Tuesday 13 August 2019

सार्थक जीवन जगून सागराला मिळालेली गंगा

रोहित चक्रतीर्थ, पत्रकार, बंगळुरू
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे


बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. सिद्धगंगेच्या श्री शिवकुमार स्वामीजींना 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांची दीर्घ मुलाखत घेण्यासाठी दीप तिम्मय्या यांनी आपली टीम तुमकुरला नेली होती. त्या टीममध्ये मलाही संधी दिली होती. आम्ही बंगळुरूहून निघून कॅत्संद्रजवळ उजव्या बाजूला वळलो. मठाला पोहोचेपर्यंत सायंकाळचे साडेचार वाजले. बंगळुरू - तुमकुरु राष्ट्रीय महामार्गावरील ट्रॅफिकची वर्दळ संपताच मन प्रशांत परिसतील सायंकाळच्या शीतलतेने व्यापले. भोवती उंच वाढलेली झाडे, पसरलेली विशाल खुली जागा, शेतशिवार. पुढे जाताच दिसल्या त्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या इमारती, अनेक समाधी, भव्य संस्कृत पाठशाळा, देवालये, मठ, दासोह भवन, अतिथीगृहे. मध्यभागी उभे राहून भोवती पाहिल्यास भव्य, उंच सिद्धगंगा डोंगराची अगाधता भान हरपून टाकत होती. डावीकडे रामदेवाचे डोंगर, त्याच्या पलिकडे देवराय दुर्ग. संस्कृत पाठशाळेच्या बाजूने डोंगराला लागल्यास समोरच्या एका गुहेत कधीच न आटलेले सिद्धगंगेचे तीर्थजलकुंड. मठाचा कर्मचारी आम्हाला हे सर्व दाखवत होता. सहा वाजता सामुदायिक प्रार्थना होते; स्वामीजीही तेव्हा तेथे असतात, असे त्याने सांगितले. तोपर्यंत आम्हाला इकडे तिकडे दहा - वीस विद्यार्थी दिसले असले तरी मठाचे विशाल प्रांगणही भरुन वाहावे इतक्या विद्यार्थी सागराने भरते, याचा आम्हाला अंदाजही नव्हता. मात्र, सहा वाजायला दहा मिनिटे कमी असताना कोठेही असले तरी पंचा, लाल शेला परिधान केलेली मुले तेथे येत होती!  पुराच्या काळात धरण फुटल्यावर खेड्यांत पाणी शिरावे तसे त्या प्रांगणात काही मिनिटांतच 8000 मुले जमली! हजारोंची संख्या असली तरी कुठेही धक्काबुक्की, हसणे - खिदळणे, गोंधळ नाही. एक मूकचित्र पाहतोय का, असा भ्रम व्हावा, अशाप्रकारे माझ्या डोळ्यांसमोरच ते सर्व प्रांगणात शिस्तबद्ध उभे राहून स्वामीजींची प्रतिक्षा करत होते. स्वामीजींनाच पाहून घड्याळ आपणहून स्वत:ला सेट करुन घेते, असे वाटावे इतक्यातच सहाला सहा सेकंद कमी असताना कोणाच्याही मदतीविना आलेले स्वामीजी आसनावर आसनस्थ झाले! आसनासमोरील छोट्या टेबलवर ठेवलेली त्या दिवशीची कार्यक्रम पत्रिका चष्म्याविना वाचली! ही दृश्ये पाहून हे सत्य की भास म्हणून मला हाताला चिमटा घ्यावा लागला!

