Friday, 3 March 2017

धर्मजीवन : पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामी यांची प्रवचने

 

विजयपूरचे ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रवचनावर आधारित अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. स्वामीजी हे शिवशरण श्री अल्लमप्रभू यांच्या वचनसाहित्याचे भाष्यकार आहेत. त्यांच्या प्रवचनावर आधारित बहुतांश साहित्य हे कन्नड भाषेत आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकांचे अनुवाद झाले आहे. अजुन मोठ्या प्रमाणातील साहित्य अनुवाद होणे बाकी आहे. त्यांच्या साहित्याचे सर्वाधिकार हे विजयपूरच्या ज्ञानयोग फाउंडेशनकडे आहेत. श्री स्वामीजींचे साहित्य मराठी भाषकांपर्यंतही पोहोचावे, या एकाच उद्देशाने त्यांचे साहित्य मराठीत ब्लाॅगवर उपलब्ध करुन देत आहे, यामागे कोणताही अन्य हेतू नाही. मात्र, कोणीही ज्ञानयोग फाउंडेशनच्या पूर्वपरवानगीशिवाय या साहित्याचा वापर करू नये. 

................................................................................................................................................................

२०१३ मध्ये बीदर जिल्ह्यातील औराद येथे श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे आध्यात्मिक प्रवचन झाले. श्री गुरुदेवांच्या या प्रवचनाचे सारसंग्रह म्हणजे धर्मजीवन हा ग्रंथ. डाॅ. श्री श्रद्धानंद स्वामी यांनी याचे संपादन केले आहे. त्यातील पहिले प्रकरण. 

.....................................................................................................................................................................

शरणधर्म

धर्म हे परमशांतीचे साधन होय. धर्मामुळे अनेक महात्म्यांचे जीवन सुंदर झाले आहे. धर्माने जगाला शांतीचा सुगंध, संतोष, मकरंद प्रदान केला आहे. या जगात मानवनिर्मित धर्म एक, दोन नव्हे, शेकडो, हजारो आहेत. ते कालप्रवाहात काही काळ उन्नत बनून पुन्हा लुप्त होतात.  संपूर्ण जगात नैसर्गिक, खरा धर्म मात्र एकच आहे,  जो नसल्याने जीवन नीरस बनते, तो धर्म होय. सौंदर्य नसलेले फुल फुल नाही. सावली न देणारे झाड नाही. त्याच प्रकारे धर्माविना जीवन जीवन नाही. धर्म हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे जीवनवैभव वाढते. केवळ श्रीमंती - संपत्ती, शिक्षण – बुद्धी यामुळे जीवन समृद्ध होत नाही, ते धर्मामुळे समृद्ध होते. धर्म हे प्रत्येक वस्तूचे सारभूत तत्त्व आहे.
प्रकाश देणे हा दिव्याचा धर्म आहे. प्रवाहित होणे हा पाण्याचा धर्म आहे. फुल सौंदर्यामुळे फुल बनते. मनुष्य धर्मामुळे मनुष्य बनतो. पाहणे हा डोळ्यांचा धर्म आहे. चालणे हा पायांचा धर्म आहे. वाहणे हा वाऱ्याचा धर्म आहे. हा निसर्ग धर्म आहे. हा कोणीही स्थापन केलेला धर्म नाही. सर्व देशांमध्ये, सर्व काळात अस्तित्वात असलेला हा धर्म आहे. 'धम्मं शरणं गच्छामि' असे बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी अशा नैसर्गिक धर्माला शरण जायला हवे. ते स्वीकारायला हवे. यालाच शरणधर्म म्हटले जाते.
घर कितीही मोठे असो, छोटे असो, त्यात प्रकाश देणारी एक छोटी पणती हवी. अंधार असलेले घर घर नाही. तसे श्रीमंत असो, गरीब असो त्याच्या अंतरंगातील महाल प्रकाशित करणारी धर्माची ज्योत हवी! अन्यथा तो मनुष्य नव्हे, पशू होय. एखाद्या वेळेस हृदयातील धर्माची ज्योत विझली तर मनुष्य युद्ध, कलह, हत्या, खोटारडेपणा, चोरी आदी अमानुष कृत्ये करतो. धर्मच सुंदर बाग फुलवू शकतो, तर बहरलेली बाग नासधूस करणारे धर्म नव्हे. जेव्हा मनुष्य या लोकांत आला तेव्हाच हा नैसर्गिक धर्मही आला. हाच सत्यधर्म अथवा सद्धर्म होय! सर्वांसाठी नैसर्गिक धर्म एकच आहे. यांच्यासाठी एक, त्यांच्यासाठी एक असा नैसर्गिक धर्म वेगवेगळा नाही. जेथे सत्य आहे,  तेथेच सौंदर्य,  शांती,  मांगल्य आहे. ‘सत्यं शिवं सुंदरम्’ हे सद्धर्माचे सद्लक्षण होय! आपल्या जीवनाच्या अंगणात या धर्माची फुले फुलावीत. केवळ बोलण्याने, विचाराने जीवनाला भव्यदिव्यता येणार नाही. आपल्या अंतरंगात सद्धर्माची ज्योत प्रकाशित झाल्यास आपले जीवन भव्यदिव्य बनेल.
दक्षिण भारतातील एक संत ईश्वरनामाचा महिमा गात भक्तिसुख अनुभवत होते. त्यांची भक्तिगीते ऐकून हजारो लोक धन्य व्हायचे! मात्र, त्या संतांच्या जवळच त्यांना न सहणारे चारजण होते.  कशाप्रकारेही ते त्यांचा अवमान करुन त्यांना तेथून हाकलून देण्याच्या प्रयत्नात होते. एके दिवशी मध्यरात्री त्यांनी जुनी फाटलेली पादत्राणे त्यांच्या घराच्या दरवाजाला बांधली आणि तेथेच ते लपून बसले. पहाटे झोपेतून उठून ते संत स्नानाला नदीवर जण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर पडले त्याच क्षणी त्यांच्या डोक्याला पादत्राणे लागली. ते पाहून लपून बसलेल्या लोकांना न मावणारा आनंद झाला आणि ते हसले. परंतु ते संत मात्र किंचितही विचलित झाले नाहीत; त्यांना रागही आला नाही.  त्याउलट त्यांनी एक सुंदर गोष्ट सांगितली.
केचित ज्ञानावलंबिन: केचित ज्ञानावलंबिन:।
वयंतु हरिदासानां पादरक्षावलंबिन:।।

