Friday 24 February 2017

मधुराद्वैताचार्य श्री गुलाबराव महाराज

1857 च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर इंग्रजी शासकांकडून भारतीय धर्म व संस्कृतीची बैठकच खिळखिळी करुन समाजात आत्मग्लानीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यांनी जाणीवपूर्व असे विचार रुजविले जे त्यांच्यासाठी फायदेशीर होते. परिणामी पाश्चिमात्य भोगवादाचा प्रभाव वाढत होता. अशाप्रसंगी संतांनी समाजातील आत्मविस्मृती दूर करुन राष्टÑीय चैतन्य निर्माण केले. ही चेतना प्रथम सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात निर्माण झाली. या चेतनेमुळे समाजाला बळ मिळाले आणि त्याच्या धारणा शक्तिशाली बनल्या. जरी आपण आपले स्वातंत्र्य गमावले असले तरी पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला. परकीय शासकांच्या या वैचारिक आक्रमणाला थोपविण्याचे यशस्वी प्रयत्न ज्या महान व्यक्तींनी केले त्यात श्री गुलाबराव महाराज हे अग्रणी होते. युक्ती व बुद्धिवादाच्या आधाराने त्यांनी पाश्चिमात्य मतांचे खंडन केले आणि भारतीय शास्त्रांचे नव्या स्वरुपात प्रतिपादन केले. अल्पायुष्यात गुलाबराव महाराजांनी विविध क्षेत्रांत जे योगदान दिले ते पाहता श्री शंकराचार्य व श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या स्मृती जागविणारी आहे. कारण विदर्भातील माधानसारख्या खेड्यातील जीवन, चौथ्या महिन्यात आलेले नेत्रहीनत्व, शिक्षणाचा अभाव आणि केवळ 34 वर्षांचे आयुष्य. अशा विपरीत परिस्थितीत महाराजांनी केलेल्या ग्रंथरुप ज्ञानयज्ञाचे कार्य अजोड आहे.

श्री गुलाबराव महाराज हे माधान (जि. अमरावती) चे. 6 जुलै 1881 रोजी गोंदुजी मोहोड व त्यांच्या धर्मपरायण पत्नी सौ. अलोकाबाई यांच्या पोटी अमरावतीजवळील लोणीटाकळी येथे त्यांचा जन्म झाला. जन्मत:च त्यांचा कल परमार्थाकडे होता. केवळ चवथ्या महिन्यात वाट्याला आलेले अंधत्व, चवथ्या वर्षी आलेले मातृवियोगाचे दु:ख अथवा बाराव्या वर्षी झालेला विवाह या कोणत्याही गोष्टीने त्यांची मूळ प्रवृत्ती विचलित झाली नाही. याच काळात त्यांच्या प्रज्ञाचक्षुत्वाचा प्रत्यय आला. अध्ययनासाठी त्यांना खुप कष्ट झेलावे लागले. दुर्मिळ पुस्तके शोधणे आणि शिक्षणाअभावी त्यांचे वाचन दुसºयांकडून करुन घेणे किती अवघड कार्य आहे. सुरुवातीला ज्ञानी साधकांना शोधण्यासाठी त्यांना गावोगावी पायी हिंडावे लागले. त्यानंतरच्या काळात आपल्या मतांच्या प्रतिपादनासाठी ही भ्रमंती त्यांना आणखी वाढवावी लागली. त्यासाठी पाटीलकीवर पाणी सोडून त्यांनी गृहत्याग केला. 1901 मध्ये महाराजांना श्री ज्ञानेश्वर माऊलीचा साज्ञात् अनुग्रह झाला. ते स्वत:ला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. कृष्णपत्नी मानून मंगळसूत्रादी स्त्रीचिन्हेही धारण करीत. महाराजांचे मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर कमालीचे प्रभुत्व होते. त्यांनी सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमाीमांसा या सर्व दर्शनांवर नवीन संदर्भात ग्रंथरचना केली. पण मूळ सूत्र तुटू दिले नाही. वेदांतूनच सर्व ज्ञानविज्ञानाच्या शाखा निर्माण झाल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी संगीत, व्याकरण, आयुर्वेद, काव्य, मानसशास्त्र, मानसायुर्वेद आदी अनेक विषयांवर लेखन केले. 123 नव्या मात्रावृत्तांना जन्म दिला. मराठी, हिंदी व संस्कृतसह वºहाडी भाषेतून 133 ग्रंथ लिहिले. सूत्रग्रंथ, भाष्य, निबंध, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश आदी वाड.मयप्रकार हाताळले. कौटुंबिक समस्या व शिक्षणविषयक प्रश्नांवरही चर्चा केली. त्यांच्या साहित्य संपदेत 27,000 ओव्या, 2,500 अभंग, 1,250 गीत, 2,500 पदे, 2,500 श्लोक आदींचा समावेश आहे. त्यांची एकूण पृष्ठसंख्या ही 7000 इतकी होईल. महाराजांनी त्यांच्या अफाट वाड.मयाबरोबरच आध्यात्मिक बाराखडी, नवी भाषा -नवांग, लघुलिपी, सांकेतिक भाषा, मोक्षपट या अभिनव आविष्कारांनाही जन्म दिला. महाराजांच्या वाड.मयाचे गाढे अभ्यासक डॉ. कृष्ण माधव उपाख्य भय्यासाहेब घटाटे यांनी महाराजांच्या साहित्याचे संकलन केले आहे. त्यांच्या 'श्री गुलाबराव महाराजांची वाड.मयसंपदा' या प्रबंधातून महाराजांच्या अफाट व विलक्षण साहित्याची ओळख होईल.

