Monday 3 February 2020

भारतीय साहित्य क्षेत्रातील अनन्य कृती : पर्व

 
डॉ. एस. एल. भैरप्पा यांची पर्व कादंबरी प्रकाशित होऊन 40 वर्षे झाली. त्यानिमित्त बंगळुरूमध्ये 29 डिसेंबर रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात केंद्र साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार, महाराष्ट्राचे डॉ. मुकुंद आर. परांजपे, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. माधव कौशिक, प्रसिद्ध मराठी लेखिका, संशोधक डॉ. अरुणा ढेरे यांनी सहभाग नोंदवला. भैरप्पा यांच्या उपस्थितीत या लेखकांसह शतावधानी डॉ. आर. गणेश यांनी संवाद साधला, हे विशेष होय. 
राष्ट्रीय लेखक म्हणून ख्याती मिळवलेले, प्रा. डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नडची कीर्ती देश - विदेशात वाढवलेल्या लेखकांत अग्रगण्य आहेत. त्यांची पर्व ही कादंबरी महाभारतावर आधारित असली तरी पौराणिक आवरण काढून टाकून, वास्तवतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐतिहासिकता सत्य आणि संभाव्यतेच्या स्वरुपात मांडण्यात अत्यंत यशस्वी झालेली साहित्यकृती आहे. भारतीय भाषांमध्ये लिहिली गेलेली महाभारताशी संबंधित कोणतीही साहित्यकृती ‘पर्व’ इतके महत्त्व अथवा जनप्रियता मिळवू शकली नाही, हेच ‘पर्व’ची महानता सांगणारे आहे.   
उदाहरण म्हणून एखाद दुसर्‍या अभिप्रायाकडे लक्ष वेधता येईल. प्रसिद्ध कवी, कादंबरीकार रामेश्‍वर शुक्ल आंचल यांनी म्हटले होते, ‘पर्व... कन्नडची असेल. मात्र, मी म्हणेन की ती एक मूळ हिंदी कादंबरी आहे.’ तर दुसरे प्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्‍वर यांनी ‘पर्व एक आधुनिक बृहतकाव्य आहे. मीच याचा लेखक असतो तर हा विचार माझ्या मनी येतो’ अशी असूयापर प्रशंसा केली आहे. राजस्थानी विद्वान नंदकिशोर आचार्य यांनी ‘भैरप्पा हे केवळ कन्नडचे नव्हेत, आधुनिक भारतीय साहित्याचे, तुलना करता न येणारे विभूती पुरुष आहेत.’ असे म्हटले आहे. भैरप्पा यांना ‘कन्नडमध्ये लिहिणारे मराठी साहित्यिक’ मानणार्‍या मराठी विद्वानांमधील एक असे चंद्रकांत बांदिवडेकर म्हणतात. ‘महाकाव्याचा अनुभव देणारी ‘पर्व’सारखी कृती मराठीमध्ये कधी तरी येईल, याची मी वाट पाहात आहे.’ त्याशिवाय ‘पर्व वाचल्यानंतर मी भैरप्पा यांचा भक्त झालो आहे.’ असेही म्हटले आहे. 
समकालीन साहित्य समाचार पत्रिकेत हिंदी लेखक ओम गुप्त हे आणखी एक पाऊल पुढे टाकत वर्णन करतात, ‘महाभारतावर आधारित कादंबर्‍यांचे सर्व भारतीय भाषांमध्ये लेखन झाले आहे. मात्र, पर्व सर्वांपेक्षा विशेष आहे. ही यातील पात्रांची कथा नाही; पात्रांच्या अंतर्यामी लपलेल्या मानवी संबंधांची कथा आहे.’ महाभारताचे आजचे स्वरूप पाहिल्यावर महर्षी व्यास यांना मुख्यत: वासुदेवाची महिमा सांगायची होती, हे स्पष्ट होते. कन्नडमध्येही व्यास भारताच्या आधारावर काव्यांची रचना दिसून येते. यात जैन आवृत्ती आणि वैदिक आवृत्ती मुख्य आहेत. (बौद्ध आवृत्ती उपलब्ध नाही.) नेमिनाथांचे चरित्र लिहिणारे नेमिचंद - कर्णपार्य यांच्या रचना जैन आवृत्ती आहेत. पंपने ‘मिगिल ईवर्गळीन ई भारत लोकपूज्यं’ या आपल्या गौरवमालेत कृष्णाचे नावच वगळले आहे. कृष्णाची महिमा सांगणारा अक्षयवस्त्र प्रसंग, अक्षयपात्र प्रसंग, गीतोपदेश यासारखे प्रसंग वगळले आहेत. 
