Wednesday, 14 March 2018

ते परतले...कारण त्यांना केरळ वाचायला हवा होता



केरळमधील दक्षिण टोकापासून उत्तरेच्या कासरगोडपर्यंतच्या घराघरांत परमेश्वरनजींचे नाव घेतले जाते. याचे कारण त्यांची वैचारिक शक्ती आणि त्यांचे जीवन होय. स्वत:चे असे काही नाही. किमान घरही नसलेला तो माणूस काही वर्षांतच केरळचे स्वरुप बदलून उत्तर भारताकडे वळला. त्या व्यक्तिच्या वैचारिक प्रभावामुळे कम्युनिस्ट आपली गृहदेवता मार्क्सला सोडून स्वामी विवेकानंदांचा फोटो ठेवून कार्यकम करू लागले! पी. परमेश्वरनजी म्हणजे एक ग्रंथालय. मूल्यांचा समूच्चय. भारतीय तत्त्वांचा खजिना होय. त्यांच्या कार्याची यादी केल्यास त्याचेच एक खंड बनेल. गेल्या सहा दशकांपासून त्यांचे जीवन केवळ समाज, धर्म आणि भारतमातेसाठी समर्पित आहे. त्यांचे जीवन हे समाज परिवर्तनासाठीचे एक आदर्श उदाहरण होय.
आता मी शिकवलेले पुरे म्हणून एक गुरू आपल्या शिष्याला बोलावून परीक्षा घेतो. त्याला कठीण लक्ष्य साधण्याची सूचना देतो. शिष्य अनुकूल जागी उभा राहून लक्ष्यावर बाण सोडतो. लक्ष्यभेद होते. शिष्य आनंदित होतो. मात्र, गुरू कौतुक करत नाही. आणखी शिकवायचे राहिलेय हे समजून शिष्याला आणखी लक्ष्य दाखवतो. तसेच कधीही तुटून पडेल अशा सेतूवर उभा राहून धनुष्यबाणाने ते लक्ष्य साधायला सांगतो. तो सेतू पाहताच शिष्याच्या अंगाचा थरकाप उडतो. कारण तेथून बाण सोडणे दूरच, तेथे चढणेच कठीण होते. चढले तरी त्याचे वजनही पेलायची त्या सेतूची क्षमता नव्हती. शिष्य लक्ष्यभेदापासून मागे हटतो. लक्ष्यभेदापेक्षा त्या ठिकाणाहून बाण सोडणे हेही तितकेच महत्वाचे, आपल्या पायाखालची जमीन घट्ट असताना सर्व काही चांगले असते, याचा बोध गुरू शिष्याला करुन देतो. शिष्याचा अहंकार संपतो.
ही कथा नीतिकथा की कटुकथा हे माहीत नाही. मात्र, ही कथा ऐकतो तेव्हा केरळ आठवते. राक्षसी कम्युनिस्टांमुळे सतत प्राण गमावणाऱ्या केरळच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची आठवण होते. आश्चर्य वाटते. एकीकडे जिहादी धर्मांधांची दहशत, दुसरीकडे कम्युनिस्टांचे सत्ताप्रेरित खूनसत्र. रा. स्व. संघाची धुळधाण व्हायला पूरक वातावरण आहे. सकाळी शाखेवर गेलेल्या मुलाला तो घरी परतेल, हा विश्वास नाही. त्याला शाखेवर पाठवलेल्या कुटुंबियांनाही तो विश्वास नाही. अशात  केरळमध्ये देशात सर्वाधिक शाखा आहेत!
शतकानुशतके निरंतर मतांध आणि बाहेरील देशांतून आलेल्या व्यापाऱ्यांच्या थेट आक्रमणाला बळी पडून केरळ अजूनही केरळ म्हणूनच आहे! ही भूमी अस्तित्व आणि आपले ऐश्वर्य टिकवून आहे. कम्युनिस्टांची सत्ता असली तरी केरळात संस्कृती टिकून आहे. याला केरळमधील रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे अविश्रांत श्रम हेच कारण आहे. धनदांडग्यांच्या पायावर लोटांगण न घालणाऱ्या नि:स्वार्थ कार्यकर्त्यांची अविचल निष्ठाही यामागे आहे. धर्मासाठी प्राणही देईन, हे धैर्य यामागे आहे. मल्याळींच्या या गुणानेच केरळला वाचवले आणि घडवले आहे. ते गुणच आजच्या प्रतिकूल परिस्थितीतही राज्याचे वैभव सुरक्षित राखले आहे.
काही व्यक्तिंनी अशा गुणवान स्वयंसेवकांना घडवले. संघर्षाच्या वातावरणात फक्त प्रतिकार आणि हिंसाच जन्म घेते. तसेच ते कोणाच्याही प्रेरणेविना जन्मतात, हे केरळच्या रा. स्व. संघाच्या नेत्यांनी ओळखले होते. प्रतिकार आणि हिंसा संघटनेला बळ देईल, परंतु केरळची जडणघडण होणार नाही, हे सत्यही त्यांनी जाणले होते. त्यामुळे संघर्षाच्या वातावरणातही स्वयंसेवकांत वैचारिक जागृती घडवणारे काही महान नेते केरळमध्ये जन्मले. तसेच, योगायोगाने अशीच मंडळी केरळला आली. एकेकाळी नारायण गुरू यांनी राज्यात केलेली सामाजिक क्रांती विसरुन लोक साक्षात नारायण गुरू यांनाच सोन्याच्या चौरंगावर बसवून पूजा करत होते. तेव्हाच लोकांनी नारायण गुरू यांच्या विचारांना तिलांजली दिली होती. त्याच वेळेस कम्युनिस्ट नावाचे भयंकर हलाहल राज्याला संपवू पाहात होती. त्या काळात नारायण गुरुंच्या विचारांचे रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी पुनरुज्जीवन केले. त्याच वेळेस महाराष्ट्रातून गेलेले पी. माधवजी नावाच्या रा. स्व. संघाच्या एका समर्पित कार्यकर्त्याने नारायण गुरू यांच्या विचारांवर आधारित तंत्र विद्यापीठाची स्थापना केली. त्या माध्यमातून शुद्र मानले गेलेल्यांनाही पुरोहित म्हणून नेमण्याचे कार्य सुरू केले. साहजिकच कम्युनिस्टांनी याला विरोध केला. त्यांच्यासह नारायण गुरुंना जातीच्या चौकटीत बांधून ठेवलेल्या लोकांनीही विनाकारण माधवजींच्या धोरणाला विरोध सुरू केला!
एम. ए. कृष्णन हे आणखी एक प्रचारक. यांच्या परिश्रमामुळे आज केरळमध्ये श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील मुलांचे दरवर्षी सुमारे तीन हजार मिरवणुका निघतात. या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन पुढे बालगोकुलम् नावाची चळवळ सुरू झाली. या बालगोकुलमची लोकप्रियता इतकी आहे की त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील मुलेही सहभागी होतात. त्यामुळे चवताळलेल्या कम्युनिस्टांनी बालसंगमम् सुरू केले! केरळमध्ये रा. स्व. संघ समाजाच्या जवळ आहे. कम्युनिस्ट सत्ता हाकत असले तरी समाजापासून दूर आहेत. संघर्षाच्या वातावरणातही रा. स्व. संघाने आपली न विसरलेली वैचारिक शक्ती हे यामागचे कारण आहे.
केरळमध्ये अशा प्रकारचे वैचारिक नविनर्माण केलेली आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे पी. परमेश्वरनजी होय. पी. परमेश्वरनजी यांच्यामुळेच केरळमध्ये काही सामाजिक बदल झाले. केरळमधल्या विचित्र सामाजिक वातावरणात रा. स्व. संघाला तीव्र विरोध होता. अस्तित्व टिकवणे हेच मुख्य असतानाच्या काळात सामाजिक चिंतक म्हणून समस्त केरळचे सत्व पुनरुज्जिवित केलेले महात्मा म्हणजे पी. परमेश्वरनजी. हे केवळ रा. स्व. संघालाच नव्हे तर समस्त केरळसाठी वाळवंटात सापडलेल्या झऱ्यासारखे आहेत. ते नवी आशा आहेत. कारण पी. परमेश्वरन रा. स्व. संघाचे प्रचारक असले तरी केरळचे प्रसिद्ध चिंतक म्हणूनच नावाजलेले आहेत.
केरळमध्ये ते लिहित नसलेली वृत्तपत्रे नाहीत. त्यांना संधी न देणाऱ्या दूरचित्रवाहिन्याच नाहीत. त्यांचा सन्मान न करणारा कम्युनिस्टही नाही. असा चिंतक रा. स्व. संघ वगळता अन्य कोणत्या संघटनेत सापडेल? केरळमधील दक्षिण टोकापासून उत्तरेच्या कासरगोडपर्यंतच्या घराघरांत परमेश्वरनजींचे नाव घेतले जाते. याचे कारण त्यांची वैचारिक शक्ती आणि त्यांचे जीवन होय. स्वत:चे असे काही नाही. किमान घरही नसलेला तो माणूस काही वर्षांतच केरळचे स्वरुप बदलून उत्तर भारताकडे वळला. त्या व्यक्तिच्या वैचारिक प्रभावामुळे कम्युनिस्ट आपली गृहदेवता मार्क्सला सोडून स्वामी विवेकानंदांचा फोटो ठेवून कार्यकम करू लागले! पी. परमेश्वरनजी म्हणजे एक ग्रंथालय. मूल्यांचा समूच्चय. भारतीय तत्त्वांचा खजिना होय. त्यांच्या कार्याची यादी केल्यास त्याचेच एक खंड बनेल. गेल्या सहा दशकांपासून त्यांचे जीवन केवळ समाज, धर्म आणि भारतमातेसाठी समर्पित आहे. त्यांचे जीवन हे समाज परिवर्तनासाठीचे एक आदर्श उदाहरण होय.
केरळमध्ये कर्कटकं मास म्हणजे धो धो कोसळणारा पाऊस. फेसाळत येणारा समुद्र. किनाऱ्यावरील वादळ. या महिन्यात शुभ समारंभ नाहीत. आतापर्यंत न दिसणारे आजार कर्कटकं महिन्याचीच वाट पाहत होते का, असे वाटावे अशा प्रकारे पसरतात. रोग्यांना जास्तीत जास्त मरणाचे भय वाटते. जेथे तेथे भूस्खलन, दरड कोसळणे, आजार, मृत्यू, हातांना काम नाही, सर्वत्र अपशकुन. सोबतच सूर्यदर्शन नाही. एकूणच मल्याळींच्या वाट्याला कर्कटकं मास म्हणजे अशुभ मास. हजारो वर्षांपासून त्यांच्यात रुजलेली ही भावना काळानुसार परंपराच बनून गेली. काही गोष्टींचे आचरण करायचे नाही, हे नियम बनले होते. शुभ समारंभ करायचे नाहीत. कर्कटकं मासात नव्या कार्याची सुरुवात करायला मल्याळी घाबरत होते. केरळमध्ये झालेल्या कोणत्याही सुधारकाला हे अशुभ मास शुभ मासात परिवर्तित करणे साध्य झाले नाही. कम्युनिस्ट वर्षानुवर्षे सत्तेत राहिले तरी त्यांनी अशुभ मासाला आणखी अशुभ बनवून ठेवले. विचित्र गोष्ट म्हणजे कालौघात कर्कटकं मासाला आणखी नवीन वाईट गोष्टी चिकटल्या. काही देवस्थानांमध्ये काही पूजाही करायच्या नाहीत, हे नियमही त्यात शिरले.
मात्र गेल्या काही वर्षांपासून कर्कटकं मासाविषयी असलेली ती भावना बदलली आहे. अशुभ म्हणून ओळखला जाणारा कर्कटकं मास आतता केरळमध्ये रामायण मास बनला आहे. केरळातील प्रत्येक हिंदू घरात, प्रत्येक लहान आणि मोठ्या देवस्थानांमध्ये संपूर्ण महिनाभर रामायण पठण चालते. महिन्याच्या शेवटी पठण संपते. काही संघ, संस्था सामुदायिक रामायण पठण आयोजित करतात. रामायण पठणमुळे यापूर्वी लोकांच्या मनात घर केलेले अशुभ असे सर्व नियम गायब झाले आहेत. दिनदर्शिकेतही कर्कटकं मास रामायण मास म्हणून छापले जात आहे. या बदलाच्या मागे हाेते पी. परमेश्वरनजी.
भारतीय विचार केंद्राचे संचालक म्हणून केरळचे वैचारिक विश्व समृद्ध करण्यासाठी परमेश्वरनजींनी पुढाकार घेतला. भारतीय विचार केंद्र आज केरळच्या वैचारिक आणि संशोधन क्षेत्राची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. जाती आणि इतर संकुचित भिंतींच्या पलिकडे जाऊन दरवर्षी विचार केंद्रात हजारो युवक इतिहास, तत्त्वशास्त्र, अर्थशास्त्र, राजकीय, शिक्षण, पर्यावरण, विकास आणि सामाजिक परिस्थिती याविषयी अध्ययन करतात. केरळमध्ये विचार केंद्राच्या ३० शाखा आहेत. विचार केंद्र केवळ भारतीयता प्रसाराचे कार्य करते. प्रामाणिक धर्मनिरपेक्ष संस्कृती नष्ट करत नाही, जी हिंदुत्वासारख्या खऱ्या धर्मनिरपेक्षतेला पोषक आहे. त्यामुळे ते संस्कृतीपूजक आहे, हे सत्य अनेक कम्युनिस्ट विचारवंतांमध्ये निर्माण करण्यात विचार केंद्र यशस्वी झाले आहे. मार्क्स आणि विवेकानंद, मार्क्स ते महर्षी, हिंदू राष्ट्राची हृदयस्पंदने यासह १२ पुस्तके लिहिलेल्या परमेश्वरनजी यांची सर्व पुस्तके केरळच्या वैचारिक जगतात चर्चेचे विषय ठरले आहेत. मात्र, कोणतेही पुस्तक विवादास्पद ठरले नाही. कारण परमेश्वरनजी यांच्या विचारांचा कस लावणारे कम्युनिस्ट अजून जन्माला आले नाहीत.
गेल्या १५ वर्षांपासून विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष असलेले परमेश्वरनजी केंद्राला राष्ट्राची बांधणी करणारे अस्त्र बनवले. केरळ आणि तमिळनाडूमध्ये विवेकानंद केंद्राच्या उपक्रमांमुळे धर्मांतराचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात घटले. इतकेच नव्हे, चर्चला जाणारे अनेक लोक आता रविवारी विवेकानंद केंद्रात जाऊ लागले आहेत. ईशान्येतील अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, अंदमानातही विवेकानंद केंद्र शाळा, बालवाड्या, वनवासी क्षेत्रात आनंदालये चालवत आहे.
१९२७ मध्ये जन्मलेले परमेश्वरनजी इतिहासाचे पदवीधर आहेत. १९५७ मध्ये भारतीय जनसंघाचे कार्य सुरू केले. १९६८ मध्ये केरळ राज्य संघटना सचिव होते. पुढे अखिल भारतीय सचिव बनले. जनसंघाचे अध्यक्षही झाले. आणिबाणीनंतर राजकारणापासून विन्मुख होऊन जन्मभूमी केरळला परतले. कारण पुन्हा कोणी केरळला वेड्यांचा बाजार म्हणणे परमेश्वरनजी यांना आवडणारे नव्हते. कम्युनिस्ट रक्तपात करत असलेल्या या भूमीत करण्यासाठी अनेक कार्ये बाकी होती. त्याची फलश्रुती म्हणजे आजचे केरळ होय. आजही केरळने आपले स्वत्व टिकवून ठेवावे यासाठी परमेश्वरनजी हे केरळला परतायलाच हवे होते.
अशा परमेश्वरनजी यांचे वय आज ९० वर्षे आहे. केरळच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रिय परमेश्वरनजी यांच्या नवती उत्सवाचे आयोजन केले. उत्सव वर्षभर चालणार आहे. हा मोठा सन्मान आहे. केरळचे स्वयंसेवक शिष्टाचाराबाहेर जाऊन हा उत्सव करत आहेत, हे त्या व्यक्तीचे महत्व स्पष्ट करते. ते प्रेम, गौरव मोडक्या सेतूवर उभे राहून लक्ष्य साधण्यासाठी बाण सोडलेल्या परमेश्वरनजी यांना नव्हे तर मग आणखी कोणाला लाभणार?
संतोष तम्मय्या
साभार : होस दिगंत
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

