Friday, 24 February 2017

महात्मा बसवेश्‍वर

भारत हा एक असा देश आहे की, ज्याने सतत मानवतेच्या हिताचाच विचार केला आहे आणि त्यासाठीच काम केलेले आहे. या विशाल आणि प्राचीन देशात अनेक ऋषी-मुनी, साधु-संत आणि थोर व्यक्ती जन्माला आल्या. त्यांनी येथील सामाजिक, आध्यात्मिक ऐक्य मजबूत करुन त्याची प्रगती केली. तसेच विश्‍वकल्याणाचे चिंतन करीत विश्‍वबंधुत्वाचा उद्घोष केला. अशा महामानवांमध्ये महात्मा बसवेश्‍वर हे एक प्रमुख होते.बालपण बाराव्या शतकाच्या पुर्वार्धात कर्नाटकातील बागेवाडी (जि. विजापूर) येथील मादरस व मादलांबिका या दांपत्याच्या पोटी बसवेश्‍वरांचा जन्म झाला. बरेच दिवस झाले तरी या दांपत्याला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. ग्रामदैवत नंदीकेश्‍वराच्या कृपाप्रसादाने पुत्रप्राप्ती झाल्याने त्यांनी मुलाचे नाव बसव असे ठेवले.जे पुढे बसवण्णा, महात्मा बसवेश्‍वर या नावाने परिचित झाले. बसव बालपणापासूनच तीक्ष्ण बुद्धीमत्तेचा, प्रतिभाशाली, संवदेनशील, सत्यशील, निष्पक्ष स्वभावाचा होता. त्याकाळी बागेवाडी हे एक प्रसिद्ध अग्रहार होते. धर्म समजून न घेतल्याने आणि योग्य धर्माचरणाअभावी अनेक अनुचित प्रथा रूढ झाल्या होत्या. बालपणापासूनच विचारवादी असलेल्या बसवाने त्यांची व्यवहार्यता पडताडळुन पाहायला सुरूवात केली. व्यवहारी जगातील भेदाभेदाचा त्याच्या बालमनावर परिणाम होऊ लागला. अशातच मादरसाने बसवाच्या उपनयन संस्काराची तयारी केली. बसवाने तो नाकारला आणि बहीण अक्कनागम्मासह कूडलसंगम येथे जाऊन त्यांनी जातवेदमुनी यांच्याकडे विद्याभ्यास केला.वेद, उपनिषद, शास्त्र, पुराण व भारतीय तत्त्वज्ञानांत ते पारंगत झाले. येथेच बसवांनी समाजाविषयी चिंतन केले.

मंगळवेढ्‌यात समरसतेची सुरूवात
मामा बलदेव यांच्या आग्रहामुळे बसवेश्‍वरांना मंगळवेढ्याला (जि. सोलापूर, महाराष्ट्र) जावे लागले. ते राजा बिज्जळाचे मंत्री होते. नित्य विकसनशील असलेल्या बसवेश्‍वरांच्या मनाला कूडलसंगम हे मर्यादित वाटू लागले होते. तसेच उदरनिर्वाहासाठी काही तरी उद्योग करणेही आवश्यक होते. विशेष म्हणजे सुव्यवस्थित कार्य करण्याची योजनाही त्यामागे होती. येथेच बलदेवाची मुलगी गंगांबिका व राजा बिज्जळाची मानस बहीण निलांबिका यांच्याशी बसवेश्‍वरांचा विवाह झाला. राजाने त्यांची कोषागार प्रमुखपदी नेमणूक केली. जनतेची संपत्ती सुरक्षित राखण्यासाठी त्यांनी कठोर अर्थनियम केले. त्याचा उपयोग असहाय्य जनता, शेतीविकासासाठी केला. अनेक ठिकाणी विहिरी, तलाव खोदले. यामुळे शेतकर्‍यांसह सामान्य जनता कार्यशील होईल. त्यांच्या