Wednesday 14 March 2018

आधुनिक कबीर ; इब्राहिम सुतार


वादग्रस्त व्यक्तींना देशाच्या जनमानसांत रुजवण्याचा प्रयत्न भारतात पूर्वीपासून निरंतर चालला आहे.  मात्र, गेल्या काही वर्षांत ते अधिक जोरकसपणे सुरू असल्याचे विशेषत: कर्नाटकसह देशभरातल्या काही घटनांवरुन अधिक प्रकर्षाने समोर आले आहे. स्वातंत्र्यानंतर समाजातील श्रेष्ठ अशा समन्वयभावी विचारांच्या व्यक्ती, सर्वांच्या भावनांचा आदर राखत सामरस्याचे अग्रणी बनलेल्या मेरुपुरुषांना पुढे आणून त्यांच्या आदर्श जीवनाची ओळख करुन देण्याचे काम या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षाने अथवा डाव्या, तथाकथित पुरोगामी विचारवंत, बुद्धीजीवींनी केले नाही. त्याउलट सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील हे बुद्धिजीवी खोटेच सत्य भासवण्याच्या प्रयत्नात सफल झाले आहेत. त्यांच्या विचारानुसार देशभक्त खलनायक तर खलनायक देशभक्त आहेत. मात्र, कबीर, शिशुनाळ शरीफ यांच्यासारख्या संतश्रेष्ठ, एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ, म्हैसूरचे दिवाण सर मिर्जा इस्माईल यांच्यासारखे समाजसेवी यांची समाजाला आणखी ओळख व्हावी, त्यांचे सामरस्यपूर्ण आणि हिंदू - मुस्लिम - ख्रिश्चन हे सर्व एकच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपूर्व संधी गमावल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही जाती, मतांच्या नावाखाली भांडणे सुरुच आहेत. माझाच धर्म खरा, हा अट्टाहास समरस समाजजीवनाचा गळा घोटत आहे. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधुनिक कबीर म्हणून ओळखले जाणारे प्रवचनकार इब्राहिम सुतार यांना जाहीर केलेला पद्मश्री सन्मान हा समरस समाजमनासाठी आशादायक आहे.  कारण सामाजिक एकतेसाठी त्यांनी दिलेले योगदान अपूर्व आहे.  ते इस्लामी विचारधारेत वाढले असले तरी त्यांनी आपली जीवनदृष्टी विशाल बनवल्याने मुस्लिमेतरांतही ते आदरणीय आहेत. त्यांच्याकडे समाज धार्मिक नजरेने पाहत नाही. मात्र, सेक्युलरांच्या यादीत त्यांना महत्वाचे स्थान नाही. या देशातील अल्पसंख्यक समाजात आदराचे स्थान असलेलेच धर्मनिरपेक्ष असा या सेक्युलर कंपुचा अघोषित नियम आहे. धार्मिक सलोख्यासाठी अडथळा ठरणारी ही बाब आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने सुतार यांचा केलेला गौरव त्या अडथळ्यावर मात करण्यासाठी प्रेरक आहे.

वेद, उपनिषदे, शिवशरणांचे वचन साहित्य, तत्त्वपदे आणि सुफी संत परंपरेतील तत्त्वे भजन, प्रवचन आणि संवादाच्या माध्यमातून संपूर्ण कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमाभागातील जनमनांत रुजवून एकात्म समाजनिर्मितीचे कार्य इब्राहिम सुतार हे गेल्या ४८ वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. त्यांचे लौकिक शिक्षण केवळ तिसरीपर्यंत झाले आहे.  मात्र, त्यांचा जीवनानुभव हा कबीर,  शिशुनाळ शरीफ, शिवशरण आणि सुफी संतांची आध्यात्मिक धारा पुढे नेणारी आहे. प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांच्या साधनामार्गाची आठवण करुन देणारी आहे. सत्संग हेच माझ्यासाठी विश्वविद्यालय ठरल्याचे ते गौरवपूर्वक सांगतात.
१० मे १९४० रोजी महालिंगपूर (ता. मुधोळ, जि. बागलकोट) येथील नबीसाहेब बिस्ती व अमीनाबी या दांपत्यापोटी इब्राहिम यांचा जन्म झाला. मूळचे मुधोळचे असलेले बिस्ती कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी महालिंगपूर येथे स्थायिक झाले होते. वडील परिसरातील मुधोळ, लोकापूर येथे फिरून सुतारकी करायचे. गरीबीमुळे तिसरीनंतर इब्राहिम यांना शिक्षण सोडावे लागले. विशेष म्हणजे त्यांचे शिक्षण उर्दूत झाले होते. नियमित शाळेत जाणाऱ्या आपल्या मित्रांकडून ते कन्नड लिहिणे, वाचणे शिकले. त्यांचा पिढीजात व्यवसाय सुतारकीचा असला तरी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी  विणकाम स्वीकारले. कारण तेथील बहुतांश लोकांचा हा व्यवसाय होता. बालपणापासून ते मशिदीत जाऊन नमाज, कुराण पठण करायचे.  इतर धर्म, तत्त्वज्ञान, त्यातील मुक्तीचा मार्ग याविषयी बालपणापासूनच त्यांना कुतुहल होते. गावातील भजन संघामुळे त्यांच्या या सुप्त भावाला बळ मिळाले. या धार्मिक मंडळींच्या सान्निध्यात त्यांनी भजन, तत्त्वपदे, वचनांचा अभ्यास केला. वेद, उपनिषदे समजून घेतली. रमजान महिन्यात गावोगावी जाऊन पद्य गायन करत जीवनानुभव घेतलेले इब्राहिम महालिंगपुरात लिंगैक्य श्री बसवानंद स्वामी यांच्या पुण्याराधने निमित्त दरवर्षी सकाळी, सायंकाळी चालणारे निरुपण ऐकायचे. तेथील धार्मिक चिंतन, प्रवचनाने त्यांच्यातील आध्यात्मिक जाणीवा विस्तारण्यास पूरक ठरल्याचे ते सांगतात. देव, धर्म, आराधनेच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सत्य एकच असल्याची जाणीव झाली.  सोबतच निजगुण तत्त्वपदे, श्री सहजानंद, शंभूलिंग, सिद्धप्पा, विद्यानंद स्वामी आदी विद्वानांचे शास्त्र, भगवद्गीतेच्या अध्ययनाने भवविषयक जाणीवा विस्तारल्याचेही त्यांनी म्हटले. ही संत मंडळी कन्नडमध्ये सुलभरीत्या प्रवचन करायचे. ते सूचवलेल्या ग्रंथांचा इब्राहिम आपल्या मित्रांच्या साह्याने अध्ययन करायचे.
१९७० मध्ये सुतार यांनी समविचारी मित्रांसह भावैक्य जनपद संगीत मेळा सुरू केला. त्या माध्यमातून भजन, तत्त्वपदांच्या गायनाद्वारे धार्मिक, आध्यात्मिक चिंतन जनसामान्यांपर्यंत पोहोचवू लागले. ते सुलभपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रश्नोत्तरासह तत्त्वपद गायनाची परंपरा सुरू केली. त्यापूर्वी केवळ तत्त्वपदे गायिली जायची. निजगुण शिवयोगी यांची कठीण तत्त्वपदे सर्वसामान्यांना समजणार नाहीत, ते सोपे करुन सांगण्याची गरज  मल्लप्पा शिरोळ यांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रश्नोत्तरासह गायनाची रचना केली. तेव्हापासून ते  वर्षभरात भजन, प्रवचन, संवादाचे १०० कार्यक्रम करत आले आहेत. आज ७८ व्या वर्षीही समाजमनात एकात्म भाव रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे.  आजतगायत कर्नाटकाबाहेर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, राजस्थान, ओरिसा,  दिल्ली येथेही त्यांनी कन्नड, हिंदी भाषेत प्रवचन केले आहे. दरम्यान, त्यांनी सुमारे २० वर्षे हातमाग, यंत्रमागावर काम केले. भजन, पवचनामुळे त्यांना अनेकदा यंत्रमागावर कामाला जाता येत नव्हते. ज्यांच्याकडे ते कामाला होते, त्यांची अडचण व्हायची. त्यामुळे त्यांनी कोणतेतरी एक काम निवडण्याची विनंती केली. त्यांनी विचारपूर्वक यंत्रमागावरील काम सोडून पूर्णवेळ भजन, प्रवचन करण्याचा निर्धार केला. ईश्वर हाच आपला भरणपोषण करतो. भगवंताने भगद्गीतेत योगक्षेमं वहाम्यम् असे सांगितले आहे. त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे इब्राहिम सांगतात. त्यानंतर भजन, प्रवचनासाठी मिळणाऱ्या ठरावीक रकमेवर त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. सुरुवातीला मागावर काम आणि भजन, प्रवचन यामुळे आर्थिक अडचण नव्हती. मात्र, काम सोडल्याने अडचणींचा समाना करावा लागला. त्यांच्या पत्नी मरियमबी यांनी त्यांना साथ दिली. विशेष म्हणजे त्यांचा बालविवाह झाला होता. मात्र,  आपला पती सन्मार्गावर असल्याचा त्यांना विश्वास होता.  नंतर भजन, प्रवचनाचे कार्यक्रम वाढल्याने आर्थिक अडचणही दूर झाली. त्यावरच त्यांनी एका मुलाचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा मुलगा आणि सून हे शिक्षक आहेत.