कृष्णाची कथा समजून सांगतो, असे सांगणारे कुमार व्यास कृष्णाची महिमा सांगणारा कोणताही प्रसंग सोडत नाहीत. नवे प्रसंगही जोडतात. पंपला त्याचा आश्रयदाता अरसिकेरी (त्याचे प्रतिरुप म्हणून अर्जुन) मुख्य वाटतो. (त्यामुळे शेवटी सिंहासनावर बसणारे अर्जुन - सुभद्रा आहेत. धर्मराज - द्रौपदी नाहीत.) कुमार व्यास कृष्णभक्त असल्याने कृष्ण हाच त्यांच्यासाठी नायक आहे. 
अभ्यास-प्रवास : भैरप्पा यांनी व्यास भारताचा (गोरखपूर आवृत्ती) मूलगामी अभ्यास केला आहे. वाय. एस. सुखठणकर यांची आवृत्ती बाजूला ठेवली आहे. कुमार व्यास भारताचे भाग त्यांना तोंडपाठ आहेत. पंप - रन्न यांचेही अवलोकन केले आहे. मात्र, त्यांचे ध्येय-आशयच भिन्न आहे. ‘नानेके बरेयुत्तेने’ आणि ‘पर्व बरेदद्दु’ या लेखनात आपल्या ध्येय-उद्देशाविषयी स्पष्ट केले आहे. केवळ महाभारतातील घटना घडलेल्या प्रदेशांनाच नव्हे तर त्यात उल्लेखिलेल्या बहुपत्नीत्व, नियोग आदी पद्धती अजूनही असलेल्या गढवालसह अन्य ठिकाणांना भेटी देऊन तेथील लोकांशी संवाद साधला. भारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन केलेल्या ठिकाणांची पाहणी केली. काहीवेळा वेशांतर करून, शारीरिक, मानसिक त्रास सोसून, दीर्घकाळ विनावेतन रजा घेऊन विषयतज्ज्ञ, इतिहासतज्ज्ञांशी चर्चा केली. राजाजी, के. एम. मुन्शी, देवेंद्र शर्मा, ठाकर आदींच्या साहित्याचे अध्ययन केले. व्ही. सीतारामय्या, डॉ. प्रभूशंकर, प्रो. एस. बालसुब्रह्मण्यम, बी. व्ही. सुब्बरायप्पा आदी विद्वानांशी आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करून कृतीची रचना केल्याचे भैरप्पा यांनीच ‘पर्व बरेदद्दू’मध्ये सांगितले आहे. 
महाभारताची पुनर्रचना करण्यामागे ‘समाजाशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक कोनातून प्राचीन भारत समजून घेणे’ हा भैरप्पा यांचा उद्देश होता, (पृष्ठ 31) हे त्यातच म्हटले आहे. आपल्या अध्ययन, चिंतन, संशोधन, प्रवास, चर्चा, सल्लामसलत यामुळे मला हे साध्य झाले. परिणामी व्यास भारताच्या चौकटीतच नवा भारत माझ्या मनात निर्माण झाले, (पृष्ठ 33) असे नमूद केले आहे. 
धैर्यशाली साहित्यिक : पर्वची काही वैशिष्ट्येच येथे उल्लेखिता येतील. त्याला कलात्मक, सृजनशीलता, सहजता - व्यावहारिकतेचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी अपमिथकीकरण (डिमिस्टीफीकेशन अथवा डिमायथॉलायजेशन) आणि मनोवैज्ञानिक विश्‍लेषण या तंत्रांचा अवलंब केला आहे. याला पूरक आणि पोषक म्हणून प्रज्ञाप्रवाह पद्धती (स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस) आणि स्मरणतंत्र (मेमरी टेक्निक) यांचा वापर केला आहे. अपमिथकीकरण म्हणजे दैवत्व काढून टाकणे तसेच गौरवीकरणाच्या घटनांचे उच्चाटन होय. महाभारतातील सर्वात मुख्य पात्र असलेल्या कृष्णाचे देवत्व नाकारणे हे खर्‍या अर्थाने धैर्यवान साहित्यिकच करू शकेल, असे खूप मोठे धाडस आहे. कोणत्याही अलौकिक घटनेला वाव न देता कथावस्तू हाताळणे आवश्यक आहे. 