या जगात काहीजण ज्ञानमार्ग अवलंबतात. तर काहीजण कर्ममार्ग अवलंबतात. मात्र, आपण हरिदासांच्या पादुकांचाच अवलंब केला आहे! ही गोष्ट ऐकताच आपच्या चुकीची जाणीव झाल्याने ते चौघे नंतर त्यांच्या पायावर पडून क्षमा मागतात. आता त्या चौघांतही धर्माची ज्योत प्रकाशित झाली होती!
एका श्रीमंताला दोन धर्मपत्नी होत्या. पहिल्या पत्नीला एक मुलगा होता. दुसऱ्या पत्नीला एकही अपत्य झाले नव्हते. त्यामुळे तो श्रीमंत आणि शेजारीपाजारी पहिल्या पत्नीचेच कौतुक करायचे. दुसऱ्या पत्नीला हे सहन झाले नाही. काहीतरी करून त्या मुलाला संपवून टाकायचा तिने निर्धार केला. तिने तेथे मिठाई विक्रीसाठी येणाऱ्याला सांगितले - “ हे विष तुझ्या मिठाईत कालवून त्या मुलाला दिल्यास तुला हवे तेवढे धन देईन!” त्यावर मिठाई विक्रेता म्हणाला - “मी मिठाई विकणारा आहे, विष विकणारा नव्हे. आपणास शांती - समाधान न देणारे ते धन घेऊन मी काय करू, ते तुमच्याजवळच असूद्या!” त्या मिठाई विक्रेत्याची ही सुंदर गोष्ट ऐकून तिच्या मनातही धर्माची ज्योत प्रकाशित झाली. अज्ञानाचा अंधकार नष्ट झाला.  पहिलीच्या मुलालाच आपले मूल मानून त्याच्यावर प्रेम करू लागली. तिचे विशाल हृदय पाहून गावकरी पहिलीपेक्षा दुसरीचाच अधिक गौरव करू लागले. द्वेषाचा अंधकार संपून प्रेमाचा प्रकाश प्रदान करणारीच धर्मज्योती! हाच शरण धर्म!

 




No comments:

Post a Comment

ಬಸವ ಮೂಲ, ಸನಾತನ ಶೈವ ಮೂಲ!

  "ಷಣ್ಮುಖನಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡುವುದನ್ನು ಮರೆತ ವೃಷಭನೆನ್ನುವ ಗಣನನ್ನು ಶಿವನು ಬಸವನಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿ ಶಿವಭಕ್ತ ಜಂಗಮರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ವಿನಿಯೋಗಿಸಿ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ...