Friday, 24 February 2017

केरळमधील नारायण गुरुंच्या नवजागरण आंदोलनामागे होती विवेकानंदांची प्रेरणा




स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्यावर वेगवेगळ्‌या भाषांमधून विपुल साहित्य प्रकाशित झाले. त्यातून त्यांचे अनेकविध पैलू उलगडले गेले. केरळमध्ये १०० वर्षांपूर्वी सामाजिक विषमता पराकोटीची होती. आज जातिभेदाच्या भिंती गळून एकरस समाजजीवन नांदताना दिसते. हे कार्य संत श्री नारायण गुरु यांच्या नवजागरण चळवळीमुळे घडून आले. आणि यामागे स्वामी विवेकानंदांची प्रेरणा होती, हे प्रभावीपणे पुढे आली नाही. त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त यावर प्रकाश टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

समरसतेचा यशस्वी प्रयोग
स्वामी विवेकानंद यांनी सामाजिक सुधारणा करण्याची वैज्ञानिक विधी सांगितली आहे. ते म्हणायचे
"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे ! मी जोडे चांगले शिवू शकतो आणि तुम्ही राज्य चांगले चालवू शकता, परंतु त्याचा अर्थ हा नाही, की तुम्ही मला पायदळी तुडवावे.
मी छातीठोकपणे सांगतो की, आजची अवनती ही धर्मामुळे झालेली नसून, धर्मतत्वांचे योग्यरीतीने पालन न केल्यानेच झालेली आहे. धर्म निर्दोष आहे, दोषी आहेत धर्माचा व्यापार करणारे दलाल!
एखादे कालचे पोर - जे काल जन्मले आणि उद्या मरणार. त्या पोराचे ऐकून मी जर माझ्या भोवतालचे जग बदलायचे ठरविले तर मी हास्यास्पद ठरेन. त्यांना सांगा की, तुम्ही स्वत: एक समाजरचना निर्माण करून दाखवा -मग आम्ही तुमचे ऐकू.
आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे. संपूर्ण वास्तू छिन्न करण्यात काय लाभ ? पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे.
लाकडाचा तुकडा जसा त्याच्या रेषांवरून कापला तर चटकन कापला जातो. तसेच पुरातन हिंदू धर्मात शिरलेले दोष, त्या धर्माच्या माध्यमातूनच दूर होतील. त्यासाठी दिखाऊ, बेगडी, सुधारकी चळवळींची मुळीच गरज नाही !'' केरळमध्ये
नारायण गुरू यांनी अस्पृश्यता निवारणासह दलित, शोषितांच्या कल्याणासाठी समाजजागृतीची चळवळ चालवली, त्यावर विवेकानंदांच्या उपरोक्त विचारांच्या थेट प्रभाव दिसून येतो.
समाजात द्वेषाची भावना निर्माण होऊ न देता प्रेम आणि सद्भावनेच्या माध्यमातून नारायण गुरूंनी जातीभेद निर्मूलनाचे हिमालयाएवढे कार्य केले. केरळमधील सामाजिक विषमतेने परिसीमा गाठली होती. तेथील एकतृतियांश जनता अस्पृश्य मानली जात होती. त्यांना शाळा, सरकारी नोकरी यापासून वंचित ठेवले जात होते. मंदिरप्रवेशावर बंदी होती. श्री नारायण गुरूंच्या चळवळीने तेथे सामाजिक परिवर्तन घडले. कोणत्याही संघर्षाविना त्यांनी उच्च - नीचता नष्ट केली. आज तेथे दिसणार्‍या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचे श्रेय श्री नारायण गुरूंना जाते. जातिबद्ध समाजव्यवस्थेमुळे निर्माण होणार्‍या दास्यातून त्यांनी केरळमधील लक्षावधी लोकांची मुक्तता केली. दलित उत्थान, शेतकरी - शेतमजुरांच्या आर्थिक सुधारणेबरोबरच महिला शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि मागास घटकांसाठी शाळा सुरू केल्या. ग्रंथालयांची स्थापना केली. प्रथम ऋतु, स्वांग विवाह, पशुबळी यासारख्या वाईट आणि आर्थिक अपव्यय करणार्‍या अनिष्ट रुढी, परंपरा यावर प्रहार केला. व्यसनमुक्तीसाठी कार्य केले. तेथे पतीच्या मृत्यूनंतर भाऊ, पुतण्या व भाचाला संपत्तीत वाटा मिळायचा. मात्र, पत्नी, मुलांना मिळत नव्हता. तो त्यांनी मिळवून दिला. त्यासाठी नियम बनवले. त्यांनी आरुविप्पुमरम, कारामुक्कू, मुरुक्कुमपुळा, कलवनकोड येथे मंदिरांची स्थापना केली. या मंदिरांमध्ये समाजाच्या सर्व घटकांना प्रवेश होता. ते राजा राम मोहन रॉय यांच्यासारखे मूर्तिपूजेचा विरोध करत नव्हते, ते ईश्‍वराला सर्वसामान्य माणसाशी जोडू पाहत होते. त्यांनी मंदिरांना सामाजिक चेतनेचे केंद्र बनविले.
थोर तत्त्वचिंतक व विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी. परमेश्‍वरन आपल्या ‘नारायण गुरू द प्रॉफेट ऑफ रिनान्सा’ या शोधग्रंथात म्हणतात, ‘त्यांच्या निरीक्षण आणि ज्ञानाच्या शक्तीने इंग्रजीशिक्षित लोकही प्रभावीत झाले होते. ते वैज्ञानिक दृष्टी बाळगणारे होते. धर्माचे अध्ययनही त्यांनी विज्ञानाच्या साहाय्याने केले होते.’ श्री नारायण गुरू अद्वैत तत्त्वज्ञानाचे कडवे पुरस्कर्ते होते. त्यांनी आरुविप्पुरम येथे एका अद्वैत आश्रमाची स्थापना केली. नंतर हेच आश्रम ‘नारायण धर्म परिपालन योगम्’ या नावाने ओळखले जाऊ लागले. जे श्री नारायण धर्म प्रसाराचे कार्य करू लागले. हे संघटन स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने स्थापन झाले होते.