इतर धर्मांचा सन्मान हीच एकात्मता
आपला धर्म, मते नीटपणे समजून घेऊन आपल्या जीवनात  ते चांगल्याप्रकारे आचरणात आणणे,  इतरांच्या धर्म, मतांचे अत्यंत प्रामाणिकपणे सन्मान करणे म्हणजे एकात्मता होय, असे इब्राहिम सुतार यांनी सांगितले. आपला धर्म जितका सत्य आहे,  इतरांचा धर्मही तितकाच सत्य आहे या भावाने प्रेमपूर्वक स्वीकारणे. तसेच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच्या आराधनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आराध्य म्हणजेच ईश्वर एकच आहे. जसे आपल्या मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचणे शक्य आहे अगदी तसेच इतरांच्या मार्गानेही ईश्वराचा साक्षात्कार होणे शक्य आहे, हे स्वीकारुन त्या मार्गांचा प्रेमपूर्वक स्वीकार, त्यांचा गौरव हेच एकात्मता  होय. सर्व धर्मांच्या अध्ययनामुळे माझ्यातील हा भाव अधिक घट्ट झाला. तसेच धर्मांतरणही अयोग्य आहे. स्वधर्माविषयी निष्ठा, परधर्माविषयी सहिष्णुता हवी. एकात्मतेविषयी सांगताना  बसवण्णा, भगवान रामकृष्ण, स्वामी विवेकानंद सुफी संतांच्या वचनांचा, वेद, उपनिषदांतील ऋचांचा उल्लेख करत ते  म्हणाले, एकता से बढकर कोई इबादत नहीं, लडने की वेद, कुरान में नसीहत नहीं, हर इन्सान बंधू हमारा, संतोंने यही पुकारा. देव, धर्मावरुन कलह अर्थहीन आहे. सर्व धर्म माणसाच्या उन्नतीसाठी आहेत. लोकांनी धर्म, ईश्वरविषयक सत्य जाणून घ्यावे, असे सांगणारे इब्राहिम सुतार यांच्या निवासस्थानाचे नावही भावैक्य (एकता) आहे. एकात्मता हेच राष्ट्रीय धर्म अन् भारतीय हीच आमची संस्कृती आणि घटनाच राष्ट्रीय ग्रंथ  हा त्यांचा विचार आहे. प्रवचनानिमित्त स्वामी सहजानंद आणि त्यांनी  एकत्र राहिल्याचा उल्लेखही सुतार करतात.  आम्ही दोघेही एकाच खोलीत आपापल्या धर्माची साधना केल्याचे सांगतात. 
रामकृष्ण, शारदामाता, विवेकानंद हे दिव्यत्रय
श्री रामकृष्ण परमहंस यांच्यासारखा सर्वधर्म समन्वयभावी आचार्य झाला नाही. अनेकजण सामाजिक एकतेविषयी बोलतात. सर्व धर्म एकच म्हणतात. मात्र, रामकृष्ण यांनी सर्व धर्मांचे आचरण केले. रामकृष्ण म्हणतात, मी कोणत्याही धर्मानुसार साधना केलो तरी मला एकाच सत्याचे दर्शन झाले. त्यामुळे देश, कालानुसार नाना मते जन्माला आली. सर्व मते पथ आहेत. मत हेच ईश्वर नाही. हे मत प्रायोगिकरीत्या सांगितलेले रामकृष्ण हे एकमेव संत होत. रामकृष्णांनी सांगितलेल्या मार्गावर विवेकानदं चालले. त्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला. त्यांना रामकृष्णांसारखा गुरू मिळाला, हे त्यांचे सौभाग्य होय.  ते चिकित्सक बुद्धीचे, प्रकांड पंडित होते. मात्र, त्यांना रामकृष्ण, शारदामाता यांच्या ठायी ब्रह्मानुभूती मिळाली. त्यांचा शारदा माता यांच्यावरही खूप प्रेम होते. श्री रामकृष्ण, शारदामाता आणि विवेकानंद हे दिव्यत्रय होत. कर्नाटकातल्या अनेक ठिकाणच्या रामकृष्ण आश्रमांत प्रवचन करण्याचा योग आला. त्यामुळे रामकृष्ण, विवेकानंद यांच्या विचारांशी संपर्क आल्याचे सुतार यांनी सांगितले.
