Sunday 26 February 2017

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी खून सत्रातील सूत्रबद्धता

कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक डाॅ. एम. एम. कलबुर्गी यांची रविवारी त्यांच्या घरात घुसून गोळ्या घालून अमानुषपणे केलेल्या हत्येने केवळ कर्नाटकातीलच नव्हे तर देशभरातील प्रज्ञावंतांच्या मनावर आघात केला. शिक्षणवेत्ते आणि चिंतकांसाठी पोषक असलेल्या कर्नाटक आणि त्यातच शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारवाडमध्ये दिवसाढवळ्या ही हत्या व्हावी, ही खूपच शरमेची गोष्ट आहे. दोन वर्षांपूर्वी अशाप्रमाणेच महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे अध्वर्यू, डावे विचारवंत नरेंद्र दाभोळकर आणि त्यानंतर गोविंद पानसरे यांची हत्या झाली. डाॅ. कलबुर्गी हेही डाव्या विचारपरंपरेतलेच. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांची वैचारिक पार्श्वभूमी, त्यांच्या हत्येची पद्धत आणि निवडलेली वेळ पाहता यात निश्चितच एक सूत्रबद्धता दिसते. साहजिकच वैचारिक विरोधक म्हणून डाॅ. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी आणि लिंगायत समाजातीलच एका गटाकडे अंगुलीनिर्देश केले जात आहे. पण तपासापूर्वीच एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही. दोन वर्षांनंतरही दाभोळकर , पानसरे यांच्या हत्येचा तपास लागला नाही. मारेकरी कोण, हेही अद्याप समजू शकले नाही. तसे डाॅ. कलबुर्गी हत्याप्रकरणातही होणार नाही, याची काळजी कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल.
डाॅ. कलबुर्गी हे साहित्यिक असले तरी त्यांचा मूळ पिंड हा संशोधकाचा होता. वचनसाहित्य, हरिदास कीर्तन, शिलालेख, हस्तलिखित, जानपद(लोकगीत), कन्नड भाषा व इतिहास या विषयात त्यांनी अपार संशोधन केले. त्यांच्या लेखन व वैचारिकतेने कर्नाटकाची प्रज्ञा बहरली. त्यांनी संशोनात्मक तथ्ये कोणतीही भीडभाड न ठेवता निर्भीडपणे मांडली. परखडपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. डाॅ. कलबुर्गी हे शरण (लिंगायत) साहित्य संशोधन क्षेत्राला मिळालेली मोठी देणगी होती. शरण साहित्याशी संबंधित अनेक हस्तपत्रे मठांमध्ये पडून होती. त्यांचा निरंतर शोध घेऊन व वाचून त्याचे संपादन केले. लोकभाषेत जागतिक मूल्ये, मानवतेचा उद्घोष करणाऱ्या शरणांची वचने २३ भाषांमध्ये भाषांतरित व संपादनाचे कार्य त्यांच्या संपादकत्वाखालीच झाले. आता १३ भाषांमधील साहित्य प्रकाशित होऊन वचनसाहित्य जनमनात पोहोचण्याच्या मार्गावर असतानाच एक लोकाभिमुख संशोधक, चिंतक मारेकऱ्यांच्या गोळीचा बळी ठरला, हे दुर्दैव व शरण साहित्याची मोठी हानी आहे. त्यांनी विजयपूरच्या आदिलशाही राजवटीच्या साहित्याविषयी केलेले संशोधन अपूर्व आहे.तसेच त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, दुष्प्रथा, वाईट परंपरांच्या विरोधात आवाज उठवत समाजमनातून त्या हद्दपार करण्यासाठी अविरत कष्ट घेतले.