धर्म, अध्यात्माच्या माध्यमातून विकास
केरळमधील जातिभेदाने घृणास्पद व अमानवीयतेचे कळस गाठले होते. तेथील नंबुदरी ब्राह्मण मागास जातींशीच नव्हे, तर सवर्ण नायर समाजाशीही अंतर राखूनच संवाद आणि व्यवहार करत होते. तसेच त्यांच्या काही विचित्र परंपरांमुळे अनैतिकता वाढली होती. अशा काळात स्वामी विवेकानंद काही दिवस केरळमध्ये राहिले. त्यांनी ही स्थिती पाहून केरळला ‘पागलखाना’ म्हटले होते. पुढे स्वामीजी बंगळुरू येथे राहिले. त्यांचा मुक्काम डॉ. पल्पु यांच्याकडे होता. नारायण गुरुंच्या सुरुवातीच्या शिष्यांमध्ये डॉ. पल्पू, मल्याळममधील महाकवी कुमारन आशान व सहोदरन् यांचा समावेश होता. ही मंडळी आजीवन नारायण गुरुंच्या सोबत राहिली. त्यांच्या विचारांच्या प्रचारात आणि त्यांच्या समाजिक सुधारणेच्या अभियानाला यशस्वी बनविण्यात योगदान दिलेल्यांमध्ये यांचा क्रमांक वरचा आहे. त्यापैकी डॉ. पल्पू हे एक होत. ते विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावीत झाले होते. देवेंद्र कुमार बैसंतरी म्हणतात, केरळच्या नवजागरणात स्वामी विवेकानंदांची जी अमीट छाप आहे. त्याचे मुख्य माध्यम हे डॉ. पल्पू हेच आहेत. ते केरळमधील जनतेला जातीयवादाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील होते. बंगळुरुच्या मुक्कामात ब्राह्मणांकडून होणार्‍या छळाच्या कहाण्या डॉ. पल्पूू यांनी स्वामीजींना सांगितल्या. स्वामीजींनी त्यांना सल्ला दिला की, ‘भारतीय जनतेचा विकास हा धर्माच्या माध्यमातूनच शक्य आहे. आपल्या राज्यातील संतांच्या नेतृत्वाखाली दलित वर्गाला संघटित करुन त्याच्या उत्थानासाठी प्रयत्न करा. जनशक्तीद्वारेच अस्पृश्यता आणि अत्याचाराच्या विरोधात यशस्वीपणे काम करता येईल. याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही.’ (युगपुरुष श्री नारायण गुरुदेव, ले. सदानंदजी, पृष्ठ ७४)

