Friday, 24 February 2017

तपोवृद्ध शिवभक्त : पद्मभूषण श्री शिवकुमार स्वामी


शरणपरंपरा लाभलेल्या श्री सिद्धगंगा मठाने सेवाकार्याच्या माध्यमातून केवळ कर्नाटकातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात एक विशेष व गौरवाचे स्थान निर्माण केले आहे. श्री मठाने पूज्य श्री शिवकुमार स्वामी यांच्या नेतृत्वाखाली साधलेली ही प्रगती निश्चितच अतुलनीय आहे. कर्म, भक्ती व ज्ञान या योगत्रयांच्या बळावर श्री मठाला हे स्थान मिळवून दिलेल्या श्री शिवकुमार स्वामी यांनी काल १ एप्रिल रोजी १०८ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या शरीराला वयोमानाने बाक आला आहे. मात्र, आजही त्यांची कामे ते स्वत:च करतात. त्यांची दिनचर्या विस्मयकारक व थक्क करणारी आहे. ते कर्नाटकात ‘सध्या वावरणारा देव’ (नडेदाडूव देवरू) म्हणून ओळखले जातात. त्यांना यंदा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला.
सहा शतकांपूर्वी श्री गोसल सिद्धेश्वर स्वामी यांनी स्थापन केलेले शिवगंगा मठ हे आज धर्मजागृतीचे स्फूर्तीकेंद्र बनले आहे. उन्नत गुरूपरंपरा लाभलेल्या या मठाला श्री शिवकुमार स्वामी यांनी आपल्या वैराग्यभाव, संयमी, दृढसंकल्प - कार्यदक्ष, वाक्पटूत्व, संस्कृत, कन्नड व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्व, सेवाकांक्षा आणि बसवादी शिवशरणांनी प्रतिपादित केलेल्या कायक (कर्म/ प्रत्येकाने अनुकुलतेप्रमाणे काहीतरी उद्योग - व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवावा. दुसºयावर बोजा बनून राहू नये.) व दासोह (आपण संपादिलेल्याचा समाजकार्य व लोकांसाठी विनियोग करणे. अनावश्यक धनसंचय न करणे) या तत्त्वांच्या शुद्ध आचरणाने लौकिक प्राप्त करून दिला. त्यांचा (मूळ नाव शिवण्णा) जन्म वीरापूर (ता. मागडी. जि. बंगळुरू) येथील होन्नेगौडा व गंगम्मा या दांपत्याच्या पोटी १ एप्रिल १९०८ रोजी झाला. त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांची १९३० मध्ये शिवगंगा मठाचे उत्तराधिकारी म्हणून नेमणूक झाली. १९४१ पासून त्यांच्याकडे मठाची सूत्रे आली. त्यानंतर १९ व्या शतकात सुरू झालेल्या संस्कृत पाठशाळेचे रूपांतर आजच्या चार शास्त्रांमध्ये शिक्षण देणाºया महाविद्यालयात झाले आहे. तर त्याच्या ग्रंथालयात २५ हजारांहून अधिक ग्रंथसंपदा आहे. पूर्व प्राथमिकपासून अभियांत्रिकी, नर्सिंग, फार्मसी आदी अत्याधुनिक शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश असलेल्या १२४ शाळा, महाविद्यालये मठामार्फत चालवली जातात. आज मठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशातच ‘एसआयटी’ या नावाने ख्याती मिळवली आहे. मात्र, सुरुवातीला मठाची आर्थिक स्थिती अशी नव्हती. तरीही स्वामीजींनी ग्रामीण भागातील गोरगरीब, दलित, वंचित समाजघटकांना शिक्षण देण्याचा दृढनिश्चय केला आणि तो तडीस नेला. ते बैलगाडीतून रोज परिसरातल्या दोन-चार गावी जायचे. त्यावेळी तेथील जनता त्यांचे स्वागत करायची. आपल्याच बैलगाडीतून धनधान्य मठापर्यंत पोहोचवायची. मात्र, स्वामीजींनी कधीच त्यांना साहाय्य मागितले नाही. उलट ते लोकांना सांगायचे, ‘तुमच्या गावातील गरीब मुलांना माझ्यासोबत पाठवा. आम्ही त्यांना भोजन, गणवेश, पाठ्यपुस्तके देऊन शिक्षण देऊ.’ स्वामीजींनी संन्यासी धर्माच्या भिक्षाटनाच्या माध्यमातून शिवशरणांच्या कायक व दासोह तत्त्वाचा प्रचार, प्रसार केला. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेले कायकवे कैलास (कर्म हेच ईश्वर) हे तत्त्व जीवनात प्रत्यक्षात आणले. मठासह शाळा खोल्यांचे बांधकाम, मठाच्या शेतीची कामे आदी ते स्वत: करायचे. यावरून त्यांची अविचल कर्मनिष्ठा स्पष्ट होते. तसेच मठाकडून विद्यार्थी व भाविकांसाठी दासोह (अन्नछत्र) चालवले जाते. स्वामीजी विद्यार्थी व भाविकांना जंगम समजूनच हे कार्य करतात. शिवयोगी अथवा एखाद्या व्यक्तीत कर्म, भक्ती, ज्ञान या तीनही गुणांचे मिश्रण मोठ्या मुश्किलीने आढळते. मात्र, हे योगत्रय शिवकुमार स्वामीजी यांच्यात विद्यमान आहेत. त्यांच्या प्रचार, प्रसाराच्या उद्देशानेच त्यांनी शिक्षण संस्थांचा विकास केला. त्यासाठीच मठाकडून गुरूकुल परंपरेनुसार शिक्षण दिले जाते. अंध व नि:सहाय लोकांची देखभाल केली जाते. मठाकडून आठ हजार विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शिक्षणाची सुविधा नि:शुल्क पुरवली जाते. यात सर्व जाती-धर्माच्या मुलांचा समावेश आहे. मात्र, कोणालाही लिंगधारणा केली नाही. त्या त्या जाती - धर्माची मुले त्या त्या परंपरेचे अनुसरण करतात. यावरून ते भारतीय धर्मपरंपरेतील उदारतत्त्वाचे व सामाजिक समरसतेचे खरे पाईक आहेत. चांगला माणूस घडवणे हाच यामागचा स्वामीजींचा उद्देश आहे.
स्वामीजींच्या शब्दांत सांगायचे तर शिक्षण हे व्यक्ती व राष्टÑ या दोहोंसाठी सशक्तीकरणाचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांना आवास व शिक्षणाची सुविधा पुरवणे एवढेच माझे काम नव्हे तर एक चांगला माणूस घडवणे, हेही आहे. कारण आपल्या देशाचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित राहू शकेल. योग्य आणि चांगले शिक्षण हे एक असे माध्यम आहे जे मनुष्याला शक्तिसंपन्न बनवते. तसेच त्याला समाजातील वाईट गोष्टींपासून मुक्त ठेवते.’ इतकेच नव्हे तर स्वामीजींनी ग्रामीण भागात बसव विचारांच्या प्रचार, प्रसारासाठी साहित्यिक उपक्रम, प्रवचन, वस्तू प्रदर्शन, पशू विक्री व प्रदर्शन, शेती विकास आदी कार्यक्रम राबवतानाच सर्व धर्मांच्या आणि समुदायांच्या लोकांमध्ये समरस भाव आणि सौहार्दास प्रोत्साहन दिले आहे. त्यांचे हे कार्य विस्तार आणि प्रभावाच्या दृष्टीने अतुलनीय आहे. हे मठ तुमकुर येथे असल्याने त्या जिल्ह्यात शैक्षणिक संस्था अधिक आहेत. मात्र, त्याचा विस्तार तुमकुरच नव्हे तर बंगळुरू, म्हैसूर, मंड्या, हासन व चित्रदुर्ग या जिल्ह्यांमध्ये झाला आहे.