पंप यांनी आपल्या धार्मिक भूमिकेमुळे काही प्रसंगांना हात घातला नाही. पण शिशुपाल वधासारख्या घटना टाळल्या नाहीत. मात्र, भैरप्पा यांनी दैवत्व अथवा अलौकिक प्रसंगांना सरळ टाळले आहे. उदाहरणार्थ अक्षयवस्त्र प्रसंगात द्रौपदीचा संताप पाहून दुशासन माघार घेतो. वास्तवतेच्या आधारावर असे प्रसंग हाताळण्यासाठी भैरप्पा यांनी अक्षयवस्त्र प्रसंग टाळला आहे. विश्‍वरूप दर्शन प्रसंग आणि उत्तरेच्या गर्भरक्षणाचा प्रसंग याप्रमाणेच शिशुपाल, नरकासुर, जरासंध, सैंधव आदींच्या वधाचे प्रसंग यातून ठळकपणे जाणवते. 
कुठेही दैत्वाचा उल्लेखच नाही. कंस प्रकरणही अशा प्रकारे हाताळले आहे, की त्याने कौटुंबिक वादाचे रूप धारण केले आहे. त्याच्या क्रूरतेमागे हे कारण आहे. कृष्ण एक मित्र, चतुर राजकारणी, मुत्सद्दी, द्रष्टा नेता म्हणून साकारले आहे. 
युद्धानंतर धृतराष्ट्राच्या द्वेषाग्नीत भीमरुपी पुतळा नष्ट होतो, हे सांगण्याऐवजी, भीमाला मारण्यासाठी एक खंजीर लपवल्याचे जाणणारा कृष्ण धृतराष्ट्राची निर्भर्त्सना करतो, हे वास्तव चित्रण हे याचे उत्तम निदर्शक म्हणून पाहता येईल. असे अनेक प्रसंग ते दुसर्‍यांच्या आठवणी अथवा विधानाच्या रूपात मांडतात. मात्र, कथेचा प्रवाहीपणा, वाचनीयता याला कुठेही धक्का लागणार नाही, याची काळजी ते घेतात. उदाहरणार्थ, कीचक वधाचा प्रसंग पाहता येईल. याच प्रकारे भीम - दुर्योधन यांच्यातील शेवटच्या गदायुद्धाच्या प्रसंगाच्या निवारणामागची भैरप्पा यांची औचित्याची भूमिकाही आपल्याला चकित करते. वैशंपायन सरोवरातून बाहेर आलेल्या दुर्योधनाला पाहून भीम ‘हा आधीच मेला आहे. त्याच्याशी कसले युद्ध ?’ असे म्हणून निघून येतो. 
 पात्रांतील द्वंद्व : पंचपत्नीत्वासाठी कुंती द्रौपदीला राजी करते, ही कल्पना अनन्य आहे. मुलांना रागावण्यातच त्याचे समाधानही आहे, हे विशेष आहे. ‘माझ्यापोटी जन्माला आलेली मुले, एका रक्ताचे भाऊ एका मुलीच्या मोहात एकमेकांविरोधात उभे आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. गप्प बसा. मी विचार करते.’ (पृष्ठ 124) पूर्वापार चालत आलेल्या नियोग पद्धतीविषयीही जेथे तेथे सुदीर्घ चर्चा दिसून येते. मनोवैज्ञानिकदृष्ट्या पात्रांमधील द्वंद्वाचे विश्‍लेषण हे पर्वचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. महाभारताची सर्व पात्रे त्यांच्या मनोविश्‍लेषणामध्ये गुंतली आहेत. याला उदाहरण म्हणून माद्री सती जाण्याचा प्रसंग पाहता येईल. भीमाचे विधान हे आणखी एक उदाहरण आहे. : बारा वर्षे वनवासात कंदमुळे खाऊन, एक वर्ष दुसर्‍यांच्या घरात काम केले. सुख अनुभवण्याची शक्ती असण्याचे वय संपल्यावर पुन्हा राजवाड्यात राहिले काय, वनात राहिले काय? दुर्योधन, दुशासन, कर्ण, शकुनीसह उर्वरित सर्व कौरवांना, त्यांना जन्म दिलेल्या आंधळ्याला मारणे, ही माझी एकच इच्छा आहे. मी जीवंत असताना... माझ्या पत्नीला जांघ दाखवलेल्या त्या सर्वांना ठार मारल्यावर शांत होईन. (पृष्ठ 80).  