धार्मिक कट्टरतावाद हे आव्हान
सध्या समाजासमोर धार्मिक कट्टरतावाद, जातिवाद, स्वार्थ भावना ही आव्हाने आहेत. या तिन्हींचा देशाला मोठा धोका आहे.  माझाच धर्म सर्वश्रेष्ठ ही भावना, जातिवाद संपायला हवे. जाती ह्या ईश्वरनिर्मित नव्हे तर मानवनिर्मित आहेत. समाजाचा व्यवहार चालवण्यासाठी हे सर्व हवे. मात्र,  श्रेष्ठ, कनिष्ठतेची भावना संपायला हवी. कोणताही व्यवसाय श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. बसवेश्वर म्हणतात, ............................................ आपण कोणत्याही देशात असलो तरी एकाच कुटुंबातले आहोत. सर्व धर्मग्रंथांतही हेच सांगितले आहे. यासाठी सुतार यांनी वेदांतील मनू, शतरुपा, कुराणमधील आदम, इव्ह यांचे उदाहरण दिले. तसेच धर्म हे व्यक्तिगत आहे. मात्र, माझाच धर्म श्रेष्ठ या अट्टाहासातून ते कोणावरही लादू नये, असे त्यांनी म्हटले. धार्मिक कट्टरतावाद हा धर्मवाद नाही. धर्माचे आचरण करणारा मनुष्य विश्वप्रेमी बनेल, कट्टरतावादी नव्हे, असे त्यांचे मत आहे. आपण वर्तमानात जगण्याची गरज आहे. मानवी कल्याणासाठी ते आवश्यक आहे. समाजविरोधी व्यक्ती आणि विचारांचे सामुदायिकरीत्या उदात्तीकरण करणेही अयोग्य असल्याचे ते सांगतात.
प्रश्न, मात्र प्रबल विरोध नाही.
मी मुस्लिम असूनही भजन, प्रवचन करत असल्याने समाजातून प्रश्न विचारले गेले. मात्र, प्रबल विरोध झाला नाही. त्यांना मी प्रवचन ऐकण्यास सांगायचो. त्यात मी सुलभरीत्या एकतेविषयी सांगायचो. तसेच उत्तर कर्नाटकात शिवशरण, सुफी संतांचा प्रभाव आहे. मंगळुरूसारखा धार्मिक कट्टरतावाद येथे नाही.  लोकसंख्या आणि आर्थिकृष्ट्या मुस्लिम प्रबल असलेल्या विजापूरजवळील एका खेड्यात भजनसाठी गेलो होतो. मशिदीसमोरच कार्यक्रम होता. कर्णेही मशिदीकडे खांबाला बांधले होते. त्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी होती. मी नमाज पठणासाठी मशिदीत गेलो. तेथील काही लोकांनी मला गराडाच घातला. त्यांनी विचारले, तुम्ही मुस्लिम असूनही भजन करता, हे धर्मविरोधी आहे. नमाजानंतर बोलू, असे त्यांना सांगितलो. त्यानंतर पुन्हा त्यांनी तोच प्रश्न विचारला, त्यावर मी का करू, नये, असा प्रतिप्रश्न केला. त्यांनी म्हटले, गाणे, वाद्य वाजवणे, नृत्य करणे हे इस्लाममध्ये निषिद्ध आहे. त्यावर पुन्हा हे का निषिद्ध आहे, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर ते चिडले. निषिद्ध म्हणजे निषिद्ध, विचारायचे नाही, असे त्यांनी म्हटले. ज्या गाण्यात ईश्वराचे गुणगान नाही, ज्यात ऐकणाऱ्यांचे मन मलीन करणारे शब्द असतात, ज्या गाण्यात स्त्रीपुरुषांचे मन कलुषित करणारे शब्द असतात, अशी गाणी गाणे निषिद्ध आहे. जर त्यातच ईश्वराचे गुणगान, धर्माचा उपदेश असल्यास कसे निषिध्द होईल?  ती साधना बनेल. सुफी संतांनी, मुस्लिमांनी कव्वाली म्हटले नाही का ? हब्द म्हटले ना ? का निषिद्ध हे महत्वाचे. मी असे गात नाही. आपण भजन ऐका. सकाळी आपण चर्चा करू, असे सांगितलो. त्यांनी रात्रभर भजन ऐकले. पहाटे ते नमाजाला गेले. आम्हीही मंगलारती केली. मी ते पुन्हा मला सोडणार नाहीत म्हणून माझ्या निवासाच्या खोलीत नमाज पठण केले. ती मंडळी शोधत आली. मीही विचलित झालो. मात्र, त्यांनी मी करत असलेले कार्य चांगले असल्याचे उद्गार काढले. त्या परिसरात मी भजनासाठी गेल्यास ती मंडळी आवर्जून ऐकायला यायची. दरम्यान, माझ्या महालिंगपूर गावातील मंडळीही मला सतत याविषयी विचारायचे. मी त्यांनाही भजन, प्रवचन ऐकायला सांगतो. तसेच या जगातील कोणालाही कोणताही धर्म समजून घेण्याची आणि आचरण्याचे स्वातंत्र्य असल्याचेही इब्राहिम म्हणतात. 