शेती, उद्योगाची भरभराट होऊन जास्तीची संपत्ती खजिन्यात जमा होऊन तो समृद्ध होईल, हा त्यांचा अर्थविचार होता. गोरगरीब आणि वंचितांशी ते हितगुज करायचे. त्यांच्या वस्तीत जायचे. सहभोजन करायचे. त्यांच्या सामाजिक समरसतेच्या कार्याला मंगळवेढ्यातच सुरूवात झाली. मात्र, राजा बिज्जळाने आपली राजधानी कल्याणला (जि. बीदर, कर्नाटक) हलवल्याने त्यांना तेथे जावे लागले. दरम्यान, त्यांचे कार्य आणि राजाचा विश्‍वास यामुळे त्यांची प्रधानमंत्रीपदी नेमणूक झाली होती. कल्याण येथेही प्रधानमंत्री म्हणून काम करतच त्यांनी आपल्या विचारांचा प्रचार, प्रसार करायला सुरूवात केली.वीरशैव संप्रदायाचे पुनरूज्जीवन बाराव्या शतकात तत्कालीन समाजाची (विशेषत: हिंदूंचीच) विचारधारा व जीवनक्रम तेजोहीन व शिथिल बनला होता. उत्तरेकडे सतत होणार्‍या परकीय आक्रमणाचे भय व वर्णाश्रमधर्मांतील मूलभूत दोषामुळे सर्वत्र वाढलेली फुटीरता, अशा पार्श्‍वभूमीवर हिंदू समाज एकसंध व एकजिनसी बनविण्याची नितांत आवश्यकता होती. याकरिता नव्या विचार -प्रणालीची, आचारसंहितेची गरज होती. हे महान कार्य महात्मा बसवेश्‍वरांनी ‘वीरशैव’ या लिंगायतधर्माची (बसवधर्माची) स्थापना करुन साधले. (शून्य संपादन : शिवगण प्रसादी महादेव विरचित ‘शून्य संपादने’ या कन्नड पुस्तकाचा अनुवाद : जयदेवीताई लिगाडे, पृष्ठ ४६४) यावरुन बसवेश्‍वरांनी भारतीय समाजाचे आध्यात्मिक ऐक्य दृढ करण्यासाठीच भारतीय दर्शनांपैकी एक अशा प्राचीन वीरशैव मताचे पुनरुज्जीवन केले, हे स्पष्ट होते. वीरशैव संप्रदायाची स्थापना बसवेश्‍वरांनी केली, याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. कारण श्री रेणुकाचार्यांनी हे तत्त्वज्ञान त्यापूर्वी मांडले होते. ( संदर्भ : श्रीसिद्धांतशिखामणी) पंचाचार्य हेच वीरशैव संप्रदायाचे संस्थापक होत, असे परंपरा मानते. बसवेश्‍वरांनी त्याला उपनिषदकालीन मूल्यांची जोड दिली.अनुभव मंटपाची स्थापना बसवेश्‍वरांनी कल्याणला आल्यावर अनुभव मंटपाची स्थापना केली.युरोप खंडातही वैचारिक क्रांती होण्याआधी कर्नाटकात ही क्रांती झाली. अनुभव मंटप हे संसदीय लोकशाहीचे एक आदर्श मॉडेल होते. बसवेश्‍वरांना ‘अनुभव मंटपाची’ कल्पना श्रीशैल अनुभाव केंद्र, पुट्टलकेरे अनुभाव गोष्टी व चेंगणेगिल मंटप या तीन अध्ययन केंद्रावरुन आली  असावी, असे वचन पितामह श्री. फ. गु. हळकट्टी यांचे मत आहे. यावरुन त्या काळातही भारतात अध्ययन केंद्रे होती, हे स्पष्ट होते. तसेच कूडलसंगम येथे जन्मलेल्या ‘इष्टलिंगाची’ त्यांची परिकल्पना कल्याणमध्ये परिपक्व झाली. देव एकच आहे. त्याला दिलेली ब्रह्म, विष्णू, महेश ही अनेक नावे आहेत. तो निर्गुण, निराकार, साकारही असल्याचे त्यांचे एकदेवोपासनेमागचे म्हणजे इष्टलिंग परिकल्पनेमागची भूमिका होती. यासंदर्भात बसवेश्‍वर म्हणतात, देव असे एकची एक,तया नावे जरी अनेक, परम पतिव्रतचेचे चित्तकेवळ पतिठायी असे रत.