Sunday, 4 February 2018

आधुनिक कबीराचा सन्मान.. श्रेष्ठ समन्वयभावी संत : इब्राहिम सुतार

कर्नाटकातील प्रवचनकार, संत साहित्याचे अभ्यासक श्री इब्राहिम सुतार यांना केंद्र सरकारने नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर केला. त्यानिमित्त... 

वादग्रस्त व्यक्तींना देशाच्या जनमानसांत रुजवण्याचा प्रयत्न भारतात पूर्वीपासून निरंतर चालला आहे.  मात्र, गेल्या काही वर्षांत ते अधिक जोरकसपणे सुरू असल्याचे काही घटनांवरुन अधिक प्रकर्षाने समोर आले आहे. स्वातंत्र्यानंतर समाजातील श्रेष्ठ अशा समन्वयभावी विचारांच्या व्यक्ती, सर्वांच्या भावनांचा आदर राखत सामरस्याचे अग्रणी बनलेल्या मेरुपुरुषांना पुढे आणून त्यांच्या आदर्श जीवनाची ओळख करुन देण्याचे काम या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षाने अथवा विचारवंत, बुद्धीजीवींनी केले नाही. कबीर, शिशुनाळ शरीफ यांच्यासारख्या संतश्रेष्ठांची समाजाला आणखी ओळख व्हावी, त्यांचे सामरस्यपूर्ण आणि हिंदू - मुस्लिम - ख्रिश्चन हे सर्व एकच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपूर्व संधी गमावल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही जाती, मतांच्या नावाखाली भांडणे सुरुच आहेत. माझाच धर्म खरा, हा अट्टाहास समरस समाजजीवनाचा गळा घोटत आहे. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधुनिक कबीर म्हणून ओळखले जाणारे प्रवचनकार इब्राहिम सुतार यांना जाहीर केलेला पद्मश्री सन्मान हा समरस समाजमनासाठी आशादायक आहे.
वेद, उपनिषदे, वचन साहित्य, तत्त्वपदे आणि सुफी परंपरेतील तत्त्वे भजन, प्रवचन आणि संवादाच्या माध्यमातून संपूर्ण कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमाभागातील जनमनांत रुजवून एकात्म समाजनिर्मितीचे कार्य इब्राहिम सुतार हे गेल्या ४८ वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. त्यांचे लौकिक शिक्षण केवळ तिसरीपर्यंत झाले आहे. मात्र, त्यांचा जीवनानुभव हा कबीर, शिशुनाळ शरीफ, शिवशरण आणि सुफी संतांची आध्यात्मिक धारा पुढे नेणारी आहे. १० मे १९४० रोजी महालिंगपूर (ता. मुधोळ, जि. बागलकोट) येथील नबीसाहेब व अमीनाबी या दांपत्यापोटी इब्राहिम सुतार यांचा जन्म झाला. गरीबीमुळे तिसरीनंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यांचा पिढीजात व्यवसाय सुतारकीचा असला तरी त्यांनी विणकाम स्वीकारले. कारण तेथील बहुतांश लोकांचा हा व्यवसाय होता. बालपणापासून ते मशिदीत जाऊन नमाज, कुराण पठण करायचे. इतर धर्म, त्यातील मुक्तीचा मार्ग याविषयी बालपणापासूनच त्यांना कुतुहल होते. गावातील भजन संघामुळे त्यांच्या या सुप्त भावाला बळ मिळाले. या धार्मिक मंडळींच्या सान्निध्यात त्यांनी भजन, तत्त्वपदे, वचनांचा अभ्यास केला. वेद, उपनिषदे समजून घेतली. रमजान महिन्यात गावोगावी जाऊन पद्य गायन करत जीवनानुभव घेतलेले इब्राहिम महालिंगपुरात लिंगैक्य श्री बसवानंद स्वामी यांच्या पुण्याराधने निमित्त दरवर्षी सकाळी, सायंकाळी चालणारे निरुपण ऐकायचे. तेथील धार्मिक चिंतन, प्रवचनाने त्यांच्यातील आध्यात्मिक जाणीवा विस्तारण्यास पूरक ठरल्याचे ते सांगतात. देव, धर्म, आराधनेच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सत्य एकच असल्यची जाणीव झाली.  सोबतच तत्त्वपदे, निजगुण शिवयोगी, शंभूलिंग, सिद्धप्पा, विद्यानंद स्वामी आदी विद्वानांचे शास्त्र, भगवद्गीतेच्या अध्ययनाने भवविषयक जाणीवा विस्तारल्याचेही त्यांनी म्हटले.
१९७० मध्ये सुतार यांनी समविचारी मित्रांसह भावैक्य जनपद संगीत मेळा सुरू केला. त्या माध्यमातून भजन, तत्त्वपदांच्या गायनाद्वारे धार्मिक, आध्यात्मिक चिंतन जनसामान्यांपर्यंत पोहोचवू लागले. ते सुलभपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रश्नोत्तरासह तत्त्वपद गायन सुरू केले. तेव्हापासून ते  वर्षभरात भजन, प्रवचन, संवादाचे १०० कार्यक्रम करत आले आहेत. आज ७८ व्या वर्षीही समाजमनात एकात्म भाव रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. त्यांनी आजतगायत कर्नाटकाबाहेर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथेही प्रवचन केले आहे.
इतर धर्मांचा सन्मान हीच एकात्मता
आपला धर्म, मते नीटपणे समजून घेऊन आपल्या जीवनात  ते चांगल्याप्रकारे आचरणात आणणे,  इतरांच्या धर्म, मतांचे अत्यंत प्रामाणिकपणे सन्मान करणे म्हणजे एकात्मता होय, असे इब्राहिम सुतार यांनी सांगितले. आपला धर्म जितका सत्य आहे,  इतरांचाही धर्मही तितकाच सत्य आहे या भावाने प्रेमपूर्वक स्वीकारणे. तसेच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच्या आराधनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसे आपल्या मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचणे शक्य आहे अगदी तसेच इतरांच्या मार्गानेही ईश्वराचा साक्षात्कार होणे शक्य आहे, हे स्वीकारुन त्या मार्गांचा प्रेमपूर्वक स्वीकार, त्यांचा गौरव हेच एकात्म  असे ते म्हणाले. तसेच मतांतरणही अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले.  एकात्मतेविषयी सांगताना  बसवण्णा, भगवान रामकृष्ण, सुफी संतांच्या वचनांचा उल्लेख करत ते  म्हणाले, एकता से बढकर कोई इबादत नहीं, लडने की वेद, कुरान में नसीहत नहीं, मालिक भी एक हमारा, मजहब भी एक हमारा, हर इन्सान बंधू हमारा, संतोंने यही पुकारा।।

Thursday, 30 November 2017

कडूनिंब पेरले तर उगवलेल्या झाडाला आंबे लागतील?!

 






शिशुनाळ शरीफ, सर मिर्जा इस्माईल, अब्दुल कलाम आदी प्रेरक आदर्श समोर असतानाही आपल्या सेक्युलरवाद्यांना मात्र, ते दिसत नाहीत. यांना तुष्टीकरणासाठी टिपूच्या जयंतीसारखे कार्यक्रमच हवेत.  

