कर्नाटकसह महाराष्टÑाच्या सीमाभागातील जनमानसावर वीरशैव शिवशरण, शिवशरणी यांच्या वचनसाहित्यासह श्री शिशुनाळ शरीफ यांच्या तत्त्वपदांचाही प्रभाव राहिला आहे. श्री शरीफ हे संत, समाजसुधारक, दार्शनिक व कन्नड भाषेतील पहिले मुस्लिम कवी होते. त्यांनी लोकगीतांमधून (जानपद) देवतास्तुती, गुरुस्तुती केली असून त्यातून तत्त्वबोध होतो. त्यामुळे त्यांच्या रचना तत्त्वपदे म्हणून ओळखली जातात. आपल्या गीतांमधून हिंदू तत्त्वज्ञान मांडणारे सुफी संत श्री शरीफ हे एकात्म व समरस समाजजीवनाचे प्रतीक होत.
शिशुविनहाळ (ता. शिग्गावी, जि. हावेरी) येथील इमाम हजरत व फातिमा या दांपत्याच्या पोटी 7 मार्च 1819 रोजी मुहमद शरीफ यांचा जन्म झाला. बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या शरीफ यांचे मुलकी (इयत्ता सातवी) पर्यंतचे शिक्षण मराठी व उर्दूत झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी केली. पुढे त्यांनी नोकरी सोडून दिली. अध्यात्मचिंतनाकडे ओढा वाढला. त्यामुळे आई-वडिलांनी कुंदगोळच्या फातिमा यांच्याशी त्यांचा विवाह केला. त्यांना एक मुलगी झाली. मात्र, दुर्दैवाने काही महिन्यांनंतर पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अध्यात्मसाधनेला सुरुवात केली. ते गुरूच्या शोधात होते. त्यांना शेवटी आदी शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञान परंपरेतील कळसद गुरू गोविंद भट यांचा अनुग्रह झाला. गुरू-शिष्यांनी अनेक गावांतील मंदिर व मशिदींना भेटी देऊन प्रवचने केली. श्री शरीफ यांनी अनेक गीते रचली आणि गायली. त्यांच्या बहुतांश रचना कन्नडमध्ये असल्या तरी त्यांनी मराठी, उर्दू आणि कन्नड या तीनही भाषांमध्ये गीते रचली. त्यांना गुरूंविषयी नितांत प्रेम होते. त्यांनी आपल्या गीतांमधून सर्व धर्मपंथ हे सत्याकडे जाणारेच मार्ग असल्याचे हिंदू तत्त्वज्ञान मांडले. मात्र, हे तत्कालीन समाजबांधवांना रुचले नाही. तरीही गुरूंविषयीचे त्यांचे प्रेम कमी झाले नाही. त्यांच्या गीतांमधून गुरूंविषयीचे प्रेम व ईश्वराविषयीची भक्ती दिसून येते.
सद्गुरु निन्न मायक्के मरुळादनो ।। कर पिडिदु एन्न करदोळगे मोदलु, वरमंत्र बोधिसी करविट्टु शिरदोळु ।।
भावार्थ : हे सद्गुरु तुझ्या मायेला मी भाळलो. तू अंत:करणपूर्वक माझा हात धरुन मार्ग दाखव. शिरावर हात ठेवून वरमंत्र दे.
हिंदू गुरू व मुस्लिम शिष्य! त्याआधी चारशे वर्षांपूर्वीही असेच घडले होते. श्री संत कबीर यांनाही श्री रामानंद यांच्याकडून अनुग्रह झाला होता. तर श्री शरीफ यांचे गुरू होते गोविंद भट. श्री कबीर व श्री शरीफ दोघेही कवी. दोघांनीही समाजातील वाईट चालीरीतींवर प्रहार केले. तसेच हिंदू अध्यात्मिकता व भक्तिपरंपरेचे पाईक होते. त्यामुळे श्री शरीफ यांना दक्षिण भारताचे कबीर म्हणून ओळखले जाते. श्री शरीफ यांना ब्राह्मण म्हणवून घेण्यातही कधी संकोच वाटला नाही. ‘हाकिद जनिवारवा, सद्गुरुनाथा, हाकिद जनिवारवा, हाकिद जनिवारा, नुग्गीद भवभारा, लोकदे ब्रह्मज्ञान नी पडेयंदु’ भावार्थ : जानवे घातले सद्गुरुनाथा, जानवे घातले, ब्रह्मज्ञान मिळवून भवसागर तरून जाण्यासाठी जानवे घातले.
श्री शरीफ सर्व मायाबंधनापासून मुक्त होते. पत्नीच्या अंत्ययात्रेतही ते सहभागी झाले नाहीत. त्यांचा मनोभाव पुढील गीतातून व्यक्त झाला आहे. मोहद हेंडती सत्त बळीक, मावन मनेय हंगीन्याको॥ सावू नोविगो तरुव बिगंन, मातीन हंगोंदनग्याको ॥ भावार्थ : पत्नी मृत्यूनंतर सासरवाडीचा मोह कशाला, मृत्यू व दु:ख घेऊन येणाºया पाहुण्याशी बोलण्याचा मोह कशाला. त्यांची ‘अळबेडा तंगी अळबेडा, कोडगना कोळी नुंगिता, कु कु एनुतिदे बेळवा, सोरुतिदु मनेय माळिगे, तवरल्ला तंगी निन्न’ ही गीते आजही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यावरून कन्नड भाषकांच्या मनावर त्यांचे गारुड कायम असल्याचे दिसून येते.
आपली जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आल्याचे श्री शरीफ यांनी जाणले होते. पवित्र वेळी देहत्याग करण्याची त्यांची इच्छा होती. या विधानानुसार जंगमाची पादपूजा तसेच जंगमाने त्यांच्या मस्तकावर चरण ठेवून शिवसायुज्य मंत्रपठण करण्याची आवश्यकता होती. परंतु, यासाठी कोण जंगम पुढे येणार? जाती संपवून समरस समाजनिर्मितीसाठी वीरशैव संतांनी प्रयत्न केले. मात्र, त्या समाजातही कालांतराने निर्माण झालेली कर्मठता इथे आड आली. शेवटी हिरेमठचे करिबसय्या यांनी शरीफ यांची इच्छा पूर्ण केली. 7 मार्च 1889 या दिवशी श्री शरीफ ओंकारात लीन झाले. शिशुविनहाळ येथे श्री शरीफ यांची समाधी आहे. त्याची एका बाजूला हिंदू व तर दुसºया बाजूला मुस्लिम समाजबांधव पूजा करतात.
No comments:
Post a Comment