त्यांनी या माध्यमातून स्त्री -पुरूषांसह समाजाच्या सर्व घटकांत ज्ञानज्योत पेटवली. त्यांच्याकडे येणार्‍या शरणांचे आदरातिथ्य होई. त्यांना इष्टलिंग पूजेसाठी आवश्यक त्या सोयी - सुविधा पुरवल्या जात. भोजनाची व्यवस्था होई. बसवेश्‍वर स्वत: शिवशरणांचे आदरातिथ्य करीत. त्यांच्या दृष्टीने शिवशरण सर्वात मोठे आणि महान होते. ते म्हणतात, माझ्यापेक्षा लहान कोणी नाही,शिवशरणापेक्षा मोठा कोणी नाही.याला आपणच साक्षी आहात, माझे मन साक्षी आहे.हेच प्रमाण आहे माझ्यासाठी कूडलसंगमदेवा.त्यांच्या समभावाची, विश्‍वबंधुत्वाची कीर्ती देशभरातील विविध प्रांतांमध्ये पसरली. त्यांची ख्याती ऐकून भारतातील दश-दिशांतून आलेले असंख्य शिवशरण सर्व भेद विसरून बसवकल्याणमधील अनुभव मंटपात सामील झाले. यात सोलापूरचे सिद्धरामेश्‍वर, शिवमोगाचे अल्लमप्रभू, विदर्भाचे डोहर कक्कय्या, अय्दक्की मारय्या, अक्कमहादेवी, आंध्रचे रामय्या, काश्मिरचे मोळीगेय मारय्या, अफगाणचे मरुळ शंकरदेव आदी असंख्य शिवशरणांचा समावेश होता. अनुभव मंटपात तत्त्वज्ञानावर मुक्त चर्चा व परस्पर विचारांचे आदान - प्रदान चाले. तसेच बसवेश्‍वरांनी धार्मिकतेच्या बरोबरीने शिवशरणांना शिक्षणही दिले.

कर्म हाच कैलास
अनुभव मंटपातील सदस्यांवर एक नियम कटाक्षाने पाळण्याचे बंधन होते. ते म्हणजे प्रत्येकाने अनुकुलतेप्रमाणे काहीतरी उद्योग - व्यवसाय करुन उदरनिर्वाह चालवावा. दुसर्‍यावर बोजा बनून राहू नये. यालाच ‘कायक’ (कर्म) म्हणतात. काश्मीरचा राजा महादेव भूपाळ जे मोळीगेय मारय्या म्हणून ओळखले जातात अशा मोठ्या व्यक्तीलाही हा नियम पाळावा लागे. तो जंगलातील लाकडे तोडून आपला चरितार्थ चालवी. तसेच अन्य शिवरशरणही आपल्या कायकात निमग्न राहून कार्य करीत. भगवद्गीतेत सांगितलेल्या कर्मयोगापासून समाज दूर गेला होता. तो निरूद्योगी बनला होता. संपन्न अशा भारताची अवनती होण्यामागे हेही एक कारण होते. त्यामुळे बसवेश्‍वरांनी कायक तत्त्वाचा पुरस्कार केला. या माध्यमातून प्रत्येक मनुष्याने श्रम करुनच उत्पादनात भर टाकली पाहिजे व आपल्या दैनंदिन गरजा भागवल्या पाहिजेत, हा विचार तत्कालीन समाजात रुजवला. तसेच कोणत्याही कायकांत भेदभाव नाही, हे सांगून त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. बसवेश्‍वर म्हणतात, कृषिकर्म हेचि कायक, पिकवितो धरणीतन - मन श्रमवुनि, धन- धान्य आणुनीदासोह करी, त्या परम सद्भक्ताचे,दर्शन घडवा तयाच्या चरणांचे