आधुनिक कबीर ; इब्राहिम सुतार


वादग्रस्त व्यक्तींना देशाच्या जनमानसांत रुजवण्याचा प्रयत्न भारतात पूर्वीपासून निरंतर चालला आहे.  मात्र, गेल्या काही वर्षांत ते अधिक जोरकसपणे सुरू असल्याचे विशेषत: कर्नाटकसह देशभरातल्या काही घटनांवरुन अधिक प्रकर्षाने समोर आले आहे. स्वातंत्र्यानंतर समाजातील श्रेष्ठ अशा समन्वयभावी विचारांच्या व्यक्ती, सर्वांच्या भावनांचा आदर राखत सामरस्याचे अग्रणी बनलेल्या मेरुपुरुषांना पुढे आणून त्यांच्या आदर्श जीवनाची ओळख करुन देण्याचे काम या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षाने अथवा डाव्या, तथाकथित पुरोगामी विचारवंत, बुद्धीजीवींनी केले नाही. त्याउलट सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील हे बुद्धिजीवी खोटेच सत्य भासवण्याच्या प्रयत्नात सफल झाले आहेत. त्यांच्या विचारानुसार देशभक्त खलनायक तर खलनायक देशभक्त आहेत. मात्र, कबीर, शिशुनाळ शरीफ यांच्यासारख्या संतश्रेष्ठ, एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ, म्हैसूरचे दिवाण सर मिर्जा इस्माईल यांच्यासारखे समाजसेवी यांची समाजाला आणखी ओळख व्हावी, त्यांचे सामरस्यपूर्ण आणि हिंदू - मुस्लिम - ख्रिश्चन हे सर्व एकच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपूर्व संधी गमावल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही जाती, मतांच्या नावाखाली भांडणे सुरुच आहेत. माझाच धर्म खरा, हा अट्टाहास समरस समाजजीवनाचा गळा घोटत आहे. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधुनिक कबीर म्हणून ओळखले जाणारे प्रवचनकार इब्राहिम सुतार यांना जाहीर केलेला पद्मश्री सन्मान हा समरस समाजमनासाठी आशादायक आहे.  कारण सामाजिक एकतेसाठी त्यांनी दिलेले योगदान अपूर्व आहे.  ते इस्लामी विचारधारेत वाढले असले तरी त्यांनी आपली जीवनदृष्टी विशाल बनवल्याने मुस्लिमेतरांतही ते आदरणीय आहेत. त्यांच्याकडे समाज धार्मिक नजरेने पाहत नाही. मात्र, सेक्युलरांच्या यादीत त्यांना महत्वाचे स्थान नाही. या देशातील अल्पसंख्यक समाजात आदराचे स्थान असलेलेच धर्मनिरपेक्ष असा या सेक्युलर कंपुचा अघोषित नियम आहे. धार्मिक सलोख्यासाठी अडथळा ठरणारी ही बाब आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने सुतार यांचा केलेला गौरव त्या अडथळ्यावर मात करण्यासाठी प्रेरक आहे.

