Friday 24 February 2017

महात्मा बसवेश्वरांचे सार्वकालिक सत्‌चारित्र्यविषयक विचार

भारत हा एक असा देश आहे की, ज्याने सतत मानवतेच्या हिताचा विचार केला आहे आणि त्यासाठीच काम केलेले आहे. या विशाल आणि प्राचीन देशात अनेक ऋषी - मुनी, साधु - संत आणि थोर व्यक्ती जन्माला आल्या. त्यांनी येथील सामाजिक, आध्यात्मिक ऐक्य मजबूत करुन त्याची प्रगती केली. तसेच विश्वकल्याणाचे चिंतन करीत विश्वबंधुत्वाचा उद्घोष केला. अशा महामानवांमध्ये महात्मा बसवेश्वर हे एक प्रमुख होते. बसवेश्वरांचे सत्चारित्र्य निर्मितीचे विचार सार्वकालिक आहेत. आज त्या विचारांची अधिक गरज आहे. त्यांची वैशाख शुद्ध तृतीयेला (२१ एप्रिल) जयंती. त्यानिमित्त...
बाराव्या शतकात समरस समाजनिर्मिती करताना महात्मा बसवेश्वरांनी समाजजीवनात सत्चारित्र्य निर्मितीची गरज ओळखली होती. नैतिक स्तर उंचावल्याखेरीज धर्मानुसरणात प्रगती होत नाही, अशीच त्यांची धारणा होती. नैतिक शिक्षण व्यक्ती समाजविकासाचा पाया आहे. अशाप्रकारचे शिक्षण नसल्यास व्यक्ती समाजाची अधोगती निश्चित आहे. त्यामुळेच त्यांनी धर्म आणि अध्यात्माच्या माध्यमातून माणूस घडवण्यावर भर दिला. त्यांनी कल्याणमध्ये स्थापन केलेले अनुभव मंटप हे माणसं घडविणारे मुक्त विद्यापीठ बनले होते. त्यांनी लौकिक जीवन आध्यात्मिकता या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले. त्या दोन्ही वेगवेगळ्या नसून एकमेकांस पूरक असल्याचे स्पष्ट केले. जीवनात आपण आपल्या व्यवहारात परिशुद्धता आणणे हेच देवलोक, अन्यथा तेच मर्त्यलोक असे बसवेश्वर पुढील वचनात म्हणतात, ‘देवलोक मर्त्यलोक वेगळे नाही जाणा, खरे बोलणे हाच देवलोक, खोटे बोलणे हाच मर्त्यलोक, आचार हाच स्वर्ग, अनाचार हाच नरक, कूडलसंगमदेव हेच याला साक्षी.’ मनुष्य देहाच्या बहिरंगावर जास्त लक्ष देतो. त्याने अंतरंगावरही जास्त लक्ष द्यावे, असे बसवेश्वर सांगतात. अंतरंगाची ज्ञानशुद्धी आणि बहिरंगाची क्रियाशुद्धी झाली की देहात ईश्वर वास करू लागतो. अंतरंग आणि बहिरंग शुद्धीसाठी त्यांनी सात सूत्रे सांगितली. ‘नको करू चोरी, नको करू हत्या, नको बोलू खोटे, नको करू राग, नको करू आत्मस्तुती, नको करू परनिंदा, हीच अंतरंगशुद्धी, हीच बहिरंगशुद्धी, हीच आमच्या कूडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रिती.’ या सहजसुलभ वचनाकडे पाहिल्यास हे ज्ञान - विज्ञानाच्या आठ शाखांशी म्हणजे अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, आचारशास्त्र, राजनीती, आध्यात्मशास्त्राशी संबंधित असल्याचे दिसते, असे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. भगवानदास तिवारी म्हणतात. तसेच अंतरंगशुद्धी करुन व्यक्ती ज्याप्रमाणे आदर्श बनतो त्याप्रमाणे बहिरंगशुद्धीने आदर्श मानवसमाजाची संकल्पना साकार होते. त्यामुळे लोकांच्या जीवनात सुख, शांती, समता, स्नेह, सौजन्य, सदाचार, सुव्यवस्था हे सर्व संस्कार दृढ होतात, असे डॉ. तिवारी यांनी म्हटले आहे. तसेच बसवेश्वरांनी सत्य, सद्विनय, अहिंसा याचा पुरस्कार केला. परधन परस्त्री विषासमान मानले, हेच या वचनांतून दिसते. सुसंस्कारित मनच सद्भावनांची निर्मिती करते. सद्भावनेतूनच सत्कर्माची प्रेरणा मिळते. निर्मळ मनातच शिव वास करतो, हे जाणून माणसाने आशा, लोभ, तामसपणा, क्रोध, पाखंड यापासून वाणी सदैव दूर ठेवून आपल्या उक्ती आणि कृतीत अंतर पडू देऊ नये, हे बसवेश्वर सांगतात