शुद्ध तयाचे तनु - मन,अन् बोल तयाचे पावन,करणीही शुद्ध हेचि कारण!करी तयासी उपदेश, तोचि सद्गुरू परमेशऐशा सद्भक्ताचे निवास मानुनि कैलासकरितो लिंगार्चन, तो जंगम जगत्पावनऐशा लोकांप्रति विश्‍वास ठेवोनिनमो नमो म्हणे मी माथा झुकवोनिकूडलसंमदेवा!कायक तत्त्वासह ‘दासोह’ला वीरशैवांमध्ये विशेष महत्त्व आहे. दासोह म्हणजे आपण संपादिलेल्याचा समाजाकार्य व लोकांसाठी विनियोग करणे होय. गरजेपेक्षा जास्त संग्रही बाळगणे हे कायक सिद्धांताशी विसंगत आहे. कारण दासोहाविना कायकाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. कारण सन्मार्गाने अर्थार्जन नैतिक असले तरी अनावश्यक, अवास्तव धनसंग्रह मात्र, समाजाच्या दृष्टीने अनैतिक ठरतो. लोभ, मद, अहंकार अशा अनैतिक दुर्गुणांना पुष्ट करतो, मनुष्याला अवनत करतो. म्हणून अशा अतिरिक्त संपत्तीचा विनियोग समाजासाठी, समाजातील दुर्बल घटकांसाठी करावा हा दासोह संकल्पनेमागचा तत्त्व आहे. शिवरशरणांनी या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन केले. आधुनिक संत व महान तत्त्ववेत्ते, इंचगिरी संप्रदायाचे डॉ. गुरुदेव रानडे (निंबाळ) हे आपल्या ‘कर्नाटकातील परमार्थ मार्ग’ या ग्रंथात लिहितात, ‘कर्नाटकातील पारमार्थिक तत्त्वज्ञान हे जगातील पारमार्थिक तत्त्वज्ञानांत अत्यंत उच्च श्रेणीचे असे आहे.’ आजही भारतात गरीब - श्रीमंत ही दरी रुंदावत चालली आहे. वंचित समाजघटकांसह वनवासी समाजबांधवांचे जिणेही मुश्किल आहे. त्यामुळे या विचाराची आज अधिक गरज आहे. तसेच समाजाच्या श्रमातून संपादन करणार्‍यांना आता सामाजिक दायित्वाचे भान आले आहे. मात्र, बसवेश्‍वरांनी हा विचार आठशे वर्षांपूर्वी मांडला.

चारित्र्याची निर्मिती
 समरस समाजनिर्मिती करताना समाजजीवनात सत्‌चारित्र्य निर्मितीची गरज बसवेश्‍वरांनी ओळखली होती. नैतिक स्तर उंचावल्याखेरीज धर्मानुसरणात प्रगती होत नाही, अशीच त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी पंचाचारावर भर दिला. यात लिंगाचार, सदाचार, शिवाचार, भृत्याचार व गणाचाराचा समावेश आहे. लिंगाचार धार्मिक, सदाचार आर्थिक नैतिकतेचे, भृत्याचार व्यक्तिगत नैतिकतेचे प्रतिपादन करते. गणाचाराचा विषय याच लेखात स्वतंत्रपणे मांडणार आहे. स्वत: बसवेश्‍वर ब्राह्मण कुळात जन्मूनही आणि प्रधानमंत्री असूनही ते अतिशय विनम्र व विनयशील होते. ते अतिशय दयाळू अंत:करणाने सर्वांचे स्वागत करत. ते म्हणतात, होता भक्तांचे दर्शन, करितो वंदनतोचि भक्त जाणावामधुर वाणी हाच जपमधुर वाणी हेच तपसद्विनयचि असे प्रिय सदाशिवासी आणखी एका वचनात म्हतात, श्रीयाळासी शेठ म्हणल्यास,माचय्यासी धोबी म्हणल्यास,कक्कय्यासी ढोर म्हणल्यास,चेन्नय्यासी मातंग म्हणल्यास, अन् मी स्वत:ला ब्राह्मण म्हणल्यासकूडलसंगमदेव उपहासाने हसेल.