-  डॅनी परेरा, हासन
वादग्रस्त व्यक्तींना देशाच्या जनमानसांत रुजवण्याचा प्रयत्न भारतात पूर्वीपासून निरंतर चालला आहे. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील काही इतिहासकार खोटेच सत्य भासवण्याच्या प्रयत्नात सफल झाले आहेत. त्यांच्या विचारानुसार देशभक्त खलनायक तर खलनायक देशभक्त आहेत.
टिपू जयंती विवाद पुन्हा निर्माण झाला आहे. काहीना टिपू धर्मनिरपेक्ष तर काहीच्या दृष्टीने मतांध आहे. मुसलमानांतच या देशासाठी मोठे योगदान दिलेली महान मडंळी आहेत. त्या कोणाकडेही समाज धार्मिक नजरेने पाहत नाही. ते इस्लामी विचारधारेत वाढले असले तरी त्यांनी आपली जीवनदृष्टी विशाल बनवल्याने मुस्लिमेतरांतही ते आदरणीय आहेत. मात्र, सेक्युलरांच्या यादीत त्यांना महत्वाचे स्थान नाही. या देशातील अल्पसंख्यक समाजात आदराचे स्थान असलेलेच धर्मनिरपेक्ष असा या सेक्युलर कंपुचा अघोषित नियम आहे. धार्मिक सलोख्यासाठी अडथळा ठरणारी ही बाब आहे.
आदरणीय राष्ट्रपती अब्द्राल कलाम कलाम हे एक धर्माभिमानी मुस्लिम होते. त्यांचा सर्वधर्म समन्यवय भाव हा वैश्विक होता. ते कर्मठ मुसलमान नसल्या कारणाने आपल्या समाजात सर्वमान्य नव्हते! त्यांच्या सर्वधर्म समभावाचा समान्य जनता तसेच मठाधीश, मान्यवरांनी गौरव, आदर केला. त्यामुळे घोषित धर्मनिरपेक्षतावादी कलाम यांचा समन्वयभाव आदर्श म्हणून स्वीकारले नाहीत.
शिशुनाळ शरीफ यांना कर्नाटकाचे 'कबीर दास' म्हणून ओळखले जाते. हिंदू, मुस्लिम हा भेद न बाळगता सर्वच लोक त्यांना संत म्हणून त्यांच्याकडे पाहतात. शरीफ हे सर्व भारतीय मूल्यांचा सन्मान करत होते, त्यामुळे ते येथील हिंदूंशी समरस झाले. मात्र, कर्मठांनी त्यांना दूर ठेवल्याने ते सेक्युलर कंपुचे ध्रुवतारा बनू शकले नाहीत. 
प्रख्यात कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांनी उल्लेखिलेला हा एक प्रसंग : त्याकाळी म्हैसुरू सुंदर, स्वच्छ गाव होते. दिवस उजाडताना एक अधिकारी घोड्यावर बसून रस्ते स्वच्छ केलेत की नाहीत हे पाहण्यासाठी येत होते. ते मिर्जा इस्माईल ! जे म्हैसुरूचे दिवाण होते. 'मिर्जा इस्माईल यांचा संभावितपणा, व्यक्तित्व याप्रमाणेच त्यांच्या ज्ञान, समज, विनोदी स्वाभाव, सांस्कृतिक चेतनेने त्यांना अत्यंत श्रेष्ठ आणि यशस्वी प्रशासक बनवले' असे सर सी. व्ही. रामन यांनी सांगतिले आहे. नाल्वडी कृष्णराज वडेयर आणि मिर्जा इस्माईल या जोडीचा काळ म्हैसुरू संस्थानचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. वेगवेगळ्या धर्माचे असले तरी बांधवांप्रमाणे एकत्रितपणे केलेले यांचे कार्य आवडल्याने महात्मा गांधी यांनी 'येथे रामराज्य आहे' असे म्हटले होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या त्या काळात काँग्रेस सारख्या चळवळी चालवायची. तेव्हा मिर्जा इस्माईल यांच्यामुळे गांधी, नेहरू यांच्यासारख्या नेत्यांशी महाराजांचे आत्मीय संबंध राहिले. या चळवळींच्या काळात मिर्जा इस्माईल यांच्या दक्षतेमुळेच कधीही दंगली उद्भवल्या नाहीत. १९४१ मध्ये जयपूर संस्थानातही कार्यरत असताना सर मिर्जा इस्माईल यांनी आपल्या दक्ष कारभाराचा ठसा उमटवला. त्यामुळे जयपूर शहरात औद्योगिक क्षेत्राने एक नवे युग अनुभवले. फाळणीनंतर पाकिस्तानच्या आधुनिकीकरणासाठी तिकडचे नागरिकत्व स्वीकारण्याचे  महमद अली जिना यांनी आवाहन केले होते. मात्र, मिर्जा यांनी त्यांची विनंती फेटाळली. 'भारताच्या फाळणीला माझा स्पष्ट विरोध आहे' असे थेट जिना यांना कळवले.
  १९४६ मध्ये हैदराबादचे दिवाण असलेले मिर्जा इस्माईल यांनी  कोणत्याही तक्रारीविना संस्थान भारतात विलीन करण्यासाठी निजामाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे न ऐकल्याने त्यांनी काही महिन्यांतच त्यांनी दिवाण पद सोडले. मिर्जा इस्माईल कर्मठ मुसलमान नव्हते. त्यामुळे सेक्युलर कंपुने त्यांना समन्वयाचा आदर्श म्हणून स्वीकारले नाही.
केवळ ही काही उदाहरणे. याप्रमाणे जात, मत, पंथाच्या पलिकडील व्यक्ती मुस्लिम समाजात आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
असंख्य देशभक्त, सर्वधर्म समन्वय स्वीकारलेले मुसलमान या देशात आहेत. मात्र, देशाच्या फाळणीनंतर अशा श्रेष्ठ समन्वयभावी विचारांच्या व्यक्ती, सर्वांच्या भावनांचा आदर राखत सामरस्याचे अग्रणी बनलेल्या मुसलमान मेरुपुरुषांना पुढे आणून त्यांच्या आदर्श जीवनाची ओळख करुन देण्याचे काम या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस अथवा इतर सेक्युलर पक्षांनी आणि डाव्या विचारवंत, बुद्धीजीवींनी केले नाही. कबीरदास, शिशुनाळ शरीफ, मिर्जा इस्माईल, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ए पी जे अब्दुल कलाम, अश्फाकउल्ला खान यांच्यासारख्या संतश्रेष्ठ, समाजसेवक, शास्त्रज्ञ, क्रांतिकारकांची समाजाला आणखी ओळख व्हावी, त्यांचे सामरस्यपूर्ण दिव्य संदेश देणारे, हिंदू - मुस्लिम - ख्रिश्चन हे सर्व एकच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपूर्व संधी गमावल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही जाती, मतांच्या नावाखाली भांडणे सुरुच आहेत. इतिहासातून न शिकल्यामुळेच तुष्टीकरणाचे विषवृक्ष अधिक बहरले आहे. हिंदू - ख्रिश्चनांच्या भावनांवर गदाप्रहार करत त्यांचे मतांतर घडवून, न स्वीकारणाऱ्यांची हत्या केलेल्या टिपूला सामरस्याचा प्रतीक म्हणून स्वीकारणे, त्याचा धर्मनिरपेक्ष म्हणून उदोउदो करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांना काय म्हणावे? मतांधांनाही राष्ट्रवादी म्हणून तुष्टीकरण केले जात आहे, हे म्हणायला काही खुप ज्ञानाची आवश्यकता नाही. आणखी किती काळ हे सामरस्याचे नाटक? कडूनिंब पेरले तर उगवलेल्या झाडाला आंबे लागतील?!
(साभार : विजयवाणी, लेखक प्राध्यापक, हौशी लेखक आहेत.)