तलाकचा चुकीचा अर्थ, वेशभूषेतून वेगळी ओळख 
कुराण, हदीसमध्ये तिहेरी तलाकचा उल्लेख आहे. मात्र, त्याचा चुकीला अर्थ लावला जात आहे. एकाचवेळेस तीनवेळा तलाक म्हटले की विषय संपला,  असा त्याचा अर्थ नाही. एकदा तलाक म्हटल्यावर पत्नीला सुधारण्यासाठी विशिष्ट कालावधी द्यावयाचा आहे. त्यात सुधारणा न झाल्यास पुढील तलाक म्हणावयाचे आहे. चुका केलेल्यांना पश्चात्ताप करण्याची संधी द्यायला हवी. अनिवार्य झाल्यास अशाप्रकारे  तलाक द्यावा, असे महमद पैगंबरांनी सांगितले आहे. तसेच तलाकसारखे महापाप दुसरे नाही, असे खुद्द पैगंबरांनीच म्हटल्याचा सुतार यांनी उल्लेख केला. धर्माचा दुरुपयोग सुरू आहे. याचा विद्वानांनी विरोध करायला हवा. इस्लाममध्ये स्त्रियांना गौरवाचे स्थान आहे. तिला कुराण पठण, नमाज, प्रवचनाचा अधिकार आहे. स्त्रियांकडे पाहणाऱ्याच्या मनात विकार निर्माण होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. स्त्रियांच्या शोषणाचा नव्हे, हे समजून घ्यायला हवे. तसेच यातून वेगळी ओळख जपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सुतार म्हणतात. आहार, वेषभूषेचे स्वातंत्र्य असले तरी आपण 'अनेकत्वात एकत्व' पाहणारे आहोत, हे विसरू नये.
शब्दांना कृतीची जोड, प्रेरक सेवाकार्य  
श्री इब्राहिम सुतार यांनी प्रवचन, भजनच्या माध्यमातून जनमानस घडवतानाच सेवाकार्याच्या माध्यमातून त्याला कृतीची जोड दिली. श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे गुरू मल्लिकार्जुन स्वामी यांच्याकडून सेवाकार्याची प्रेरणा मिळाल्याचा गौरवपूर्वक उल्लेख ते करतात. सेवाकार्याकडे ते कसे वळले, याची कहाणीही मनाला गहिवरुन टाकणारी आहे. सुतार सांगतात, महिनाभराच्या प्रवचनाच्या काळात  त्या गावासाठी आवश्यक बाबी शोधून लोकवर्गणीतून त्यांची पूर्तता करण्याचा निश्चय केला. शेगुणशी येथे प्रवचन करताना सकाळी फिरायला निघालो होतो. एका घरात दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तेथे रडारड सुरू होती. विचारणा केल्यावर उलटी झाल्याने काल मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पुढच्या आठ दिवसांत त्याच महिलेच्या दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. विचारणा केल्यावर पुन्हा उलटी झाल्यानेच या मुलाचाही मृत्यू झाल्याचे समजले. केवळ उलटी झाल्याने दोन मुलांचा मृत्यू झाला, मग दवाखान्याला नेले नाही का, याची विचारणा केली. त्यावर ती महिला म्हणाली, गावात दवाखाना नाही. त्यासाठी तेरदाळला जावे लागते. मात्र, श्रावण महिन्यातील पावसामुळे रस्ता नाही. बैलगाडीत जावे तर १०० रुपये भाडे देणे शक्य नाही. त्यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ते ऐकून मन हेलावले. आम्ही गावातील प्रमुख मंडळींना एकत्र आणले. सुरुवातीला राजकीय मतभेदांमुळे ते एकत्र येण्यास तयार नव्हते. त्यांना विचारले, आठ दिवसांत एकाच आईच्या दोन लेकरांचा मृत्यू झाला. दवाखान्याला नेण्यासाठी चांगला रस्ता नाही, हे त्याचे