अशाप्रकारे विशेषत: कन्नड साहित्याची अमूल्य सेवा केलेले आणि संशोधन क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवलेले डाॅ. कलबुर्गी हे सरळ,सज्जन व्यक्तिमत्त्व होते. बुद्धिमंतांमध्ये दुर्मीळ असणारे उत्तम व्यक्तित्व,निगर्वी स्वभाव व उच्च विचार हे त्यांचे वैशिष्ट्य होते. महात्मा बसवेश्वर म्हणतात, "मजहून नसे कोणी सान, शिवभक्तांहून नसे कोणी थोर,तुमच्या शरणांची साक्ष, माझ्या मनाची साक्ष, कूडलसंगमदेवा, मज हेचि प्रमाण " शिवशरणांचे हे विचार ते प्रत्यक्ष जगले. कधीही वयाचा,विद्वत्तेचा लेशही मनात न बाळगता नवतरुणांच्याही खांद्यावर हात टाकत त्यांना संशोधनकार्याशी जोडले. त्यांच्या या अजातशत्रुत्व स्वभावामुळे त्यांच्या हत्येमागे अन्य कारण असणे शक्यच नाही. त्यांचे विचार, साहित्य व संशोधनाला विरोध करणाऱ्यांनीच त्यांची हत्या केल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे. त्यामुळे याची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी. जर ते सत्य असेल देशातील वैचारिक क्षेत्राचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. हिंसेने कोणताही विचार व वैचारिकता संपणार नाही. प्रबुद्ध समाजात विविध विचारांचा आदर व्हायला हवा. ते स्वीकारायचे की नाही, हा वैयक्तिक विचार आहे. त्यांची हत्या कशामुळे झाली, हे तपासातून निष्पन्न होईल. जर वैचारिक असहिष्णुतेतून त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यास शरमेने खाली मान घालायला लावणारी बाब आहे. वैचारिक मतभेदातून ब्लाॅगरची हत्या करणाऱ्या बांग्लादेशात आणि आपल्यात कोणताच फरक राहणार नाही.
मात्र, विचारांची लढाई विचारांनेच लढावी, हे सांगताना सर्वच विचारधारेच्या विचारवंतांनीही मर्यादा पाळायला हवी. हत्या ही निषेधार्हच आहे. केवळ शस्त्राने केलेली हिंसा हीच हिंसा नव्हे तर अविवेक ही ही एकप्रकारची हिंसाच आहे. गेल्या काही वर्षात पुरोगामी म्हणजे विशिष्ट धर्माचा, त्यांच्या प्रतीकांचा विकृत विरोध अशी विचारवंतांची धारणा बनली आहे. एखाद्या धर्मातील वाईट गोष्टींवर प्रहार करायला हवा. ती समाजपरिवर्तनाची गरजच नव्हे तर अपरिहार्यताही आहे. मात्र,संवैधानिक हवाला देत त्याने प्रदान केलेल्या अधिकारांवरच प्रहार करणे कोणालाही रुचणार नाही. त्यामुळे उलट समाजविघातक शक्तींनाही बळ मिळेल. स्वामी विवेकानंदांसह अनेक समाजधुरिणांनी आजच्या विचारवंतांच्या तुलनेने अधिक कठोरपणे तत्कालीन समाजव्यवस्थेवर, त्यातील चुकीच्या बाबींवर, प्रसंगी धर्मावरही आघात केले. ते समाजालाही उशिरा का होईना मान्य करावे लागले. डाॅ कलबुर्गी हे खुप मोठे विद्वान होते. त्यांच्या विद्वत्तेविषयी तीळमात्र शंका नाही. परंतु गेल्या तीन दशकांत ते अनेकदा वादग्रस्त ठरले.
 अनंतमूर्ती यांनी देवमूर्तीवर केलेल्या मूत्रविसर्जनाचा संदर्भ देत त्यांनी अनंतमूर्ती यांनी केलेला प्रयोग कोणीही करावे, असे सांगत देवताशक्ती बोगस असल्याचा केलेला वक्तव्य असो, त्यांच्या मार्ग या संशोधनखंडातील क्रांतियोगी श्री बसवेश्वर यांचे भाचे चन्नबसवण्णा यांच्याविषयीचा अवमानकारक उल्लेख याचे कोणी समर्थन करू शकेल का? परंतु ज्यांचे प्रबोधन करुन जागृती घडवून आणायची, ज्यांच्यात परिवर्तन घडवायचे त्यांना भडकवायचे का, याचाही विचार व्हायला हवा.
व्यक्ती कोणत्याही विचारधारेचा असो. या हत्या निश्चितच निंदनीय आणि निषेधार्ह आहेत.  मात्र यानिमित्ताने जाती-जातीमध्ये विष कालवण्याचे उद्योग फोफावू नये, याची काळजी सुज्ञांनी घेणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...