क्रौर्यातच वाढलेला देशप्रेमी कसा होऊ शकतो?

टिपू स्वातंत्र्ययोद्धाही नाही. देशप्रेमीही नाही. मात्र, त्याच्याविषयीची काही खोट्या गोष्टी सातत्याने जोरकसपणे सांगितल्याने टिपूचे व्यक्तित्व विशेष प्रभावी असल्याचा भास होतो. टिपूने आपल्या स्वार्थासाठी क्रौर्यच पेरला होता.
डाॅ. एम. चिदानंद मूर्ती

टिपू वीर होता. भारतात, कर्नाटकातील वीरही त्याच्यासारखे लढून हौतात्म्य पत्करले आहेत. त्यात राजे, सैनिकही आहेत. खेडूतही आहेत. त्यांचे शेकडो शिलालेख उपलब्ध आहेत. सैनिक, खेडूतांच्या शौर्याच्या गौरवगाथ सांगणाऱ्या शेकडो वीरगळही संपूर्ण कर्नाटकात सापडतात.
पुरुषांइतकेच वीर स्त्रियाही लढल्या आहेत. उदाहरणार्थ, मध्य भारतातील झांशीची राणी लक्ष्मीबाई, कर्नाटकातील बेळवडी मल्लम्मा, वीरराणी कित्तूर चन्नम्मा, अकराव्या शतकातील चालुक्य राणी अक्कादेवी आदी.
टिपू 'देशप्रेमी', 'स्वातंत्र्ययोद्धा' नाही. पूर्वी अनेक राजे आपल्या राज्याच्या रक्षणासाठी लढले. टिपू देशप्रेमी असेल तर तेही देशप्रेमीच असतील. ते आपापल्या राज्याच्या रक्षणासाठी लढले. आधुनिक भारताचे स्वातंत्र्ययोद्धे आपल्या स्वार्थासाठी नव्हे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक मार्गाने लढले. सुभाषचंद्र बोस यांनी आपली मातृभूमी ब्रिटशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी होतात्म्य पत्करले. स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान अथवा राष्ट्रपती होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. टिपू ब्रिटिशांच्या विरोधातील लढाईत जिंकला असता तर तो पूर्वीप्रमाणेच राज्याचा अधिपती म्हणून मिरवला असता. ब्रिटिशांच्या विरोधात लढणारा टिपू हा काही पहिलाच नव्हता. बंगालचा नवाब सिराजुद्दीन, महाराष्ट्रातील पेशवे, झांशीची राणी लक्ष्मीबाई हेही ब्रिटिशांच्या विरोधात लढले. त्यामुळे या विषयात टिपूला कोणतेही विशेष प्रशस्ती देण्याची गरज नाही.
टिपूने दारुची  विक्री थांबवून सर्व शिंदीची झाडे तोडायला लावली, ही चांगली गोष्ट आहे. पूर्वीच्या राजांप्रमाणे त्यानेही रस्ते बांधले, कन्नबांडी धरण बांधले (कन्नबांडी धरणाचे काम त्याच्यापूर्वीच्या चिक्कदेवराज वडेयर याच्या काळात सुरू झाले होते.). मात्र, त्याने काही ठिकाणी हिंदूंच्या नेमणुका केल्या असल्या तरी आर्थिक व्यवस्था पाहण्यासाठी खजिन्याच्या प्रमुखांचे स्थान मुसलमानांसाठीच राखून ठेवले होते. त्याचे निष्ठावंत पूर्णय्या यांच्याच धर्मांतरणाचा प्रयत्न केला. (हे टिपूच्या मुलाच्या पुस्तकातच याचा उल्लेख आहे.). केवळ म्हैसूरुच्या राजांनी बांधल्याच्या एकमेवर कारणाने म्हैसूरुजवळील तलावाचा विद्ध्वंस केला. त्याच्या क्षेत्राची नासधूस केली. (आजच्या राजवाड्यासमोरील खेळाचे मैदान). नवव्या शतकातील राणी चेट्टलदेवी तलाव, विहीर, मंदिर बांधले, त्याच काळात आदिगौड रयत तलाव, पाणपोया बांधल्या. हे राजेमंडळी, लोकांचे कर्तव्य होते.
टिपूने हिंदू धार्मिक संस्थांना दान दिल्याचा अनेकांनी खुपच गाजावाजा केला आहे. आताच मी स्पष्ट केल्याप्रमाणे त्याने दान देण्यामागे दोन कारणे आहेत. एक आपल्याला येऊ शकणाऱ्या संकटांच्या निवारणासाठी दान दिले असावे. संबंधित मठाधीश, भक्त, आपल्या प्रदेशातील हिंदूंचा विश्वास कायम राखणे हा दान देण्यामागचा हेतु आहे. त्याच्या अंमलाखालील श्रीरंगपट्टण, नंजनगुडू, म्हैसुरू प्रदेशातील जनेतेचा विश्वास राखून आपली राजवट आणखी बळकट केल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही त्या प्रदेशात काही अन्याय केला. ते अन्याय केला नसता तर त्याला समाधान झाले नसते. उदाहरणार्थ, श्रीरंगपट्टणमधील