वेद, उपनिषदे, शिवशरणांचे वचन साहित्य, तत्त्वपदे आणि सुफी संत परंपरेतील तत्त्वे भजन, प्रवचन आणि संवादाच्या माध्यमातून संपूर्ण कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमाभागातील जनमनांत रुजवून एकात्म समाजनिर्मितीचे कार्य इब्राहिम सुतार हे गेल्या ४८ वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. त्यांचे लौकिक शिक्षण केवळ तिसरीपर्यंत झाले आहे.  मात्र, त्यांचा जीवनानुभव हा कबीर,  शिशुनाळ शरीफ, शिवशरण आणि सुफी संतांची आध्यात्मिक धारा पुढे नेणारी आहे. प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांच्या साधनामार्गाची आठवण करुन देणारी आहे. सत्संग हेच माझ्यासाठी विश्वविद्यालय ठरल्याचे ते गौरवपूर्वक सांगतात.
१० मे १९४० रोजी महालिंगपूर (ता. मुधोळ, जि. बागलकोट) येथील नबीसाहेब बिस्ती व अमीनाबी या दांपत्यापोटी इब्राहिम यांचा जन्म झाला. मूळचे मुधोळचे असलेले बिस्ती कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी महालिंगपूर येथे स्थायिक झाले होते. वडील परिसरातील मुधोळ, लोकापूर येथे फिरून सुतारकी करायचे. गरीबीमुळे तिसरीनंतर इब्राहिम यांना शिक्षण सोडावे लागले. विशेष म्हणजे त्यांचे शिक्षण उर्दूत झाले होते. नियमित शाळेत जाणाऱ्या आपल्या मित्रांकडून ते कन्नड लिहिणे, वाचणे शिकले. त्यांचा पिढीजात व्यवसाय सुतारकीचा असला तरी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी  विणकाम स्वीकारले. कारण तेथील बहुतांश लोकांचा हा व्यवसाय होता. बालपणापासून ते मशिदीत जाऊन नमाज, कुराण पठण करायचे.  इतर धर्म, तत्त्वज्ञान, त्यातील मुक्तीचा मार्ग याविषयी बालपणापासूनच त्यांना कुतुहल होते. गावातील भजन संघामुळे त्यांच्या या सुप्त भावाला बळ मिळाले. या धार्मिक मंडळींच्या सान्निध्यात त्यांनी भजन, तत्त्वपदे, वचनांचा अभ्यास केला. वेद, उपनिषदे समजून घेतली. रमजान महिन्यात गावोगावी जाऊन पद्य गायन करत जीवनानुभव घेतलेले इब्राहिम महालिंगपुरात लिंगैक्य श्री बसवानंद स्वामी यांच्या पुण्याराधने निमित्त दरवर्षी सकाळी, सायंकाळी चालणारे निरुपण ऐकायचे. तेथील धार्मिक चिंतन, प्रवचनाने त्यांच्यातील आध्यात्मिक जाणीवा विस्तारण्यास पूरक ठरल्याचे ते सांगतात. देव, धर्म, आराधनेच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सत्य एकच असल्याची जाणीव झाली.  सोबतच निजगुण तत्त्वपदे, श्री सहजानंद, शंभूलिंग, सिद्धप्पा, विद्यानंद स्वामी आदी विद्वानांचे शास्त्र, भगवद्गीतेच्या अध्ययनाने भवविषयक जाणीवा विस्तारल्याचेही त्यांनी म्हटले. ही संत मंडळी कन्नडमध्ये सुलभरीत्या प्रवचन करायचे. ते सूचवलेल्या ग्रंथांचा इब्राहिम आपल्या मित्रांच्या साह्याने अध्ययन करायचे.
१९७० मध्ये सुतार यांनी समविचारी मित्रांसह भावैक्य जनपद संगीत मेळा सुरू केला. त्या माध्यमातून भजन, तत्त्वपदांच्या गायनाद्वारे धार्मिक, आध्यात्मिक चिंतन जनसामान्यांपर्यंत पोहोचवू लागले. ते सुलभपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रश्नोत्तरासह तत्त्वपद गायनाची परंपरा सुरू केली. त्यापूर्वी केवळ तत्त्वपदे गायिली जायची. निजगुण शिवयोगी यांची कठीण तत्त्वपदे सर्वसामान्यांना समजणार नाहीत, ते सोपे करुन सांगण्याची गरज  मल्लप्पा शिरोळ यांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रश्नोत्तरासह गायनाची रचना केली. तेव्हापासून ते  वर्षभरात भजन, प्रवचन, संवादाचे १०० कार्यक्रम करत आले आहेत. आज ७८ व्या वर्षीही समाजमनात एकात्म भाव रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे.  आजतगायत कर्नाटकाबाहेर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, राजस्थान, ओरिसा,  दिल्ली येथेही त्यांनी कन्नड, हिंदी भाषेत प्रवचन केले आहे. दरम्यान, त्यांनी सुमारे २० वर्षे हातमाग, यंत्रमागावर काम केले. भजन, पवचनामुळे त्यांना अनेकदा यंत्रमागावर कामाला जाता येत नव्हते. ज्यांच्याकडे ते कामाला होते, त्यांची अडचण व्हायची. त्यामुळे त्यांनी कोणतेतरी एक काम निवडण्याची विनंती केली. त्यांनी विचारपूर्वक यंत्रमागावरील काम सोडून पूर्णवेळ भजन, प्रवचन करण्याचा निर्धार केला. ईश्वर हाच आपला भरणपोषण करतो. भगवंताने भगद्गीतेत योगक्षेमं वहाम्यम् असे सांगितले आहे. त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे इब्राहिम सांगतात. त्यानंतर भजन, प्रवचनासाठी मिळणाऱ्या ठरावीक रकमेवर त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. सुरुवातीला मागावर काम आणि भजन, प्रवचन यामुळे आर्थिक अडचण नव्हती. मात्र, काम सोडल्याने अडचणींचा समाना करावा लागला. त्यांच्या पत्नी मरियमबी यांनी त्यांना साथ दिली. विशेष म्हणजे त्यांचा बालविवाह झाला होता. मात्र,  आपला पती सन्मार्गावर असल्याचा त्यांना विश्वास होता.  नंतर भजन, प्रवचनाचे कार्यक्रम वाढल्याने आर्थिक अडचणही दूर झाली. त्यावरच त्यांनी एका मुलाचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा मुलगा आणि सून हे शिक्षक आहेत.
इतर धर्मांचा सन्मान हीच एकात्मता
आपला धर्म, मते नीटपणे समजून घेऊन आपल्या जीवनात  ते चांगल्याप्रकारे आचरणात आणणे,  इतरांच्या धर्म, मतांचे अत्यंत प्रामाणिकपणे सन्मान करणे म्हणजे एकात्मता होय, असे इब्राहिम सुतार यांनी सांगितले. आपला धर्म जितका सत्य आहे,  इतरांचा धर्मही तितकाच सत्य आहे या भावाने प्रेमपूर्वक स्वीकारणे. तसेच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच्या आराधनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आराध्य म्हणजेच ईश्वर एकच आहे. जसे आपल्या मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचणे शक्य आहे अगदी तसेच इतरांच्या मार्गानेही ईश्वराचा साक्षात्कार होणे शक्य आहे, हे स्वीकारुन त्या मार्गांचा प्रेमपूर्वक स्वीकार, त्यांचा गौरव हेच एकात्मता  होय. सर्व धर्मांच्या अध्ययनामुळे माझ्यातील हा भाव अधिक घट्ट झाला. तसेच धर्मांतरणही अयोग्य आहे. स्वधर्माविषयी निष्ठा, परधर्माविषयी सहिष्णुता हवी. एकात्मतेविषयी सांगताना  बसवण्णा, भगवान रामकृष्ण, स्वामी विवेकानंद सुफी संतांच्या वचनांचा, वेद, उपनिषदांतील ऋचांचा उल्लेख करत ते  म्हणाले, एकता से बढकर कोई इबादत नहीं, लडने की वेद, कुरान में नसीहत नहीं, हर इन्सान बंधू हमारा, संतोंने यही पुकारा. देव, धर्मावरुन कलह अर्थहीन आहे. सर्व धर्म माणसाच्या उन्नतीसाठी आहेत. लोकांनी धर्म, ईश्वरविषयक सत्य जाणून घ्यावे, असे सांगणारे इब्राहिम सुतार यांच्या निवासस्थानाचे नावही भावैक्य (एकता) आहे. एकात्मता हेच राष्ट्रीय धर्म अन् भारतीय हीच आमची संस्कृती आणि घटनाच राष्ट्रीय ग्रंथ  हा त्यांचा विचार आहे. प्रवचनानिमित्त स्वामी सहजानंद आणि त्यांनी  एकत्र राहिल्याचा उल्लेखही सुतार करतात.  आम्ही दोघेही एकाच खोलीत आपापल्या धर्माची साधना केल्याचे सांगतात. 
रामकृष्ण, शारदामाता, विवेकानंद हे दिव्यत्रय
श्री रामकृष्ण परमहंस यांच्यासारखा सर्वधर्म समन्वयभावी आचार्य झाला नाही. अनेकजण सामाजिक एकतेविषयी बोलतात. सर्व धर्म एकच म्हणतात. मात्र, रामकृष्ण यांनी सर्व धर्मांचे आचरण केले. रामकृष्ण म्हणतात, मी कोणत्याही धर्मानुसार साधना केलो तरी मला एकाच सत्याचे दर्शन झाले. त्यामुळे देश, कालानुसार नाना मते जन्माला आली. सर्व मते पथ आहेत. मत हेच ईश्वर नाही. हे मत प्रायोगिकरीत्या सांगितलेले रामकृष्ण हे एकमेव संत होत. रामकृष्णांनी सांगितलेल्या मार्गावर विवेकानदं चालले. त्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला. त्यांना रामकृष्णांसारखा गुरू मिळाला, हे त्यांचे सौभाग्य होय.  ते चिकित्सक बुद्धीचे, प्रकांड पंडित होते. मात्र, त्यांना रामकृष्ण, शारदामाता यांच्या ठायी ब्रह्मानुभूती मिळाली. त्यांचा शारदा माता यांच्यावरही खूप प्रेम होते. श्री रामकृष्ण, शारदामाता आणि विवेकानंद हे दिव्यत्रय होत. कर्नाटकातल्या अनेक ठिकाणच्या रामकृष्ण आश्रमांत प्रवचन करण्याचा योग आला. त्यामुळे रामकृष्ण, विवेकानंद यांच्या विचारांशी संपर्क आल्याचे सुतार यांनी सांगितले.
धार्मिक कट्टरतावाद हे आव्हान
सध्या समाजासमोर धार्मिक कट्टरतावाद, जातिवाद, स्वार्थ भावना ही आव्हाने आहेत. या तिन्हींचा देशाला मोठा धोका आहे.  माझाच धर्म सर्वश्रेष्ठ ही भावना, जातिवाद संपायला हवे. जाती ह्या ईश्वरनिर्मित नव्हे तर मानवनिर्मित आहेत. समाजाचा व्यवहार चालवण्यासाठी हे सर्व हवे. मात्र,  श्रेष्ठ, कनिष्ठतेची भावना संपायला हवी. कोणताही व्यवसाय श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. बसवेश्वर म्हणतात, ............................................ आपण कोणत्याही देशात असलो तरी एकाच कुटुंबातले आहोत. सर्व धर्मग्रंथांतही हेच सांगितले आहे. यासाठी सुतार यांनी वेदांतील मनू, शतरुपा, कुराणमधील आदम, इव्ह यांचे उदाहरण दिले. तसेच धर्म हे व्यक्तिगत आहे. मात्र, माझाच धर्म श्रेष्ठ या अट्टाहासातून ते कोणावरही लादू नये, असे त्यांनी म्हटले. धार्मिक कट्टरतावाद हा धर्मवाद नाही. धर्माचे आचरण करणारा मनुष्य विश्वप्रेमी बनेल, कट्टरतावादी नव्हे, असे त्यांचे मत आहे. आपण वर्तमानात जगण्याची गरज आहे. मानवी कल्याणासाठी ते आवश्यक आहे. समाजविरोधी व्यक्ती आणि विचारांचे सामुदायिकरीत्या उदात्तीकरण करणेही अयोग्य असल्याचे ते सांगतात.