या वचनातून जसा ह्या शिवशरणांचा थोरपणा प्रतीत होतो तशी बसवेश्‍वरांमधील विनयशीलताही प्रतीत होते. तसेच बसवेश्‍वरांनी नैतिकतेची सूत्रेही मांडली. ते म्हणतात, नको करू चोरी, नको करू हत्या, नको बोलू असत्य,नको धरू मनी द्वेष,नको मानू कोणी तुच्छ,नको आत्मस्तुती,नको करू निंदानालस्ती,हीच खरी अंतरंगशुद्धी,हीच खरी बहिरंगशुद्धी, आमच्या कूडलसंगमदेवासप्रसन्न करण्याची ही रिती.बसवेश्‍वरांनी सत्य, सद्विनय, अहिंसा याचा पुरस्कार केला. परधन व परस्त्री मोह विषासमान मानले, हेच या वचनांतून दिसते. सुसंस्कारित मनच सद्भावनांची निर्मिती करते. सद्भावनेतूनच सत्कर्माची प्रेरणा मिळते. निर्मळ मनातच शिव वास करतो, हे जाणून माणसाने आशा, लोभ, तामसपणा, क्रोध, पाखंड यापासून वाणी सदैव दूर ठेवून आपल्या उक्ती व कृतीत अंतर पडू देऊ नये, हे बसवेश्‍वर सांगतात. वसुधैवं कुटुंबकमबसवेश्‍वर समरस समाजजीवनाचे खंदे पुरस्कर्ते होते. भेदातीत समाजरचना हा त्यांचा संकल्प होता. मानवा - मानवात भेद करणे हे अनैसर्गिक आहे. इतरांना कमी लेखणे हे गैर आहे, हे त्यांनी सांगितले. संपूर्ण मानवजात एकच असल्याचे सांगत विश्‍वबंधुत्वाचा संदेश दिला. यासंदर्भात ते म्हणतात, हा कोण, हा कोण, हा कोण?असे म्हणवू देऊ नका,    हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा,असेच म्हणवून घ्या.तुमच्या घरचा पुत्र म्हणवाहे कूडलसंगमदेवा.तसेच ‘महारवाड्याची जमीन अन् मठमंदिराची जमीन असते का भिन्न?’ असा सवालही ते करतात. तसेच आणखी एका वचनात म्हणातात, जाणून - बुजून भेदभाव करू नयेतराजूचा काटा थोडासा जरीइकडे - तिकडे झाला तर ईश्‍वर अवश्य शिक्षा देईल, पात्र-अपात्र भेदभाव केल्यासशिव कसे बरे प्रसन्न होतील?सर्व जीवांत भेद नाही मानला,तर शिव का प्रसन्न होणार नाहीत?सकल जीवांकडे दयार्द्र दृष्टिने पाहून‘यत्र जीव: तत्र शिव:’ मान्य केले तरकूडलसंगमदेव का हृदयाशी धरणार नाहीत?सकल प्राणिमात्रांविषयी मनी दयाभाव राखणे हे उदात्त जीवनमूल्य आहे. म्हणूनच बसवेश्‍वर दयेविना धर्म तो कोणता? असा प्रश्‍न करतात आणि पुढे म्हणतात, ‘सकल प्राणिमात्रांविषयी दया असावी. कारण दया हेच धर्माचे मूळ आहे.’ म्हणूनच प्राण्यांची हत्या करणाराच खरा अस्पृश्य असल्याचे ते सांगतात.