अंजनेय मंदिर पाडून मशीद बांधली. मात्र, तेथील रंगनाथ स्वामी देवस्थानच्या नादी लागला नाही - कारण तेच त्या प्रदेशाचे अधिदैवत. म्हैसुरुतही राजवाडा पाडून काही मंदिरे नष्ट केली. मात्र, त्याने दूरच्या कोडगू, मलबारमध्ये घोर अन्याय केला. त्याविषयीचे स्पष्ट पुरावे आहेत. त्याने दिलेले दान त्याने केलेल्या घोर अन्यायावर पडदा टाकण्यास असमर्थ ठरले आहेत. आताचे राजकारणी, गर्भश्रीमंत देवस्थानांना भेटी दिल्याच्या प्रसारमाध्यमात बातम्या होतात. त्यांनी दिलेल्या मोठमोठ्या देणग्याही बातम्या बनतात. मात्र, गरीब देवस्थानात जातात ते खऱ्या भक्तीने; त्यांनी अर्पण केलेल्या वस्तू मोठ्या बातम्या बनत नाहीत. तेवढेच नव्हे तर ती बातमीच नाही.
टिपूचे क्रौर्य, मतांधता, हे तर स्पष्टातिस्पष्ट आहे. हे त्याच्या शिलालेख, हस्तलिखिते (उदाहणारणासाठी : केरळच्या आपल्या सेनापतीला लिहिलेले पत्र - You sHould capture and kill all hindus). त्याच्या तलवारीवर लिहिलेले (''This Victorious... ... is lightning to kill all kafirs''), त्याच्या मुलाच्या पुस्तकातील उल्लेख आदी मूलभूत पुरावे हे सूचित करतात.  त्याचे अंतरंग, धोरण, मन - त्याच्याही पूर्वीच्या उत्तर भारतातील घोरी, गजनी, बाबर, औरंगजेब यांची परंपरा त्याने पुढे नेली. कुवेंपु यांनी आपल्या एका मुलाखतीत एक गोष्ट सांगितली आहे. बांग्लामुक्तीच्या पार्श्वभूमीवर - 'ते (बांग्लामुक्ती) स्पष्ट करण्यासाठी कोणतीही भौतिक कारणे नाहीत.; धार्मिक कारणे आहेत. त्यामुळेच आपण हिंदू धर्मासाठी प्राण द्यायला हवे, असे म्हणतो. मात्र, मुस्लिम धर्मासाठी प्राण घ्यायला हवे, असे म्हणतात. इतकाच फरक आहे.' अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डाॅ. सी. पी. कृष्णकुमार यांनी पूर्वी डाॅ. कुवेंपू यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी हे सांगितले. डाॅ. पी. पी. कृष्णकुमार यांनी २१ जानेवारी २०१३ रोजी मला लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. - ''टिपू विवादाशी संबंधित हे पत्र - कुवेंपू यांच्या साहित्यात; काव्यात, 'मलेगळल्ली मदुमगळु' कादंबरीसह सर्वत्र मुस्लिम विरोधी अभिप्राय आहे. त्यांनी मी वर उल्लेखिलेले कुवेंपु यांचे वक्तव्य माझ्या निदर्शनास आणून दिले. हे मृतप्राय भारतीयांना खडबडून जागे करणाऱ्या डिंडिमासारखे होय. एकूणच टिपूच्या मुस्लिम मनोधर्माचा हा एक नमुना होय. याला काही अपवादही आहेत. खंडितच सर्वच मुस्लिम वाईट नाहीत.
पर्शियन राज्यभाषा : टिपू सत्तेवर येईतोवर म्हैसुरूची राज्यभाषा अथवा प्रशासकीय भाषा कन्नड हीच होती. टिपूने ती रद्द करुन त्या जागी पर्शयिन अथवा पर्सो - अरेबिक (Perso - Arebic) भाषेला स्थान दिले. त्याचे सगळे शिलालेख, आदेशपत्रे पर्शियन भाषेत आहेत. त्या काळी खुपच कमी प्रमाणात कन्नड भाषेचा वापर केला जात होता, मध्यम प्रमाणात पर्शयिन आणि मराठी भाषेचा वापर केला जात होता. सर्वोच्च पातळीवर केवळ पर्शियन भाषेचा वापर केला जात होता. टिपूनंतर सत्तेवर आलेल्या म्हैसुरूच्या राजांनी पुन्हा प्रशासकीय भाषा म्हणून कन्नड भाषेचा वापर सुरू केला. लक्ष वेधण्याची बाब म्हणजे - हैदर, टिपू यांच्यापूर्वीच्या हिंदू राजांच्या काळात शेकडो साहित्यांची निर्मिती झाली. टिपूच्या राजवटीत त्याच्या प्रोत्साहनाने कन्नडमध्ये कोणतेच साहित्य निर्माण झाले नाही. (वाचा - आर. नरसिंहाचार ; कर्नाटक कविचरित्रे). परंतु कोणत्याही कवी अथवा रचनाकाराने हैदर अथवा टिपूचा उल्लेख केला नाही. मात्र, म्हेसुरूच्या राजांनी दिलेले प्रोत्साहन सर्वज्ञात आहे.
(लेखक ज्येष्ठ संशोधक, साहित्यिक आहेत. )
साभार : विजयवाणी





