अमृत सुरभी

Monday, 3 February 2020

ज्ञानपीठासाठी भैरप्पा पात्र नाहीत का ?


ज्ञानपीठासाठी भैरप्पा पात्र नाहीत का ? हा प्रश्‍न अनेक वर्षांपासून केवळ कन्नड वाचकांना नव्हे तर त्यांना मानणार्‍या इतर भाषिक वाचकांनाही पडला आहे. तसेच यामागे काही कारणे असतील असे वाटणारेही आहेत. 
कदाचित भैरप्पा यांच्या जागी मीच असतो तर आतापर्यंत दुसर्‍यांदा ज्ञानपीठसाठी लॉबिंग केलो असतो की काय! कारण माझे साहित्यिक कार्य तेवढे आहे या अभिमानामुळे! 
होय, हा अभिमान आहे ना, तो सहज निर्माण होत नाही, तो कमवावा लागतो. एखाद्या वेळेस भैरप्पा यांच्यात तसा अभिमान असल्यास तो त्यांच्या ज्ञानामुळे मिळविलेला आहे,  सुखासुखी निर्माण झालेला नव्हे. सुखासुखी निर्माण होणारा अभिमान नव्हे, ती चरबी असते. 
ज्ञानामुळे निर्माण होणारा अभिमान मान्य होईल. एका मर्यादेत असल्यास तो गौरवास्पद असेल. असो, तो विचार बाजूला ठेवा. का इतक्या दीर्घ काळानंतरही भैरप्पा हे ज्ञानपीठ पुरस्कारासाठी पात्र ठरले नाहीत, हा प्रश्‍न माझ्यासारख्या अनेकांना खराच सतावत आहे. 
गोकाक, अनंतमूर्ती, कर्नाड, कंबार यांच्यासारख्यांना ज्ञानपीठ मिळाले. तर या सर्वांच्या रांगेत उभे राहण्याइतके साहित्याची सेवा भैरप्पा यांनी केली नाही का? ज्ञानपीठ हे साहित्य क्षेत्रासाठी आहे. केवळ साहित्य क्षेत्रासाठीच असलेल्या या पुरस्कारासाठी भैरप्पा हे पात्र ठरले नाहीत म्हणजे त्यांच्या साहित्य निर्मिती आणि सेवेविषयी माझ्यासारख्यात संशय निर्माण होतो. मात्र, सत्य हे आहे की, भैरप्पा यांची साहित्य रचना, सेवा आणि प्रतिभा नाकारणे कोणाकडूनही शक्य नाही. एखाद्या वेळेस नाकारल्यास वरील चारही साहित्यिकांच्या साहित्य रचना, सेवा आणि प्रतिभेला नाकारल्यासारखे होईल! 
सरळच सांगतोय, या गोष्टीचा कोणी चुकीचा अर्थ लावू नये. लॉबिंग न करता कोणताही पुरस्कार मिळवणे (हिसकावणे) साध्यच नसलेला हा काळ आहे. कर्नाड यांनी मी लॉबिंग करुनच ज्ञानपीठ मिळविल्याचे जाहीररीत्या कबुल केले होते. मला ज्ञानपीठ मिळाले तेव्हा ते विजय तेंडुलकर यांना मिळायला हवे होते, असे त्यांनीच म्हटले होते! आतापर्यंत देण्यात आलेले सर्वाधिक पुरस्कार आणि पुरस्कार विजेते (सर्वच नव्हेत) यांनी लॉबिंग करुनच मिळविलेले आहे, हा भाव लोकांत आहे. 
जिल्हा, राज्योत्सव पुरस्कारासाठीच लॉबिंग चालते म्हटल्यावर आणखी ज्ञानपीठ, पद्म पुरस्कारांसाठीही लॉबिंग चालत नाही म्हणायचे तर यावर विश्‍वास ठेवणे खूपच कष्टदायक आहे !
हा लॉबिंगचा काळ आहे. पुरस्कारच नव्हे तर प्रत्येक गोष्टीला लॉबिंग केल्याशिवाय अथवा करायला लावल्याशिवाय काहीही मिळत नाही. भैरप्पा यांनी लॉबिंग न केल्याने त्यांना ज्ञानपीठ मिळाले नाही. लॉबिंग केल्यास कधीच ज्ञानपीठ मिळाले असते, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे. वाचकांच्या वर्तुळातही हीच चर्चा आहे. त्यांना अजून का ज्ञानपीठ मिळाले नाही, त्यांच्याशिवाय इतरांना मिळाले तरी ते मिळाल्यासारखे नाही, असा अतिरेकी विचारही मी ऐकलो आहे. अरे, भैरप्पा लॉबिंग केले असते तर मिळाले असते, असे व्यंगात्मक बोलणेही ऐकले आहे. 
मात्र, भैरप्पा यांचा गुणस्वभाव माहीत असलेले कोणीही त्यांनी पुरस्कारासाठी लॉबिंग करतील हा विचार सोडा, अशा संधीसाधू राजकारणात ते उतरतील हा विचारही करणे साध्य नाही. देहि हा त्यांचा स्वभाव नाही. तशी अभिरुचीही त्यांची नाही. मंगळुरू लिट. फेस्टमध्ये त्यांना दिलेला गौरव निधी त्यांनी कल्लड्क श्रीराम माध्यमिक शाळेला दिला. सरस्वती सन्मान प्राप्त भैरप्पा यांना कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही परिस्थितीत लॉबिंग करण्याची दुस्थिती येणार नाही, असे माझ्यासारख्याला वाटते. आता तर मोदी सरकार आहे. लॉबिंग करायचेच तर त्यांना वाटेल ते पद मिळविण्यास अनुकूलता आहे. 
सत्ताधार्‍यांची खुशमस्करी करुन पद, पदवी, पुरस्कार मिळविणे हे एका रीतीने बौद्धिक आणि वैचारिक गुलामीच आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, बौद्धिकदृष्ट्या उजव्या विचारसरणीचे म्हणूनच भैरप्पा यांची गणना केली गेली आहे. अथवा तसेच त्यांच्याकडे पाहिले गेले आहे. हे चुकीचे आहे. कादंबर्‍या पाहून, त्यातच आवरण कादंबरी वाचून त्यांना तसे समजणे चुकीचे आहे! आणखी त्यांचे सामाजिक विचार पाहून त्यांना तसे समजणे बौद्धिक दारिद्य्रच होय! 
भैरप्पा यांना चिकटलेले विवाद म्हणजे 1. त्यांनी त्यांच्या कादंबर्‍या लेखनासाठी निवडलेले विषय. 2. त्यांच्या काही प्रमुख कृती (वंशवृक्ष, तब्बलियू निनादे मगने, पर्व, सार्थ, आवरण, उत्तरकांड). यात भारताच्या पुरातन संस्कृतीचे सार आहे. त्यामुळे ते काही साहित्यिकांमुळे, विशेषकरुन नवसाहित्यिकांच्या टिकेचे लक्ष्य बनले. 3. वाद्यांवर राष्ट्रगीत वाजवल्याच्या प्रकरणात इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे समर्थन केले. 4. कावेरी विवादाच्या निषेधाला हिंसक वळण लागले. हिंसा, निषेधामुळे काही साध्य होणार नसल्याचे नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे. 5. टिपू सुलतान धर्म सहिष्णू असल्याचे वक्तव्य गिरीश कर्नाड यांनी केले होते. भैरप्पा यांनी दैनिक विजय कर्नाटकमधून त्याचे खंडन केले. कर्नाड हे टिपू सुलतान याच्याविषयी चुकीचे विचार पसरवत आहेत. विनाकारण धर्म सहिष्णू म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वाचे उदात्तीकरण करत आहेत. टिपू सुलतान एक धर्मांध होता. तो हिंदूंचा द्वेष करत होता हे सांगितले. 6. अनंतमूर्ती हे भैरप्पा यांच्या कादंबर्‍यांचे प्रमुख टीकाकार होते. भैरप्पा यांनी आपल्या आणि अनंतमूर्ती यांच्यातील वाद - विवाद भित्ती आणि नानेके बरेयुत्तेने या कृतींच्या काही भागात उल्लेख केला. 7. मुस्लिम राजवटीतील भारतीय संस्कृती आणि सामाजिक प्रगतीवर झालेला परिणाम दाखविणारा, ऐतिहासिक सत्यावर आधारित आवरण लिहिले. 8. भैरप्पा हे इतिहासाच्या नावाखाली समाजात दुही माजवून राज्य करू इच्छिणारे मूलतत्ववादी आहेत. तसेच त्यांना कादंबरी लिहिण्याचे ज्ञान नाही, असे वक्तव्य अनंतमूर्ती यांनी केले. त्यामुळे त्यांना साहित्य क्षेत्रात टिकेला सामोरे जावे लागले. 9. मात्र, भैरप्पा यांनी आपण कोणत्याही विषयी पूर्वग्रह न ठेवता केलेल्या सत्यान्वेषणाचे आवरण हे फळ असल्याचे सांगत बाजू मांडली. टीकाकारांनी कोणत्याही निर्णयाला येण्यापूर्वी कादंबरीत उल्लेख केलेल्या संदर्भ ग्रंथांचे अध्ययन करावे असे सांगितले. 10. दैनिक विजय कर्नाटकात प्रसिद्ध झालेल्या भैरप्पा यांच्या मतांतर मत्तु कवलु लेखनावर खूप दिवस समर्थनार्थ आणि विरोधात चर्चा चालली, लेख प्रसिद्ध झाले. 11. कवलु कादंबरी खूपच चर्चेचा, विवादाचा विषय ठरली. आधुनिक महिला सिद्धांतातील फोलपणा आणि त्याचा सामाजिक परिणाम हाच वस्तूविषय निवडून ही कादंबरी लिहिली. त्यामुळे महिला प्रगती विरोधी हा शिक्का त्यांच्या माथ्यावर मारला गेला. सारा अबुबकर यांनी ती कादंबरी कोणी वाचू नये, असे एका समारंभात जाहीररीत्या सांगितले. 
मुख्यत: भैरप्पा हे उजव्या विचारसरणीचे आहेत, हा जुना आरोप या अकरा कारणांमुळे त्यांना ज्ञानपीठ मिळाले नाही, ही विवादात्मक चर्चा चालत आली आहे. 