प्रश्न, मात्र प्रबल विरोध नाही.
मी मुस्लिम असूनही भजन, प्रवचन करत असल्याने समाजातून प्रश्न विचारले गेले. मात्र, प्रबल विरोध झाला नाही. त्यांना मी प्रवचन ऐकण्यास सांगायचो. त्यात मी सुलभरीत्या एकतेविषयी सांगायचो. तसेच उत्तर कर्नाटकात शिवशरण, सुफी संतांचा प्रभाव आहे. मंगळुरूसारखा धार्मिक कट्टरतावाद येथे नाही.  लोकसंख्या आणि आर्थिकृष्ट्या मुस्लिम प्रबल असलेल्या विजापूरजवळील एका खेड्यात भजनसाठी गेलो होतो. मशिदीसमोरच कार्यक्रम होता. कर्णेही मशिदीकडे खांबाला बांधले होते. त्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी होती. मी नमाज पठणासाठी मशिदीत गेलो. तेथील काही लोकांनी मला गराडाच घातला. त्यांनी विचारले, तुम्ही मुस्लिम असूनही भजन करता, हे धर्मविरोधी आहे. नमाजानंतर बोलू, असे त्यांना सांगितलो. त्यानंतर पुन्हा त्यांनी तोच प्रश्न विचारला, त्यावर मी का करू, नये, असा प्रतिप्रश्न केला. त्यांनी म्हटले, गाणे, वाद्य वाजवणे, नृत्य करणे हे इस्लाममध्ये निषिद्ध आहे. त्यावर पुन्हा हे का निषिद्ध आहे, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर ते चिडले. निषिद्ध म्हणजे निषिद्ध, विचारायचे नाही, असे त्यांनी म्हटले. ज्या गाण्यात ईश्वराचे गुणगान नाही, ज्यात ऐकणाऱ्यांचे मन मलीन करणारे शब्द असतात, ज्या गाण्यात स्त्रीपुरुषांचे मन कलुषित करणारे शब्द असतात, अशी गाणी गाणे निषिद्ध आहे. जर त्यातच ईश्वराचे गुणगान, धर्माचा उपदेश असल्यास कसे निषिध्द होईल?  ती साधना बनेल. सुफी संतांनी, मुस्लिमांनी कव्वाली म्हटले नाही का ? हब्द म्हटले ना ? का निषिद्ध हे महत्वाचे. मी असे गात नाही. आपण भजन ऐका. सकाळी आपण चर्चा करू, असे सांगितलो. त्यांनी रात्रभर भजन ऐकले. पहाटे ते नमाजाला गेले. आम्हीही मंगलारती केली. मी ते पुन्हा मला सोडणार नाहीत म्हणून माझ्या निवासाच्या खोलीत नमाज पठण केले. ती मंडळी शोधत आली. मीही विचलित झालो. मात्र, त्यांनी मी करत असलेले कार्य चांगले असल्याचे उद्गार काढले. त्या परिसरात मी भजनासाठी गेल्यास ती मंडळी आवर्जून ऐकायला यायची. दरम्यान, माझ्या महालिंगपूर गावातील मंडळीही मला सतत याविषयी विचारायचे. मी त्यांनाही भजन, प्रवचन ऐकायला सांगतो. तसेच या जगातील कोणालाही कोणताही धर्म समजून घेण्याची आणि आचरण्याचे स्वातंत्र्य असल्याचेही इब्राहिम म्हणतात. 
तलाकचा चुकीचा अर्थ, वेशभूषेतून वेगळी ओळख 
कुराण, हदीसमध्ये तिहेरी तलाकचा उल्लेख आहे. मात्र, त्याचा चुकीला अर्थ लावला जात आहे. एकाचवेळेस तीनवेळा तलाक म्हटले की विषय संपला,  असा त्याचा अर्थ नाही. एकदा तलाक म्हटल्यावर पत्नीला सुधारण्यासाठी विशिष्ट कालावधी द्यावयाचा आहे. त्यात सुधारणा न झाल्यास पुढील तलाक म्हणावयाचे आहे. चुका केलेल्यांना पश्चात्ताप करण्याची संधी द्यायला हवी. अनिवार्य झाल्यास अशाप्रकारे  तलाक द्यावा, असे महमद पैगंबरांनी सांगितले आहे. तसेच तलाकसारखे महापाप दुसरे नाही, असे खुद्द पैगंबरांनीच म्हटल्याचा सुतार यांनी उल्लेख केला. धर्माचा दुरुपयोग सुरू आहे. याचा विद्वानांनी विरोध करायला हवा. इस्लाममध्ये स्त्रियांना गौरवाचे स्थान आहे. तिला कुराण पठण, नमाज, प्रवचनाचा अधिकार आहे. स्त्रियांकडे पाहणाऱ्याच्या मनात विकार निर्माण होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. स्त्रियांच्या शोषणाचा नव्हे, हे समजून घ्यायला हवे. तसेच यातून वेगळी ओळख जपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सुतार म्हणतात. आहार, वेषभूषेचे स्वातंत्र्य असले तरी आपण 'अनेकत्वात एकत्व' पाहणारे आहोत, हे विसरू नये.
शब्दांना कृतीची जोड, प्रेरक सेवाकार्य  
श्री इब्राहिम सुतार यांनी प्रवचन, भजनच्या माध्यमातून जनमानस घडवतानाच सेवाकार्याच्या माध्यमातून त्याला कृतीची जोड दिली. श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे गुरू मल्लिकार्जुन स्वामी यांच्याकडून सेवाकार्याची प्रेरणा मिळाल्याचा गौरवपूर्वक उल्लेख ते करतात. सेवाकार्याकडे ते कसे वळले, याची कहाणीही मनाला गहिवरुन टाकणारी आहे. सुतार सांगतात, महिनाभराच्या प्रवचनाच्या काळात  त्या गावासाठी आवश्यक बाबी शोधून लोकवर्गणीतून त्यांची पूर्तता करण्याचा निश्चय केला. शेगुणशी येथे प्रवचन करताना सकाळी फिरायला निघालो होतो. एका घरात दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तेथे रडारड सुरू होती. विचारणा केल्यावर उलटी झाल्याने काल मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पुढच्या आठ दिवसांत त्याच महिलेच्या दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. विचारणा केल्यावर पुन्हा उलटी झाल्यानेच या मुलाचाही मृत्यू झाल्याचे समजले. केवळ उलटी झाल्याने दोन मुलांचा मृत्यू झाला, मग दवाखान्याला नेले नाही का, याची विचारणा केली. त्यावर ती महिला म्हणाली, गावात दवाखाना नाही. त्यासाठी तेरदाळला जावे लागते. मात्र, श्रावण महिन्यातील पावसामुळे रस्ता नाही. बैलगाडीत जावे तर १०० रुपये भाडे देणे शक्य नाही. त्यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ते ऐकून मन हेलावले. आम्ही गावातील प्रमुख मंडळींना एकत्र आणले. सुरुवातीला राजकीय मतभेदांमुळे ते एकत्र येण्यास तयार नव्हते. त्यांना विचारले, आठ दिवसांत एकाच आईच्या दोन लेकरांचा मृत्यू झाला. दवाखान्याला नेण्यासाठी चांगला रस्ता नाही, हे त्याचे कारण आहे. आपण श्रीमंत आहात, आपण जीप, ट्रॅक्टर, बैलगाडीत येजा करता. झोपडीत राहणारे, मोलमजुरी करणारे, ज्यांच्याकडे बैलगाडीसाठी भाडे द्यायला पैसे नाहीत अशांनी काय करायचे ? आपल्या घरात अशा दोन मुलांचा मृत्यू झाला असता तर आपल्याला काय वाटले असते? किमान रस्ता असल्यास ते चालत तरी जाऊ शकले असते. तुम्हा श्रीमंतांना त्याची कल्पनाही नसावी? त्यामुळे आम्ही रस्त्यासाठी उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. आपण शासकीय स्तरावर प्रयत्न करा. आम्ही आंदोलन सांभाळू, असे त्यांना सांगितले. आपण न ऐकल्यास भजन करत आपल्याच घरांसमोर उपोषणाला बसू, असा इशारा दिला. त्यावर त्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली. आता ऐनवेळी सरकारकडून रस्ता मिळणार नाही. त्यामुळे आधी आपण रस्त्यावरील अतिक्रमण हटवून कच्चा रस्ता बनवू, असा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार रस्त्याचे काम झाले. मी त्यासाठी सहा महिने तेथेच मुक्काम ठोकला. बससेवा सुरू झाल्यानंतरच मी घरी परतलो. सुतार यांनी  ढवळेश्वर येथे स्वामी विवेकानंद प्रशाला सुरु केली. अरळीमट्टी येथे भाविकांसाठी यात्री निवास, सोन्न येथे कल्याण मंडप, महालिंगपुरात पाण्याच्या टाकीची उभारणी केली. सौंदत्तीसह कर्नाटकातल्या गावोगावी जाऊन देवदासी निर्मूलनाचे कार्य केले. कोणी शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या निधीसंकलनासाठी विचारणा केल्यास मोफत भजन, प्रवचनाचे कार्यक्रम करतात. त्यांनी लेखन केले नसले तरी तत्त्वपदांच्या संग्रहाचे कार्य केले आहे.
इतक्या मोठ्या सन्मानाची कल्पना केली नव्हती
मला प्रवचन, भजनाची संधी दिलेल्या जनांना पद्मश्री सन्मान समर्पित करत असल्याचे इब्राहिम सुतार यांनी विनम्रपूर्वक सांगितले. पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. यापुढेही इतक्याच निष्ठेनेच हे कार्य करावे लागणार आहे. मात्र, माझ्यासारख्या सामान्य माणसाला इतका मोठा सन्मान मिळेल, याची कधीही कल्पना केली नव्हती. हा सन्मान मिळाल्याने कुटुंबियांसह मित्रमंडळी, ग्रामस्थ आणि कर्नाटकातल्या जनमानसाला आनंद झाला आहे. केंद्र सरकारने माझ्यासारख्याचा कशाप्रकारे शोध घेतला माहीत नाही. मात्र, त्यामुळे आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे इब्राहिम सुतार यांनी सांगितले.
एकता आश्रमाची स्थापना करणार
येत्या काळात गावात एकता (भावैक्य) आश्रमाची स्थापना करणार असल्याचे सुतार यांनी सांगितले. या आश्रमात सर्वधर्म अध्ययन पीठ स्थापणार आहे. सर्वधर्म जाणून घेण्याची आसक्ती असलेल्यांना यात प्रवेश असेल. एकदोन वर्षात त्यांना सर्व धर्मांचे तत्त्वज्ञान आणि सर्व धर्मांचा संदेश एकच आहे, हे समजावून सांगता येईल, अशी त्याची रचना आहे. अशाप्रकारे वानप्रस्थी जीवन जगत हे शरीर त्यागणाचा विचार इब्राहिम सुतार यांनी बोलून दाखवला.