Sunday, 29 October 2017

बेंद्रे यांच्या साहित्यातील शरण तत्त्वाचे चिंतन

बाराव्या शतकात  बसवण्णा, अल्लमप्रभू आदि शरणांनी लोकभाषा कन्नडमधील वचन साहित्याच्या माध्यमातून कर्नाटकात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक जागृती घडवली. कर्नाटकातीलच ज्ञानपीठ विजेते महाकवी द. रा. बेंद्रे यांनी शरणतत्त्व हाच आपला श्वास मानला. गेल्या शतकात शरणांच्या विषयी विविध साहित्य लिहिले गेले. मात्र, काव्य माध्यमातून ते समर्थपणे अभिव्यक्त करणारे आणि लौकिक भावनांच्या अभिव्यक्तीसाठी वचनशैलीचा वापर करणारे  नवोदय काव्याचे प्रमुख कवी असलेले बेंदे हे पहिले कवी होते. त्यांच्या साहित्याचे जीवनभर आद्यांतापर्यंत अभ्यास, त्यांची जनपद भाषा, त्यांचा आध्यात्मिक मनोभाव याचा दर्शन केलेले डाॅ. जी. कृष्णप्पा यांनी त्यांच्या साहित्यातील शरणतत्त्वांच्या चिंतनाचे आपल्या 'बेंद्रेयवर साहित्यदल्ली शरण चिंतने' या पुस्तकात निरुपण केले आहे. ३६ पुस्तकांतही मावणार नाही अशा शरण संस्कृती, शरण दर्शनाचं सार त्यांनी 'गागर में सागर' याप्रमाणे केवळ ३६ पानांत निरुपिले आहे. इतक्या संक्षिप्तपणे केलेले हे निरुपण ग्रंथकर्त्याच्या अगाध अभ्यासाचे फळ म्हणावे लागेल.
शरणक्षेत्र धारवाडमध्ये बेंद्रे यंचा जन्म झाला. जाती, मत, पंथ, सोवळेओवळे, श्रीमंती, गरीबी हा भेद त्यांच्या मनाला शिवला नाही. वेदांचे पाठ, जंगमांची वचने,  करडीकुणित (स्थानिक लोकनृत्य), बयलाट आदि जीवपोषक द्रव्यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. मात्र, ते पाश्चात्त्य प्रेरणेला बळी  पडले नाहीत.  देशी प्रज्ञेने त्यांचे काव्य फुलले. त्यांना सर्वज्ञ, हरिहर, लक्ष्मीश, वचनकार आणि हरिदासांविषयी आत्मीयता होती. 'बेळगु' काव्यासाठी त्यांनी सदानंद जंगम हे काव्यनाम स्वीकारले. १९२० - २१ मध्ये 'नोविन बेले', 'हिग्गिन नेले' आदि वचने लिहिल्याचे 'उय्याले' काव्यसंग्रहाच्या मनोगतात बेंद्रे यांनी सांगितले आहे. 'उय्याले'  मधील 'करुळीन वचनगळू'  वात्सल्यांची रसलहरीच. गर्भवती स्त्रीमध्ये अपत्यप्राप्तीचा अनुभव अलौकिक शक्ती निर्माण करते, हे सांगणाऱ्या 'अलौकिक' वचनांत  अल्लमप्रभूंच्या वचनांचा प्रभाव दिसतो.
बेंद्रे यांचे 'दवन हुण्णिमेय जात्रेय रात्री' हे काव्य शिवाचे प्रतीक आहे. लेखक कृष्णप्पा म्हणतात की, शिवध्यानी बेंद्रे यांनी प्रकृतीत अनुभवलेले लिंगवैभव भारतीय साहित्यातच विशिष्ट आहे. निसर्गातील समतत्त्व, त्याच्या अमृत पोषणामुळे जगणारे सकल जीवराशी, त्यावरील विश्वासाला पात्र शिवरुप हेच बेंद्रे यांचे शिवानुभव. वेद, उपनिषदांचे सार जाणून बसवण्णांनी संपूर्ण मानवजात एकच हे तत्त्व सांगण्यासाठी सामाजिक क्रांती घडवली. कायकतत्त्वापासून दार्शनिकत्वापर्यंत त्यांनी ध्वजा फडकावली. असे क्रांतिकारी बसवण्णा बेंद्रे यांच्यासाठी महात्मा होते. त्यांनी 'वृषभोरोरविती' हे काव्य रचले. भूतदयेचे साक्षात्कारी बसवण्णा हे समानतेचे पुरस्कर्ते असल्याचे बेंद्रे यांनी या काव्यात सांगितले आहे. 'कर्नाटकद इतिहास पुरुषरू' या प्रकरणात कृष्णप्पा यांनी बसवण्णा, अल्लमप्रभू, अक्कमहादेवी यांच्याविषयीचे बेंद्रे यांचे चिंतन मांडले आहे. 'तुंबी बंदीत्तु' या रुपकात्मक काव्यातून बसवादि शरणांच्या मधुरभावाचे मधुर जीवन सकल जनांत भरुन गेल्याचा काल मांडल्याचे सांगितले आहे.
बेंद्रे १९४४ ते १९५६ पर्यंत सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात होते. त्यामुळे त्यांच्या सिद्धराम या प्रकरणाचा विशेष उल्लेख करावा लागेल. सोलापुरात आल्या वर्षीच वयाला आलेला मुलगा रामचंद्र, पुढच्या सात दिवसांतच लहान मुलगा आनंद याचे निधन झाले. बेंद्रे यांना तीव्र दु:ख झाले. अशाप्रसंगी सिद्धरामेश्वर देवस्थानची त्यांच्या आध्यात्मिक साधनेत प्रमुख भूमिका राहिली. त्यांनी सिद्धरामेश्वरांचे कायततत्त्व, लिंगांग सामरस्य आणि  स्त्री, सोनेनाणे या विषयांच्या मोहापलिकडील सिद्धत्व, साधनामार्ग याविषयी 'सिद्धरामर वचनवन्नु नेनेदु' हे काव्य रचले. 'चेन्नलिंगवे' या काव्यातून त्यांचे मित्र तत्त्वचिंतक हलसंगीचे मधुरचेन्न यांच्याविषयीचा, विनायक गोकाक, शंकरगौड पाटील, शिंपी लिंगण्णा यांच्याविषयीच्या  बेंद्रे यांच्या शरणबंधुत्वावर 'शरण बांधव्य' या प्रकरणात लेखकाने प्रकाश टाकला आहे. बेंद्रे यांचे शिवध्यानातील भावैक्य सामरस्य, भक्त,  प्राण, लिंग, शक्ती, इष्टलिंग याविषयीच्या चिंतनाचे कृष्णप्पा यांनी सुलभपणे निरुपण केले आहे. एकूणच शरणांनी वचनसाहित्य, शिवभक्ती, कायतत्त्वानुसार जीवन, दासोह आणि आध्यात्मिकता या माध्यमातून केलेल्या ऐतिहासिक  कार्याविषयी बेंद्रे यांनी म्हटले आहे, ' कन्नड शिवशरणांनी आपल्या भक्तीच्या युक्तीने कैलासाला कल्याणला आणण्यासाठी केलेली अद्भुत साधना कर्नाटकाच्या,  नव्हे भारताच्या, तेवढेच काय संपूर्ण जगाच्या इतिहासात रोमहर्षक आहे.
डाॅ. जी. कृष्णप्पा यांनी जानेवारी २०१५ पासून बसव समितीच्या 'बसव पथ' मासिकाच्या कन्नड आवृत्तीत सलग चार महिने बेंद्रे यांच्या साहित्यात शरण चिंतन ही लेखमाला लिहिली. या माध्यमातून त्यांनी बेंद्रे यांच्या साहित्याला व्यापलेल्या शरण चिंतनावर टाकलेल्या प्रकाशाला वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या लेखमालेचा अमूल्य ठेवा पुस्तकरुपात बंगळुरुच्या वंशी प्रकाशनाद्वारे वाचकांसमोर आणला आहे. योगी अरविंद यांचे चिंतन, कवी कुवेंपु यांच्या काव्याचे समग्र चिंतन केलेले ज्येष्ठ साहित्यिक को. चेन्नबसप्पा यांची प्रस्तावना लाभली आहे.
बेंद्रेयवर साहित्यदल्ली शरण चिंतने
लेखक : डा. जी. कृष्णप्पा
प्रकाशक : वंशी प्रकाशन,  बंगळुरू
किंमत :  ३० रुपये

Sunday, 9 April 2017

शिवयोगिनी अक्कमहादेवी

सोमवार, दि. १० मार्च २०१७ रोजी चैत्र पौर्णिमा. शिवयोगिनी अक्कमहादेवी यांचा जन्मदिवस. यानिमित्त  डाॅ. शिवानंद शिवाचार्य स्वामी यांचा कन्नड बोधीवृक्ष पुरवणीत प्रसिद्ध झालेला हा लेख. 
कण्गे श्रृंगार गुरुहिरीयर नोडुवदु.
कर्णक्के श्रृंगार पुरातनर संगीतंगळ केळुवुदु.
वचनक्के श्रृंगार सद्भक्तर नुडिगडण.
करक्के श्रृंगार सत्पात्रक्किवुदु.
जीविसुव जीवक्के श्रृंगार गणमिळाप.
ईविल्लद जीविय बाळुवे एतक्के
बातेयय्या चेन्नमल्लिकार्जुना ?
हे अक्कमहादेवीचे वचन. या वचनात अक्कमहादेवीने सुंदर गोष्टी सांगितल्या आहेत. तिने या वचनात सांगितलेली एकेक गोष्ट 'आदरणीय' आणि 'अवधारणीय' आहे. तिने सांगितलेल्या कानगोष्टी आपण  अंगिकारल्यास दु:ख, संकटे, अडचणी, तापत्रय हे आपल्या जीवनात जवळही फिरकणार नाहीत. या वचनात अक्कमहादेवीने आनंद मिळवण्यासाठी डोळे, कान, हाताने काय करावे, काय काय करावे ? याविषयी मार्गदर्शन केले आहे.