ज्ञानपीठ पुरस्कारासाठी साहित्यकृतींच्या निवडीचा विचार पाहू. 18 भारतीय भाषांतील अमूल्य कृतींचे प्रतिष्ठानची निवड समिती परिशीलन करते. पुरस्कारासाठी निवडली जाणारी व्यक्ती प्रतिभावंत, प्रतिष्ठित आणि सृजनशील साहित्यिक असावी. साहित्य क्षेत्रात विविध प्रकारची साहित्य निर्मिती करुन यशस्वी झालेली असावी. 18 भाषांत अत्युन्नत स्थान प्राप्त केले तरच ज्ञानपीठ पुरस्कारासाठी कृती निर्मात्याची निवड होते. ज्ञानपीठ पुरस्कारामुळे त्या साहित्यिकासह त्याने निर्मिलेल्या साहित्याची भाषा आणि त्याच्या प्रांतालाही सन्मान प्राप्त होतो. 
ज्ञानपीठ पुरस्काराठीचे नियम सूची म्हणजे 1. साहित्यिक आणि कृती भारतीयच असावी. 2. त्याने आपल्या संबंधित भाषेत पंडित, तज्ज्ञ असावा. 3. पुरस्कार देताना ती व्यक्ती जीवंत असावी. 4. एकदा पुरस्कार दिलेल्या व्यक्तीला कोणत्याही कारणांनी पुन्हा पुरस्कार देऊ नये. 4. एकदा कोणत्याही एका भाषेला पुरस्कार दिल्यास त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्याच भाषेच्या कोणत्याही साहित्यिकाला हा पुरस्कार देऊ नये. देशात आतापर्यंत 18 भाषांना दिलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारांत हिंदी भाषेनंतर सर्वाधिक पुरस्कार कन्नड भाषेला मिळाले आहेत. त्यामुळे कन्नड भाषेचा मान आणि सन्मान उंचावला आहे.
ज्ञानपीठाच्या नियमांनुसार भैरप्पा हे त्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. केवळ नियमांचे अवलोकन करुन त्यानुसार भैरप्पा हे त्यासाठी पात्र आहेत, असे मला वाटत नाही, वाटूही नये. भारतातील साहित्याला दिल्या जाणार्‍या श्रेष्ठ पुरस्कारासाठी श्री. साहू शांतिप्रसाद जैन दांपत्याने या भारतीय प्रतिषठानाची स्थापना केली. साहजिकच जैन तत्त्वज्ञानालाही हे प्रतिष्ठान पुरस्कार देत आला आहे. जे साहित्य मानवी जीवनातील संवेदनशीलता आणि संवेदना अभिव्यक्त करते अथवा चैतन्य भरते असे साहित्य सर्वमान्यता, सार्वकालिक मौल्यवान ठरते. भारतीय साहित्यात चिरस्थायी बनते. ज्ञानपीठ मिळविलेले आतापर्यंतचे साहित्यिक आणि साहित्याचे अवलोकन केल्यास हे अधिक ग्राह्य ठरते. 
मानवजात ही एकच आहे, यावर पंप यांनी भर दिला. पंप, रन्न, पोन्न, नागचंद्र आदी जैन साहित्यिकांपासून दासांपर्यंतच्या साहित्यामुळे संपन्न बनलेली कन्नड साहित्य परंपरा देशी भाषांत अभिन्न आहे. वैशिष्ट्यांचा आगर आहे. जी साहित्यकृती समाजाच्या हितासाठी जीवनमूल्यांचे संवर्धन करते ती सार्वकालिक सत्य बनून राहते. भैरप्पांच्या कृतींचे हे मूलस्त्रोत होय. जे साहित्य सकल जीवनिष्ठेने जीवनमूल्यांचे प्रतिनिधीत्व करते ते समाज स्वीकारते, स्वीकारायलाही हवे. भैरप्पांच्या कादंबर्‍यांची ही खरी अस्मिता आहे. अशा प्रकारच्या अगाध अनुभव चिंतनेने त्यांच्या कादंबर्‍यांतील मुख्य पात्रे उलगडतात.    
कारंत यांच्या मूकज्जीय कनसुमधील मुकी आजी ही बोलता न येणारी मुकी म्हातारी नव्हे. 80 वर्षांची एक मौनी म्हातारी आहे. वर्षानुवर्षे विशाल प्रांगणातील एका अश्‍वत्थ वृक्षाखाली बसून एक महिला वेदना सहन करत मानवी विषमता उलगडून सांगते. सिंहावलोकन करत, मनातच विचार करत आपल्यात एक अद्भुत जागृती निर्माण करताना दिसते. समष्टीच्या धर्तीवर भूतकाळाचा वर्तमानकाळाशी सांगड घालत मानवी सभ्यतेच्या विकासाचा तिचा प्रयत्न रोमांचक आहे. करुणा ही जीवनातील सर्वात मोठी शक्ती आणि मनुष्यत्वाचे अत्यंत मोठे गुण ती शिकवते. भैरप्पांच्या कादंबर्‍यांत अशा पात्रांची मालिकाच आहे. कसे तरी लाभलेले हे जीवन कसेही जगले तरी तरी चालेल, अशा प्रकारचे मानवी जीवन नाही, अशी मूल्ये कारंतांच्या मूकज्जीसारखी पात्रे सांगतात. अशी पात्रे भैरप्पांच्या कादंबर्‍यांतही दिसतात. या कारणांमुळे भैरप्पा यांच्या कादंबर्‍या वाचताना अनेक संदर्भात कारंत यांच्या सर्जनशील आणि प्रतिभावान सामर्थ्याची आठवण होते.  दोघांचीही चिंतन शक्ती आणि जीवन अंतर्दृष्टी एकच वाटते. कारंतांप्रमाणे भैरप्पा यांनी निवडलेली कथावस्तू, तंत्र, भाषा आणि निरुपण शैली यामुळे त्यांच्या कादंबर्‍या चैतन्यप्रद ठरतात. त्याची व्याप्ती विस्तृत आहे. तसेच कादंबरी आपले लक्ष्य गाठत जिंकते. हवे ते साध्य करते. 
भैरप्पा यांच्या साहित्य रचनेची व्याप्ती खूप मोठी आहे. वास्तवतेची चौकट मोडून काल्पनिक चौकटीत त्यांनी कोणतीही कादंबरी लिहिलेली नाही, लिहिणारही नाहीत. कथेनुसार निर्माण केलेली पात्रे काल्पनिक असतात, ही साहित्यातील सहज क्रिया आहे, हा वेगळा विषय आहे. त्याला कधीही कोणी अपवाद नाही. कादंबर्‍यांची सुरुवातच वास्वतेच्या पार्श्‍वभूमीवर झालेली आहे. भैरप्पा हे भ्रम निर्माण न करता वास्तवतेच्या आधारावर संशोधन करुन लिहिणार्‍या संशोधकांच्या रांगेतील साहित्यिक आहेत. केवळ जे स्वत:वर मात करू शकतात तेच कठोर विचार मांडणे असो, चिंतन करणे असो अथवा लिहिणे शक्य आहे. वेद आणि उपनिषद हे देशाच्या संपूर्ण संस्कृतीचे मूळ आहेत. - असे सांगणारे साहित्यिक भैरप्पा पुराण भंजन करुन, वास्तव जीवनाचा शोध घेतल्यानेच पर्व, उत्तरकांड यासारख्या सृजनात्मक कृतींची निर्मिती त्यांच्याकडून झाली असेल! ‘
"Literature is a way of discovering human truths in its emotional and aspirational aspects. साहित्यिकाने या समाजाला कोणती जीवनमूल्ये द्यावीत, हे त्यांनी सांगितले आहे. : No one asks how Draupadi must have felt having five husbands, Or which one she might haved loved more. In Parva I tried to change the motivation for Gandhari about why she wears a patch around her eye. In Uttarakhanda , I reinterpreted the Ramayana from Sita's point of view"
एका सर्जनशील लेखकाच्या कादंबरीतील पात्रे एका जीवंत जीवनाच्या निरंतर यानाप्रमाणे मूल्यांचे विस्ताराने, विस्तीर्णपणे प्रतिपादन करतात !
  शेवटची गोष्ट : भैरप्पा यांना ज्ञानपीठ देऊच नये, मिळूच नये यासाठी ऊर फाटेस्तोवर प्रयत्न करणारेही आहेत. पूर्वग्रह वगळता दुसर्‍या कोणत्याही कोनातून अशा गोष्टींचे समर्थन करणे शक्य नाही. भैरप्पा यांचे साहित्य न वाचताच केलेल्या या कोरड्या गोष्टी आहेत. मागे एकदा भैरप्पा यांना मरणोत्तर ज्ञानपीठ द्या, अशी मागणी करण्यात आली होती. अशी असभ्य संस्कृतीहीन वक्तव्ये करणारी मंडळीही आहेत. अशा प्रकारची भाषा करणार्‍यांत बहुतांश कन्नड भाषिकच आहेत, हे खेदजनक आहे. 
भैरप्पा यांच्या साहित्य विचारांचे समर्थन करणार्‍या एका ज्येष्ठ व्यक्तीला चप्पल दाखवणारे महाभागही आहेत. कोणाला कधी पुरस्कार द्यावा अथवा मिळावा, हा विचार मांडण्यासाठी कोणताही पुरस्कार कोणाच्याही मालकीची संपत्ती नाही, ती त्यांची मालमत्ताही नाही. भारतीय ज्ञानपीठाचे मोठेपण आणि गौरव खूप मोठे आहे. प्रतिष्ठानच्या कार्यक्षेत्राची व्याप्तीही खुप व्यापक आहे. भारतीय साहित्य विश्‍वात भारतियांना दिला जाणारा हा श्रेष्ठ पुरस्कार भारतीय साहित्य जगतात आपल्या लेखनाने जनमान्यता मिळविलेल्या भैरप्पा यांना मिळायलाच हवा. ते त्याला पात्र आहेत. भारतीय ज्ञानपीठ नावाच्या शुद्ध सरोवरातील पुष्करणीतील अनेक कमळांच्या रांगेत भैरप्पा नावाचा कमळही फुलायला हवा, ही साहित्यप्रेमींची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. निवड समितीत प्रत्येक भाषेचे दोन, तीन प्रतिनिधी असतात. त्यातील कन्नड भाषेच्या प्रतिनिधींनी भैरप्पा यांच्या कन्नड साहित्य सेवेची गहनता समितीपुढे विषद करुन सांगायला हवे. तसेच त्यांच्याकडे मागणी करुन भैरप्पा यांच्या माध्यमातून कन्नड भाषेला नववे ज्ञानपीठ मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत.  
टी. देविदास

