Friday 24 February 2017

शिवयोगिनी श्री अक्कमहादेवी

बाराव्या शतकात महात्मा बसवेश्‍वरांनी शरण सांप्रदायाच्या माध्यमातून मानव धर्माचा उद्घोष केला. बसवेश्‍वरांनी स्थापन केलेल्या अनुभव मंटपातील प्रमुख शरणांपैकी शिवयोगिनी अक्कमहादेवी ह्या एक प्रमुख शरणी होत. भक्ती, ज्ञान व वैराग्याच्या प्रभावाने त्यांनी तत्कालीन शिवशरणींमध्ये अद्वितीय स्थान मिळवले. लिंगांग सामरस्य (अंग हीच सती व लिंग हाच पती या भक्तिपूर्ण भावनेने साधलेले सामरस्य) साधलेल्या जागितक इतिहासातील एकमेवाद्वितीय दिगंबर शिवयोगिनी अक्कमहादेवी यांची चैत्र पौर्णिमेला जयंती. त्यानिमित्त...
 
कर्नाटकातील उडुतडी (जि. शिमोगा) येथील निर्मल शेट्टी व सुमती या दांपत्याच्या पोटी अक्कमहादेवी यांचा जन्म झाला. अद्वितीय सौंदर्य लाभलेल्या अक्कमहादेवी यांच्यावर शिवप्रेम, शिवभक्ती, शिवपूजा, शिवयोग, शिवानुभव यांचे जन्मजात संस्कार झाले होते. वयाच्या  आठव्या वर्षीच त्यांनी लिंगदीक्षा घेतली होती. उडुतडीमधील गुरूवादी मठात त्यांचे शिक्षण झाले. कन्नडसह संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.त्यांच्या वचनांमध्ये आढळणार्‍या संस्कृत वचनांमधून हे स्पष्ट होते.
 
शिवप्रेमाने वयाच्या सोळाव्या वर्षी दिगंबर अवस्थेत त्या आपल्या प्राणप्रिय चन्नमल्लिकार्जुनाच्या शोधात घराबाहेर पडल्या. एकेदिवशी शिकारीवरुन परतताना जैन राजा कौशिकाची नजर तिच्यावर पडली. महादेवीचे असामान्य रूप व लावण्यावर तो मोहित झाला. आपल्या कामवासनेच्या तृप्तीसाठी त्याने अनेक प्रयत्न केले. राजा कौशिकाने निर्मल शेट्टी यांच्याकडे आपले दूत पाठवून विवाहाचा प्रस्ताव दिला.महादेवीने तो नाकारला. चन्नमल्लिकार्जुन हाच माझा पती आहे, त्यामुळे दुसरा विवाह कशाला, असा तिचा प्रश्‍न होता. अक्कमहादेवी आपल्या वचनात म्हणतात,
लिंगमुखी अंग अर्पुनीअंग अंग जाहले.
ज्ञानासी मन अर्पुनी मन हे लय पावले.
तृप्तीसी भाव अर्पुनी भाव शून्य जाहले
नि:शेष झाल्याने अंग मन - भावशरीर अकाय जाहले.
मम कायेचे सुखभोग भोगितसे लिंग; मग -
शरणसती लिंगपती बनले. अन् याचिकारणे
पती चेन्नमल्लिकार्जुनाच्या अंतरी लीन होऊनी समरसले.
 