अक्कमहादेवी ‘कण्गे श्रृंगार गुरुहिरीयर नोडुवुदु’ (डोळ्यांना श्रृंगार गुरुज्येष्ठांना पाहण्याचे) म्हणून सांगते. कण्गे म्हणजे कण्णुगळिगे (डोळ्यांना) असा अर्थ. डोळ्यांना काय श्रृंगार, तो कोणता श्रृंगार असे विचारल्यावर अक्कमहादेवी सांगते, गुरू, ज्येष्ठांना  डोळे भरुन पाहणे म्हणजे डोळ्यांना श्रृंगार.  डोळ्यांसाठी नित्य गुरू, ज्येष्ठांच्या दर्शनाशिवाय आणखी कोणते मोठे श्रृंगार ? अक्कमहादेवी आणखी सांगते, कर्णक्के श्रृंगार पुरातनर संगीतंगळ केळुवुदु. कर्ण म्हणजे कान. कानांसाठी कोणते श्रृंगार हे विचारल्यावर संगीत ऐकायचे, असे अक्कमहादेवी म्हणते. तिने त्या काळातही संगीत ऐकावे असे सांगितले आहे तर मग आजचे संगीत ऐकणाऱ्या आम्हा लोकांची काय स्थिती असेल ? हा टिकेचाच विषय आहे.
अक्कमहादेवी पुन्हा सांगते, वचनक्के श्रृंगार सद्भक्तर नुडिगडण. बोलता बोलता सद्भक्तांच्या शब्दसंपत्तीचा वापर केल्यास त्याहून मोठे श्रृंगार ते कोणते ?  श्रृंगार म्हणजे भूषण. सद्भक्तांची वचने आपल्या भाषेचे सौंदर्य वाढवतात. शरण आणि सद्भक्तांच्या वचनांत विशेष काय आहे? अशी विचारणा करणाऱ्यांनी जेडर दासिमय्या यांचे हे वचन वाचावे. तेव्हा अशा प्रवृत्तीच्या लोकांना सद्भक्तांच्या वचनाचे सामर्थ्य लक्षात येईल. अक्कमहादेवी पुन्हा सांगते, ' करक्के श्रृंगार सत्पात्रक्किवुदु' कर म्हणजे हात. ईवुदु म्हणजे देणे. 'हाताला काय भूषण ?' म्हणून विचारल्यावर अक्कमहादेवी, सत्पात्री दान करणे हे हाताला भूषण असे सांगते. 'जीवीसुव जीवक्के श्रृंगार गणमिळाप' मिळाप म्हणजे संग, सहवास. गणमिळाप म्हणजे सत्संग, सज्जनसहवास होय. जीवनाला एक अर्थ प्राप्त व्हावयाचे तर, जीवनाला एक नवा आयाम लाभावयाचे तर सत्संग आवश्यक आहे. तसेच सज्जनांचा सहवास गरजेचा आहे. सज्जन हे आपल्याला जीवनमूल्याचा परिचय करुन देतात. ते आपल्याला जीवन कसे जगावे याची शिकवण देतात. हे समजून न घेणारे लोक बाजाराचा संग करुन चिंतेच्या चितेत जळत राहतात.
अक्कमहादेवी सांगते, 'इविल्लद जीविय बाळुवे एतक्के बातेयय्या चन्नमल्लिकार्जुना?' इविल्लद म्हणजे  हे नसलेले १ गुरुज्येष्ठांचे दर्शन न करता असलेले २ पुरातनांचे संगीत न ऐकता असलेले ३ शरणांच्या वचनांचा आपल्या जीवनात वापर न करणारे ४ सत्पात्री दान न करणारे ५ आजीवन सज्जनांचा सहवास, सत्संग न लाभलेले यांचे जीवन कशालाही उपयोगी नाही.

Saturday, 18 March 2017

राजविद्या


धर्मामुळेच जीवनाला समृद्धी, ईश्वराचे दिव्यानुभव, परमशांती मिळते. धर्माअभावी जीव - जगत विनाशाकडे जाईल. एकूण धर्मामुळेच जीव - जग बहरेल. धर्म सोडल्यास मनुष्याला शांती, समाधान मिळू शकणार नाही. हृदयाचे माधुर्य हेच धर्म होय. असा हृदय नसल्यास, आणखी काहीही असले तरी काय प्रयोजन?
घराजवळच रंगीबेरंगी फुलांची बाग आहे. एकही दिवस तेथे गेले नाही. डोळे उघडून पाहिले नाही. हे जगच एक फुलबाग आहे. हे डोळे उघडून पाहण्याचा एक प्रयत्नही केला नाही तर कसे? शंभर वसंतांच्या या जीवनात प्रपंचाच्या बाजारातून एकही दिवस बाहेर आला नाही. सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त पाहिला नाही. अनंत आकाशात चमचमणारे तारे पाहिले नाहीत. पक्ष्यांच्या गायनात सूर मिसळले नाहीत. मोराच्या मनमोहक नृत्याचा आनंद अनुभवला नाही. मूक, मुग्ध पशूंच्या डोळ्यांतील निर्मल भावसागरात डुबकी मारली नाही. असे झाले तर शंभर वसंतांचे आमचे जीवन कसे संतोषमय बनेल? 
या सत्यं शिवं सुंदरम् अशा सृष्टीचे मर्म जाणणारी दिव्य  कलाच धर्म होय. जगातील महात्म्यांनी आयुष्यभर अशा धर्माविषयी चिंतन - मंथन केले. देवर दासिमय्या यांनी आपल्या एका सुंदर वचनातून धर्माचे सत्यस्वरुप उलगडून दाखवले आहे. 
धर्मवनेत्तुववर धर्मिगळेंबिरी
निम्म धर्मवनारू अविवरिल्ला!
धर्मगळनिक्की उत्त भूमिय डोणी
निनेत्मनेल्लर नोडी सलहिदै रामनाथ.

कोणीतरी बनवलेले स्वयंपाक आणून देवाला नैवेद्य म्हणून दाखवणार्‍यांना काहीजण धर्मवंत म्हणतात. खरे देव, धर्म कोणते हे कोणीही जाणून घेऊ शकतो. परंतु देवाने मात्र विश्‍वातील सकल जीवराशींना फळे, धान्य, पाऊस, वारा, प्रकाश आदी देऊन करुणा दाखवली आहे. त्या महादेवाने दिलेले दुसर्‍यांना देऊन आपण दानधर्म केल्याचे सांगणे, त्याचा अभिमान बाळगणे योग्य आहे? त्या महादेवाने या गर्द हिरव्या निसर्गात करुन ठेवलेले पंचक्वान्नाचे स्वयंपाक साधारण नाही. तो महादेवच महान पाकशास्त्रज्ञ! त्याच्यासारखे फुले, फळे, दूध मध, धान्य बनवणे कोणाला साध्य आहे? धर्मसागर असलेल्या महादेवाने बनवलेले हे स्वयंपाक देवाचा प्रसाद म्हणून भक्तिभावाने स्वीकारुन संतोषाने राहणे हेच आपले धर्म! आपले कर्तव्य! भगद्गीतेत हे धर्म अथवा आध्यात्मिक विद्येच्या संदर्भात खुपच सुंदर वर्णन केले आहे- 
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम।
प्रत्यक्षावमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम॥