- February 03, 2020 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

भारतीय साहित्य क्षेत्रातील अनन्य कृती : पर्व

 
डॉ. एस. एल. भैरप्पा यांची पर्व कादंबरी प्रकाशित होऊन 40 वर्षे झाली. त्यानिमित्त बंगळुरूमध्ये 29 डिसेंबर रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात केंद्र साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार, महाराष्ट्राचे डॉ. मुकुंद आर. परांजपे, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. माधव कौशिक, प्रसिद्ध मराठी लेखिका, संशोधक डॉ. अरुणा ढेरे यांनी सहभाग नोंदवला. भैरप्पा यांच्या उपस्थितीत या लेखकांसह शतावधानी डॉ. आर. गणेश यांनी संवाद साधला, हे विशेष होय. 
राष्ट्रीय लेखक म्हणून ख्याती मिळवलेले, प्रा. डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नडची कीर्ती देश - विदेशात वाढवलेल्या लेखकांत अग्रगण्य आहेत. त्यांची पर्व ही कादंबरी महाभारतावर आधारित असली तरी पौराणिक आवरण काढून टाकून, वास्तवतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐतिहासिकता सत्य आणि संभाव्यतेच्या स्वरुपात मांडण्यात अत्यंत यशस्वी झालेली साहित्यकृती आहे. भारतीय भाषांमध्ये लिहिली गेलेली महाभारताशी संबंधित कोणतीही साहित्यकृती ‘पर्व’ इतके महत्त्व अथवा जनप्रियता मिळवू शकली नाही, हेच ‘पर्व’ची महानता सांगणारे आहे.   
उदाहरण म्हणून एखाद दुसर्‍या अभिप्रायाकडे लक्ष वेधता येईल. प्रसिद्ध कवी, कादंबरीकार रामेश्‍वर शुक्ल आंचल यांनी म्हटले होते, ‘पर्व... कन्नडची असेल. मात्र, मी म्हणेन की ती एक मूळ हिंदी कादंबरी आहे.’ तर दुसरे प्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्‍वर यांनी ‘पर्व एक आधुनिक बृहतकाव्य आहे. मीच याचा लेखक असतो तर हा विचार माझ्या मनी येतो’ अशी असूयापर प्रशंसा केली आहे. राजस्थानी विद्वान नंदकिशोर आचार्य यांनी ‘भैरप्पा हे केवळ कन्नडचे नव्हेत, आधुनिक भारतीय साहित्याचे, तुलना करता न येणारे विभूती पुरुष आहेत.’ असे म्हटले आहे. भैरप्पा यांना ‘कन्नडमध्ये लिहिणारे मराठी साहित्यिक’ मानणार्‍या मराठी विद्वानांमधील एक असे चंद्रकांत बांदिवडेकर म्हणतात. ‘महाकाव्याचा अनुभव देणारी ‘पर्व’सारखी कृती मराठीमध्ये कधी तरी येईल, याची मी वाट पाहात आहे.’ त्याशिवाय ‘पर्व वाचल्यानंतर मी भैरप्पा यांचा भक्त झालो आहे.’ असेही म्हटले आहे. 
समकालीन साहित्य समाचार पत्रिकेत हिंदी लेखक ओम गुप्त हे आणखी एक पाऊल पुढे टाकत वर्णन करतात, ‘महाभारतावर आधारित कादंबर्‍यांचे सर्व भारतीय भाषांमध्ये लेखन झाले आहे. मात्र, पर्व सर्वांपेक्षा विशेष आहे. ही यातील पात्रांची कथा नाही; पात्रांच्या अंतर्यामी लपलेल्या मानवी संबंधांची कथा आहे.’ महाभारताचे आजचे स्वरूप पाहिल्यावर महर्षी व्यास यांना मुख्यत: वासुदेवाची महिमा सांगायची होती, हे स्पष्ट होते. कन्नडमध्येही व्यास भारताच्या आधारावर काव्यांची रचना दिसून येते. यात जैन आवृत्ती आणि वैदिक आवृत्ती मुख्य आहेत. (बौद्ध आवृत्ती उपलब्ध नाही.) नेमिनाथांचे चरित्र लिहिणारे नेमिचंद - कर्णपार्य यांच्या रचना जैन आवृत्ती आहेत. पंपने ‘मिगिल ईवर्गळीन ई भारत लोकपूज्यं’ या आपल्या गौरवमालेत कृष्णाचे नावच वगळले आहे. कृष्णाची महिमा सांगणारा अक्षयवस्त्र प्रसंग, अक्षयपात्र प्रसंग, गीतोपदेश यासारखे प्रसंग वगळले आहेत. 
कृष्णाची कथा समजून सांगतो, असे सांगणारे कुमार व्यास कृष्णाची महिमा सांगणारा कोणताही प्रसंग सोडत नाहीत. नवे प्रसंगही जोडतात. पंपला त्याचा आश्रयदाता अरसिकेरी (त्याचे प्रतिरुप म्हणून अर्जुन) मुख्य वाटतो. (त्यामुळे शेवटी सिंहासनावर बसणारे अर्जुन - सुभद्रा आहेत. धर्मराज - द्रौपदी नाहीत.) कुमार व्यास कृष्णभक्त असल्याने कृष्ण हाच त्यांच्यासाठी नायक आहे. 
अभ्यास-प्रवास : भैरप्पा यांनी व्यास भारताचा (गोरखपूर आवृत्ती) मूलगामी अभ्यास केला आहे. वाय. एस. सुखठणकर यांची आवृत्ती बाजूला ठेवली आहे. कुमार व्यास भारताचे भाग त्यांना तोंडपाठ आहेत. पंप - रन्न यांचेही अवलोकन केले आहे. मात्र, त्यांचे ध्येय-आशयच भिन्न आहे. ‘नानेके बरेयुत्तेने’ आणि ‘पर्व बरेदद्दु’ या लेखनात आपल्या ध्येय-उद्देशाविषयी स्पष्ट केले आहे. केवळ महाभारतातील घटना घडलेल्या प्रदेशांनाच नव्हे तर त्यात उल्लेखिलेल्या बहुपत्नीत्व, नियोग आदी पद्धती अजूनही असलेल्या गढवालसह अन्य ठिकाणांना भेटी देऊन तेथील लोकांशी संवाद साधला. भारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन केलेल्या ठिकाणांची पाहणी केली. काहीवेळा वेशांतर करून, शारीरिक, मानसिक त्रास सोसून, दीर्घकाळ विनावेतन रजा घेऊन विषयतज्ज्ञ, इतिहासतज्ज्ञांशी चर्चा केली. राजाजी, के. एम. मुन्शी, देवेंद्र शर्मा, ठाकर आदींच्या साहित्याचे अध्ययन केले. व्ही. सीतारामय्या, डॉ. प्रभूशंकर, प्रो. एस. बालसुब्रह्मण्यम, बी. व्ही. सुब्बरायप्पा आदी विद्वानांशी आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करून कृतीची रचना केल्याचे भैरप्पा यांनीच ‘पर्व बरेदद्दू’मध्ये सांगितले आहे. 
महाभारताची पुनर्रचना करण्यामागे ‘समाजाशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक कोनातून प्राचीन भारत समजून घेणे’ हा भैरप्पा यांचा उद्देश होता, (पृष्ठ 31) हे त्यातच म्हटले आहे. आपल्या अध्ययन, चिंतन, संशोधन, प्रवास, चर्चा, सल्लामसलत यामुळे मला हे साध्य झाले. परिणामी व्यास भारताच्या चौकटीतच नवा भारत माझ्या मनात निर्माण झाले, (पृष्ठ 33) असे नमूद केले आहे. 
धैर्यशाली साहित्यिक : पर्वची काही वैशिष्ट्येच येथे उल्लेखिता येतील. त्याला कलात्मक, सृजनशीलता, सहजता - व्यावहारिकतेचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी अपमिथकीकरण (डिमिस्टीफीकेशन अथवा डिमायथॉलायजेशन) आणि मनोवैज्ञानिक विश्‍लेषण या तंत्रांचा अवलंब केला आहे. याला पूरक आणि पोषक म्हणून प्रज्ञाप्रवाह पद्धती (स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस) आणि स्मरणतंत्र (मेमरी टेक्निक) यांचा वापर केला आहे. अपमिथकीकरण म्हणजे दैवत्व काढून टाकणे तसेच गौरवीकरणाच्या घटनांचे उच्चाटन होय. महाभारतातील सर्वात मुख्य पात्र असलेल्या कृष्णाचे देवत्व नाकारणे हे खर्‍या अर्थाने धैर्यवान साहित्यिकच करू शकेल, असे खूप मोठे धाडस आहे. कोणत्याही अलौकिक घटनेला वाव न देता कथावस्तू हाताळणे आवश्यक आहे. 
पंप यांनी आपल्या धार्मिक भूमिकेमुळे काही प्रसंगांना हात घातला नाही. पण शिशुपाल वधासारख्या घटना टाळल्या नाहीत. मात्र, भैरप्पा यांनी दैवत्व अथवा अलौकिक प्रसंगांना सरळ टाळले आहे. उदाहरणार्थ अक्षयवस्त्र प्रसंगात द्रौपदीचा संताप पाहून दुशासन माघार घेतो. वास्तवतेच्या आधारावर असे प्रसंग हाताळण्यासाठी भैरप्पा यांनी अक्षयवस्त्र प्रसंग टाळला आहे. विश्‍वरूप दर्शन प्रसंग आणि उत्तरेच्या गर्भरक्षणाचा प्रसंग याप्रमाणेच शिशुपाल, नरकासुर, जरासंध, सैंधव आदींच्या वधाचे प्रसंग यातून ठळकपणे जाणवते. 
कुठेही दैत्वाचा उल्लेखच नाही. कंस प्रकरणही अशा प्रकारे हाताळले आहे, की त्याने कौटुंबिक वादाचे रूप धारण केले आहे. त्याच्या क्रूरतेमागे हे कारण आहे. कृष्ण एक मित्र, चतुर राजकारणी, मुत्सद्दी, द्रष्टा नेता म्हणून साकारले आहे. 
युद्धानंतर धृतराष्ट्राच्या द्वेषाग्नीत भीमरुपी पुतळा नष्ट होतो, हे सांगण्याऐवजी, भीमाला मारण्यासाठी एक खंजीर लपवल्याचे जाणणारा कृष्ण धृतराष्ट्राची निर्भर्त्सना करतो, हे वास्तव चित्रण हे याचे उत्तम निदर्शक म्हणून पाहता येईल. असे अनेक प्रसंग ते दुसर्‍यांच्या आठवणी अथवा विधानाच्या रूपात मांडतात. मात्र, कथेचा प्रवाहीपणा, वाचनीयता याला कुठेही धक्का लागणार नाही, याची काळजी ते घेतात. उदाहरणार्थ, कीचक वधाचा प्रसंग पाहता येईल. याच प्रकारे भीम - दुर्योधन यांच्यातील शेवटच्या गदायुद्धाच्या प्रसंगाच्या निवारणामागची भैरप्पा यांची औचित्याची भूमिकाही आपल्याला चकित करते. वैशंपायन सरोवरातून बाहेर आलेल्या दुर्योधनाला पाहून भीम ‘हा आधीच मेला आहे. त्याच्याशी कसले युद्ध ?’ असे म्हणून निघून येतो. 
 पात्रांतील द्वंद्व : पंचपत्नीत्वासाठी कुंती द्रौपदीला राजी करते, ही कल्पना अनन्य आहे. मुलांना रागावण्यातच त्याचे समाधानही आहे, हे विशेष आहे. ‘माझ्यापोटी जन्माला आलेली मुले, एका रक्ताचे भाऊ एका मुलीच्या मोहात एकमेकांविरोधात उभे आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. गप्प बसा. मी विचार करते.’ (पृष्ठ 124) पूर्वापार चालत आलेल्या नियोग पद्धतीविषयीही जेथे तेथे सुदीर्घ चर्चा दिसून येते. मनोवैज्ञानिकदृष्ट्या पात्रांमधील द्वंद्वाचे विश्‍लेषण हे पर्वचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. महाभारताची सर्व पात्रे त्यांच्या मनोविश्‍लेषणामध्ये गुंतली आहेत. याला उदाहरण म्हणून माद्री सती जाण्याचा प्रसंग पाहता येईल. भीमाचे विधान हे आणखी एक उदाहरण आहे. : बारा वर्षे वनवासात कंदमुळे खाऊन, एक वर्ष दुसर्‍यांच्या घरात काम केले. सुख अनुभवण्याची शक्ती असण्याचे वय संपल्यावर पुन्हा राजवाड्यात राहिले काय, वनात राहिले काय? दुर्योधन, दुशासन, कर्ण, शकुनीसह उर्वरित सर्व कौरवांना, त्यांना जन्म दिलेल्या आंधळ्याला मारणे, ही माझी एकच इच्छा आहे. मी जीवंत असताना... माझ्या पत्नीला जांघ दाखवलेल्या त्या सर्वांना ठार मारल्यावर शांत होईन. (पृष्ठ 80).  
पात्रचित्रणात व्यक्तीच्या स्वभावाची महानता, महत्त्व सांगण्यात भैरप्पा यांनी दाखवलेली संवेदनशीलता प्रशंसनीय आहे. मय निर्मित राजवाड्यात जमीन पाणी समजून, पाणी जमीन समजून मुखभंग झालेल्या दुर्योधनाला पाहून दौपदी हसली नाही, हे सांगताना ती राजघराण्याशी अनुरूप वागली नाही असा अर्थ होईल, हे भैरप्पा सांगतात. त्यामुळे कौरवेश्‍वराच्या सूडाला हेच मूळ कारण हे परिभाषित करणार्‍या सामान्य दृष्टिकोनाच्या पलीकडे ते गेल्याचे दिसते. निसर्गाचे वर्णन औचित्यपूर्ण आणि तेवढ्या थोडक्यात करणारे भैरप्पा हे निसर्गेतर वर्णनही अद्भुतपणे करू शकतात, यासाठी मत्स्ययंत्राचे वर्णन हे उत्तम उदाहरण आहे.  
युद्धभूमीचे चित्रण : दु:खद घटना, करूणरसाचा प्रसंग किती सहजपणे हाताळता येईल, यासाठी अभिमन्यू आणि घटोत्कच यांच्या मृत्यूनंतर अनुक्रमे सुभद्रा आणि भीमाच्या वेदनेचे वर्णन पाहता येईल. पर्वमध्ये जितक्या बीभत्सपणे युद्धाचे वर्णन आले आहे, तितके अन्य कोठेही आले नसल्याचे दिसते. इतस्तत: तुकडे होऊन पडलेले मृतदेह, ते खाण्यासाठी घिरट्या घालणार्‍या गिधाडांचे चित्कार, दुर्गंधी सहन होत नसल्याने दुसर्‍या मार्गाने रथ नेणारे सारथी अशा वर्णनांना आपल्या काळात झालेल्या जागतिक स्तरावरील आणि भारताच्या भूमीवर झालेल्या युद्धांच्या अहवालाचा आधार आहे. 
पर्व वाचून संपल्यावरही युद्धभूमीवरील दुर्गंधी आपल्याला विसरता येत नाही म्हणजे त्यात अतिशयोक्ती नाही. युद्धाचा वृत्तांत सांगणारा संजय दिव्यदृष्टी लाभलेला असला तरी घटनेनंतर वृत्तांत लिहिणार्‍या पत्रकारासारखे चित्रण झाले आहे, हे लक्ष वेधणारे आहे. युद्धानंतर अत्याचारांना बळी पडून परतलेल्या अनाथांना पंजाबच्या कुटुंबांनी स्वीकारले. नरकासुराच्या ताब्यात असलेल्या स्त्रियांना स्वीकारून कृष्ण पत्नीचे स्थान देतो, याचे चित्रण समकालीन घडामोडींना भैरप्पा प्राचीनतेच्या पटलावरही कसा प्रतिसाद देतात, याला साक्षी आहे. युद्धामुळे जनजीवनावर होणार्‍या भीषण परिणामाकडे लक्ष वेधणारे भैरप्पा धृतराष्ट्राच्या राजवाड्यात दिव्याला तेल नाही, जेवायला अन्न नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, असे सांगतात. 
पर्वच्या मनोगतात भैरप्पा यांनी सांगितले आहे, ‘मी लिहिलेले महाभारताच्या पात्रांची कथा नाही; मानवी अनुभवाचे वेगवेगळे स्वरूप, रूप, मानवी संबंध, स्वरूप आणि विवेचन याची प्रज्ञा माझ्यात पहिल्यापासूनच होती. एकेक नवीन पात्र अथवा संदर्भ लिहिताना हे नवे आयाम सूचले. (पृष्ठ 10 - 11). समीक्षा करताना पर्वचे नवीन आयाम समोर येतात. पाश्‍चात्य महाकाव्यांचे मानदंड अथवा पौर्वात्य महाकाव्यांचे सिद्धांत यांच्या आधारावर ताडून पाहिल्यास पर्व आधुनिक गद्य महाकाव्य आहे, या सन्मानाला पात्र ठरणारे आहे. 
 डॉ. प्रधान गुरुदत्त, ज्येष्ठ कन्नड साहित्यिक 
साभार : दैनिक विजयवाणी 
- February 03, 2020 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, 13 August 2019

सार्थक जीवन जगून सागराला मिळालेली गंगा

रोहित चक्रतीर्थ, पत्रकार, बंगळुरू
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे


बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. सिद्धगंगेच्या श्री शिवकुमार स्वामीजींना 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांची दीर्घ मुलाखत घेण्यासाठी दीप तिम्मय्या यांनी आपली टीम तुमकुरला नेली होती. त्या टीममध्ये मलाही संधी दिली होती. आम्ही बंगळुरूहून निघून कॅत्संद्रजवळ उजव्या बाजूला वळलो. मठाला पोहोचेपर्यंत सायंकाळचे साडेचार वाजले. बंगळुरू - तुमकुरु राष्ट्रीय महामार्गावरील ट्रॅफिकची वर्दळ संपताच मन प्रशांत परिसतील सायंकाळच्या शीतलतेने व्यापले. भोवती उंच वाढलेली झाडे, पसरलेली विशाल खुली जागा, शेतशिवार. पुढे जाताच दिसल्या त्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या इमारती, अनेक समाधी, भव्य संस्कृत पाठशाळा, देवालये, मठ, दासोह भवन, अतिथीगृहे. मध्यभागी उभे राहून भोवती पाहिल्यास भव्य, उंच सिद्धगंगा डोंगराची अगाधता भान हरपून टाकत होती. डावीकडे रामदेवाचे डोंगर, त्याच्या पलिकडे देवराय दुर्ग. संस्कृत पाठशाळेच्या बाजूने डोंगराला लागल्यास समोरच्या एका गुहेत कधीच न आटलेले सिद्धगंगेचे तीर्थजलकुंड. मठाचा कर्मचारी आम्हाला हे सर्व दाखवत होता. सहा वाजता सामुदायिक प्रार्थना होते; स्वामीजीही तेव्हा तेथे असतात, असे त्याने सांगितले. तोपर्यंत आम्हाला इकडे तिकडे दहा - वीस विद्यार्थी दिसले असले तरी मठाचे विशाल प्रांगणही भरुन वाहावे इतक्या विद्यार्थी सागराने भरते, याचा आम्हाला अंदाजही नव्हता. मात्र, सहा वाजायला दहा मिनिटे कमी असताना कोठेही असले तरी पंचा, लाल शेला परिधान केलेली मुले तेथे येत होती!  पुराच्या काळात धरण फुटल्यावर खेड्यांत पाणी शिरावे तसे त्या प्रांगणात काही मिनिटांतच 8000 मुले जमली! हजारोंची संख्या असली तरी कुठेही धक्काबुक्की, हसणे - खिदळणे, गोंधळ नाही. एक मूकचित्र पाहतोय का, असा भ्रम व्हावा, अशाप्रकारे माझ्या डोळ्यांसमोरच ते सर्व प्रांगणात शिस्तबद्ध उभे राहून स्वामीजींची प्रतिक्षा करत होते. स्वामीजींनाच पाहून घड्याळ आपणहून स्वत:ला सेट करुन घेते, असे वाटावे इतक्यातच सहाला सहा सेकंद कमी असताना कोणाच्याही मदतीविना आलेले स्वामीजी आसनावर आसनस्थ झाले! आसनासमोरील छोट्या टेबलवर ठेवलेली त्या दिवशीची कार्यक्रम पत्रिका चष्म्याविना वाचली! ही दृश्ये पाहून हे सत्य की भास म्हणून मला हाताला चिमटा घ्यावा लागला!

आमच्यासाठी तो एक दिवसाचा कार्यक्रम. मात्र श्री शिवकुमार स्वामीजी ते व्रत एक - दोन दिवस नव्हे तर बरोबर 80 वर्षांपासून आचरत आले होते. पहाटे दोन वाजता - आपण अजून साखर झोपेत - ते झोपेतून उठून, योगाभ्यासाला बसायचे. ब्राह्म मूहुर्ताला स्नान, जप - तप, नामस्मरण, मुप्पिन षडाक्षरी, निजगुणांच्या पद्यांसह शिवपूजा संपवून साडेपाच वाजता लौकिक जगात परतल्यावर पुन्हा त्यांना रात्री उशिरा अकरा वाजताच विश्रांती मिळायची. तरुणपणी मठ चालवण्यासाठी आवश्यक आर्थिक संपदा जमवण्यासाठी स्वामीजी पहाटे सहाला बैलगाड्या घेऊन निघायचे. बैलगाडी जाणार नाही तेथे ते घोड्यावरुन जायचे. घोडाही जाणार नाही त्या ठिकाणी ते पायीच पोहोचायचे. तसेच खेड्यात जाऊन मठातील विद्यार्थ्यांच्या आहार - निवासाच्या व्यवस्थेसाठी रिकामी झोळी पुढे करत भिक्षा मागून, लोकांनी दिलेला एक दाणाही वाया जाणार नाही इतक्या काळजीने आणून मठातील सदा पेटत्या चुलींचे पोट भरावे लागायचे. अनेकदा मठाच्या शेतात वाढलेले गवत आपणच कापून पेंढ्या बांधून आणून गोशाळेतील गायींपुढे टाकायचे. मठाचा विस्तार वाढू लागल्यावर हवे तेथे नवी बांधकामे उभी राहू लागली तेव्हा त्यासाठी स्वत: दगड, वाळू वाहिली. शारिरीक श्रमाची कामे संपताच  स्वामीजी विद्यार्थ्यांसाठी शिक्षक व्हायचे. त्यांच्या अध्यापनात कालीदास, भास, कुमार व्यास, अल्लम, मिल्टन, शेक्स्पिअर अशा सर्व देशभाषांच्या सिमेबाहेरील कवी लीलया येऊन जायचे. अध्यापनाचे कर्तव्य संपल्यावर थोडीशीही उसंत नाही! पुन्हा पाकशाळेतील कर्तव्य हाक द्यायची. रात्रंदिवस पाकशाळेतील चुलींमध्ये लाकडे  जळत राहतील हे पहावे लागत होते ना?  सरपण संपल्यावर त्यासाठी हेच संन्यासी कासोटी बांधून उभे राहायचे. लाकडे फोडण्यासाठी कुर्‍हाड धरलेले हेच दंड काही क्षणातच रागीमुद्दीसाठी कढयांत चमचा फिरवताना दिसायचे. अशाप्रकारे एकाही दिवशी कोणतेही कारण पुढे न करता, न चुकवता, आठ दशके ही व्यक्ती रोज वीसहून अधिक तास, आपल्यासाठी नव्हे तर केवळ इतरांसाठी आपले जीवन समर्पित करुन जगले, हे पुढील पिढीला सांगितल्यावर विश्‍वास ठेवतील ? तरीही हे भगव्या वस्त्रांतील जीवन श्री शिवकुमार स्वामीजी यांनी स्वत:हून आवडीने स्वीकारलेले नव्हते तर आकस्मिकपणे त्यांच्या जीवनाला ती महत्वाची कलाटणी मिळाली होती. बंगळुरू जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील वीरापूर येथे 1 एप्रिल 1908 रोजी शिवण्णाचा जन्म झाला. वडील होन्नप्पगौडा हे वीरापूरचे पाटील होते. परिसरातील गावांत त्यांना मान होता. त्यातच सात मुले, पाच मुली असलेल्या होन्नप्पा - गंगम्मा दांपत्याचे 13 वे अपत्य असलेला शिवण्णा शिक्षणात पुढे, खेळात चपळ, आईसारखाचा ईशभक्त, वडिलांसारखा वागण्याबोलण्यात विनयशील होता. इतर मुलांपेक्षा भिन्न, विशिष्ट व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या लहान मुलाला पाहून गावी आलेल्या एका हस्तसामुद्रिकाने, हा मुलगा घरालाच नव्हे गावासाठी ज्योती बनून प्रकाश देईल, असे सांगितले होते म्हणे. होन्नय्याच्या मुलाचे पायगुण चांगला असल्याचे सांगून गावातील वडीलधारी मंडळी त्याचे कोडकौतुक करायचे. प्राथमिक शिक्षण गुंडीगेरेतील कुलीमठात घेतले. वयाच्या आठव्या वर्षी आईच्या निधनामुळे पोरका झाल्याने पुढे आपल्या बहिणींच्या घरांमध्ये राहून शिक्षण सुरू ठेवले. हायस्कूलच्या शिक्षणासाठी तुमकुरुच्या सरकारी शाळेत प्रवेश घेतला. त्याच वेळेस गावात प्लेगची साथ पसरल्याने शेट्टीहळ्ळीला जावे लागले. मात्र, तेथेही प्लेगची महामारी आल्याने स्वत:च स्वयंपाक करुन शाळा शिकावी लागली. सिद्धगंगा मठात उद्दान शिवयोगी स्वामी काही विद्यार्थ्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था केल्याचे ऐकलेल्या मुलाने पुढील शिक्षणाच्या आशेने मठ गाठला. तेथे गरीबाला अनुमती मिळाली नाही. तरी  मुलाला शिक्षणाविषयी अदम्य रुची, श्रद्धा असल्याचे उद्दान शिवयोगी यांनी जाणले. त्यांनी त्याला मठात चार महिने वास्तव्यास परवानगी दिली. शिवण्णाचा मठाशी पहिला संपर्क आला - तो अशाप्रकारे.
तेव्हा मठात एक लहान इमारत सोडली तर काही मालमत्ता नव्हती. तरीही धैर्याने स्वामीजींनी संस्कृत पाठशाळा सुरु करुन त्यात लिंगायत, गौड, हरिजन, ब्राह्मण आदी सर्व जाती - पंथाच्या मुलांना संस्कृत अध्ययनाची सोय केली होती, हे विशेष. यावरुन उद्दान शिवयोगी किती आधुनिक होते, ही लक्षात घेता येणारी बाब आहे. अशा मठाला मरुळसिद्ध (मरुळाराध्य) यांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. काही काळ सिद्धगंगा मठात राहून शिक्षण घेणार्‍या शिवण्णा आणि त्यांच्यात स्नेह वाढला. आध्यात्मिक भुकेने दोघांना जवळ आणले असावे,  असे म्हणावे लागेल. हायस्कूल शिक्षण संपवून, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शिवण्णा इंटमिजिएटसाठी बंगळुरूच्या सेंट्रल कॉलेजमध्ये दाखल झाला. तरी कॉलेजमध्ये गेल्यावरही त्याचे आणि सिद्धगंगा मठाचे संबंध तसेच राहिले. सुटीत वर्षातून दोन - तीनवेळा त्याचे मठाला भेटी देणे चुकले नाही.
16 जानेवारी 1930. शिवण्णा सेंट्रल कॉलेजमध्ये बी. ए. अंतिम वर्षात शिकत होता. वीज कोसळावी तशी एक खबर आली. चार -  पाच वर्षांपासून परिचित, आत्मीय मित्र मरुळाराध्य यांचे अकालिक निधन झाले होते. ती खबर ऐकताच शिवण्णा सिद्धगंगेला पोहोचला. अंत्यसंस्कार कार्यात पुढे उभे राहून सर्व काही पार पाडले. डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसत, हृदयावर दगड ठेवून मठातील सर्व कामे हिरीरीने मार्गी लावली. हे सर्व सूक्ष्मपणे पाहणार्‍या गुणग्राही ज्येष्ठ स्वामीजींच्या मनात एक विचार आकार घेत होता. क्रियाकर्म संपल्यानंतरच्या दिवशी त्यांनी शिवण्णाला जवळ बोलावले. जवळ बसवून म्हणाले, “शिवण्णा ! मुला, या मठाचा पुढचा उत्तराधिकारी तूच ! ही जबाबदारी मी तुला सोपवत आहे, स्वीकार कर ! ’’ थंड तलवारीसारखे शब्द. दोरीवर उभे करुन खाली पडणार नाही अशाप्रकारे चाल असे सांगितल्यावर कसे, मगरींचे वास्तव्य असलेल्या तलावात सहजपणे उतरवून पोहायला सांगितल्यास कसे, असा हा प्रसंग! ऐकलेस का, स्वीकार कर; स्वीकार कर म्हणाले. जीवनच बदलवून टाकण्यासारख्या त्या बोलण्यावर एकदोन सेकंदाचे मौनही पसरण्याआधीच पटकन शिवण्णा म्हणाला, “आपली आज्ञा स्वामीजी !.’’ विचार करुन सांगतो म्हणून मान हलवली नाही; घरी विचारावे लागेल, हा बहाणा केला नाही; आता काय कॉलेज दोन महिन्यांत संपण्याच्या मार्गावर आहे, त्यानंतर सरकारी नोकरी करायची, ही सबबही पुढे केली नाही. सर्व काही बाजूला ठेवून शिवण्णा एकाच श्‍वासात त्या महाजबाबदारीला मान देता झाला होता. स्वामीजी आणि  आणि शिवण्णा यांच्यात झालेले बोलणे सविस्तरपणे वडील होन्नप्पगौडा यांच्यापर्यंत पोहोचले. कॉलेज शिकलेल्या मुलाला योग्य मुलगी पाहून त्याचे लग्न करावे, नातवांना खेळवावे, हे स्वप्न पाहिलेल्या वडिलांंची ही गोष्ट ऐकून छातीच फुटली. ते एकटेच नव्हे, आपल्या सर्व नातेवाईकांना एकत्र करुन लगबगीने सिद्धगंगेला पोहोचले. मुलाच्या दोन्ही भुजांना पकडून त्याचे डोके ठिकाणावर आहे ना, हे पाहिले. त्याला रागावले. चार चांगल्या गोष्टी सांगितल्या. हात पसरले. तरी मुलाचा निर्णय मात्र सिद्धगंगा डोंगराइतकाच अचल होता. बाबा, मला जन्म देऊन हे जग दाखवलेत. या जगाचे ऋण फेडण्यासाठी कार्य करण्याची संधी मला द्या - मुलगा हट्टाने या एकाच वाक्यावर अढळ राहिला. अश्रूधारा वाहिल्या तरी मुलाचे मन न विरल्याने बेजार वडील मठाशी संपर्कही गमावून बसले. शिक्षणाला प्रथम प्राधान्य देणारे उद्दान शिवयोगी आपल्या शिष्याच्या मार्गातील दगड बनले नाहीत. ते त्यांच्या मार्गात फुलांचा सडा बनले. मठाचा उत्तराधिकारी म्हणून पट्टाभिषेक झाल्यावर भगवी वस्त्रे धारण करणारा मुलगा त्याच वस्त्रांत पुढे बी. ए. अंतिम वर्षाची परीक्षा दिल्याची त्या काळी राष्ट्रीय बातमी झाली होती ! तेथून पुढे श्री शिवकुमार स्वामी यांचे संपूर्ण विरक्त जीवन. संपूर्ण समाजासाठी समर्पित जीवन. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर 11 वर्षांनी श्री शिवकुमार स्वामी यांचे गुरुही लिंगैक्य झाले. परंतु तेव्हा मठाची संपत्ती म्हणून हाती होते केवळ 300 रुपये. शिवगणाराधनेसाठीही पुरेसे पैसे नाहीत, ही परिस्थिती होती. केवळ 33 वर्षे वयाच्या युवकाच्या डोक्यावर फक्त 60 विद्यार्थ्यांच्या भोजन - निवासाचीच जबाबदारी नव्हे, तर संपूर्ण मठाच्या सर्व खर्चादी पेलून नेण्याची महत्वाची जबाबादारीही होती. येणारी संकटे येऊ दे, देवाची कृपा राहू दे, ही सद्भावना सोडल्यास स्वामीजींच्या समोरील मार्गावर होता अंधार, फक्त अंधार... तरीही त्या अंधारातच  आशेचा किरण दिसला. गावात कंजुष शेट्टी म्हणून ओळखली जाणारी चिक्कण्णा नावाची एक व्यक्ती बैलगाडी भरुन तांदूळ घेऊन कुठे निघाली होती कोण जाणे, मनपरिवर्तन होऊन तो वाटेतून बैलगाड्यांसह परतला आणि मठासमोर येऊ उभा राहिला. गाडीतील सर्व तांदूळ मठाच्या आवारात उतरवून हातातील 3000 रुपये स्वामीजींच्या हाती ठेवून  शरणु शरणार्थी म्हणाला! तेवढेच नाही पुढे त्याने गावातील कोणाकोणाला व्याजाने पैसे दिले होते त्यांच्याकडून मुद्दल वसूल करुन ते सर्व मठाच्या तिजोरीत आणून जमा केले! सोबतच मठातच कोणतेही काम करत जीवन व्यतीत केले! तेथून सुरू झालेल्या यात्रेत श्री शिवकुमार स्वामी यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांनी मार्गातील चढ - उतारांवरही  मात केली. या यात्रेत सामना केलेल्या अग्निपरीक्षांचा खरा हिशेब त्यांच्याशिवाय कुणालाही माहीत नाही. विटा - विटांनी मठ बांधलेल्या स्वामीजींनी संपूर्ण जीवनयात्रेत लाकडे फोडली, दगड वाहिले, गायी सांभाळल्या, मुलांना दही मिळावी या उद्देशाने दूधाचा त्याग केला, अशा प्रसंगांचा विशेब ठेवायचा तरी कसा? एखादी व्यक्ती आपल्या जीवनात दत्त म्हणून समोर ठाकलेल्या एका प्रसंगाला स्वीकारुन, त्यानुसार आपले अखंड जीवन कसे जगले याचेच मला आश्‍चर्य वाटते. मनुष्यमात्राला जीवनाच्या एका ना एका क्षणी कामक्रोधादी षड्रिपुंची बाधा होतेच होते, मात्र स्वामीजी कसे त्यापासून दूर राहून जगले, हा एक अभ्यास करण्यायोग्य विषय आहे !  आपल्या जीवनात ते गोरगरीबांना भेटले, राजेरजवाड्यांना, पंतप्रधान - राष्ट्रपतींनाही भेटले. मात्र कोणत्याही भेटीने त्यांच्यात तिळमात्रही कमीपणा अथवा मोठेपणा आला नाही. गोरगरीबांनी प्रेमाने दिलेला पावशेर तांदूळ - रागी, राजकारण्यांकडून मिळणारे हजारो रुपयांचे दान त्यांनी नि:स्वार्थपणे स्वीकारले. देवराज अरस यांचे काँग्रेस सरकार असताना तीन वर्षे सरकारच सिद्धगंगेवर तुटून पडले होते. 1850 पासून कोणतेही जात, मत, पंथ न पाहता धर्मनिरपेक्षतेने कार्यरत मठ अरस यांचे लक्ष्य ठरले, हे विचित्र होते. मागास जाती -  वर्गांना तुम्ही चांगली वागणूक देत नाही, अशा विचित्र अतार्किक मुद्यावरुन अरस यांनी तीन वर्षे  सरकारकडून मठाला मिळणार्‍या अनुदानांना कात्री लावली. अनुदानाच्या पाठबळाविना  रस्त्यावर येण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना स्वामीजींनी केवळ झोळीच्या बळाच्या भरवशावर मार्गक्रमण केले. खेडोपाडी भिक्षाटन करुन धनधान्य गोळा केले. आकाशच फाटून डोक्यावर पडले असताना मुले मात्र एका वेळेसही उपाशी राहू नयेत याची काळजी आणि भूतदयेने रात्रंदिवस यंत्रगत राबणार्‍या स्वामीजींनी सरकारी मदतीविना आपण मठ चालवू शकतो, हे दाखवून दिले. प्रतिदिन श्री मठाला रोज लागणारे धान्य, वस्तूंचा हिशेब पाहिल्यास कोणाचेही डोके गरगरायला लागेल. 3000 किलो तांदूळ, 1500 किलो तूरडाळ, 400 किलो भाजीपाला, उप्पीट रवा 500 किलो, 300 किलो कांदा, 200 नारळ... एवढे सर्व एका दिवसाच्या जेवणासाठी लागते; रोज 9000 विद्यार्थ्यांना पोट भरुन जेवण देणार्‍या श्री मठात स्वामीजींचा आहार 2 इडली, एक छोटे रागीमुद्दी, कडुनिंबाच्या काडीचा काढा! हे देव नाहीत तर आणखी कोण ?