महाराजांनी संतांची ज्ञानोत्तर पराभक्ती व शंकराचार्यांचा अद्वैत वेदान्त यांचा समन्वय करुन शास्त्रीय खंडन मंडन पद्धतीने भक्तिशास्त्राची नव्या स्वरुपात मांडणी केली. त्या माध्यमातून ‘श्री ज्ञानेश्वर मधुराद्वैत संप्रदाय’ स्थापन केला. हा नाथसंप्रदाय असून उपास्यत्वेकरुन वारकरी पंथाची शाखा आहे. तसेच भगवंताचा सगुण विग्रह मिथ्या नसून सच्चिदानंदघन शुद्ध ब्रह्मस्वरुप आहे. तो ज्ञानानेही नाश पावत नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी नवीन शब्द योजना सुचविली आणि शंकराचार्यांच्या अद्वैतात ‘अनघ्यस्तविवर्त’ या भक्तिसंकल्पनेचे नवे योगदान दिले. मानव समाजाच्या भिन्न भिन्न समाज घटकांना परस्पर संघर्षापासून रोखण्यासाठी त्यांनी ‘समन्वय विचार’ मांडला. हा विचार म्हणजे देशातील साामाजिक बंधुभावाला महाराजांनी दिलेले ‘तात्विक अधिष्ठान ’ होय. भारतीय व अभारतीय असे सर्व धर्म, वैदिक धर्माच्या एका अंशावर स्थित असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व धर्मांमधील तत्त्व त्यांच्याहून प्राचीन अशा वैदिक धर्मात आधीपासूनच अस्तित्वात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच त्यांच्यातील समानताही विषद केली. या दिशेने जनप्रबोधन झाल्यास केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वातील सर्व धर्मांमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव निर्माण होईल. म्हणूनच प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज ‘मधुराद्वैताचार्य’ यासह ‘समन्वयमहर्षि’ म्हणूनही सर्वश्रुत आहेत.

19 व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजी साम्राज्य दृढमूल करण्यासाठी चतुर इंग्रजांनी भारतीय मन पाश्चात्य - मतांच्या पगड्याखाली आणण्याचे निश्चित केले. त्यासाठी 'आर्य हे युरोपमधून भारतात आले. ते मूळचे भारतीय नव्हतेच' असे विधान त्यांनी   मॅक्सम्यूलरसारख्या पाश्चात्त्य पंडिताकडून मांडून घेतले. या भ्रामक अपसिद्धांताचा प्रभाव लोकमान्य टिळकांसारख्या श्रेष्ठ पंडितांवरही पडू लागला आहे, हे दिसताच गुलाबराव महाराजांनी त्याचे साधार खंडन केले. वैदिक संस्कृती ही जगाच्या पाठीवरील सर्वप्रथम अस्तित्वात आलेली, समृद्ध बहरलेली, संस्कृती होती अणि तीच जगभर पसरलेली होती, असा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांनी भारतीयांच्या इतिहासावर नवीन प्रकाश टाकला. आज नव्या तंत्रांच्या सहाय्याने केलेल्या शोधकार्यानंतर त्यांचे मत सिद्ध होत आहे. महाराज जन्माने कुणबी होते. त्यांनी आर्य - अनार्य विवादाला पुष्टी दिली असती तर ते स्वाभाविक ठरले असते. त्यांची बुद्धि इतकी तीव्र होती की, संपूर्ण ब्राह्मण समाजाची मर्यादा धुळीला मिळाली असती. परंतु महाराजांनी देशात कलहाचे बीज रोवणाºया या वादाचा तात्त्विक आधारावर विरोध केला. महाराजांनी डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरच्या तत्त्वज्ञानाचेही खंडन केले. अध्यात्म व विज्ञान यांचा कसा समन्वय होऊ शकतो, हेही दाखवून दिले. त्यांच्याविषयी प्रसिद्ध शास्त्रज्ञ विजय भटकर म्हणतात, ‘ज्यावेळी गुलाबराव महाराजांचे परखड वैज्ञानिक विचार जगासमोर येतील, त्यावेळी त्यांचे नाव तत्त्वज्ञान व विज्ञान या दोन्ही क्षेत्रांत सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.’

अशा श्री गुलाबराव महाराजांनी 20 सप्टेंबर 1915 रोजी आपली लीला संपविली. येत्या 20 सप्टेंबरला 97 वर्षे पूर्ण होत आहेत. महाराजांनी पेटविलेला वैचारिक वन्ही आजही समाजाला चेतवित आहे. मात्र, आजही भारतीय सांस्कृतिक बैठक खिळखिळी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराजांचे एका व्यक्तीशी झालेल्या संवादाचा उल्लेख येथे करावा लागेल. त्या व्यक्तिने विचारले, ‘जर सर्व धर्म समान आहेत तर आपल्याच धर्मात का रहायचे? सर्व धर्म समान आहेत तर अन्य धर्मात जाऊ शकतो?' गुलाबराव महाराजांनी उत्तर दिले, 'सर्व धर्म समान आहेत तर आपल्या धर्माला सोडून जाण्याची गरज काय गरज आहे?'

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...