ही आत्मविद्या सर्व विद्येचा राजा होय. तेवढेच नाही ही अत्यंत श्रेष्ठ, पवित्र, मंगलकारी, धर्मस्वरुपी आहे. अनुसरण्यास सुलभ आहे. अविनाशी आहे!
हसत हसत सदा प्रसन्नचित्त राहणे हेच धर्म होय. ही आध्यात्मविद्या, राजविद्या आहे. गंभीर राहणे हे कष्टदायक आहे. सतत हसत हसत संतोषमय, विजयी भावाने राहणे हे काही फारसे कष्टाचे नाही. हृदय स्वच्छ अथवा मन मुग्ध बालकाचे बनल्यास पुरेसे आहे. हसर्‍या चेहर्‍याचे झोपडीत असले तरी ते राजवाड्यासारखे वाटते. रडक्या चेहर्‍याचे राजवाड्यात असले तरी ती झोपडीपेक्षाही कनिष्ट वाटते. 
एका श्रीमंताच्या घरासमोरील झाडावर बसून एक पक्षी दिवस उजाडताच गात होते. एके दिवशी श्रीमंत पक्ष्याला विचारला, “तू सतत इतक्या खुशीत गातोस कसा काय? अपार संपत्ती गोळा करुन ठेवलास काय?’’ पक्ष्याने सांगितले, “ या झाडावर असलले गवत, काड्यांचे घरटे, त्यात असलेले दोन अंडे हेच माझी संपत्ती. तरीही आम्ही गात राहतो. कारण आमचा जन्मच गाण्यासाठी, आकाशात उडडण्यासाठी झाला आहे. तुमच्याप्रमाणे जमीन धरुन बसायला नव्हे!!’’ हसतहसत जगायला आणखी कशाची आवश्यकता नाही, निर्मल हृदय हे एक असले तर पुरेसे आहे, याची जाणीव श्रीमंताला आता झाली. 
हजारो वर्षांपूर्वी याच भूमीत उपगुप्त नावाचा एक सुप्रसिद्ध बौद्ध संन्यासी होऊन गेला. हा धर्मोपदेश करत एका गावी आला. त्या गावी एगक श्रीमंत नर्तकी होती. तिच्या सौंदर्यावर, संगीतावर फिदा होऊन त्या गावातील लोक आपली संपत्ती उधळायचे. उपगुप्त तिच्या घरी भिक्षेसाठी गेला. उपगुप्ताच्या सौंदर्याला भाळलेली नर्तकी स्वत:सह आपली संपत्ती त्याला अर्पण करण्यास सिद्ध झाली. उपगुप्त सांगितला - “ मी आता अन्नाच्या भिक्षेसाठी आलो आहे, सोन्याच्या भिक्षेसाठी नव्हे; योग्य वेळ येताच मी परत येईन. त्यावेळी आणखी काहीतीर वेगळं दे!’’आज नाही तर उद्या कधीतरी उपगुप्त येईल, या भरवशाने नर्तकी गप्प बसली. काळ गेला. नर्तकीला महारोग झाला. सर्व गावकर्‍यांनी तिला गावाबाहेर हाकलून लावले आणि तिची संपत्ती हडपली. तेथे असलेल्या प्रेतांच्या मध्ये ती जीवंत शव बनून राहिली. तेवढ्यातच “बुद्धं शरणं गच्छामि’’ हे शब्द कानावर पडले. हा उपगुप्ताचाच आवाज असावा म्हणून ती डोळे उघडून पाहिली.समोर तोच उभा होता. ती म्हणाली, “हीच काय तू सांगतिलेली योग्य वेळ?’’ “होय, तू मागचं सर्व विसरून जा. सर्व जग आपली साथ सोडल्यावर आपल्याविषयी करुणा दाखवून धर्ममार्गावर नेऊन निर्वाण अथवा मोक्ष प्राप्त करुन देतात तेच खरे बंधू -नातीगोती, गुरू, देव, सर्वस्व!! असे उपगुप्तने सांगितले. हे उपदेशामृत ऐकता क्षणी नर्तकी हसत - हसत देवलोकापर्यंत पोहोचली. मृत्यूच्या वेळीही अमरत्वाचे अमृतानुभव देणेच धर्म अथवा अध्यात्म! हीच राजविद्या!!

Wednesday, 15 March 2017

समरसतेचे मंदिर खुले झाले!

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंढरपुरातील श्री विठ्ठल - रुक्मिणी

 मंदिर बडवे - उत्पातांच्या कचाट्यातून मुक्त झाल्यानंतर नुकतेच

 पुजारीपदाच्या भरतीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. त्यांच्या निवडीही

 लवकरच जाहीर होतील. यात पुरुषांसह महिलांनाही संधी मिळण्याची 

शक्यता आहे. साने गुरुजींच्या हे मंदिर अस्पृश्यांना खुले करण्याच्या 

समरसतावादी लढ्याला नुकतीच 10 मे रोजी 67 वर्षे पूर्ण झाली. त्या 

पार्श्‍वभूमीवर पुजार्‍यांच्या निवडीने हे मंदिर सर्वार्थाने मुक्त होणार आहे. 

तसेच हे परिवर्तन सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या क्रांतिकारी 

ठरणार आहे.


भक्त पुंडलिकाच्या भक्तिपोटी लोककल्याणासाठी श्री विठ्ठल, रुक्मिणी 

मातेसह भूवैकुंठी पंढरीत अवतरला. तो खरा तर लोकदेव. मात्र, लाखो 

वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठूरायाला गेल्या अनेक शतकांपासून 

बडवे - उत्पात मंडळींनी जखडून ठेवले होते. त्यांनी संत, महंतांपसून 

सर्वसामान्य वारकर्‍यांपर्यंत सर्वांनाच छळले. श्री संत चोखामेळा यांच्या 

धाव घाली विठू आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही 

तरी अपराध॥’ या अभंगातून हे स्पष्ट होते. धर्म नीटसे समजून न घेता 

त्याच्या नावाखाली सर्वसामान्य वारकर्‍याला नागवण्याचाच प्रकार विठ्ठल 

मंदिरात सुरू होता. केवळ मंदिरात येणार्‍या अमाप पैशासाठी सामान्य 

भाविकाला दूर लोटण्यात येत होते. तर मागल्या दाराने श्रीमंत भक्तांना 

विठ्ठल दर्शन मिळेल, यातच ते खरी धन्यता मानत होते. दक्षिणेसाठी 

भाविकांचा छळ मांडला जात होता. त्यामुळे वारकर्‍यांनी बडवे, उत्पात व 

सेवाधारी यांना मंदिरातून हद्दपार करण्याची मागणी सुरू केली. 

स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच या मागणीने जोर धरला होता.


या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी 1967 मध्ये आळंदी यात्रेत वारकरी 

महामंडळाची स्थापना झाली आणि त्याला वेग आला. बडवे - उत्पात

 यांच्या विरोधातील वाढती नाराजी लक्षात घेऊन 1968 मध्ये तत्कालीन

 मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी निवृत्त जिल्हा न्यायाधीश बी. डी नाडकर्णी

 यांचा आयोग नेमला. या आयोगाने 1970 मध्ये राज्य शासनाला अहवाल 

दिला. बडवे, उत्पात, सेवाधारी यांचे हक्क, अधिकार व विशेषाधिकार 

रद्दबातल करावेत, देवतांच्या पूजेसाठी नोकर नेमावेत, धार्मिक देवालय 

राजकारणापासून अलिप्त राखावे, देवळाच्या भागात दक्षिणा / ओवाळणी 

मागण्यास सक्त मनाई असावी, प्रांत दर्जाचा अधिकारी व्यवस्थापक 

असावा, अशा शिफारशी या आयोगाने केल्या होत्या. त्यानंतरच्या तीन 

वर्षांमध्ये या अहवालावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने वारकर्‍यांनी 

1973 मध्ये मुंबईत उपोषण सुरू केल्याने शासनाला पंढरपूर मंदिर 

अधिनियम 1973 हा कायदा करणे भाग पडले. त्यामुळे बडवे - उत्पातांचे 

मंदिरातील वर्चस्व संपुष्टात आले. मंदिराचे व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द 

केले गेले. परंतु बडवे - उत्पातांनी अधिसूचना प्रसिद्ध होण्याआधीच याला 

आव्हान दिले होते. कनिष्ठ न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली 

40 वर्षे बडवे - उत्पात व सेवाधारी यांचा आपल्या हक्कासाठी न्यायालयीन 

लढा सुरू होता. तो गेल्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या 

निर्णयाने संपला आणि त्यांचे सर्व अधिकार संपुष्टात आले.