योगम एक लोकशक्ती
स्वामीजींचा संकेत नारायण गुरुदेव यांच्या दिशेने होता. डॉ. पल्पूंनी हा सल्ला मनावर घेतला आणि त्यांनी तातडीने आरुविप्पूरमला जाऊन नारायण गुरुदेव यांची भेट घेतली. कुमारन आशान गुरुदेवांच्या सेवेतच होेते. त्यांनी गुरुदेवांच्या छत्रछायेत १९०३ मध्ये ‘श्री नारायण धर्म परिपालन योगम्’ची स्थापना केली. ही संघटना संपूर्ण केरळमध्ये एक व्यापक लोकशक्ती बनली. याचा उद्देश गुरुदेवांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे आणि दलित वर्गाचे उत्थान हे होते. कोणत्याही भेदभावाविना कोणीही समभावनेने याचे सदस्य बनू शकत होते. गुरुदेव दलितांच्या उद्धारासाठी आपल्या संन्यासी शिष्यांना प्रोत्साहन द्यायचे. राज्याच्या विविध भागात योगम्‌चे महासंमेलन व्हायचे. यथावकाश गुरुदेव त्यात उपदेश करायचे. आराधना स्वातंत्र्य, सरकारी नोकरी, संचार स्वातंत्र्य, शेती, व्यवसाय, शिक्षण, अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा आणि अनाचारयुक्त प्रथांचे उच्चाटन आदी कार्यांमध्ये योगम्‌ने सफलता मिळवली. डॉ पल्पू आणि कवी कुमारन यांच्या काळात ‘योगम्’ची प्रगती झाली होती.
नारायण गुरुंचे विवेकानंद
नारायण धर्म परिपालन योगम् म्हणजेच ‘एसएनडीपी’च्या स्थापनेने नारायण गुरुंना मानवकल्याणाचे अनेक कार्य करता आले. योगम्‌च्या स्थापनेबरोबरच त्यांनी जनतेला शिक्षणाने स्वतंत्र आणि संघटनेने शक्तिशाली बनण्याचा संदेश दिला. हा संदेश योगम्‌च्या नियमावलीतही समाविष्ट करण्यात आला. योगम्‌च्या वतीने ‘विवेकोदयम्’ या नावाचे नियतकालिक सुरू करण्यात आले. ज्यात गुरुदेवांच्या मानवकल्याणाच्या विचारांविषयी उपदेश करण्यात येत होते. गुरुदेवांचे प्रमुख शिष्य महाकवी कुमारन आशान हे त्याचे संपादक आणि संचालक होते. केरळमधील नवजागरणात स्वामी विवेकानंदांच्या विचार आणि कार्याच्या प्रभावाचे श्रेय डॉ. पल्पू यांच्यानंतर कुमारन आशान यांच्याकडे जाते. (दलित साहित्य का समाजशास्त्र, ले. हरिनारायण ठाकूर, पृष्ठ २९६). जेव्हा कवी कुमारन आशान शिक्षणासाठी १८९८ मध्ये कोलकात्यात होते, तेव्हा ते स्वामी विवेकानंद आणि बंगालच्या नवजागरणाच्या संपर्कात आले. कोलकात्याहून परतल्यानंतर त्यांनी ‘विवेकोदयम्’ची सुरुवात केली. त्यातून स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य सुरू केले. या सर्व गोष्टींमागे नारायण गुरुदेव होते. कवी कुमारन यांना ‘नारायण गुरुंचे विवेकानंद’ म्हणूनही ओळखले जाते.