आज १०७ वर्षांचे असलेले शिवकुमार स्वामी यांच्या शरीराला वयोमानाने बाक आला आहे. मात्र, आजही त्यांची कामे ते स्वत:च करतात. त्यांची दिनचर्या विस्मयकारक व थक्क करणारी आहे. दोन वाजता उठणे, तीनपर्यंत वाचन, तीन ते साडेतीन स्नान, साडेतीन ते साडेपाचपर्यंत पूजागृहात ध्यान, पूजा, भक्तांसह वेदमंत्र, वचने, भक्तीगीत गायन, गुरू, लिंग व जंगमाराधना, इष्टलिंगार्चनेनंतर प्रसादग्रहण. पूजागृहातून बाहेर पडल्यानंतर ते नित्य कायक (कर्म) करतात. तसेच विद्यार्थ्यांसह प्रार्थनासभा, आशीर्वचन, विद्यार्थ्यांच्या व अतिथींच्या भेटी, धर्माचार्यांशी धार्मिक व आध्यात्मिक चिंतन, माध्यान्ह पूजा व प्रसाद, संध्याकाळी सामूहिक प्रार्थनेला उपस्थिती, रात्रपूजा, प्रसाद, वाचन आणि त्यानंतर रात्री ११ वाजता निद्रा अशी त्यांची दिनचर्या आहे. त्यांची निद्रा म्हणजेही एक प्रकारचे धर्माचरणच आहे. कारण शिवशरणांच्या एका वचनात म्हटले आहे की, ‘शरणांची झोप म्हणजेही तप जाणा!’ मठाची सूत्रे हाती घेतल्यापासून सुरू झालेल्या या दिनचर्येत आजही कोणताही बदल झाला नाही. आध्यात्मिक जागृती, सांस्कृतिक परंपरेचे रक्षण, संस्कृतचे पुनरुज्जीवन व सेवकार्याच्या माध्यमातून शिवकुमार स्वामी यांच्या नेतृत्वात सिद्धगंगा मठाने एक लौकिक मिळवला आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘गरीब, दुबळे, रोगी वगैरेंमध्ये ज्यांना शिव दिसतो, तेच खरेखुरे शिवाचे उपासक होत. तेच खरोखर शिवाची उपासना करीत असतात आणि जो माणूस केवळ प्रतिभेमध्येच शिवाची उपासना करीत असतो. त्याने धर्मजीवनाला नुकतीच सुरुवात केली आहे, असे म्हणता येईल. फक्त मंदिरांमध्येच शिव आहे, असे मानणाºया व्यक्तीपेक्षा जी व्यक्ती जात किंवा धर्म विचारात न घेता, एका देखील गरीब माणसाची शिव बोधाने सेवा करते तिच्यावर शिव अधिक प्रसन्न होतात.’ यावरून शिवशरणांच्या विचारांनी मार्गक्रमण करणारे श्री शिवकुमार स्वामी हे खरे शिवभक्त आहेत.

No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...