त्या दिवशी मुलाखतीसाठी सिद्धगंगेला गेलो असताना मला सिद्धगंगा शिक्षण संस्थेचे संचालक चन्नबसप्पा यांच्या गोष्टी ऐकण्याची संधी मिळाली. लहान असताना चौथ्या - पाचव्या वर्षी मठात आलेले चन्नबसप्पा हे पुढे शिक्षण संपवून सुरत्कल कॉलेजमध्ये गणित प्राध्यापक बनले होते. ते मठात विद्यार्थी असताना स्वामीजी दररोज मुलांचा क्लास घ्यायचे. इंग्लिश, कन्नड, संस्कृतसह स्वामीजी मुलांना गणित शिकवायचे. सेंट्रल कॉलेजमध्ये पदवीला स्वामीजींनी भौतिकशास्त्र आणि गणित शिकल्याचे  बहुतेक लोकांना माहीत नाही. गणिताचा विद्यार्थी असलेल्या मला स्वामीजींची गणित विषयातली रुची पाहून आश्‍चर्य वाटले. गणितात 111 या संख्येला एक विशेष नाव आहे. त्याला नेल्सन म्हटले जाते. 111 वर्षांचे भरलेले आयुष्य जगून, उत्तरायण पुण्यकालात, सोमवारी पूर्णायुष्य संपवून ईश्‍वराच्या चरणी लीन झालेले स्वामीजी या भूमीचे सन - अर्थात भूमिपुत्र म्हणजून जगले; ते या कन्नड मातीचे पुण्य आहे. त्यांच्यासारखे जगता न आले तरी ते असतानाच्या काळात आपण या भूमीवर  आहोत, हेच आमचे पुण्य होय. ते अलग झाल्यामुळे भूमीवरील पुण्यच पुरुष रुपाने गेल्यासारखे झाले आहे. मन विदीर्ण झाले आहे. ओम शांती.






- August 13, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, 12 August 2019

कन्नड गीत


नेत्तीयल्ली गिरी छत्रियनेत्तीद शक्तीगे ओ नमना । धृ ।
सुत्तले सागर वस्त्रव धरिसिद भक्तीगे ओ नमना
कोटी कोटी कै, कोटी कोटी कंटाळी निंतिरिवुदु
साटी इल्लद एकरुपाद ताईगे ओ नमना, शक्तीगे ओ नमना
मरिगिड आडीतिडुव गाळीय परिमळ निन्न उसिरू
निनू उट्टिरव पितांबरवू शालीवनद हसिरू
हगलल्ली सूर्य,  इरूळल्ली चंद्र, निन्न हणेय तिलकं
एंथ श्रीमंत रुप निन्नदे नोडी ननगे पुलका, नोडी ननगे पुलका
नेत्तीयल्ली गिरी छत्रियनेत्तीद शक्तीगे ओ नमना
सुत्तले सागर वस्त्रव धरिसिद भक्तीगे ओ नमना, भक्तीगे ओ नमना
सावीर धारेगळ आदरु वंदे सागर नम्म गुरी
सावीर रेशमी एडेगळू सेरीद पत्तल नम्म सिरी
नुरू शक्तीगळ सुंदर संगम संस्कृती ई नाडू
हुट्टू कुडलू नाडिन दुडिमेगे नमगे यारू ईडू, नमगे यारू ईडू
नेत्तीयल्ली गिरी छत्रियनेत्तीद शक्तीगे ओ नमना
सुत्तले सागर वस्त्रव धरिसिद भक्तीगे ओ नमना, भक्तीगे ओ नमना
कोटी कोटी कै, कोटी कोटी कंटाळी निंतरूनू
साटी इल्लद एकरुपाद ताईगे ओ नमना, शक्तीगे ओ नमना, शक्तीगे ओ नमना, नमना, नमना ,नमना, ताईगे ओ नमना,नमना, नमना, नमना,  कोटीगे ओ नमना, नमना, नमना, नमना,  देवीगे ओ नमना, शक्तीगे ओ नमना, ताईगे ओ नमना, कै कंटिगे ओ नमना...

- August 12, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

त्रिविध दासोही शिवकुमार स्वामी


६०० वर्षांची शरण परंपरा लाभलेल्या कर्नाटकातील तुमकुरु येथील सिद्धगंगा मठाला पद्मभूषण डाॅ. शिवकुमार स्वामी यांनी अन्न, अक्षर आणि आश्रय या त्रिविध दासोहाच्या आधारे देशभरातच गौरवाचे स्थान मिळवून दिले.  अखंड कायक (कर्म)  निष्ठा, अनन्य भक्ती आणि ज्ञानामुळे त्यांना जनमनांत नडेदाडुव देवरु (जिवंत ईश्वर) म्हणून स्थान मिळाले. १११ व्या वर्षी २१ जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले. 


या जगातील शेकडो गुरुंस पाहून पाहुन, मी कंटाळून गेलो हो,  वित्तापहारी गुरू शेकडो, शास्त्रार्थ सांगणारे गुरू शेकडो,  मंत्रतंत्राने दोन्ही लोकांमध्ये, सुखदु:खे देणारे गुरू शेकडो, सत्कर्माचा उपदेश करून, स्वर्ग - मर्त्यामध्ये सुख देणारे गुरू शेकडो, विचारमार्गाने षट्साधनांचा उपदेश करणारे गुरू शेकडो. विषय सगळे मिथ्या म्हणून समजावून देऊन, आत्मप्रेम निर्माण करणारे गुरू शेकडो, शिवजीवांचे ऐक्य समजावून देऊन, निर्मल ज्ञान देणारे गुरू प्रथम होत.  संशयाचे किडे सर्व ज्ञानाग्नीमध्ये जाळून टाकून,
मुक्तीची गरज ज्ञानाच्या बंधनी ठेवणारे गुरू, चेन्नबसवण्णाविना दुसरे कोणी न दिसती पहा हो,
कपिलसिद्ध मल्लिकार्जुना.  श्री सिद्धरामेश्वरांचे हे वचन सर्वकालिक सत्य आहे. गुरु कसा असावा, हे त्यांनी या वचनातून सांगितले आहे. श्री शिवकुमार स्वामी हे शरण विचारांनुसार मूर्तिमंत गुरू होते. बाराव्या शतकात बसवण्णांनी दासोह शब्दाला क्रियाशील रुप दिले. मात्र, आजच्या पिढीला त्याचा अर्थ समजून घेण्याचा, पाहण्याचा योग श्री शिवकुमार स्वामी यांनी दिला. त्यांचे ८८ वर्षांचे संन्यस्त जीवन, ७७ वर्षे मठाधीश म्हणून कायक निर्वाह हे संख्यात्मकदृष्ट्या आश्यर्चकारक आहे. मात्र, यापेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांचा निकटचा लोकसंपर्क.  त्यांच्या दृष्टीने संन्यास हा समाजापासून अंतर आणि धार्मिक गोष्टींपुरते सीमित नव्हते. मनुष्याची आंतरिक उन्नती हाच त्यांच्या चिंतनाचा प्राधान्याचा विषय होता. त्यासाठी सशक्त व्यक्तित्व घडवणारे शिक्षण गोरगरीब आणि वंचित समूहांना मिळवून देण्यासाठी आजीवन ते राबले.