Sunday, 4 February 2018

आधुनिक कबीराचा सन्मान.. श्रेष्ठ समन्वयभावी संत : इब्राहिम सुतार

कर्नाटकातील प्रवचनकार, संत साहित्याचे अभ्यासक श्री इब्राहिम सुतार यांना केंद्र सरकारने नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर केला. त्यानिमित्त... 

वादग्रस्त व्यक्तींना देशाच्या जनमानसांत रुजवण्याचा प्रयत्न भारतात पूर्वीपासून निरंतर चालला आहे.  मात्र, गेल्या काही वर्षांत ते अधिक जोरकसपणे सुरू असल्याचे काही घटनांवरुन अधिक प्रकर्षाने समोर आले आहे. स्वातंत्र्यानंतर समाजातील श्रेष्ठ अशा समन्वयभावी विचारांच्या व्यक्ती, सर्वांच्या भावनांचा आदर राखत सामरस्याचे अग्रणी बनलेल्या मेरुपुरुषांना पुढे आणून त्यांच्या आदर्श जीवनाची ओळख करुन देण्याचे काम या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षाने अथवा विचारवंत, बुद्धीजीवींनी केले नाही. कबीर, शिशुनाळ शरीफ यांच्यासारख्या संतश्रेष्ठांची समाजाला आणखी ओळख व्हावी, त्यांचे सामरस्यपूर्ण आणि हिंदू - मुस्लिम - ख्रिश्चन हे सर्व एकच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपूर्व संधी गमावल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही जाती, मतांच्या नावाखाली भांडणे सुरुच आहेत. माझाच धर्म खरा, हा अट्टाहास समरस समाजजीवनाचा गळा घोटत आहे. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधुनिक कबीर म्हणून ओळखले जाणारे प्रवचनकार इब्राहिम सुतार यांना जाहीर केलेला पद्मश्री सन्मान हा समरस समाजमनासाठी आशादायक आहे.
वेद, उपनिषदे, वचन साहित्य, तत्त्वपदे आणि सुफी परंपरेतील तत्त्वे भजन, प्रवचन आणि संवादाच्या माध्यमातून संपूर्ण कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमाभागातील जनमनांत रुजवून एकात्म समाजनिर्मितीचे कार्य इब्राहिम सुतार हे गेल्या ४८ वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. त्यांचे लौकिक शिक्षण केवळ तिसरीपर्यंत झाले आहे. मात्र, त्यांचा जीवनानुभव हा कबीर, शिशुनाळ शरीफ, शिवशरण आणि सुफी संतांची आध्यात्मिक धारा पुढे नेणारी आहे. १० मे १९४० रोजी महालिंगपूर (ता. मुधोळ, जि. बागलकोट) येथील नबीसाहेब व अमीनाबी या दांपत्यापोटी इब्राहिम सुतार यांचा जन्म झाला. गरीबीमुळे तिसरीनंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यांचा पिढीजात व्यवसाय सुतारकीचा असला तरी त्यांनी विणकाम स्वीकारले. कारण तेथील बहुतांश लोकांचा हा व्यवसाय होता. बालपणापासून ते मशिदीत जाऊन नमाज, कुराण पठण करायचे. इतर धर्म, त्यातील मुक्तीचा मार्ग याविषयी बालपणापासूनच त्यांना कुतुहल होते. गावातील भजन संघामुळे त्यांच्या या सुप्त भावाला बळ मिळाले. या धार्मिक मंडळींच्या सान्निध्यात त्यांनी भजन, तत्त्वपदे, वचनांचा अभ्यास केला. वेद, उपनिषदे समजून घेतली. रमजान महिन्यात गावोगावी जाऊन पद्य गायन करत जीवनानुभव घेतलेले इब्राहिम महालिंगपुरात लिंगैक्य श्री बसवानंद स्वामी यांच्या पुण्याराधने निमित्त दरवर्षी सकाळी, सायंकाळी चालणारे निरुपण ऐकायचे. तेथील धार्मिक चिंतन, प्रवचनाने त्यांच्यातील आध्यात्मिक जाणीवा विस्तारण्यास पूरक ठरल्याचे ते सांगतात. देव, धर्म, आराधनेच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सत्य एकच असल्यची जाणीव झाली.  सोबतच तत्त्वपदे, निजगुण शिवयोगी, शंभूलिंग, सिद्धप्पा, विद्यानंद स्वामी आदी विद्वानांचे शास्त्र, भगवद्गीतेच्या अध्ययनाने भवविषयक जाणीवा विस्तारल्याचेही त्यांनी म्हटले.
१९७० मध्ये सुतार यांनी समविचारी मित्रांसह भावैक्य जनपद संगीत मेळा सुरू केला. त्या माध्यमातून भजन, तत्त्वपदांच्या गायनाद्वारे धार्मिक, आध्यात्मिक चिंतन जनसामान्यांपर्यंत पोहोचवू लागले. ते सुलभपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रश्नोत्तरासह तत्त्वपद गायन सुरू केले. तेव्हापासून ते  वर्षभरात भजन, प्रवचन, संवादाचे १०० कार्यक्रम करत आले आहेत. आज ७८ व्या वर्षीही समाजमनात एकात्म भाव रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. त्यांनी आजतगायत कर्नाटकाबाहेर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथेही प्रवचन केले आहे.
इतर धर्मांचा सन्मान हीच एकात्मता
आपला धर्म, मते नीटपणे समजून घेऊन आपल्या जीवनात  ते चांगल्याप्रकारे आचरणात आणणे,  इतरांच्या धर्म, मतांचे अत्यंत प्रामाणिकपणे सन्मान करणे म्हणजे एकात्मता होय, असे इब्राहिम सुतार यांनी सांगितले. आपला धर्म जितका सत्य आहे,  इतरांचाही धर्मही तितकाच सत्य आहे या भावाने प्रेमपूर्वक स्वीकारणे. तसेच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच्या आराधनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसे आपल्या मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचणे शक्य आहे अगदी तसेच इतरांच्या मार्गानेही ईश्वराचा साक्षात्कार होणे शक्य आहे, हे स्वीकारुन त्या मार्गांचा प्रेमपूर्वक स्वीकार, त्यांचा गौरव हेच एकात्म  असे ते म्हणाले. तसेच मतांतरणही अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले.  एकात्मतेविषयी सांगताना  बसवण्णा, भगवान रामकृष्ण, सुफी संतांच्या वचनांचा उल्लेख करत ते  म्हणाले, एकता से बढकर कोई इबादत नहीं, लडने की वेद, कुरान में नसीहत नहीं, मालिक भी एक हमारा, मजहब भी एक हमारा, हर इन्सान बंधू हमारा, संतोंने यही पुकारा।।

Thursday, 30 November 2017

कडूनिंब पेरले तर उगवलेल्या झाडाला आंबे लागतील?!

 






शिशुनाळ शरीफ, सर मिर्जा इस्माईल, अब्दुल कलाम आदी प्रेरक आदर्श समोर असतानाही आपल्या सेक्युलरवाद्यांना मात्र, ते दिसत नाहीत. यांना तुष्टीकरणासाठी टिपूच्या जयंतीसारखे कार्यक्रमच हवेत.  

