Friday, 24 February 2017

हलसंगीच्या अरविंद आश्रमातील दिव्यांश




हलसंगी येथील अरविंद आश्रमात श्री योगी अरविंद यांच्या दिव्यांश स्थापनेला गेल्या जुलै 15 ला 43 वर्षे झाली. त्यानिमित्त तेथे विविध आध्यात्मिक कार्यक्रमही झाले. तसेच 15 ऑगस्ट रोजी योगी अरविंद यांची जयंती त्यानिमित्त...
बंगालमधील महान क्रांतिकारक महर्षी अरविंद यांनी देशात आध्यात्मिक क्षेत्रातही नवक्रांती घडवली.  त्यांच्या आवहनानुसार हजारो बंगाली युवक राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढले. सशस्त्र क्रांतीमागे त्यांचीच प्रेरणा होती. ते एक महान योगी आणि दार्शनिक होते. संपूर्ण जगातील दर्शनशास्त्रावर त्यांचा प्रभाव राहिला आहे. त्यांनी वेद, उपनिषदांवर टीका लिहितानाच योगसाधनेवरही मौलिक लेखन केले. विशेषत: डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताच्या पुढे जाऊन पृथ्वीवर जीवनाचा विकास कसा झाला, यावरही त्यांनी लेखन केले.  लेटर्स ऑन योगा, सावित्री, योग समन्वय, दिव्य जीवन, फ्युचर पोएट्री व द मदर या त्यांच्या प्रमुख आध्यात्मिक साहित्यकृती सर्वज्ञात आहेत. अशा आध्यात्मिक क्रांतिकारक श्री योगी अरविंद यांनी 5 डिसेंबर 1950 रोजी देहविलय केला. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या पार्थिव शरीरात दिव्य तेज कायम राहिल्याने त्यावर चार दिवस अंतिम संस्कार करण्यात आले नाहीत आणि शेवटी 9 डिसेंबर रोजी त्यांना समाधी देण्यात आली.
दरम्यान, श्री योगी अरविंद हे जटा विंचरताना गळालेले केस व काढलेली नखे सुरक्षितरीत्या राखून ठेवण्यात आली होती. त्यात त्यांचे आध्यात्मिक तेज अनुस्युत असल्याची असल्याची साधकांची श्रद्धा आहे. हे दिव्यांश असलेल्या कलशाची देशात प्रथम सोलापूरपासून 40 किलोमीटर अंतरावरील कर्नाटकातील हलसंगी(ता. इंडी, जि. विजयपूर) येथील आश्रमात स्थापना करण्यात आली. कर्नाटकातील थोर आध्यात्मिक तत्त्वचिंतक, कवी मधुरचेन्न हे या गावचे. बालपणापासून मेधावी प्रतिभा लाभलेल्या आणि अध्यात्माकडे ओढा असलेल्या मधुरचेन्न यांना श्री अरविंद यांच्या भेटीनंतर जीवनध्येय गवसले. त्यांनी श्री अरविंद मंडळाच्या माध्यमातून हलसंगी परिसरातील गावांमध्ये आध्यात्मिक कार्य केले. त्यांच्या अध्यात्मविषयक चर्चा, परिसंवादांमध्ये कन्नड साहित्यजगतातील द. रा. बेंद्रे, मुगळी, गोकाक आदी प्रतिभावंतांचा सहभाग असायचा. मधुरचेन्न यांचे 1953 मध्ये मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या सहकार्यांनी हे कार्य पुढे सुरू ठेवले. मधुरचेन्न यांच्या आध्यात्मिक कार्याची दखल घेत श्री माताजी यांनी योगी अरविंद यांच्या दिव्यांश कलशाची हलसंगी आश्रमात स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
पाँडिचेरीचे तत्कालीन नायब राज्यपाल व मूळचे कर्नाटकाचे असलेले बी. डी. जत्ती हेही योगी अरविंद यांचे अनुयायी होते. माताजींनी त्यांना कळवल्यानंतर ते स्वत: दिव्यांश कलश घेऊन हलसंगीला आले. त्यांच्याच हस्ते आश्रमात कलशाची स्थापना झाली. यावेळी पाँडिचेरीच्या आश्रमातील ज्येष्ठ साधक उदार पिंटो यांची प्रमुख उपस्थिती होती. हे दिव्यांश सोने, चांदी, चंदन व गुलाबाची काडी यापासून बनवेल्या पेटिकेत (क्युबिक बॉक्स) आहे. ही पेटिका कलशात ठेवण्यात आली आहे. या आश्रमात आजही  प्रार्थना, ध्यान, अरविंदांचे साहित्य पारायण आदी अनेकविध उपक्रम चालतात, असे या आश्रमाचे प्रमुख श्री पुरुषोत्तम गलगली यांनी सांगितले.
श्री अरविंद यांच्या दिव्यांश कलशाची स्थापना पहिल्यांदा हलसंगी येथे झाली असली तरी आज देशभरातील 50 आश्रमांमध्ये हे कलश स्थापन केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील अमरावती, चर्चगेट (मुंबई) या आश्रमांचाही समावेश आहे. तसेच कर्नाटकातील जेपी नगर (बंगळुरू), गुलबर्गा, तुमकुरू, दांडेली (धारवाड) आदी आश्रमांतही हे कलश स्थापन केले आहेत. योगी अरविंद यांच्यातील दिव्य तेज त्यांच्या शरीराचे भाग असलेल्या केस, नखांमध्येही असल्याची साधकांची श्रद्धा आहे. त्यांचे हे दिव्यांश आजही साधकांना आध्यात्मिक प्रेरणा देत आहेत.

No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...