ते अनपेक्षितपणे सिद्धगंगा मठाचे उत्तराधिकारी झाले.  मात्र, त्यांनी आपल्या वैराग्यभाव, संयमी, दृढसंकल्प, कार्यदक्षता, वाकपटुत्व, सेवाकांक्षा आणि बसवादि शिवशरणांनी प्रतिपादित कायक व दासोह तत्त्वांच्या आचरणाने मठाला लौकिक प्राप्त करुन दिले. १९३० मध्ये श्री उद्दान शिवयोगी यांनी मठाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केली. १९४१ मध्ये मठाची सूत्रे त्यांच्या हाती आली तेव्हा केवळ ६० विद्यार्थ्यांची संस्कृत पाठशाळा होती.  तेथे आज १३१ शैक्षणिक संस्थांतून ४९ हजार १४७ विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवली जात आहे.  तर अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशातच 'एसआयटी' या नावाने ख्याती मिळवली आहे.  सरकार शिक्षणाला अधिक महत्व देत नसतानाच्या काळात मठाने त्याचे महत्व ओळखले. योग्य शिक्षण, वसतिगृह आणि भोजन याद्वारे हजारो मुलांचे जीवन उजळवले. 'ज्ञान हाच दीपस्तंभ' हा शिवकुमार स्वामी यांचा विचार होता. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर 'शिक्षण हे व्यक्ती व राष्ट्र या दोहोंसाठी सशक्तीकरणाचे माध्यम आहे. कारण आपल्या देशाचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित राहू शकेल. योग्य आणि चांगले शिक्षण हे एक असे माध्यम आहे जे मनुष्याला शक्तिसंपन्न बनवते. तसेच त्याला समाजातील वाईट गोष्टींपासून मुक्त ठेवते.’  विशेष म्हणजे १० हजार विद्यार्थ्यांच्या निवास, भोजनाची आणि रोज दर्शनासाठी येणाऱ्या तीन हजारांहून अधिक भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते.  मठातील अनेक दशकांपूर्वीची पेटती चूल आजही गोरगरीब, अनाथ विद्यार्थ्यांसह भाविकांसाठी नंदादीप बनली आहे. 'जेवणारा यजमान, वाढणारा दास' असे शिवकुमार स्वामी म्हणायचे. त्यामुळेच रात्रीही मठात आलेला भाविक उपाशीपोटी गेल्याचे आजपर्यंत एकही उदाहरण नाही. त्यांनी त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था लावली होती.
शिवकुमार स्वामी यांनी बसवण्णांचा कायकवे कैलास हे तत्व जीवनात प्रत्यक्षात आणले. त्यांच्यावर बसवण्णांसह स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. गरीब, दुबळे, रोगी वैगरेंमध्ये ज्यांना शिव दिसतो, ते खरेखुरे शिवाचे उपासक होत. तेच खरोखर शिवाची उपासना करीत असतात आणि जो माणूस केवळ प्रतिमेमध्येच शिवाची उपासना करीत असतो, त्याने धर्मजीवनाला नुकतीच सुरुवात केली आहे, असे म्हणता येईल, फक्त मंदिरांमध्येच शिव आहे, असे मानणाऱ्या व्यक्तीपेक्षा जी व्यक्ती जात किंवा धर्म विचारात न घेता , एका देखील गरीब माणसाची शिव बोधाने सेवा करते तिच्यावर शिव अधिक प्रसन होतात, हा विवेकानंदांचा विचार त्यांनी अनुसरला. ते रोज वि्दयार्थ्यांना नीतिकथा सांगायचे. त्यात बसवण्णा, विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या संदर्भातील कथा सर्वाधिक असायच्या. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबन, शिक्षणाबरोबर जीवनशिक्षणाचेही धडे दिले. त्यांच्यावर श्रमसंस्कार केला.  त्यांच्यासोबत मठात आणि शेतात राबणारे ते कायकयोगी होते.  त्यांच्यात धर्म आणि कर्म यांचा समन्वय होता. त्यामुळेच राष्ट्रकवी जी. एस. शिवरुद्रप्पा, ज्येष्ठ साहित्यिक जी. एस. सिद्धलिंगय्या, गो. रु. चन्नबसप्पा, कुं. वीरभद्रप्पा, अभिनेता मुख्यमंत्री चंद्रू आदी अनेकविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मठाच्या शिक्षण संस्थांतून घडली. श्री शिवकुमार स्वामी यांनी बसवण्णांच्या विचारांच्या प्रसारासाठी कार्य केले.  ते म्हणायचे, ' 'आज जगाला शांती हवी आहे. ती केवळ बसवण्णांसह  शरणांच्या वचन साहित्याच्या अध्ययन, अनुसरणानेच निर्माण होईल. हा कोण ऐवजी तो आमचा हा मधुर आत्मीय भाव सर्वांच्यात वाढावा. तेव्हाच जातियता संपेल. 'तसेच शेती विकासासाठी कृषी, जनावरे प्रदर्शनासह विविध उपक्रम राबवले. मठाची वार्षिक यात्रा ही रयत यात्रा म्हणूनच ओळखली जाते. चेन्नबसवण्णा म्हणतात,  भगवी कफनी घातलेला जंगम असे का? कर्णकुंडल , हस्तमुद्रिका बाळगलेला जंगम असे का? केवळ संन्यासी सारे जंगम असती का? वेषधरी सारे जंगम असती का? अज्ञानी सारे जंगम असती का? भूभारी  सारे जंगम? नव्हेत. जंगम कोण म्हणजे, सीमा नसलेला निस्सीम हा जंगम, आशा नसलेला निरासक्त हा जंगम, चिंता नसलेला निश्चिंत हा जंगम, अशा जंगमाची चाहूल न लागल्याने, कूडल चेन्नसंगय्या स्वत:च जंगम झाला. या वचनातील जंगमाच्या लक्षणाप्रमाणे पद्मभूषण डाॅ. शिवकुमार स्वामी हे निस्सीम, निरासक्त आणि निश्चिंत होते. तसेच ते लोकजंगम होते.

चौकट
धर्मनिरपेक्ष धोरणामुळे बनले सर्वांचे श्रद्धाकेंद्र
सिद्धगंगा मठ वीरशैव लिंगायत समुदायाचे असले तरी श्री शिवकुमार स्वामी यांच्या धर्मनिरपेक्ष धोरणामुळेच ते सर्व वर्गातल्या भक्तांचे श्रद्धाकेंद्र बनले. शैक्षणिक संस्थांत येणाऱ्या विद्यार्थी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांत त्यांनी कोणताही भेद केला नाही.  कन्नडद कोट्यधिपती कार्यक्रमात भगवद्गीतेचे श्लोक सहजगत्या व पटापट उच्चारत गंगावतीच्या हुसेन बाशा याने एक कोटीचे बक्षीस मिळवले. हुसेनने सिद्धगंगा मठातच शिक्षण घेतले. बक्षीस मिळवल्यानंतर हुसेन आधी स्वामींच्या दर्शनासाठी सिद्धगंगा मठ गाठला होता.  सर्वधर्मीयांना मठाच्या सेवाकार्याचा लाभ मिळत असला तरी त्यांचा अजेंडा मतांतरणाचा नव्हता. केवळ मानवीय सेवा हाच त्यांचा अजेंडा होता.
अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर





- August 12, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

काश्मीर आता खरा भारताचा मुकुटमणी !

सहना विजयकुमार, बंगळुरू

अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे 
आता यापुढे काश्मीरला भेट देणार्‍यांना पडझड झालेली घरे, फोडलेली मंदिरे, हरवलेले सांस्कृतिक अवशेष पाहायला मिळाले नाही तरी पुरेसे आहे. त्यांचे संवर्धन खरेच कष्टदायक आहे.

अशक्य ! काश्मीरचे ऐतिहासिक, राजनैतिक आणि वैधानिक पार्श्‍वभूमी जाणणारे या वेळेस भावूक न होणे अशक्य ! ते काहीही नसले तरी आनंद व्यक्त करायला केवळ भारतीय यापेक्षा आणखी कोणत्याही निमित्ताची गरज नाही !
शेवटी कलम 370 नावाच्या ब्रह्मराक्षसाचे शिरच्छेद झाले. त्यासोबतच 35 ए नावाचे त्याचे विषारी सुळे दातही गळून पडल्याने भारतीयांत आनंद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काश्मीरी हिंदूंमध्ये (सतत काश्मीरी पंडित म्हणून उल्लेख करत केवळ ब्राह्मण जातीवर अन्याय झाल्याची भावना निर्माण करुन त्याला क्षुल्लक गोष्ट बनवले, हे वेगळ्या स्तराचे राजकारण. असो, त्याची चर्चा आता नको.)
29 वर्षांपूर्वी मशिदींमधील ध्वनिवर्धकांवरुन धमकी, मतांध मौलवींची क्रूरता, विश्‍वास ठेवलेल्या मुस्लिम बांधवांनीच चालवलेला रक्तपात, अत्याचाराला बळी पडून घाबरुन रातोरात आपली घरे सोडून बाहेर पडलेले आज भावूक होवून अश्रूंना मोकळी वाट करुन देत आहेत. साहजिकच भावूकतेने मूक झाले आहेत. बहुतेक ही समस्या इतक्या सहजतेने सुटेल, असे त्यांनाही वाटले नसावे. राष्ट्रीय वाहिन्यांवरील अगणित चर्चांमधून सर्वजण मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर सतत टीका करत असतात. त्यांचा आक्रोश समजून घेण्यासारखा आहे. तसे पाहिल्यास ही समस्या सोडविण्यासाठी 72 वर्षे लागावीत, इतके क्लिष्ट ती कधी नव्हतीच. अभाव होता केवळ इच्छाशक्तीचा.
एकतर नेता स्वत: बुद्धिमान असावा. नाहीतर बुद्धिमंतांनी दिलेला सल्ला पाळण्याचा विवेक तरी हवा. देशाच्या हिताचे निर्णय घेण्याचे धैर्यही हवे. पण या गोष्टी नसलेल्या नेहरू यांनी काश्मीरची जबाबदारी घेतली हा त्यांचा मोठा अविचार होता. नंतर ती जबाबदारी कोणत्याही प्रकारे योग्य नसलेल्या गोपालस्वामी अय्यंगार यांच्याकडे हस्तांतरित केली. काश्मीर म्हणजे त्यांना वाटले इतके सुलभ होते? या भूमीवर गोनंद, त्यानंतर झालेले 43 राजे, कार्कोट, उत्पल, गुप्त, लोहर, दुलाच, रिंचन, शहमीर, सय्यद, दर, चक, मुघल, अफगाण आणि शिखांनी राज्य केले. नंतर आलेल्या निर्लज्ज धर्मनिरपेक्ष राजकारण्यांनी वाहिलेल्या रक्ताच्या पाटात ही भूमी भिजली. त्याच्या नशिबाची कथा समजायला कल्हणाची राजतरंगिणी एकच पुरेसे आहे. दुर्दैवाने, काश्मीरचा इतिहास कोणत्याही पाठ्यपुस्तकात नाही. अरबांना पिटाळून लावणार्‍या कार्कोट वंशाच्या अग्रणी वीर ललितादित्य याची अंगावर रोमांच उभी करणारी कथा बाबर, अकबराच्या कल्पित, उत्प्रेक्षित महागाथांमध्ये समाधिस्थ झाली. असो, काश्मीरचे अन्य आयाम बाजूला ठेवून स्वातंत्र्योत्तर भारतातात घडलेल्या दोन घटनांचे अवलोकन करू या.