-  डॅनी परेरा, हासन
वादग्रस्त व्यक्तींना देशाच्या जनमानसांत रुजवण्याचा प्रयत्न भारतात पूर्वीपासून निरंतर चालला आहे. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील काही इतिहासकार खोटेच सत्य भासवण्याच्या प्रयत्नात सफल झाले आहेत. त्यांच्या विचारानुसार देशभक्त खलनायक तर खलनायक देशभक्त आहेत.
टिपू जयंती विवाद पुन्हा निर्माण झाला आहे. काहीना टिपू धर्मनिरपेक्ष तर काहीच्या दृष्टीने मतांध आहे. मुसलमानांतच या देशासाठी मोठे योगदान दिलेली महान मडंळी आहेत. त्या कोणाकडेही समाज धार्मिक नजरेने पाहत नाही. ते इस्लामी विचारधारेत वाढले असले तरी त्यांनी आपली जीवनदृष्टी विशाल बनवल्याने मुस्लिमेतरांतही ते आदरणीय आहेत. मात्र, सेक्युलरांच्या यादीत त्यांना महत्वाचे स्थान नाही. या देशातील अल्पसंख्यक समाजात आदराचे स्थान असलेलेच धर्मनिरपेक्ष असा या सेक्युलर कंपुचा अघोषित नियम आहे. धार्मिक सलोख्यासाठी अडथळा ठरणारी ही बाब आहे.
आदरणीय राष्ट्रपती अब्द्राल कलाम कलाम हे एक धर्माभिमानी मुस्लिम होते. त्यांचा सर्वधर्म समन्यवय भाव हा वैश्विक होता. ते कर्मठ मुसलमान नसल्या कारणाने आपल्या समाजात सर्वमान्य नव्हते! त्यांच्या सर्वधर्म समभावाचा समान्य जनता तसेच मठाधीश, मान्यवरांनी गौरव, आदर केला. त्यामुळे घोषित धर्मनिरपेक्षतावादी कलाम यांचा समन्वयभाव आदर्श म्हणून स्वीकारले नाहीत.
शिशुनाळ शरीफ यांना कर्नाटकाचे 'कबीर दास' म्हणून ओळखले जाते. हिंदू, मुस्लिम हा भेद न बाळगता सर्वच लोक त्यांना संत म्हणून त्यांच्याकडे पाहतात. शरीफ हे सर्व भारतीय मूल्यांचा सन्मान करत होते, त्यामुळे ते येथील हिंदूंशी समरस झाले. मात्र, कर्मठांनी त्यांना दूर ठेवल्याने ते सेक्युलर कंपुचे ध्रुवतारा बनू शकले नाहीत. 
प्रख्यात कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांनी उल्लेखिलेला हा एक प्रसंग : त्याकाळी म्हैसुरू सुंदर, स्वच्छ गाव होते. दिवस उजाडताना एक अधिकारी घोड्यावर बसून रस्ते स्वच्छ केलेत की नाहीत हे पाहण्यासाठी येत होते. ते मिर्जा इस्माईल ! जे म्हैसुरूचे दिवाण होते. 'मिर्जा इस्माईल यांचा संभावितपणा, व्यक्तित्व याप्रमाणेच त्यांच्या ज्ञान, समज, विनोदी स्वाभाव, सांस्कृतिक चेतनेने त्यांना अत्यंत श्रेष्ठ आणि यशस्वी प्रशासक बनवले' असे सर सी. व्ही. रामन यांनी सांगतिले आहे. नाल्वडी कृष्णराज वडेयर आणि मिर्जा इस्माईल या जोडीचा काळ म्हैसुरू संस्थानचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. वेगवेगळ्या धर्माचे असले तरी बांधवांप्रमाणे एकत्रितपणे केलेले यांचे कार्य आवडल्याने महात्मा गांधी यांनी 'येथे रामराज्य आहे' असे म्हटले होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या त्या काळात काँग्रेस सारख्या चळवळी चालवायची. तेव्हा मिर्जा इस्माईल यांच्यामुळे गांधी, नेहरू यांच्यासारख्या नेत्यांशी महाराजांचे आत्मीय संबंध राहिले. या चळवळींच्या काळात मिर्जा इस्माईल यांच्या दक्षतेमुळेच कधीही दंगली उद्भवल्या नाहीत. १९४१ मध्ये जयपूर संस्थानातही कार्यरत असताना सर मिर्जा इस्माईल यांनी आपल्या दक्ष कारभाराचा ठसा उमटवला. त्यामुळे जयपूर शहरात औद्योगिक क्षेत्राने एक नवे युग अनुभवले. फाळणीनंतर पाकिस्तानच्या आधुनिकीकरणासाठी तिकडचे नागरिकत्व स्वीकारण्याचे  महमद अली जिना यांनी आवाहन केले होते. मात्र, मिर्जा यांनी त्यांची विनंती फेटाळली. 'भारताच्या फाळणीला माझा स्पष्ट विरोध आहे' असे थेट जिना यांना कळवले.
  १९४६ मध्ये हैदराबादचे दिवाण असलेले मिर्जा इस्माईल यांनी  कोणत्याही तक्रारीविना संस्थान भारतात विलीन करण्यासाठी निजामाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे न ऐकल्याने त्यांनी काही महिन्यांतच त्यांनी दिवाण पद सोडले. मिर्जा इस्माईल कर्मठ मुसलमान नव्हते. त्यामुळे सेक्युलर कंपुने त्यांना समन्वयाचा आदर्श म्हणून स्वीकारले नाही.
केवळ ही काही उदाहरणे. याप्रमाणे जात, मत, पंथाच्या पलिकडील व्यक्ती मुस्लिम समाजात आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
असंख्य देशभक्त, सर्वधर्म समन्वय स्वीकारलेले मुसलमान या देशात आहेत. मात्र, देशाच्या फाळणीनंतर अशा श्रेष्ठ समन्वयभावी विचारांच्या व्यक्ती, सर्वांच्या भावनांचा आदर राखत सामरस्याचे अग्रणी बनलेल्या मुसलमान मेरुपुरुषांना पुढे आणून त्यांच्या आदर्श जीवनाची ओळख करुन देण्याचे काम या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस अथवा इतर सेक्युलर पक्षांनी आणि डाव्या विचारवंत, बुद्धीजीवींनी केले नाही. कबीरदास, शिशुनाळ शरीफ, मिर्जा इस्माईल, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ए पी जे अब्दुल कलाम, अश्फाकउल्ला खान यांच्यासारख्या संतश्रेष्ठ, समाजसेवक, शास्त्रज्ञ, क्रांतिकारकांची समाजाला आणखी ओळख व्हावी, त्यांचे सामरस्यपूर्ण दिव्य संदेश देणारे, हिंदू - मुस्लिम - ख्रिश्चन हे सर्व एकच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपूर्व संधी गमावल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही जाती, मतांच्या नावाखाली भांडणे सुरुच आहेत. इतिहासातून न शिकल्यामुळेच तुष्टीकरणाचे विषवृक्ष अधिक बहरले आहे. हिंदू - ख्रिश्चनांच्या भावनांवर गदाप्रहार करत त्यांचे मतांतर घडवून, न स्वीकारणाऱ्यांची हत्या केलेल्या टिपूला सामरस्याचा प्रतीक म्हणून स्वीकारणे, त्याचा धर्मनिरपेक्ष म्हणून उदोउदो करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांना काय म्हणावे? मतांधांनाही राष्ट्रवादी म्हणून तुष्टीकरण केले जात आहे, हे म्हणायला काही खुप ज्ञानाची आवश्यकता नाही. आणखी किती काळ हे सामरस्याचे नाटक? कडूनिंब पेरले तर उगवलेल्या झाडाला आंबे लागतील?!
(साभार : विजयवाणी, लेखक प्राध्यापक, हौशी लेखक आहेत.)

क्रौर्यातच वाढलेला देशप्रेमी कसा होऊ शकतो?

टिपू स्वातंत्र्ययोद्धाही नाही. देशप्रेमीही नाही. मात्र, त्याच्याविषयीची काही खोट्या गोष्टी सातत्याने जोरकसपणे सांगितल्याने टिपूचे व्यक्तित्व विशेष प्रभावी असल्याचा भास होतो. टिपूने आपल्या स्वार्थासाठी क्रौर्यच पेरला होता.
डाॅ. एम. चिदानंद मूर्ती