स्वामीजी व गुरुदेवांमधील साम्यस्थळे
स्वामी विवेकानंद आणि समरस समाजनिर्मिती करणारे श्री. नारायण गुरू यांच्या विचारात अनेक साम्यस्थळे आहेत. दोघांनीही अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. स्वामीजींनी धर्मकार्य, सेवाकार्य यासाठी रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशनची तर गुरुदेवांनी युवक ब्रह्मचारी संघ, श्री नारायण धर्म संघ, सहोदर संघाची स्थापना केली. दोघांनीही शिक्षण आणि संघटनेला महत्त्व दिले. आपल्या शिक्षणातील सर्वात मोठी उणीव असेल तर ती गरिबांचे शिक्षण. असे कार्यकर्ते हवेत, जे खेडोपाडी दारोदारी जातील व धर्मज्ञानाबरोबरच भौतिक शिक्षणही देतील. शिक्षण म्हणजे मानवाच्या अंत:स्थित असलेल्या पूर्णत्वाचे प्रगटीकरण होय, असे स्वामीजींनी सांगितले. तर गुरुदेवांनी म्हटले, समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण अनिवार्य आहे. त्यासाठी जनता ज्या तन्मयतेने आणि उत्साहाने मंदिरांच्या उभारणीसाठी काम करते. त्याच उत्साहाने आणि स्फूर्तीने शाळा बांधण्याचे काम करावे. ज्यामुळे समाजाच्या तळागाळात शिक्षण पोहोचू शकेल. स्वामीजी म्हणतात, संघटनेशिवाय जगात कोणतेही स्थायी अथवा महान कार्य करता येणार नाही. तर गुरुदेवांनी शिक्षणाने स्वतंत्र आणि संघटनेने शक्तिशाली बनण्याचा उपदेश केला. व्यसनमुक्तीसंदर्भात स्वामीजी म्हणाले, आपले शरीर उत्तम कर्म करण्याचे साधन आहे. ते कुकर्मांनी बिघाडणारा अपराधी होय. गुरुदेवांनी मद्याला विषाची संज्ञा दिली. त्याचे उत्पादन, वापर आणि विक्री बंद करण्याचा आग्रह धरला. दारू मनुष्याच्या आरोग्य, बुद्धी आणि संपत्तीसाठी हानीकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. जातिभेद, स्त्रीशिक्षण, मूर्तिपूजा यासह विविध विचारांमध्ये स्वामीजी व गुरुदेवांमध्ये साम्य आढळून येते. दोघांनीही धर्म आणि अध्यात्म हा भारतीय जीवनाचा कणा मानला. अन्य धर्मांकडे समदृष्टीने पाहिले. विस्तारभयास्तव त्या सर्वांचा उल्लेख शक्य नाही. मात्र, त्यांनी धर्मांतराविषयी व्यक्त केलेले विचार सध्याच्या स्थितीत आवश्यक वाटतात. स्वामी विवेकानंदांनी मुस्लिमांना अधिक चांगला मुसलमान, ख्रिश्‍चनांना अधिक चांगला खिश्‍चन बनण्याचा संदेश दिला. मात्र, मुस्लिमांनी तलवारीच्या बळावर केलेल्या आणि मिशनर्‍यांकडून फसवून होणार्‍या धर्मांतरावर त्यांनी तितक्याच प्रखरपणे हल्ला चढविला. तसेच धर्मांतरितांना हिंदू धर्मात परत घेण्याची गरजही प्रतिपादित केली. धर्मांतराविरोधात काहीही न बोलता नारायण गुरुंनी नेमका हाच विचार मांडला. जसे हिंदूंना ख्रिश्‍चन, मुस्लीम धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे तसे अन्य धर्मियांनाही हिंदू धर्मात येण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी. तसेच ते विचारतात, सर्व धर्मांचा सार एकच आहे. मग हिंदू धर्माचा त्याग करुन अन्य धर्माचा स्वीकार करणे किती संयुक्तिक आहे? गुरुदेवांनी युवक ब्रह्मचारी संघाच्या माध्यमातून भारतीय जनतेला हिंदू धर्माचे महत्त्व पटवून दिले. या संघाची स्थापनाच सनातन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी केली गेली. या संघाने धर्मांतर रोखण्यात चांगल्याप्रकारे यश मिळविले.
नारायण गुरु यांचे कार्य पाहिल्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या पुढील उद्गाराचे स्मरण होते. स्वामी विवेकानंद म्हणतात, " भारताचे पुनरुत्थान करण्यासाठी या राष्ट्राचा धर्म आमूलाग्र बदलला पाहिजे, नव्हे मोडून टाकला पाहिजे अशा विचारांचे काही सुधारक आज आपल्यात आहेत. त्यांच्यापैकी काही खरोखर विचारवंत आहेत. पण बहुतेक लोक आंधळेपणाने पाश्चात्यांचे अनुकरण करणारे आहेत, मूर्खपणाने वागणारेही आहेत. त्याना आपण काय करतो आहोत तेही कळत नाही...
खरोखर हिंदुस्थानात सुधारकांची कधी वाण होती काय? हिंदुस्थानचा इतिहास तुम्ही वाचला आहे काय? रामानुज कोण होते? चैतन्य महाप्रभू कोण होते? कबीर आणि दादू कोण होते? हे सारे जण महान सुधारकच नव्हते काय?
रामानुजांच्या पोटी दलितांविषयीचा उत्कट जिव्हाळा नव्हता काय? आपल्या संप्रदायात भंग्यांपर्यंत सर्वांना प्रवेश असावा यासाठी ते शेवटपर्यंत झगडले नाहीत काय? अगदी मुसलमानांनीसुद्धा आपल्या उपासना पंथात यावे म्हणून ते झटले नाहीत काय? नानकांनी हिंदू आणि मुसलमान या दोघांनाही दीक्षा देऊन एक नवा पायंडा पाडला नाही काय? हे सर्व सुधारक होते। त्यांचे कार्य अद्यापही चालूच आहे. आत्ताच्या आणि त्यावेळच्या सुधारकांमध्ये फरक एवढाच की, आताच्या सुधारकांसारखा गाजावाजा त्या वेळच्या सुधारकांनी केला नाही. त्यांच्या ओठी कुणासाठी शिव्याशाप नव्हते- केवळ शुभतम आशीर्वादच होते!''

No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...