 महिलांसाठीचे कार्य
प्राचीन भारतात महिलांवर बंधने नव्हती. त्यांना स्वातंत्र्य होेते, हे गार्गी, मैत्रेयी या तत्त्वज्ञांवरून स्पष्ट होते. बृहदारण्यकाच्या सहाव्या व आठव्या अध्यायात गार्गीचा उल्लेख आढळतो. तर मैत्रेयी ही गार्गीने ज्यांना वादविवादासाठी आव्हान दिले त्या याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी. मात्र, सततची आक्रमणे आणि धर्माचे आकलन नीटसे करुन न घेतल्याने स्त्रियांना चार भिंतींपूरते सीमित केले गेले. बसवेश्‍वरांना स्त्री व पुरुषांमधील भेदभाव लहानपणापासूनच सतावत होता. त्यांच्या उपनयन संस्कारावेळीच त्यांनी माझ्या बहिणीसाठी हा संस्कार का नाही, हा प्रश्‍न विचारला होता. अनुभव मंटपात स्त्री व पुरुषांमध्ये कोणताही भेद नव्हता. ते एकमेकांना अण्णा (दादा) व अक्का (ताई) म्हणूनच संबोधित. अनुभव मंटपात अक्कमहादेवी, अक्कम्मा, अमुगे रायम्मा, अय्दक्की रायम्मा, बोंतादेवी, मुक्तायक्का, मोळिगेय महादेवी, सत्यक्का, कामम्मा, केतलदेवी आदी अनेक शिवशरणी होत्या.‘मातृदेवोभव’ असे वेदांत सांगितले आहे. फक्त माताच नव्हे तर समस्त नारीकुलच देव आहे, असा शिवशरणांनी उद्घोष केला. बसवेश्‍वरांसह शरणांनी स्त्रियांना समान संधी प्राप्त करुन दिली. त्यामुळे शिवशरणींनी अनुभव मंटपाच्या चर्चेत भाग घेतानाच वचनांची रचना केली. बसवेश्‍वरांनी परस्त्री हव्यासाविषयी कठोर शब्दांत फटकारले आहे. ते म्हणत की, जिला पाहिल्यानंतर माझे मन आकर्षित होईल त्या     परवधूला महादेवी मानेन! तसेच लिंग - जंगम एकच मानल्यानंतर स्त्रिया पार्वतीसमान आहेत. तरीसुद्धा भोगाची भावना कशासाठी? अशा ठिकाणी मातृभाव सोडून आलिंगन देणार्‍यांचा कूडलसंगमदेव शिरच्छेद करतील. गेल्या काही वर्षांत देशात वाढलेल्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता हा विचार समाजमनांत रुजविण्याची गरज आहे.

वचन साहित्य
बसवेश्‍वरांसह शिवशरणांनी आपल्या स्वानुभवातील तत्त्वे वचनांमधून मांडली. त्यांची संख्या कोट्यवधी होती. मात्र, कल्याणक्रांतीनंतर घडलेल्या उत्पाताने मोठ्‌‌‌या प्रमाणात वचन साहित्य नष्ट झाले. त्यातील खुपच कमी साहित्य आज उपलब्ध आहे. आजवर उपलब्ध असलेल्या बसवयुग व बसवोत्तर युगातील वचनांची संख्या एकवीस हजारांहून अधिक आहे. बसवेश्‍वरांच्या कालाआधी साहित्य कन्नडमध्ये उपलब्ध नव्हते. बसवेश्‍वरांसह सर्व शिवशरणांनी कन्नड भाषेत वचने रचली. या साहित्याने कर्नाटकात एक धार्मिक, आध्यात्मिक व वैचारिक चळवळ उभी राहिली. ‘वचन म्हणून ओळखला जाणारा कन्नड भाषेतील हा एक विशिष्ट साहित्य प्रकार होय. अन्य भाषेचे कोणतेच आदर्श किंवा अनुकरण कोणत्याही दृष्टीने अंगीकार न करता केवळ अनुभवाद्वारे अंकुरित होऊन व रूप धारण केल्यामुळे कन्नड साहित्य गौरवशाली ठरले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ कन्नड साहित्यिक श्री. एम. चिदानंदमूर्ती यांनी वचन साहित्याबद्दल काढले आहेत. तर प्रसिद्ध लेखक एम. आर. श्रीनिवास मूर्ती म्हणतात, ‘वचनकारांमध्ये देश व काळाचा व्यत्यास न करता सर्वांना अन्वयणारा विश्‍वधर्म हेच एकमेव ध्येय सामावले होते.’