Tuesday, 25 August 2026

हरिका : तेव्हाची अन् आताची

 




हरिकाचे सोलापुरातील पहिले व्याख्यान आज झाले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी जुळे सोलापूर शाखेने विश्वबंधुत्व दिनानिमित्त या व्याख्यानाचे आयोजन केले होते. अपेक्षेपेक्षा अधिक चांगले व्याख्यान झाल्याचे सांगत सर्वच कार्यकर्त्यांनी तिचे कौतुक केले. दक्षिणात्यांच्या हिंदीबाबतची साशंकताही या व्याख्यानाने दूर केली आहे. एक कन्नड भाषिक मुलगी इतक्या चांगल्या प्रकारे अस्खलित हिंदी बोलू शकते, याचे उपस्थितांना खूपच कौतुक वाटले. व्याख्यानासाठी उपस्थित अनेकांनी तिची भेट घेत हे बोलूनही दाखवले. यात विशेषतः महिलांची संख्या अधिक होती.

हरिकाचा आणि माझा परिचय झाला तेव्हा ती इयत्ता पाचवीत शिकत होती. आज ती बीएच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. बेळगावच्या स्वामी विवेकानंद - भगिनी निवेदिता साहित्य संमेलनात पाचवी शिकणारी एक मुलगी विवेकानंदांच्या जीवन कार्यावर इतके चांगल्या प्रकारे भाष्य करते संमेलनातील वेगवेगळ्या चर्चा परिसंवादात बोलते, हा आकर्षणाचा व चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता. देशाचे एक माजी अर्थमंत्री कॅशलेस व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उभा करताना आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि लोकांना कॅशलेस व्यवहाराची माहिती मिळावी, या तळमळीने हाती मोबाईल घेऊन रस्त्या - रस्त्यावर लोकांना त्याची माहिती देणाऱ्या हरिकाची कर्नाटकासह देशातील इंग्रजी माध्यमांनीही दखल घेतली होती. चिमुकल्या हरिकाच्या कामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दखल घेत कौतुक केले होते. 

बंगळूरू येथील एका सामान्य कुटुंबातील या भगिनीची मातृभाषा कन्नड, शिक्षणामुळे इंग्रजी अवगत झाली. मात्र, बुद्धिमंतांनी जनमनात पेरलेल्या 'विषा'मुळे दक्षिणात्य लोकांत आजही 'हिंदी विरोध' कायम असल्याचे आपण गेल्या काही महिन्यांपूर्वीच पाहिले आहे. आपल्या मातृभाषेतून कर्नाटकातील व्यासपीठं गाजवतानाच टीव्हीवरील चर्चेतही आपल्या अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणीने तिने लक्ष वेधून घेतले आहे. शिवाय 'हिंदी'बाबतचीही अढी मनात न बाळगता तिने त्यावरही प्रभुत्व मिळवले आहे. कन्नड, इंग्रजीसह हिंदी भाषेत तिने महाराष्ट्रात काही ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. तिने कन्नड व इंग्रजी भाषेत कर्नाटकातल्या खेड्यापाड्यासह आंध्र प्रदेश व तेलंगणात हजारो व्याख्याने दिली आहेत. (होय हजारोच, ती आजपासून एक महिन्यानंतर घरी परतणार आहे, इतक्या व्याख्यानाच्या तारखा सध्या बुक आहेत.)

बालपणापासून स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव, भारत मातेविषयी प्रेम, राष्ट्रवादी विचार व संस्कार, युवा ब्रिगेड व सोदरी निवेदिता प्रतिष्ठानचे संस्थापक चक्रवर्ती सुलिबेले यांचे नेतृत्व आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच तिच्या मनात हिंदी भाषेविषयीची अढी निर्माण होऊ शकली नाही. परिणामी ती आज महाराष्ट्राच्या सीमाभागासह अन्य ठिकाणच्या सभा, व्याख्याने आपल्या राष्ट्रवादी विचाराने गाजवत आहे. उपनिषदांवरही पुस्तके लिहिलेली हरिका येत्या काळात एक अभ्यासू लेखिका म्हणूनही उदयास येईल.