आमच्यासाठी तो एक दिवसाचा कार्यक्रम. मात्र श्री शिवकुमार स्वामीजी ते व्रत एक - दोन दिवस नव्हे तर बरोबर 80 वर्षांपासून आचरत आले होते. पहाटे दोन वाजता - आपण अजून साखर झोपेत - ते झोपेतून उठून, योगाभ्यासाला बसायचे. ब्राह्म मूहुर्ताला स्नान, जप - तप, नामस्मरण, मुप्पिन षडाक्षरी, निजगुणांच्या पद्यांसह शिवपूजा संपवून साडेपाच वाजता लौकिक जगात परतल्यावर पुन्हा त्यांना रात्री उशिरा अकरा वाजताच विश्रांती मिळायची. तरुणपणी मठ चालवण्यासाठी आवश्यक आर्थिक संपदा जमवण्यासाठी स्वामीजी पहाटे सहाला बैलगाड्या घेऊन निघायचे. बैलगाडी जाणार नाही तेथे ते घोड्यावरुन जायचे. घोडाही जाणार नाही त्या ठिकाणी ते पायीच पोहोचायचे. तसेच खेड्यात जाऊन मठातील विद्यार्थ्यांच्या आहार - निवासाच्या व्यवस्थेसाठी रिकामी झोळी पुढे करत भिक्षा मागून, लोकांनी दिलेला एक दाणाही वाया जाणार नाही इतक्या काळजीने आणून मठातील सदा पेटत्या चुलींचे पोट भरावे लागायचे. अनेकदा मठाच्या शेतात वाढलेले गवत आपणच कापून पेंढ्या बांधून आणून गोशाळेतील गायींपुढे टाकायचे. मठाचा विस्तार वाढू लागल्यावर हवे तेथे नवी बांधकामे उभी राहू लागली तेव्हा त्यासाठी स्वत: दगड, वाळू वाहिली. शारिरीक श्रमाची कामे संपताच  स्वामीजी विद्यार्थ्यांसाठी शिक्षक व्हायचे. त्यांच्या अध्यापनात कालीदास, भास, कुमार व्यास, अल्लम, मिल्टन, शेक्स्पिअर अशा सर्व देशभाषांच्या सिमेबाहेरील कवी लीलया येऊन जायचे. अध्यापनाचे कर्तव्य संपल्यावर थोडीशीही उसंत नाही! पुन्हा पाकशाळेतील कर्तव्य हाक द्यायची. रात्रंदिवस पाकशाळेतील चुलींमध्ये लाकडे  जळत राहतील हे पहावे लागत होते ना?  सरपण संपल्यावर त्यासाठी हेच संन्यासी कासोटी बांधून उभे राहायचे. लाकडे फोडण्यासाठी कुर्‍हाड धरलेले हेच दंड काही क्षणातच रागीमुद्दीसाठी कढयांत चमचा फिरवताना दिसायचे. अशाप्रकारे एकाही दिवशी कोणतेही कारण पुढे न करता, न चुकवता, आठ दशके ही व्यक्ती रोज वीसहून अधिक तास, आपल्यासाठी नव्हे तर केवळ इतरांसाठी आपले जीवन समर्पित करुन जगले, हे पुढील पिढीला सांगितल्यावर विश्‍वास ठेवतील ? तरीही हे भगव्या वस्त्रांतील जीवन श्री शिवकुमार स्वामीजी यांनी स्वत:हून आवडीने स्वीकारलेले नव्हते तर आकस्मिकपणे त्यांच्या जीवनाला ती महत्वाची कलाटणी मिळाली होती. बंगळुरू जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील वीरापूर येथे 1 एप्रिल 1908 रोजी शिवण्णाचा जन्म झाला. वडील होन्नप्पगौडा हे वीरापूरचे पाटील होते. परिसरातील गावांत त्यांना मान होता. त्यातच सात मुले, पाच मुली असलेल्या होन्नप्पा - गंगम्मा दांपत्याचे 13 वे अपत्य असलेला शिवण्णा शिक्षणात पुढे, खेळात चपळ, आईसारखाचा ईशभक्त, वडिलांसारखा वागण्याबोलण्यात विनयशील होता. इतर मुलांपेक्षा भिन्न, विशिष्ट व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या लहान मुलाला पाहून गावी आलेल्या एका हस्तसामुद्रिकाने, हा मुलगा घरालाच नव्हे गावासाठी ज्योती बनून प्रकाश देईल, असे सांगितले होते म्हणे. होन्नय्याच्या मुलाचे पायगुण चांगला असल्याचे सांगून गावातील वडीलधारी मंडळी त्याचे कोडकौतुक करायचे. प्राथमिक शिक्षण गुंडीगेरेतील कुलीमठात घेतले. वयाच्या आठव्या वर्षी आईच्या निधनामुळे पोरका झाल्याने पुढे आपल्या बहिणींच्या घरांमध्ये राहून शिक्षण सुरू ठेवले. हायस्कूलच्या शिक्षणासाठी तुमकुरुच्या सरकारी शाळेत प्रवेश घेतला. त्याच वेळेस गावात प्लेगची साथ पसरल्याने शेट्टीहळ्ळीला जावे लागले. मात्र, तेथेही प्लेगची महामारी आल्याने स्वत:च स्वयंपाक करुन शाळा शिकावी लागली. सिद्धगंगा मठात उद्दान शिवयोगी स्वामी काही विद्यार्थ्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था केल्याचे ऐकलेल्या मुलाने पुढील शिक्षणाच्या आशेने मठ गाठला. तेथे गरीबाला अनुमती मिळाली नाही. तरी  मुलाला शिक्षणाविषयी अदम्य रुची, श्रद्धा असल्याचे उद्दान शिवयोगी यांनी जाणले. त्यांनी त्याला मठात चार महिने वास्तव्यास परवानगी दिली. शिवण्णाचा मठाशी पहिला संपर्क आला - तो अशाप्रकारे.