दरम्यान, वेगवेगळ्या स्तरांवरील न्यायालयांनी त्यांच्या विरोधातच निकाल 

होते. मंदिर व्यवस्थापन देवस्थान समितीच्या हाती गेल्यानंतरही बडवे - 

उत्पात व सेवाधारी यांची भूमिका मंदिर परिसर विकास व भाविकांना

 सोयी सुविधा निर्माण करण्यातही अडचणीची ठरत होती.



सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर समितीने श्री विठ्ठल - रुक्मिणी व 

मंदिरातील विविध देवतांच्या पूजाअर्चा, नित्योपचार, विधी व नैमित्तिक 

पोषाख करणे आदींविषयीचे बडवे -उत्पात व सेवाधारी यांचे अधिकार 

काढून घेतले. मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांमार्फत ही सर्व कार्ये सुरू

 आहेत. 

दरम्यान, मंदिर समितीने पुजारी निवडीसाठी भरती प्रक्रिया राबवली. 

राज्यभरातून 199 अर्ज यासाठी आले होते. त्यापैकी 176 जणांनी मुलाखती 

दिल्या आहेत. त्यात 23 महिला उमेदवारांचा समावेश आहे. मंदिर 

समितीच्या येत्या बैठकीत पुजार्‍यांची निवड जाहीर होईल. यात हिंदू 

धर्मातील कोणत्याही जातीच्या आणि विशेषत: महिलांनाही श्री विठ्ठल - 

रुक्मिणीची पूजा - अर्चा करण्याची संधी मिळू शकते. वाल्मिकी, व्यास 

यांच्यासह अनेक समाजाच्या शेवटच्या वर्गातील मंडळी आपल्या ज्ञानाच्या 

आणि तपोबळाच्या आधारावर ऋषी पदावर पोहोचले. ते हिंदू समाजाचे 

आराध्य बनले. तर गार्गी, मैत्रेयी अशा तत्त्वज्ञही झाल्या. मात्र, कालौघात 

धर्माचे नीटसे आकलन न करुन घेतल्याने जातीव्यवस्था, अस्पृश्यता या 

बेड्यांनी हिंदू समाज जखडला गेला. तर स्त्रियांना चार भिंतींपूरते सीमित 

केले गेले. सध्या सुरू असलेल्या समरस समाजजीवनाची निर्मिती आणि 

स्त्रीशक्ती जागरणाच्या प्रयत्नांना या घटनेने बळ मिळणार आहे.


साने गुरुजी यांच्या श्री विठ्ठल मंदिर अस्पृश्यांना खुले करण्याच्या

 आंदोलनाला 67 वर्षे पूर्ण होत असतानाच विठ्ठल मंदिरातील पुजारी

 भरतीची प्रक्रिया पार पडल्याने त्यांनी समरस समाजनिर्मितीसाठी सुरू

 केलेल्या लढ्याचेच हे यश म्हणावे लागेल. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत

 सांगायचे तर, आधुनिक सुधारणावाद्यांना धर्माची मोडतोड केल्यावाचून

 सामाजिक  सुधारणा करणे अशक्य वाटते. अलीकडच्या काळात असा

 प्रयत्न ज्यांनी  केला, त्यांना अपयश मिळाल्याचे दिसते. कारण त्यांच्यापैकी

 फारच  थोड्यांनी स्वत: अभ्यास केला होता आणि सर्व धर्मांची जननी

 असलेल्या  आपल्या धर्माचे शिक्षण, त्यासाठी आवश्यक साधना तर

 एकाचीही झाली नव्हती. समाजाची अवनती होते, ती धर्मामुळे नव्हे तर

 धर्मतत्त्वांचे योग्यरीतीने पालन न केल्याने.’ साने गुरूजी हे जाणून होते.

 आपण  धर्ममय मनुष्य’ असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी धार्मिक हक्कांनाही

 महत्व असल्याचे ठामपणे सांगितले. मनुष्य हा केवळ दिडक्यांवर जगत 

नाही. त्याला मन आहे, हृदय आहे, आत्मा आहे. स्वाभिमान आहे, प्रतिष्ठा

 आहे.’ 

म्हणून केवळ आर्थिक परिस्थिती सुधारुन हा प्रश्‍न सुटणार नाही, असे त्यांचे 

मत होते. त्यामुळेच त्यांचे मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठीचे आंदोलन 

यशस्वी होऊ शकले. मात्र, त्यांच्यानंतर या आंदोलनाची धुरा वाहणार्‍या 

मंडळींच्या धर्मविरोधी भूमिकेमुळेच पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍या 

महाराष्ट्रात अशाप्रकारचे धार्मिक बदल घडण्यात खरी अडचण निर्माण 

होत आहे. कारण दक्षिण भारतात याआधीच हे होऊ शकले. शिवाय गेल्या 

(2013) ऑक्टोबर महिन्यात मंगळूरू (कर्नाटक) जवळील कुद्रोली 

गावातील 100 वर्षांच्या जुन्या मंदिरात दोन विधवा महिलांची पुजारी म्हणून 

नियुक्ती झाली.


आता पगारी पुजार्‍यांची नेमणूक होणार असल्याने भाविकांना बडवे - 

उत्पातांच्या छळाचा सामना करावा लागणार नाही. मात्र, मंदिर समितीच्या 

कारभारातही सुधारणा होणे गरजेचे आहे. दर्शनापासून वेगवेगळ्या

 सुविधा भाविकांना उपलब्ध करुन देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार

 आहे. 

भाविक धर्मकार्य व सेवाकार्यांसाठी देणग्या देतात, याचे भान समितीने 

राखणे आवश्यक आहे. परंतु समितीवर असलेले राजकीय नेतेमंडळींचे 

वर्चस्व पाहता समितीच्या कारभारात सुधारणा होण्याविषयी साशंकताच 

आहे. कारण राजकीय पुनर्वसन म्हणूनच या समित्यांकडे पाहण्याचा 

राजकीय पक्षांचा   दृष्टिकोन आहे. त्यामुळे नाडकर्णी आयोगाच्या 

शिफारशीनुसार धार्मिक देवस्थाने राजकारणापासून अलिप्त राखण्याची 

गरज आहे. त्यासाठीही आता चळवळ उभी राहण्याची आवश्यकता आहे.




हरिका : तेव्हाची अन् आताची

  हरिकाचे सोलापुरातील पहिले व्याख्यान आज झाले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी जुळे सोलापूर शाखेने विश्वबंधुत्व दिनानिमित्त या व्याख्यानाचे आयो...