कल्याण क्रांती उच्च - नीच या जातिभेदाच्या कल्पनांना शरण संप्रदायात थारा नव्हता.बसवेश्‍वरांनी म्हटले आहे,जमीन एक : महारवाडा आणि शिवालयासाठी,पाणी एकच : शौच आणि आचमनासाठी,कुळ एकच : स्वत:ला जाणून घेतलेल्याचे,फळ एकच : षड्‌दर्शन मुक्तीसाठी,तुम्हाला जाणणार्‍यांचीही स्थिती एकच,कूडलसंगमदेवा.भेदाभेद दूर करण्यासाठी सर्व शिवशरणांनी चांभार हरळय्याचा मुलगा शीलवंत व ब्राह्मण मंत्री मधुवरस याची कन्या कलावती यांचा विवाह अनुभव मंटपात लावण्यात आला. यामुळे तत्कालीन राजा बिज्जळ व त्यांचा पुरोहितवर्ग यांनी वर्णसंकर होत आहे म्हणून गदारोळ उठवला. यामुळे प्रधानमंत्री बसवेश्‍वरांनी पदाचा राजीनामा दिला. राजाने हरळय्या व मधुवरस यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. त्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार करण्यात आले. बसवेश्‍वर तेथे न थांबता कल्याण सोडून निघून गेले. कल्याणात हलकल्लोळ माजला. अनुभव मंटपातील शरणजन देशांत इतस्तत: विखुरले गेले. बसवेश्‍वर कूडलसंगम येथे गेले. तेथे ते लिंगैक्य पावले. दरम्यान, हरळय्या, मधूवरस व शीलवंत यांच्या हत्येचा सूड घेण्याचा निर्धार शरण जगदेव व मल्लिबोम्मण्णा यांनी केला. त्यांनी एके दिवशी भर रस्त्यात राजा बिज्जळाचा वध केला. त्यानंतर बिज्जळाचा मुलगा सोविदेवने सर्व शरणांना शोधून शोधून मारण्याची आज्ञा केली. त्यावेळी मोठ्‌‌‌या प्रमाणात शिवशरणांसह लोकांच्या हत्या झाल्या. बसवेश्‍वरांनी स्वप्नाळू आदर्शवाद, वंचितांविषयीच्या दया, सहानूभूतीतून , भावनिक उद्रेकातून नव्हे तर सुसंबंद्ध सिद्धांताच्या आधारे मूल्याधिष्ठित नवसमाज निर्मितच्या ध्येयप्राप्तीसाठी मध्ययुगीन कालखंडात धार्मिक चळवळीच्या माध्यमातून नवीन समाजव्यवस्था, मानवतावादी समाजव्यवस्था उभारण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही सुधारणा ह्या धर्माच्या माध्यमातूनच होऊ शकतात, हे ते जाणून होते. त्यामुळे त्यांनी त्याला धार्मिक स्वरूप दिले. त्याचे स्वरुप लवचिक होते. त्यांनी आपला साधेपणा, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि कौशल्याने समाजाचे संघटन केले. मात्र, आंतरजातीय विवाहानंतर झालेल्या हत्याकांडामुळे आत्मकल्याणाचा हा मार्गच कुंठित झाला.

   धर्मरक्षणासाठी शरणांनी उचलले खड्‌ग
गणाचार या तत्त्वाचा आपण स्वतंत्रपणे विचार करुया. कारण आज भारताला त्याची आवश्यकता आहे. गणाचार हा पंचाचारांपैकी एक आचार होय. स्वातंत्र्यानंतर इतिहास लिहिताना सातत्याने भारतीय श्रद्धास्थानांवर आघात केले जात आहेत. त्यांची मोडतोड करून इतिहास मांडण्यात येत आहे. कारण आपल्या पूर्वसूरींच्या गौरवशाली इतिहासातून नव्या पिढीने बोध घेऊ नये आणि निष्क्रीय समाजाची निर्मिती व्हावी, हाच यामागचा उद्देश आहे. नुकतेच हिंदू धर्म व संस्कृतीवर चिखलफेक करणार्‍या एका इंग्रजी पुस्तकाची विक्री थांबवण्याचा करार झाला, त्यामुळे हा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने समोर आला. इतिहास