 
त्या चन्नमल्लिकार्जुनाशी समरस झाल्या होत्या, हे या वचनातून दिसून येते. राजाने निर्मल शेट्टी यांना मृत्यूदंडाची धमकी दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अक्कमहादेवीने आपल्या आध्यात्मिक जीवनात बाधा न आणण्याची अट घातली. राजा कौशिकाने ती शर्त मान्य केली आणि वैभवपूर्ण समारंभानंतर (संदर्भ : शून्य संपादन: विवाहया शब्दाचा प्रयोग येथे नाही) महादेवीचा राजवाड्यात प्रवेश झाला. त्यानंतर राजभवनातील विलासी जीवनाची निरर्थकता पाहून महादेवीने अंत:प्रेरणेने वस्त्रालंकाराचा त्याग करुन राजभवन सोडले. (राजा कौशिक हा जैन होता. तत्कालीन सामाजिक स्थिती पाहता त्याच्याशी विवाह झाला नसावा, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. तसेच महादेवीचा विवाह त्याच्याशी विवाह झाला की नाही याविषयी मतमतांतरे आहेत.) तेथून त्या देववेड्या होऊन आपला प्रियकर चन्नमल्लिकार्जुनाच्या शोधात ठिकठिकाणी भ्रमंती करत अनुभव मंटपात (बसवकल्याण) पोहोचल्या. तत्पूर्वी त्यांनी अनुभव मंटपाची कीर्ती ऐकली होती. तेथे अनेक शिवशरण व शिवशरणी कायक (कर्म) व दासोह (आपण संपादिलेल्याचा काही भाग समाजासाठी देणे. अनावश्यक संचय न करणे) करत आपले जीवन व्यतीत करत होते. तसेच अनुभव मंटपात विविध विषयांवर चर्चा झडत असे. तेथे आपल्या अतुलनीय आध्यात्मिक साधनेने लहान वयातच महादेवीने आपले स्थान निर्माण केले.अनुभव मंटपात सत्य, शिव व सुंदर या मूल्यांची अनुभूती घेऊन कल्याण क्रांतीपूर्वीच (आंतरजातीय विवाहानंतर झालेला रक्तपात) त्या श्रीशैल पर्वताच्या भव्य, गंभीर अशा नैसर्गिक वातावरणातील कदली बनात विलीन (निर्बयलू पावल्या) झाल्या.बसवेश्‍वरांसह शिवशरणांनी आपल्या स्वानुभवातील तत्त्वे वचनांमधून मांडली. अक्कमहादेवीनेही अनेक वचने रचली.केवळ काव्यरचना हे लक्ष्य नव्हे तर प्राणप्रिय चन्नमल्लिकार्जुनाला प्रसन्न करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यांच्या वचनांमधून व्यापक उनभव, सूक्ष्म अनूभुती, सर्वसमावेशक दृष्टिकोन व्याप्त अभिव्यक्ती प्रतीत होते. त्यात विषयवैविध्यता आहे. त्या महान कवियित्री आणि गूढ तत्त्ववेत्या होत्या. पाश्‍चिमात्य विद्वानांनीही त्यांच्या काव्याचा गौरव केला आहे. त्यांनीयोगांग त्रिविधीहा ग्रंथही लिहिला. त्यात त्यांनी लिंगांग सामरस्याच्या अद्वितीय रहस्यमय अनुभावाचे मार्मिकतेने वर्णन केले आहे. विशेष म्हणजे गुरूकृपेने अक्कमहादेवीला शिवतत्त्वाचा बोध झाला. लिंग, जंगम, पादोदक, प्रसाद, विभूती, रुद्राक्ष आणि मंत्र प्राप्त झाले आणि सारे भवबंधन तुटून पडले. चन्नमल्लिकार्जुनाचा अनुग्रह, अवितरत अध्ययन, मनन, चिंतन, स्वाध्याय, शिवोपासना व लिंगोपासनेने कमी वयातच त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. परिणामी धर्म, दर्शन आणि अध्यात्माच्या माध्यमातून त्या चन्नमल्लिकार्जुनमय झाल्या.
त्या म्हणतात,
 
माझे नेसणे लिंगास्तव,
माझे सवरणे लिंगास्तव,
माझी प्रत्येक क्रिया लिंगास्तव,
मी जे पाहते ते लिंगास्तव,
 
माझे अंतरंग, बहिरंग केवळ लिंगासाठीच.
करुनही न केल्यापरी मी राहते  पहा.
माझ्या चेन्नमल्लिकार्जुनाठायी सामावून,
मी दहाबरोबर अकरावी, काय सांगू माई!
अक्कहादेवी ह्या आपल्या व्यक्तिगत जीवनात भावजीवी, विरक्त, अध्यात्माच्या प्रबुद्ध साधिका होत्या. त्यामुळेच अत्यंत विपरित परिस्थितीतही आव्हानांशी संघर्ष करत आपल्या श्रद्धा, भक्ती, निष्ठा, समर्पण व साधनेच्या माध्यमातून समरस सामंजस्याद्वारे सती पती भावाने चन्नमल्लिकार्जुनाशी एकरुपता साधून भवबंधनापसून मुक्ती मिळवली.  परंतु आत्मकल्याणासह लोककल्याण हा त्यांच्या जीवनविचाराचा अभिन्न अंग होता. त्यामुळे त्यांचे जीवन, व्यक्तिमत्त्व आणि वचनांत देशकालातीत, सार्वकालिक उदात्त जीवनमूल्यांचा संदेश आढळतो. तसेच  त्यांच्या विचारांतून समग्र जीवनदार्शन घडते

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...