घटना 1 : 24 ऑगस्ट 1947 : आजाराने ग्रस्त पाकिस्तानचे गवर्नर जनरल मोहम्मद अली जीना विश्रांतीसाठी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतात. त्या वेळी भारत  - पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झाले असले तरी जम्मू काश्मीर संस्थान कोणत्याही देशात विलीन झाले नव्हते. काश्मीर मुस्लिमबहुल प्रदेश असल्या कारणाने कधी का होईना ते आपल्यालाच मिळेल, हे जीनांचे गणित होते. त्यामुळे आपले ब्रिटीश सचिव कर्नल विल्यम बर्नी यांना बोलावून आपली काश्मीरमध्ये दोन आठवडे राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देतात. त्यानंतर पाच दिवसांनी बर्नी येतात. ते आघातकारी उत्तर देतात, ‘काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी आपल्याला प्रवासी म्हणूनही तेथे पाय ठेवू देणार नाही !’ असे म्हटले आहे. त्यामुळे चिडलेले जीना भारताच्या गुप्तचरांनाही कळू न देता काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी आपले संस्थान पाकिस्तानात विलीन न केल्यास पुढे हाती घ्याव्या लागणार्‍या कारवाईची रुपरेषा आखतात. मात्र, त्यात तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान सक्रियपणे कार्यरत असतात. परिणामी 22 ऑक्टोबरला पठाण टोळ्या मुजफ्फराबादवर अमानुष हल्ला करतात. घाबरलेले हरिसिंग भारताकडे मदतीची याचना करतात आणि 26 ऑक्टोबर रोजी भारताच्या विलीनकरण करारावर स्वाक्षरी करतात. संवैधानिकदृष्ट्या त्या दिवशी जम्मू काश्मीर (लडाखसहित) भारतात विलीन झाले.
तेव्हा भारतात - पाकिस्तानचा हल्ला परतवणे असाध्य नाही हे जाणलेले आपले सैनिक त्यात प्रत्येक टप्प्यावर यश मिळवत राहिले. इतक्यात, म्हणजे एक जानेवारी 1948 रोजी नेहरू यांनी माउंबॅटनच्या सल्ल्यानुसार हा विषय संयुक्त राष्ट्रसंघात नेऊन तिसर्‍याने मध्यस्थी करण्यास संधी मिळवून दिली. ते पुरे नसेल की काय एक जानेवारी 1949 रोजी युद्धविरामाची घोषणा केली. आजचा पाकव्याप्त काश्मीर त्याचाच परिणाम आहे. आपल्या सैनिकांना रोखले नसते तर नीलम खोर्‍यातील शारदापीठ (श्रीनगरपासून सुमारे 130 किलोमीटर अंतर) आज आपल्या अधिकारात सुरक्षित राहिले असते.
घटना 2 : 1949 : काँग्रेस कार्यकारिणी संविधानाच्या मसुदा प्रतीला अंतिम स्वरुप देण्यात रत होते. त्याच वेळेला गोपालस्वामी अय्यंगार यांना जम्मू - काश्मीरची जबाबादारी सोपवली होती. गोपालस्वामींच्या मागे लागलेल्या शेख अब्दुल्ला यांनी कलम 370 चा मसुदा तयार करुन त्यांची संमती मिळविण्यात यशस्वी झाले. मात्र, ते संविधानात समाविष्ट व्हावे, यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीत चर्चा होऊन स्वीकारायला हवे होते. संसदेत गोपालस्वामी यातील तरतुदी सांगताना गोंधळ झाला. तेव्हा नेहरू नेहमीप्रमाणे सुटाबुटात विदेश प्रवासात होते. नाईलाजाने गोपालस्वामींनी सरदार पटेलांकडे मदतीची याचना केली. त्यावर पटेल यांचे निजी सचिव व्ही. शंकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर पटेल यांनी काय सांगून त्यांचे समाधान केले माहीत आहे? ‘शेख अब्दुल्ला आणि गोपालस्वामी या दोघांपैकी कोणीही शाश्‍वत नाही. भारताचे भविष्य सरकारची शक्ती, सामर्थ्यावर उभी आहे. त्यावरच आपला विश्‍वास नसेल तर आपण एक देश म्हणून अस्तित्व टिकविण्यास पात्र नाही !’
पहिली घटना घडली तेव्हाच प्रत्युत्तर दिले असते तर हे राहिलेच नसते. तेव्हा नेहरू आंतरराष्ट्रीय समुदायाचे दार ठोठावल्यामुळेच आज अमेरिका पावलोपावली नाक खुपसण्यासाठी सज्ज आहे. उद्याच्या जेवणाचीही भ्रांत असलेला पाकिस्तान आपली परिस्थिती बिघडली तरीही वेळोवेळी काश्मीरच्या जखमेवरील खपल्या काढून आनंदित व्हायचा. आपल्यामधील कलह, आपण स्थैर्य मिळवू शकतो, हे सांगणारे धैर्यधर पटेल या देशाचे पहिले पंतप्रधान बनू शकले नाहीत, हे आपले दुर्दैव होय. नेहरुंच्या अनुपस्थितीत त्यांच्या सचिवाचा अवमान नको, या एकमेव उद्देशाने मसुदा स्वीकारण्यासाठी सहकार्य केलेल्या पटेलांना असलेली नैतिक प्रज्ञा ही त्यांच्या असीम व्यक्तिमत्त्वाचा आरसाच आहे. एकूणच, काश्मीरच्या विषयात चारजण प्रात:स्मरणीय आहेत. सरदार पटेल, कलम 370 विरुद्ध लढतानाच काश्मीरमध्ये बलिदान दिलेले श्यामाप्रसाद मुखर्जी, 1990 च्या त्या अंधकारात आपली संपूर्ण ताकद लावून हिंदूंचे संरक्षण करणारे तत्कालीन राज्यपाल जगमोहन मल्होत्रा आणि पटेलांच्या जन्मभूमीचे आणखी एक पुत्र नरेंद्र दामोदरदास मोदी.
 कलम 370 ला हात घातल्यास आकाशच कोसळेल म्हणून बोंब मारणार्‍या राजकीय धुरीणांना राहत्या घरी नजरकैदेत ठेवले. फुटीरतावाद्यांना तिहार कारागृहात टाकले. दगडफेक करणार्‍यांचे हात बांधून ठेवले. ही रात्र संपून दिवस उजाडण्याच्या आत जे घडले ते चमत्कार नव्हे. दीड वर्षाहून अधिक काळ अतिसतर्कतेने आखलेल्या रणनीतीचे हे प्रतिफल, हे एक मुख्य तथ्य आहे. काश्मीरचे कोणतीही मुस्लीम व्यक्ती नाराज झाली नाही. त्यांना या कलमाविषयी कधीही विशेष आस्था नव्हती. मी काश्मीरात सर्वाधिक मुस्लिमांसोबतच फिरले. सुशिक्षितांची भावना आपल्या शहरातील युवकांपेक्षा वेगळी नाही. निश्‍चितच प्रलय येणार नाही.
आता यापुढे काश्मीरला भेट देणार्‍यांना पडझड झालेली घरे, फोडलेली मंदिरे, हरवलेले सांस्कृतिक अवशेष पाहायला मिळाले नाही तरी पुरेसे आहे. त्यांचे संवर्धन खरेच कष्टदायक आहे. आपण एक देश म्हणून राहण्यास पात्र असल्याचे मोदी सरकारने दाखवून दिले आहे. लक्षात असू द्या, संपूर्ण जगात शतकानुशतके अव्याहतपणे ख्रिस्ती आणि मुस्लिम आक्रमणांना सामोरे जावे लागूनही संस्कृती, सभ्यता वाचवू शकले ते केवळ आपले राष्ट्र. सनातन धर्मीय म्हणून अभिमान बाळगायला संधी मिळाली, हे पुण्यच होय. काश्मीर खराच भारताचा मुकुटमणी झाला,  अशावेळी श्रीकृष्णांची उक्ती आठवते, ‘धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।...’
- August 12, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

सिद्धगंगेचा लोकजंगम






बाराव्या शतकात दासोह शब्दाला बसवण्णांनी क्रियाशील रुप दिले. त्यांच्यानंतरच्या अनेक अनुयायांनी ही परंपरा पुढे चालवल्याचे दाखले इतिहासात मिळत असले तरी आपल्याला त्याचा अर्थ समजून घेण्याचा, पाहण्याचा योग शरण परंपरेतील सिद्धगंगा मठाने दिला.  तर पद्मभूषण डाॅ. शिवकुमार स्वामी यांनी कर्म, भक्ती, ज्ञान या योगत्रयांच्या बळावर आणि अन्न, अक्षर, आश्रय या त्रिविध दासोहाच्या आधारे या मठाला कर्नाटकातच नव्हे तर देशभरात गौरवाचे स्थान मिळवून दिले. त्यामुळे ते चालता बोलता ईश्वर (नडेदाडुव देवरू) बनले.  अशा शतायुषयी स्वामीजींचे २१ जानेवारी रोजी वयाच्या १११ व्या वर्षी निधन झाले. … 
 भगवी कफनी घातलेला जंगम असे का? 
कर्णकुंडल , हस्तमुद्रिका बाळगलेला जंगम असे का? 
केवळ संन्यासी सारे जंगम असती का? 
वेषधरी सारे जंगम असती का?
अज्ञानी सारे जंगम असती का? 
भूभारी  सारे जंगम? नव्हेत. 
जंगम कोण म्हणजे, 
सीमा नसलेला निस्सीम हा जंगम, 
आशा नसलेला निरासक्त हा जंगम, 
चिंता नसलेला निश्चिंत हा जंगम, 
अशा जंगमाची चाहूल न लागल्याने, 
कूडल चेन्नसंगय्या स्वत:च जंगम झाला. 
श्री चेन्नबसवण्णांनी या वचनात सांगितलेल्या जंगमाच्या लक्षणाप्रमाणे पद्मभूषण डाॅ. शिवकुमार स्वामी हे निस्सीम, निरासक्त आणि निश्चिंत होते. ८८ वर्षांचे संन्यस्त जीवन, ७७ वर्षे मठाधीश म्हणून कायक निर्वाह हे संख्यात्मकदृष्ट्या आश्यर्चकारक आहे. मात्र, यापेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांचा निकटचा लोकसंपर्क. त्यांच्या दृष्टीने संन्यास हा समाजापासून अंतर आणि धार्मिक गोष्टींपुरते सीमित नव्हते. मनुष्याची आंतरिक उन्नती हाच त्यांच्या चिंतनाचा प्राधान्याचा विषय होता. त्यासाठी सशक्त व्यक्तित्व घडवणारे शिक्षण गोरगरीब आणि वंचित समूहांना मिळवून देण्यासाठी आजीवन ते राबले.

अनपेक्षितपणे सिद्धगंगा मठाचा उत्तराधिकारी झालेला शिवण्णा शिवकुमार स्वामी झाला. मात्र, त्यांनी आपल्या वैराग्यभाव, संयमी, दृढसंकल्प, कार्यदक्षता, वाकपटुत्व, संस्कृत, कन्नड व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्व, सेवाकांक्षा आणि बसवादि शिवशरणांनी प्रतिपादित कायक व दासोह तत्त्वांच्या आचरणाने मठाला लौकिक प्राप्त करुन दिले. १९३० मध्ये श्री मरुळाराध्य स्वामी यांच्या निधनानंतर श्री उद्दान शिवयोगी यांनी मठाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केली. शिवण्णा बंगळुरुत पदवीचे शिक्षण घेत होता.   मठाधिपती मरुळाराध्य स्वामी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तो मठात आला होता. ते संपल्यांतर श्री उद्दान शिवयोगी यांनी त्याला जवळ बोलावले, म्हणाले, तुला एक गोष्ट सांगतो. तू नकार देऊ नकोस. आता तूच या मठाचा उत्तराधिकारी. हे शिवण्णासाठी अनपेक्षित होते. तरीही त्याने क्षणाचाही विचार न करता  होकार दिला. तारुण्यात अनेक आमिषे हात जोडून समोर उभ्या असतात. भविष्याची स्वप्ने असतात. तशी त्यांचीही असतील आणि त्यांच्या वडिलांसह कुटुंबियांनीही पाहिल्या असतील. मात्र, त्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करतात त्याने भगव्या वस्त्रातील संन्यस्त जीवनाचा हा कंटकाकीर्ण मार्ग स्वीकारला.   १९४१ मध्ये मठाची सूत्रे त्यांच्या हाती आली तेव्हा ६० विद्यार्थ्यांची संस्कृत पाठशाळा आणि छोटेसे वसतिगृह होते.  तेथे आज १३१ शैक्षणिक संस्थांतून ४९ हजार १४७ विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवली जात आहे.  तर अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशातच 'एसआयटी' या नावाने ख्याती मिळवली आहे.  सरकार शिक्षणाला अधिक महत्व देत नसतानाच्या काळात मठाने त्याचे महत्व ओळखले. योग्य शिक्षण, वसतिगृह आणि भोजन याद्वारे हजारो मुलांचे जीवन उजळवले. 'ज्ञान हाच दीपस्तंभ' हा शिवकुमार स्वामी यांचा विचार होता. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर 'शिक्षण हे व्यक्ती व राष्ट्र या दोहोंसाठी सशक्तीकरणाचे माध्यम आहे. कारण आपल्या देशाचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित राहू शकेल. योग्य आणि चांगले शिक्षण हे एक असे माध्यम आहे जे मनुष्याला शक्तिसंपन्न बनवते. तसेच त्याला समाजातील वाईट गोष्टींपासून मुक्त ठेवते.’  विशेष म्हणजे १० हजार विद्यार्थ्यांच्या निवास, भोजनाची आणि रोज दर्शनासाठी येणाऱ्या तीन हजारांहून अधिक भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते.  मठातील अनेक दशकांपूर्वीची पेटती चूल आजही गोरगरीब, अनाथ विद्यार्थ्यांसह भाविकांसाठी नंदादीप बनली आहे. 'जेवणारा यजमान, वाढणारा दास' असे शिवकुमार स्वामी म्हणायचे. त्यामुळेच रात्रीही मठात आलेला भाविक उपाशीपोटी गेल्याचे आजपर्यंत एकही उदाहरण नाही. त्यांनी त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था लावली होती. मठासाठी रोज लागणारे धनधान्य पाहिल्यास थक्क करणारे आहे. रोज तीन टन तांदूळ, दीड टन रागी पीठ, तीन क्विंटल तूरडाळ, ४ क्विंटल भाजीपाला, तीन क्विंटल कांदा, २०० नारळ आदी अन्य वस्तू लागतात. हजारो विद्यार्थ्यांच्या भोजन आणि भाविकांच्या प्रसादाची सोय करणाऱ्या या मठाच्या स्वामीजींचे आहार होते केवळ दोन इडली, एक लहान रागी मुद्दी आणि कुडनिंबाचा काढा!