टिपू वीर होता. भारतात, कर्नाटकातील वीरही त्याच्यासारखे लढून हौतात्म्य पत्करले आहेत. त्यात राजे, सैनिकही आहेत. खेडूतही आहेत. त्यांचे शेकडो शिलालेख उपलब्ध आहेत. सैनिक, खेडूतांच्या शौर्याच्या गौरवगाथ सांगणाऱ्या शेकडो वीरगळही संपूर्ण कर्नाटकात सापडतात.
पुरुषांइतकेच वीर स्त्रियाही लढल्या आहेत. उदाहरणार्थ, मध्य भारतातील झांशीची राणी लक्ष्मीबाई, कर्नाटकातील बेळवडी मल्लम्मा, वीरराणी कित्तूर चन्नम्मा, अकराव्या शतकातील चालुक्य राणी अक्कादेवी आदी.
टिपू 'देशप्रेमी', 'स्वातंत्र्ययोद्धा' नाही. पूर्वी अनेक राजे आपल्या राज्याच्या रक्षणासाठी लढले. टिपू देशप्रेमी असेल तर तेही देशप्रेमीच असतील. ते आपापल्या राज्याच्या रक्षणासाठी लढले. आधुनिक भारताचे स्वातंत्र्ययोद्धे आपल्या स्वार्थासाठी नव्हे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक मार्गाने लढले. सुभाषचंद्र बोस यांनी आपली मातृभूमी ब्रिटशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी होतात्म्य पत्करले. स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान अथवा राष्ट्रपती होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. टिपू ब्रिटिशांच्या विरोधातील लढाईत जिंकला असता तर तो पूर्वीप्रमाणेच राज्याचा अधिपती म्हणून मिरवला असता. ब्रिटिशांच्या विरोधात लढणारा टिपू हा काही पहिलाच नव्हता. बंगालचा नवाब सिराजुद्दीन, महाराष्ट्रातील पेशवे, झांशीची राणी लक्ष्मीबाई हेही ब्रिटिशांच्या विरोधात लढले. त्यामुळे या विषयात टिपूला कोणतेही विशेष प्रशस्ती देण्याची गरज नाही.
टिपूने दारुची  विक्री थांबवून सर्व शिंदीची झाडे तोडायला लावली, ही चांगली गोष्ट आहे. पूर्वीच्या राजांप्रमाणे त्यानेही रस्ते बांधले, कन्नबांडी धरण बांधले (कन्नबांडी धरणाचे काम त्याच्यापूर्वीच्या चिक्कदेवराज वडेयर याच्या काळात सुरू झाले होते.). मात्र, त्याने काही ठिकाणी हिंदूंच्या नेमणुका केल्या असल्या तरी आर्थिक व्यवस्था पाहण्यासाठी खजिन्याच्या प्रमुखांचे स्थान मुसलमानांसाठीच राखून ठेवले होते. त्याचे निष्ठावंत पूर्णय्या यांच्याच धर्मांतरणाचा प्रयत्न केला. (हे टिपूच्या मुलाच्या पुस्तकातच याचा उल्लेख आहे.). केवळ म्हैसूरुच्या राजांनी बांधल्याच्या एकमेवर कारणाने म्हैसूरुजवळील तलावाचा विद्ध्वंस केला. त्याच्या क्षेत्राची नासधूस केली. (आजच्या राजवाड्यासमोरील खेळाचे मैदान). नवव्या शतकातील राणी चेट्टलदेवी तलाव, विहीर, मंदिर बांधले, त्याच काळात आदिगौड रयत तलाव, पाणपोया बांधल्या. हे राजेमंडळी, लोकांचे कर्तव्य होते.
टिपूने हिंदू धार्मिक संस्थांना दान दिल्याचा अनेकांनी खुपच गाजावाजा केला आहे. आताच मी स्पष्ट केल्याप्रमाणे त्याने दान देण्यामागे दोन कारणे आहेत. एक आपल्याला येऊ शकणाऱ्या संकटांच्या निवारणासाठी दान दिले असावे. संबंधित मठाधीश, भक्त, आपल्या प्रदेशातील हिंदूंचा विश्वास कायम राखणे हा दान देण्यामागचा हेतु आहे. त्याच्या अंमलाखालील श्रीरंगपट्टण, नंजनगुडू, म्हैसुरू प्रदेशातील जनेतेचा विश्वास राखून आपली राजवट आणखी बळकट केल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही त्या प्रदेशात काही अन्याय केला. ते अन्याय केला नसता तर त्याला समाधान झाले नसते. उदाहरणार्थ, श्रीरंगपट्टणमधील अंजनेय मंदिर पाडून मशीद बांधली. मात्र, तेथील रंगनाथ स्वामी देवस्थानच्या नादी लागला नाही - कारण तेच त्या प्रदेशाचे अधिदैवत. म्हैसुरुतही राजवाडा पाडून काही मंदिरे नष्ट केली. मात्र, त्याने दूरच्या कोडगू, मलबारमध्ये घोर अन्याय केला. त्याविषयीचे स्पष्ट पुरावे आहेत. त्याने दिलेले दान त्याने केलेल्या घोर अन्यायावर पडदा टाकण्यास असमर्थ ठरले आहेत. आताचे राजकारणी, गर्भश्रीमंत देवस्थानांना भेटी दिल्याच्या प्रसारमाध्यमात बातम्या होतात. त्यांनी दिलेल्या मोठमोठ्या देणग्याही बातम्या बनतात. मात्र, गरीब देवस्थानात जातात ते खऱ्या भक्तीने; त्यांनी अर्पण केलेल्या वस्तू मोठ्या बातम्या बनत नाहीत. तेवढेच नव्हे तर ती बातमीच नाही.
टिपूचे क्रौर्य, मतांधता, हे तर स्पष्टातिस्पष्ट आहे. हे त्याच्या शिलालेख, हस्तलिखिते (उदाहणारणासाठी : केरळच्या आपल्या सेनापतीला लिहिलेले पत्र - You sHould capture and kill all hindus). त्याच्या तलवारीवर लिहिलेले (''This Victorious... ... is lightning to kill all kafirs''), त्याच्या मुलाच्या पुस्तकातील उल्लेख आदी मूलभूत पुरावे हे सूचित करतात.  त्याचे अंतरंग, धोरण, मन - त्याच्याही पूर्वीच्या उत्तर भारतातील घोरी, गजनी, बाबर, औरंगजेब यांची परंपरा त्याने पुढे नेली. कुवेंपु यांनी आपल्या एका मुलाखतीत एक गोष्ट सांगितली आहे. बांग्लामुक्तीच्या पार्श्वभूमीवर - 'ते (बांग्लामुक्ती) स्पष्ट करण्यासाठी कोणतीही भौतिक कारणे नाहीत.; धार्मिक कारणे आहेत. त्यामुळेच आपण हिंदू धर्मासाठी प्राण द्यायला हवे, असे म्हणतो. मात्र, मुस्लिम धर्मासाठी प्राण घ्यायला हवे, असे म्हणतात. इतकाच फरक आहे.' अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डाॅ. सी. पी. कृष्णकुमार यांनी पूर्वी डाॅ. कुवेंपू यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी हे सांगितले. डाॅ. पी. पी. कृष्णकुमार यांनी २१ जानेवारी २०१३ रोजी मला लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. - ''टिपू विवादाशी संबंधित हे पत्र - कुवेंपू यांच्या साहित्यात; काव्यात, 'मलेगळल्ली मदुमगळु' कादंबरीसह सर्वत्र मुस्लिम विरोधी अभिप्राय आहे. त्यांनी मी वर उल्लेखिलेले कुवेंपु यांचे वक्तव्य माझ्या निदर्शनास आणून दिले. हे मृतप्राय भारतीयांना खडबडून जागे करणाऱ्या डिंडिमासारखे होय. एकूणच टिपूच्या मुस्लिम मनोधर्माचा हा एक नमुना होय. याला काही अपवादही आहेत. खंडितच सर्वच मुस्लिम वाईट नाहीत.
पर्शियन राज्यभाषा : टिपू सत्तेवर येईतोवर म्हैसुरूची राज्यभाषा अथवा प्रशासकीय भाषा कन्नड हीच होती. टिपूने ती रद्द करुन त्या जागी पर्शयिन अथवा पर्सो - अरेबिक (Perso - Arebic) भाषेला स्थान दिले. त्याचे सगळे शिलालेख, आदेशपत्रे पर्शियन भाषेत आहेत. त्या काळी खुपच कमी प्रमाणात कन्नड भाषेचा वापर केला जात होता, मध्यम प्रमाणात पर्शयिन आणि मराठी भाषेचा वापर केला जात होता. सर्वोच्च पातळीवर केवळ पर्शियन भाषेचा वापर केला जात होता. टिपूनंतर सत्तेवर आलेल्या म्हैसुरूच्या राजांनी पुन्हा प्रशासकीय भाषा म्हणून कन्नड भाषेचा वापर सुरू केला. लक्ष वेधण्याची बाब म्हणजे - हैदर, टिपू यांच्यापूर्वीच्या हिंदू राजांच्या काळात शेकडो साहित्यांची निर्मिती झाली. टिपूच्या राजवटीत त्याच्या प्रोत्साहनाने कन्नडमध्ये कोणतेच साहित्य निर्माण झाले नाही. (वाचा - आर. नरसिंहाचार ; कर्नाटक कविचरित्रे). परंतु कोणत्याही कवी अथवा रचनाकाराने हैदर अथवा टिपूचा उल्लेख केला नाही. मात्र, म्हेसुरूच्या राजांनी दिलेले प्रोत्साहन सर्वज्ञात आहे.
(लेखक ज्येष्ठ संशोधक, साहित्यिक आहेत. )
साभार : विजयवाणी