तसेच बसवेश्वरांनी गुरू, लिंग, जंगम, पादोदक, प्रसाद, विभूती, रुद्राक्ष मंत्र या अष्टावरणांसह पंचाचार आणि षट्स्थलांवर भर दिला. लिंगाचार धार्मिक, सदाचार आर्थिक नैतिकतेचे, शिवाचार सामाजिक नैतिकतेचे, भृत्याचार व्यक्तिगत नैतिकतेचे तर गणाचार धर्मरक्षणासह सार्वभौम नैतिकतेचे प्रतिपादन करते. तर भक्त, माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण ऐक्य ही षट्स्थले त्यांचा आत्मा आहेत. बसवेश्वरांसह शिवशरणांनी ही जीवनतत्त्वे केवळ मांडली नाहीत तर ती आचरली. स्वत: बसवेश्वर ब्राह्मण कुळात जन्मूनही आणि प्रधानमंत्री असूनही ते अतिशय विनम्र विनयशील होते. ते अतिशय दयाळू अंत:करणाने सर्वांचे स्वागत करत. ते म्हणतात, ‘होता भक्तांचे दर्शन, करितो वंदन तोचि भक्त जाणावा, मधुर वाणी हाच जप, मधुर वाणी हेच तप, सद्विनयचि असे प्रिय सदाशिवासी.’ अनुभव मंटपातील सदस्यांनाकायक(कर्म) दासोह (आपण संपादिलेल्याचा समाजकार्य लोकांसाठी विनियोग करणे) बंधनकारक होते. अनुभव मंटपातील शरण -शरणी वेगवेगळे कायक करुन दासोह करायचे. मात्र, तेथे कोणताही कायक आणि त्यावरुन व्यक्ती श्रेष्ठ - कनिष्ठ मानला जात नव्हता. बसवेश्वर म्हणतात, ‘श्रीयाळासी शेठ म्हणल्यास, माचय्यासी धोबी म्हणल्यास, कक्कय्यासी ढोर म्हणल्यास, चेन्नय्यासी मातंग म्हणल्यास, अन् मी स्वत:ला ब्राह्मण म्हणल्यास कूडलसंगमदेव उपहासाने हसेल.’ या वचनातून जसा शिवशरणांचा थोरपणा प्रतीत होतो तशी बसवेश्वरांमधील विनयशीलताही प्रतीत होते.समरस समाजजीवनाचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या बसवेश्वरांचा भेदातीत समाजरचना हा संकल्प होता. मानवा -मानवात भेद करणे हे अनैसर्गिक आहे. इतरांना कमी लेखणे हे गैर आहे, हे त्यांनी सांगितले. संपूर्ण मानवजात एकच असल्याचे सांगत विश्वबुंधत्वाचा संदेश दिला. यासंदर्भात ते म्हणतात, ‘हा कोण, हा कोण? असे म्हणवू देऊ नका, हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा, असेच म्हणवून घ्या. तुमच्या घरचा पुत्र म्हणवा हे कूडलसंगमदेवा. तसेच महारवाड्याची जमीन अन् मठमंदिराची जमीन असते का भिन्न?’ असा सवालही ते करतात. तसेच आणखी एका वचनात म्हणतात, जाणूनबुजून भेदभाव करू नये, तराजुचा काटा थोडासा जरी इकडे - तिकडे झाला तर ईश्वर अवश्य शिक्षा देईल, पात्र - अपात्र भेदभाव केल्यास शिव कसे बरे प्रसन्न होतील? सर्व जीवांत भेद नाही मानला, तर शिव का प्रसन्न होणार नाहीत? सकल जीवांकडे दयार्द्र दृष्टीने पाहूनयत्र जीव: तत्र शिव:’ मान्य केले तर कूडलसंगमदेव का हृदयाशी धरणार नाहीत? सकल प्राणिमात्रांविषयी मनी दयाभाव राखणे हे उदात्त जीवनमूल्य आहे. म्हणूनच बसवेश्वर दयेविना धर्म कोणता? असा प्रश् करतात आणि पुढे म्हणतात, ‘सकल प्राणिमात्रांविषयी दया असावी. कारण दया हेच धर्माचे मूळ आहे.’ म्हणूनच प्राण्यांची हत्या करणाराच खरा अस्पृश्य असल्याचे ते सांगतात, ‘हत्या करणारा मांग आहे, घाण खाणारा महार आहे. कुल म्हणजे काय? त्याने काय होणार? सकल जीवांचे कल्याण इच्छिणारे आमच्या कूडलसंगमदेवांचे शरण श्रेष्ठ कुलीन.’बसवेश्वरांनी परस्त्री हव्यासाविषयी कठोर शब्दांत फटकारले आहे. ते म्हणत की, जिला पाहिल्यानंतर माझे मन आकर्षित होईल त्या परवधूला महादेवी मानेन! तसेच लिंग - जंगम एकच मानल्यानंतर स्त्रिया पार्वतीसमान आहेत. तरीसुद्धा भोगाची भावना कशासाठी? अशा ठिकाणी मातृभाव सोडून आलिंगन देणार्यांचा कूडलसंगमदेव शिरच्छेद करतील. आज समाजात वाढीस लागलेली स्वार्थपरायणता, गेल्या काही वर्षांत वाढलेल्या महिला अत्याचाराच्या घटना, जगात वाढणारा धार्मिक विद्वेष आणि त्यातून होणारा नरसंहार यासह समाजातील अनेकविध अपप्रवृत्ती पाहता मानवकुलाच्या उत्थानासाठी आज महात्मा बसवेश्वरांच्या सत्चारित्र्य निर्मितीविषयक विचारांची अधिक आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...