दि. १४ सप्टेंबर २०२५



Friday, 15 May 2026

माध्यमाची शक्ती अन् अहंकारी नेतृत्वाचा शेवट

  धारवाड… कर्नाटकातील ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाणारे शहर. पण याच शहराने एक काळ असा पाहिला, जेव्हा शिक्षण, संस्कृती आणि प्रगतीच्या ओळखीवर राजकीय सत्तेच्या अहंकाराची काळी सावली पडली. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य योगेश गौडा यांच्या खून प्रकरणाने केवळ एका व्यक्तीचा जीव घेतला नाही, तर व्यवस्था, पोलिस यंत्रणा आणि पत्रकारितेच्या मूल्यांनाही कठोर प्रश्न विचारले. १५ जून २०१६ ची पहाट. जिममध्ये नियमित व्यायाम करणाऱ्या योगेश गौडा यांच्यावर हल्ला होतो आणि काही क्षणांत त्यांचा जीव घेतला जातो. या हत्येच्या आदल्या दिवशी, म्हणजे १४ जूनला, त्यांना एक हस्तलिखित पत्र मिळते—“तुमच्या खुनाची तयारी झाली आहे, सावध राहा.” हा इशारा केवळ योगेश गौडा यांच्यासाठी नव्हता; तो संपूर्ण व्यवस्थेच्या पुढील वर्तनाचा संकेत होता. खुनानंतर लगेचच संशयाची सुई तत्कालीन काँग्रेसचे मंत्री व विद्यमान आमदार विनय कुलकर्णी यांच्याकडे वळली. कुटुंबीयांनी तशी तक्रारही केली. पण पोलिसांनी ती नोंदवण्यास नकार दिला. उलट, “नाव न घेता तक्रार द्या” अशी अट घालण्यात आली. ‘जमिनीच्या वादातून खून’ ही कथा तयार झाली आणि विशेष म्हणजे, पोस्टमार्टम होण्याआधीच तत्कालीन गृहमंत्र्यांनी विधानसभेत हीच भूमिका मांडली. यापेक्षा मोठा योगायोग कोणता? यानंतर घडलेली प्रत्येक घटना ही सत्तेच्या गैरवापराची साखळीच ठरली. सहा जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत खुनाची जबाबदारी स्वीकारली. पण पुढे सीबीआय तपासात हे सर्व बनावट असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच खरा गुन्हेगार लपवण्यासाठी ‘खोट्या आरोपींची’ उभारणी करण्यात आली होती. तपासाच्या प्रक्रियेत आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या. खून करण्याआधीच एका फार्महाऊसवर मंत्री, काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मारेकरी यांची बैठक झाली होती. खुनाचे नियोजन इथेच झाले, असे तपासात उघड झाले. खुनानंतर साक्षीदारांना पोलिसच कोर्टात नेण्याआधी त्या फार्महाऊसवर घेऊन जात, त्यांना पैसे देत, धमक्या देत. न्यायप्रक्रियेची ही उघड उघड थट्टा होती. सप्टेंबर २०१७ मध्ये डीवायएसपी तुळजप्पा सुलपी यांनी योगेश गौडा यांचे बंधू गुरुनाथ गौडा यांची भेट घेतली. पण गुरुनाथ यांनी सावधगिरी बाळगत या भेटीचे सीसीटीव्ही चित्रीकरण आणि मोबाईल रेकॉर्डिंग केले. हा पुरावा घेऊन त्यांनी अनेक माध्यमांचे दरवाजे ठोठावले, पण बहुतेकांनी मौन बाळगले. इथेच पत्रकारितेचा एक काळा चेहरा समोर येतो. या अंधारात अपवाद ठरले Asianet Suvarna News. त्यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. पोलिसांनी दोषारोपपत्रात नोंद न केलेली कार शोधून काढली, तपासातील त्रुटी उघड केल्या, साक्षी-पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न समोर आणले. धमक्या, दबाव, आमिष या सगळ्यांना न जुमानता त्यांनी सत्याचा धागा सोडला नाही. “तुम्ही बेंगळुरूत राहता, तुमचे आई-वडील गावी आहेत…” अशा सूचक धमक्या देऊनही त्यांना गप्प बसवता आले नाही. दरम्यान, या प्रकरणात बसवराज कोरवर यांसारख्या निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोठा लढा दिला. तीन महिने आंदोलन करून प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आली. या लढ्यात त्यांना वैयक्तिक आयुष्यातही मोठी किंमत मोजावी लागली. कुटुंबापासून दूर राहणे, सततचा दबाव सहन करणे. राजकीय पातळीवरही या प्रकरणाने अनेक वळणे घेतली. काँग्रेस सरकारच्या काळात हे प्रकरण सीबीआयकडे जाऊ नये, याची काळजी घेतली गेली. मात्र, २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर अखेर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. आणि तेथून सत्य बाहेर येण्यास सुरुवात झाली. या संपूर्ण कथेत एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘अहंकार’. विनय कुलकर्णी यांच्याकडे नेतृत्वासाठी लागणाऱ्या सर्व गुणांचा उल्लेख केला जात होता. पण “मी काहीही करू शकतो” हा सत्तेचा गर्व शेवटी त्यांच्या विरोधात गेला. साक्षीदार फोडू शकतो, चार्जशीट बदलू शकतो, तपास वळवू शकतो, या मानसिकतेनेच त्यांना या टप्प्यापर्यंत आणले. योगेश गौडा यांच्या पत्नीने नंतर घेतलेला 'यू-टर्न' आणि काँग्रेसमध्ये प्रवेश हा देखील या प्रकरणातील गुंतागुंतीचा भाग ठरला. दुसरीकडे, गुरुनाथ गौडा यांना धमक्या देत हा पाठपुरावा थांबवण्याचा प्रयत्न झाला. मित्राच्या घरी बोलावून दमदाटी करण्यात आली. पण ते झुकले नाहीत. अखेर, बंगळुरूच्या लोकप्रतिनिधी न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेने या दीर्घ संघर्षाला न्याय दिला. हा केवळ एका खुनाचा निकाल नाही. हा लोकशाहीचा विजय आहे. ही कथा आपल्याला दोन गोष्टी शिकवते. एक - सत्तेचा गैरवापर कितीही मोठा असला, तरी तो कायम टिकत नाही. आणि दोन - पत्रकारिता जर निर्भय असेल, तर ती कोणत्याही सत्तेला प्रश्न विचारू शकते. पण जेव्हा पत्रकारिता गप्प बसते, तेव्हा अन्यायाला बळ मिळते. धारवाडच्या या प्रकरणाने दाखवून दिले - सत्य दडपता येते, पण संपवता येत नाही. उशीर होतो, संघर्ष करावा लागतो, किंमत मोजावी लागते… पण शेवटी विजय होतो तो न्यायाचाच. 


हरिका : तेव्हाची अन् आताची

  हरिकाचे सोलापुरातील पहिले व्याख्यान आज झाले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी जुळे सोलापूर शाखेने विश्वबंधुत्व दिनानिमित्त या व्याख्यानाचे आयो...