तेव्हा मठात एक लहान इमारत सोडली तर काही मालमत्ता नव्हती. तरीही धैर्याने स्वामीजींनी संस्कृत पाठशाळा सुरु करुन त्यात लिंगायत, गौड, हरिजन, ब्राह्मण आदी सर्व जाती - पंथाच्या मुलांना संस्कृत अध्ययनाची सोय केली होती, हे विशेष. यावरुन उद्दान शिवयोगी किती आधुनिक होते, ही लक्षात घेता येणारी बाब आहे. अशा मठाला मरुळसिद्ध (मरुळाराध्य) यांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. काही काळ सिद्धगंगा मठात राहून शिक्षण घेणार्‍या शिवण्णा आणि त्यांच्यात स्नेह वाढला. आध्यात्मिक भुकेने दोघांना जवळ आणले असावे,  असे म्हणावे लागेल. हायस्कूल शिक्षण संपवून, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शिवण्णा इंटमिजिएटसाठी बंगळुरूच्या सेंट्रल कॉलेजमध्ये दाखल झाला. तरी कॉलेजमध्ये गेल्यावरही त्याचे आणि सिद्धगंगा मठाचे संबंध तसेच राहिले. सुटीत वर्षातून दोन - तीनवेळा त्याचे मठाला भेटी देणे चुकले नाही.
16 जानेवारी 1930. शिवण्णा सेंट्रल कॉलेजमध्ये बी. ए. अंतिम वर्षात शिकत होता. वीज कोसळावी तशी एक खबर आली. चार -  पाच वर्षांपासून परिचित, आत्मीय मित्र मरुळाराध्य यांचे अकालिक निधन झाले होते. ती खबर ऐकताच शिवण्णा सिद्धगंगेला पोहोचला. अंत्यसंस्कार कार्यात पुढे उभे राहून सर्व काही पार पाडले. डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसत, हृदयावर दगड ठेवून मठातील सर्व कामे हिरीरीने मार्गी लावली. हे सर्व सूक्ष्मपणे पाहणार्‍या गुणग्राही ज्येष्ठ स्वामीजींच्या मनात एक विचार आकार घेत होता. क्रियाकर्म संपल्यानंतरच्या दिवशी त्यांनी शिवण्णाला जवळ बोलावले. जवळ बसवून म्हणाले, “शिवण्णा ! मुला, या मठाचा पुढचा उत्तराधिकारी तूच ! ही जबाबदारी मी तुला सोपवत आहे, स्वीकार कर ! ’’ थंड तलवारीसारखे शब्द. दोरीवर उभे करुन खाली पडणार नाही अशाप्रकारे चाल असे सांगितल्यावर कसे, मगरींचे वास्तव्य असलेल्या तलावात सहजपणे उतरवून पोहायला सांगितल्यास कसे, असा हा प्रसंग! ऐकलेस का, स्वीकार कर; स्वीकार कर म्हणाले. जीवनच बदलवून टाकण्यासारख्या त्या बोलण्यावर एकदोन सेकंदाचे मौनही पसरण्याआधीच पटकन शिवण्णा म्हणाला, “आपली आज्ञा स्वामीजी !.’’ विचार करुन सांगतो म्हणून मान हलवली नाही; घरी विचारावे लागेल, हा बहाणा केला नाही; आता काय कॉलेज दोन महिन्यांत संपण्याच्या मार्गावर आहे, त्यानंतर सरकारी नोकरी करायची, ही सबबही पुढे केली नाही. सर्व काही बाजूला ठेवून शिवण्णा एकाच श्‍वासात त्या महाजबाबदारीला मान देता झाला होता. स्वामीजी आणि  आणि शिवण्णा यांच्यात झालेले बोलणे सविस्तरपणे वडील होन्नप्पगौडा यांच्यापर्यंत पोहोचले. कॉलेज शिकलेल्या मुलाला योग्य मुलगी पाहून त्याचे लग्न करावे, नातवांना खेळवावे, हे स्वप्न पाहिलेल्या वडिलांंची ही गोष्ट ऐकून छातीच फुटली. ते एकटेच नव्हे, आपल्या सर्व नातेवाईकांना एकत्र करुन लगबगीने सिद्धगंगेला पोहोचले. मुलाच्या दोन्ही भुजांना पकडून त्याचे डोके ठिकाणावर आहे ना, हे पाहिले. त्याला