कारण आहे. आपण श्रीमंत आहात, आपण जीप, ट्रॅक्टर, बैलगाडीत येजा करता. झोपडीत राहणारे, मोलमजुरी करणारे, ज्यांच्याकडे बैलगाडीसाठी भाडे द्यायला पैसे नाहीत अशांनी काय करायचे ? आपल्या घरात अशा दोन मुलांचा मृत्यू झाला असता तर आपल्याला काय वाटले असते? किमान रस्ता असल्यास ते चालत तरी जाऊ शकले असते. तुम्हा श्रीमंतांना त्याची कल्पनाही नसावी? त्यामुळे आम्ही रस्त्यासाठी उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. आपण शासकीय स्तरावर प्रयत्न करा. आम्ही आंदोलन सांभाळू, असे त्यांना सांगितले. आपण न ऐकल्यास भजन करत आपल्याच घरांसमोर उपोषणाला बसू, असा इशारा दिला. त्यावर त्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली. आता ऐनवेळी सरकारकडून रस्ता मिळणार नाही. त्यामुळे आधी आपण रस्त्यावरील अतिक्रमण हटवून कच्चा रस्ता बनवू, असा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार रस्त्याचे काम झाले. मी त्यासाठी सहा महिने तेथेच मुक्काम ठोकला. बससेवा सुरू झाल्यानंतरच मी घरी परतलो. सुतार यांनी  ढवळेश्वर येथे स्वामी विवेकानंद प्रशाला सुरु केली. अरळीमट्टी येथे भाविकांसाठी यात्री निवास, सोन्न येथे कल्याण मंडप, महालिंगपुरात पाण्याच्या टाकीची उभारणी केली. सौंदत्तीसह कर्नाटकातल्या गावोगावी जाऊन देवदासी निर्मूलनाचे कार्य केले. कोणी शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या निधीसंकलनासाठी विचारणा केल्यास मोफत भजन, प्रवचनाचे कार्यक्रम करतात. त्यांनी लेखन केले नसले तरी तत्त्वपदांच्या संग्रहाचे कार्य केले आहे.
इतक्या मोठ्या सन्मानाची कल्पना केली नव्हती
मला प्रवचन, भजनाची संधी दिलेल्या जनांना पद्मश्री सन्मान समर्पित करत असल्याचे इब्राहिम सुतार यांनी विनम्रपूर्वक सांगितले. पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. यापुढेही इतक्याच निष्ठेनेच हे कार्य करावे लागणार आहे. मात्र, माझ्यासारख्या सामान्य माणसाला इतका मोठा सन्मान मिळेल, याची कधीही कल्पना केली नव्हती. हा सन्मान मिळाल्याने कुटुंबियांसह मित्रमंडळी, ग्रामस्थ आणि कर्नाटकातल्या जनमानसाला आनंद झाला आहे. केंद्र सरकारने माझ्यासारख्याचा कशाप्रकारे शोध घेतला माहीत नाही. मात्र, त्यामुळे आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे इब्राहिम सुतार यांनी सांगितले.
एकता आश्रमाची स्थापना करणार
येत्या काळात गावात एकता (भावैक्य) आश्रमाची स्थापना करणार असल्याचे सुतार यांनी सांगितले. या आश्रमात सर्वधर्म अध्ययन पीठ स्थापणार आहे. सर्वधर्म जाणून घेण्याची आसक्ती असलेल्यांना यात प्रवेश असेल. एकदोन वर्षात त्यांना सर्व धर्मांचे तत्त्वज्ञान आणि सर्व धर्मांचा संदेश एकच आहे, हे समजावून सांगता येईल, अशी त्याची रचना आहे. अशाप्रकारे वानप्रस्थी जीवन जगत हे शरीर त्यागणाचा विचार इब्राहिम सुतार यांनी बोलून दाखवला.

No comments:

Post a Comment

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...