Sunday, 29 October 2017

बेंद्रे यांच्या साहित्यातील शरण तत्त्वाचे चिंतन

बाराव्या शतकात  बसवण्णा, अल्लमप्रभू आदि शरणांनी लोकभाषा कन्नडमधील वचन साहित्याच्या माध्यमातून कर्नाटकात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक जागृती घडवली. कर्नाटकातीलच ज्ञानपीठ विजेते महाकवी द. रा. बेंद्रे यांनी शरणतत्त्व हाच आपला श्वास मानला. गेल्या शतकात शरणांच्या विषयी विविध साहित्य लिहिले गेले. मात्र, काव्य माध्यमातून ते समर्थपणे अभिव्यक्त करणारे आणि लौकिक भावनांच्या अभिव्यक्तीसाठी वचनशैलीचा वापर करणारे  नवोदय काव्याचे प्रमुख कवी असलेले बेंदे हे पहिले कवी होते. त्यांच्या साहित्याचे जीवनभर आद्यांतापर्यंत अभ्यास, त्यांची जनपद भाषा, त्यांचा आध्यात्मिक मनोभाव याचा दर्शन केलेले डाॅ. जी. कृष्णप्पा यांनी त्यांच्या साहित्यातील शरणतत्त्वांच्या चिंतनाचे आपल्या 'बेंद्रेयवर साहित्यदल्ली शरण चिंतने' या पुस्तकात निरुपण केले आहे. ३६ पुस्तकांतही मावणार नाही अशा शरण संस्कृती, शरण दर्शनाचं सार त्यांनी 'गागर में सागर' याप्रमाणे केवळ ३६ पानांत निरुपिले आहे. इतक्या संक्षिप्तपणे केलेले हे निरुपण ग्रंथकर्त्याच्या अगाध अभ्यासाचे फळ म्हणावे लागेल.
शरणक्षेत्र धारवाडमध्ये बेंद्रे यंचा जन्म झाला. जाती, मत, पंथ, सोवळेओवळे, श्रीमंती, गरीबी हा भेद त्यांच्या मनाला शिवला नाही. वेदांचे पाठ, जंगमांची वचने,  करडीकुणित (स्थानिक लोकनृत्य), बयलाट आदि जीवपोषक द्रव्यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. मात्र, ते पाश्चात्त्य प्रेरणेला बळी  पडले नाहीत.  देशी प्रज्ञेने त्यांचे काव्य फुलले. त्यांना सर्वज्ञ, हरिहर, लक्ष्मीश, वचनकार आणि हरिदासांविषयी आत्मीयता होती. 'बेळगु' काव्यासाठी त्यांनी सदानंद जंगम हे काव्यनाम स्वीकारले. १९२० - २१ मध्ये 'नोविन बेले', 'हिग्गिन नेले' आदि वचने लिहिल्याचे 'उय्याले' काव्यसंग्रहाच्या मनोगतात बेंद्रे यांनी सांगितले आहे. 'उय्याले'  मधील 'करुळीन वचनगळू'  वात्सल्यांची रसलहरीच. गर्भवती स्त्रीमध्ये अपत्यप्राप्तीचा अनुभव अलौकिक शक्ती निर्माण करते, हे सांगणाऱ्या 'अलौकिक' वचनांत  अल्लमप्रभूंच्या वचनांचा प्रभाव दिसतो.
बेंद्रे यांचे 'दवन हुण्णिमेय जात्रेय रात्री' हे काव्य शिवाचे प्रतीक आहे. लेखक कृष्णप्पा म्हणतात की, शिवध्यानी बेंद्रे यांनी प्रकृतीत अनुभवलेले लिंगवैभव भारतीय साहित्यातच विशिष्ट आहे. निसर्गातील समतत्त्व, त्याच्या अमृत पोषणामुळे जगणारे सकल जीवराशी, त्यावरील विश्वासाला पात्र शिवरुप हेच बेंद्रे यांचे शिवानुभव. वेद, उपनिषदांचे सार जाणून बसवण्णांनी संपूर्ण मानवजात एकच हे तत्त्व सांगण्यासाठी सामाजिक क्रांती घडवली. कायकतत्त्वापासून दार्शनिकत्वापर्यंत त्यांनी ध्वजा फडकावली. असे क्रांतिकारी बसवण्णा बेंद्रे यांच्यासाठी महात्मा होते. त्यांनी 'वृषभोरोरविती' हे काव्य रचले. भूतदयेचे साक्षात्कारी बसवण्णा हे समानतेचे पुरस्कर्ते असल्याचे बेंद्रे यांनी या काव्यात सांगितले आहे. 'कर्नाटकद इतिहास पुरुषरू' या प्रकरणात कृष्णप्पा यांनी बसवण्णा, अल्लमप्रभू, अक्कमहादेवी यांच्याविषयीचे बेंद्रे यांचे चिंतन मांडले आहे. 'तुंबी बंदीत्तु' या रुपकात्मक काव्यातून बसवादि शरणांच्या मधुरभावाचे मधुर जीवन सकल जनांत भरुन गेल्याचा काल मांडल्याचे सांगितले आहे.
बेंद्रे १९४४ ते १९५६ पर्यंत सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात होते. त्यामुळे त्यांच्या सिद्धराम या प्रकरणाचा विशेष उल्लेख करावा लागेल. सोलापुरात आल्या वर्षीच वयाला आलेला मुलगा रामचंद्र, पुढच्या सात दिवसांतच लहान मुलगा आनंद याचे निधन झाले. बेंद्रे यांना तीव्र दु:ख झाले. अशाप्रसंगी सिद्धरामेश्वर देवस्थानची त्यांच्या आध्यात्मिक साधनेत प्रमुख भूमिका राहिली. त्यांनी सिद्धरामेश्वरांचे कायततत्त्व, लिंगांग सामरस्य आणि  स्त्री, सोनेनाणे या विषयांच्या मोहापलिकडील सिद्धत्व, साधनामार्ग याविषयी 'सिद्धरामर वचनवन्नु नेनेदु' हे काव्य रचले. 'चेन्नलिंगवे' या काव्यातून त्यांचे मित्र तत्त्वचिंतक हलसंगीचे मधुरचेन्न यांच्याविषयीचा, विनायक गोकाक, शंकरगौड पाटील, शिंपी लिंगण्णा यांच्याविषयीच्या  बेंद्रे यांच्या शरणबंधुत्वावर 'शरण बांधव्य' या प्रकरणात लेखकाने प्रकाश टाकला आहे. बेंद्रे यांचे शिवध्यानातील भावैक्य सामरस्य, भक्त,  प्राण, लिंग, शक्ती, इष्टलिंग याविषयीच्या चिंतनाचे कृष्णप्पा यांनी सुलभपणे निरुपण केले आहे. एकूणच शरणांनी वचनसाहित्य, शिवभक्ती, कायतत्त्वानुसार जीवन, दासोह आणि आध्यात्मिकता या माध्यमातून केलेल्या ऐतिहासिक  कार्याविषयी बेंद्रे यांनी म्हटले आहे, ' कन्नड शिवशरणांनी आपल्या भक्तीच्या युक्तीने कैलासाला कल्याणला आणण्यासाठी केलेली अद्भुत साधना कर्नाटकाच्या,  नव्हे भारताच्या, तेवढेच काय संपूर्ण जगाच्या इतिहासात रोमहर्षक आहे.
डाॅ. जी. कृष्णप्पा यांनी जानेवारी २०१५ पासून बसव समितीच्या 'बसव पथ' मासिकाच्या कन्नड आवृत्तीत सलग चार महिने बेंद्रे यांच्या साहित्यात शरण चिंतन ही लेखमाला लिहिली. या माध्यमातून त्यांनी बेंद्रे यांच्या साहित्याला व्यापलेल्या शरण चिंतनावर टाकलेल्या प्रकाशाला वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या लेखमालेचा अमूल्य ठेवा पुस्तकरुपात बंगळुरुच्या वंशी प्रकाशनाद्वारे वाचकांसमोर आणला आहे. योगी अरविंद यांचे चिंतन, कवी कुवेंपु यांच्या काव्याचे समग्र चिंतन केलेले ज्येष्ठ साहित्यिक को. चेन्नबसप्पा यांची प्रस्तावना लाभली आहे.
बेंद्रेयवर साहित्यदल्ली शरण चिंतने
लेखक : डा. जी. कृष्णप्पा
प्रकाशक : वंशी प्रकाशन,  बंगळुरू
किंमत :  ३० रुपये

Sunday, 9 April 2017

शिवयोगिनी अक्कमहादेवी

सोमवार, दि. १० मार्च २०१७ रोजी चैत्र पौर्णिमा. शिवयोगिनी अक्कमहादेवी यांचा जन्मदिवस. यानिमित्त  डाॅ. शिवानंद शिवाचार्य स्वामी यांचा कन्नड बोधीवृक्ष पुरवणीत प्रसिद्ध झालेला हा लेख. 
कण्गे श्रृंगार गुरुहिरीयर नोडुवदु.
कर्णक्के श्रृंगार पुरातनर संगीतंगळ केळुवुदु.
वचनक्के श्रृंगार सद्भक्तर नुडिगडण.
करक्के श्रृंगार सत्पात्रक्किवुदु.
जीविसुव जीवक्के श्रृंगार गणमिळाप.
ईविल्लद जीविय बाळुवे एतक्के
बातेयय्या चेन्नमल्लिकार्जुना ?
हे अक्कमहादेवीचे वचन. या वचनात अक्कमहादेवीने सुंदर गोष्टी सांगितल्या आहेत. तिने या वचनात सांगितलेली एकेक गोष्ट 'आदरणीय' आणि 'अवधारणीय' आहे. तिने सांगितलेल्या कानगोष्टी आपण  अंगिकारल्यास दु:ख, संकटे, अडचणी, तापत्रय हे आपल्या जीवनात जवळही फिरकणार नाहीत. या वचनात अक्कमहादेवीने आनंद मिळवण्यासाठी डोळे, कान, हाताने काय करावे, काय काय करावे ? याविषयी मार्गदर्शन केले आहे.

अक्कमहादेवी ‘कण्गे श्रृंगार गुरुहिरीयर नोडुवुदु’ (डोळ्यांना श्रृंगार गुरुज्येष्ठांना पाहण्याचे) म्हणून सांगते. कण्गे म्हणजे कण्णुगळिगे (डोळ्यांना) असा अर्थ. डोळ्यांना काय श्रृंगार, तो कोणता श्रृंगार असे विचारल्यावर अक्कमहादेवी सांगते, गुरू, ज्येष्ठांना  डोळे भरुन पाहणे म्हणजे डोळ्यांना श्रृंगार.  डोळ्यांसाठी नित्य गुरू, ज्येष्ठांच्या दर्शनाशिवाय आणखी कोणते मोठे श्रृंगार ? अक्कमहादेवी आणखी सांगते, कर्णक्के श्रृंगार पुरातनर संगीतंगळ केळुवुदु. कर्ण म्हणजे कान. कानांसाठी कोणते श्रृंगार हे विचारल्यावर संगीत ऐकायचे, असे अक्कमहादेवी म्हणते. तिने त्या काळातही संगीत ऐकावे असे सांगितले आहे तर मग आजचे संगीत ऐकणाऱ्या आम्हा लोकांची काय स्थिती असेल ? हा टिकेचाच विषय आहे.
अक्कमहादेवी पुन्हा सांगते, वचनक्के श्रृंगार सद्भक्तर नुडिगडण. बोलता बोलता सद्भक्तांच्या शब्दसंपत्तीचा वापर केल्यास त्याहून मोठे श्रृंगार ते कोणते ?  श्रृंगार म्हणजे भूषण. सद्भक्तांची वचने आपल्या भाषेचे सौंदर्य वाढवतात. शरण आणि सद्भक्तांच्या वचनांत विशेष काय आहे? अशी विचारणा करणाऱ्यांनी जेडर दासिमय्या यांचे हे वचन वाचावे. तेव्हा अशा प्रवृत्तीच्या लोकांना सद्भक्तांच्या वचनाचे सामर्थ्य लक्षात येईल. अक्कमहादेवी पुन्हा सांगते, ' करक्के श्रृंगार सत्पात्रक्किवुदु' कर म्हणजे हात. ईवुदु म्हणजे देणे. 'हाताला काय भूषण ?' म्हणून विचारल्यावर अक्कमहादेवी, सत्पात्री दान करणे हे हाताला भूषण असे सांगते. 'जीवीसुव जीवक्के श्रृंगार गणमिळाप' मिळाप म्हणजे संग, सहवास. गणमिळाप म्हणजे सत्संग, सज्जनसहवास होय. जीवनाला एक अर्थ प्राप्त व्हावयाचे तर, जीवनाला एक नवा आयाम लाभावयाचे तर सत्संग आवश्यक आहे. तसेच सज्जनांचा सहवास गरजेचा आहे. सज्जन हे आपल्याला जीवनमूल्याचा परिचय करुन देतात. ते आपल्याला जीवन कसे जगावे याची शिकवण देतात. हे समजून न घेणारे लोक बाजाराचा संग करुन चिंतेच्या चितेत जळत राहतात.
अक्कमहादेवी सांगते, 'इविल्लद जीविय बाळुवे एतक्के बातेयय्या चन्नमल्लिकार्जुना?' इविल्लद म्हणजे  हे नसलेले १ गुरुज्येष्ठांचे दर्शन न करता असलेले २ पुरातनांचे संगीत न ऐकता असलेले ३ शरणांच्या वचनांचा आपल्या जीवनात वापर न करणारे ४ सत्पात्री दान न करणारे ५ आजीवन सज्जनांचा सहवास, सत्संग न लाभलेले यांचे जीवन कशालाही उपयोगी नाही.

माध्यमाची शक्ती अन् अहंकारी नेतृत्वाचा शेवट

  धारवाड… कर्नाटकातील ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाणारे शहर. पण याच शहराने एक काळ असा पाहिला, जेव्हा शिक्षण, संस्कृती आणि प्रगतीच्या ओळ...