रागावले. चार चांगल्या गोष्टी सांगितल्या. हात पसरले. तरी मुलाचा निर्णय मात्र सिद्धगंगा डोंगराइतकाच अचल होता. बाबा, मला जन्म देऊन हे जग दाखवलेत. या जगाचे ऋण फेडण्यासाठी कार्य करण्याची संधी मला द्या - मुलगा हट्टाने या एकाच वाक्यावर अढळ राहिला. अश्रूधारा वाहिल्या तरी मुलाचे मन न विरल्याने बेजार वडील मठाशी संपर्कही गमावून बसले. शिक्षणाला प्रथम प्राधान्य देणारे उद्दान शिवयोगी आपल्या शिष्याच्या मार्गातील दगड बनले नाहीत. ते त्यांच्या मार्गात फुलांचा सडा बनले. मठाचा उत्तराधिकारी म्हणून पट्टाभिषेक झाल्यावर भगवी वस्त्रे धारण करणारा मुलगा त्याच वस्त्रांत पुढे बी. ए. अंतिम वर्षाची परीक्षा दिल्याची त्या काळी राष्ट्रीय बातमी झाली होती ! तेथून पुढे श्री शिवकुमार स्वामी यांचे संपूर्ण विरक्त जीवन. संपूर्ण समाजासाठी समर्पित जीवन. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर 11 वर्षांनी श्री शिवकुमार स्वामी यांचे गुरुही लिंगैक्य झाले. परंतु तेव्हा मठाची संपत्ती म्हणून हाती होते केवळ 300 रुपये. शिवगणाराधनेसाठीही पुरेसे पैसे नाहीत, ही परिस्थिती होती. केवळ 33 वर्षे वयाच्या युवकाच्या डोक्यावर फक्त 60 विद्यार्थ्यांच्या भोजन - निवासाचीच जबाबदारी नव्हे, तर संपूर्ण मठाच्या सर्व खर्चादी पेलून नेण्याची महत्वाची जबाबादारीही होती. येणारी संकटे येऊ दे, देवाची कृपा राहू दे, ही सद्भावना सोडल्यास स्वामीजींच्या समोरील मार्गावर होता अंधार, फक्त अंधार... तरीही त्या अंधारातच  आशेचा किरण दिसला. गावात कंजुष शेट्टी म्हणून ओळखली जाणारी चिक्कण्णा नावाची एक व्यक्ती बैलगाडी भरुन तांदूळ घेऊन कुठे निघाली होती कोण जाणे, मनपरिवर्तन होऊन तो वाटेतून बैलगाड्यांसह परतला आणि मठासमोर येऊ उभा राहिला. गाडीतील सर्व तांदूळ मठाच्या आवारात उतरवून हातातील 3000 रुपये स्वामीजींच्या हाती ठेवून  शरणु शरणार्थी म्हणाला! तेवढेच नाही पुढे त्याने गावातील कोणाकोणाला व्याजाने पैसे दिले होते त्यांच्याकडून मुद्दल वसूल करुन ते सर्व मठाच्या तिजोरीत आणून जमा केले! सोबतच मठातच कोणतेही काम करत जीवन व्यतीत केले! तेथून सुरू झालेल्या यात्रेत श्री शिवकुमार स्वामी यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांनी मार्गातील चढ - उतारांवरही  मात केली. या यात्रेत सामना केलेल्या अग्निपरीक्षांचा खरा हिशेब त्यांच्याशिवाय कुणालाही माहीत नाही. विटा - विटांनी मठ बांधलेल्या स्वामीजींनी संपूर्ण जीवनयात्रेत लाकडे फोडली, दगड वाहिले, गायी सांभाळल्या, मुलांना दही मिळावी या उद्देशाने दूधाचा त्याग केला, अशा प्रसंगांचा विशेब ठेवायचा तरी कसा? एखादी व्यक्ती आपल्या जीवनात दत्त म्हणून समोर ठाकलेल्या एका प्रसंगाला स्वीकारुन, त्यानुसार आपले अखंड जीवन कसे जगले याचेच मला आश्‍चर्य वाटते. मनुष्यमात्राला जीवनाच्या एका ना एका क्षणी कामक्रोधादी षड्रिपुंची बाधा होतेच होते, मात्र स्वामीजी कसे त्यापासून दूर राहून जगले, हा एक अभ्यास करण्यायोग्य विषय आहे !  