शिवकुमार स्वामी यांनी बसवण्णांचा कायकवे कैलास हे तत्व जीवनात प्रत्यक्षात आणले. त्यांच्यावर बसवण्णांसह स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. गरीब, दुबळे, रोगी वैगरेंमध्ये ज्यांना शिव दिसतो, ते खरेखुरे शिवाचे उपासक होत. तेच खरोखर शिवाची उपासना करीत असतात आणि जो माणूस केवळ प्रतिमेमध्येच शिवाची उपासना करीत असतो, त्याने धर्मजीवनाला नुकतीच सुरुवात केली आहे, असे म्हणता येईल, फक्त मंदिरांमध्येच शिव आहे, असे मानणाऱ्या व्यक्तीपेक्षा जी व्यक्ती जात किंवा धर्म विचारात न घेता , एका देखील गरीब माणसाची शिव बोधाने सेवा करते तिच्यावर शिव अधिक प्रसन होतात, हा विवेकानंदांचा विचार त्यांनी अनुसरला. ते रोज वि्दयार्थ्यांना नीतिकथा सांगायचे. त्यात बसवण्णा, विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या संदर्भातील कथा सर्वाधिक असायच्या. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबन, शिक्षणाबरोबर जीवनशिक्षणाचेही धडे दिले. त्यांच्यावर श्रमसंस्कार केला.  त्यांच्यासोबत मठात आणि शेतात राबणारे ते कायकयोगी होते.  त्यांच्यात धर्म आणि कर्म यांचा समन्वय होता. त्यामुळेच राष्ट्रकवी जी. एस. शिवरुद्रप्पा, ज्येष्ठ साहित्यिक जी. एस. सिद्धलिंगय्या, गो. रु. चन्नबसप्पा, कुं. वीरभद्रप्पा आदी अनेकविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मठाच्या शिक्षण संस्थांतून घडली. श्री शिवकुमार स्वामी यांनी बसवण्णांच्या विचारांच्या प्रसारासाठी कार्य केले. तसेच शेती विकासासाठी कृषी, जनावरे प्रदर्शनासह विविध उपक्रम राबवले. मठाची वार्षिक यात्रा ही रयत यात्रा म्हणूनच ओळखली जाते. त्यांनी आध्यात्मिक जागृती, सांस्कृतिक परंपरेचे रक्षण, संस्कृतचे पुनरुज्जीवनही केले. 

स्त्रियांविषयी शिवकुमार स्वामी म्हणतात, स्त्री ही कुटुंबाचे नेत्र आहे. ती चांगली राहून आपल्या मुलांना चांगले घडवली तर ते कुटुंब चांगले बनेल. एकेक कुटुंब चांगले बनले तर समाज चांगले बनायला किती वेळ लागेल ? एकदा काही मुली ट्रेकिंगसाठी सिद्धगंगा डोंगराव गेली होती. प्रसादाच्या वेळेस त्या सिद्धगंगा मठात गेल्या. पसाद भवनाच्या दारात त्या थांबल्या. आपण प्रसादाला स्वतंत्र रांगेत बसावे का, हे विचारण्यासाठीत्या थांबल्या होत्या. तितक्यात तेथे आलेल्या श्री शिवकुमार स्वामीजींचे त्यांच्याकडे लक्ष गेले. ते बाहेर का थांबले आहेत, याविष्यी त्यांनी त्यांना विचारणा केली. त्यावर एका मुलीने सांगितले, पाळीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे आम्ही स्वतंत्र रांगेत बसावे का, विचारण्यासाठी थांबलो आहोत. त्यावर स्वामीजी खिन्नतेने म्हणाले,  ही एक नैसर्गिक दैहिक प्रक्रिया आहे. यात संकोचण्यासारखे काय आहे. चला त्याच रांगेत बसा, असे सांगितले. तसेच म्हणाले, आई होण्याचे सौभाग्य प्रत्येकाला मिळत नाही. स्त्रियांनाच स्त्रियांच्या देहाविषयी सन्मानाची भावना हवी. निसर्गप्रेरित दैहिक प्रक्रियेविषयी संकोच नसावा.  नारीकुलच देव आहे, असा शिवशरणांनी उद्घोष केला. बसवेश्‍वरांसह शरणांनी स्त्रियांना समान संधी प्राप्त करुन दिली. त्यामुळे शिवशरणींनी अनुभव मंटपाच्या चर्चेत भाग घेतानाच वचनांची रचना केली. जिला पाहिल्यानंतर माझे मन आकर्षित होईल त्या     परवधूला महादेवी मानेन! तसेच लिंग - जंगम एकच मानल्यानंतर स्त्रिया पार्वतीसमान आहेत, असा विचार बसवेश्वरांनी मांडला. ही परंपराच शिवकुमार स्वामी यांनी पुढे चालवली. 


चौकट 
धर्मनिरपेक्ष धोरणामुळे बनले सर्वांचे श्रद्धाकेंद्र 
सिद्धगंगा मठ वीरशैव लिंगायत समुदायाचे असले तरी श्री शिवकुमार स्वामी यांच्या धर्मनिरपेक्ष धोरणामुळेच ते सर्व वर्गातल्या भक्तांचे श्रद्धाकेंद्र बनले. शैक्षणिक संस्थांत येणाऱ्या विद्यार्थी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांत त्यांनी कोणताही भेद केला नाही.  कन्नडद कोट्यधिपती कार्यक्रमात भगवद्गीतेचे श्लोक सहजगत्या व पटापट उच्चारत गंगावतीच्या हुसेन बाशा याने एक कोटीचे बक्षीस मिळवले. हुसेनने सिद्धगंगा मठातच शिक्षण घेतले. बक्षीस मिळवल्यानंतर हुसेन आधी स्वामींच्या दर्शनासाठी सिद्धगंगा मठ गाठला होता.   

मुलांमध्येच देव पाहिला 
दोन महिन्यांपूर्वी श्री शिवकुमार स्वामी यांची प्रकृती बिघडल्याने चेन्नईच्या रेला रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते आयसीयूमध्येच इष्टलिंग पूजा करत होते. तेव्हा डाॅ. मोहमद रेला यांनी त्यांना विचारले, 'स्वामीजी आपण रोज पूजा करता ना? आपणास ईश्वराचे दर्शन झालेय ?' त्यावर स्वामीजी हसत म्हणाले, 'होय, मी देव पाहिलाय.' तर देव कुठे आणि असा आहे, हे आम्हालाही दाखवा, डाॅ रेला म्हणाले. त्यावर पुन्हा हसत स्वामीजी म्हणाले, 'एकदा आमच्या मठाला या आपल्याला दहा हजार देव दाखवेन.' हे उत्तर ऐकून डाॅ. रेला आश्चर्यचकित झाले. स्वामीजी पुढे म्हणाले, 'होय, माझ्यासाठी मुलेच देव आहेत. त्यांच्यातच मी देव पाहिलाय. मठातील मुलांसाठीच मी रोज इष्टलिंग पूजा करतो. हे उत्तर ऐकून डाॅ. रेला काही काळ स्तब्ध झाले. 

थक्क करणारी दिनचर्या 
श्री शिवकुमार स्वामी यांची दिनचर्या विस्मयकारक व थक्क करणारी होती. रात्री दोन वाजता झोपेतून उठणे, पूजा, ध्यान, भक्तांसह वेदमंत्र, वचने, भक्तिगीत गायन, गुरु, लिंगव जंगमाराधना, इष्टलिंगार्चनेनंतर प्रसादग्रहण, विद्यार्थ्यांसह प्रार्थना, मार्गदर्शन, भाविकांना दर्शन, मठाची कार्यालयीन कामे, पुन्हा रात्री स्नान, पूजा, वाचन आदी संपवून ते रात्री अकरा वाजता झोपायचे. सुरुवातीची अनेक वर्षे ते मठातील बांधकाम, शेतातील पिके काढणे, गायीसाठी चारा कापून आणणे आदी कामे करायचे. तसेच वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायचे. मात्र, मठाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या दिनचर्येत कोणताही बदल झाला नाही.  
अप्पासाहेब हत्ताळे, सोलापूर 
९०४९२९०१०१
ReplyForward
- August 12, 2019 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

माध्यमाची शक्ती अन् अहंकारी नेतृत्वाचा शेवट

  धारवाड… कर्नाटकातील ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाणारे शहर. पण याच शहराने एक काळ असा पाहिला, जेव्हा शिक्षण, संस्कृती आणि प्रगतीच्या ओळ...

  • ಲಿಂಗಾಯತ, ವೀರಶೈವ, ಹಿಂದೂ ಪದಗಳ ಸುತ್ತಮುತ್ತ…
    ಎಲ್ಲ ವೀರಶೈವರು ವೇದಗಳಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆ ಹೊಂದಿದ್ದು, ಹಲವು ದೈವಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಯಿರುವವರು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವೇದ-ಸಂಸ್ಕೃತ ಪಾಠಶಾಲೆಗಳನ್ನು ಹಲವು ವೀರಶೈವ ಮಠಗಳು ನ...
  • ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಹಿಂದೂಸಂಸ್ಕೃತಿಯ ಭಾಗ
    ವೀ ರಶೈವ-ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮಕ್ಕಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಹೋರಾಟ ಸದ್ಯಕ್ಕೆ ತಣ್ಣಗಾಗುವ ಲಕ್ಷಣವಿಲ್ಲ. ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮದ ಬೇಡಿಕೆಯು ಧರ್ಮವನ್ನು ಇಬ್ಭಾಗಗೊಳಿಸು...
  • संत साहित्याचे अभ्यासक : दा. का. थावरे
    माझ्या शालेय आणि पुढे महाविद्यालयीन जीवनात ‘ दैनिक संचार ’ मधील ‘ नौबत ’ आणि ‘ चिंतन ’ या दोन सदरांचा माझ्यावर प्रभाव राहि...

Search This Blog

  • Home

About Me

My photo
अप्पासाहेब चंद्रकांत हत्ताळे. निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर गेल्या 20 वर्षांपासून मराठी पत्रकारितेत
View my complete profile

Report Abuse

Blog Archive

  • ▼  2026 (1)
    • ▼  May (1)
      • माध्यमाची शक्ती अन् अहंकारी नेतृत्वाचा शेवट
  • ►  2025 (1)
    • ►  July (1)
  • ►  2024 (17)
    • ►  September (1)
    • ►  August (16)
  • ►  2023 (26)
    • ►  September (10)
    • ►  August (1)
    • ►  July (1)
    • ►  April (2)
    • ►  March (1)
    • ►  February (11)
  • ►  2021 (3)
    • ►  November (1)
    • ►  August (2)
  • ►  2020 (2)
    • ►  February (2)
  • ►  2019 (5)
    • ►  August (5)
  • ►  2018 (8)
    • ►  May (1)
    • ►  March (6)
    • ►  February (1)
  • ►  2017 (30)
    • ►  November (2)
    • ►  October (1)
    • ►  April (1)
    • ►  March (5)
    • ►  February (21)
Simple theme. Powered by Blogger.