पात्रचित्रणात व्यक्तीच्या स्वभावाची महानता, महत्त्व सांगण्यात भैरप्पा यांनी दाखवलेली संवेदनशीलता प्रशंसनीय आहे. मय निर्मित राजवाड्यात जमीन पाणी समजून, पाणी जमीन समजून मुखभंग झालेल्या दुर्योधनाला पाहून दौपदी हसली नाही, हे सांगताना ती राजघराण्याशी अनुरूप वागली नाही असा अर्थ होईल, हे भैरप्पा सांगतात. त्यामुळे कौरवेश्‍वराच्या सूडाला हेच मूळ कारण हे परिभाषित करणार्‍या सामान्य दृष्टिकोनाच्या पलीकडे ते गेल्याचे दिसते. निसर्गाचे वर्णन औचित्यपूर्ण आणि तेवढ्या थोडक्यात करणारे भैरप्पा हे निसर्गेतर वर्णनही अद्भुतपणे करू शकतात, यासाठी मत्स्ययंत्राचे वर्णन हे उत्तम उदाहरण आहे.  
युद्धभूमीचे चित्रण : दु:खद घटना, करूणरसाचा प्रसंग किती सहजपणे हाताळता येईल, यासाठी अभिमन्यू आणि घटोत्कच यांच्या मृत्यूनंतर अनुक्रमे सुभद्रा आणि भीमाच्या वेदनेचे वर्णन पाहता येईल. पर्वमध्ये जितक्या बीभत्सपणे युद्धाचे वर्णन आले आहे, तितके अन्य कोठेही आले नसल्याचे दिसते. इतस्तत: तुकडे होऊन पडलेले मृतदेह, ते खाण्यासाठी घिरट्या घालणार्‍या गिधाडांचे चित्कार, दुर्गंधी सहन होत नसल्याने दुसर्‍या मार्गाने रथ नेणारे सारथी अशा वर्णनांना आपल्या काळात झालेल्या जागतिक स्तरावरील आणि भारताच्या भूमीवर झालेल्या युद्धांच्या अहवालाचा आधार आहे. 
पर्व वाचून संपल्यावरही युद्धभूमीवरील दुर्गंधी आपल्याला विसरता येत नाही म्हणजे त्यात अतिशयोक्ती नाही. युद्धाचा वृत्तांत सांगणारा संजय दिव्यदृष्टी लाभलेला असला तरी घटनेनंतर वृत्तांत लिहिणार्‍या पत्रकारासारखे चित्रण झाले आहे, हे लक्ष वेधणारे आहे. युद्धानंतर अत्याचारांना बळी पडून परतलेल्या अनाथांना पंजाबच्या कुटुंबांनी स्वीकारले. नरकासुराच्या ताब्यात असलेल्या स्त्रियांना स्वीकारून कृष्ण पत्नीचे स्थान देतो, याचे चित्रण समकालीन घडामोडींना भैरप्पा प्राचीनतेच्या पटलावरही कसा प्रतिसाद देतात, याला साक्षी आहे. युद्धामुळे जनजीवनावर होणार्‍या भीषण परिणामाकडे लक्ष वेधणारे भैरप्पा धृतराष्ट्राच्या राजवाड्यात दिव्याला तेल नाही, जेवायला अन्न नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, असे सांगतात. 
पर्वच्या मनोगतात भैरप्पा यांनी सांगितले आहे, ‘मी लिहिलेले महाभारताच्या पात्रांची कथा नाही; मानवी अनुभवाचे वेगवेगळे स्वरूप, रूप, मानवी संबंध, स्वरूप आणि विवेचन याची प्रज्ञा माझ्यात पहिल्यापासूनच होती. एकेक नवीन पात्र अथवा संदर्भ लिहिताना हे नवे आयाम सूचले. (पृष्ठ 10 - 11). समीक्षा करताना पर्वचे नवीन आयाम समोर येतात. पाश्‍चात्य महाकाव्यांचे मानदंड अथवा पौर्वात्य महाकाव्यांचे सिद्धांत यांच्या आधारावर ताडून पाहिल्यास पर्व आधुनिक गद्य महाकाव्य आहे, या सन्मानाला पात्र ठरणारे आहे. 
 डॉ. प्रधान गुरुदत्त, ज्येष्ठ कन्नड साहित्यिक 
साभार : दैनिक विजयवाणी 

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...