मल्लिकार्जुना. श्री सिद्धरामेश्वरांचे हे वचन सर्वकालिक सत्य आहे. गुरु कसा असावा, हे त्यांनी या वचनातून सांगितले आहे. श्री शिवकुमार स्वामी हे शरण विचारांनुसार मूर्तिमंत गुरू होते. बाराव्या शतकात बसवण्णांनी दासोह शब्दाला क्रियाशील रुप दिले. मात्र, आजच्या पिढीला त्याचा अर्थ समजून घेण्याचा, पाहण्याचा योग श्री शिवकुमार स्वामी यांनी दिला. त्यांचे ८८ वर्षांचे संन्यस्त जीवन, ७७ वर्षे मठाधीश म्हणून कायक निर्वाह हे संख्यात्मकदृष्ट्या आश्यर्चकारक आहे. मात्र, यापेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांचा निकटचा लोकसंपर्क. त्यांच्या दृष्टीने संन्यास हा समाजापासून अंतर आणि धार्मिक गोष्टींपुरते सीमित नव्हते. मनुष्याची आंतरिक उन्नती हाच त्यांच्या चिंतनाचा प्राधान्याचा विषय होता. त्यासाठी सशक्त व्यक्तित्व घडवणारे शिक्षण गोरगरीब आणि वंचित समूहांना मिळवून देण्यासाठी आजीवन ते राबले.
ते अनपेक्षितपणे सिद्धगंगा मठाचे उत्तराधिकारी झाले. मात्र, त्यांनी आपल्या वैराग्यभाव, संयमी, दृढसंकल्प, कार्यदक्षता, वाकपटुत्व, सेवाकांक्षा आणि बसवादि शिवशरणांनी प्रतिपादित कायक व दासोह तत्त्वांच्या आचरणाने मठाला लौकिक प्राप्त करुन दिले. १९३० मध्ये श्री उद्दान शिवयोगी यांनी मठाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केली. १९४१ मध्ये मठाची सूत्रे त्यांच्या हाती आली तेव्हा केवळ ६० विद्यार्थ्यांची संस्कृत पाठशाळा होती. तेथे आज १३१ शैक्षणिक संस्थांतून ४९ हजार १४७ विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवली जात आहे. तर अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशातच 'एसआयटी' या नावाने ख्याती मिळवली आहे. सरकार शिक्षणाला अधिक महत्व देत नसतानाच्या काळात मठाने त्याचे महत्व ओळखले. योग्य शिक्षण, वसतिगृह आणि भोजन याद्वारे हजारो मुलांचे जीवन उजळवले. 'ज्ञान हाच दीपस्तंभ' हा शिवकुमार स्वामी यांचा विचार होता. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर 'शिक्षण हे व्यक्ती व राष्ट्र या दोहोंसाठी सशक्तीकरणाचे माध्यम आहे. कारण आपल्या देशाचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित राहू शकेल. योग्य आणि चांगले शिक्षण हे एक असे माध्यम आहे जे मनुष्याला शक्तिसंपन्न बनवते. तसेच त्याला समाजातील वाईट गोष्टींपासून मुक्त ठेवते.’ विशेष म्हणजे १० हजार विद्यार्थ्यांच्या निवास, भोजनाची आणि रोज दर्शनासाठी येणाऱ्या तीन हजारांहून अधिक भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. मठातील अनेक दशकांपूर्वीची पेटती चूल आजही गोरगरीब, अनाथ विद्यार्थ्यांसह भाविकांसाठी नंदादीप बनली आहे. 'जेवणारा यजमान, वाढणारा दास' असे शिवकुमार स्वामी म्हणायचे. त्यामुळेच रात्रीही मठात आलेला भाविक उपाशीपोटी गेल्याचे आजपर्यंत एकही उदाहरण नाही. त्यांनी त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था लावली होती.