आपल्या जीवनात ते गोरगरीबांना भेटले, राजेरजवाड्यांना, पंतप्रधान - राष्ट्रपतींनाही भेटले. मात्र कोणत्याही भेटीने त्यांच्यात तिळमात्रही कमीपणा अथवा मोठेपणा आला नाही. गोरगरीबांनी प्रेमाने दिलेला पावशेर तांदूळ - रागी, राजकारण्यांकडून मिळणारे हजारो रुपयांचे दान त्यांनी नि:स्वार्थपणे स्वीकारले. देवराज अरस यांचे काँग्रेस सरकार असताना तीन वर्षे सरकारच सिद्धगंगेवर तुटून पडले होते. 1850 पासून कोणतेही जात, मत, पंथ न पाहता धर्मनिरपेक्षतेने कार्यरत मठ अरस यांचे लक्ष्य ठरले, हे विचित्र होते. मागास जाती -  वर्गांना तुम्ही चांगली वागणूक देत नाही, अशा विचित्र अतार्किक मुद्यावरुन अरस यांनी तीन वर्षे  सरकारकडून मठाला मिळणार्‍या अनुदानांना कात्री लावली. अनुदानाच्या पाठबळाविना  रस्त्यावर येण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना स्वामीजींनी केवळ झोळीच्या बळाच्या भरवशावर मार्गक्रमण केले. खेडोपाडी भिक्षाटन करुन धनधान्य गोळा केले. आकाशच फाटून डोक्यावर पडले असताना मुले मात्र एका वेळेसही उपाशी राहू नयेत याची काळजी आणि भूतदयेने रात्रंदिवस यंत्रगत राबणार्‍या स्वामीजींनी सरकारी मदतीविना आपण मठ चालवू शकतो, हे दाखवून दिले. प्रतिदिन श्री मठाला रोज लागणारे धान्य, वस्तूंचा हिशेब पाहिल्यास कोणाचेही डोके गरगरायला लागेल. 3000 किलो तांदूळ, 1500 किलो तूरडाळ, 400 किलो भाजीपाला, उप्पीट रवा 500 किलो, 300 किलो कांदा, 200 नारळ... एवढे सर्व एका दिवसाच्या जेवणासाठी लागते; रोज 9000 विद्यार्थ्यांना पोट भरुन जेवण देणार्‍या श्री मठात स्वामीजींचा आहार 2 इडली, एक छोटे रागीमुद्दी, कडुनिंबाच्या काडीचा काढा! हे देव नाहीत तर आणखी कोण ?

त्या दिवशी मुलाखतीसाठी सिद्धगंगेला गेलो असताना मला सिद्धगंगा शिक्षण संस्थेचे संचालक चन्नबसप्पा यांच्या गोष्टी ऐकण्याची संधी मिळाली. लहान असताना चौथ्या - पाचव्या वर्षी मठात आलेले चन्नबसप्पा हे पुढे शिक्षण संपवून सुरत्कल कॉलेजमध्ये गणित प्राध्यापक बनले होते. ते मठात विद्यार्थी असताना स्वामीजी दररोज मुलांचा क्लास घ्यायचे. इंग्लिश, कन्नड, संस्कृतसह स्वामीजी मुलांना गणित शिकवायचे. सेंट्रल कॉलेजमध्ये पदवीला स्वामीजींनी भौतिकशास्त्र आणि गणित शिकल्याचे  बहुतेक लोकांना माहीत नाही. गणिताचा विद्यार्थी असलेल्या मला स्वामीजींची गणित विषयातली रुची पाहून आश्‍चर्य वाटले. गणितात 111 या संख्येला एक विशेष नाव आहे. त्याला नेल्सन म्हटले जाते. 111 वर्षांचे भरलेले आयुष्य जगून, उत्तरायण पुण्यकालात, सोमवारी पूर्णायुष्य संपवून ईश्‍वराच्या चरणी लीन झालेले स्वामीजी या भूमीचे सन - अर्थात भूमिपुत्र म्हणजून जगले; ते या कन्नड मातीचे पुण्य आहे. त्यांच्यासारखे जगता न आले तरी ते असतानाच्या काळात आपण या भूमीवर  आहोत, हेच आमचे पुण्य होय. ते अलग झाल्यामुळे भूमीवरील पुण्यच पुरुष रुपाने गेल्यासारखे झाले आहे. मन विदीर्ण झाले आहे. ओम शांती.






No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...