लेखन करताना अत्यंतिक अहिंसेचा गौरव करतानाच राष्ट्रविघातक कृत्यांविरोधातील प्रतिकारालाच लक्ष्य केले जात आहे. मात्र, महात्मा बसवेश्‍वरांच्या साहित्याचे अवलोकन केल्यास ते किती दूरदृष्टीचे राष्ट्रपुरुष होते, हे दिसून येईल. ते अहिंसक असले तरी भ्याडपणाचे समर्थक नव्हते. ‘बाराव्या शतकाच्या अखेरीस भारताच्या उत्तर दिशेला परकीय आक्रमण होण्याची चाहूल शरणांना लागल्याचे व त्याच्या संभाव्य परिणामांना तोंड देण्याच्या पूर्वतयारीला ते लागल्याचे त्यांच्या वचनांवरुन आढळून येते. दक्षिणेकडे जरी आक्रमणाच्या तीव्रतेची झळ नसली तरी त्याच्या संभाव्य परिणामांचा प्रतिरोध करण्याची तयारी आणि जबाबादारी त्यांच्यावर होतीच. ‘अहिंसो परमोधर्म: असे म्हणत, अहिंसेच्या अतिरेकाने दुष्ट शक्तीचा सुद्धा समर्थपणे प्रतिकार करण्याची अस्मिता समाजपुरुषांतून लोप पावत असल्याचे त्यांच्या चाणाक्ष नजरेत आले. देशांत व संस्कृतीला क्षते पडून ती दुभंगण्याचा धोका त्यांनी हेरला. देश व धर्म रक्षणार्थ समाज सक्षम व सजग होण्यासाठी गणाचार तत्त्वाचे सूत्र त्यांनी आपल्या धर्मनिष्ठेत गोवले’’ (शून्यसंपादन
) त्यामुळेच कल्याण क्रांतीनंतर झालेल्या हल्ल्यांचा केवळ शिवशरणांनीच नव्हे तर शिवशरणींनीही प्रतिकार केला. वचनसाहित्य सुरक्षितपणे उळवीकडे घेऊन जाताना कक्केरी येथे सोविदेवच्या सैन्याने शिवशरणांवर हल्ला केला. शिवशरणांनी त्यांच्याशी लढाई केली. त्यात डोहर कक्कय्या हे धारातीर्थी पडले. ते वीर कक्कय्या म्हणून ओळखले जातात. शरणांनी मरणास ‘महानवमी’ असे संबोधलेले आहे. भय, भीती व भ्याडपणा यास जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रांत नि कोठल्याही प्रसंगी शरण मुळीच थारा देत नाहीत. ते निर्भय आहेत.ते न्यायानिष्ठुर व ‘लोकविरोधी’असून कोणापुढेही मान तुकविणार नाहीत. सत्य आणि न्यायाच्या प्रतिपालनासाठी व समाजाचे समष्टि - हित साधण्यासाठी निर्भय मनोवृत्तीची जी शिकवण शरणांनी दिली आहे, तोच गणाचार होय. जो आचारयुक्त आहे तो भक्त, जो अनाचारी आहे तो ‘भवि’ अशी शरणांची धारणा आहे. समस्त मानवजातीच्या हितासाठी व मानवी मूल्यांच्या जोपासनेसाठी अधिकार, दौर्जन्य आणि क्रौर्य या राक्षसी प्रवृत्तीबरोबर मुकाबला करणे हा गणाचाराचा भाग आहे. काही प्रसंगी अहिंसापालन निष्क्रीयतेचे व भ्याडपणाचे द्योतक ठरण्याचा संभव असतो. हिंसा व भ्याडपणाचे द्योतक ठरण्याचा संभव असतो. हिंसा किंवा भ्याडपणा यापैकी एखादा पर्याय निवडण्याचा प्रसंग आल्यास गणाचारी, खड्‌ग घेऊन दुष्ट शक्तीच्या संहारासाठी प्राणार्पण करतात, आत्मबलिदानही देतात. अन्याय, असत्य व अनाचार यांच्याशी कधीही तडजोड नाही. हे आक्रमणाकरिता नसून तत्त्वप्रतिपालनाकरिता आहे.(शून्य संपादन)आज पुन्हा राष्ट्रविघातक शक्तींमुळे देश व धर्मासमोर अनेक प्रश्‍न उभे ठाकले आहेत. अशाप्रसंगी मातृभूमी आणि धर्माच्या रक्षणासाठी बसवेश्‍वरांसह शिवशरणांनी प्रतिपादित केलेल्या गणाचाराचा विचार घरोघरी पोहोचवण्याची वेळ आली आहे.

No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...