शिवकुमार स्वामी यांनी बसवण्णांचा कायकवे कैलास हे तत्व जीवनात प्रत्यक्षात आणले. त्यांच्यावर बसवण्णांसह स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. गरीब, दुबळे, रोगी वैगरेंमध्ये ज्यांना शिव दिसतो, ते खरेखुरे शिवाचे उपासक होत. तेच खरोखर शिवाची उपासना करीत असतात आणि जो माणूस केवळ प्रतिमेमध्येच शिवाची उपासना करीत असतो, त्याने धर्मजीवनाला नुकतीच सुरुवात केली आहे, असे म्हणता येईल, फक्त मंदिरांमध्येच शिव आहे, असे मानणाऱ्या व्यक्तीपेक्षा जी व्यक्ती जात किंवा धर्म विचारात न घेता , एका देखील गरीब माणसाची शिव बोधाने सेवा करते तिच्यावर शिव अधिक प्रसन होतात, हा विवेकानंदांचा विचार त्यांनी अनुसरला. ते रोज वि्दयार्थ्यांना नीतिकथा सांगायचे. त्यात बसवण्णा, विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या संदर्भातील कथा सर्वाधिक असायच्या. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबन, शिक्षणाबरोबर जीवनशिक्षणाचेही धडे दिले. त्यांच्यावर श्रमसंस्कार केला. त्यांच्यासोबत मठात आणि शेतात राबणारे ते कायकयोगी होते. त्यांच्यात धर्म आणि कर्म यांचा समन्वय होता. त्यामुळेच राष्ट्रकवी जी. एस. शिवरुद्रप्पा, ज्येष्ठ साहित्यिक जी. एस. सिद्धलिंगय्या, गो. रु. चन्नबसप्पा, कुं. वीरभद्रप्पा, अभिनेता मुख्यमंत्री चंद्रू आदी अनेकविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मठाच्या शिक्षण संस्थांतून घडली. श्री शिवकुमार स्वामी यांनी बसवण्णांच्या विचारांच्या प्रसारासाठी कार्य केले. ते म्हणायचे, ' 'आज जगाला शांती हवी आहे. ती केवळ बसवण्णांसह शरणांच्या वचन साहित्याच्या अध्ययन, अनुसरणानेच निर्माण होईल. हा कोण ऐवजी तो आमचा हा मधुर आत्मीय भाव सर्वांच्यात वाढावा. तेव्हाच जातियता संपेल. 'तसेच शेती विकासासाठी कृषी, जनावरे प्रदर्शनासह विविध उपक्रम राबवले. मठाची वार्षिक यात्रा ही रयत यात्रा म्हणूनच ओळखली जाते. चेन्नबसवण्णा म्हणतात, भगवी कफनी घातलेला जंगम असे का? कर्णकुंडल , हस्तमुद्रिका बाळगलेला जंगम असे का? केवळ संन्यासी सारे जंगम असती का? वेषधरी सारे जंगम असती का? अज्ञानी सारे जंगम असती का? भूभारी सारे जंगम? नव्हेत. जंगम कोण म्हणजे, सीमा नसलेला निस्सीम हा जंगम, आशा नसलेला निरासक्त हा जंगम, चिंता नसलेला निश्चिंत हा जंगम, अशा जंगमाची चाहूल न लागल्याने, कूडल चेन्नसंगय्या स्वत:च जंगम झाला. या वचनातील जंगमाच्या लक्षणाप्रमाणे पद्मभूषण डाॅ. शिवकुमार स्वामी हे निस्सीम, निरासक्त आणि निश्चिंत होते. तसेच ते लोकजंगम होते.
चौकट
धर्मनिरपेक्ष धोरणामुळे बनले सर्वांचे श्रद्धाकेंद्र
सिद्धगंगा मठ वीरशैव लिंगायत समुदायाचे असले तरी श्री शिवकुमार स्वामी यांच्या धर्मनिरपेक्ष धोरणामुळेच ते सर्व वर्गातल्या भक्तांचे श्रद्धाकेंद्र बनले. शैक्षणिक संस्थांत येणाऱ्या विद्यार्थी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांत त्यांनी कोणताही भेद केला नाही. कन्नडद कोट्यधिपती कार्यक्रमात भगवद्गीतेचे श्लोक सहजगत्या व पटापट उच्चारत गंगावतीच्या हुसेन बाशा याने एक कोटीचे बक्षीस मिळवले. हुसेनने सिद्धगंगा मठातच शिक्षण घेतले. बक्षीस मिळवल्यानंतर हुसेन आधी स्वामींच्या दर्शनासाठी सिद्धगंगा मठ गाठला होता. सर्वधर्मीयांना मठाच्या सेवाकार्याचा लाभ मिळत असला तरी त्यांचा अजेंडा मतांतरणाचा नव्हता. केवळ मानवीय सेवा हाच त्यांचा अजेंडा होता.
अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर
No comments:
Post a Comment